एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय तिसावा

एकनाथी भागवत – आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

जय जय सद्गुरु अनादी । जय जय सद्गुरु सर्वादी । जय जय सद्गुरु सर्वसिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुवा ॥१॥ जय जय वेदवाचका । जय जय वेदार्थप्रकाशका । जय जय वेदप्रतिपालका । जय जय वेदात्मका वेदज्ञा ॥२॥ जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका । जय जय विश्वनिवासका । अकर्तात्मका अव्यया ॥३॥ तुझी अव्यय अक्षर स्थिती । नाहीं नाम रुप वर्ण व्यक्ती । तो तूं नांदसी जातिगोतीं । लोकस्थितीव्यवहारें ॥४॥ तुज जगीं नाहीं दुसरें । तो तूं गृहस्थ घरदारें । तूं पुरुष ना नपुंसक साचोकारें । कीं स्त्रीपुत्रें नांदसी ॥५॥ अज आणि वंदिसी पिता । अजन्मा तो नमिसी माता । जगीं तुझी सर्वसमता । शेखीं अरिमित्रता चाळिसी ॥६॥ तूं जगन्नाथ जगचाळक । कीं एकाचा होसी सेवक । तूं परिपूर्ण पूर्णात्मक । कीं मागसी भीक रंकत्वें ॥७॥ तूं नैष्ठिक ब्रह्मचारी । कीं व्यभिचारें तारिसी नारी । तूं सर्वज्ञ कीं गुरुच्या द्वारीं । तृणकाष्ठें शिरीं वाहसी स्वयें ॥८॥ जो तूं कळिकाळातें ग्रासिसी । तो तूं बागुलाभेणें लपसी । तूं मायानियंता हृषीकेशी । शेखीं माया बांधिजशी उखळीं ॥९॥ तूं आत्माराम नित्यतृप्त । शेखीं गोवळांचा खाशी भात । तुझा ब्रह्मादिकां न कळे अंत । तो तूं उभा रडत यशोदेपाशीं ॥१०॥ त्रैलोक्य दाविसी उदरीं । तो तूं गोपिकांचे कडियेवरी । तूं जगाचा चाळक श्रीहरी । त्या तुज लेंकुरीं शिकविजे चालूं ॥११॥ जो तूं सर्ववंद्य सर्वेश्वर । तो तूं होसी पांढरा डुकर । एवं करितां तुझा निर्धार । वेदांसी विचार कळेना ॥१२॥ वेदीं घेतलें महामौन । ज्ञाते झाले नेणकोण । योगी वळंघले रान । तुझें महिमान कळेना ॥१३॥ मुख्यत्वें जन्म नाहीं ज्यासी जाण । तो कृष्ण कैसें दावी मरण । तें ऐकावया निरुपण । परीक्षिती पूर्ण श्रद्धाळू ॥१४॥ प्रथमाध्यायीं वैराग्यार्थ । मुसळ बोलिलें शापयुक्त । तेंचि ग्रंथावसानीं एथ । असे पुसत परीक्षिती ॥१५॥


एकनाथी भागवत – श्लोक १ ला राजोवाच – ततो महाभागवते उद्धवे निर्गते वनम् । द्वारवत्यां किमकरोद्भगवान् भूतभावनः ॥१॥

जो पांडवकुळीं कुळरत्नग । कीं कौरवकुळीं कुळभूषण । जो धर्माचें निजरक्षण । कलीचें निग्रहण जेणें केलें ॥१६॥ ऐसा राजा परीक्षिती । धैर्यवीर्य उदारकीर्ति । तेणें स्वमुखें श्रीशुकाप्रती । केली विनंती अतिश्रद्धा ॥१७॥ उद्धव पावोनि पूर्ण ज्ञान । तो बदरिकाश्रमा गेलिया जाण । मागें द्वारकेसी श्रीकृष्ण । काय आपण करिता झाला ॥१८॥ उत्त्पत्तिस्थितिनिदान । जो इच्छामात्रें करी जाण । तो स्वदेहाचें विसर्जन । कैसेनि श्रीकृष्ण करिता झाला ॥१९॥


एकनाथी भागवत – श्लोक २ रा

ब्रह्मशापोपसंसृष्टे, स्वकुले यादवर्षभः । प्रेयसीं सर्वनेत्राणां, तनुं स कथमत्यजत् ॥२॥

ब्रह्मशापें श्रीकृष्णनाथ । निःशेष निजकुळासी घात । कैसेनि करविला एथ । हें सुनिश्चित सांगावें ॥२०॥ जननयना आल्हादकर । कृष्णतनु अतिसुंदर । जीसी देखतांचि त्रिनेत्र । हर्षें निर्भर स्वानंदें ॥२१॥ ऐशी आल्हादकारक तनु । कैसेनि सांडी श्रीकृष्णु । ब्रह्मशापासी भिऊनु । तो कां निजतनु सांडिता झाला ॥२२॥ कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । त्यासी बाधीना शापबंधन । तोही सत्य करी ब्रह्मवचन । यादववंशीं तनु सांडूनी ॥२३॥ दृष्टीं देखतां श्रीकृष्ण । सुखें सुखावे जीवप्राण । त्याच्या सौंदर्याचें निरुपण । राजा आपण सांगत ॥२४॥


एकनाथी भागवत – श्लोक ३ रा

प्रत्याक्रष्टुं नयनमबला यत्रलग्नं न शेकुः, कर्णाविष्टं न सरति ततो यत्सतामात्मलग्नम् । यच्छ्रीर्वाचां जनयति रतिं किं नु मानं कवीनां, दृष्टवा जिष्णोर्युधि रथगतं यच्च तत्साम्यमीयुः ॥३॥

ज्याची अकराही इंद्रियां सदा गोडी । भोगिजे तंव तंव प्रीती गाढी । कदा वीट नुपजे अनावडी । अवीट गोडी कृष्णाची ॥२५॥ बाळा प्रौढा मुग्धा प्रगल्भा व्यक्ती । ऐशी चतुर्विधा स्त्रियांची जाती । तिंहीं देखिल्या श्रीकृष्णमूर्ती । दृष्टी मागुती परतेना ॥२६॥ ज्या धार्मिका धैर्यवृत्ती । ज्या पतिव्रता महासती । तिंहीं देखिल्या कृष्णमूर्ती । दृष्टि मागुती परतेना ॥२७॥ ज्या का अबळा अभुक्तकामा । ज्या अतिवृद्धा अतिनिष्कामा । तिंहीं देखिल्या मेघश्यामा । नयन सकामा हरिरुपीं ॥२८॥ जेवीं लवणजळा भेटी । तेवीं श्रीकृष्णीं स्त्रियांची दिठी । मिसळलिया उठाउठी । परतोनि मिठी सुटेना ॥२९॥ एवं देखिलिया श्रीकृष्णमूर्ती । स्त्रियांचिया निजात्मशक्ती । दृष्टि परतेना मागुती । ऐशी नयनां प्रीती हरिरुपीं ॥३०॥ स्त्रिया बापुडया त्या किती । जे का संत विरक्त परमार्थी । त्यांचे श्रवणीं पडतां कीर्ती । चित्तीं श्रीकृष्णमूर्ती ठसावे ॥३१॥ चित्तीं ठसावोनि श्रीकृष्णमूर्ती । चित्तचि आणी कृष्णस्थितीं । ऐशी कृष्णाची कृष्णकीर्ती । चित्तवृत्ती आकर्षी ॥३२॥ संतांची आकर्षी चित्तवृत्ती । हें नवल नव्हे कृष्णकीर्ती । कीर्ती ऐकतां असंतीं । तेही होती तद्रूप ॥३३॥ लागतां चंदनाचा पवन । खैर धामोडे होती चंदन । तेवीं कृष्णकिर्तिश्रवण । दे समाधान समसाम्यें ॥३४॥ भावें ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । असंतही संतत्वा येती । मग संतासंत दोनी स्थिती । हारपती समसाम्यें ॥३५॥ महाकवि वर्णितां श्रीकृष्णकीर्ती । पावले परम सौभाग्यस्थिती । ते कृष्णकीर्ती जे वर्णिती । तेही पावती ते शोभा ॥३६॥ कवीश्वरां नवरसिकु । नवरंगडा श्रीकृष्ण एकु । जो जो वर्णिजे रसविशेखु । तो तो यदुनायकु स्वयें होय ॥३७॥ महाकवि आदिकरुनी । कवीश्वरांची कीर्तिजननी । जे विनटले हरिकीर्तनीं । वंद्य वाणी तयांची ॥३८॥ श्रीकृष्णकीर्तिपवाडे । ज्याची वाणी अबद्धही पढे । ते वाचा वंदिजे चंद्रचूडें । त्याच्या पायां पडे यमकाळ ॥३९॥ जेथें श्रीकृष्णकीर्तिकीर्तन । तेथें कर्माकर्मांची उजवण । होय संसाराची बोळवण । जन्ममरणसमवेत ॥४०॥ यापरी कीर्तीचें महिमान । सर्वार्थीं अगाध जाण । श्रीकृष्णकीर्तिकविता जाण । परम पावन तिंही लोकीं ॥४१॥ कवीश्वरांची श्रीकृष्णकीर्ति । ऐकतां वाढे श्रद्धा प्रीती । तेणें थोरावे कृष्णभक्ती । हें कविताशक्ती अगाध ॥४२॥ ऐशी अगाध श्रीकृष्णकीर्ती । मा त्या कृष्णाची कृष्णमूर्ती । जे अखंड ध्यानीं देखती । ते ते होती तद्रूप ॥४३॥ ज्यांसी अखंड ध्यानीं श्रीकृष्णमूर्तीं । ते ते तद्रूप पावती । हें नवल नव्हे कृष्णस्थिती । जे द्वेषें देखती तेही मुक्त ॥४४॥ ज्याचे रथीं मेघश्याम । सारथी झाला पुरुषोत्तम । यालागीं पार्थाचा पराक्रम । मिरवी नाम विजयत्वें ॥४५॥ सदा जयशील संपूर्णु । यालागीं अर्जुना नाम ’जिष्णु’ । ज्याचे युद्धींचा कठिण पणु । सिद्धी श्रीकृष्णु पाववी ॥४६॥ तो बैसोनि अर्जुनाचे रथीं । विचरतां युद्धक्षिती । जे जे देखती श्रीकृष्णमूर्ती । ते ते कृष्णस्थिती पावले ॥४७॥ जेथ कृष्णाचा पडे पदरेणु । तेथें चहूं मुक्तींसी होय सणु । ऐशी पावन कृष्णतनु । कैसेनि श्रीकृष्णु सांडिता झाला ॥४८॥ म्हणाल ब्रह्मशापाभेण । शरीर सांडी श्रीकृष्ण । हा बोलचि अप्रमाण । कृष्ण ब्रह्म पूर्ण परमात्मा ॥४९॥ हेळण छळण दुर्वचन । द्विजा न करावा अपमान । त्यांचा वाढवावया पूर्ण सन्मान । तनुत्यागें श्रीकृष्ण द्विजशाप पाळी ॥५०॥ कृष्ण परमात्मा परिपूर्ण । तेणेंही निजकुळ निर्दळून । सत्य करी ब्राह्मणवचन । विप्रशापें आपण निजतनु त्यागी ॥५१॥ तो तनुत्यागप्रकार । साङग समूळ सविस्तर । सांगताहे शुक योगींद्र । परिसे नरेंद्र त्यक्तोदक ॥५२॥ पांडवकुळीं कुळदीपक । जन्मला परीक्षितीच एक । जो होऊनि त्यक्तोदक । भागवतपरिपाक सेवित ॥५३॥ ब्रह्मानारदव्यासपर्यंत । भागवत-उपदेश गुह्य गुप्त । तो परीक्षितीनें जगा आंत । केला प्रकटार्थ दीनोद्धारा ॥५४॥ धर्मवंशीं अतिधार्मिक । जन्मला परीक्षितीच एक । भागवतरसीं अतिरसिक । अति नेटक श्रवणार्थी ॥५५॥ ऐसा जो कां परीक्षिती । तेणें अत्यादरें केली विनंती । शुक सुखावोनि चित्तीं । काय त्याप्रती बोलिला ॥५६॥


