इतर

सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ

सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ

संत साहित्याच्या मध्यामातून आम्ही ज्ञानेश्वर हरिपाठाचा अर्थे उपलब्ध करत आहोत, सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्स मध्ये टाका .

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥

अर्थ:

देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असें द्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे.
देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. “क्षणभर” ह्याचा लाक्षणिक अर्थ घेतला, तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे. अशा दृष्टीनें क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. ॥ १ ॥ (हरिनामोच्चार करण्यात रत राहण्याविषयीं ध्रुवपदांत मोठ्या अट्टाहासानें सकळ जनांस बोध करीत आहेत) मुखानें ‘हरिनाम घ्या हरिनाम घ्या’ असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असें सांगतात ॥ २ ॥ देह-स्त्री-पुत्र-गृह रूपी संसारात राहूनही जिव्हेला हरिनामाचें प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रादिक हात उंचावून सांगत आहेत ॥ ३ ॥ श्रीमहाराज म्हणतात की, अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्णपरमात्मा कसा राबत होता हें श्रीमत् व्यासकृत महाभारतावरून दिसूने येईल. ॥ ४ ॥

२ 

चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥

मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥ ३ ॥

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥

अर्थ:

चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ही हरीचेंच वर्णन करीत आहेत. ॥ १ ॥ ज्याप्रमाणें दही घुसळून त्यांतील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणें चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ह्यामध्यें सारभूत असणार्‍या हरीचें तूं विचारानें ग्रहण कर, आणि त्यांतील ताकाप्रमाणें असणार्‍या वांझट कथांचा मार्ग टाकून दे ॥ २ ॥ हरि जो एक आत्मा त्याची व्याप्ति मायोपाधिक शिवामध्यें व अविद्योपासक जीवामध्यें एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसर्‍या समजण्यास कठीण अशा साधनांमध्यें तूं आपलें मन घालूं नको. (भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम् मूढ मते ? ) ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरि हे त्या वैकुंठाचें नांव आहे. त्याचेंच मी निरंतर भजन करतों आणि तो मला पाण्यानें भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणें जिकडे तिकडे दिसत आहे. ॥ ४ ॥

त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥

सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥

अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ॥

अर्थ:

त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे. तीन गुणांचे पलिकडे असलेलें निर्गुण निराकार परब्रह्म तेंच शाश्वत व सार होय. ह्या सारासाराचें रहस्य निरंतर हरिचिंतनांत रत असणें हेंच होय. ॥ १ ॥ जे गुणसहित साकार आहे तें सगुण, जें गुणरहित निराकार आहे तें निर्गुण. म्हणजे सगुण तेंच निर्गुण व निर्गुण तेंच सगुण – फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ति दोहीतही समानत्वेंकरून आहे. त्या दृष्टीनें कोणत्याही सगुण वस्तुस निर्गुण असें निश्चयानें म्हणण्यास कांही हरकत नाहीं. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधि नसल्यामुळें त्याच्या स्वरुपाचें ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियांस होणें शक्य नाही, ह्यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसतां, भगवत चिंतन करण्यांतच गढून जा. त्यावांचून अन्य विषयांत जर तूं आपलें मन गुंतविशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असें समज. ॥ २ ॥ जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही, व ज्याच्यापासून चर (चेतनयुक्त) व अचर (जड) अशा उभयभावात्मक जगताची उत्पत्ति झाली, त्या हरीचें तूं भजन कर. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानांत व मनांत निरंतर रामकृष्ण आहे व त्यायोगानें या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे. ॥ ४ ॥

भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥

कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ २ ॥

सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥

अर्थ:

