संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२


मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली ।
पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय ।
तेथें भरोनि वोसंडिली गे माये ॥१॥
अभिनव रुप कैसें मना अगोचर अरुप रुपासि आलें ।
तें हें कल्पद्रुमातळीं ठाण मांडूनि देहुडें ।
तेणें आनंदघनें निवविलेंगे माये ॥ध्रु०॥
चिदानंदाची मांदुस किंचिदघन चिदाकाश ।
तेज: पुंज प्रकाश चरणीं शोभा ॥
निडारलें दृष्टि पाहतां रुपाचा एकवळा ।
कैसा साकारे सोहळा भोगीतसे गे माये ॥२॥
सकळ तीर्थ अर्तिलीं । तीं ऋषिवृंदें घेऊनि बैसलीं ।
पावन झालीं । चरणांगुष्ठीं ॥
वाकी तोडरु गजरीं । गर्जतसे नानापरी तो श्रुतिनादु अंबरीं ।
सांठवलागे माये ॥३॥
उपनिषदाचा गाभा । परी देहुडा पाउलीं उभा ।
जानुजघनींच्या प्रभा । नभ धवळलें ॥
सुरंग सोनसळा । वरी वेढिला पिंवळा ।
त्यावरी गाठियला मेखळा । रत्नखचितगे माये ॥४॥
हा जगडंबरु जगदाभासु । कीं ठसावला आभासु ।
नाभिकमळीं प्रकाशु । चतुरानना ॥
पाहता तेथींची हाव । मना न पुरे तेथींची थाव ।
म्हणउनि सगुण ध्यान । करी तुझेगे माये ॥५॥
ब्रह्मांडाचिया कोडी । रोमरंध्रीं उतरंडी ।
मदन सांडुनिया प्रौढी । उदरा आला ॥
सुघटित वक्षस्थळ । निरोपम केवळ ।
वरी पदयुगुळ । द्विजोत्तमगे माये ॥६॥
चहूं पुरुषार्थांचें साधन । तोचि आयुधें मंडन ।
बाहीं बाहुवटे मंडन । मंडना आलें ॥
वीर कंकण मनगटीं । कांडोवांडीं मुद्रा दाटी ।
कैसा अलोहित नखें बोटीं ।वेणु वाहे वो माये ॥७॥
ब्रह्म ऐसें धेनु आतला । कीं सुधारसु मुराला ।
तोचि नादु सुस्वर आला । पावया छंदें ॥
अधरीचें अमृत । पिकलेंसे ब्रह्मरस ।
तेणें जाला सौरसु । गोपिजनागे माये ॥८॥
नयनींचे तारे । दो पक्षीं प्रेम पुरे ।
द्वैताद्वैत एकसरें । ठकलें ठेलें ॥
कुंडलाचिये दीप्ती । लोपला गभस्ती ।
सुखस्वरुपाची शांति । येणे सुखेंगे माये ॥९॥
आतां पाहतां पाहतया दृष्टी नपुरे । ध्यातां मनचि नुरे ।
आंत बाहेरी पुरे । व्यपूनि ठेला ॥
मावळलिया दृष्टि पाहातां देखणें ठसावलें ।
निर्गुण गुणासि आलें । सदोदित गे माये ॥१०॥
आतां हा केंवि पाहावा । पाहातयेचि दृष्टि ।
मन मनेंचि दिधली मिठी । तेथील ते गोडी रुपासी आली ॥
म्हणती निवृत्ति । ज्ञानदेवा पाहे चित्तीं ।
आतां जागृतीच्या अंती । सुखशातिं रया ॥११॥