एकनाथी भागवत – श्लोक ४ था ऋषिरुवाच – दिवि भुव्यन्तरिक्षे च, महोत्पातान् समुत्थितान् । दृष्टवाऽऽसीनान् सुधर्मायां, कृष्णः प्राह यदूनिदम् ॥४॥

शुक म्हणे परीक्षिती । उद्धव गेलिया वनाप्रती । मागें विघ्नभूत द्वारावती । त्रिविध उत्पातीं अतिव्याप्त ॥५७॥ दिवि-भुवि-अंतरिक्षगत । उठिले गा महोत्पात । दिवसा उल्कापात होत । भूतें खाखात अंतरिक्षीं ॥५८॥ गगनीं उगवले त्रिविध केतु । दंडकेतु धूमकेतु । शिखाकेतु अति अद्भुत । दिवसाही दिसतु सर्वांसी ॥५९॥ धरा कांपोनि अतिगजरीं । भूस्फोट झाला नगरद्वारीं । भूकंप तीन दिवसवरी । घरोघरीं आंदोळ ॥६०॥ वारा सुटला अति झडाडें । समूळ उन्मळतीं झाडें । द्वारकेमाजीं धुळी उडे । डोळा नुघडे जनांचा ॥६१॥ अंतरिक्षीं नग्न भूतें । धांवती खाखातें खिंखातें । रुधिरवृष्टि होय तेथें । अकस्मातें निरभ्रीं ॥६२॥ रविचंद्रांचें मंडळ । खळें करीत सर्वकाळ । ग्रह भेदिती ग्रहमंडळ । क्रूरग्रहमेळ शत्रुसदनीं ॥६३॥ सन्मुख आकाशाचे पोटीं । दिग्दाह देखती दृष्टीं । अभ्रेंवीण कडकडाटी । पडती वितंडीं महाविजा ॥६४॥ घारी झडपिती सत्राणें । जेवितां पुढील नेती भाणें । दिवसा दिवाभीत घुंगाणे । राजद्वारीं श्वानें सैंघ रडती ॥६५॥ बैसल्या सुधर्मासभेप्रती । संकल्पविकल्पांची निवृत्ती । ते सभेसी वीर वोसणती । मारीं मारीं म्हणती परस्परें ॥६६॥ तें ऐकतांचि उत्तर । दचकती महाशूर । सुधर्मासभेसी चिंतातुर । यादववीर समस्त ॥६७॥ यादव बैसले सभेसी। छाया देखती वीणशिसीं । सुधर्मासभेपाशीं । अरिष्टें ऐशीं उठतीं ॥६८॥ ऐशीं अरिष्टें अनिवार । दुःखसूचकें दुस्तर । देखोनि यादव थोरथोर । विघ्नविचार विवंचिती ॥६९॥ द्वारकेचें विघ्ननिर्दळण। करुं ठेविलेंसे सुदर्शन । ते द्वारकेमाजीं महाविघ्न । काय कारण उठावया ॥७०॥ जंव पातया पातें लवे । तंव चक्र एकवीस वेळा भंवे । ते द्वारकेसी विघ्न संभवे । देखोनि आघवे अतिचकित ॥७१॥ सर्व विघ्नांचें आकर्षण । करी या नांव म्हणिपे ’कृष्ण’ । तो कृष्ण येथें असतां जाण । उत्पात दारुण कां उठती ॥७२॥ एवं विचारारुढ यादवांसी । चितांतुर देखोनियां त्यांसी । बुद्धि सांगावया त्यांपाशीं । काय हृषीकेशी बोलत ॥७३॥


एकनाथी भागवत – श्लोक ५ वा श्रीभगवानुवाच- एते घोरा महोत्पाता द्वार्वत्यां यमकेतवः । मुहूर्तमपि न स्थेयमत्र नो यदुपुङगवाः ॥५॥

जो जगाचा सूत्रधारी । जो मायायंत्रींचा यंत्रकारी । तो यादवांप्रती श्रीहरी । आलोच करी विघ्नांचा ॥७४॥ यादवकुळासी आला प्रांत । हें जाणो श्रीकृष्णनाथ । यांचा द्वारकेसी होऊं नये घात । यालागीं समस्त प्रभासा धाडी ॥७५॥ द्वारावती सातवी पुरी । येथील मरण मोक्षोपकारी । यादव समस्त देवाधिकारी । यालागीं ते बाहेरी श्रीकृष्ण काढी ॥७६॥ कुळनाशाचें मूळ देखा । प्रभासीं निघालीसे एरिका । हाचि कृष्णाचाही आवांका । तो धाडी सकळिकां प्रभासासी ॥७७॥ यादवांसी ब्रह्मशाप । घडलासे घोररुप । यालागीं द्वारकेमाजीं संताप । उत्पातरुप उठती ॥७८॥ उत्पात उठले अनेक । हे अनिवार अरिष्टसूचक । अविलंबें तत्काळिक । परम दुःख पावाल ॥७९॥ यालागीं तुम्हीं आवश्यक । येथें न राहावें मुहूर्त एक । स्त्रिया पुत्र सुहृद लोक । तात्काळिक निघावें ॥८०॥ म्हणाल यादववीर उद्भट । आम्हांसी काय करील अरिष्ट । येणें गर्वें अतिअनिष्ट । परम कष्ट पावाल ॥८१॥ ब्राह्मणाचे शापापुढें । कायसें शौर्य बापुडें । तुम्हीं न विचारितां मागेंपुढें । आतांचि रोकडें निघावें ॥८२॥ द्वारकेमाजीं आजि कोणी । सर्वथा पिऊं नये पाणी । स्त्रीपुत्रसुहृदजनीं । परिवारोनि निघावें ॥८३॥ कुळासी घडला ब्रह्मशाप । तेणें द्वारकेसी उठिला संताप । तें फेडावया कुळाचें पाप । क्षेत्र पुण्यरुप प्रभास ॥८४॥


एकनाथी भागवत – श्लोक ६ वा

स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च, शङखोद्धारं व्रजंत्वितः । वयं प्रभासं यास्यामो, यत्र प्रत्यक् सरस्वती ॥६॥

वस्तीसी अतिगूढ शंखोद्धार । तेथें ठेवावीं स्त्रीवृद्धकुमार । आम्हीं समस्त यादववीर । निघावें सत्वर प्रभासेसी ॥८५॥ जेथें प्राची सरस्वती । मिळाली असे सागराप्रती । तेथें जाऊनि समस्तीं । करावें विघ्युक्तीं तीर्थविधान ॥८६॥


एकनाथी भागवत – श्लोक ७ वा

तत्राभिषिच्य शुचय, उपोष्य सुसमाहिताः । देवताः पूजयिष्यामः, स्नपनालेपनार्हणैः ॥७॥

तेथें वेदोक्तविधान । करावें तीर्थीं तीर्थस्नान । तीर्थविध्युक्त उपोषण । करावें आपण निराहार ॥८७॥ तेथें सद्भावें शुचिर्भूंत । राहोनियां समस्त । तीर्थदेवता विध्युक्त । निःशापार्थ पूजावी ॥८८॥स्नान वस्त्रें अलंकार । चंदनादि पूजासंभार । समर्पूनि पूजा षोडशोपचार । श्रद्धा हरिहर पूजावे ॥८९॥


एकनाथी भागवत – श्लोक ८ वा

ब्राह्मनांस्तु महाभागान्, कृतस्वस्त्ययना वयम् । गोभूहिरण्यवासोभिर्गजाश्वरथवेश्मभिः ॥८॥

वेदवेदांगपारंगत । शमदमादितपयुक्त । ब्राह्मण जे स्वधर्मनिरत । विघ्नशांत्यर्थ पूजावे ॥९०॥ व्हावया अरिष्टनिरसन । करिती शांत्यर्थ स्वस्तिवाचन । त्या ब्राह्मणांसी आपण । द्यावें दान श्रद्धायुक्त ॥९१॥ गोदान भूदान गजदान। अश्वदान सुवर्णदान । तिळदान वस्त्रदान । द्यावें गृहदान अतिश्रद्धा ॥९२॥ रथीं संजोगोनि अश्ववर । दान द्यावें रहंवर । द्विज सुखी होती अपार । तो तो प्रकार करावा ॥९३॥ जें जें ब्राह्मणा अपेक्षित । तें तें द्यावें श्रद्धायुक्त । ब्राह्मण तुष्टमान जेथ । अरिष्ट तेथ रिघेना ॥९४॥


एकनाथी भागवत – श्लोक ९ वा

विधिरेष ह्यरिष्टघ्नो, मङगलायनमुत्तमम् । देवद्विजगवां पूजा, भुतेषु परमो भवः ॥९॥

जेथ हरीचें देवतार्चन । जेथ शालग्रामशिलार्चन । जेथ साधुसंतां सन्मान । ते अरिष्टनाशन महापूजा ॥९५॥ जेथ सद्भावें द्विजपूजन । जेथ भावार्थें गोशुश्रूषण । जेथ भूतदया संपूर्ण । तेथें कदा विघ्न रिघेना ॥९६॥ अंध पंगु अशक्त जन । जेथ पावती अवश्य अन्न । जेथ सुखी होती दीन । तेथ कदा विघ्न बाधीना ॥९७॥ जेथें भूतदया अलोलिक । ते सकळ अरिष्टच्छेदक । परममंगळप्रकाशक । सुखदायक सर्वार्थीं ॥९८॥


एकनाथी भागवत – श्लोक १० वा

इति सर्वे समाकर्ण्य, यदुवृद्धा मधुद्विषः । तथेति नौभिरुत्तीर्य, प्रभासं प्रययू रथैः ॥१०॥

जो मधुकैटभमर्दन । जो मुरारी मधुसूदन । जो परमात्मा श्रीकृष्ण । तो करी प्ररण प्रभासा ॥९९॥ यादवांमाजीं वृद्ध सज्ञान । पुत्र मित्र सुहृद स्वजन । तिहीं श्रीकृष्णाचें वचन । बहुसन्मानें वंदिलें ॥१००॥ सकळ समृद्धिसंभारा । स्त्रीवृद्धादि बाळकुमारा । नावा भरोनियां समग्रा । शंखोद्धारा न्या म्हणती ॥१॥ पालाणोनि रथ कुंजर । चतुरंग सेनासंभार । कृष्णसहित यादववीर । निघाले समग्र प्रभासासी ॥२॥


एकनाथी भागवत – श्लोक ११ वा

तस्मिन् भगवताऽऽदिष्टं, यदुदेवेन यादवाः । चक्रुः परमया भक्त्या , सर्वश्रेयोपबृंहितम् ॥११॥

