संत नामदेव

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा अभंग १ ते ६१


ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी ।
परि समाधि हे तुजपासीं । घेईन देवा ॥१॥
नलगे मज मुक्ति । नलगे मज मुक्ति ।
तुझां चरणीं आर्ती । थोर आथी ॥२॥
विठोजी म्हणे ज्ञानदेवा । ज्ञानसागरा अनुभवा ।
वचनेंचि विसांवा । जाला मज ॥३॥
ऐकें ज्ञानचक्रवर्ती । तूं तंव ज्ञानाचीच मूर्ती ।
परि पुससी जे आर्ती । ते कळली मज ॥४॥
येक येक अनुभव कृपा । पद पदांतरें केला सोपा ।
परि यांत माझिया कृपा । सकळही वोळली ॥५॥
ज्ञानदेवें चरणीं मिठी । मनेंसी पडली एके गांठी ।
दृश्यादृश्य जाली एक दृष्टी । प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥
कर ठेउनी कुरवाळी । सर्वांग न्याहार न्हाहळी ।
म्हणे तुवाम घेतली जे आळी । ते सिद्धितें पावेल ॥७॥
नामा उभा असे सन्मुख । ऐकतां थोर खेद दुःख ।
म्हणे ज्ञानांजन महासुख । समाधि घेतसे ॥८॥


ज्ञानदेव उभा जोडोनि हस्त । पाहती समस्त ।
विठोजी म्हणे सकळा स्वार्थ । या ज्ञानांजनाचा ॥१॥
कैसे वोळले त्वाम ज्ञाना । समाधान तया ध्याना ।
मन नाठवें मीतूंपणा । समाधि खूना ज्ञानासी ॥२॥
मग म्हणे विठोजी दातार । समाधि तुज निरंतर ।
आतां प्रस्थान करी साचार । मज निरंतर आठवी ॥३॥
कैसे परिपूर्ण वोळले । आपण समाधिरुप जाले ।
मनातें मन समरसलें । विठठलरुपीं ॥४॥
दशमी प्रस्थानाचा समयो । येकादशी जागर उत्सावो ।
द्वादशी क्षीरापती महोत्सवो । ज्ञानदेवेम केला ॥५॥
त्रयोदशीं म्हणे पांडुरंग । कांहीं न करीं गा उद्वेग ।
आळकापुरीं समाधि प्रसंग । करीं करीम लवलाह्या ॥६॥
माता रुक्मणी वाढी ताटीं । विठोजी म्हणे उघडी दृष्टी ।
तुज मज आहे नित्य भेटी । येई पंढरीये ॥७॥
नामा म्हणे ज्ञानउदयो । आळंकापुरीं सिद्ध समयो ।
परी विठठलीं मुराला भावो । या ज्ञानदेवाचा ॥८॥


विठोजी म्हणे ज्ञानदेवा । तुझी विश्रांति मन ठेवा ।
ते मुराली आमुचिया भावा । निःसंदेहें ॥१॥
कैसें समाधान ज्ञानदेवा । आळंकापुरीं समाधि ठेवा ।
विठठल ओळला वोल्हावा । नित्यरुपसमाधि ॥२॥धृ०॥
संत करिती महा खेद । म्हणती ज्ञानांजन उद्धोध ।
मग चालिले विद्‌गद । आळंकापुरीसी ॥३॥
महावल्ली वृक्ष अजान । तो निक्षेपिला पूर्णधन ।
मग विठोजी म्हणे आपण । ज्ञानदेवासी ॥४॥
धन्य धन्य ज्ञानेश्वरा । पुण्यभूमि समाधि स्थिरा ।
कृष्ण-पक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक मास शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षीं निर्धारेंसी । तुज दिधली असे ॥६॥
हें ऐकोनि संत-जनीं । जयजयकार केला ध्वनी ।
दिंड्या पताका मेळ गगनीं । देव सुमनें वर्षताती ॥७॥
नामा म्हणे आले विष्णव । आलंकापुरीं मिळाले सर्व ।
समाधिं सुखी ज्ञानदेव । बैसते जाहले ॥८॥


महा उत्साव त्रयोदशी । केली त्या ज्ञानदेवासी ।
मग नामा म्हणे विठोबासी । चरण धरुनियां ॥१॥
समाधिसुख दिधलें देवा । ज्ञानांजन आळंकापुरीं ठेवा ।
आजानवृक्षी बीज वोल्हावा । या ज्ञानंजनासी ॥२॥
कृपा आली विठठलासी । म्हणे ज्ञानदेवा परियेसी ।
तीर्थ भागीरथी अहर्निशीं । तुज नित्य स्नानासि दिधलीसे ॥३॥
इंद्रायणी दक्षिणवाहिनी । भागीरथी मणिकर्णिका दोन्ही ।
इया मिळालिया त्रिसंगमीं । पुण्यभूमि तुझिये ॥४॥
येथें जरी नित्य स्नान घडे । तरी नित्य वैकुंठवास जोडे ।
तुज नाहीं नाहीं रे कुवाडे । मी वाडें-कोडें उभा असे ॥५॥
येथें हरिकथा नाम वाचे । जो उच्चारिल विठठलाचे ।
तयासी पेणें वैकुंठीचें । दिधलें साचें तिअक्षरीं ॥६॥
आणिक ऐके रे ज्ञानराजा । जो या सिद्धेश्वरीं करील पूजा ।
तो अंतरंग सखा माझा । मुक्ति सहजा जाली त्यासी ॥७॥
नामा म्हणे ऐसें अंतरंग । कैसा वोळला पांडुरंग ।
ज्ञानदेवीम समाधि सांग । हरिपाठ कीर्तनें ॥८॥


सनकादिकीं मंत्रघोष । केले विधिपूर्वक पांच दिवस ।
मग पांडुरंग यथावकाश । भक्ता वास महिवरी ॥१॥
धन्यभूमि आळंकापुरी । ज्ञान समाधि खेचरी ।
पूर्ण परिपूण श्रीहरी । स्वयें आपण उभा असे ॥२॥धृ०॥
संत भागवत देव्हडे । अमर उभे चहुंकडे ।
नारद तुंबर पुढें । वीणा वाजविती ॥३॥
एकीं केला जयजयकार । ज्ञानदेवीं धरुनियां कर ।
विठठल चरणा समोर । निकट बैसते जाले ॥४॥
करें कुरवाळिलें ज्ञाना । कांसवी अवलोकिला पान्हा ।
आंसुवें येताती नयना । तया ज्ञानदेवाचिया ॥५॥
विठोजी म्हणे ज्ञानांजना । तुझेनि कवित्वें हर दारुणा ।
उच्चारितां महाविघ्ना । सकळै पळतील ॥६॥
तुज आठविले जो भक्त । तो होईल विरक्त ।
ऐसें विठोजी बोलत । येरु चरणीं रुळे ॥७॥
नामा म्हणे सकळ तीर्थराज । तया कृपा कैसी केली सहजा ।
एकादशीं दिधली पूजा । तया ज्ञानदेवासी ॥८॥


स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति ।
मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥
धन्य धन्य तो देव ज्ञान । राजा निवृत्ति निधान ।
विठोजी आपण । भक्तां साह्ये ॥२॥
मग सकळहि भक्तमेळीं । सहित वनमाळी ।
बैसले तये पाळीं । इंद्रायणीचे ॥३॥
एकीं केलें स्तुतिस्तोत्रें । एक जपाताती नाममंत्रें ।
एक गाताती वेदस्तोत्रें । विठोबासी ॥४॥
तंव पुढारा जाला नारा । तो नामयाचा पुत्र सैरा ।
तो पुसतसे विचारा । नामयासी ॥५॥
ये संतभेमाजीं । राऊळ बैसले असे सहजीं ।
यातें पुसि जो कां जी । कवण क्षेत्र म्हणोनी ॥६॥
उठिला नामा प्रेमें डुले । वंदिलीं विठ्ठल पाउलें ।
मग करद्वयें जोडुनि बोले । साशंकित ॥७॥
नामा म्हणे पूर्णब्रह्म । तें कैसें सभासदीं मन ।
तें बोलतसे परम । ज्ञानदेवा भाग्यें ॥८॥


मग सकळ प्रेम पुतळे । बैसले माजीं ब्रह्ममेळे ।
तेथें नामा वचन बोले । स्वामीप्रति ॥१॥
वोळलें चैतन्य सतरावें । पूर्ण वोघ नामा विठठलदेवें ।
पव्हे घालुनी ज्ञानदेवं । जग तारिलें कीर्तनें ॥२॥
नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ । परि आमुचें मन निमग्न ।
चरणरजें पापभग्न । पवित्र जालों ॥३॥
तरी स्वामिराजा विनंति । परियेसी गा माझी पुढती ।
हे आळंकापुरीं होती । कवणियें युगीं ॥४॥
हें सांगिजे जी समर्था । कवण क्षेत्र कवण तीर्था ।
येथें क्षेत्रज्ञ हा सर्वथा । कवण धर्म असे ॥५॥
तूं आत्माराम संपन्न । जुगा जुनाट नारायण ।
तुनप्रति हें वचन । न साहे माझें ॥६॥
कासवीचा तुषार गाढा । तैसा तुझा पवाडा ।
हें पुसणें कवणियां चाडा । तें तूंचि जाणसि ॥७॥
नामा उभा तिष्ठत प्रेमें । संत दाटले सप्रेमें ।
आपण तें तें अनुक्रमें । सांगतसे देव ॥८॥


देवासी कळलें गौप्यगुज । म्हणे रे नामया हेंचि चोज ।
तो निजभाव सहज । प्रगट सांगूं आतां ॥१॥
कृतयुगीं क्षेत्र आदि । ज्ञानदेवा तेथेम समाधि ।
देव सांगतसे शुद्धी । योगबुद्धी जुनाट ॥२॥
ऐकें भक्तजनश्रेष्ठा । भूमिनामें वैकुंठपीठा ।
तें हें आळंकापुरीं श्रेष्ठा । आदि वरिष्ठा पीठा आठरा ॥३॥
आणिक ऐकरे वचन । हे पंचक्रोशी पुरातन ।
यासी युगें सांगता संपन्न । चतुरानन जाणतसे ॥४॥
कांहीएक किंचित सांगों । युगसंख्या मार्गांत रिघों ।
तरी वैवस्वत हाचि मागो । पूर्ण वोळंगो यापासोनी ॥५॥
मनु सहस्त्र युगें संख्या । तैं आळंकापुरीं आदि लक्षा ।
कोटी याग असंख्या । सहस्त्र दक्ष येथें जाले ॥६॥
आदि क्षेत्र संख्यारहित । ऋषमुनीं तपती सप्त ।
आणि नारदमुनि असे जाणत । हेचि पुरी पुरातन ॥७॥
नामा म्हणे कैसें दिधलें । हें ज्ञानासी सिद्ध लाधलें ।
हेंचि आम्हासी जोडलें । पूर्ण लाधलें पीयूष ॥८॥


देव म्हणे नामया । ऐकें येथें चित्त देउनियां ।
एक एक तीर्थ सांगावया । हें तों पुराणीं असे ॥१॥धृ०॥
नकळे देवाची थोरी । कैसें पुढारिले मुरारी ।
गौप्यगुज श्रीहरी । सांगतसे नामया ॥२॥
पुराण म्हणसी कोण कथा । तरी ऐकें गा तूं सकळार्था ।
शैवशास्त्र हा ग्रंथ सर्वथा । सिद्धमार्ग असे ॥३॥
जें जें जुनाट क्षेत्रतीर्थ । जें जें ब्रह्मनामें परमार्थ ।
तो तो सांगितला हेत । चतुरानाननें ॥४॥
ऐसें देवमुखीचें वचन । ऐकतां संतोषले पूर्ण ।
मग देताति आलिंगन । येकमेकांसी ॥५॥
जयजयकाराचा ध्वनी । विठठनामें गर्जे वाणी ।
प्रेम ओसंडत नयनीं । स्फुंदन रोमांचित दाटले ॥६॥
स्फुंदत नामा नाचे गाये । परिसा म्हणे वोळली माये ।
तो ज्ञानासी पान्हा होये । पूर्ण बोधाचा ॥७॥
नामा म्हणे सकळ संतमेळीं । कथा सांगितली रसाळीं ।
तंव ज्ञानदेवा करतलमळीं । समाधि शेज घातली ॥८॥

१०
मग म्हणे सर्वज्ञ विठठल । न लावावा वाढवेळ ।
मग पातले निर्मळ । सिद्धेश्वरलिंगी ॥१॥
धन्य धन्य हरिदिवस । धन्य धन्य हा निवास ।
आपण ह्रषिकेश । भक्ता साह्य ॥२॥
वैष्णव मिळाले संपन्न । गाती हरिनाम कीर्तन ।
तंव पातले सोपान । प्रेमें वोसंडत ॥३॥
चरणीं घातली मिठी । विठोजी म्हणे उठी उठी ।
लवलाहें उघडी दृष्टी । भेटे ज्ञानदेवा ॥४॥
येरु म्हणे मी कृतकृत्य । नामस्मरण तुझें नित्य ।
तेणें सकळ हित । आमुचें जालें ॥५॥
तूंचि गा जनकजननी । तूंचि एक त्रिभुवनीं ।
पाहतां नित्य उन्मनीं । लागे आम्हां ॥६॥
समाधि शेज ज्ञानेंसी । घातली अहर्निशीं ।
ते कर्णीं परिसत जिवेंसी । तुवां चरण धरित आलों ॥७॥
नामा म्हणे ज्ञान सोपान । एक जाले जनीं जनार्दन ।
समाधिसंगें संजीवन । आळंकापुरी आले ॥८॥

११
तंव निवृत्तीसी उन्मनीं । बैसका होती सप्तदिनीं ।
ते पालटोनि तत्क्षणीं । मूर्तीतं न्याहाळी ॥१॥
निवृत्तिनिधान । सोपान निजधन ।
ज्ञानदेव आपण । तिन्ही मूर्ती ॥२॥
कोण भाग्याचे संतुष्ट । जेथें प्रगटलें वैकुंठ ।
विठठलनामें पूर्ण पाठ । आळंकापुरीसी ॥३॥
आदि क्षेत्र जुनाट । युगें सांगतां उद्‌भट ।
जें कां पुण्यरुप प्रगट । सांगतसे महिमा ॥४॥
ऐसा उत्साह गमला । निवृत्ति ध्यानीं निवाला ।
सोपान आळंगिला । ज्ञानराजें ॥५॥
निवृत्ति पाहे ज्ञानाकडे । येरु धांवे लवडसवडें ।
तंव चरणरजामाजीं बुडे । मन निमग्न केलें ॥६॥
तिन्ही देव एकत्र । सत्वरजमादि मंत्र ।
हे गाताती नरे जे स्तोत्र । ते उद्धरती सर्वथा ॥७॥
नामा म्हणे तिन्ही देव । मिळाले गुण सागर वैभव ।
समाधि सेज माधव । देतु असे ज्ञानदेवा ॥८॥