अर्थ:-
भगवान श्रीकृष्ण मदनमूर्ति विश्वरूपाने कशी अलंकृत झाली आहे, हे डोळ्यंने पाहता पुरवत नाही ! तेथील शोभा मनाने कितीही वेळ पाहू गेले असता तृप्ति होत नाही; त्या मूर्तीत असलेले सौंदर्य भरून ओसंडते की काय असे वाटते. ॥१॥ काय चमत्कार सांगावा, वास्तविक परमात्मस्वरूप अगोचर म्हणजे मनाला विषय न होणारे, ते कसे सुंदर रूपाला प्राप्त होऊन या कल्पद्रुमाखाली दिडक्या पायांनी उभे आहे; त्या आनंदघन सुंदर परमात्म्याने चित्ताला शांत करून ठेवले आहे. ॥धृ॥ ही श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ति म्हणजे चैतन्यरूप आनंदाची पेटीच किंवा चैतन्यरूप आकाश आहे असे वाटते; चरणाच्या ठिकाणी तेजःपुंज शोभा कशी पूर्ण आहे ते सर्व गुणांनी एकरूप झालेले सुंदर सगुणमूर्तीचे रूप पाहात असता, सुखाचा सोहळाच भोगतो आहे, असे वाटते, ॥२॥ जगातील सर्व तीर्थे ज्यांचा ऋषी आश्रय घेऊन बसले आहेत, ती तीर्थें भगवत् चरणांगुष्टाच्या स्पर्शाने पावन झाली आहेत, हातात वाक्याचा जोड आहे व पायात ( तोरड्या नावाचे भूषण ) जोड असून त्याचा नाना त-हेने ध्वनी होत आहे.तो नाना त-हेने होणारा शब्द आकाशात साठवून गेला आहे. ॥३॥ हा श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत गुह्य म्हणून उपनिषदांने प्रतिपादन केलेला निराकार असता, आमचे समोर हा आज वाकुड्या पाउलाने उभा आहे पहा ! त्याच्या पोट-याच्या व मांड्याच्या प्रभेने सर्व आकाश प्रकाशित होऊन गेले आहे.उत्तम सुवर्ण रंगाचा पीतांबर वेढलेला आहे, आणि त्यावर रत्नखचित अंगवस्र कंबरेला बांधले आहे. ॥४॥ वास्तविक त्याचे स्वरूप जगाएवढे असता ते लहानशा सगुण मूर्तीत कसे साठवले आहे ! त्याच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या नाभिकमळाची शोभा पाहात असता त्याचे मन तृप्त होत नाही; म्हणूनच हा सगुण ध्यान करतो की काय कोणास ठाऊक ? ॥५॥ ज्याच्या रोमरंध्रात ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी उत्पन्न होतात, व ज्याला पाहून मदन आपला अभिमान परित्याग करितो, आणि त्याच्या स्वरूपात प्रवेश करितो, ज्याचे वक्षस्थळ अत्यंत निरूपम असून ज्याच्यावर ब्राह्मणाच्या पायाचे चिन्ह आहे. ॥६॥ त्याच्या चारी हातातील आयुधे म्हणजे चारी पुरूषार्थाची साधनेच आहेत, सगळ्या जगाचे रक्षण करणारे बळ त्याच्या बाहूत असून वीरांच्या हातात असलेले काकण मनगटात आहे, आणि जागोजागी म्हणजे त्याच्या बोटात आंगठ्या आहेत; आणि रक्तवर्णाची नखें ज्याच्या बोटाला आहेत, त्याने हातात वेणू धारण केली आहे.. ॥७॥ या परमात्मा श्रीकृष्णाची मूर्ति, म्हणजे ज्याच्यात ब्रह्मरस आहे असा मेघ अवतरला की काय, किंवा अमृत मुरून त्याचा हा सगुण आकार बनला की काय असे वाटते.त्या वेणूचा सुस्वर उमटत आहे.यावरून असे वाटते की, भगवंतांच्या अधरात असलेला ब्रह्मरस पिऊनच सर्व गोपीजनाला अतिशय आल्हाद होतो. ॥८॥ त्याच्या दोन्ही डोळ्यातील तेजाचे तारे दोन्ही पक्षात म्हणजे द्वैताद्वैतात एकदम व्याप्त होऊन ठाकले आहेत म्हणजे राहिले आहेत; कानातील कुंडलाच्या प्रकाशाने सूर्यप्रकाश लोपून गेला; सुंदर स्वरूपाची शांती या सगुण सुखानेच प्राप्त होते. ॥९॥ या सगुण स्वरूपाला पाहत असता पाहणाऱ्याची दृष्टि तृप्त होत नाही.ध्यान करू गेले असता, मन शिल्लक राहत नाही.असे अंतरबाह्य त्याचे स्वरूप व्यापून राहिले आहे. ॥१०॥ पहाणेपणाची दृष्टी मावळली असता, पाहाणाराचे पाहणे या मूर्तीत एकरूप होऊन जाते; मूळचा निर्गुण परमात्मा सा सगुण होऊन राहिला आहे ! आता याला पहावा तरी कसा ? पाहणारा दृष्टीने पाहू गेला असता, मनाचे मनातच मिठी बसली तर या स्वरूपाच्या दर्शनाची गोडी प्रकट होते.श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, या श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात पाहा, म्हणजे त्या दर्शनाच्या जागृतीने शेवटी सुखशांती होईल. ॥११॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥


मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *