जनार्दन स्वामी

जनार्दन स्वामी ओव्या

जनार्दन स्वामी ओव्या – एकूण ४ ओव्या

जनार्दन स्वामी ओव्या – १.

अनंत निर्गुण सर्वां ठायीं पूर्ण ।
न करी निर्वाण दासालागीं ॥
हांकेबरोबरी धांवोनी सत्वरी ।
भक्तालांगीं तारी गुरुनाथ ॥
सुंदर तें ध्यान वसे औदुंबरीं ।
व्याघ्रचर्मधारी शोभतसे ॥
काषाय अंबर दंडकमंडलु ।
डमरु त्रिशुलु शंखचक्र ॥
किरीट कुंडलें रुद्राक्षाच्या माळा ।
वैजयंती गळां हार रुळे ॥
सूर्य चंद्र नेत्र शेषफणी छत्र ।
पीतांबर वस्त्रपरिधान ॥
गुरुचरणीं सर्व तीर्थाची मिरासी ।
म्हणोनी जगासी उद्धरिती ॥
जनार्दन म्हणे न लगे ब्रम्हाज्ञान ।
गुरुचरणीं मन राहो सदा ॥


जनार्दन स्वामी ओव्या – २.

आतां गुरुराया परिसा विज्ञापना ।
दासाची करुणा येऊं द्यावी ॥
नेणोनियां सोय फिरलों दिशा दाही ।
झाले दु:ख देहीं बहुसाल ॥
तुमची ब्रीदावळी पतितपावन ।
कीर्ति हे ऐकोन शरण आलों ॥
माझा मायबाप गणगोत बंधु ।
तूंचि कृपासिंधु गुरुराया ॥
आतां कांहीं नेणें तुमच्या पायांविणें ।
संसाराचें पेणें दूर केलें ।
जोडोनियां हात शिर पायांवरी ।
ठेविलें निधारी जनार्दनें ॥


जनार्दन स्वामी ओव्या – ३.

कंठी राहो नाम हा माझा नवस ।
पुरवावी आस गुरुराया ॥
वसोनी अंतरीं बोलवीं उत्तर ।
जेणें हा संसार सार होय ॥
सर्व चराचरीं द्दष्टि ऐसी करीं ।
दावीं रूप हरी अखंडित ॥
ऐसिया वासने स्वामी साहय होणें ।
काल वांयां जाणें ऐसे न हो ॥
तुजऐसा नाहीं त्रिभुवनीं उदार ।
कृपें देईं वर जनार्दन ॥


जनार्दन स्वामी ओव्या – ४.

अहो सद्रुरु अनंता ।
फार काय बोलूं आतां ॥
नारायणा कृपावंता ।
असों द्यावी माझी चिंता ॥
भलते याती हो कां जन्म ।
परी आवडो गुरुनाम ॥
नामें पतित तारिले ।
पशुपक्षी मोक्षा नेले ॥
मातंगाचे मुखीं वेद ।
लीलें करविला संवाद ॥
जरी करिसी अंगीकार ।
तरी काय माझा भार ॥
जनार्दन चिंती भावें ।
याचें स्मरण असों द्यावें ॥
मुळीं नाहीं गुण म्हणोनि निर्गुण ।
ब्रम्हा परिपूर्ण गुरुनाथ ॥
ज्याचे गुण गातां वेद मौनावला ।
शेष ओढवला झाला शय्या ॥
ब्रम्हादिक ज्याचे झाले आज्ञाधर ।
मानव पामर कोण पुढें ।
तोचि कृष्णातीरीं वसे औदुंबरीं ।
दासां कृपा करीं तारावया ॥
राव रंक याती वर्व न विचारी ।
भाविकां अंतरीं राहे सदां ॥
स्मरतां येतो ऐसें वेद बोभाईला ।
तया तो ब्रीदाला रक्षीतसे ॥
जया चित्तीं ठेवा कल्याण असावें ।
गुरुसी रिधावें शरण वेगें ॥
ऐसी वेदवाणी ऐकोनिया कानीं ।
जनार्दना मनीं निश्चय झाला ॥

जनार्दन स्वामी ओव्या समाप्त


हे पण वाचा: संत जनार्दन स्वामी यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published.