१२
हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां ।
विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बैसावें ॥१॥
इंद्र चंद्र देव येती । ब्रह्मादिक गीती गाती ।
यमवरुणबृहस्पति । विमानें दाटतें अंतरिक्षीं ॥२॥
तंव पातले गरुडदेव । रुक्मणी सत्यभामा भाव ।
राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥
ब्रह्मैंद्रप्रजापति । सर्व अंतरिक्षीं पाहती ।
आळंकापुरीं ये श्रीपती । हरुष चित्तीं ज्ञानदेवा ॥४॥
रुषिमुनी गणगंधर्व । पिशाच-गुह्यक सर्व ।
धृव-अंबऋषि माधव । चित्तीं भाव पहावया ॥५॥
ऐसी दाटलीं विमानें । संतीं जाणितलें ज्ञानें ।
ज्ञानदेव ब्रह्म होणें । हें विदान विठठलाचें ॥६॥
जयजय शब्दें ध्वनि गर्जे । तेणें स्वर्गमृत्युपाताळ गाजे ।
पाताळीं शेष म्हणे भुंजे । प्रेमें फुंजे न समाये ॥७॥
नामा म्हणे शिवादिक । सिद्धेश्वरीं मिळाले सकळिक ।
पाहाती विठठलकौतुक । ज्ञानदेव समाधीचें ॥८॥

१३
वेदध्वनि केलिया मुनी । गंधर्वगायनें होती गगनीं ।
ब्रह्मादिक इंद्र विमानीं । इंद्रायणी ज्ञानदेवी ॥१॥
लागलिया मंगळतुरे ध्वनि । तीर्थे उभी असती कर जोडुनी ।
विठठलदेव ज्ञान संजीवनीं । नयनीं न्याहाळिती ॥२॥
राही रखुमाई माता । सत्यभामा गोपी समस्ता ।
आरतिया ओवाळिती निभ्रांता । ब्रह्म त्वरिता ज्ञानदेवा ॥३॥
देवऋषिगण सकळ । जयजयकार ध्वनि मंजुळ ।
स्तुतिस्तोत्रें सकळ । नक्षत्रादिक गाती ॥४॥
वरुषति दिव्यसुमनेम । निवृत्तिसोपान नारायणें ।
संमोखिलें संजीवनें । नित्य पारणें हरिपाठें ॥५॥
परिसा भागवत डुलत । विठठलीं जाला कृतकृत्य ।
नामा असे शोकाकुलित । चरणीं रत विठ्ठलाचे ॥६॥
शेज घालुनी सुमनीं । विठठल पाहे रुक्मिणी ।
ज्ञानदेवाचे गुण मनीं । आठवती म्हणे हरी ॥७॥
नामा जाला भयभीत चित्तें । ज्ञानासारखें रत्न मागुते ।
न देखों ऐसें विठ्ठलातें । पुसे त्वरित रुक्मिणी ॥८॥

१४
देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं ।
हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । जो यातें दृष्टीं न्याहाळी ।
तो वात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥
जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रां ।
सकळही कुळ पवित्रा । याचेंनि दरुषणें होती ॥३॥
आळंकापुरीं हें शिवपीठ । पूर्वीं येथें होते नीळकंठ ।
ब्रह्मादिकीं तप वरिष्ठ । येथेंचि पैं केलें ॥४॥
इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिले अहर्निशीं ।
इंद्रायणीं इदोरिसी । या पासोनि पंचक्रोशी ॥५॥
येथें त्रिवेणी गुप्त वसे । भैरवापासूनि भागीरथी बसे ।
पूर्ववटि माया दिसे । ते प्रत्यक्ष जाण पार्वती ॥६॥
भोवतें वनवल्लिवृक्ष । येथें देव येउनी होताती पक्ष ।
हे असे नित्य साक्ष । अस्थी नासती उदकीं ॥७॥
पंढरीहुनी हें सोपें । जनाचीं हरावया पापें ।
कळिकाळ कोपलिया कोपें । त्याचें न चले आळंकापुरीसी ॥८॥
ऐसें सांगतां हरिसी । प्रेम ओसंडलें रुक्मिणीसी ।
म्हणे धन्य धन्य जयाचे कुसीं । ज्ञानदेव जन्मले ।
नामा म्हणे माझा स्वामी । सवें संतसमागमीं ।
ऐसेम सांगितलें ग्रामीं । आळंकापुरीसी ॥१०॥

१५
तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता ।
तरी ज्ञानासारिखा कां आतां । समाधीसी बैसवितां ॥१॥
हें सांगावेम सविस्तर । याचे कोण कोण अवतार ।
बंधु त्रिवर्ग हे साचार । आणि ते भगिनी ॥२॥
देव म्हणती ब्रह्मा होय । सोपान देव नेणसी काय ।
निवृत्ति शिव ज्योतिर्मय । ज्ञानदेव ब्रह्म निघोंट ॥३॥
ऐसे ब्रह्मा विष्णु हर । मुक्ताई ते मूळमाता साचार ।
तारावया चराचर । कलिमाजीं अवतरलें ॥४॥
रुक्मिणी पुसे देवासी । कां कलिमाजीम जन दोषी ।
हे घातली देवा पुसी । ते सांगती महाविष्णु ॥५॥
तरी ऐके हो साचार चित्तें । तूं काय नेणसी त्या व्यासातें ।
ग्रंथीं सांगितलें भारतें । कलिमाजीं जन दोषी ॥६॥
कृष्ण अवतार जाला । पांडवी निजठाव ठाकिला ।
तेथून एक शकु जाला । जनमेजयापासूनि ॥७॥
तया मार्गे विक्रमशक । पुण्यवित्र सकळ लोक ।
कलियुगी पुण्यश्लोक । उज्जनिये नांदती ॥८॥
तेणें एक शत पंचतीस । हरिले कळिकाळदोष ।
पुढें शालिवाहन होवयास । अवतार जाण पैठणीं ॥९॥
तो हा शालिवाहन । अठरा हजार जाण ।
तें क्षेत्र प्रतिष्ठान । गंगातीरीं प्रत्यक्ष ॥१०॥
या शकामाजीं प्रथम । राजा भोज उत्तम ।
मग पुण्यपुरुष जन्म । थोडे घेती कलियुगीं ॥११॥
राजे भ्रष्ट यवन जाले । ठायीं ठायीं दोष घडले ।
मग इहीं अवतार घेतले । कलिदोष हरावया ॥१२॥
रुक्मिणी म्हणे स्वामी । सत्य सांगितलें तुम्ही ।
पुरानप्रसिद्ध आम्ही । अवतार चरित्र जाणतसों ॥१३॥
नामा म्हणे पुढें हे जन । यवनसंसर्गें कठिण ।
होता गातां हरीचे गुण । ते उद्धरती सर्वथा ॥१४॥

१६
पुष्पक विमानातळीं । हरि उतरले भूतळीं ।
तंव उदयो पूर्वमेळीं । सूर्याचा जाला ॥१॥
धन्य धन्य प्रश्नोत्तर । धन्य धन्य ते तरुवर ।
धन्य ज्ञानदेव अवतार । तिन्ही देव प्रगटले ॥२॥
संत सनकादिक देव । आणि भक्त आले सर्व ।
स्नानें करुनियां भाव । हरिचरणीं ठेविला ॥३॥
विलाप मांडियेला भक्तीं । खंति करिती त्रिजगतीम ।
ज्ञानदेवासारिखी मूर्ति । न देखो म्हणती देवराय ॥४॥
देव म्हणती निवृत्ति । तूं प्रत्यक्ष शिवमूर्ति ।
तारावया क्षितीं । अवतार धरियेला ॥५॥
सोपानें घातलें लोटांगण । मुक्ताया धरिले चरण ।
संत करिताती स्तवन । पांडुरंगरायाचें ॥६॥
मग संबोखोनियां हरी । सोपानदेवा धरिला करीं ।
निवृत्ति मस्तकावरी । करकमळ हरि ठेवितसे ॥७॥
नारा विठा पुढें चाले । ऐसे इंद्रायणीस आले ।
सौंदडीवृक्षातळी बैसले । सपरिवारेम सकळैं भक्त ॥८॥
न्याहाळिती कांसवदृष्टी । ऐसा हरि चालत सृष्टी ।
नामा होतसे हिंपुटी । ज्ञानदेवाकारणें ॥९॥

१७
तंव अंतरिक्ष गगनीं । अवचिती जाली वाणी ।
भक्त तरतील मेदिनी । ज्ञानदेव दरुषणें ॥१॥
ऐसी खवाणी वदली । जयजयकारें टाळी पिटली ।
तंव स्नानासंध्या सारिली । देवभक्तीं सकळिकीं ॥२॥
धन्य धन्य वृक्ष अजान । धन्य धन्य सिद्धेश्वरस्थान ।
ज्ञानदेवा समाधान । धन्य आळंकापुरी ॥३॥
मग पाहोनियां शुभदिन । देवेम करुं आदरिलें प्रयाण ।
नामा होतसे खेदक्षीण । ज्ञानदेवाकारणें ॥४॥

१८
मग प्रश्न आदरिला । नामा फुंदों जो लागला ।
कां गा ज्ञानदेवो गेला । मज सांडुनियां ॥१॥
कैसा होय तुझा दास । कैसी पाहों तुझी वास ।
ज्ञानाकारणें कासाविस । जीव माझा होतसे ॥२॥
देव म्हणे नामयासी । तूं झणीं कासाविस होसी ।
तूं रे तयातें नेणसी । तें कैसें आईक पां ॥३॥
ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरु ।
ज्ञानदेव भवसिंधुतारुं । प्रत्यक्ष रुपें पैं असे ॥४॥
ज्ञानदेवीम ज्ञानगम्य । ज्ञानदेवीं ज्ञानधर्म्य ।
ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पैं असे ॥५॥
ज्ञानदेव हाचि देव । ज्ञानदेवीम धरलिया भाव ।
ज्ञान होईल जीवां सर्व । यासी होय समाधान ।
जीव शिवीं परिपूर्ण । एके रात्रीं कीर्तन केलिया ॥७॥
झणें तूं व्याकुळ होसी चित्तें । मनीं आठवी गा मातेम ।
नामस्मरणें एका चित्तें । रामकृष्ण गोविंद ॥८।
नामा म्हणे तूं समर्थ होसी । अर्जुनीं प्रीति करिसी ।
हें सांगितलें व्यासीं । एकादशाध्यायीं ॥९॥
तैसा पावे तूं विश्व्शा । विश्वरुपा जगन्निवासा ।
मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारनें ॥१०॥
तरी तूं गा युगानयुगीम । असशी भक्तांचिया संगीं ।
आम्ही विनटलों पांडुरंगीं । रंगारंगीं विठठलीं ॥११॥
एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।
तें करी निर्विशषे । नामा येतसे काकुळती ॥१२॥

१९
तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्‍ही ।
ध्यान धरुनी अंतरीं । निश्चळ राहिला ॥१॥
जयजयशब्द नामा बोभाये । केशवा त्राहे त्राहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥२॥
नारायण त्राहे त्राहे । कृपादृष्टी तूं रे पाहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥३॥
तुझेनि दर्शनें । ज्ञानाचेनि अवलोकनें ।
मज पंढरीस असणें । तुझे चरणी गा विठठला ॥४॥
आतां मज तूं सांभाळी । ज्ञानदेवेंवीण सदाकाळीं ।
मज न कंठे भूमंडळी । भानुसहित वर्ततां ॥५॥
तूं माझी जनक जननी । परि ज्ञानदेवेंविण मेदिनी ।
शून्य वाटे हे धरणी । जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥
तूं रक्षिता सर्व जीवांसी । तरी कां दुःख दिधलें आम्हांसी ।
तूं जवळी असतां ह्रषिकेशी । ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥
नामा खेदें क्षीण जाला जीवें । तंव नेत्र उघडिले देवें ।
आलिंगला केशवें । चार्‍ही भुजा पसरुनी ॥८॥

२०
नामा न राहे खेद करुं । केशव ठेवी अभय करु ।
म्हणे तूं दुःखिया होसी थोरु । ज्ञानदेवाकारणें ॥१॥
धन्य धन्य तुम्ही भक्त । नित्य विष्णुचरणीं रत ।
पुण्यशील भागवत । ज्ञानदेव नामया ॥२॥
तुमचेनि जग हें कृतार्थ । कवित्वें तरेल हें सत्य ।
मायामोहो निरसे समस्त । नामस्मरणें तुमचेनी ॥३॥
धन्य ज्ञानादेव ज्ञानशीळ । ज्ञानदेवा ऐसा सुढाळ ।
मी न देखें भूमंडळ । सकळही पाहतां ॥४॥
तूं करिसी खेद त्याचा । तरी तो आत्मा माझा साचा ।
भाव सांडी सांडी द्वैताचा । निखळ स्वरुप पाहे पां ॥५॥
तुम्ही भक्त अवघे आवडते । तुमचेनि साजिरे पूर्णचित्तें ।
मज पंढरिये येणें आवडतें । नाम गाताती ये प्रीतीं ॥६॥
पुंडलिक माझा भक्त सखा । परी प्रेमळ तुम्ही विशेषा ।
तुमचेनि सर्व दुःखा । हरणें मी हें जाणावें ॥७॥
नामा म्हणे ज्ञानदेवाचें । मज दरुषण होईल साचें ।
तरीच रंगणी मी नाचें । हरिकीर्तनीं पंढरीये ॥८॥