यादव प्रभासा पावोन । जैसें होतें श्रीकृष्णवचन । त्याहूनि विशेष जाण । स्नानदान तिंहीं केलें ॥३॥ यादव समस्त मिळोन । केलें पारणाविधिभोजन । मग महामद्य आणूनि जाण । मद्यपान मांडिलें ॥४॥


एकनाथी भागवत – श्लोक १२ वा

ततस्तस्मिन्महापानं, पपुमैरेयकं मधु । दिष्टविभ्रंशितधियो, यद्‌द्रवैर्भ्रश्यते मतिः ॥१२॥

करुनियां तीर्थविधान । करावें अरिष्टनिरसन । बाप अदृष्टाचें विंदान । तेथें मद्यपान मांडिलें ॥५॥ ज्याची गोडपणें पडे मिठी । उन्मादता अतिशयें उठी । तें मद्यपान उठाउठी । वडिलींधाकुटीं मांडिलें ॥६॥ ज्याचा वास येतांचि घ्राणीं । उन्माद चढे तत्क्षणीं । तैशिया मद्याचे मद्यपानीं । वीरश्रेणी बैसल्या ॥७॥ ’मैरेयक’ मद्याची थोरी । मधुरता अतिशयें भारी । लागतांचि जिव्हेवरी । भ्रांत करी सज्ञाना ॥८॥ तें मद्यपान यादववीरीं । आदरिलें स्वेच्छाचारीं । आग्रह करुनि परस्परीं । लहानथोरीं मांडिलें ॥९॥


एकनाथी भागवत – श्लोक १३ वा

महापानाभिमत्तानां, वीराणां दृप्तचेतसाम् । कृष्णमायाविमूढानां, संघर्षः सुमहानभूत् ॥१३॥

पूर्वी अतिमित्रत्व पोटांत । ते महापानें झाले मत्त । वीर मातले अतिदृप्त । नोकूनि बोलत परस्परें ॥११०॥ कृष्णमाया हरिला बोध । अवघे झाले बुद्धिमंद । सांडूनि सुहृदसंबंध । निर्वाणयुद्ध मांडिलें ॥११॥ नोकूनि बोलतां विरुद्ध। अतिशयें चढला क्रोध । शस्त्रें घेऊनि सन्नद्ध । सुहृदीं युद्ध मांडिलें ॥१२॥


एकनाथी भागवत – श्लोक १४ वा

युयुधः क्रोधसंरब्धा, वेलायामाततायिनः । धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभिः ॥१४॥

क्रोधें नेत्र रक्तांबर । वेगें वोढूनि हातियेर । समुद्रतीरीं महावीर । युद्ध घोरांदर ते करिती ॥१३॥ धनुष्यें वाऊनियां जाणा । बाण सोडिती सणसणां । खङगें हाणिती खणखणां । सुहृदांच्या प्राणां घ्यावया ॥१४॥ एकीं उचलोनियां भाले । परस्परें हाणिते झाले । एकीं गदा उचलोनि बळें । वीर कलेवरें पाडिती ॥१५॥ एक तोमरें लवलाहीं । राणीं खवळले भिडती पाहीं । एक टोणप्याच्या घायीं । वीर ठायीं पाडिती ॥१६॥ यापरी चतुरंगसेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती ॥१७॥


एकनाथी भागवत – श्लोक १५ वा

पतत्पताकै रथकुंजरादिभिः खरोष्ट्रगोभिर्महिषैर्नरैरपि । मिथः समेत्याश्वतरैः सुदुर्मदा, न्यहन् शरर्दद्भिरिव द्विपा वने ॥१५॥

पतकांसीं रथ कुंजर । रणीं पाडिले अपार । पाखरांसीं असिवार । मारिले खरोष्ट्र रणामाजीं ॥१८॥ म्हैसे मारुनियां रणीं । पाडिलिया वीरश्रेणी । जैसे उन्मत्त गज वनीं । दंतीं खणाणी भीडत ॥१९॥ यापरी यादववीर । रणीं मातले महाशूर । घाय मारोनि निष्ठुर । रणीं अपार पाडिले ॥१२०॥ कृष्णमाया केले भ्रांत । युद्धीं न देखतां स्वार्थ । परस्परें प्राणघात । व्यर्थ करित सुहृदांचा ॥२१॥ रणीं पाडिलें अपार । तंव खवळले कृष्णकुमर । ज्यांज्यांमाजीं प्रीति थोर । ते युद्धातुर चालिले ॥२२॥


एकनाथी भागवत – श्लोक १६ वा

प्रद्युम्नसाम्बौ युधिरुढमत्सरावक्रूरभोजावनिरुद्धसात्यकी । सुभद्रसंग्रामजितौ सुदारुणौ, गदौ सुमित्रासुरथौ समीयतुः ॥१६॥

ज्यांज्यांमाजीं अतिप्रीती । ते ते निर्वाणयुद्ध करिती । बाप संहारक काळगती । सखे मारिती सख्यांतें ॥२३॥ प्रद्युम्न सांब अतिमित्र । त्यासीं युद्ध मांडलें घोरांदर । अक्रूर भोज दोन्ही वीर । युद्धीं सत्वर मिसळले ॥२४॥ अनिरुद्ध आणि सात्यकी । उठावले क्रोधतवकीं । वाणीं वर्षोनि अनेकीं । एकमेकीं भीडती ॥२५॥ सुभद्र संग्रामजित दोनी । खवळले रणांगणीं । वर्षोनियां तीक्ष्ण वाणीं । उन्मत्त रणीं मातले ॥२६॥ कृष्णपुत्र कृष्णबंधु । दोंहीचेंही नाम गदु । त्यांसी समत्सर क्रोधु । युद्धसंबंधु परस्परें ॥२७॥ सुमित्र आणि सुरथ । या दोंहीसीं द्वेष अद्भुत । परस्परें करावया घात । युद्धा आंत मिसळले ॥२८॥


एकनाथी भागवत – श्लोक १७ वा

अन्ये च ये वै निशठोल्मुकादयः, सहस्त्रजिच्छतजिद्भानुमुख्याः । अन्योऽन्यमासाद्य मदान्धकारिता, जध्नुर्मुकुन्देन विमोहिता भृशम् ॥१७॥

यादवकुळीं बळें अधिक । निशठादि उल्मुकादिक । शतजित्सहस्त्रजिद्भानुमुख्य । हेही युद्धीं देख खवळले ॥२९॥ मद्यपानें अतिगर्वित । कृष्णमाया हरिलें चित्त । महामोहें केले भ्रांत । सुहृदां घात स्वयें करिती ॥१३०॥ ब्रह्मशापाची केवढी ख्याती । बंधु बंधूंतें जीव घेती । कृष्णमाया पाडिले भ्रांतीं । युद्ध स्वयातीमाझारीं ॥३१॥


एकनाथी भागवत – श्लोक १८ वा

दाशार्हवृष्ण्यन्धकभोजसात्वता, मध्वर्बुदा माथुरशूरसेनाः । विसर्जनाः कुकुराः कुन्तयश्च, मिथस्ततस्तेऽथ विसृज्य सौहृदम् ॥१८॥

यादवांची एक जाती । तेचि बारा नामीं नामांकिती । त्या बाराही ज्ञाती युद्धीं भिडती । ऐक परीक्षिती तीं नामें ॥३२॥ दाशार्ह सात्वक अंधक जाण । अर्बुद माथुर शूरसेन । कुंती कुकुर विसर्जन । मधु भोज वृष्ण्य बारा नामें ॥३३॥ पूर्वील यादवांचें साजणें । ज्ञातीचें अल्पही ऐकतां उणें । जीवेंसीं सर्वस्व वेंचणें । परी वांचवणें स्वयाती ॥३४॥ तेचि यादव पैं गा आतां । सांडोनियां सुहृदता । ज्याचे चरणीं ठेविजे माथा । त्याच्या जीवघाता पेटले ॥३५॥


एकनाथी भागवत – श्लोक १९ वा

पुत्रा अयुध्यन्पितृभिर्भ्रातृभिश्च, स्वस्त्रीयदौहित्रपितृव्यमातुलैः । मित्राणि मित्रैः सुहृदः सुहृद्भिर्ज्ञातींस्त्वहन् ज्ञातय एव मूढाः ॥१९॥

कृष्णमाया आकळिलें चित्त । अवघे झाले परम भ्रांत । न कळे आप्त अनाप्त । रणीं उन्मत्त मातले ॥३६॥ ज्याचे चरण वंदिजे भावार्था । श्रद्धा घेइजे चरणतीर्था । त्या निजपित्याचिया माथां । पुत्र शस्त्रघाता प्रवर्तले ॥३७॥ बंधु शिरकल्या रणांगणीं । बंधु बंधूंतें सोडवी निर्वाणीं । तेचि बंधु बंधूंतें रणीं । निर्वाणवाणीं खोंचिती ॥३८॥ जो लळे पुरवूनि खेळविता । जैसा बाप तैसा चुलता । त्यासी पुतण्या प्रवर्ते घाता । शस्त्रें माथां हाणोनी ॥३९॥ कन्येचा सुत दौहित्र । ज्यासी श्राद्धीं अधिकार । तो आज्यासी करी मार । घाय निष्ठुर हाणोनी ॥१४०॥ मामाभाचे परस्परीं । प्रवर्तले महामारीं । सुहृद सुहृदांच्या शिरीं । सतेज शस्त्रीं हाणिती ॥४१॥ मित्र मित्रांच्या मित्रतां । वेंचिती अर्था जीविता । ते मित्र मित्रांच्या जीवघाता । सक्रोधता उठिले ॥४२॥ आयुष्य सरलें निःशेख । चढलें काळसर्पाचें विख । अवघे होऊनियां मूर्ख । ज्ञातीसी ज्ञाति देख वधिते झाले ॥४३॥


एकनाथी भागवत – श्लोक २० वा

शरेषु क्षीयमाणेषु, भज्यमानेषु धन्वसु । शस्त्रेषु क्षीयमाणेषु, मुष्टिभिर्जर्हु-रेरकाः ॥२०॥

युद्ध मांडिलें घोरांदर । सरले भातडींचे शर । धनुष्यदंडें येरायेर । घायें निष्ठुर हाणिती ॥४४॥ घाय हाणितां अतिबळें । धनुष्यें मोडलीं तत्काळें । क्षीण झालीं शस्त्रें सकळें । हतियेर-बळें खुंटलीं ॥४५॥ ब्रह्मशापाची एरिका । तीरीं निघाली होती देखा । ते मुष्टीं घेऊनि क्रोधतवका । एकमेकां हाणिती ॥४६॥


एकनाथी भागवत – श्लोक २१ वा

ता वज्रकल्पा ह्यभवन् परिघा मुष्टिना भृताः । जघ्रुर्द्विषस्तैः कृष्णेन, वार्यमाणास्तु तं च ते ॥२१॥