जन्ममृत्युरूप संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावांचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निःसीम प्रेम बसणार नाही, व अशा निःसीम भक्तीवांचून संसारांतून मुक्तता केव्हांही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणीं भाव असल्यावांचून भक्ति होईल व भक्तीवांचून मुक्ति मिळेल असें जे म्हणतात त्यांचे तें म्हणणें आपल्या अंगांत कांही एक बळ नसतांना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असें म्हणण्याप्रमाणें व्यर्थ होय, म्हणून तसें बोलूं नये ॥ १ ॥ देव लवकर कशानें प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर कांहीएक व्यर्थ शीण न करतां आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थीर कर आणि निजबोधानें शांत रहा ॥ २ ॥ देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयीं व रक्षणाविषयीं प्रापंचिक खटाटोप तूं रात्रंदिवस करीत आहेस, व हरीचें भजन मात्र मुळींच करीत नाहीस तें कां बरें ? ॥ ३ ॥ हरीचें भजन कर म्हणजे तूं या संसारसागरांतून तात्काळ तरून जाशील, असें श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥ ४ ॥

योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥

भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥

तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥

ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥

अर्थ:

अष्टांगयोग व यज्ञ याचें यथाविधि आचरण केल्यानें हरीची प्राप्ति होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे – दूरची साधनें – आहेत. याचें अनुष्ठान करणारामध्यें मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याति व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेनें तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळें खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. ॥ १ ॥ भावावाचून साधकास देव केव्हांही निःसंशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन, याच्यावर दृढ विश्वास असल्यावांचून देवाचें निःसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेंच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरूद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावांचून देवाचा अनुभव कसा कळेल ? ॥ २ ॥ तपावांचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावांचून कांही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावें तसें फळ मिळतें. हित सांगणारांमध्यें जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल ? कारण आत्मज्ञान होणें हेंच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणारांमध्यें जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणें हाच होय असें माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ॥ ४ ॥

 

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥

कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥

मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥

अर्थ:

साधनचतुष्टय अधिकार्‍यास श्रीगुरुरूपी साधूनी ‘तत्त्वमसि’ ह्या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्यें नाहीसा होतो, मग तो अधिकारी देहबुद्धीनें, अथवा देहातीत जीवबुद्धीने, अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानाज्ञानातीत सहज निर्धर्म ब्रह्मस्थितीनें असतो. ॥ १ ॥ जसें कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीनें पेटली म्हणजे कापूर व अग्नि ह्यापैकीं कांही एक शिल्लक रहात नाही. ॥ २ ॥ त्याप्रमाणें साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची, विद्या अविद्येची निवृत्ति होऊन नित्य निर्धर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षानें सुशोभित होतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधुसंतांच्या संगतीत असण्यांत गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्त्वरूप हरि दिसत आहे ॥ ४ ॥

पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १ ॥

नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरीसी न भजत दैवहत ॥ २ ॥

अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३ ॥

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४ ॥

 

अर्थ:

ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून जे हरिविषयींच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे तें पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहींसे होत नाही. ॥ १ ॥ ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ति नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचें भजन कसें करील ? ॥ २ ॥ जे वायफळ बडबड करणारे, झोपेंत बरळळ्याप्रमाणें अमर्याद बडबड करतात, असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल ? ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्यें एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझें सर्वस्व आहे. ॥ ४ ॥

संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २ ॥

एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३ ॥

नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४ ॥

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥

ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥

अर्थ:

आपल्या मनोवृत्तीची धाव संताच्या संगतीकडे लाव, व या साधनानें तूं लक्ष्मीपतीस वश करून घे, म्हणजे संत ज्याप्रमाणें सांगतील त्याप्रमाणें ती गोष्ट मनावर धरून देहानें मनानें तसें वाग. हरीला वश करून घेण्याचें साधन हेंच होय ॥ १ ॥ वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणें हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचें तू भजन कर; अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे. अर्थात् जीवानें त्याचें भजन करणें अवश्यच आहे. ॥ २ ॥ एकतत्त्व हरि, त्यास त्याच्या नामरूपी साधनानें जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यांस मी आणि तूं इत्यादिक द्वैतबंधनाची बाधा होत नाही. ॥ ३ ॥ योग्यांना सतराव्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्यें जें सुख व जी आवड आहे, तेंच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्यें आहे. ॥ ४ ॥ बाळपणींच प्रल्हादाचे जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. ॥ ५ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचें नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपें असून तें सर्व मनुष्यांना दुर्मिळ झालें आहे, कारण हरीचें नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून तें नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. ॥ ६ ॥

विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १ ॥

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४ ॥

अर्थ:

विष्णूचें नामस्मरणावांचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपीं ज्याचें मन नाही त्याचें ज्ञान व्यर्थ आहे. ॥ १ ॥ जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल ? म्हणजे रामकृष्णस्वरूपीं ऐक्याला तो कसा पावेल ? ॥ २ ॥ ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानानें अहं (मी) इदं (हें) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ति झाली त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेंच होणार आहे. तें ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरूवाचून तें कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळालें नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचें अभेदभजन घडत नाहीं. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुणसाकार स्वरूपाचेंच ध्यान आहे, आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ति करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधानें मौन घेतलें आहे. ॥ ४ ॥

१०

त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १ ॥

नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २ ॥

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४ ॥

अर्थ:

हरीच्या नामाकडे चित्त नाहीं आणि गंगा यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो, अथवा दुसर्‍या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचें ते करणें व्यर्थ होय. ॥ १ ॥ जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे तें नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरीवांचून दुसरा कोण धांव घेणारा आहे ? ॥ २ ॥ भगवंताच्या नामानें पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असें वाल्मीकीने रामायणांत सांगितलें आहे. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचें जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. ॥ ४ ॥

 

११

हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ २ ॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४ ॥

अर्थ:

हरिनामाचा जप केल्यानें पापाच्या अनंत राशी एका क्षणांत नाहीशा होतात. ॥ १ ॥ गवताचा व अग्नीचा संबंध झाला की तें गवत अग्निरूप होतें, त्या प्रमाणें हरीचा जप निरंतर करीत असलें, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. ॥ २ ॥ हरीच्या नाममंत्राचें सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकानें भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेंच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामानें देहाभिमानाचा नाश होतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही ॥ ४ ॥

१२

तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ॥ १ ॥
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्‍न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥

अर्थ:

अहो जनहो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचें आचरण केलें, तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत, याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण कां करतां ? ॥ १ ॥ हरीच्या ठिकाणीं विश्वास ठेवून त्याचें भजन केल्यानें तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणें आपल्या हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. ॥ २ ॥ पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणें ते पार्‍याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणें हरिनामावांचून इतर साधनांनी भगवत्प्राप्ति होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की, माझे गुरु निवृत्तिनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्यें दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधानें माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. ॥ ४ ॥

१३

समाधि हरीची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १ ॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २ ॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥

अर्थ:

सृष्टींतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचारानें काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपानें वास्तव्य करणार्‍या हरीचें समबुद्धीनें ग्रहण केलें असता समाधि (आत्मस्थिति) प्राप्त होते. जर बुद्धींतील सजातियादि भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधि कधींही प्राप्त होणार नाहीं . ॥ १ ॥ केशवास (आत्म्यास) यथार्थत्वेंकरून जाणणें हेंच बुद्धीचें ऐश्वर्य आहे, यावांचून दुसरें नाही. त्यानेंच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो. ॥ २ ॥ ऋद्धि म्हणजे ऐश्वर्य, सिद्धि म्हणजे अणिमा गरिमा इत्यादि अष्ट प्रकारच्या सिद्धि, यांचा निधि म्हणजे ठेवा प्राप्त झाला, तरी जोपर्यंत परमानंदरूप हरीच्या ठिकाणीं मन नाही, तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणिमात्राला रमविणारें असें समाधान माझे ठिकाणीं सुस्थिर झालें असून हरीचें चिंतन सर्वकाळ चालले आहे. ॥ ४ ॥

ref:https://satsangdhara.net/

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.