२१
ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें ।
याचें करिजो जी म्हणितलें । हाकारिजो पुंडलिका ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । वोळले वोळले वनमाळी ।
वैष्णवी पिटली टाळी । जयजय शब्दें करुनियां ॥२॥
गरुडासी सांगे केशव । कैसा भेटे यासी ज्ञानदेव ।
पुंडलिकासी जाऊनी सर्व । वृत्तांत सांगे येथींचा ॥३॥
तेणें नमस्कारुनि हरी । निघाला पक्षाच्या फडात्कारीं ।
भेटला पुंडलिका झडकरी । यथाविधि सांगितलें ॥४॥
पुंडलिकें विस्मित चित्तीं । म्हणे धन्य धन्य ज्ञानमूर्ती ।
ज्या कारणें वैकुंठपती । आळंकापुरीसी गेले ॥५॥
धन्य धन्य विठोबाचे चरण । धन्य धन्य माझे नयन ।
धन्य नामा रुपीं संपन्न । विष्णु भक्त सखा माझा ॥६॥
मग गरुडासि पूजिलें । ज्ञानदेवा हाकारिलें ।
दिव्य विमानीं बैसविलें । चला म्हणितलें आळंकापुरीसी ॥७॥
नामा असे खेद करीत । केशव तयासी संबोखित ।
तुम्हा दोघांचा येकांत । माझेनि संगें पुरेल ॥८॥

२२
पुढें चालिला गरुड । आक्रमित अवघें ब्रह्मांड ।
विमान शुभ्र चंड । पुंडलिक आणितसे ॥१॥
धन्य हरिभक्तांचा मेळ । धन्य धन्य तो गोपाळ ।
धन्य धन्य आळंकापुरी सुढाळ । ज्ञानदेव येतसे ॥२॥
दुरोनी लक्षित रुक्मिणी । हरुषें सांगे चक्रपाणि ।
पैल विमान येतसे गगनीं । दाखविजे नामया ॥३॥
मग नामयासी सावध । करुनियां तो गोविंद ।
म्हणे तुझा पुरविला रे छंद । पैल ज्ञानदेव येताहे ॥४॥
नेत्र विकसित पाहे । तंव गगनीम विमान दिसताहे ।
पुंडलिक गरुड आहे । दिव्य देहीं दिव्य विमानीं ॥५॥
ऐसा जंव तटस्थ घटिका । तंव उतरलें निमिष्य एका ।
नामा पावला संतोषा । ज्ञानदेवा देखोनी ॥६॥
विमानघंटी गर्जत । नामा पुढाराम चालत ।
जी जी रुक्मिणी म्हणत । वेगु कीजे ज्ञानदेवा ॥७॥
नामा ज्ञानदेव भेटले । पुंडल्कें विष्णु नमस्कारिले ।
भक्तीं जयजय शब्द केले । देवीम पुष्पवृष्टि केलिया ॥८॥

२३
आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ ।
पुंडलिक म्हणे मज चाड । या विठठल चरणाची ॥१॥
तुझे दरुषण माझा लाभ । जैसा ज्ञानदेवावरी लोभ ।
नामयावरी स्वयंभ । तैसाचि करी विठठला ॥२॥
नामदेवेम आळंगुनी प्रीती । शिर चरणावरी अवचितीं ।
ज्ञानदेवाच्या ठेवी पुढतीं । म्हणे धन्य क्षितीं मी एक ॥३॥
पुंडलिक म्हणे नामया । धन्यधन्य तुझा थाया ।
क्षितीम आणिलें वैकुंठराया । ज्ञानदेवाचेनि स्मरणें ॥४॥
धन्य युगानयुगीं तुम्ही । धन्य देखिलें तीं आम्ही ।
धन्य आळंकापुर जन्मीं । उपजोनी जो देखेल ॥५॥
पंढरीहुनी हें मूळपीठ । जुनाट पैं वैकुंठ ।
पूर्वीं येथेम होते नीळकंठ । ब्रह्मविष्णुरुद्रइंद्र ॥६॥
तें हें शिवक्षेत्र प्रत्यक्ष । पूर्वे मातुलिंग साक्ष ।
तेथेंही केशव प्रत्यक्ष । चतुर्भुजरुपें असे ॥७॥
दक्षिण पुण्येश्वर देवो । पुण्यस्थळ महादेवो ।
मूळपीठीं नागेंद्रीं पाहा हो । त्रिवेणीरुपीं वाहातसे ॥८॥
पश्चिमे इंदोरिये देवो । ब्रह्मेश्वर उत्तम ठावो ।
उत्तरे सिद्धेश्वर देवो । खेटकग्रामीम भागीरथी ॥९॥
मध्यस्थळीं हे इंद्रायणी । सरसी भागीरथी वाहिनी ।
सिद्धेश्वर शोभे स्थानीं । ज्ञानेदेवो सहित ॥१०॥
ऐसिये दक्षिण वाहिनीसी । स्नान घडताम अहर्निशीं ।
कोटि तीर्थें प्रयाग काशी । प्रसन्न होती हरिहर ॥११॥
ऐसिये तीर्थीं देवा । समाधि दिधली ज्ञानदेवा ।
पुंडलिक विनवितसे केशवा । धन्य भाग्य नामयाचें ॥१२॥

२४
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप ॥१॥
समाधिसंजीवन निवृत्ती फावले । तें निधान देखिलें आम्ही तुम्ही ॥२॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई सिद्धि आळंकापुरीं ॥३॥
पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवें । उभारुनि बाहे सांगे आम्हां ॥४॥
कळिकाळासीं त्रास विठठल उच्चारीं । हरी चराचरी भरला असे ॥५॥
सर्वत्र सबाह्य अंतरंग रुपडें । तें रुप फाडोवाडें पारखिलें ॥६॥
चिंतामणीचें सार कल्पतरु उघड । दावुनियां मूढ तारियेले ॥७॥
सुवर्णाचा पिंपळ तिहीं केला ठाऊका । त्या समीप देखा कल्पतरु ॥८॥
सिद्धेस्व्हरलिंग सिद्धिबुद्धि दाता । जड जीवा मुक्तता देतु हरी ॥९॥
ऐसिये स्थानकीं ज्ञानदेव राहिले । राहुनी तारिले मूढजन ॥१०॥
नामा म्हणे ज्ञानदेव हा दातार । जडजीवाम उद्धार विठठल हरी ॥११॥

२५
तंव तेथें नवल वर्तलें । आकाश असे विमानीं दाटलें ।
म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिलें । पुंडलिकासगट ॥१॥
पंढरीहुनि आलें कैसें । पुंडलिक देव सरिसे ।
ज्ञानदेवासवें नामा असे । आणि विष्णुभक्त अपार ॥२॥
राही रुखमाई सत्यभामा । गाई गोपाळ मेघःश्यामा ।
म्हणती पाहाहो महिमा । या विष्णुभक्तांचा ॥३॥
सवें ध्रुव प्रल्हाद अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी ।
आणि ऋषीमुनी तापसी । ऐसिया समवेत वनमाळी ॥४॥
बळी भीष्म नारद । उद्धव अक्रुर विद्‌गद ।
आणि बिभीषण सुबुद्ध । हनुमंतादि करुनि ॥५॥
हा हा हु हु गंधर गाती । रुणुझुणु रुणुरुणु विणे वाजती ।
देवांगना आरतिया ओवाळिती । देशभक्तासहित ॥६॥
ऐसा शुभ काळ समयो । जाला भाग्याचा उदयो ।
ज्ञानदेव नामदेव पाहाहो । धन्य धन्य धरातळीं ॥७॥
ज्ञानदेवो निजमानसीं । विष्णुमूर्तीसी लीन जाला ॥८॥

२६
तंव बोलत उद्धव । धन्य धन्य हा देवाधिदेव ।
धन्य धन्य ज्ञानदेव । निजभक्त आवडता ॥१॥
धन्य तीर्थ इंद्रायणी । धन्य प्रत्यक्ष शूळपाणि ।
तारक ब्रह्म त्रिवेणी । मिश्रित रुपें वहातुसे ॥२॥
चिंतामणि हे पाषाण । दिव्य वनवल्ली जाण ।
जेथें लागले हरिचे चरण । ते धन्य आळंकापुरी ॥३॥
जेथें समाधिसी बैसतां । इंद्रादि सामोके येती तत्वतां ।
वैकुंठा जाईल निभ्रांता । रामकृष्ण उच्चारित ॥४॥
यम न पाहे इकडे । काळ नमस्कारी वाडेंकोडें ।
म्हणती पाहा हो केव्हढें । भाग्य या ज्ञानदेवाचेम ॥५॥
ऐसें उद्धव सांगे रुक्मिणी । होय म्हणती चक्रपाणि ।
पंढरीहुनि हे जुनाटपुराणी । शैवागमीं बोलिलेसे ॥६॥
ज्ञानदेवेम नमस्कार केला । नामा ह्रदयीं धरिला ।
प्रीतीनें पुढती अलिंगिला । म्हने धन्य धन्य रे सखया ॥७॥
नामा लोळत गडबडां । चरणजालागीम जाला वेडा ।
केशव म्हणे तूं धडफुडा । विष्णुभक्त साचार ॥८॥

२७
ऐसी प्रदक्षिणा करुनी विष्णुभक्ता । नामा जालासे सरता ।
रुक्मिणी म्हणे यातं तत्वतां । वैकुंठासी न्यावें जी ॥१॥
नामा म्हणे नेघे मुक्ती । मज पंढरीची आर्ती ।
विठठलनामें करीन कीर्ती । नित्यकाळ जीवन्मुक्त ॥२॥
मज नित्यमुक्ता जन्म नाहीं । केशवासी माते पुसोनि पाही ।
युगनयुगी अवतार दाही । याचेनि संगें मज घडती ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं उदार । मुक्ति तुम्हापाशीं साचार ।
परि भक्तिविण मुक्ति असार । कोण पामर इच्छिल ॥४॥
मुक्ति फलकट नैश्वर । फळ एक विठठल सार ।
विष्णुभक्तीसी ज्याचा निर्धार । त्याचे चरण वंदीन माथां ॥५॥
विष्णुविण कीर्तन न करीं । भक्तिविण नसे क्षणभरी ।
कीर्तन करीन गजरीं । रामकृष्णगोविंद ॥६॥
मज नामाचें अमृत । माझें मुक्ति दास्य करी ।
तूं मूळमाता जाणसी जरी । तरी तुजसीं हें गुह्य बोलिलों ॥७॥
नामदेव परतोनी पाहे । तंव ज्ञानदेवें उभारिले बाहे ।
म्हणे विष्णुभक्ति ऐसी आहे । आइक माते इचा बडिवारु ॥८॥

२८
भक्त अमर स्वस्तिक्षेम । चरणरजें डौरलें व्योम ।
मग कैलासीं मंदाकिनी सोम । नीळकंठे सिरीम धरियेली ॥१॥
धन्य विष्णुचरणींची गंगा । स्नपन होत महालिंगा ।
भीमरथीं मृत्युलोकीं सवेगा । इंद्रायणीसमरसें ॥२॥
भोगावती पाताळ गेली । मग विष्णुचरणीम गुप्त ठेली ।
मग पुरोनियां उरली । त्र्यंबक सिखरीं ॥३॥
मग कितेका काळें भागीरथी । भगीरथें आणिली भारथीं ।
सगर उद्धरिले त्वरितीं । विष्नुतीर्थें करुनियां ॥४॥
ऐसी त्रिभुवनीं ज्याची थोरी । तो मुकुटमणे हा हो श्रीहरी ।
त्यातें सोडिलिया मुक्ति चारी । काय आम्हां तारिती ॥५॥
सर्वे तीर्थे ज्याचे रंक । आम्ही तयाचे सेवक ।
ज्याचेनि नामें हें त्रैलोक्य । नाम घेताम तरत ॥६॥
तो पूर्ण बीजमंत्र आम्ही जाणों । विष्णुविण कांहीं नेणों ।
पूर्ण ब्रह्म काय म्हणों । हा महिमा तूं जाणसी ॥७॥
ज्ञानदेव्म नमस्कारिले हरी । निवृत्ति सोपान झडकरीं ।
मुक्ताई भेटली लवकरीं । ज्ञानदेवा करीं धरियलें ॥८॥

२९
मग संतोष जाला हरिभक्तां । ज्ञानदेव झाला बोलता ।
निवृत्तीसी म्हणे तुम्ही जावें आतां । त्र्यंबका सीखरीं ॥१॥
करुनि नमस्कार हरिसी । वेगीम यावें वैकुंठासी ।
नित्य हरिचरणापासीं । तुम्हीं आम्हीं सोपान ॥२॥
मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा । मज विठोबासी निरवा ।
मजवरी लोभ असों द्यावा । रुक्मिणीमाता आदिकरुनि ॥३॥
पुंडलिकासी निरवावें । समस्तांसी क्षेम सांगावेम ।
कृपादृष्टी अवलोकावेम । मतलागीम ज्ञानदेवा ॥४॥
ज्ञानें करुनि विज्ञान । भक्तीसी करावें निरुपण ।
द्यावे समाधिसंजीवन । तुम्ही यावें शीघ्रवत ॥५॥
निवृत्तीने दिधलें उत्तर । आम्ही जाऊं वेगवत्तर ।
सोपानासी मार्गीं निरंतर । समाधीसी बैसवूनि ॥६॥
तंव बोलिला यादवराणा । तुम्ही सांगितल्या समाधीच्या खुणा ।
परी नामयावरी जाणा । माझी कासवदृष्टी ॥७॥
नामा म्हणे विठोबासी । तूं स्वामि दीनाचा होसी ।
गेलें निधान ज्ञानदेव दाखविशी । मज नयनीं प्रत्यक्ष ॥८॥