ते एरिका घेतांचि हातीं । झाली वज्रप्राय धगधगिती । अतितीक्ष्ण परिघाकृती । तेणें हाणिती परस्परें॥४७॥ नाना शस्त्रें लागतां पाहीं । यादव न डंडळती कंहीं । तेही एरिकेच्या घायीं । पडती ठायीं अचेतन ॥४८॥ एरिकेच्या निजघायीं । यादवांसी उरी नाहीं । दुधड तोडूनियां पाहीं । पडती ठायीं परस्परें ॥४९॥ रणीं पाडूनियां इतर । यादव उरले महाशूर । जे कां नेटके जुंझार । निधडे वीर निजयोद्धे ॥१५०॥ यादव उरले भद्रजाती । हे आणिकासि नाटोपती । त्यां निर्दळावया निश्चितीं । निवरणार्थी हरि धांवे ॥५१॥ तो म्हणे ब्रह्मशापाची एरिका । है सर्वथा हातीं धरुं नका । सांडा युद्धाचा आवांका । शिकविले ऐका तुम्ही माझें ॥५२॥ धर्मतां निवारी श्रीकृष्ण । त्यासीही मारुं धांवले जाण । हें कृष्णमायेचें विंदान । न चुकत मरण पैं आलें ॥५३॥ एक म्हणती श्रीकृष्णासी । आधीं झोडोनि पाडा यासी । ठकूं आला आम्हांसी । म्हणोनि एरिकेसीं धांविन्नले ॥५४॥ एक म्हणती धरा केशीं । एक म्हणती भीड कायसी । एक म्हणे मी श्रीकृष्णासी । एका घायेंसीं लोळवीन ॥५५॥


एकनाथी भागवत – श्लोक २२ वा

प्रत्यनीकं मन्यमाना, बलभद्रं च मोहिताः । हन्तुं कृतधियो राजन्नापन्ना आततायिनः ॥२२॥

पैल पैल तो बळिभद्रु । हाचि आमुचा मुख्य शत्रु । यासी चला आधीं मारुं । यादवभारु लोटला ॥५६॥ मदमोहें अतिदुर्मती । वज्रप्राय एरिका हातीं । घेऊनि बळिभद्रावरी येती । तेणें तोही निश्चितीं क्षोभला ॥५७॥


एकनाथी भागवत – श्लोक २३ वा

अथ तावपि संक्रुद्धावुद्यम्य कुरुनन्दन । एरकामुष्टिपरिघौ, जरन्तौ जघ्नतुर्यधि ॥२३॥

शुक म्हणे कुरुनंदना । यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्णा । आततायी जाणा लोटले ॥५८॥ यादव उठले हननासी । देखोनि राम-हृषीकेशी । अतिक्रोध चढला त्यांसी । तेही युद्धासी मिसळले ॥५९॥ एरका जे कां परिघाकृती । वज्रप्राय धगधगिती । दोघीं जणीं घेऊनि हातीं । यादवां ख्याती लाविली ॥१६०॥ रामकृष्णांच्या निजघातीं । यादवांची जाती व्यक्ती । अवघेचि रणा येती । कृष्ण काळशक्तीं क्षोभला ॥६१॥ निजकुळाचें निधन । देखोनियां श्रीकृष्ण । कर्तव्यार्थ झाला पूर्ण । ऐसें संपूर्ण मानिलें ॥६२॥


एकनाथी भागवत – श्लोक २४ वा

ब्रह्मशापोपसृष्टानां, कृष्णमायावृतात्मनाम् । स्पर्धाक्रोधः क्षयं निन्ये, वैणवोऽग्निर्यथा वनम् ॥२४॥

ब्रह्मशापें छळिलें विधीं । कृष्णमाया ठकली बुद्धी । मद्यपान उन्मादमदीं । क्रोधें त्रिशुद्धी क्षया नेले ॥६३॥ वेळुवाच्या वेळुजाळीं । जेवीं कांचणीं पडे इंगळी । तेणें वनाची होय होळी । तेवीं यदुकुळीं कुलक्षयो ॥६४॥


एकनाथी भागवत – श्लोक २५ वा

एवं नष्टेषु सर्वेषुः कुलेषु स्वेषु केशवः । अवतारितो भुवो भार, इति मेनेऽवशेषितः ॥२५॥

स्वकुळ नाशूनि श्रीधर । अवशेष धराभार । उतरला मानी चक्रधर । तेणें सुखें थोर सुखावे ॥६५॥ जेवीं कां आलें पेरी माळी । निजजीवनें प्रतिपाळी ॥ शेखीं तोचि खणे समूळीं । तेवीं यदुकुळीं श्रीकृष्ण ॥६६॥ यादव निजबळें प्रतिपाळी । त्यातें स्वयें निजांगें निर्दळी । हें दाखवितां वनमाळी । ममतामेळीं अलिप्त ॥६७॥ कृष्ण पाळी यादवां समस्तां । त्यांची दाविली अतिममता । शेखीं करुनि कुळाचे घाता । निरभिमानता हरि दावी ॥६८॥ स्त्रीपुत्रेंसीं निजजीविता । सकळ कुळाच्या होतां घाता । ज्ञात्यासी नुपजे ममता । ते ’नित्यमुक्तता’ हरि दावी ॥६९॥ ज्ञात्यासी नाहीं अहंममता । तेचि दावावया तत्त्वतां । कुळेंसीं होतां पुत्रघाता । स्वप्नींही ज्ञाता ग्लानि नेणे ॥१७०॥ ब्राह्मणाचा शाप दारुण । अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । निजकुळ निर्दळी आपण । विप्रवचनसत्यत्वा ॥७१॥ करुनि कुळक्षयाचें काम । सुख मानी पुरुषोत्तम । तें देखोनि म्हणे बळराम । अवतारकर्म संपलें ॥७२॥


एकनाथी भागवत – श्लोक २६ वा

रामः समुद्रवेलायां, योगमास्थाय पौरुषम् । तत्त्याज लोकं मानुष्यं, संयोज्यात्मानमात्मनि ॥२६॥

मग बळिभद्रें आपण । समुद्रतीरीं योगासन । दृढ घालोनियां जाण । निर्वाणध्यान मांडिलें ॥७३॥ आकर्षूनि देहींचा प्राण । निःशेष सांडिला देहाभिमान । मग परमपुरुषध्यान । करितांचि आपण तद्रूप झाला ॥७४॥ जेवीं घटामाजील गगन । सहजें महदाकाश पूर्ण । तेवीं सांडितां देहाभिमान । झाला संकर्षण बळराम ॥७५॥ होतें मनुष्यनाटय अवलंबिलें । तें देह निःशेष त्यागिलें । जें कां पूर्वरुप आपुलें । तें होऊनि ठेलें बळिराम ॥७६॥ समुद्रतीरीं योगासन । तें देह ठेविलें अचेतन । हें रामनिर्याण देखोन । स्वयें श्रीकृष्ण सरसावला ॥७७॥


एकनाथी भागवत – श्लोक २७ वा

रामनिर्याणमालोक्य, भगवान् देवकीसुतः । निषसाद धरोपस्थे, तूष्णीमासाद्य पिप्पलम् ॥२७॥

बळभद्र झाला देहातीत । हें देखोनि देवकीसुत । भगवान् श्रीकृष्णनाथ । स्वयें इच्छित निजधाम ॥७८॥ तेव्हां धरातळीं धराधर । मौनें अश्वत्थातळीं स्थिर । वीरासनीं शार्ङगधर । श्यामसुंदर बैसला ॥७९॥ ज्याच्या स्वरुपाचे आवडीं । शिवविरिंच्यादि झालीं वेडीं । ज्याच्या दर्शनाची गोडी । दृष्टी नोसंडी क्षणार्ध ॥१८०॥ दृष्टीनें चवी चाखिली गाढी । तंव तंव रसना चरफडी । तिणें कीर्तनरसें रसगोडी । चवी चोखडी चाखिली ॥८१॥ प्राशनेंवीण कृष्णरस । रसना सेवी अतिसुरस । तेव्हां विषयरस तो विरस । होय निरस संसार ॥८२॥ श्रवणीं पडतां श्रीकृष्णकीर्ती । त्रिविध तापां उपशांती । ज्याची वर्णितां गुणनामकीर्ती । चारी मुक्ती कामार्यात ॥८३॥ चरणकमलमकरंद । तुळशीमिश्रित आमोद । सेवितां घ्राणीं परमानंद । इतर गंध ते तुच्छ ॥८४॥ ज्याचा लागतां अंगसंग । देहबुद्धीसी होय भंग । स्वानंदविग्रही श्रीरंग । अंगप्रत्यंगसुखकारी ॥८५॥ ज्याचे आवडीं वंदितां पाये । समाधि लाजिली मागें ठाये । तो अश्वत्थातळीं पाहें । बैसला आहे निजशोभा ॥८६॥ तें अंतकाळींचें कृष्णध्यान । शुकासी आवडलें संपूर्ण । तोही स्वानंदें वोसंडून । श्रीकृष्णध्यान वर्णित ॥८७॥


एकनाथी भागवत – श्लोक २८ वा

बिभ्रच्चतुर्भुजं रुपं, भ्राजिष्णु प्रभया स्वया । दिशो वितिमिराः कुर्वन्, विधूम इव पावकः ॥२८॥

प्रांतीचें श्रीकृष्णध्यान । पांचां श्लोकीं निरुपण । श्रोता परीक्षिती सावधान । वक्ता ज्ञानघन शुकयोगींद्र ॥८८॥ पिंपळातळीं प्रकाशघन । ते काळींची मूर्ति जाण । निजतेजें दीदीप्यमान । दिशा परिपूर्ण तेणें तेजें ॥८९॥ ना धूम ना इंगळ । आरक्ततेवीण अग्निजाळ । तैशी कृष्णमूर्ती तेजाळ । प्रकाश प्रबळ अतिदीप्त ॥१९०॥ कृष्णमूर्तीचे निजप्रभा । लोपली रविचंद्राची शोभा । शून्यत्वें ठाव नाहीं नभा । सच्चिदानंदगाभा साकार ॥९१॥ चैतन्यतेजें तनु मुसावली । शांतिरसाची वोतिली । चतुर्भुजत्वें रुपा आली । तेणें देशांची गेली काळिमा ॥९२॥


एकनाथी भागवत – श्लोक २९ व ३० वा

श्रीवत्साङंक घनश्यामं, तप्तहाटकवर्चसम् । कौशेयाम्बरयुग्मेन, परिवीतं सुमङगलम् ॥२९॥

सुन्दरस्मितवक्त्रााब्जं, नीलकुन्तलमण्डितम् । पुण्डरीकाभिरामाक्षं, स्फुरन्मकरकुण्डलम् ॥३०॥

कृष्णमूर्ति स्वच्छ स्वयंभ । अंगीं प्रत्यंगीं बिंबलें नभ । तेणें घनश्यामता-शोभ । अतिसप्रभ साजिरी ॥९३॥ आधींच नेटका श्रीकृष्ण । वरी घनश्यामता बाणली पूर्ण । तेणें मुसावलें बरवेंपण । लागलें ध्यान नरनारी ॥९४॥ नरनारी बापुडया किती । संन्यासी भुलोनि ठाती । विरक्त वेधले परमार्थी । देखोनि मूर्ती कृष्णाची ॥९५॥ देखतां श्रीकृष्णदर्शन । शिवासी लागलें नित्यध्यान । पार्वत्याही निजमन । कृष्णार्पण स्वयें केलें ॥९६॥ ऐसें अंगींचें बरवेंपण । त्याहीवरी हास्यवदन । साजिरें राजीवलोचन । आकर्ण पूर्ण आरक्त ॥९७॥ मस्तकींचे नीलालक । सुगंधसुमनीं गुंफिले चोख । कृष्णीं कृष्णरुप मधुक । कृष्णकेशीं देख विगुंतले ॥९८॥ स्फुरत्कुंडलें मकराकार । ऐसें वर्णिती कविवर । परी तीं आकारीं निर्विकार । श्रवणें विकार मावळती ॥९९॥ फावलिया कृष्णश्रवण । आकारविकारां बोळवण । ते श्रीकृष्णश्रवणीं पूर्ण । देदीप्यमान कुंडलें ॥२००॥ तप्त सुवर्णासमान । उभय पीतांबर जाण । एक कासे विराजमान । दुजा प्रावरण शोभत ॥१॥ ब्रह्मण्यदेवो श्रीकृष्ण । लक्ष्मी डावलूनि पूर्ण । दक्षिणांगीं विप्रचरण । श्रीवत्सलांच्छन गोविंद ॥२॥


