संत चोखामेळा सांगत आहेत, सोवळ्या-ओवळ्यापलीकडचा देव !
ईश्वर हा नित्य, शुद्ध, मुक्त व आनंददायी असतो. सोवळे ओवळे असते, ते मनुष्याला, ईश्वराला नाही. मात्र लोकांनीच काही संभ्रम निर्माण करून ठेवले आणि त्यातच अडकून राहिले. अशा लोकांना सोवळ्या ओवळ्या पलीकडच्या देवाची ओळख करून देण्यासाठी संत चोखामेळा यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या अमोघ शैलीतून देवाची खरी ओळख करून दिली .
संत चोखामेळा म्हणतात, कि हा विटाळ आला तरी कोठून? पूर्व जन्मीच्या कर्मानुसार हा विटाळ वंश परंपरेने आपणास आला काय? पूर्वजन्मी तरी कर्म करण्याची बुद्धी कोणी दिली? या प्रश्नांचा धागा लांबवतांना तो थेट ब्रह्मतत्त्व पर्यंत जाऊन पोहचतो. या एका तत्त्वापासून सर्व सृष्टीची निर्मिती झाली. मग एक सोवळा व दुसरा ओवळा, असं भेदभाव कसा झाला?एका बीजापासून निर्माण झालेल्या वृक्षास फळे सारखीच गोड येणार. दोन तीन नासकी निघाली, तर बिजातच दोष आहे, अशी शंका घेणार का? ही शंका संत चोखामेळा यांनी सांगितली आहे. विटाळ असेल, तर तो सर्वांनाच आहे. सोवळा कोण? आणि ओवळा कोण? हे सांगणे अवघड आहे. चोखा म्हणे मज नवल वाटते, वितळपरते आहे कोण?
हे पण वाचा: भक्त पुंडलिका साठी देव विटेवर उभा
सर्वांचा जन्म विटाळातूनच होता, असे त्यांना सांगायचे होते. त्यांच्या मते, सोवळ्या ओवळ्या पलीकडचा एक विठ्ठल सोवळा, अरुप आगळा विटेवरी । म्हणून कोणाच्या संगतीने देव विटाळतो व पाण्यानी शुद्ध होतो, हे त्यांना मान्य नाही. जो सोवळा आहे, खरे पाहता देव सोवळ्या ओवळ्याच्या पलीकडचा आहे. चोखोबा म्हणतात कि-निचाचे संगती देवो विटाळलापाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला, मुळीच सोवळा कोठे तो गोवळा, पाहत पाहणे डोळा जयापरी, सोवळ्याचे ठायी सोवळा आहे, वोवळ्या ठायी वोवळा कान राहे, चोखा म्हणजे देव दोहाच्या वेगळा, तोचि म्या देखील दृष्टीभरी।
भगवंताला नियमांच्या चौकटीत न अडकवता, आपणही चौकटी पलीकडचा निर्गुण पराआत्मा बघायला शिकले पाहिजे. एवढेच काय, तर संत असेही म्हणतात, चराचरात भगवंताला बघायला शिका,म्हणजे मनातून भेद भेद दूर राहील आणि पारआत्म्याचे स्वरूप नजरेस पडेल. असा सोवळ्या ओवळ्या पलीकडचा देव सर्वांना भेटावा, हीच तळमळ चोखोबांच्या या अभंगातून प्रगट होत आहे.
ध न्य वा द
ref:lokmat
______________________________________________________________________________