३०
ऐसें बोलोनियां हरी । रुक्मिणीसीं विचार करी ।
यासी भोजनें परोपरी । अन्नें निफजवावीं ॥१॥
संतोष जाला हरिभक्तां । जेथेम स्वयें हरी भोक्ता ।
कर्ता आणि करविता । सर्व चाळक विठठल ॥२॥
तंव दिव्यग्राम उभवुनि । भक्तीं देखिले नयनीं ।
विश्वकर्मा येऊनी । उत्तरापंथें निर्मिले ॥३॥
तंव अष्टमहासिद्धी । सर्व सामोग्रीसी समृद्धि ।
कर जोडोनी कृपानिधी । विनविती आनंदें ॥४॥
दिव्यवनें दिव्यवल्ली । दिव्यसुमनें समग्र जालीं ।
वैकुंठीहुनि आलीं । महाविष्णुकारणें ॥५॥
तेथें सुगंध परिमळ । जवादि कस्तुरी निर्मळ ।
चिंतामणी देती ढाळ । नानाकीळ दीप्तीचे ॥६॥
चंदनाचे खांब उभारिले । पवळ वेलीचे शोभले ।
मुक्ताफळाचे घोस मिरवले । रत्नखचित दामोदरें ॥७॥
चंपक सुमनाचियां हारी । सेवंती वाटोगर नानापरी ।
नानापुष्पें परिमळ आगरीं । दिव्यवनें कीं शोभती ॥८॥
आंबे खजुरिया पोफळी । फणसें नारिंगें नारिकेळीं ।
कर्दळी वाडिन्नलीया सरळी । उदक पाट वाहताती ॥९॥
तेथें भ्रमर रुणुझुणु करित । कोकिळा सुश्वरें बोलत ।
पारवे आनंदें घुमघुमित । सुखें संवादती निजगजरें ॥१०॥
ताललोरी गीती गाती । गोपाळ वीणे वाजवती ।
नाना परी बागडे धरिती । देव पाहती विमानीं ॥११॥
थकलीं योगियांचीं ध्यानें । निश्चळ राहिलीं आसनें ।
निवृत्ती सोपानें । तेथें देवडे उभे असती ॥१२॥
नामा जातो लोटांगणीं । वैकुंठ उतरलें मेदिनी ।
आळंकापुर पाटणीं । उत्तरापंथें देखिलें ॥१३॥
जेथें त्रिभुवनिचें निधान । स्वयं आपण भगवान ।
तेथेम सकळ काम होती पूर्ण । जाणती खुण अंतरंग भक्त ॥१४॥
नामा म्हणे ऐसीं विंदानें । भक्तीलागीं जगजीवनें ।
प्रत्यक्ष वैकुंठ भुवनें । दासा सुखसंपन्न करावया ॥१५॥

३१
ऐसें देखिलें वैष्णवीं । वैकुंठ नगरी चिरंजीवी ।
आणि ज्ञानदेव गोसावी । विष्णुमूर्ती चतुर्भुज ॥१॥
तालालोरी वाजविती पावा । समाधान होतसे जीवां ।
नामा विनवितो केशवा । तुझ्या दरुशनें निवालों ॥२॥
तंव रुक्मिणीनें विनविलें । यासि भोजन सारा कां वहिलें ।
तंव अक्रूरें पाचारिलें । समस्तांसीं देखा ॥३॥
उद्धव घालित आसनें । ताटें विस्तारिलीं बोनें ।
राही रुक्मिणी विचक्षणें । पंचामृतें वाढिती ॥४॥
समस्त भक्त दाटले । पांतीकर एकवटले ।
नानापरी भात विस्तारिले । परिमळित मघमघां ॥५॥
वरी मिरवे मुगांचे वरण । कथिका वाढिली संपूर्ण ।
नाना कोरिकें विस्तीर्ण । रुक्मिणी वाढितसे ॥६॥
कामधेनूचें घृत । पयोदधिक्षीर वाढित ।
नानापत्र शाखा शोभत । वैष्णवांचा ताटीं ॥७॥
ऐसें समस्तांसीं संपूर्ण । ताटें जालीं विस्तीर्ण ।
तंव देव बोलती आपण । ज्ञानदेवासी ॥८॥
निवृत्ती सोपान बोलवा । मुक्ताईस वेगीं आणवा ।
पांथिकरासी रिघावा । ताटीम बैसवा समस्तांसी ॥९॥
विष्णुमूर्ती चतुर्भुज । पूजी ब्राह्मण द्विभुज ।
तुळसी मंजिरी केसिराज । त्यांचे मस्तकीं वाहतसे ॥१०॥
चरणतीर्थ घेतलें । तेणें समस्त मंदिर शिंपिलें ।
आपण मुखीं घातलें म्हणे । कृतकृत्य जालों मी ॥११॥
नामा तिष्ठत उभा द्वारीं । त्यासीही रुक्मिणी ताट करी ।
ऐसीं भोजनें परोपरी । जालीं वैष्णवांचीम ॥१२॥

३२
ऐसेम भक्त जेवुनि धाले । समस्त पांतिकरु उठिले ।
गोपाळें विडे दिधले । आपुलेनि करकमळें ॥१॥
धन्य धन्य तें भोजन । धन्य धन्य तें निधान ।
धन्य धन्य तो वृक्ष अज्ञान । धन्य नारायन आळंकापुरी ॥२॥
विठ्ठलें दिधलें वचन । यांसी घाला रे आसन ।
तंव उद्धवें आपण । समस्तां बैसकार दिधले ॥३॥
पूजिलें गंधाक्षता लावुनि । टिळे उटी कर्पुर चंदनीं ।
ऐसे तिये वैकुंठभुवनीं । वैष्णवांसी पूजी हरी ॥४॥
तंव म्हणे रुक्मिणी । नामा आणा बुझावुनि ।
आपलेनि हातें चक्रपाणि । त्यासी घांस घालावे ॥५॥
ऐसें सांगताम हरीसी । बुझाविती नामयासी ।
तो स्फुंदत उकसा बुकसीं । मग चहूंकरीं उचलिला ॥६॥
सवेम संतांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा ।
नामा बुझावोनी तत्काळा । देहावरी आणिला ॥७॥
तंव विस्तारुनी आणिलें ताट । माजी षड्रस अन्ने बरवंट ।
रुक्मिणी आणि जेथें वैकुंठ । भक्तांसहित उभे असती ॥८॥
नामयातें संबोखोनि हरि । बैसविला मांडियेवरी ।
कवळ घ्यावचा मुख पसरी । निजकरें हरी घालितसे ॥९॥
नामा आनंदें डुलत । तृप्त जाला प्रेमें ओसंडत ।
सकाळ संतां कवळ देत । आपुलेनि निजकरें ॥१०॥

३३
ऐसा येकवळा भक्तांचा । भोक्ता हरी वैकुंठींचा ।
उतरोनी आळंकापुरी साचा । करी भक्तांचा उत्छाव ॥१॥
ऐसे जेवुनि धाले । हरिकरेंचि निवाले ।
मग सुखें रहिवासले । सकळै भक्त वैकुंठीं ॥२॥
देव म्हणती निवृत्तीसी । तुम्ही जावें त्र्यंबक सिखरासी ।
मग समाधी सरिसी । गंगोदकें करुनि घ्यावी ॥३॥
तंव सोपान म्हणे स्वामी । पूर्वीं बोलिले होतेति तुम्ही ।
कर्‍हे पठार संवत्सरे ग्रामीं । समाधे देऊं म्हणोनि ॥४॥
देव म्हणती संतासि पुसा । हा ज्ञानदेव असे सरिसा ।
हाहि दिव्यदेही आम्हांसरिसा । येईल तेथवरी ॥५॥
मुक्ताई म्हणे देवाधिदेवा । आम्ही करावी चरणसेवा ।
तुझेनि विचारेम जी केशवा । समाधीधन भक्तांसी ॥६॥
ऐसा करीती विचार । तंव पातला राजा इंद्र ।
भक्तीं केलें जयजयकार । देवें दुंदुभी वाजविल्या ॥७॥
संत सनकादिकीं स्तोत्रें । मुखीं आरंभिलीं पवित्रें ।
गाती हरीनाम चरित्रें । ऋषिगण सकळीक ॥८॥
धन्य आळंकापुरी ग्राम । जेथें प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।
नामा नाचे हरिचे द्वारीं । ब्रह्मांद गरजे जयजयकारीं ।
निवृत्ति सोपान म्हणती हरी । आम्हां निरंतरी सांभाळीं ॥१०॥

३४
नानागंधें तुलसीमाळा । वैष्णवीं घातलिया गळां ।
नमस्कार करीती गोपाळा । चरणरजा वंदिती ॥१॥
दोहीं बाहीं देव्हडे । संत सनकादिक गाढे ।
जयजयकार पुढें । महाशब्दें गर्जिन्नले ॥२॥
ऐसे इंद्रायणीचां तटीं । हरि रुक्मिणी जगजेठी ।
संत सनकादिकांची गोमटी । मांदी मिळाली असे ॥३॥
तंव पुंडरिकें नमस्कार केला । म्हणे तूं कां गा येथें विठो उगवला ।
बहुत दिवस येथेंचि राहिला । या ज्ञानेदेवाकारणें ॥४॥
तरी पंढरीहुनि हे श्रेष्ठ । तूं येथें उभा अससी प्रगट ।
भूमी उतरलें वैकुंठ । ज्ञानदेवाकारणें ॥५॥
बहुत दिवस येथेंचि जाले । मी न देखें विटेवरी जंव पाउलें ।
तंव नयन माझें भुकेले । न राहाती देवराया ॥६॥
देव म्हणती पुंडरिका । तूं भक्त माझा निजसखा ।
आणि हा ज्ञानदेव देखा । दुजा न देखोम आणिक ॥७॥
हें संत सनकादिक माझे । यांचेनि समागमें माझें बीजें ।
नामा डौरिन्नला यांचे चरणरजें । मग जावों रे पंढरीसी ॥८॥

३५
सवें तीर्थें मिळालीं अनंतें । तीं सुखी करुनी कृतार्थें ।
संवत्सरा जावोनी सोपानातें । समाधीसी बैसंवू ॥१॥
अनंत सुखाचिया रासी । उदैल्या भक्तांचिया मानसीं ।
आनंद जाला पुंडरिकासी । मग न बोले कांहीं ॥२॥
सोपान म्हणे वैकुंठा । बिजें किजो महाश्रेष्ठा ।
संवत्सर ग्राम कर्‍हे तटां । वैकुंठासहित चालावें ॥३॥
इंद्रचंद्रब्रह्माहर देव । आणि गण मिळाले सर्व ।
तेहतीस कोडी देव । विमानीं आरुढले देखा ॥४॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेवो । त्रिमूर्ति तिन्ही देवो ।
धर्मरक्षणार्थ पाहा हो । मनुष्यरुपें अवतरले ॥५॥
तिघेही उभे सन्मुख । तिघांही थोर संतोष ।
विनविती केशवास । स्वामी विनंति अवधारिजो ॥६॥
ये आळंकापुरीसी ।स्थापावें कोटी तीर्थांसी ।
जो जो भक्त येईल स्नानासी । तो वैकुंठासि आणावा ॥७॥
ऐसें आइकोनि श्रीहरी । म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी ।
जगदोद्वार केला संसारीं । बावीस वरुषें असतां पैं ॥८॥
जो जो दिवस उगवला । तो तो ज्ञानदेवें सफळ केला ।
पद पदांतर कथिला । जेणें आत्माराम संतोषे ॥९॥
पूर्वीं अनंत भक्त जाले । पुढें ही भविष्य बोलिलें ।
परी निवृत्तीं ज्ञानदेवेम सोडविले । अपार जीवजंतु ॥१०॥
जो अभक्त मनुष्य जनीं प्राणी । ज्याचा भार न साहे मेदिनी ।
मग इहीं अवतार घेउनी । जग तारिलें कीर्तनें ॥११॥
नामा पंढरीस नाचत । ज्ञानेश्वर आळंकापुरीं शोभत ।
सोपान संवत्सरी मिरवित । निवृत्ति त्र्यंबकसिखरीम ॥१२॥

३६
ऐसें पांडुरंग बोलिले । मग सकळ तीर्थांसी सांगितलें ।
आळंकापुरीं वसिजो वहिलें । भक्त तारावया ॥१॥
जो जो करील कीर्तन । तो तो तरेल जाण ।
आळंकापुरीं नारायण । स्वयें उभे असती ॥२॥
ऐसा निरोप तीर्थांसि । ते तिष्ठति अहर्निशीं ।
कीर्तन करितां गजरेंसि । वैकुंठासी नेवों म्हणती ॥३॥
देव म्हणे यमुना नर्मदा । सरस्वति भागीरथी त्रिविधा ।
गंगा कृष्णा तुंगभद्रा । इंद्रायणीस मिळावें ॥४॥
जो जो भक्त येईल स्नाना । तो पवित्र कराया ये क्षणा ।
वैकुंठ कैलसापर्यंत जाणा । त्यासी घेवुनि यावें ॥५॥
हो म्हणती तीर्थें सकळें । मग मीनली आपुलेनि मेळें ।
गुप्त राहोनि यथाकाळें । आज्ञा शिरसा वंदिती ॥६॥
गया काशी त्रिवेणी । त्या शोभती विठठलचरणीं ।
ज्ञानदेवा समाधिरंगणीं । अखंड वाहों लागल्या ॥७॥
सुवर्णाचा अश्वत्थ । द्वारीम स्थापुनि निवास ।
भोवते देव्हडे तापस । समाधीस बैसले ॥८॥
देव म्हणे जो करील तप । तो होईल निष्पाप ।
केवळ होईल शिवरुप । आत्माराम साक्षात ॥९॥
जप तप नेम मंत्र ध्यान । कोटि याग घडले पूर्ण ।
अथवा द्विजीं दिधलिया अन्न । चतुर्भुज नर होती ॥१०॥
ऐसें वचन सांगे हरी । ज्ञानदेवासी धरिलें करीं ।
निवृत्ति सोपान अंतरीं । ध्यान धरोनी राहिले ॥११॥
नामा म्हणे कोटि तीर्थांचे । तीर्थं वोळलें पैं साचें ।
पाप जाईल अनंत जन्मांचें । एक स्नान केलिया ॥१२॥

३७
मग अष्टदिशा व्यापुनी । तीर्थें राहिली स्थानीं स्थानीं ।
आळंकापुरीं पाटणी । इंद्रायणीचां तटीं ॥१॥
धन्य धन्य सृष्टीतळीं । आळंकापुरी महितळीं ।
कीर्तन करितां वैष्णव मेळीं । ते चतुर्भुज नर होती ॥२॥
मग पुंडलिकासी सांगितलें । कृष्णपक्षीं येथें पाहिजे आलें ।
येरु म्हणे स्वामीनें सांगितलें । ते शिरस वंदीन ॥३॥
देव म्हणे आम्ही तुम्ही । पंढरीहुनि समागमीं ।
येवों आळंकापुरा ग्रामीं । सकळ तीर्थांसहित ॥४॥
मग व्यास वाल्मिक बोलीविलें । त्यांसही हें तीर्थ सांगितलें ।
तें तिहीं शिवपीठ ऐसेम म्हणितलें । जुनाट असे केशवा ॥५॥
या शिवतीर्थाचा महिमा । कवणा वर्णवेल पुरुषोत्तमा ।
पंढरी पांडुरंग महात्मा । भीमातीरही उत्तम ॥६॥
आणिक आइकें वो सर्वोत्तमा । येथें अधिक अष्टतीर्थ ग्रामा ।
पंचक्रोशीची उपमा । सिद्धि होती तात्काळ ॥७॥
ब्रह्मा विष्णु इंद्र तप । आणि योगेश्वर उमप ।
पाताळीं शेष समीप । याज खालता आहे ॥८॥
स्कंदासी उपदेश स्थान । लोहोगिरीसी येऊन ।
पुरुरवा पुण्य क्षेत्रमहिमान । पूर्वीं येथुनि जालें ॥९॥
येथून भीमरथी नदी । भीमाशंकरा घेऊनि गेला नंदी ।
तेथुनि उगमीं पडली सर्वां आधीं । मग शंकरें तेथें स्नान केलें ॥१०॥
तें भीमा माहात्म्य प्रसिद्ध । तो हा सिद्धेश्वर अगाध ।
महा योगेश्वरा निजबोध । आळंकापुर पाटणीं ॥११॥
ऐसें व्यास बोले तये क्षणीं । नामा गेला लोटांगणीं ।
समाधी मूळपीठस्थानीं । आळंकापुरीम ज्ञानदेव ॥१२॥

३८
मग व्यासपूजा सारिली । तैसीच वाल्मिकाची केली ।
वसिष्ठादिकीं अंगिकारिली । समस्त ऋषि पूजियले ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । येऊनियां देवीं सकळीं ।
माजीं सहित वनमाळी । आळंकापुरीं नगरीये ॥२॥
मग साठी तीनशें गंगा । माजी शिव द्वादश लिंगा ।
अष्टोत्तर तीर्थें समर्थें पैं गा । तिहीं स्तवन आरंभिलें ॥३॥
कोटी तीर्थांचा रहिवास । अष्टभैरव सावकास ।
वसू कोटि गणेश । साठीसहस्त्र गणासहित ॥४॥
ऐसे रहिवासले षण्मास । दिव्यद्रुमफळें प्रतिदिवस ।
दिव्य अन्नें सावकाश । अमृत भक्षिती देव ॥५॥
ऐसा सकळ तीर्थांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा ।
करी ज्ञानदेवाचा सोहळा । आळंकापुर नगरिये ॥६॥
गरुड हनुमंता ऐसे । पुढें कामारी ह्रषिकेशें ।
साक्षात वसिजे महेशें । गौरीसहित आळंकापुरीं ॥७॥
नंदि श्रृंगी त्राहाटण । प्रतिदीनीं विभूतीचे उधळण ।
जयजय शंकर शिव पूर्ण । ऐशीं स्तोत्रें गाताती ॥८॥
महा सभास्थळ वैकुंठ । सभे श्रेष्ठ वैकुंठपीठ ।
आणि शिवमूर्ती घनदाट । नीलकंठ सभेसी ॥९॥
रंभा उर्वशी नाचती । नारद तुंबर वीणे वाती ।
गणेश सारजा आळविती । सा राग एकवीस मूर्च्छना ॥१०॥
ऐसा रंग स्थिरावला । जयजयकारेम घोष केला ।
तेणें चवकोनि उठला । पाताळींचा शेष ॥११॥
ऐकोनी विष्णुकीर्तन । तयासी आलें पैं स्फुंदन ।
मग उच्चारित रामकृष्ण । मृत्युलोकासि आला ॥१२॥
सहस्त्र वदनें स्तुति करी । हर नमस्कारिले हरी ।
वाहुनि तुळसीमंजिरी । ज्ञानदेवा पूजियेलें ॥१३॥
नामा म्हणे ज्ञानउदयो । ज्ञानदेवा भाग्याचा पहा हो ।
आपण येऊनि वैकुंठरावो । समाधि दिधली जिनहस्तें ॥१४॥

३९
ऐसे स्वर्गवासी अमर । ते आपुलाले ठायीं स्थिर ।
राहोनि करिती जयजयकार । पुष्पवृष्टे ज्ञानदेवावरी ॥१॥
धन्य धन्य तूं विष्णुभक्ता । ज्ञानदेवा तूं समर्था ।
म्हणौनि पडती पुष्पचळथा । ज्ञानदेवावरी ॥२॥
अनंत तीर्थांचा मेळ । उदकें शिंपिती ब्रह्मगोळ ।
लोहगिरी सुवर्णचळ । त्यावरी आळंकापुरी ॥३॥
म्हणती धन्य धन्य हे जन । जेथें जो करील कीर्तन ।
तया जोडे वैकुंथस्थान । चतुर्भुज होऊन जाईल ॥४॥
देव म्हणती इंद्रासी । तूं पूर्वीं येथेंच होतासी ।
आणि ब्रह्मा रुद्र तापसी । पूर्वापर हे पुरी असे ॥५॥
कृत त्रेत हे द्वापारादि । येथें सकळांची समाधी ।
धन्य ज्ञानदेव गोविंदीं । रतोनी येथें बैसले ॥६॥
इंद्र म्हणे विष्णुभक्त थोर । प्रत्यक्ष हेहि हरिहर ।
निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर । हेहि अवतार हरीचे ॥७॥
ऐसें सांगितलें समस्तां । मग विदित जालें उभयतां ।
शक्र जाहला निघता । ब्रह्मा आदि करुनीं ॥८॥
शेषही पाताळासी गेला । पुंडरिक गोपाळ राहिला ।
आळंकापुरा स्थिरावला । सकळां भक्तां सहित ॥९॥
सवें संतांचा मेळ । ऐसा राहिला गोपाळ ।
नामा म्हणे चक्रचाळ । पुढें कैसें वर्तलें ॥१०॥

४०
गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें ।
तंव आळकापुरीं कीर्तनें । टाळ मृदांग झणत्कारले ॥१॥
जयजयकार क्षितीं होत । महादोषां संहार घात ।
नामा असे नाचत । पांडुरंगापुढें ॥२॥
रामकृष्ण अवतार । चरित्र गाती सविस्तर ।
वैष्णवीं केला जयजयकार । पांडुरंग म्हणितलें ॥३॥
ज्ञानदेव बैसले समाधी । पुढें आजान वृक्ष निधी ।
वामभागीं पिंपळ क्षितीं । सुवर्णाचा शोभत ॥४॥
निवृत्ती सोपान खेचर । ज्ञानदेव मुक्ताई साचार ।
हे उत्तर द्वारासमोर । बैसते जाले ॥५॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा । चंद्र सूर्य जंव तारा ।
तुझी समाधि स्थिरा । राहो हे निरंतर ॥६॥
जंववरी हें क्षितीमंडळ । जंववरी हें समुद्र्जल ।
मग कल्पक्षी यथाकाळ । माझां ह्रदयीं ठसावें ॥७॥
आणिक एक सोपारें । ज्ञानदेव च्यार अक्षरें ।
जो जप करील निर्धारें । त्यासी ज्ञान होईल ॥८॥
ऐसा दिधला आशीर्वाद । मग संतासीम बोले गोविंद ।
ज्ञानदेवा ऐसा उद्‌बोध । दुजा न देखो दृष्टीसी ॥९॥
ज्ञाना म्हणे स्वामी माझा । अंगिकार केला वोजा ।
पावला भक्तांचिया काजा । गरुडारुढ होऊनी ॥१०॥

४१
ऐसे संतोषले देव । प्रसन्नरुपें माधव ।
मग बोलती ज्ञानदेव । विठठलाप्रती ॥१॥
धन्य धन्य तूं विठ्ठला । धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला ।
धन्य समारंभ येथिला । सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥
तुझेनि आम्ही धन्य । ये जगत्रयीं देवा मान्य ।
म्हणती भक्तांसमान । न देखों त्रिभुवनीं ॥३॥
तूं विश्वात्मा विश्वरुप । तूं जगाचें स्वरुप ।
तुज न लिंपे पुण्यपाप । सदा शुद्ध बुद्ध अससी ॥४॥
तूं आम्हां भक्तां सरिसा । सवें हिंडसी जगदीशा ।
तुजविण अष्टदिशा । मज शून्य वाटती ॥५॥
तरी तूं पाळिसी भक्त लळा । केला समाधीचा सोहळा ।
तो दाखविला मज डोळा । दिव्य दृष्टी देवोनी ॥६॥
तूं सत्वरजतमात्मक । तूं सकळ जीवांचा चालक ।
तूंचि त्रिमूर्ती अवघा एक । विराटस्वरुप सकळ ॥७॥
भक्तभाग्य भूमींतळीं । याकारणें तूं वनमाळी ।
दहा अवतार भूमंडळीं । नाना चरित्रें खेळसी ॥८॥
ऐसें महिमान अगाध । तें तुझें विश्वस्वरुप प्रसिद्ध ।
कोण भाग्याचा मी प्रबुद्ध । तो तूं मजकारणें आलासी ॥९॥
नामा म्हणे ज्ञानदेवें । ऐसी स्तुति केली स्वभावें ।
तंव कृपा करुनियां देवें । अभयकर दीधला ॥१०॥

४२
चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।
पीतांबराची दिव्य दीप्ति । पाडिली सृष्टीवरी ॥१॥
धन्य धन्य ज्ञानदेव । धन्य धन्य तो माधव ।
मग आरंभिला अनुभव । ज्ञानदेवाचेनि मुखें ॥२॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा । तूं अवतरौनि माजि चराचरा ।
हरिला महादेषथारा । तुझेनि कवित्वें ॥३॥
तुझें कवित्व माझ्या गोष्टी । जो परिसेल हे सृष्टी ।
तो येईल माझे भेटी । वैकुंठा पीठीं विष्णूच्या ॥४॥
तुवां जो ग्रंथानुभव । गीतें सांगितला भाव ।
तें मुख्य ठेवणें राणीव । अनुभवीच जाणती ॥५॥
तैसाची अमृतानुभव । सिद्ध पीठ केलें भाव ।
दाउनी मनोहर राणीव । निज गुह्य आमुचें ॥६॥
वसिष्ठगीतेची टीका । भावार्थ काढिला श्लोका ।
ग्रंथ संचिला नेटका । करुनि रचना दाविली ॥७॥
तूं महाब्रह्मींचा अंश । पदपदांतरीं केला प्रवेश ।
दाऊनियां उदास विशेष । या जीवांसी तारिलें ॥८॥
तरी तूं आतां एक वेळ । माझी स्तुती करी निर्मळ ।
जेणें करुनि तरती सकळ । वक्ते श्रोते ग्रंथकार ॥९॥
नामा म्हणे परमानंद । पावोनियां उद्‌बोध ।
केला ज्ञानदेव सावध । स्तुती उपरती मांडिली ॥१०॥

४३
ऐसें आळंकापुर पीठींचे । भक्त नांडती दैवाचे ।
जे कां सागर भाग्याचे । ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥
मग षोडश उपचारीं । पूजा ज्ञानदेव आदरीं ।
दिव्यवाद्यें मंगलतुरीं । ओवाळिती पंचारतियां ॥२॥
ज्ञान सोपान निवृत्ती । मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती ।
ओंवाळिती विष्णूमूर्ती । चतुर्भुज पैं ॥३॥
पीतांबरधारी श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती ।
उद्धव अक्रूर ढाळिती । चवरें वरी ॥४॥
प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । दिव्य स्वरुप प्रसन्न वदन ।
माजी मिरवे दिव्य सिंहासन । त्यावरी आरुढली ॥५॥
पुढें गरुड जोडल्या करीं । उभा पक्षांचा फडत्कारी ।
सूर्य लोपे तेजाकारी । अमृतकरु नाम एक ॥६॥
गोपाळ देव्हडे उभे । मंजुळ पावे वेणुप्रभें ।
शुभकाल सुप्रभें । माजी स्तुति मांडिली ज्ञानदेवें ॥७॥
नामा म्हणे ऐका । पुढें ग्रंथाची पीठिका ।
तो तारील सकळ लोकां । एक एक अक्षर आईकतां ॥८॥

४४
नमो काळकौतुहळ । नमो चक्रचालक गोपाळ ।
नमो विश्वप्रतिपाळ । प्रभंजन ॥१॥
नमो शिव शिवेशा । नमो शिवादि विश्वेशा ।
नमो रुपा अष्टदिशा । व्यापका नारायणा ॥२॥
नमो सकळ गर्भोद्‌भवा । नमो चित्तचाळक भावा ।
नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा । श्रीविठठला ॥३॥
नमो भजनशीळ व्यापका । नमो ज्योतिर्लिंगदीपका ।
नमो नमो तुज एका । आत्मव्यापका जगद्‌गुरु ॥४॥
नमो श्रीये श्रीनिवासा । नमो आगमपरेशा ।
नमो ज्ञानगम्याधीशा । प्रतिकुळा ॥५॥
नमो स्वलीळा विनटा । नमोस्तु ते वैकुंठपीठा ।
नमो रुपादिश्रेष्ठा । वैकुंठीचिया ॥६॥
नमो दर्शनस्पर्शना । नमो उपरतिनिधाना ।
नमो तितीक्षा दारुणा । कमळालया ॥७॥
नमो त्रिगंटी आदटा । नमो त्रिगुणा तूं उद्‌भटा ।
नमो सत्वरुप सदटा । ब्रह्मनामा ॥८॥
नमो रजेश्वरा हरी । नमो विगळितसंहारी ।
नमो वाचा वक्ता करी । वाचाळ वाक्‌पुष्पीं ॥९॥
नमो तमहर्ताकर्ता । नमो सकळसंहर्ता ।
नमो काळकौळु दाता । रक्षिता हरिभक्तां ॥१०॥
नमो हरिहरेश्वरा । नमो न देखों दुसरा ।
नमो वेदांत सागरा । सर्वेश्वरा तुज नमो ॥११॥
श्रुती निरामय नमो । नमो ज्ञानरुप गमो ।
नमो द्वैतनिरसनसमो । करीं तूं निजकरें ॥१२॥
नमो व्यक्ताव्यक्त हरी । नमो मायासंहारकेसरी ।
नमो सर्वांच्या माजघरीं । नांदसी तूं आत्मारामा ॥१३॥
जीवशिव नमो तुज । ज्ञानविज्ञान तूं सहज ।
नमो सर्व जीवां बीज । तूंचि श्रीविठ्ठला ॥१४॥
लीलेस्तव नटारंभ । नमो जगदादि अखिलस्तंभ ।
उभा राहोनी प्रतीभ । भीमातीरीं पंढरीये ॥१५॥
नमो ऐशिया रुपेशा । नमो त्रैलोक्य विस्तारठसा ।
नमो आदि परेशा । जगदाधीशा युगादी ॥१६॥
नमो पुरुषोत्तम परेशा । नमो सकळही उदासा ।
करुनि जीवरुपा ठसा । नांदसी तूं चराचरीं ॥१७॥
मधुसूदना तुज नमो । मधुमाधवा ह्रदय रमो ।
नमो मधुर गीत समो । माजघरीं आत्मयाचिये ॥१८॥
त्रिविधतिमिर नाशा । परम परमानंदा उल्हासा ।
नमो पुरविसी आशा । हरिभक्तांची श्रीहरी ॥१९॥
नमो वासाना चक्रचाळी । नमो तुंडवितंड गेली ।
नमो सर्वही हरली । प्रपचंरचना ॥२०॥
नमो श्रीधर श्रीकर । नमो सर्व संगीम निर्विकार ।
नमो विकृती विकार । हरिसी नामें एकें ॥२१॥
नमो शांती दया क्षमा । नमो कृपाकर पुरुषोत्तमा ।
नमो कांसवदृष्टीसमा । निष्कलंक नाथा ॥२२॥
नमो द्विविध छेदका । नमो एकार्णव पावका ।
नमो द्वादश अर्का । सुभाषका वेद वक्त्या ॥२३॥
नमो चित्त चकोर हर्त्या । नमो सर्वकारण कार्यकर्त्या ।
नमो तुजवांचोनि सत्या । विवेक प्रत्यया पैं न ये ॥२४॥
नमो अद्वैत अनंता । नमो निर्द्वद्व भोक्ता ।
नमो नित्यानित्य सरता । तुज नमो नमो ॥२५॥
नमो दुर्गतिहरणा । नमो सर्व हरण भरणा ।
नमो शिव शक्ति समलिंगा । नमा भक्षक काळवेगा ।
रुद्रादित्या वसु पैं गा । सम सर्वांगा परम परेशा ॥२७॥
नमो कृत्रिम दहना । नमो कृश करण हरणा ।
नमो प्रतिपाळ करणा । नारायणा तुज नमो ॥२८॥
नमो इंद्रिय नियंत्या । नमो प्रपंच अकृत्या ।
नमो दीनादित्या । सकळ वृद्धि तूंचि ॥२९॥
नमो अवधूत दत्ता । नमो अपरमित मिता ।
नमो सर्वां वरिष्ठ सत्ता । तूं चाळिता ह्रषिकेशी ॥३०॥
नमो दृष्ट दर्पादर्पा । नमो चमत्कार गंगा सर्पा ।
नमो नमो हरण पापा । नमो स्वल्पा रामकृष्णा ॥३१॥
नमो चतुर वेद दीप्ता । नमो हरण करण तूम तुप्ता ।
जागृति स्वप्न गुप्ता । सत्य सुप्ता महाविष्णु ॥३२॥
नमो देवेश्वरा सूक्ता । महा मोहा हर्ता ।
मंद मंद नियंता । नमो नारायणा ॥३३॥
क्षीर नीर निर्झरा । नमो विद्वद अनुकारा ।
नमो विवेक सागरा । महानादा ॥३४॥
नमो मुखदंतसदना । नमो भक्षक भुवना ।
शुक्लांबरा शुक्लवर्णा । दयाघना गुणनिधी ॥३५॥
मृतामृत नमो नमो । नमो श्रुतिशास्त्र समो ।
नमो हा गर्व गमो । पद्मगर्भानंतानंता ॥३६॥
नमो चिदाकाशव्याप्ता । चित्सत्ता चळण सत्ता ।
चित्स्वरुपादिरुपा । भुवन दीपा महामूर्ती ॥३७॥
नमो एक एकार्णव । नमो कल्पादि गुण वैभव ।
नमो सकळ हे देव । हे भाव पैं तुझे ॥३८॥
गो गोपाळ नमो नमो । गोविंद गुणविष्णु धर्मो ।
नमो चित्त चिंतनी रमो । सर्वकाळ तुझ्या चरणीं ॥३९॥
ध्वज वज्रांकुशा । ध्वजनीळ विकासा ।
ध्वजांबरा अष्ट दिशा । नीळिमा भासती शामांकिता ॥४०॥
सुषुप्तीचे जें सत्य । तें नमो तुज कृत्य ।
असोस ज अमित्य । तें तें क्षमा करी स्वामी ॥४१॥
नमो निर्धार नियंता । नमो सुखरुप दाता ।
नमो आलिया पदार्था । क्षमा करी स्वामीं ॥४२॥
नमो चित्त विभ्रमा । नमोधार्य धैर्य नेमा ।
नमो पुराण पुरुषोत्तमा । पाहे कासव दृष्टी ॥४३॥
पसाय दाना नमो । परम परेशा समो ।
ध्यनांतर गमो । तुझ्या चरणीं केशवा ॥४४॥
आग्रह नियंत्या नमो । सग्रह परी नमो ।
अनंता नित्य धर्मो । वैकुंठ गुण ग्राम नमो नमस्ते ॥४५॥
अनादृश दृश्यमाना । दृशादृश्य नित्यघना ।
सुखरुप जगजीवना । तुज नमो स्वामी ॥४६॥
दीप्तादीप्त अदृश्य । जीवन दिसती सादृश्य ।
जीवमय हें भाष्य । तुज नमो स्वामी ॥४७॥
परम पर ब्रह्मा । आदि ब्रह्मा तूं रामा ।
भक्तांलागीं साउमा । तुज नमो ॥४८॥
नमो नमो एक तत्वा । बाह्य मुद्रा शुद्ध सत्वा ।
योगा रुढ परतत्वा । सबाह्य पावसी तुज नमो ॥४९॥
वेदादि परम वक्ता । वेदादि तूंचि कर्ता ।
तुजवांचोनि सर्व सत्ता । नमो भोक्ता न देखों ॥५०॥
ज्योतिर्मय रुप तुझें । सर्व तत्वां तूंचि बीज ।
नमो तुज सहज । पुढती पुढती नमो नमो ॥५१॥
परब्रह्म परात्पर । परम तत्व परम सार ।
परम गुह्य परम विचार । तुज नमो नारायणा ॥५२॥
दिघड बिघड सुघडा । जाडा जाड अवघड ।
द्वैता द्वैत जोडाजोड । कर्ता कार्यता तुज नमो ॥५३॥
संख्या रहित जीवना । असंख्य जीव पाळणा ।
नमो तुज संजीवना । पुंडलिकधना पांडुरंगा ॥५४॥
निर्गुण सगुण रुपा । देवा देव तूं सोपा ।
तुझी जाहलिया कृपा । नमन बापा तुझ्या चरणीं ॥५५॥
नमो नमो तारका । तूं ब्रह्म नामा निशेखा ।
नमो तुजवांचोनि सखा । योगीयासी पैं नाहीं ॥५६॥
जुगादि जुगत्रय । जुग जोग योगमय ।
हे तुज पासाव होय । ऐसिया तुज नमो ॥५७॥
नमो नमो नम । नाहीं नाहीं तुजसी सम ।
ऐसा परापश्यंती नेम । वदलिया चारी ॥५८॥
चहूं मुक्ति परतत्वा । पंचभूजा शुद्ध सत्वा ।
षड्‌ मार्ग गुण सत्वा । ग्रास न करिसी तुज नमो ॥५९॥
विद्वद चिद्विलासा । भानुबिंबा प्रति प्रकाशा ।
नेमो तेज तेजसा । आदिसूर्या ॥६०॥
ऐसा चहूं ग्रंथाचा क्लेशु । वाउगाचि वाहे सोसू ।
त्रिमिर त्रिगुण असोसू । तो सत्वांशु तोडी माझा ॥६१॥
साहीं नाडी नक्र भ्रमें । वाहातां इंद्रियांची ग्रामें ।
ते अडखळोनि साउमे । नये ऐसें करीं नमो ॥६२॥
बाध्य बाधा कर्माची । सर्व सत्ता या भ्रमाची ।
नमनें करुनियां तुमचीं । तुम्हासी अर्पिलीं स्वामी ॥६३॥
यम धर्माचिया सत्ता । कर्म धर्माचिया पंथा ।
कर्मधर्म विधाता । ऐसिया नेमिता तुज अर्पिला ॥६४॥
दश शम समान । इडा पिंगळा सुशुम्न ।
साही चक्रें दरुषन । तुझीं तुज अर्पिलीं ॥६५॥
मन पवन योग धारण । तूं यासी पैं कारण ।
समतुकें अवघे गुण । तुझ्या चरणीं निक्षेपिलें ॥६६॥
हें भूत भौतिक प्रचंड । जन्म उत्पत्तीचें अंड ।
जन्म जुगादि ब्रह्मांड । खंड विखंड तूं जाणता ॥६७॥
प्रचुर चर्या चित्ताची । धावन वळण अकोंचनाची ।
सूचना जे चमत्काराची । ते हि अर्पण तुज सदां ॥६८॥
निर्वासना वासना युक्त । गुंफले राहिले जेथें चित्त ।
तेथें तूं धावोनि अनंत । सोडविसी वासनामय ॥६९॥
सूक्ष्म अविचारा बोला । बोली नातुडे व्यर्थ गेला ।
तो म्यां बुझावोनि संबोखिला । मग लाविला तुझ्या पंथीं ॥७०॥
नित्य धर्माचिया वोळी । चळल्या चुकल्या कोण चाळी ।
त्यासी वेद तुझा पाळी । त्या तूं सांभाळी परब्रह्म ॥७१॥
श्रृति स्मृतिंची वचनें । याची अंगराग मार्गस्थानें ।
कीर्तनीं गुण वर्णनें । हे हि नारायणें अंगीकारावीं ॥७२
उदंड विदंड वितंड । देह द्व्याचे अभंड ।
जे जे दिसे भ्रंश अंडांड । ते शुभ्र चंड सांभाळी ॥७३॥
देह भरणाची ममता । देह पोखिती जे सत्ता ।
त्याहि वरील सूक्ष्मता । ते कृपावंता सांभाळी ॥७४॥
त्रिमिर त्रिगुण अवघे । जें जें आलें असेल वोघें ।
तें तें मी नेघे । तें तूं सकळ वेगें सांभाळीं ॥७५॥
योनीचिया कष्टा । वरी वासना होती भ्रष्टा ।
त्या त्या करुनि प्रविष्टा । रत जालों तुझ्या चरणीं ॥७६॥
विद्या वयसा कुळ । ब्रह्म कर्म आचारशीळ ।
गेले आले विव्हळ । ते तूं दयाळ सांभाळी ॥७७॥
नाना जन्म अवतार । नाना शाखांचे निर्धार ।
नाना गोत्र उच्चार । तुझा विचार तूं जाणसी ॥७८॥
पाठ वेदादि वचनें । शास्त्रदृष्टी अवलोकनें ।
कीर्तनी गुण वर्णनें । हें हि नारायणें अंगीकारावी ॥७९॥
सर्वमय सर्व सपाट । त्यावरी करुनि चालिलों वाट ।
चंद्र सूर्य नक्षत्रें घनदाट । करुनि एकवट पायरी ॥८०॥
सर्व अंडाचे ब्रह्मांड । मी न म्हणे अंडांड ।
खंडें करुनियां विखंड । प्रचंड मी तुजसी बोलें ॥८१॥
रोमरंध्रीं ब्रह्मांडें । सकळ विराटमय खंडें ।
ऐसी महत्तू ब्रह्म प्रचंडें । तुझ्या अंगीं दातारा ॥८२॥
तूं विश्वरुपाची घडी । तारक ब्रह्मचि उघडी ।
मियां निज दृष्टीनें चोखडी । तुझी मूर्ति न्याहळिलो ॥८३॥
तें न सुटे निजकळे । येर्‍हवी हें ना कळे ।
तुझ्या कृपागुणें आकळे । तुझिया दासा निज भक्तां ॥८४॥
अनंत या नामाचा संकेत । मन मुरालें जेथें निर्धूत ।
तूंपणे परमाद्‌भुत । परमानंदा ॥८५॥
गुणाग्र गोसावी राम । गुण समुद्र गुण ग्राम ।
सकळ भूतांचा विश्राम । तुज नमो ॥८६॥
नमन केलिया विभूतीं । चित्त रमलें जाली विश्रांती ।
तुज देखिलिया श्रीपती । न राहे चित्तीं तळमळ ॥८७॥
नमन हेंचि थोर दिसे । एर्‍हवीं तरंगाकार भासे ।
देखिलें तुतुकें नासे । नैश्वर्य ऐसें श्रुति बोले ॥८८॥
नमन हेंचि परम । नमन हेंचि सुवर्म ।
नमन हेंचि आत्माराम । करुं निघाली ॥८९॥
नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव ।
नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तूं पावसी ॥९०॥
नमन हेंचि श्रेष्ठ पीठा । नेतसे तुझिया वाटा ।
तुज ऐसा श्रेष्ठा । मग वाटा काय कराव्या ॥९१॥
नमन हेंचि तारक । नमन हाचि विवेक ।
नमनेंविण त्रैलोक्य । आडमार्गीं रिघताती ॥९२॥
नमन लटिकें नव्हे नव्हे । नमन भलतियासी न साहे ।
जैं साह्य सखा होय । श्री निवृत्ती ॥९३॥
नमन एवढा मंत्र । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र ।
विचार लक्षण पात्र । तोचि जाणे येथींचे ॥९४॥
नमन करी ब्रह्मा श्रेष्ठा । नाभीकमळीं धरी वैकुंठा ।
नमन करी नीळकंठा । तीर्थें मस्तकीं वंदिती ॥९५॥
इंद्र चंद्र महेंद्र थोर । नमनेंविण नैश्वर ।
अंडामध्यें चराचरा । नमनेंविण न तरती ॥९६॥
नमस्ते नमस्ते नमस्ते । पुढतीं पुढतीं नमस्ते ।
समाधिसुख आस्ते । नमो नमन करितां ॥९८॥
नमो नमो आदि पीठा । शिवादिक वरिष्ठा ।
येथें येऊनि वैकुंठा । समाधि शेज घातली ॥९९॥
महाविष्णू तूं योगरुपा । महारुपाचिया स्वरुपा ।
महादित्या अमूपा । कोटी सूर्य तेजसा ॥१००॥
शंखचक्रानें मंडित । करकमळ तुझे मिरवत ।
पदक ह्रदयावरी शोभत । आणि श्रीवत्सलांछन ॥१०१॥
अनंत बाहूंचा मेळ । तो तूं चतुर्भुज गोपाळ ।
मुगुट विराजित तेजाळ । कोटी सूर्यहुनि प्रभा ॥१०२॥
पितांबर माळ कंठीं । सर्वांगीं चंदनाची उटी ।
हिरे माणिक कटीतटीं । अनेक कीळा फाकती ॥१०३॥
क्षुद्र्घटिकाचिया वोळी । घणघणाट तया तळीं ।
देहुडा पाऊलीं निश्चळीं । वेणु वाजविसी सुस्वरें ॥१०४॥
रुणुझुणु रुणुझुणु । ऐसा वाजविसी वेणू ।
सुंदर तूं श्यामतनु । अळंकापुरीं उभा अससी ॥१०५॥
सभोंवते गोपाळ तुझे । ते अंतरंग पैं सखे माझे ।
पुंडलिक तरि सहजे । प्राण सखा पैं माझा ॥१०६॥
ऐसा ज्ञान उद्‌बोध बोले । ज्ञानांजन निरसलें ।
विज्ञानहि हारविलें । दृश्य द्रष्टेंपणेसी ॥१०७॥
बापरमुमादेवीवरु । समाधि देऊनियां स्थिरु ।
वरी ठेवोनियां अभय करु । वर देऊनि राहिला ॥१०८॥

४५
ऐसी स्तुति नमनाची । केलिया भगवंताची ।
ऐकतां जाली रुची । म्हणे धन्य धन्य रे सख्या ॥१॥
कैसी स्तुति परिकर । जपतां नामावळी साचार ।
वेगीं तुष्टले हरिहर । निज ब्रह्म स्वरुप ॥२॥
वैष्णव सभोंवते उभे । तिहीं जयजयकार प्रतिभे ।
करुनि रुक्मिणीवल्लभे । तया प्रसाद दिधला ॥३॥
मागुता ज्ञानदेव वदे । धन्य धन्य तुझीं चरणारविंदें ।
तेथें रातलिया योगिवृंदें । ते चरण धन्य धन्य ॥४॥
पुंडलिकें स्तवन । मांडावें तंव नारायण ।
म्हणे सन्मुख उभा सोपान । यासी समाधि देणें लांगेल ॥५॥
निवृत्ती मुक्ताई दोघें । तीं बुझाविलीं पांडुरंगें ।
उद्धव अक्रुर वेगें । तया संगें निरविलीं ॥६॥
ज्ञानदेवासी उद्धव । बोले एकांतीचा भाव ।
तुम्हां तुष्टला देवाधिदेव । धन्य धन्य वैष्णव तुम्ही ॥७॥
ज्ञानदेव म्हणे स्वामी । दीनें रंकें विठोबाचे आम्ही ।
धन्य धन्य भाग्याचे तुम्ही । जे निरंतर विष्णुसंगें ॥८॥
उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा । आम्ही जाणो कृष्णावतारा ।
परि पांडुरंग मूर्ति निर्धारा । तूं आणि पुंडलिक जाणसी ॥९॥
नामा म्हणे ज्ञानदेवें मागुतें स्तवन आरंभिलें भावें ।
तें ऐकवया देवें । एकचित्त केलें ॥१०॥

४६
कर जोडोनियां पुढें । लोटांगण टाकिलें गाढें ।
म्हणे स्तवन करावया मी वेडें । काय जाणे तुझा महिमा ॥१॥
तरी पांडुरंगा तूं दयाळु । भक्त भाविकां कृपाळु ।
भीमातटीं उभा गोपाळु । पुंडलिकाकरणें ॥२॥
चंद्रभागा सरोवरीं । निरे भिवरेचां तिरिं ।
वाट पाहसी हरी । भक्तासाह्या कारणें ॥३॥
तरी उदार शूर महिमेचा । खुंटलिया चारी वाचा ।
तेथ पवाडु मज कैंचा । वर्णाविया सामर्थ्य ॥४॥
शेषा ऐसा स्तुती करी । तया नाकळ्सीच श्राहरि ।
जिव्हा चिरलिया भग्नधारी । मग मौन्येंचि राहिला ॥५॥
तो तूं अळंकापुरीं येसी । मज दीना समोखिसि ।
देव म्हणे तूं होसि । साक्षात ज्ञानरुप ॥६॥
ज्ञानदेवो साक्षात नाम तुझें । तें ज्ञान ह्रदयीचें माझें ।
हे जन तारावया काजें । तुवां अवतार घेतला ॥७॥
नामा म्हणे देव हरी । पुढतोपुढतीं साहाकारी ।
वर देऊनि अंगिकारी । आपणची जाला ॥८॥

४७
तव अंतरिक्षीं गगनीं । देव बैसोनि विमानीं ।
वर्षताती दिव्य सुमनीं । पांडुरंगावरी ॥१॥
विठोबा गुणनिधी । सवें पुंडलिक सुबुद्धि ।
लघिमा आणिमादी सिद्धी । सवें असती ॥२॥
मग नेमिलिया तिथी । कृष्णपक्ष अष्टमी समर्थीं ।
नाम संकीर्तन संतसंगतीं । तो ब्रह्मप्राप्ति पावला ॥३॥
नवमीं गजर कथेचा । तरि वैष्णव तोचि साचा ।
चतुर्भुज होईल हे वाचा । वदोनियां गेले ॥४॥
सहज ते दशमी । दिंडी जागरण आश्रमीं ।
तो येईल वैकुंठ ग्रामीं । कीर्तन करीतची ॥५॥
एकादशी श्रेष्ठ गाढी । नामस्मरणें कोटीयाग जोडी ।
येकी घडी युगाएवढी । एवढें सामर्थ्य इयेचें ॥६॥
एकादशी दिननिशीं । जागरणीं ह्रषिकेशी ।
कीर्तन करी अहर्निशीं । तरि तो तारिल सर्व जनां ॥७॥
द्वादशीस क्षीराब्दी । कीर्तन करील आल्हादीं ।
तो पावन होईल गोविंदीं । निजपदीं विष्णूचा ॥८॥
त्रयोदशीं उत्तम थोर । करिल दिंडी पताका गजर ।
टाळ मृदुंगे झणत्कार । तरि तो सकळ कुळ तारील ॥९॥
नामा म्हणे चतुर्दशीं । अमावस्येचा दिवशीं ।
ज्ञानदेवीं राहेल नेमेंसी । तरी तो तरैल भूतकाळीं ॥१०॥

४८
ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें ।
देऊनि भूषणें अनेगें । रत्नमुक्ताफळें अलंकार ॥१॥
धन्य जन्मले भूमंडळीं । कीर्तनीं नाचती गदारोळी ।
ते विष्णुसन्निध सर्वकाळीं । ऐसें वनमाळी बोलिले ॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा । विचारिती पुरुषोत्तमा ।
बहुत विठोजी जंववरी धरा । तंववरि समाधि स्थिरा ।
हरिकीर्तन करितो सैरा । चतुर्भुज होईल ॥४॥
हें शिवपीठ शिवाचें । हेंचि पूर्वस्थान अगस्तीचें ।
जाणोनि जन्म जाले चौघांचे । सर्व क्षेत्रांची आदिभूमि ॥५॥
पूर्वापार युगायुगीं । अनेक पुण्यें घडले यागीं ।
तपें तपिन्नलें महायोगी । तो हा आळंकापुरें ठावो ॥६॥
येथें रामकृष्ण कथा । जो करील सर्वथा ।
तो पुढें पवेल व्यथा । भवबंधापासुनी सुटेल ॥७॥
सप्तद्वीप नवखंड । आणि अवघें गणितां ब्रह्मांड ।
त्याहूनि हें हो उदंड । पुण्य जोडेल नामें ॥८॥
ऐसें उत्तमोत्तम थोर । सकळ जीवांचे माहेर ।
नाम घेतां तरती चराचर । दिला वर रुक्मिणीवरें ॥९॥
नामा म्हणे देवराव । महिमा सांगतसे भाव ।
धन्य आळंकापुरी गांव । आदि ठाव वरिष्ठ ॥१०॥

४९
नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती ।
जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥
ऐसें तीर्थक्षेत्र सर्वोत्तम । आणिक नाहीं यासी सम ।
शिवपीठ हें मनोरम । आळंकापुरीं हें देख ॥२॥
न वर्णवे येथिंची थोरी । जेथें साक्षात श्रीहरि ।
येऊनियां झडकरी । ज्ञानदेवा समाधि दिधली ॥३॥
अनंत पुण्य ज्याचें गांठीं । तरीच ज्ञानदेव पडे दिठी ।
जोडे तप कोट्यानुकोती । ऐसे धूर्जटी बोलिले ॥४॥
सिद्ध साधकांचे स्थळ । सर्व तीर्थाचें हेंचि मूळ ।
वास केलिया सर्वकाळ । तरी महादोष हरतील ॥५॥
अजान वृक्षातळीं हरिकथा । नित्य जो नर करी तत्वतां ।
तो न जाय यमपंथा । ऐसें जगन्नाथ बोलिले ॥६॥
द्वारीं सुवर्णाचा अश्वत्थ । नित्य पूजलिया स्वस्थ ।
लक्ष्मी न सांडी तया सत्य । सकळ आर्ती पूर्ण होती ॥७॥
नित्य प्रदक्षिणा सप्त । तरी अगाध पुण्य त्वरित ।
पूर्वज्क वैकुंठासी जात । बेचाळिसां सहित ॥८॥
नित्य विष्णूचें पूजन । नित्य नाम संकीर्तन ।
नित्य वैष्णव संत भोजन । धन्य पावन इहलोकीं ॥९॥
नामा म्हणे आळंकापूर । सर्व क्षेत्रामाजीं मनोहर ।
पवित्रासी परम परिकर । त्रिभुवनीं दुर्लभ ॥१०॥

५०
ऐसें तीर्थ सर्वोत्तम । सांगतसे पुरुषोत्तम ।
शंकरादि परमधाम । ब्रह्मनाम वर्णित ॥१॥
क्षेत्रमहिमा अति अद्‌भुत । आदि सिद्धेश्वर कुळदेवत ।
समर्थ महाभागवत । नामें गर्जत सर्वकाळ ॥२॥
म्हणे पुंडलिक पूर्वींचे स्थळ । आणि शिवाचें मूळपीठ निर्मळ ।
तेथें निर्विकल्प सोज्वळ । तप विशाळ जोडिले ॥३॥
क्षेत्र पंढरीहुनी अधिक । ऐसें बोलती ब्रह्मादिक ।
म्हणती धन्य येथिंचे लोक । शुद्ध भाविक प्रेमळ ॥४॥
घडे महाविष्णूचें पूजन । तीर्थ व्रत संध्यास्नान ।
वाचे हरिनाम कीर्तन । श्रवणीं गुण विष्णुचे ॥५॥
विठोजी म्हणे ऐक भक्ता । तपोनिधी महंत तूं सर्वथा ।
ज्ञानदेवासारिखा वक्ता । मज आवडता न दिसे ॥६॥
तुम्ही दोघे असा या सृष्टीं । जग उद्धारीं पाटोवाटीं ।
कीर्तन करितां उठाउठीं । तो वैकुंठीं पावावें ॥७॥
पुंडलिकें नमस्कारिले हरी । चरणचज वंदिले शिरीं ।
म्हणे मी भाग्याचा उजरी । तूं कैवारी आमुचा ॥८॥
नामा म्हणे देशभक्त । एक होऊनि समस्त ।
निवृत्तिराज स्तुति बोलत । प्रेम अद्‌भुत दाटलें ॥९॥

५१
परब्रह्म परममूर्ती । परमधाम परात्पर कीर्ति ।
परमप्रियो परंज्योती । श्रुतिस्मृति स्वानुभव ॥१॥
अकळ विकळ निरंजन । ज्ञाताज्ञेय विवेकधन ।
संशय दृश्य निरसन । विश्वप्रिये ॥२॥
नलिनीकमलविकाशा । नयनघन विश्वेशा ।
नमन चरणलेशा । चित्सुखा ॥३॥
चराचर सच्चिदानंदांग । शुद्धस्नान शंकर दिव्यांग ।
विष्णुमूर्ति पांडुरंग । सगुणरुप भीमातटीं ॥४॥
सजळ जलघना । दशन कोटी सूर्यकिरणा ।
मुक्ताहार जडित रत्ना । किरिटी मुगुट विराजित ॥५॥
नीलोत्पल नीलवर्णा । श्यामसुंदराअ मूर्तिघना ।
स्तविताम सहस्त्रवदना । नकळे पार तुझा ॥६॥
रजतमाचे मेहुडे । पाहतां तूं न सांपडे ।
नाहीं तुझिया पडिपाडें । भूमंडळीं दैवत ॥७॥
अनंत ब्रह्मांडधीशा । गुण न वर्णवे परेशा ।
तुंवा ज्ञानदेव सर्वेशा । अपणामाजीं सामावला ॥८॥
निवृत्ती म्हणे आम्ही दीनें । तारावीं तुम्ही नारायणें ।
मग काय आदरिलें सोपानें । तेथवरी येणें घडेल ॥९॥
ऐसी निवृत्तिदेवाची स्तुती । ऐकुनियां श्रीपती ।
नामा म्हणे देव तयाप्रती । बोलत जाले ॥१०॥
नारायणें स्तुति परिसिली । ऐकुनियां अव्यक्त बोली ।
म्हणे तुवां गीतेची टीका केली । ते प्रमाण आम्हासी ॥११॥
नामा म्हणे हरी देवें । जाणोनियां अंतर्भावें ।
तुष्टले गुणगौरवें । निवृत्तीसी दिधले ॥१२॥

५२
म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा ।
स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥
वसति सप्तद्वीप नवखंड । त्यामाजीं अनंत ब्रह्मांड ।
रोमरंध्रीं ज्या अखंड । तो मनुष्यरुपें मेदिनी ॥२॥
निवृत्तिनाथ नाना अवतारीं । तुमच्या सेवेसीं श्रीहरी ।
जें जें प्रेरसी कामारी । सांगितलें करी उगाचि ॥३॥
म्हणे देवाधिदेवा आतां । सांगाल तें करुं तत्वतां ।
हरुं भवार्णवाची चिंता । या त्रैलोक्याची ॥४॥
तंव निवृत्तीनें लोटांगन । म्हणे नाहीं तुज समान ।
आम्हांकारणें नारायण । साहाकारी होसी ॥५॥
आमुचा तपें समर्थें । तुवां सिद्धी पावविली जगन्नाथें ।
सरते करुनियां आम्हांते । विष्णुमार्गें लाविलें ॥६॥
देव म्हणे तूं आधीं । विष्णुमार्गींची सकळ सिद्धी ।
जाणतां तूं एकत्र शुद्धी । निवृत्ती होसी ॥७॥
नामा म्हणे ऐसे लळे । पाळिले तयाचे गोपाळें ।
देऊनियां समाधिसोहळे । विष्णुधर्म प्रतिष्ठिला ॥८॥