एकनाथी भागवत – श्लोक ३१ व ३२ वा

कटिसूत्रब्रह्मसूत्रकिरीटकटकाङगदैः । हारनूपुर मुद्राभिः, कौस्तुभेन विराजितम् ॥३१॥

वनमालापरीताङंग, मूर्तिमद्भिर्निजायुधैः । कृत्वोरौ दक्षिणे पादमासीनं पङकजारुणम् ॥३२॥

कंठीं कौस्तुभ सोज्वळा । कटीं मिरवे रत्निमेखळा । ब्रह्मसूत्र रुळे गळा । आपाद वनमाळा शोभत ॥३॥ माथां मुकुटाचें खेवणें । लखलखीत अनर्घ्य रत्नेंु । कीर्तिमुखें बाहुभूषणें । वीरकंकणें विचित्रें ॥४॥ यंत्र उपास्ती उपासका । तैशा कराग्रीं करमुद्रिका । त्रिकोण षट्‌कोण कर्णिका । जडितमाणिका शास्त्रोक्त ॥५॥ वैजयंतीचा सोहळा । पदक एकावळी गळां । नाना रत्नेंो हार मुक्ताफळा । तुळशीमाळा सुगंधा ॥६॥ दोनी मोतीलग पदर । रत्नें जडित पीतांबर । किंकिणी क्षुद्रघंटिका विचित्र । मनोहर शोभती ॥७॥ वांकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार । रुळे बिरुदांचा तोडर । मनोहर हरिचरणीं ॥८॥ रातोत्पलां कठिणपण । त्यांहूनि सुकुमार चरण । घवघवीत श्रीकृष्ण । शोभा संपूर्ण शोभत ॥९॥ शंख चक्र गदा कमळ । मूर्तिमंत आयुधें सकळ । आश्रऊनि पिंपळ । बैसला केवळ वीरासनीं ॥२१०॥ त्या वीरासनाचें लक्षण । तळीं सूनि दक्षिण चरण । त्याचि मांडीवरी जाण । वामचरण आलोहित ॥११॥ लाजवूनि संध्यारागासी । उणें आणोनि बाळसूर्यासी । चरणशोभा हृषीकेशीं । अतिदीप्तीसीं आरक्त ॥१२॥


एकनाथी भागवत – श्लोक ३३ वा

मुसलावशेषायःखण्डकृतेषुर्लुब्धको जरा । मृगास्याकारं तच्चरणं, विव्याध मृगशङकया ॥३३॥

करुनि निजकुळाची होळी । सरस्वतीतीरीं वनमाळी । टेंकोनि बैसला पिंपळातळीं । चरणनवाळी आरक्त ॥१३॥ आरक्त श्रीकृष्णचरण । भावूनि मृगमुखासमान । जराव्याधें विंधिला बाण । अतिसत्राण भेदिला ॥१४॥ ब्रह्मशापाचें मुसल घन । यादवीं पिष्ट करितां जाण । उरला अवशेष लोहकण । तो समुद्रीं जाण टाकिला ॥१५॥ तो पडतांचि समुद्रजळीं । त्यातें मीन सगळेंचि गिळी । त्या मीनातें जराव्याध गळीं । जाळ्यामेळीं आकळित ॥१६॥ व्याध करी मीनविदारण । तंव निघाला तो लोहकण । त्याचा जराव्याधें केला बाण । तेणें कृष्ण चरण विंधिला ॥१७॥ मत्स्योदरींचा लोहघन । त्याचा केलिया दृढ बाण । थोर पारधी साधे संपूर्ण । व्याधें जाणोनि बाण तो केला ॥१८॥ भेदावया कृष्णचरण । मुळीं ब्रह्मशापचि कारण । यालागीं जराव्याधाचा बाण । कृष्णचरणीं पूर्ण खडतरला ॥१९॥ व्याधें अवचितें विंधिला । परी कृष्ण नाहीं दचकला । बाण सत्राणें खडतरला । तेणें सुखी झाला श्रीकृष्ण ॥२२०॥


एकनाथी भागवत – श्लोक ३४ वा

चतुर्भुजं तं पुरुषं, दृष्टवा स कृतकिल्बिषः । भीतः पपात शिरसा, पादयोरसुरद्विषः ॥३४॥

बाण श्रीकृष्णचरणीं पूर्ण भेदला । जराव्याधाचा हात निवाला । म्हणे म्यां मोठा मृग विंधिला । म्हणोनि धांवला धरावया ॥२१॥ देखोनि चतुर्भुज पुरुषासी । भय सुटलें जराव्याधासी । म्हणे मज घडल्या महापापराशी । परमपुरुषासी विंधिलें ॥२२॥ म्हणे कटकटा रे अदृष्टा । आचरविलें कर्मा दुष्टा । ऐशिया मज महापापिष्ठा । दुःखदुर्घटा कोण वारी ॥२३॥ जगाचा परमात्मा श्रीहरी । तो म्यां विंधिला बाणेंकरीं । माझ्या पापासमान थोरी । नाहीं संसारीं आनासी ॥२४॥ भयें सुटला थोर कंप । मज घडलें महापाप । जगाचें जें ध्येय स्वरुप । त्यासी संताप म्यां दिधला ॥२५॥ ज्याचे अमर वंदिती चरण । ज्यासी संत येती लोटांगण । त्या श्रीकृष्णासी विंधिला बाण । पाप संपूर्ण मज घडलें ॥२६॥ अवचटें आत्महत्या घडे । तें पाप कदा न झडे । जगाचा आत्मा कृष्ण वाडेंकोडें । ते आत्महत्या पडे मस्तकीं माझे ॥२७॥ जगाचें आत्महनन । कर्ता मी एक पापी पूर्ण । त्या पापाचें पुरश्चरण । सर्वथा जाण दिसेना ॥२८॥ प्रमादें ब्रह्महत्या घडे । तेणें पापें तो समूळ बुडे । तें पूर्णब्रह्म म्यां मूढें । बाणें सदृढें विंधिलें ॥२९॥ पापकर्मा मी व्याधरुप । तेणें म्यां जोडलें पाप अमूप । कृष्ण परमात्मा चित्स्वरुप । त्यासीही संताप दिधला म्यां ॥२३०॥ येणें अनुतापें तप्त पूर्ण । धांवोनि घाली लोटांगण । श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं जाण दृढ धरिले ॥३१॥ मर्दी दैत्यांचा अभिमान । मधुद्वेष्टा जो मधुसूदन । त्याचे दृढ धरुनि चरण । करी रुदन अट्टाहासें ॥३२॥ चरणीं घातली परम मिठी । उठवितां कदा नुठी । मज क्षमा करीं कृपादृष्टीं । कृपाळू सृष्टीं तूंचि एक ॥३३॥


एकनाथी भागवत – श्लोक ३५ वा

अजानता कृतमिदं, पापेन मधुसूदन । क्षन्तुमर्हसि पापस्य, उत्तमश्लोक मेऽनघ ॥३५॥

अतिभीत जराव्याध । म्हणे मी पापात्मा अतिअशुद्ध । नेणतां घडला हा अपराध । लिंगभेद मज घडला ॥३४॥ जो ईश्वरप्रतिमा उच्छेदी । तो महापापी लिंगभेदी । त्या तुज ईश्वरासी म्यां दुर्बुद्धीं । अदृष्टविधीं विंधिलें ॥३५॥ ऐसा मी पापी पापकर्मा । महापापी पापात्मा । माझा अपराध करावा क्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥३६॥ तूं कृपाळु त्रिजगतीं । गर्भीं राखिला परीक्षिती । गजेंद्राचें अतिआकांतीं । उडी कृपामूर्ती घातली ॥३७॥ पांडव जळतां जोहरीं । तुवां काढिले विवरद्वारीं । शेखीं अर्जुनाचा कैवारी । घेशी जुंझारी भीष्मासीं ॥३८॥ द्रौपदीचे अतिसांकडीं । धांवलासी लवडसवडीं । तिळभरी न दिसतां उघडी । नेसतीं लुगडीं तूं होसी ॥३९॥ ऐसी कृपाळुत्वाची ख्याती । श्रुतिपुराणें वाखाणिती । तुझी उत्तम श्र्लोककीर्ती । ऋषि वर्णिती महासिद्ध ॥२४०॥ नेणतां आचरलों दुष्कर्मा । तें मज करावया क्षमा । तूं कृपाळु परमात्मा । पुरुषोत्तमा क्षमाशीळ ॥४१॥ अजामिळ दुराचारी । पुत्रलोभें नाम उच्चारी । त्याचे पापाची झाली बोहरी । ऐशी निष्पाप थोरी नामाची ॥४२॥ नामें निष्पाप दुर्मती । नामें निष्पाप पितृघाती । नामें दुराचारी तरती । हे निष्पाप ख्याती नामाची ॥४३॥


एकनाथी भागवत – श्लोक ३६ वा

यस्यानुस्मरणं नृणामज्ञानध्वान्तनाशनम् । वदन्ति तस्य ते विष्णो, मयाऽसाधु कृतं प्रभो ॥३६॥

ज्या विष्णूचें नामस्मरण । कोटिजन्मांचें घन अज्ञान । नराचें निर्दाळी पूर्ण । सकळ कल्याणदायक ॥४४॥ ऐसें ज्याचें नामस्मरण । त्याचे स्वरुपासी म्यां जाण । निजबळें विंधिला निर्वाण बाण । अपराध पूर्ण हा माझा ॥४५॥ ज्याचें अगाध महिमान । सदा वर्णिती साधु सज्जन । जो स्वरुपें सच्चिद्धन । स्वामी श्रीकृष्ण जगाचा ॥४६॥ जगाचें जीवन श्रीकृष्ण । त्या कृष्णासही मी आपण । विंधिला निर्वाणींचा बाण । हा अपराध पूर्ण पैं माझा ॥४७॥ त्रैलोक्यराजा कृष्ण समर्थ । तो म्यां केला राजधात । जगाचा आत्मा श्रीकृष्णनाथ । तो आत्मघात म्यां केला ॥४८॥ श्रीकृष्ण जगाचा जनिता । त्या म्यां केलें पितृघाता । जगप्रतिपाळणीं श्रीकृष्णमाता । त्या मातृघाता म्यां केलें ॥४९॥ श्रीकृष्ण ब्राह्मण ब्रह्मबोध । तो म्यां केला ब्रह्मवध । याहीहोनि अगाध । जगीं अपराध असेना ॥२५०॥ राजघात आत्मघात । मातृपितृ-ब्रह्मघात । मजचि घडला समस्त । जे म्यां श्रीकृष्णनाथ विंधिला ॥५१॥


एकनाथी भागवत – श्लोक ३७ वा

तन्माशु जहि वैकुण्ठ, पाप्मानं मृगलुब्धकम् । यथा पुनरहं त्वेवं, न कुर्यां सदतिक्रमम् ॥३७॥

ऐशिया मज पापरुपासी । कृपा करावी हृषीकेशी । निष्कृती होय पापासी । त्या उपायासी करीं वेगीं ॥५२॥ कोरडिये कृपेचा संबंध । तेणें न फिटे दोषबाध । माझा जेव्हां तूं करिसी वध । तेव्हां मी शुद्ध होईन ॥५३॥ मी लुब्धक पापबुद्धी । मृगलोभी पशुपारधी । त्या मज तूं निजहस्तें वधीं । तैं मी त्रिशुद्धी उद्धरलों ॥५४॥ जेणें देहें केलें पापकर्मा । तो देह निवटीं पुरुषोत्तमा । पुढती ऐशिया असत्कर्मा । न करीं अधर्मा तें करीं ॥५५॥ बाण विंधिला तुझिया पायां । हें अगाध पाप केलें काया । तीसी शीघ्र वधावें यदुराया । तैं महापापा या होय निस्तारु ॥५६॥ जेणें देहें केलें पापाचरण । त्याचें प्रायश्चित्त हेंचि पूर्ण । करीं निजहस्तें देहदंडण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥५७॥ देहें केलें पापाचरण । देहलोभी तो पापी पूर्ण । स्थूल लिंग आणि कारण । यांचें करीं छेदन निजतेजचक्रें ॥५८॥


एकनाथी भागवत – श्लोक ३८ वा

यस्यात्मयोगरचितं न विदुर्विरिञ्चो, रुद्रादयोऽस्य तनयाः पतयो गिरां ये । त्वन्मायया पिहितदृष्टय एतदञ्जः, किं तस्य ते वयमसद्गतयो गृणीमः ॥३८॥

देहसंभवाचें मूळ जाण । स्थूल सूक्ष्म आणि कारण । यासी नातळतां तूं श्रीकृष्ण । चतुर्भुज संपूर्ण देह धरिसी ॥५९॥ स्थूळ-सूक्ष्म-कारणता । ये तिन्ही त्रिगुणेसीं नातळतां । तूं योगमायेचिया सत्ता । नाना अवतारता देह धरिसी ॥२६०॥ नवल तुझा लीलाविग्रहो । मत्स्य कूर्म श्वेतवराहो । होतां न धरिसी संदेहो । जन्मभयो तुज नाहीं ॥६१॥ वोडवल्या जन्म एक । ब्रह्मादिक होती रंक । तो तूं अवतार अनेक । धरिसी निःशंक निजात्मतां ॥६२॥ अदृष्टाचिये निजगतीं । देहासी नाना भोग होती । तूं अदृष्टेंवीण श्रीपती । नाना भोगसंपत्ती भोगिसी ॥६३॥ आयुष्य तंववरी देहधारण । वेदें नेमस्त केलें जाण । नवल तुझें लीलाविंदान । आयुष्येंवीण देह धरिसी ॥६४॥ काळसत्ता दुर्धर पूर्ण । ब्रह्मादिकां अलोट मरण । तुज काळ वेळ नसतां जाण । स्वलीला मरण दाविसी ॥६५॥ तुझे योगमायेची योगगती । लीलाविग्रहें देहस्थिती । अतर्क्य सर्वांसी सर्वार्थीं । तेही उपपत्ती निर्धारीं ॥६६॥ ब्रह्मा जगाचा आदिकर्ता । त्यासही न कळे तुझी सत्ता । तूं नाना अवतारीं देह धरिता । त्याचा कर्ता नव्हे ब्रह्मा ॥६७॥ तूं स्वलीला देह कैसा धरिसी । अवतारचरित्रें कैसीं करिसी । कैसेनि तो देहो सांडिसी । हें ब्रह्मादिकांसी कळेना ॥६८॥ ज्यासी तूं मानिसी अतिसन्मानीं । सदाशिव जो कां त्रिकाळज्ञानी । त्यासीही अतर्क्य तुझी करणी । शार्ङगपाणी श्रीकृष्णा ॥६९॥ सदाशिवाचे निजवचनीं । तूं दुजेन झालासी मोहिनी । ते शिवासी न कळे तुझी करणी । तत्क्षणीं तो भुलला ॥२७०॥ जाणोनि योग ज्ञान दोनी । सनकादिक ब्रह्मज्ञानी । जिंहीं मायापडळ छेदूनी । स्वानंदभुवनीं सुखरुप ॥७१॥ त्यांसीही तुझी स्वलीलाशक्ती । सर्वथा न कळेचि श्रीपती । ते जयविजयां शाप देती । सकोपस्थितीं वैकुंठीं ॥७२॥ पारंगत वेदशास्त्रार्थीं । बृहस्पत्यादि वाचस्पती । त्यांसीही लीलाविग्रहस्थिती । न कळे निश्चितीं श्रीकृष्णा ॥७३॥ जे सज्ञान ज्ञाते परमार्थी । त्यांसीही अतर्क्य अवतारशक्ती । मा इंद्रादि देवांसी ते स्थिती । कैशा रीतीं कळेल ॥७४॥ इंद्रादि देवां दिविभोगनिष्ठीं । माया आच्छादी तयांच्या दृष्टी । त्यांसी तुझे लीलेची गोष्टी । न कळे जगजेठी निश्चित ॥७५॥ तेथ मायावी देहवंता । उद्बोध नव्हे पैं सर्वथा । तुझी लीला श्रीकृष्णनाथा । अतर्क्य सर्वथा सर्वांसी ॥७६॥ सुखें होईल ब्रह्मज्ञान । परी तुझें स्वलीलादेहधारण । याचें नेणती पर्यवसान । अति सज्ञान साकल्यें ॥७७॥ तेथ मी तंव अधम जन । असद्गतीचें भाजन । त्या मज तुझें लीलावर्णन । सर्वथा जाण अतर्क्य ॥७८॥ आतां असो हें निरुपण । बहु बोलाचें काय कारण । माझ्या पापाचें पुरश्चरण । देहदंडपण करीं कृष्णा ॥७९॥ तुझेनि हस्तें देहदंडण । तेणें सकळ पापांचें निर्दळण । मज उद्धरावया जाण । हे कृपा पूर्ण करावी ॥२८०॥ म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण । ऐकोनि व्याधाचें स्तवन । कृपा श्रीकृष्ण तुष्टला ॥८१॥


एकनाथी भागवत – श्लोक ३९ वा श्रीभगवानुवाच – मा भैर्जरे त्वमुत्तिष्ठ, काम एष कृतो हि मे । याहि त्वं मदनुज्ञातः, स्वर्गं सुकृतिनां पदम् ॥३९॥

जो वेदार्थाचा मथित बोध । जो जगदादि-आनंदकंद । जो स्वरुपें स्वानंद शुद्ध । तो व्याधेंसीं गोविंद सकृप बोले ॥८२॥ तूं जीवघातक पारधी । भय मानिसी ममापराधीं । तुज अभय गा त्रिशुद्धीं । माझी कार्यसिद्धी त्वां केली ॥८३॥ कुमारीं सांब केला स्त्रीरुप । कपटें ब्राह्मणां आला कोप । कुळासी झाला ब्रह्मशाप । हा त्रिविध संकल्प माझाचि ॥८४॥ शापावशेष लोह जाण । त्याचा तुवां करोनि बाण । मृगलोभें विंधिला चरण । यासही कारण संकल्प माझा ॥८५॥ मी बुद्धीची अनादि बुद्धी । मी क्रियेची क्रिया त्रिशुद्धी । तेथें अहंकर्तृत्वाचे विधी । तूं वृथा अपराधी म्हणविसी ॥८६॥ मिथ्या धरुनि देहाभिमान । म्हणसी घडलें मज पाप पूर्ण । त्याही पापासी पुरश्चरण । माझें दर्शन मुख्यत्वें ॥८७॥ माझिया नामा एकासाठीं । जळती महापातकांच्या कोटी । त्या मज तुवां देखिलें दृष्टीं । परम भाग्यें भेटी घडली तुज ॥८८॥ माझी घ्यावया क्षणार्ध भेटी । एक रिघाले गिरिकपाटीं । एक योगयागसंकटीं । झाले महाहटी नेमस्त ॥८९॥ एवं नाना नेम आटाटी । शिणतांही कल्पकोटी । स्वप्नींही न लभे माझी भेटी । त्या मज त्वां दृष्टीं देखिलें ॥२९०॥ माझें होतांचि दर्शन । सकळ पातकां निर्दळण । तूं तंव पुण्यात्मा परिपूर्ण । पापाभिमान धरुं नको ॥९१॥ पापाभिमानें अधोगती । पुण्याभिमानें स्वर्गा जाती । निरभिमानें माझी प्राप्ती । सत्य वचनोक्ती पैं माझी ॥९२॥ तूं ऐसें मानिसी आपण । परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण । त्यासी विंधिला निर्वाणबाण । हें पाप दारुण अनिवार ॥९३॥ लोहपरिसा आलिंगन । तेणें लोह होय सुवर्ण । त्यासी फोडूं आल्या लोहघण । आघातें सुवर्ण तो होय ॥९४॥ तेवीं भक्तीं घेतल्या माझी भेटी । पातकें जातीं उठाउठी । का द्वेषें देखिल्या मज दृष्टीं । पातकां तुटी तत्काळ ॥९५॥ हो कां इतरांच्या अपराधतां । प्राणी पावे अधःपाता । तोचि अपराध माझा करितां । नित्यमुक्तता अपराध्यां ॥९६॥ ममापराधें नरक पावे । तैं माझें सामर्थ्य बुडालें आघवें । माझेनि अपराधें सुख पावे । मुक्तिवैभवें भयनिर्मुक्त ॥९७॥ विष म्हणोनि अमृतपान । केल्या अमरत्व न चुके जाण । तेवीं द्वेषेंही माझें दर्शन । करी पावन प्राण्यासी ॥९८॥ जाणोनि अग्नि लाविला घरीं । तो जाळूनि सर्वही भस्म करी । मा नेणतांही ठेविला वळचणीवरि । तोही करि तैसेंचि ॥९९॥ तेवीं भावें अथवा द्वेषें पूर्ण । ज्यासी घडे माझें दर्शन । तो होय परम पावन । हें सत्य जाण जराव्याधा ॥३००॥ मज ठाकावया निजधाम । त्वां सिद्ध केलें माझें काम । तेणें तुष्टलों मी आत्मारम । तूं पावन परम तिंही लोकीं ॥१॥ ज्या नांव म्हणसी ’पाप’ पूर्ण । जेणें देहें मज विंधिला बाण । तेणेंचि देहें तूं आपण । होसी स्वर्गभूषण सुरवंद्य ॥२॥ याग करुनि याज्ञिक । पावती सुख पतनात्मक । तैसें तुज न घडे देख । तूं अक्षय सुख पावसी ॥३॥ माझिया दर्शनाचें पुण्य । दिविभोगें नव्हे क्षीण । यालागीं अक्षय सुख संपूर्ण । तूं सर्वथा जाण पावसी ॥४॥ तूं विकल्प सांडोनियां पोटीं । जराव्याधा सवेग उठीं । मिथ्या नव्हती माझ्या गोष्टी । तूं अक्षय्य तुष्टी पावसी ॥५॥ तूं ऐसें जीवीं कल्पिसी । आपण निघालां निजधामासी । मागें अक्षय सुखासी । कोणापाशीं मागावें ॥६॥ जैसें बोलती इतर लोक । ममाज्ञा तैशी नव्हे देख । ठाकठोक आतांचि रोख । अक्षय सुख पावसी ॥७॥ माझे आज्ञेचें लाहोनि बळ । ध्रुव अद्यापि झाला अढळ । माझी आज्ञा वंदी कळिकाळ । कोणेपरी विकळ करुं न शके ॥८॥ ऐसें श्रीमुखें आपण । जंव बोलों नपुरे श्रीकृष्ण । तंव घवघवीत विमान । व्याधासी जाण उतरलें ॥९॥


एकनाथी भागवत – श्लोक ४० वा

इत्यादिष्टो भगवता, कृष्णेनेच्छाशरीरिणा । त्रिः परिक्रम्य तं नत्वा, विमानेन दिवं ययौ ॥४०॥

जो सदा पूजिजे सुरासुरीं । जो परमात्मा चराचरीं । जो लीलाविग्रहदेहधारी । जो योगीश्वरों वंदिजे ॥३१०॥ ऐसा अतिवरिष्ठ श्रीकृष्ण । तेणें जराव्याध आज्ञापून । कृष्ण इच्छामात्रें विमान । देदिप्यमान जें आलें ॥११॥ व्याघें देखोनि विमाना । हर्षें निर्भर झाला मना । तीन प्रदक्षिणा करुनि कृष्णा । नमूनि विमाना आरुढे ॥१२॥ व्याध आरुढोनि विमाना । क्रमूनि इंद्रचंद्रग्रहगणा । अक्षय सुख स्वर्गभुवना । कृष्णकृपें जाणा तो पावला ॥१३॥ जेणें अपकार केला पूर्ण । त्यासी उपकार करावा आपण । हें निज शांतिज्ञानलक्षण । स्वांगें श्रीकृष्ण स्वयें दावी ॥१४॥ ब्रह्मज्ञानाचे बोल बोलती । तैसें नाहीं कृष्णनाथीं । अंगें दावूनियां स्थिती । व्याध निश्चितीं उद्धरिला ॥१५॥ सकळ कुळाचें निर्दळण । झाल्याही मोह न धरी श्रीकृष्ण । जेणें निजांगें विंधिला बाण । तो व्याधही जाण सुखी केला ॥१६॥ समुद्रतीरीं घेऊनि रथ । दारुक उभा होता तेथ । तेणें न देखतां श्रीकृष्णनाथ । गवेषणार्थ निघाला ॥१७॥


एकनाथी भागवत – श्लोक ४१ वा

दारुकः कृष्णपदवीमन्विच्छन्नधिगम्यताम् । वायुं तुलसिकामोदमाघ्रायाभिमुखं ययौ ॥४१॥

कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख । शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक्‌ अवलोकी ॥१८॥ तंव कृष्णकंठींच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला । तेणें गंधाभिमुखें निघाला । तंव देखता झाला महातेज ॥१९॥


एकनाथी भागवत – श्लोक ४२ वा

तं तत्र तिग्मद्युभिरायुधैर्वृतं, ह्यश्वत्थमूले कृतकेतनं पतिम्। स्नेहप्लुतात्मा निपपात पादयो, रथादवप्लुत्य स बाष्पलोचनः ॥४२॥

तंव धगधगीत तेजागळा । दिव्य आयुधांचा मेळा । त्यांमाजीं घनसांवळा । श्रीकृष्ण डोळां देखिला ॥३२०॥ अश्वत्थातळीं धरुनि स्थान । घालूनियां वीरासन । निजतेजें विराजमान । दारुकें श्रीकृष्ण देखिला स्वयें ॥२१॥ कृष्ण देखतां लवडसवडीं । रथाखालीं घालूनि उडी । पोटींच्या सप्रेम आवडीं । धरिले तांतडीं हरिचरण ॥२२॥ नेत्रीं अश्रूचिया धारा । अंग कांपे थरथरा । तुजवेगळें शार्ङगधरा । अंधतम नेत्रा दृढ दाटे ॥२३॥


एकनाथी भागवत – श्लोक ४३ वा

अपश्यतस्त्वच्चरणाम्बुजं प्रभो, दृष्टिः प्रनष्टा तमसि प्रविष्टा । दिशो न जाने न लभे च शान्तिं, यथा निशायामुडुपे प्रनष्टे ॥४३॥

ऐके स्वामी श्रीकृष्णा । न देखतां तुझिया श्रीचरणां । जगदांध्य पडे नयनां । दिशांची गणना गणी कोण ॥२४॥ ज्ञानेंसीं मावळला विवेक । अणुमात्र न लभे सुख । तुज न देखतां मी देख । जड मूढ मूर्ख होऊनि ठेलों ॥२५॥ जेवीं नष्टचंद्राचिये रात्रीं । निबिड अंवसेचिये आंधारीं । तेवीं तुजवीण श्रीहरी । दृढ दाटे संसारीं अंधतम ॥२६॥ तुझे देखतांचि श्रीचरण । अंधतमा निर्दळण । जेवीं प्रकटतां रविकिरण । अंधारेंसीं जाण निशा नासे ॥२७॥


एकनाथी भागवत – श्लोक ४४ वा

इति ब्रुवति सूते वै, रथो गरुडलाञ्छनः । खमुत्पपात राजेन्द्र, साश्वध्वज उदीक्षतः ॥४४॥

ऐसें विनवी जंव दारुक । तंव परमाश्चर्य कांहींएक । देखतां झाला अलोलिक । पाखेंवीण देख उडाला रथु ॥२८॥ चहूं वारुवांसंयुक्त । गरुडध्वजेंसीं श्रीकृष्णरथ । ऊर्ध्वगतीं गगनाआंत । दारुकादेखत उडाला ॥२९॥ शुक म्हणे परीक्षिती । निजधामा जातां श्रीपती । आपुली ऐश्वर्यसंपत्ती । स्वेच्छा ऊर्ध्वगती स्वयें नेत ॥३३०॥ इहलोकीं ठेवूनि कीर्ती । निजवैभवविलास संपत्ती । आवरुनियां निजशक्ती । स्वयें ऊर्ध्वगती स्वसत्ता नेत ॥३१॥


एकनाथी भागवत – श्लोक ४५ वा

तमन्वगच्छन् दिव्यानि, विष्णुप्रहरणानि च । तेनातिविस्मितात्मानं, सूतमाह जनार्दनः ॥४५॥

रथ जातां ऊर्ध्वमंडळ । शंख चक्र गदा कमळ । तदनुलक्षित तत्काळ । दिव्यायुधें सकळ निघालीं ॥३२॥ ऊर्ध्वमंडळीं उडाला रथ । दिव्यायुधेंही समस्त । तें देखोनि अतिविस्मित । ठेला तटस्थ दारुक ॥३३॥ धुरे बैसोनियां नित्य । मी वागवीं श्रीकृष्णरथ । तो रथ ऊर्ध्वगतीं कृष्ण नेत । मज कां एथ सांडिलें ॥३४॥ मज सांडूनियां गोविंदें । नेलीं आपुलीं दिव्यायुधें । मी अभाग्य भाग्यमदें । त्यजिलों मुकुंदें निश्चित ॥३५॥ म्यां उडी घातली रथाखालती । हेचि माझी मंदमती । येरवीं मीही जातों ऊर्ध्वगती । कां श्रीपती रुसला ॥३६॥ जेणें चरणीं विंधिला बाण । तो व्याधही उद्धरिला जाण। मी भाग्यें अभागी पूर्ण । यालागीं श्रीकृष्ण मज त्यागी ॥३७॥ नित्य कृष्ण दृष्टीं पुढें । धुरे बैसोनि वागवीं घोडे । तो मी कृष्णावेगळा पडें । भाग्य कुडें पैं माझें ॥३८॥ मी श्रीकृष्णाचा सारथी । ऐशी त्रिलोकीं झाली ख्याती । तो मी वेगळा पडें अंतीं । कां श्रीपती रुसला ॥३९॥ यावज्जन्म भोगिलें कृष्णसुख । त्या मज वोडवलें वियोगदुःख । कृष्णा कां झालासी विमुख । मी दीन रंक पैं तुझें ॥३४०॥ माझा बोल अणुभरी । नाहीं अव्हेरिला हरी । त्या मज तूं श्रीहरी । अंतीं दुर्धरीं दुराविशी कां ॥४१॥ अपराधिया तारिलें व्याधासी । अश्व-ध्वजेंसीं रथ नेसी । तो तूं मज उद्धरावयासी । कां उबगलासी गोविंदा ॥४२॥ ऐसा अवस्थाभूत पूर्ण । पाहतां श्रीकृष्णाचें वदन । दारुकासी आलें रुदन । आसुवीं नयन लोटले ॥४३॥ दीर्घस्वरें देऊनि हांक । दारुक रडे अघोमुख । अंतीं श्रीकृष्ण झाला विमुख । हें अतिदुःख मजलागीं ॥४४॥ दुःखें चरफडीत मोठा । करें पिटीत ललाटा । मर मर विधातया नष्टा । वोखटें अदृष्टा काय लिहिलें ॥४५॥ मग म्हणे श्रीकृष्णनाथा । तुजपुढें बापुडें विधाता । तुजवेगळा मी राहतां । अतिदीनता पावेन ॥४६॥ तुझेनि बळें श्रीकृष्णा । म्यां कळिकाळा घातला आंकणा । तो मी काळाचा वोळंगणा । कां करिसी पोसणा जगाचा ॥४७॥ ऐसें ऐकोनियां वचन । ’ना भीं ना भीं’ म्हणे जनार्दन । मग आश्वासून पूर्ण । गुह्य आलोचन सांगत ॥४८॥ आजिच्या काळाचे काळगतीं । तूं एक उरलासी निकटवर्ती । तुज म्यां राखिलें निजकार्यार्थीं । वेगीं द्वारावतीं तूं जाईं ॥४९॥


एकनाथी भागवत – श्लोक ४६, ४७ व ४८ वा

गच्छ द्वारवतीं सूत, ज्ञातीनां निधनं मिथः । सङकर्षणस्य निर्याणं, बन्धुभ्यो ब्रूहि मद्दशाम्‌ ॥४६॥

द्वारकायां च न स्थेयं, भवद्भिश्च स्वबन्धुभिः । मया त्यक्तां यदुपुरीं, समुद्रः प्लावयिष्यति ॥४७॥

स्वं स्वं परिग्रहं सर्वे, आदाय पितरौ च नः । अर्जुने नाविताः सर्व, इंद्रप्रस्थं गमिष्यथ ॥४८॥ तूं जाऊनि द्वारकेआंत । यादवांचा निधनवृत्तांत । परस्परें कलहयुक्त । निमाले समस्त हें सांग ॥३५०॥ बळिभद्रें निजात्मस्थितीं । देहो त्यजिला योगगतीं । माझीही दशा समस्तांप्रती । यथानिगुती सांगावी ॥५१॥ तुवां जाऊनियां त्यांपाशीं । शीघ्र सांगावें समस्तांशी । कोणीं न रहावें द्वारकेसी । निघावें वेगेंसीं ममाज्ञा ॥५२॥ द्वारका त्यागावयाचें कारण । तुज मी सांगेन आपण । दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ॥५३॥ यालागीं तुज राहवूनि एथ । अंतकाळींचें गुज सांगत । तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥५४॥ बाहेर काढावयाचें कारण । म्यां द्वारका त्यागिल्या जाण । समुद्र येऊनि आपण । नगर संपूर्ण बुडवील ॥५५॥ ठाव मागूनि समुद्रापाशीं । म्यां वसविलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो अवश्येंसीं बुडवील ॥५६॥ यालागीं सत्वर गमन । शीघ्र करावें आपण । माझीं माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावीं ॥५७॥ जंव समुद्र बुडविना तो ठावो । तंव आपुलाला समुदावो । घेऊनि सकळ परिग्रहो । शीघ्रतर पहा हो निघावें ॥५८॥ झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट । कोणीं नव जावें एकट । अवघीं एकवट करावीं ॥५९॥ अर्जुनाचेनि सांगातें । एकत्र मिळूनि समस्तें । शीघ्र जावें इंद्रप्रस्थातें । तो मार्गीं त्यांतें रक्षील ॥३६०॥ ऐसें ऐकतां श्रीकृष्णवचन । दारुकासी आलें रुदन । न वचे सांडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥६१॥ निजकुळासी करुनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ । मी काळमुखा द्वारकेआंत । जावों हा वृत्तांत सांगावया ॥६२॥ गिळूनि श्रीकृष्णनिजसुखा । म्हणती हा आला काळमुखा । सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ॥६३॥ ऐकतां माझिया वचनासी । प्राणान्त होईल सर्वांसी । एवढया द्यावया महादुःखासी । न वचें हृषीकेशी मी तेथें ॥६४॥ ज्यासी म्यां सांगावी हे वार्ता । त्यांच्या करावें जीवघाता । एवढी घोर निष्ठुरता । नव्हे कृष्णनाथा माझेनीं ॥६५॥ बहुतां मुंग्यांच्या विवरासी । जेवीं आगी लावावी हृषीकेशी । तेवीं हे वार्ता द्वारकेसी । म्यां सुहृदांपाशीं सांगावी ॥६६॥ जेवीं फळते फुलते वनीं । भडकोनि लावावा दावाग्नी । तैसा भडका हा सुहृदांचे कानीं । कृष्णनिधनाग्नी कोण लावी ॥६७॥ जेवीं बुडतयाचे माथां । पाषाण न देववे सर्वथा । तेवीं कृष्णसहित कुळाच्या घाता । मी नव्हें सांगता सुहृदांसी ॥६८॥ सुख द्यावें सुहृदांसी । तें राहिलें हृषीकेशी । घेऊनियां महादुःखांचिया राशी । सुहृदांपाशीं मी न वचें ॥६९॥ आशंका ॥ म्हणसी जन्मवरी अवज्ञा । तुवां नाहीं केली अतिप्रज्ञा । तो तूं अंतकाळींच्या वचना । कां अवज्ञा करितोसी ॥३७०॥ कृष्णा अंतकाळींचें तुझें श्रीमुख । पाहतां मज अत्यंत सुख । तें सांडूनि जनांसी दुःख । द्यावया देख मी न वचें ॥७१॥ कुळनिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधनें संतापक । माझे वचनमात्रें हें विख । जगासी देख न देववे ॥७२॥ तुझे आज्ञेकरितां देख । जगासी द्यावें महादुःख । तुझे अवज्ञेचा उल्लेख । नरकदायक मज होय ॥७३॥ मा आपणचि घेऊनि विख । तुजपुढें मरतां देख । उत्तम गति अलोलिक । मी निजनिष्टंक पावेन ॥७४॥ ऐसें म्हणोनि आपण । दारुकें घातलें लोटांगण । मस्तकीं धरिले श्रीचरण । सर्वथा जाण सोडीना ॥७५॥ देखोनि दारुकाचा भावो । कृपें द्रवला देवाधिदेवो । जेणें निर्दळे शोकमोहो । तों वर्म पहा हो सांगत ॥७६॥


एकनाथी भागवत – श्लोक ४९ वा

त्वं तु मद्धर्ममास्थाय, ज्ञाननिष्ठ उपेक्षकः । मन्मायारचनामेतां, विज्ञायोपशमं व्रज ॥४९॥

माझ्या धर्माचें निजलक्षण । दृढ आश्रयितां आपण । पावोनि माझें ज्ञान विज्ञान । तूं ब्रह्मसंपन्न स्वयें होसी ॥७७॥ माझें धर्माचें निजलक्षण । तूं म्हणसी तें कोण कोण । ऐक दारुका सावधान । मद्धर्म पूर्ण ते ऐसे ॥७८॥ हृदयीं नित्य माझें ध्यान । मुखीं माझें नामकीर्तन । श्रवणीं माझें कथाश्रवण । करें मदर्चन सर्वदा ॥७९॥ नयनीं मम मूर्तिदर्शन । चरणीं मदालया गमन । रसनें मम तीर्थप्राशन । मत्प्रसादभोजन अत्यादरें ॥३८०॥ साष्टांगें मजचि नमन । आल्हादें मद्भक्तां आलिंगन । सप्रेम माझे सेवेवीण । रिता अर्धक्षण जाऊं नेदी ॥८१॥ ऐसी सेवा करितां पहा हो । सर्वभूतीं देखें मद्भावो । हा सर्वधर्मांमाजीं रावो । तेथें अपावो कदा न रिघे ॥८२॥ सर्वभूतीं माझें दर्शन । तेव्हां ’वैराग्य’ वोसंडे संपूर्ण । तेथ सहजें होय शुद्ध ज्ञान । देहाभिमानच्छेदक ॥८३॥ देहाभिमान होतां क्षीण । अपेक्षेसी पडे शून्य । तेव्हां ’निरपेक्षता’ पूर्ण । सहजें जाण ठसावे ॥८४॥ निरपेक्षतेची दशा कैशी । विषय भेटलिया इंद्रियांसी । उपेक्षा करी त्यांसी । जेवीं मृगजळासी सज्ञान ॥८५॥ या दृष्टीं पाहतां चराचर । समूळ मिथ्या व्यवहार । जेवीं दोराचा सर्पाकार । तेवीं भ्रमें संसार भासत ॥८६॥ केवळ दोराचा सर्पाकार । तो श्वेत कृष्ण कीं रक्तांबर । तेवीं विषयीं विषयव्यवहार । मिथ्या संसार मायिक ॥८७॥ जेवीं शुक्तिकेचा रजताकार । न घडे एकही अलंकार। तेवीं हा आभासे संसार । मिथ्या व्यवहार मायिक ॥८८॥ मूळीं मिथ्या भवभान । त्याचें भ्रांतीसीच बंधन । तेथील जें मुक्तपण । तोही भ्रम जाण सोलींव ॥८९॥ आम्हीं सज्ञान पूर्ण । निर्दळूनि भवबंधन । दृढ साधिलें मुक्तपण । हेंही जल्पन मायिक ॥३९०॥ संसार मायिक रचना । हें सत्यत्वें कळलें ज्याच्या मना । तैं मनचि लाजे मनपणा । ’विज्ञान’ जाणा त्या नांव ॥९१॥ जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । संसाराचें मिथ्या ज्ञान । हें ज्यासी ठसावलें संपूर्ण । ’विज्ञान जाण त्या नांव ॥९२॥ मुख्य विज्ञानाचें लक्षण । साधक होय ब्रह्म पूर्ण । जगीं न देखे मीतूंपण । ’उपशम’ जाण या नांव ॥९३॥ ऐसा उपशम ज्यासी पूर्ण । त्यासी मजसीं नाहीं भिन्नपण । दारुकें ऐकतां निरुपण । हृदयीं ते खूण चमत्कारली ॥९४॥ अलंकार सोनें पाहूं गेला । तंव तोचि सोनें होऊनि ठेला । तेवीं मी तंव कृष्णरसें वोतला । वियोग नाथिला देहलोभें ॥९५॥ मी कृष्णरुप आपण । मज कृष्णेंसीं नाहीं भिन्नपण । ऐशी चमत्कारली खूण । मी ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥९६॥


एकनाथी भागवत – श्लोक ५० वा

इत्युक्तस्तं परिक्रम्य, नमस्कृत्य पुनः पुनः । तत्पादौ शीर्ष्ण्युपाधाय, दुर्मनाः प्रययौ पुरीम् ॥५०॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे यदुकुलसंक्षयो नाम त्रिंशोऽध्यायः ॥३०॥

ऐसें ऐकोनि श्रीकृष्णवचना । शिरीं वंदूनि श्रीकृष्णाज्ञा । खेद सांडोनियां मना । कृष्णचरणां लागला ॥९७॥ करुनि त्रिवार प्रदक्षिणा । पुनः पुनः लागोनि चरणां । चरणीं माथा ठेवूनि जाणा । घेऊनि कृष्णाज्ञा निघाला ॥९८॥ ब्रह्म सर्वत्र परिपूर्ण । त्याचा बोधक श्रीकृष्ण । तो निजधामा गेला आपण । तेणें दुर्मन दारुक ॥९९॥ पुढती श्रीकृष्णदर्शन । सर्वथा न लभे आपण । यालागीं अतिदुर्मन । करी गमन द्वारकेसी ॥४००॥ दारुक धाडिला द्वारकेसी । तंव मैत्रेय आला कृष्णापाशीं । तेचि काळीं हृषीकेशी । ब्रह्मज्ञान त्यासी उपदेशी ॥१॥ तो ब्रह्मज्ञान उपदेशविधि । शुक बोलिला तृतीयस्कंधीं । म्हणोनि तें निरुपण ये संधीं । न प्रतिपादीं पुनरुक्त ॥२॥ पाहावया कृष्णनिर्याण । उद्धव गुप्त होता आपण । तेणें ऐकोनि ज्ञाननिरुपण । संतोषें नमन करी कृष्णा ॥३॥ तेचि काळीं मैत्रेयासी । स्वमुखें बोलिला हृषीकेशी । विदुर येईल तुजपाशीं । त्यासी तूं उपदेशीं गुह्यज्ञान ॥४॥ उपदेशूनि मैत्रेयासी । देवें धाडिला तो स्वाश्रमासी । उद्धवेंही नमूनि हृषीकेशी । तोही बदरीसी निघाला ॥५॥ दारुक धाडिला द्वारकेसी । मैत्रेय धाडिला स्वाश्रमासी । उद्धव धाडिला बदरीसी । व्याध अधमासी धाडिलें स्वर्गा ॥६॥ निजरथसहित घोडे । निजायुधेंसीं धाडिलें पुढें । आतां आपणही वाडेंकोडें । निजधामाकडे निघेल ॥७॥ निजधामा निघतां श्रीपती । समस्त देव पाहों येती । ते सुरस कथासंगती । पुढिले अध्यायार्थी अतिगोड ॥८॥ अजन्मा तो जन्म मिरवी । विदेहाअंगीं देहपदवी । स्वयें अक्षयी तो मरण दावी । अतिलाघवी श्रीकृष्ण ॥९॥ ज्याचें निजधामगमन । शिवविरिंच्यादिकां अतर्क्य खूण । त्याचें सांगेन उपलक्षण । श्रोता अवधान मज द्यावें ॥४१०॥ एकादशाचा कळस जाण । श्रीकृष्णाचें निजनिर्याण । जेथ नाहीं देहाभिमान । तें ब्रह्म पूर्ण परिपक्व ॥११॥ भय नाहीं जन्म धरितां । भय नाहीं देहीं वर्ततां । भय नाहीं देह त्यागितां । ’हे ब्रह्म-परिपूर्णता’ हरि दावी ॥१२॥ एका जनार्दना शरण । पुढें अचुंबित निरुपण । संतीं मज द्यावें अवधान । सांगेन व्याख्यान सद्गुरुकृपा ॥४१३॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां ’स्वकुलनिर्दळणं’ नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥

श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥३०॥श्लोक ५०॥ओंव्या॥४१३॥

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.