५३
ऐसा निवृत्ती स्थिरावला । महाविष्णु संतोषला ।
मग सोपानदेवें आरंभिला । स्तुतिवाद परियेसा ॥१॥
जयजया तूं रामकृष्णा । भक्तभाविकां हरी तृष्णा ।
देहीं दीपक सहिष्णा । रामकृष्ण म्हणतांचि ॥२॥
नरहरि नरकेसरी । टाळी वाउनियां गजरीं ।
टाळ मृदंग झणत्कारी । जयजय कृष्ण म्हणों आम्हीं ॥३॥
एक हरिविण नाहीं सखा । त्रिभुवनीं आत्मा देखा ।
समाधिसुखाविशेखा । चरणरजें डौरवावें ॥४॥
धन्य हे भूमिका देश । आपण हरि जगन्निवास ।
ज्ञानदेवीं केला वास । समाधिसुख घेऊनी ॥५॥
निवृत्ती ऐसा श्रेष्ठ गुरु । तोहि समाधीसी होय स्थिरु ।
तरि पुढें काय करणें विचारु । तो सांगावा स्वामिया ॥६॥
देव म्हणे ब्रह्मावतारा । या अवघिया चराचरा ।
श्रेष्ठ तूंचि निर्धारा । मनुष्यरुपें अवतलासी ॥७॥
सकळ हे तुझे व्यापक । चराचर हें त्रैलोक्य ।
अधर्मं जालिया चाळक । अवतार घेती तिघे ॥८॥
ऐसें बोले पाडुरंग । सोपान निवाला सर्वांग ।
म्हणे सांकडें फेडिता श्रीरंग । तूंचि श्री विठठला ॥९॥
नामा म्हणे सोपानदेवें । मागुती स्तुति आदरिली भावें ।
जेणें करुनियां बरवें । समाधिसेजेची ॥१०॥

५४
मुक्ताई म्हणे देवा । तूं विसावा सर्वां जीवां ।
गुण गौरव अनुभवा । आम्ही जाणों तुज ॥१॥
सत्य सत्य जनार्दना । सत्य सत्य नारायणा ।
सत्य सत्य तूं आमुचें धना । जगज्जीवन जगदाकारा ॥२॥
तुझेवांचेनि त्रिभुवनीं । दुजा न देखों नायकों कानीं ।
वेदशास्त्रपुराणें । अगाध महिमा तुझा ॥३॥
तूं देवा देवोत्तम । योगियांचा विश्राम ।
शिवाचा ही आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥४॥
तरी भक्तांलागीं ऐसा । पावसी तूं ह्रषिकेशा ।
तुजविण नाहीं भरंवसा । आणिकां देवांचा ॥५॥
तूं परत्रीचें तारुं । तुझा आगम निगम विचारु ।
तुज चिंतलिया संसारु । निरसे हेंचि सत्य ॥६॥
देव म्हणे मुक्ताबाई । चित्त समरसें जैं माझ्या ठायीं ।
तैं तया जन्मचि नाहीं । हें सत्य जाणावें ॥७॥
नामा म्हणे ऐसी स्तुति । मुक्ताबाई नंव करिती ।
तंव संत विनविती । महाविष्णूसी ॥८॥

५५
तंव पुंडलिक पुढारला । कर जोडोनि वदला ।
म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया रुपाचा ॥१॥
तो तूं प्रकट श्रीरंगा । भीमातटीं पांडुरंगा ।
येउनि आमुचिया लोभा । भक्तजनां तारिसी ॥२॥
नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महिमान ।
कोण तप कोण साधन । कोणें जन्मीं केलें होतें ॥३॥
नीरे भिवरेचां संगमीं । चंद्रभागेचां उगमीं ।
वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥
तरी स्वामी दयाळा । महाविष्णू गोपाळा ।
भक्तालागीं कृपाळा । तारावया दासासी ॥५॥
माझें करुनियां मिस । राहिलास युगीं अठठावीस ।
धरुनि सगुण गुणास । माझे भक्ति लोधलासी ॥६॥
तूं नियंता ईश्वरमूर्ति । सकळ गोसावी श्रीपती ।
तुजवांचोनी नेणें मती । दयामूर्ति परब्रह्मा ॥७॥
नामा म्हणे पुंडलिका । देवें म्हणती पुण्यश्लोका ।
स्तुति आदर केला निका । धैर्य विवेक तूंचि होसी ॥८॥

५६
मग सारोनी संध्यास्नान । देवभीक्त विष्णुपूजन ।
पंक्ति आदरिलें आपोशन । मागुती भोजन करिताती ॥१॥
धन्य धन्य तूं ज्ञानराजा । तूं आवडलासि केशिराजा ।
पंक्ति करोनि द्विजा । वाढितसे रुक्मिणी ॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा । वाढिती पंचामृत उत्तमा ।
पुंडलिक बोलावुनि साउमा । ज्ञानदेवा पंक्ति बैसविलें ॥३॥
निवृत्ती सोपान मुक्ताबाई । गोपाळ देव्हढे दोन्ही बाहीं ।
रुक्मिणी सत्यभामा राही । वाढिती अन्नें नानाविधें ॥४॥
वैष्णव प्रेमळाचे पंक्तीं । प्रार्थना करितसे श्रीपति ।
सोपान ज्ञानदेव निवृत्ती । एकवट बैसविले ॥५॥
गरुड तिष्ठत होता द्वारीं । त्यासी रुक्मिणी ताट करी ।
मग गर्जिन्नले जैजैकारीं । गोविंद श्रीराम उच्चारें ॥६॥
देव आकाशीं पाहाती । ब्रह्मादिक वंचलों म्हणती ।
भाग्य केवढें यांचें क्षितीं । या भक्तजनांचें ॥७॥
नामा म्हणे आळंकापुर । धन्य धन्य मनोहर ।
आपण येउनि सारंगधर । समाधि देती ज्ञानदेवा ॥८॥

५७
तंव विनवी ज्ञानदेव । सकळांचा जाणोनी ठाव ।
शुद्ध भक्ति प्रेमळ वैष्णव । सर्वभाव सख्य घेतां ॥१॥
बैसोनियां एक आसनीं । देशभक्त चक्रपाणि ।
तांबुल घेवोनियां वदनीं । सुखसंतोषें बोलती ॥२॥
मग पाचारिला गरुड । भक्त पूंडलिक प्रौढ ।
भक्त सोपान गम्यगूढ । जाणते भक्त ॥३॥
केलें प्रयाणासि मुहूर्त । पंढरीस जावयाचें आर्त ।
संवत्सरा जाऊनि त्वरित । समाधी देऊं सोपाना ॥४॥
ऐसा निर्धार करुनि । समस्तां भोजने सारुनि ।
सिद्ध जाली माता रुक्मिणी । दिन अस्तमाना गेला ॥५॥
जावोनी तया पुष्पकावरी । शयन आरंबिलें हरी ।
नारद तुंबर वैकुंठाभीतरीं । मंजुळ सुस्वरीं गातसे ॥६॥
भक्त भागवत भाग्याचे । तीहीं जयजयकार केला वाचे ।
ऐसें चतुर पाहार निशींचे । जागरण हरीचें कर्मिलें ॥७॥
नामा म्हणे निघतां हरी । ज्ञानदेवो प्रार्थना करी ।
देवा तूंचि वैकुंठहरी । आमचा ह्रदयस्थु ॥८॥

५८
उगवला दिन प्रभात । स्नान संध्या सारोनी समस्त ।
उद्वव कर जोडोनी बोलत । पूर्ण आर्त सर्वांचे ॥१॥
अनूपम इचा महिमा । न बोलवे जाहली सीमा ।
आताम चला वेगीं पुरुषोत्तमा । आपले आश्रमा पंढरीसी ॥२॥
गरुड सामोरा तिष्टत । भक्त भागवत समस्त ।
मुनी पुंडलिक विनवित । केलें दंडवत साष्टांगें ॥३॥
म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदि । वाग्‌स्नेहो वाक्बुद्धी ।
परंपरा याचि वैखरी । यासी मंत्रोक्त दिधली ॥४॥
ऐसाचि सोपान मार्ग । तूंचि करितां पांडुरंग ।
ग्राम लेखनाचा प्रसग । निरोपिला सांग कुळयाती ॥५॥
सकळवंश परंपरा । न सोडावें तुम्ही आचारा ।
आम्ही जातों पंढरपुरा । या विठोबा सांगातें ॥६॥
सकळां आलिंगन दिधलें । मग गरुडावरी आरुढले ।
ज्ञानदेवांनीं हरीची पाऊलें । दृढ धरिलीं निरंतर ॥७॥
नामा नाचे हरिद्वारीं । आनंद जाला आळंकापुरीं ।
विठठल देवो निघाले पंढरीं । ज्ञानदेवा समाधि देवोनि ॥८॥

५९
नामयाचा धरुनि हात । क्षणक्षणा पंढरिनाथ ।
ज्ञानदेवातें आठवित । कंठ सद्‌गदित करुनियां ॥१॥
उद्धवासी म्हणे पांडुरंग । या सज्जनाचा न व्हावा वियोग ।
हें ह्रदय होतसे दोन भाग । जाणा अंतरंग तुम्ही माझें ॥२॥
त्याविण गोड मज न वाटे । ऐसे जिवलग कैचे भेटे ।
जे मनींचा वियोग दुःख तुटे । समाधान वाटे ह्रदयामाजीं ॥३॥
ज्ञानदेवा ऐसो निधान । नाहीं धुंडितां त्रिभुवन ।
न संपडे न देखो जाण । तुझी आणि उद्धवा ॥४॥
धन्य धन्य हे तिघेजण । मुक्ताताई मुक्तरुपें पूर्ण ।
हीं उद्धरिलें त्रिभुवन । भवदुःख दारुण नासीलें ॥५॥
याचे निपडी पाडे । उपमेसी दीसे थोडे ।
परी ज्ञानदेवा ऐसें रत्न जोडे । हें न घडे कल्पांतीं ॥६॥
माझे जिवीचें गुह्यगुज । हें उद्धवा सांगितलें तुज ।
कां नामदेव जाणे सहज । आणि सकळ संत सज्जन ॥७॥
गुज सांगे रुक्मिणीसी । घडी घडी ह्रषिकेशी ।
तंव रुक्मिणीसी । मानसीं । या जीवलागासी आठवि ॥८॥
ज्ञानदेव तरी तुमचा अंश । केवळ स्वयंप्रकाश ।
स्वात्मसुख निजरहिवास । स्वानंद असे उद्‌बोध ॥९॥
निवृत्ति तुम्हां नाहीं भिन्नता । त्याचा आत्मा तुम्ही हो आनेला ।
शिव विष्णु आईक्यता । असे स्वभावता मुळींच ॥१०॥
सोपान तरि पोटींचा । तो प्रान असे तुमचा ।
तेथें शब्द भिन्नपणाचा । कोठें मिरवेल ॥११॥।
संतभक्त सकळ मिळोनि । मस्तक ठेवला श्रीचरणीं ।
तंव बोले रुक्मिणी । तुम्हापासुनि दुरी नाहींत ॥१२॥
नामयाचें धरुनि चरण । साष्टांगीं करुनि नमन ।
म्हणे तूं सर्वांचे स्वानंद जीवन । मी दीन काय बोलों ॥१३॥

६०
भागवंत म्हणे नामयासी । हें यथार्थ तूं बोलसी ।
परी क्षणक्षणा गुण आठवती मानसीं । या ज्ञानदेवाचे ॥१॥
भक्त ज्ञानि आणि वैरागी । ज्ञानदेवा ऐसा चहुंयुगीं ।
ना शको न देखो याची लागीं । खंती वाटे बहुत ॥२॥
उद्धवें चरणावरी ठेउनि माथा । कांही एक विनंति जगन्नाथा ।
ते सांगाअजी कृपावंता । गुज अंतरीचें स्वामी ॥३॥
निवृत्ति ज्ञान सोपानासि । हे बैसविले जी समाधीसी ।
मुक्ताताईची स्थिती कैसी । तें ह्रषिकेशी सांगावें ॥४॥
मग देव म्हणे तूं काय नेणसी । जरी प्रीतीनें आम्हां पुससी ।
तरी आइकें गा च्छिती ऐसी । उघडचि बोलों ॥५॥
तरी नाथाचा हात ईचा शिरीं । यालागीं ते सत्यसनातन अवधारी ।
महाकल्पाचा अवश्वरीं । हे सोडील देह ॥६॥
तंववरी तिचें शरीर । अभंग चिरकाळ निरंतर ।
महद्‌माया योगिणी साचार । मुक्ताबाई उद्धवा ॥७॥
देवगन बैसोनि विमाना । गेले आपुलिया भवना ।
सकळ महामुनि स्थाना । हरिचराणा वंदोनि ॥८॥
म्हणती ज्ञानदेवाच्या प्रसादें । देखिली विठठल चरनारविंदें ।
रुप पाहातां डोळ्या दोंदें । निघति स्वानंद सुखाचीं ॥९॥
तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण । निवृत्तिदेव तोचि अंजन ।
सोपान तो नयन । तेथिचे सिखप्राप्ती ॥१०॥
ऐसें करुनि साधन । साधिलें श्रीविठ्ठल निधान ।
तेथिचे विभागीं ज्याचें भाग्य पूर्ण । तींही प्रत्यक्ष देखिलें ॥११॥
या निधानासी कुरवंडी । मुक्ताबाई देह भावाची सांडी ।
मग उभविली गुढी । आनंदाची सर्वकाळ ॥१२॥
नामा म्हणे पंढरीसी । चालिले ह्रषिकेशी ।
भक्ताचि मांदी देवासरीसी । नाम घोष गर्जत चालिले ॥१३॥

६१
ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके । तो या भक्ताबरोबरी तुके ।
भोगी वैकुंठींचीं निजसुखें । बोलिले मुखें श्रीविठठल ॥१॥
धन्य धन्य ते भक्त । ज्या कारणें श्री भगवंत ।
ऐसे पवाडे करित । विश्व उद्धरी तेणें करुनि ॥२॥
जे भाग्याचे होति । त्यासिच हे होय प्राप्ती ।
ते मागुते न येति पुनरावृत्ती । गर्भवासा ॥३॥
नामा म्हणे नामस्मरण । तुटचि प्रपंचधरण बंधन ।
सुख पावती निदान । समचरण देखलिया ॥४॥

“संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा अभंग १ ते ६१ समाप्त

“संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *