संत नामदेव

संत नामदेव गाथा संतचरित्रे

संत नामदेव गाथा संतचरित्रे अभंग १ ते १८

संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत कबीर

आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा ।
संत साधु आलिया घरा । कदा पाठमोरा नव्हेची ॥१॥
कोणी एके अवसरीं । आहे जी माध्यान रात्रीं ।
मिळोनि संतमांदी बरी । आले घरीं कबीराचे ॥२॥
तंव स्त्रीसहित उठोनी । लागे संतांचे चरणीं ।
आमुचें परम भाग्य म्हणोनी । जाली भेटी स्वामींची ॥३॥
मोडकें खोपट जर्जर । तेथें कैंचें भिंती आवार ।
वरुविण उपवासी पोर । नांदणुक थोर कबीराची ॥४॥
तंव बैसावया । कारण । संतांसी घातलें आसन ।
काढिला बोर्‍या मुलें उठवून । सवेंचि आपण उभा ठेला ॥५॥
कबीर म्हणे स्त्रियेसी । कांहीं नैवेद्य करावा देवासी ।
अवश्य म्हणोनी त्वरेसी । अंगिकारिती पैं जाली ॥६॥
बहुत संकट षडलें नारी । पाहातां धन न दिसे घरीं ।
दोन प्रहर लोटली रात्री। बाजारीं कोणी असेना ॥७॥
मेघ वर्षती दारुण । काळोखी पडली अति कठीण ।
अंतरीं स्मरे राम राम निधान । मग झडकरी जाण निघाली ॥८॥
सत्वर येउनी वाणिया आळीसी । तंव कुलुपें जालीं दुकानांसी ।
कोणी न बोलती कोणासी । जन निद्रेसी प्रवर्तले ॥९॥
मग झाली ह्रदयीं चिंताक्रांत । नामस्मरण करीत ।
एका दुकाना आंत । काय म्हणत परियसा ॥१०॥
मग जाउनी दुकानाजवळी । उघडी होती एक फळी ।
वाणी जागत तये वेळीं । अकस्मात बाळी तेथें आली ॥११॥
वाणी पुसे तूं कवणाची कवण । कां आलीस रात्न करून ।
कवण कृत्य असे तें निरोपण । श्रुत करणें आम्हालागीं ॥१२॥
ऐकें वाणीया देऊनि चित्त । कबीर जाणिजे माझा कांत ।
घरीं पाहुणे आले साधुसंत । म्हणोनि त्वरित पाठवीलें ॥१३॥
पाहिजे सामुग्री आम्हांसी । विलंब न करावा द्यावयासी ।
लेख होईल ते आम्हांसी । तंव दुकानासी नेलें तें ॥१४॥
तंव तो नष्ट दुराचारी । जाला असे कामातुर भारी ।
कुवासना धरिली अंतरीं । म्हणे ऐक सुंदरी वचन माझें ॥१५॥
जें सांगेन तें अंगिकारावें । मग लागेल तितुकें न्यावें ।
मनीं कांहीं न धरावें । नाहीं तरी जावें आले वाटे ॥१६॥
तंव ते सत्त्वधैर्याची पेटी । देखुनी त्याची चंचळ द्दष्टी ।
मग म्हणे बरवेंगा सेटी । वेगीं उठीं देईं सर्वदा ॥१७॥
आधीं सामग्री देईं आम्हांसी । कार्य संपादून येईन त्वरेसी ।
हें बोलणें माझें सत्य परियेसीं । या वचनासी नटळें गा ॥१८॥
तंव तो अविश्वासी नर । तयास कैसा बुद्धि विचार ।
म्हणे मज भाक देईं वो सत्वर । तरीच खरें वाटे गे आम्हलागीं ॥१९॥
मग भाक देऊनियां नारी । सर्व सामग्री घेतली पदरीं ।
तेथून निघाली झडकरी । आली घरीं तात्काळ ॥२०॥
मग उभय वर्ग मिळून । केलें संतचरण क्षाळण ।
घेतलीं तीर्थें समाधान । पूजाविधान आरंभिलें ॥२१॥
केल्या गंधाक्षता समस्तांसी । धूप दीप ओंवाळिले संतांसी ।
झाला नैवेद्य अवघियासी । मग नमस्कारासी प्रवर्तले ॥२२॥
केले नमस्कार एकंदर । मनीं आनंदला कबीर ।
म्हणे धन्य भाग्य आजी थोर । करून नमस्कार प्रवर्तले ॥२३॥
सर्व सांग विधि झाली । आनंदाची घडी लोटली ।
संतवृंदें संतोषलीं । समाधिस्थ झालीं सुखें ॥२४॥
ऐसा संत सत्कार सांभाळिला । मग कबीर स्त्रियेनें खुणविला ।
आतां पाहिजे निरोप दिधला । शब्द गुंतला आजी माझा ॥२५॥
तुम्ही आसीजे संतांपासीं । मज सत्य करणें वचनासी ।
भाक देऊनियां वाणीयासी । सामुग्रीसी आणिलें ॥२६॥
त्याचे मनोरथ पूर्ण करणें । म्हणोनि लागे मज जाणें ।
उशीर होतां उगवेल दिन । शिणतील नयन वाणीयाचे ॥२७॥
कबीर म्हणे वो कांते । मी येईन तुज संगातें ।
मेघ वर्षती अपरमित । निशी बहुत झाली असे ॥२८॥
त्या वणीयाचा उपकार । आम्हांवरी झाला थोर ।
मग स्कंधीं वाहोन सुंदर । वेगें सत्वर निघाला ॥२९॥
उभयतां करताती स्मरण । ह्रदयीं आठविला रघुनंदन ।
घरीं समाचार न घेतां जाण । कोपती सज्जन आम्हांवरी ॥३०॥
मग येऊनि दुकानापाशीं । आणोनि सोडिलें स्त्रियेसी ।
म्हणे सत्य करावें भाकेसी । वाणीयासी सुख द्यावें ॥३१॥
वाणी पाहत होता वाट । म्हणे रात्रीं येऊनियां धीट ।
कैसी ठकून गेली नष्ट । तंव अवचट आली पुढें ॥३२॥
मग हर्ष झाला वाणीयासी । भीतरीं येईं वो गुणरासी ।
तंव आशंका झाली मानसीं । नवल तुजपासीं दिसतसे ॥३३॥
बैसली स्वस्थानीं दोघेंजणें । उपरी आरंभिलें बोलणें ।
कोरडी आलीस कवण्या गुणें । मृत्तिका चरणीं न लागेची ॥३४॥
वरुनी वर्षताती मेघ । जाला कर्दम वाहाती वोघ ।
कैसें कौतुक झालें तें सांग । आतां वेगें करुनियां ॥३५॥
ऐक गा सेटीया धर्मवंता । बोलती झाली गा कबीर कांता ।
तुझा उपकार नये सांगतां । साधुसंतां तृप्त केलें ॥३६॥
झालें संतसमाधान । हें तंव तुझेंचि पुण्य ।
मी नव्हे उपकारा उत्तीर्ण । सत्त्वरक्षण तुझेनी ॥३७॥
कबीर जीवाचा जिवलग । मज स्कंदीं वाहुनीं चांग ।
वरुनी झांकिलें सर्वांग । आणीले वेगें तुज पाशीं ॥३८॥
आपण गेले हो त्वरित । घरीं एकले साधुसंत ।
आतां सांडींगा चित्ताई भ्रांत । पुर्वीं मनोरथ आपले ॥३९॥
ऐसें बोलतांच सुंदरा । तंव वाणी कांपतसे थरथरा ।
धिक्‌ माझें जन्म दातारा । विषय व्यभिचारा प्रवर्तलें ॥४०॥
मी मतीहीन अज्ञान भारी । कुबुद्धि अमंगल शरीरीं ।
व्यर्थ भूमीभार संसारीं । मग अंतरीं पस्तावला ॥४१॥
होता विषयभाव मनीं । तो गळीत झाला तत्‌क्षणीं ।
मग धांवुनी लाला चरणीं । मजलागुनी उद्धरावें ॥४२॥
अन्यास झाला माते । सर्व शब्द क्षमा करीं वो दुरितें ।
ते माते पुण्य पवित्रे धैर्यवंते । मी मोहीत मूढमति हणोनियां ॥४३॥
आतां मज आणि कबीरासी । भेट करवीं दोघांसी ।
मज उद्धरावें त्वरेसी । म्हणोनि च्रणामिठी घाली ॥४४॥
मग म्हणे भला भला गा शेटी । बरवा भाव धरिला पोटीं ।
आतां चला उठाउठी । करीन भेटी कबीरासी ॥४५॥
मग उठोनि दोघेंजण । त्वरें आटोपिलें दुकान ।
वेगें चालिले टाकिलें भुवन । देखिले चरण कबीराचे ॥४६॥
घातले दंडवत  नमस्कार । म्हणे मी अपराधी थोर ।
माझा करावा जी उद्धार । अभयकर ठेवूनियां ॥४७॥
कबीर अंतरज्ञानी पूर्ण । ओळखिलें तयाचें चिन्ह ।
मग स्वकरें कुरवाळून । दिधलें दान अक्षयीं ॥४८॥
कबीरभक्त ज्ञान विश्वासी । सदा संतुष्ट आणि उदासी ।
झाला रूप स्वय्पंप्रकाशी । उडाला भाव द्वैताचा ॥४९॥
ग्रेथूनि कथा रसाळ पुढती । एकाग्र होवोनी परिसिजे श्रोतीं ।
नामा सांगे भक्तांची विभूति । होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥५०॥
इती श्री ग्रंथ नामावली जे । प्रार्थना करती प्रात:काळीं ।
तयाच्या पापाची होय होळी । होय अक्षयीं दास रामाचा ॥५१॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत कमाल

कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥
उठोनी कबीर संतां नमन केलें । बैसावया दिलें तृणासन ॥२॥
कांतेसी म्हणत संत उपवासी । यासी भोजनासी घालावें हो ॥३॥
अवश्य म्हणे कांता एक युक्ति करा । कमाल दुसरा घेऊनि संगें ॥४॥
ऐशा समयांत वाणी ते निद्रिस्थ । चला जाऊ येथें चोरीलागीं ॥५॥
चोरूनियां धान्य घेऊनियां यावें । संतांसी वालावें भोजनासी  ॥६॥
घेऊनियां शस्त्र उभयतां निघाले । घर तें फोडिलें वाणियाचें ॥७॥
प्रथम देखिली द्रव्याची ते रासी । नये उपयोगासी अमुचिया ॥८॥
पुढें तें देखिलें डाळ आणि पीठ । आनंदलें मोठें मन त्याचें ॥९॥
सर्वही साहित्य होएं वाण्या घरीं । कमाल अंतरीं संतोषला ॥१०॥
संतांचे पुरती सामीग्री घेतली । मोट ते बांधिली बरी तेणें ॥११॥
घेऊनियां मोट गवाक्षद्वारें । कबीराचे करें दिली तेणें ॥१२॥
मोकळ्या पडल्या द्रव्याचिया रासी । सावध वाण्यासी करूनि येतों ॥१३॥
योवोनी कमाल वाणियासी बोले । सांभाळ आपुलें द्रव्य आतां ॥१४॥
आइकोनी शब्द वाणी जागा झाला । कमाल चालिला तेथूनियां ॥१५॥
तांतडीनें निघतां गवाक्षाचें द्वारें । अर्ध तें शरीर गुंतलेंसे ॥१६॥
त्वरें करोनियां वाणी तो धांवला । कमाल धरिला पायीं तेणें ॥१७॥
तेव्हां तो कमाल म्हणे कबीरासी । न सोडी मजसी वाणी आतां ॥१८॥
आतां ताता तुम्ही कापा माझें शीर । जावें हो सत्वर धांवोनियां ॥१९॥
न कापितां शीर होईल फजिती । घरासी न येती संत कोणी ॥२०॥
खरें मानूनियां काढियेलें शस्त्र । कापियेलें शीर कमालाचें ॥२१॥
त्वरें करोनियां कबीर चालिला । आश्रमासी गेला आपुलिया ॥२२॥
झाला जो वृत्तांत सांगे कांतेलागीं । येरी म्हणे वागीं बरें केलें ॥२३॥
धन्य तो कमाल धन्य त्याची भक्ति । देह संतांप्रती अर्पियेला ॥२४॥
याचा खेद स्वामी न धरावा चित्ता । सामोग्री हे संतां अर्पा तुम्ही ॥२५॥
देवोनी सामोग्री संतांसी तो म्हणे । करावे भोजन स्वामी आतां ॥२६॥
घेवोनि सामोग्री केलेंसे गलबला । चोर धरियेला धांवा धांवा ॥२८॥
धांवोनियां आले नगरीचे लोक । पाहाती अनेक तयालागीं ॥२९॥
रुंड असे तेथें त्यासि नाहीं शीर । करिती विचार एकमेक ॥३०॥
म्हणती वाण्यासी काय तुझें नेलें । शोधोनी पाहिलें मग त्यानें ॥३१॥
सर्वस्वही आहे नेलें डाळ पीठ । साहित्य तें मिष्ट भोजनाचें ॥३२॥
श्रुत झाली वार्ता गांवींच्या राजाला । म्हणे त्या चोराला शूळीं घाला ॥३३॥
राजदूत तेव्हां आले धांवोनियां । रुंड घेविनियां चालिले ते ॥३४॥
शूळ तो रोंविला भागीरथी तीरीं । रुंड तयावरी घातलें तें ॥३५॥
पाहाती ते जन सर्व नामरीक । करील कवतुक पांडुरंग ॥३६॥
कबीरासी संत आशिर्वाद देत । कृपा सादोदित असों द्यावी ॥३७॥
वैष्णवांचा मेळा पुसोनि चालिला । कबीर निघाला बोळवीत ॥३८॥
करिती गजर हरिच्या नामाचा । पंथ भागिरथीचा धरिला त्यांनीं ॥३९॥
भागिरथी तीरीं रोंविलासे शूळ । नयनीं सकळ पाहाती संत ॥४०॥
शूळावरी रुंड देखिलें नयनीं । हात जोडुनी दोन्ही नमस्कारी ॥४१॥
सर्वत्रीं देखलें आपुलिया डोळां । जीव निर्जिवाला आला कैसा ॥४२॥
वैष्णव पुसती कभीरालागोनी । विपरीत करणी कैसो झाली ॥४३॥
तेव्हां तो कबीर बोलतसे संतां । चोर हा देखिला हरिभक्त ॥४४॥
तुम्हांपाशीं त्याचें गुंतलें संचित । म्हणूनि दंडवत केलें त्यानें ॥४५॥
तंव त्या संतांनीं घेतलीसे आळी । उठवीं वनमाळी यासी आतां ॥४६॥
तंव त्या कबीरें श्रुत केलेई वार्ता । तेव्हां त्या हो संतां समजलें ॥४७॥
तेव्हां ते वैष्णव बोलती सकळ । आणा शिरकमल तुम्ही येथें ॥४८॥
इकडे मातेनें कमालाचें शीर । घेवीनी धणीवर पाहे द्दष्टी ॥४९॥
म्हणे धन्य बाळा येउनी पोटाशी  । उभय कुळांसी उद्धरिलें ॥५०॥
संतांचिया कजा वेंचिलासी प्राण । जगीं तूंचि धन्य म्हणविलें ॥५१॥
वैकुंठींचा वासी झालासी मिरासी । आम्हां पतितांसी सोडियेलें ॥५२॥
तुजसवें मज जावें बा घेवोनी । करी विनवणी पांडुरंगा ॥५३॥
तुजविण मज न गमे सखया । येईं तूं तान्हया धांवोनियां ॥५४॥
हरणी चुकली जैसी कां पाडसा । दश दिशा ओसा तिजलागीं ॥५५॥
तैसें मज झालें न गमेचि कांहीं । भेट माझे आई कमाला तूं ॥५६॥
काय तुझे गुण आठवूं मी आतां । सत्त्वधारी सुता कबीराच्या ॥५७॥
नाशवंत देह त्याचा केला त्याग । धन्य हें वैराग्य तुझें बापा ॥५८॥
ऐसी तेही माया कारेतसे शोक । अकस्मात्‌ देखे कबीराला ॥५९॥
झालें वर्तमान सांगितलें तिसी । चिंता हे मानसीं करूं नमो ॥६०॥
वेगीं देईं शीर उठला कमा ल । संतांचा हा बोल सत्य असे ॥६१॥
सभळित शीर घेउनी कबीर । संतांचिया करें दिलें तेव्हां ॥६२॥
उतरुनी रुंड वैष्णवांनीं शीर । ठेविलें झड करी नामघोषें ॥६३॥
भावाचा तो देव भक्तीचा अंकिला । कमाल उठिला तेचि वेळीं ॥६४॥
हरि नामघोषें करुनि गजर । संतां नमस्कार केला तेणें ॥६५॥
ऐसें सकळ जनीं पाहिलें कौतुक । संतांचा अधिक महिमा असे ॥६६॥
नामा म्हणे त्याचा होईन मी दास । शरण तयांस वारंवार ॥६७॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत मीराबाई

राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा ॥१॥
मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीनें देवा पूजिताती ॥२॥
सवें मिराबाई जात असे नित्य । वेधलेंसे चित्त कृष्णपायीं ॥३॥
मिरा गुणवंती लावण्याची खाणी । आवडे ती मनीं मायबापां ॥४॥
म्हणती देवा इचा करावा सांभाळ । हांसे ते वेल्हाळ मिराबाई ॥५॥
मायबापें मज केलें कृष्णार्पण । हरुषलें मन फार तिचें ॥६॥
वरिला म्यां आतां द्वारकेचा नाथ । समाधान चित्त झालें माझें ॥७॥
आनंदानें करी देवाचें पूजन । नाचे उल्हासानें प्रेमें डोले ॥८॥
संत आणि साधु येती कीर्तनासी । आनंद मानसीं होय तिच्या ॥९॥
संतांचिया पायीं मिरा असे लीन । अहोरात्र ध्यान देवाजीचें ॥१०॥
समारंभ ऐसा होतां नित्यानित्य । आनंदभरित मायबाप ॥११॥
धन्य मिराबाई भक्तीची आवडी । लागलीसे गोडी देवाजीची ॥१२॥
सज्जन अंतरीं संतोष मानिती । निंदक निंदिती तिजलागीं ॥१३॥
राजियानें कन्या केखोनि उपवर । द्यावें इशीं घर करोनियां ॥१४॥
बोले मिराबाई ऐका तुम्ही ताता । वरिला म्यां आतां चक्रपाणी ॥१५॥
उभयतां तुम्हीं केलें कृष्णार्पण । तें कां हो स्मरण विसरले ॥१६॥
त्यानेम केआ असे माझा अंगिकार । नका पाहूं वर दुजा आतां ॥१७॥
देवाविण मज नावडे आणीक । मोठें आहे सुख देवापायीं ॥१८॥
फार गोडी त्यातें वर्णितांचि नये । बोलूं आतां काय एक मुखें ॥१९॥
तेव्हां मातापिता करिदी उत्तर । बौद्ध अवतार देव झाले ॥२०॥
नामीं रूपीं त्याच्या असों द्यावें चित । असे सर्व हित प्रपंचाचें ॥२१॥
ओळखूनि रूप करावा संसार । सर्व व्यवहार असे त्यचा ॥२२॥
ऐकोनियां ऐसें खहिताचे ठायीं । बोले मिराबाई पितयासी ॥२३॥
आधीं ज्यानें केलें अमृत प्राशन । नावडे त्या धुण कदाकाळीं ॥२४॥
मुंगिये लागली साखरेची गोडी । आवडीनें उडी घालीतसे ॥२५॥
राजहंस पक्षी मोतीयांचा चारा । आणिक इतरा न सेविती ॥२६॥
तैसा म्यां वरिला असे हा गोविंद । नका करूं शोध आणिकांचा ॥२७॥
हरि विणें कांहिं नेणें मी आणीक । सर्वही जनलोक माझे बाप ॥२८॥
तुम्ही म्हणा बौद्ध झाले चक्रपाणी । संशय हा मनीं न धरावा ॥२९॥
भाविकासी द्दश्य अभाविका बौद्धा । मोठा हा सावध नारायण ॥३०॥
लक्षस असे ज्याचें देवाजीचे पायीं । येऊनियां राही ह्रदयांत ॥३१॥
त्याचा सर्व धंदा करी चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥३२॥
संशय चित्तांत नका धरूं आतां । सर्व हा जाणता पांडुरंग ॥३३॥
नाम्यासंगें जेवी आवडी हा जाणा । कैसें त्या म्हणा बौद्ध आतां ॥३४॥
एकनाथा घरीं बाहतसे पाणी । कैसा चक्रपाणी बौद्ध झाला ॥३५॥
कबीराचे मागीं विणितसे शेले । जाटाचें राखिलें शेत तेणें ॥३६॥
आणिकही कामें भक्तांघरीं करी । काय त्याची थोरी वर्णूं आतां ॥३७॥
राजा म्हणे मिरा समजली पूर्ण । परी जग दूषण ठेविताती ॥३८॥
म्हणोनियां त्यानें केली बंदोबस्ती । प्रवेश तो संतीं न होयची ॥३९॥
मिराबाई म्हणे अहो पांडुरंगा । कांहो संतसंगा अंतरलें ॥४०॥
संतांचे संगतीं आनंद सोहळा । दाखवाल डोळां केव्हां देवा ॥४१॥
कनवाळु मोठी सांवळी विठाई । नेई मिराबाई कीर्तनासी ॥४२॥
श्रुत झाली वार्ता तेव्हां राजियासी । जाते कीर्तनासी मिराबाई ॥४३॥
क्रोधावून नृप बोले त्या कांतेला । देईं विष प्याला निरालागीं ॥४४॥
लौकिकाची लाज सांडियेली तिणें । उपाय करणें हाचि आतां ॥४५॥
तेचि वेळीं प्याला भरोनियां विष । आली मंदिरास तेव्हां तिच्या ॥४६॥
येईं मिराबाई लाविलें दूषण । ऐसे सर्व जन बोलताती ॥४७॥
म्हणोनियां नृपें दिला विष प्याला । कुळासि लाविला डाग तुवां ॥४८॥
बोले मिराबाई सांवळ्या अनंता । तूं एक जाणता पांडूरंगा ॥४९॥
गेला तरी जावो सुखें माझा प्राण । निवारीं दूषण राजियाचें ॥५०॥
म्हणोनियां नृपें दिला विष याला । ही लाज तुजला देवराया ॥५१॥
मिरा त्यचे पाटीं झाली अपवित्र । बोलती सर्वत्नजग ऐसें ॥५२॥
कळेल हो तैशी राखीं याची लाज । वारंवार तुज काय सांगूं ॥५३॥
करूनियां तेव्हां कृष्णाचें चिंतन । प्याली आवडीनें विष प्याला ॥५४॥
नाहीं बाधा झाली तयाची ते वेळीं । मूर्ति झाली काळी देवाजीची ॥५५॥
येऊनियां नृपें विलोकिलें डोळां । आणिक सकळा जनानीं ते ॥५६॥
धन्य मिराबाई वंदिती चरण । जन्मलें निधान वंशामाजी ॥५७॥
मिरा वनमाळी नव्हेचि वेगळी । निश्चय सकळीं संतीं केला ॥५८॥
बोले मिराबाई अहो चक्रपाणी । कां तुझी जाचणी सोसितसां ॥५९॥
प्रेमें अश्रुनीर वाहे तिचे डोळां । माझा कळवळा तुम्हां आला ॥६०॥
सांवळे सकुमार गोजिरे चरण । इच्छितसे मन पहावया ॥६१॥
भकांची आवडी पुरवी केशव । पूर्ववत देव झाला तेव्हां ॥६२॥
निळी रेषा असे अद्याप ते कंठीं । देतां प्रीति मिठीं पाहती लोक ॥६३॥
धन्य मिराबाई धन्य तिची भक्ति । करिताती स्तुति साधुसंत ॥६४॥
संतांचा तो दास बोले शिंपिनामा । त्यानें दिला प्रेमा सदां मज ॥६५॥


संत नामदेव गाथा संतचरित्रेसंत भानुदास 

पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग ॥१॥
म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥
कांहो उपेक्षिलें कृपाळु अनंता । भेट देईं संतां आपुलिया ॥३॥
अयोध्या नगरासी नेला पंढरीराव । कळला अभिप्राय सकळांसी ॥४॥
असा कोणी भक्त आहे पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथें ॥५॥
ऐकोनियां मात कोणीच न बोले । म्हणोन उपेक्षिलें पांडूरंगा ॥६॥
बोले भानुदास आणितों मी देव । कैसा पंढरीराव गेला पाहों ॥७॥
भानुदासें केलें सकळिकां नमन । मग आज्ञा घेऊन चालिला तो ॥८॥
अयोध्या नगरासी गेला भानुदास । पंढरीनिवास पाहावया ॥९॥
दुंदुभी वाजती वाजंत्रांची ध्वनि । परी चक्रपाणी द्दष्टी नये ॥१०॥
प्रात:काळीं पूजा केली रामरायें । आणिका न होय दर्शनची ॥११॥
कवाडें अर्गळा कुलुपें असती द्वारा । करूनियां भीतरीं पांडूरंगा ॥१२॥
देखोनि कवतुक बोले भानुदास । भला बसलास देवा येथें ॥१३॥
भाग्यवंत देव झाल सितूं आतां । दुर्बळ अनाथा कोण पुसे ॥१४॥
तेव्हां झाली रात्र पडिला अंधकार । जोडोनियाम कर विनवितसे ॥१५॥
आतां देव तुम्ही चलावें येथूनि । नाहीं तरी आम्ही भले नाहीं ॥१६॥
आम्हांसि टाकूनि येथें बैसलासि । पोटच्या पोरासी कोण पोसी ॥१७॥
आम्हां वांचोनियां नाहीं तुम्हां गति । न करीं फजिती जगामध्यें ॥१८॥
करुणा वचन भाकोनियां येथें । केलासे उपाय भानुदासें ॥१९॥
कुलुपें कवाडा बंधन उघडती । देखिली श्रीमूर्ति भानुदासें ॥२०॥
राउळाभीतरीं गेला भानुदास । साष्टांगीं चरणास नमन केलें ॥२१॥
सद्नदीत कंठ झाल्या दोघां भेटी । आनंद तो पोटीं समायेना ॥२२॥
देवा तुम्हीं कांहो सोडिली पंढरी । लागलीसे गोडी वैभवाची ॥२३॥
म्हणे पांडुरंग बंदीं मी पडिलों । भिमा अंतरलों चंद्रभागा ॥२४॥
नवरत्नाची माळा घालूनियां कंठीं । म्हणे द्यावी भेटी प्रात:काळीं ॥२५॥
देऊळा बाहेरी गेला भानुदास । कुलुपें कवाडास बंधन झालें ॥२६॥
प्रात:काळीं दर्शन भानुदास करी । आठवी श्रीहरि ह्रदयामधीं ॥२७॥
घालूनि आसन बैसला ध्यानस्थ । ठेवोनियां चित्त पांडूरंगा ॥२८॥
प्रात:काळीं पूजा करावया आला । रामराय न देखे माळा रत्नाचि ते ॥२९॥
कोणी नेली माळा झालासे बोभाट । ताडिलें सत्वर पुजार्‍यासी ॥३०॥
चोर पहावयासी सेवक धांवती । माळा दिसे कंठीं भानुदासा ॥३१॥
त्यासी देखूनि ताडिती प्रसिद्ध । म्हणती हाचि पक्का मैंद चोर असे ॥३२॥
चोर धरूनियां रायाराशीं नेला । म्हणती यासी घाला सुळावरी ॥३३॥
शूळ तासोनियां खांदीं जो दिधला । मागें चालविला भानुदास ॥३४॥
भानुदास म्हणे एइकावें वचन । भेटी मी घेईन विठोबाची ॥३५॥
आला भानुदास देवा नमन केलें । शिक्षेसी लाविलें म्हणे आम्हां ॥३६॥
अगा तुझी देवा लोभ असों द्यावा । आठव धरावा ह्रदयामध्यें ॥३७॥
तुजमज वियोग केंवि होय देवा । न सोडूं केशवा चरण तुझे ॥३८॥
सुळ नेवोनियां वेसीबाहेर रोंविला । म्हणती आतां याला वर घाला ॥३९॥
तेव्हां भानुदास आठवी विठ्ठला । म्हणती लवकर घाला सुळावरी ॥४०॥
भक्ताचा कळवळा पांडुरंगा आला । कंठ तो फुगला सद्नदीत ॥४१॥
नेत्रीं अश्रुधारा कांपतो थरथरी । भक्तांचा कैवारी धांविन्नला ॥४२॥
शूळा अकस्मात्‌ पाला तो फुटला । फळें पुष्पें तो झाला घवघवीत ॥४३॥
शूळ वृक्ष झाला सांगती रायाला । विस्मय वाटला सकळिकांसी ॥४४॥
भानुदासा नमन केलें रामरायें । म्हणे हा अन्याय घडिला आम्हां ॥४६॥
पांडुरंग म्हणे कोणी गांजिलें माझ्या भक्ता । सांग भानुदासा काय झालें ॥४७॥
आमचा कैवारी कृपाळु श्रीहरी । असतां साहाकारी कोण गांजी ॥४८॥
आतां तुम्ही देवा बसावें खांदेसी । नेईन मी तुम्हांसी पंढरीसी ॥४९॥
रामराय म्हणे मज उपिक्षिलें । येथोनियां वहिलें तुम्हीं जातां ॥५०॥
आपुलें वचन सत्य केलें देवा । लोभ आम्हावरी असों द्यावा ॥५१॥
घेवोनी खांदेसी देव बैसवीला । पंढरीसी आला भानुदास ॥५२॥
झालीसे दाटणी करती नमस्कार । मोठा संतभार जमला तेथें ॥५३॥
नामदेव म्हणे संतांचे संगतीं । अधमहि होती संतजन ॥५४॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत जगमित्र नागा

परळी वैजनाथीं जगमित्र नागा । ध्यानीं पांडुरंगा आठवीत ॥१॥
सर्वांभूतीं त्यासी दिसे वासुदेव । नाहीं दुजाभाव त्याचे मनीं ॥२॥
निद्य आणि वंद्य लेखितो सारिखे । पाहे ब्रह्मरूप सर्वत्रांसी ॥३॥
रात्रंदिवस करी हरीचें भजन । सुखें आनंदानें राहतसे ॥४॥
सज्जन हे त्यासी बहुत मानिती । दुर्जन द्वेषिती त्याज लागीं ॥५॥
परि त्याचे चित्ती वाटेना हें दु:ख । मानी प्रेमसुख आनंदानें ॥६॥
दुर्जनांनीं त्याच्या घरासी तो अग्नि । लाविला येऊनि रात्रीमध्ये ॥७॥
अग्नि मोठा तेव्हां प्रदिप्त तो झाला । वृत्तांत कळला सज्जनांसी ॥८॥
धांवुनी ते आले पाहती नयनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥९॥
तुजवीण कोण राखे यासी आतां । धांव तूं अनंता येचि वेळां ॥१०॥
पांडव राखिले लाक्षांतून जो हरी । तैसी करीं परी नागयासी ॥११॥
येथें नाहीं देवा कोणाचा उपाय । घालीं आतां घाय पांडुरंगा ॥१२॥
प्रल्हाद रक्षिला अग्नि तो माझारी । तैसी करीं परी त्यासी आतां ॥१३॥
ब्रीद हें सांभाळीं आपुलें अनंता । राखीं आतां भक्तां आपुलिया ॥१४॥
ऐकोनियां स्तुस्ति आले नारायण । शांत झाला अग्नि तेचि वेळां ॥१५॥
स्वस्थ असे नागा आनंदानें सुखें । पाहती सर्वलोक परळीचे ॥१६॥
सज्जन संतोष अंतरीं मानिती । धांवण्या श्रीपति धाविन्नला ॥१७॥
दुजेंनांचीं तेव्हां तोडें जाहलीं काळीं । साह्य वनमाळी भक्तालागीं ॥१८॥
चाहुर एक भूमी इनाम त्या दिली । पत्रिका लिहिली त्याच्या नांवें ॥१९॥
ग्रामवासी त्यासी पिकवुनी धान्य । देती तें नेऊन नाग्या घरीं ॥२०॥
वारसीक नेम चालविती लोक । आला नवा एक अमलदार ॥२१॥
करोनी पाहणी मागतसे सारा । नायके विचारा कोणाचिया ॥२२॥
तयासी उत्तर करिती ग्रामवासी । नवसिलें देवासी सर्वत्रांनीं ॥२३॥
जगमित्न नागा हरिचा तो भक्त । सांगती वृत्तांत त्याजलागीं ॥२४॥
याचे मनीं नाहीं कांहीं दुजा भाव । सर्वांभूतीं देव पाहतसे ॥२५॥
कृपावंत असे यासी चक्रपाणी । नका तुम्ही मनीं आणूं दुजें ॥२६॥
मनामाजी त्यानें केला तो विचार । पाहूं चमत्कार याचा आतां ॥२७॥
जगमित्र नागा त्यानें बोलाविला । बोलता त्या झाला सुभेदार ॥२८॥
आमुचिया घरीं मुलींचें तें लग्न । व्याघ्राचें कारण असे आम्हां ॥२९॥
घेऊनियां आतां यावा तुम्ही व्याघ्र । म्हणवितां जगमित्र पाहूं कैसें ॥३०॥
व्याघ्ररूप असे माझा नारायण । येतों मी घेउनी आतांची हा ॥३१॥
आनंदानें नागा निघाला तेथुनी । आला असे वनीं अरण्यांत ॥३२॥
धांवूनियां तेथें आले पांडुरंग । पुसतसे अंगें त्याजलागीं ॥३३॥
कोठें जासी बापा घोर अरण्यांत । भय असे तेथें श्वापदांचें ॥३४॥
मारतील तुज फिर तुं माघारी । येरु म्हणे हरि रक्षीं आम्हां ॥३५॥
सुभेदार माझा असे परम मित्न । पाहिजे हा व्याघ्र त्याजलागीं ॥३६॥
येरु म्हणे सुभेदार आहे नष्ट । काय त्याची गोष्ट ऐकसी तूं ॥३७॥
तया चांडाळासी वधितों मी आतां । झाला तो बोलतां जगन्मित्रा ॥३८॥
तूंचि हा चांडाळ बोलसी या गोष्टी । नको करूं कष्टी मित्र माझा ॥३९॥
जाय तूं वाटेनं आपुल्या या आतां । होतसे बोलतां उशीर मज ॥४०॥
व्याघ्र तेचि वेळां जाहले नारायण । धरी आलिंगुनी नागा त्यासी ॥४१॥
गळांत्याचे तेव्हां बांधिलें अंगवस्त्र । घेऊनियां व्याघ्र आला नागा ॥४२॥
भयाभीत झाले तेव्हां ग्रामवासी । लावियेया वेसी गांवीचिया ॥४३॥
ग्रामवासी यांनीं लावियेलें द्वार । करी सुभेदार विचार तेव्हां ॥४४॥
करीत गर्जना भयानक व्याघ्र । कांपती थरथर सकळ लोक ॥४५॥
जगमित्र नागा आला वेसीपासीं । उघडा द्वारासी हांका मारी ॥४६॥
ऐकोनियां कोणी न देती उत्तर । मोडियेलें द्वार व्याघ्रानें तें ॥४७॥
प्रवेशला नागा सुभेदारा घरीं । हांका त्यासी मारी यावें आतां ॥४८॥
करा करा कार्य सिद्धि घेऊनियां व्याघ्र । हांका वारंवार मारीतसे ॥४९॥
द्वारपाळ त्याचे नुघडिती द्वार । मोडोनियां व्याघ्र शिरे आंत ॥५०॥
करीत गर्जना आपटूनि पुच्छ । जाहले भयाभीत सकळ लोक ॥५१॥
सुभेदार होता जया मंदिरांत । व्याघ्र नागा आंत गेले दोघे ॥५२॥
सुभेदार बोले द्वाराचे आंतून । देईं जीवदान मज आतां ॥५३॥
पतीत मी पापी तुझा शरणागत । होईं कृपावंत जगमित्रा ॥५४॥
कर जोडोनियां करितों विनंती । अज्ञानाची भ्रांति झाली मज ॥५५॥
वारंवार तुज घेतों लोटांगणीं । देई वा सोडोनी वनीं व्याघ्र ॥५६॥
कृपावंत साधु वर्णिताती वेद । करीं अपराध क्षमा माझा ॥५७॥
ऐकोनियां व्याघ्र गर्जना करीत भक्षावया धांवत त्याजलागीं ॥५८॥
जगमित्र नागा अवरीत त्यासी । चाल तूं वनासी मायबापा ॥५९॥
घेऊनियां व्याघ्र चालिला जगमित्र । पाहती सर्वत्र लोक तेव्हां ॥६०॥
भक्तांनीं जिंकिला भाव बळें देव । घालीतसे धांव संकटीं तो ॥६१॥
संतांचा महिमा न वर्णवे कांहीं । जाहला लीन पायीं नामदेव ॥६२॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संताजी पवार

रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥
स्वामी काजामध्यें असे तो सावध । भावें हा गोविंद आठवीत ॥२॥
शास्त्र भागवत करितां श्रवण । समजलें पूर्ण मनामाजी ॥३॥
नाशवंत सर्व आहे हा संसार । नाम एक सार विठोबाचें ॥४॥
ऐसें कांहीं आतां करावें साधन । रामनामीं मन लागेल तें ॥५॥
कासियासि आतां हा पाहिजे उद्योग । घेतलें वैराग्य तेचि वेळां ॥६॥
मातेलागीं तेव्हां केला नमस्कार । निघाले हे त्वरें तेथूनियां ॥७॥
बाबा संतराजा कां बा केला त्याग । घेतलें वैराग्य कासयास ॥८॥
काय जड भारी पडियेलें तुज । सांग कैसें गुज मजलागीं ॥९॥
नको नको माते या संसाराची बेडी । फारच आहे गोडी हरिनामांत ॥१०॥
नामामृत पान करीन हें आतां । माधान चित्ता होय माझ्या ॥११॥
करूं दे सार्थक आलिया देहास । नको भव फांस घालूं आतां ॥१२॥
वारंवार तुज हेचि विज्ञापना । पाहूं दे चरणा देवाजीच्या ॥१३॥
कृपा करूनियां देईं आशिर्वाद । सखा हा गोविंद करीं माझा ॥१४॥
करुनी प्रार्थना निघाले तेथुनी । चालिले ते वनीं अरण्यांत ॥१५॥
नको नको मज भव हा संसार ॥ उतरावें स्वामीसंगें मजलागीं ॥१७॥
गंगेचा हा ओघ सागरासी गेला । नाहीं परतला मागुता तो ॥१८॥
ऐसे महाराज तुम्ही कृपावंत । समाधान चित्त करा माझें ॥१९॥
येईन सांगातें करीन हे सेवा । मान्य हे केशवालागीं असे ॥२०॥
पहा महाराजा तुम्ही कृपाद्दष्टी । कां मज हिंपुटी करीतसां ॥२१॥
जळा तो वेगळा कैसा राहे मीन । जाईल हा प्राण तेचि वेळां ॥२२॥
तुमचे चरणीं बहु आहे सुख । नको भवदु:ख संसार हा ॥२३॥
सार रामनाम फार आहे गोड । पुरवा आवड माझी आतां ॥२४॥
आवडीचें लेणें द्यावें मज आतां । तुम्ही प्राणनाथा कृपासिंधु ॥२५॥
रामनास अंगीं लेववा भूषण । तेणें समाधान होय माझें ॥२६॥
दीपक ही प्रभा नव्हेचि वेगळी । पाहूं वनमाळी संगें दोघें ॥२७॥
तेव्हां संतराज करिती उत्तर । न धरवे धीर तुजलागीं ॥२८॥
न सोसवे तुज कठीण बैराग्य । नको येऊं मागें माझ्या आतां ॥२९॥
सांडोनियां द्यावी देहाची हे आस । तेव्हां तुटेल फांस संसाराचा ॥३०॥
कामक्रोध यांसी देऊं नये थार । लीन व्हावें फार संतांपायीं ॥३१॥
वस्त्रें भूषणाची धरुं नये चाड । ध्यावें नाम गोड गोविंदाचें ॥३२॥
लौकिकाची कांहीं धरूं नये लाज । बोलावें हें गुज देवाजीसीं ॥३३॥
द्वतै कल्पनेचा नसे जेथें ठाव । तोचि झाला देव स्वयें अंगें ॥३४॥
ऐकोनियां ऐसें बोले कांता त्यासी । आनंद मानसीं हाचि माझ्या ॥३५॥
तिचि वेळां केला भूषणाचा त्याग । घेतलें वैराग्य पतिसंगें ॥३६॥
पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं ॥ राहती ते वनीं आनंदानें ॥३७॥
तेव्हां संत राज बोले कांतेलागीं । भिक्षेलागीं वेगीं जावें आतां ॥३८॥
पारगांव असे भीमे पलीकडे । कोणासी सांकडें न घालावें ॥३९॥
संतोषानें जे कां देतील पदरीं । म्हणावें श्रीहरी अर्पण तें ॥४०॥
आनंदानें तेव्हां निघाली तेथुनी । वाचे नारायण गात असे ॥४१॥
भिक्षा मागतांना नणंद भेटली । तिणें ओळखिली भाउजई ॥४२॥
कासयासी बाई घेतलें वैराग्य । कांगे केला त्यग संसाराचा ॥४३॥
सांडोनियां सर्व हें राज्य संपत्ती । उदास कां चित्तीं झालां तुम्ही ॥४४॥
ऐकोनियां येरी करीत उत्तर । सांपडलें सार संसारींचें ॥४५॥
सार नामामृत गोड आहे फार । प्राशन चतुर करिताती ॥४६॥
सद्रुरु कृपेचा वर्षाव जाहला । प्रसाद लाधला भ्रतारासी ॥४७॥
त्यांतील हें शेष त्या पात्रीं राहिले । आवडी सेविलें माझ्या एक्या मुखें ॥४९॥
अखंड सेविती नित्य साधुसंत । भाग्या नाहीं अंत त्याचीया तो ॥५०॥
येरी म्हणे वाई करावें भोजन । भिक्षा जा घेऊन येथूनियां ॥५१॥
आग्रह करून दोन पोळ्या आतां । घातल्या झोळींत न कळतां ॥५२॥
आज्ञा घेऊनियां निघाली ते त्वरें । पोंहचली तीरा भीवरेचे ॥५३॥
भीवरे उगमीं पर्जन्य पडीला । पुर तेथें आला अकस्मात्‌ ॥५४॥
पलीकडे जावया न दिसे उतार । झाली चिंतातुर मनामाजी ॥५५॥
स्वामी माझा तेथें असे उपवासी । काय हृषिकेशी करूं आतां ॥५६॥
ऐकोनियां कोळी झाला नारायण । नेलें उतरून पार तीतें ॥५७॥
पतीलागीं तिनें केला नमस्कार । ठेविली समोर भिक्षा त्याचे ॥५८॥
येरु म्हणे कैसी आलीस तूं पार । कोळीयानें त्वरें उतरीली ॥५९॥
कैंचा कोळी तेथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेट झाली ॥६०॥
प्रेमअश्रु डोळां वाहे त्याचे नीर । भेट द्यावी त्वरें पांडुरंगा ॥६१॥
भेटी वांचूनियां न करीं भोजन । करीतसे ध्यान देवाजीचें ॥६२॥
वाणी एक होता रांजणगांवांत । झाला द्दष्टांत त्याजलागीं ॥६३॥
बोले पांडुरंग करुनि पव्कान्न । घालावें भोजन संतराजा ॥६४॥
करुनी पाकसिद्धि वाणी गेला तेथें । सांगे तो वृत्तांत त्याजलगीं ॥६५॥
येरु म्हणे तुज देवाजी भेटले । निष्ठुर कां झाले मजविसीं ॥६६॥
करीन भोजन देवा तुझ्या हातें । कांहो माझें चित्त पाहातसां ॥६७॥
पतीत मी पापी तुझा शरणागत । समाधान चित्त कर माझें ॥६८॥
न मागें मी कांहीं देवा तुज आतां । भेट तूं अनंता एक वेळां ॥६९॥
भाकितां करुणा आले नारायण । करीं बा भोजन संतराजा ॥७०॥
आलिंगूनि दोघां धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥७१॥
काय इच्छा असे मागा तुम्ही आतां । नामीं हे अनंता प्रीत देईं ॥७२॥
भिक्षेचें पवित्र भक्षिताती अन्न । अहोरात्न ध्यान देवाजीचें ॥७३॥
आषाढीची यात्रा जात पंढरीसी । आनंद मानसीं जाहला त्यांचे ॥७४॥
भेटतील आतां माझे दिनानाथ । आणीकही संत साधुजन ॥७५॥
समारंभें जाती करीत गजर । पोहोंचले तीर भीवरचें ॥७६॥
व्रत एकादशी होती तेचि दिनीं । भीवरा भरोनि चाललीसे ॥७७॥
नामाचेंनि छंदें जाहला ब्रम्हानंद । चालिले आनंदें त्याची पंथें ॥७८॥
कूर्मरूप तेव्हां जाहला नारायण । नेलें उतरून पार  त्यातें ॥७९॥
स्वर्गीं सुरव्र बैसोनि विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥८०॥
धन्य साधुसंत भाग्या नाहीं पार । वाहे पृष्ठीं भार देव त्यांचा ॥८१॥
भीमा उतरूनि आले पंढरिसी । आनंद मानसी सर्वत्रांचे ॥८२॥
अणीकही भार अयात्रेचा तो आला । त्याणें हा देखिला नवलावो ॥८३॥
म्हणती संतराजा नेईं आम्हां पार अ। भेटवीं हा वर रखुमाईचा ॥८४॥
कृपावंत साधु आले धांऊनियां । म्हणती पंढरिराया सांभाळावें ॥८५॥
भावाची ही पेठ बांधा बळकट । मार्ग धरा नीट भक्तीचा हा ॥८६॥
संतांचा हा संग धरावा सप्रेम । न वाधा हा श्रम तुम्हालागीं ॥८७॥
रामनाम संगें धरावें भांडवल । वस्तु हे अमोल येईल हाता ॥८८॥
सभाग्य हे साधु त्यांनीं केला सांठा । देतील ते वांटा तुम्हांलागीं ॥८९॥
नामाचें तें रूप असे सर्व सृष्टी । दाविती तो द्दष्टी ज्ञानाची हे ॥९०॥
तेव्हां तुझ्या मना होईल आनंद । तोचि ब्रह्मानंद ओळखावा ॥९१॥
द्वैत क्ल्पनेसीनसे जेथें ठाव । आला तोचि देव स्वयें अंगें ॥९२॥
सद्‌गुरु कृप्नें हरेल हा भ्रम । दिसेल हें ब्रम्हा जग सारें ॥९३॥
त्याजविण कोठें रिता नाहीं ठाव । धरा नामीं भाव विठोबाच्या ॥९४॥
उतरूनि भीमा गेले पैल तीरा । भेटावया वरा रखुमाईच्या ॥९५॥
ब्रम्हानंद झाला सर्वांचे अंतरीं । आनंदें श्रीहरि आठविती ॥९६॥
पंढरीच्या सुखा भाग्या नाहीं अंत । जाणताती संत साधुजन ॥९७॥
नित्यानित्य घडे चंद्रभागे स्नान । अखंड दरुशन देवाजीचें ॥९८॥
तयाचिया भाग्या अंत नाहीं पार । राहिला सार संतोबा तो ॥९९॥
नामदेव तेथें याचक भिकारी । हाका त्यासी मारी वारंवार ॥१००॥
कांहीं मज द्यावें तुमचें उच्छिष्ट । भरेल हें पोट तेणें माझें ॥१०१॥
कृपावंत साधु आली त्या करुणा । वंदितो चरणा नामदेव ॥१०२॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत बोधलेबावा

धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥
विठोबाचे नामीं रंगलें हें मन । मिळालें जीवन सिंधुमाजी ॥२॥
आवडीनें केला त्याणें अंगिकार । कृपेचा सागर पांडुरंग ॥३॥
गुणदोष त्याचे न पाहे चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥४॥
सत्य हेंचि असे सांगतों प्रमाण । भावे करा ध्यान विठोबाचे ॥५॥
तैसा बोधराज प्रेमळ हा भक्त । भावें आठवीत देवाजीसी ॥६॥
रात्रीं शेतामाजी करीत रक्षण । गात नारायण आवडीनें ॥७॥
राळरास त्याच्या सासर्‍याचा गांव । त्याची याची सींव एक असे ॥८॥
तयाचिया घरीं हांसी कुणबीण । करीत रक्षण शेतामाजी ॥९॥
बोधराज भावें आळवीत देव । हांसीचिया जीवा सुख वाटे ॥१०॥
विठोबाचे नामीं वेधलेंसे मन । आली ती शरण बोध राजा ॥११॥
म्हणे बापा मज द्यावा उपदेश । तोडावा हा फांस संसाराचा ॥१२॥
हांसीचा तो भाव जाणुनी पवित्र । सांगितला मंत्न त्रिअक्षरी ॥१३॥
विठ्ठल हें नाम अहोरन ध्याईं । मग तुला नाहीं भय चिंता ॥१४॥
हरिदिनिं व्रत करीं एकादशी । जागर कथेसी करीत जावा ॥१५॥
हांसीचिया मना झाला तो आनंद । भावें हा गोविंद आळवी ती ॥१६॥
चालवीत व्रत नेम एकादशी । जागर कथेसी धामणगांवीं ॥१७॥
बोधराज भक्त भाविक प्रेमळ । कीर्तन रसाळ आवडीचें ॥१८॥
श्रवणासी ते येती गांवीचे ते लोक । वाटतसे सुख तयालागीं ॥१९॥
भवर गांवीचे कीर्तनास आले । त्यांत काय झालें एक एका ॥२०॥
मार्गीं चालतांना सर्पदंश झाला । तेचि वेळां गेला प्राण त्याचा ॥२१॥
सांगात्यांनीं तेव्हां विचार करुनी । आणियेला त्वरें कथेमाजी ॥२२॥
बैसविलें त्यासी भिंतीसी टेकुनी । करिती श्रव्ण हरिकथा ॥२३॥
नामामृत भावें वाढीत बोधला । घ्यारे सर्वत्नांला सांगतसे ॥२४॥
करावी पुरती तुम्ही सांठवण । जगीं हें भरूनि उरलेंसे ॥२५॥
स्वर्ग मृत्युलोकीं असे तो पाताळीं । आणिला जवळीं पुंडलीकें ॥२६॥
समपदीं कटीं ठेऊनियां कर । उभे विटेवर राहिले ते ॥२७॥
तयाची हे गोडी बोधल्या संपडली । तेचि म्यां वाढिली तुम्हांपुढें ॥२८॥
श्रवणद्वारें तुम्ही जेवा सावकाशा । होईल उल्हास माझे जीवा  ॥२९॥
नामघोष तुम्ही वाजवावी टाळी । होईल हे होळी पातकांची ॥३०॥
श्रोते बोलताता तेव्हां बोधल्यास । करा उपदेश या गृहस्थासी ॥३१॥
वाजवीना टाळी करीना भोजन । कांहो यानें मौन्य धरियेलें ॥३२॥
बोधराज करी त्यासी विनवणी । बोला चक्रपाणी आवडीनें ॥३३॥
कथेलागीं तेव्हां येती आनंदानें । कांपे तया भेणें कळीकाळ ॥३४॥
सांडूनि अहंता यावें कीर्तनासी । तेणें हृषिकेशी संतोषतो ॥३५॥
म्हणेनिया कोणीं न करावा आळस । बोलावा उल्हासें पांडुरंग ॥३६॥
ऐकोनियां ऐसें तेव्हां नारायण । परतविला प्राण तेचि वेळां ॥३७॥
कथेमाजी जें कां बैसविलें प्रेत । तें आनंदें नाचत नामघोषें ॥६८॥
समजलें तेव्हां श्रोत्यां त्या सकळां । महिमा आगळा हरिनामाचा ॥३९॥
बोधल्यासी तेव्हां श्रुत झाली मात । उठविलें प्रेत पांडुरंगें ॥४०॥
प्रेमअश्रु बोधल्याचे डोळां । पाळिसी तूं लळा पांडुरंगा ॥४१॥
जाणूनि अंतर होसी साहाकारी । लज्जा त्वां श्रीहरि राखियेली ॥४२॥
बाळकाचे बोल मातेसी आवड । पुरवीत कोड आनंदानें ॥४३॥
समजलें मज आतां विठाबाई । काय उतराई होऊं तुज ॥४४॥
बोधल्यासी बोले विठोबा सांवळा । आवडी प्रेमला तुई मज ॥४५॥
आनंदें जागर होत एकादशी । किर्तनांत हांसी होती तेव्हां ॥४६॥
हांसीचे ते धनी विभक्त ते झाले । विकरा घातिलें हांसीलागीं ॥४७॥
हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥४८॥
काय जन्मांतर कैसें हें प्राक्तन । स्वामीचे चरण अंतरती ॥४९॥
बोधराज माझी पांडुरंग मूर्ती । वाटेल ही खंती त्याचि मज ॥५०॥
होऊनियां श्रमी धामणगांवा गेली । वार्ता सांगितली बोधराजा ॥५१॥
बाबा तुम्ही आतां द्यावें मज मोल । श्रुत तेव्हां केलें ममताईसी ॥५२॥
जाणूनि अंतर राळेरास आला । मेहुण्यास बोले बोधराज ॥५३॥
हंसिसी विकितां म्हणूनि ऐकिलें । सांगा इचें मोल काय आतां ॥५४॥
येरूं म्हणे हांसी देऊं आणिकासी । देऊं ना तुम्हासी बोलूं नका ॥५५॥
हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥५६॥
बोधराज तेव्हां श्रुत झाली वार्ता । सांगतों देवासी नेतील तुजा ॥५७॥
सांगूनियां ऐसें धामणगांवा गेले । तों हांसीलागीं आलें गिर्‍हाईक ॥५८॥
पंचवीस होन केलें तिचें मोल । लिहून घेतलें खरिदखत ॥५९॥
द्रव्य घातियेलें तयाच्या पदरांत । तों आले अकस्मात्‌ पांडुरंग ॥६०॥
हांसे तुललागीं बोलावी बोधला । शब्द हा ऐकिला सर्वत्रांनीं ॥६१॥
हांसी आणि मूल तेव्हां जालें गुप्त । केला हा वृत्तांत पांडुरंगें ॥६२॥
बोलावितां हांसी न दिसे तयाला । कज्जा तो लागला दोघांजणा ॥६३॥
भांडत हे गेले तेव्हां दिवाणांत । सांगती वृत्तांत दोघेज्ण ॥६४॥
फजीत होऊनि तेव्हां दरबारीं । दिल्हें तें माघारी द्रव्य त्याचें ॥६५॥
संताचें नायके नाडला तो खर । दोहींकडे थार नाहीं त्यासी ॥६६॥
संतांसी शरण असे दास नामा । अखंडित प्रेमा त्याचे नामीं ॥६७॥


संत नामदेव गाथा संतचरित्रे – संत जनसवंत

जनजसवंत भला । देवत याचे घरा गेला ॥१॥
येऊन राहातो चाकरी । पोटा मागतो भाकरी ॥२॥
स्त्री वाढावया गेली । वरचेवर विठठल झेली ॥३॥
काम सांगा सहज कांहीं । करितों मी लवलाहीं ॥४॥
मागें उरों नेदी कांहीं । कशाला गे माणुस बाई ॥५॥
दुबळ्याचे घरची नागवण । भाग्या घरची सांठवण ॥६॥
शेतांतील काम करी । विठो माझा नांगर धरी ॥७॥
खुटें पालख्या तोडी । साठ चाहुर पाणा झोडी ॥८॥
देव लाकडांसी गेला । परत घेवूनियां आला ॥९॥
पांचा साता गांवा गेला । लेंकी सुना घेऊन आला ॥१०॥
खांद्यावरी आणिल्या पाहीं । नवल याचें सांगों काइ ॥११॥
मायलेंकी केल्या भेटी । ऐशा विठोबाच्या गोष्टी ॥१२॥
कैसा प्रगटरे झाला । विठो माझा निघोन गेला ॥१३॥
आठवा आठवा माझा सखा । नामा सांगे सर्व लोकां ॥१४॥


संत जनाबाई अभंग १ ते २

१.
नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला ॥१॥
करितां कामधंदा ध्यानीं नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥
देखोनियां भाव तिचा पांडुरंग । काम करूं लागे जनीलागीं ॥३॥
रात्रीं येऊनियां जनीचिया घरीं । दळूं लागे हरी तिजलागीं ॥४॥
दळितां काढिली माळ विजयंती । ठेविली परती शालजोडी ॥५॥
जनीचें आवडे देवाजीस गाणें । झालासे तल्लिन पांडुरंग ॥६॥
प्रात:काळ झाला तेव्हां त्या समयासी । जात हृषिकेशी तांतडीनें ॥७॥
घेऊनियां गेले जनीची वाकळ । विसरले माळ शाल जोडी ॥८॥
तेव्हां पुजार्‍यानेंज उघडिलें द्वार ।  पाहिला तो वर रुवक्मिणीचा ॥९॥
देवाच्या अंगावर देखिली वाकळ । नाहीं गळां माळ शालजोडी ॥१०॥
एकमेकां तेव्हां पुसती पुजारी । कोणें केली चोरी देवाजीची ॥११॥
शोध करितांना जनीची वाकळ । आले ते सकळ तिच्या घरीं ॥१२॥
शालजोडी माळ होती तिचे घरीं । दाविती पुजारी सर्वांलागीं ॥१३॥
बांधियेली तेव्हां त्यांनीं दासी जनी । नामया लागुनी श्रुत केलें ॥१४॥
नामा म्हणे जने कांगे केली चोरी । बोलतसे खरें जनी त्यासी ॥१५॥
रात्नी माझ्या घरा आले पांडुरंग । दळितां श्रीरंगा घाम आला ॥१६॥
काढियेली माळ तेव्हां शालजोडी । गातसे आवडी मजसवें ॥१७॥
प्रात :— काळीं देव गेले ते उठोनी । न कळे करणी कैसी ॥१८॥
बापा मी सांगतें हेंचि हो प्रमाण । पुसावें जाऊन पांडुरंगा ॥१९॥
नामा म्हणे तुम्हां कळेल तैसें करा । नका या विचारा पुसों मज ॥२०॥
नामा म्हणे जने केलें असें कर्म । जाणे एक वर्म पांडुरंग ॥२१॥
धमकावुनी नेली त्यांणीं दासी जनी । सकळ ब्राम्हाणीं मिळोनियां ॥२२॥
श्रुत केली वार्ता गांर्वांच्या राजाला । ते म्हणे जनीला शूळीं द्यावें ॥२३॥
शूळ तो रोंविला चंद्रभागेतीरीं । पहती नरनारी द्दष्टी तेव्हां ॥२४॥
जनी आठवीत तेव्हां पांडुरंगा । कां गा तूं श्रीरंगा मोकलिसी ॥२५॥
घडी घडी येत होतासी तूं देवा । आज कां केशवा निद्रा आली ॥२६॥
कोठें गुंतलासी भक्तीचिया काजा । धांवें महाराजा येईं आतां ॥२७॥
प्रल्हादाकारणें नृसिंह झालासी । स्तंभीं प्रकटसी क्षणमात्रें ॥२८॥
दीनांचा दयाळू तुझें नांव बापा । कां हो अवकृपा केली मज ॥२९॥
द्रौपदीनें केला जेव्हां तुझा धांवा । आलासी केशवा क्षणामाजी ॥३०॥
माझा तुज देवा आला हो कंटाळा । आळ हा घातला मजवरी ॥३१॥
समजलें मज होतें तुझे मनीं । नसावी हे जनी पांडुरंगा ॥३२॥
करितां कामधंदा तुज आला शीण । कंटाळलें मन देवा तुझें ॥३३॥
कासयासी बोल ठेवूं तुज देवा । प्रारब्धाचा ठेवा फळा आला ॥३४॥
आतां ऐक माझी हेचि विनवणी । भेट चक्रपाणी एक वेळां ॥३५॥
न मागें मी कांहीं देवा तुज आतां । पायां पै अनंता ठाव देईं ॥३६॥
ऐकूनियां ऐसी जनीची विनवणी । आले चक्रपाणी धांवोनियां ॥३७॥
जनीच्या सांगातें होते राजदूत । नेलीगे त्वरित शूळापाशीं ॥३८॥
जनीनें तो शूळ पाहातां नयनीं । अकस्मात्‌  पाणी झालें त्याचें ॥३९॥
शस्त्रें जीं कां होतीं राजदूतां करीं । विरालीं तीं सारीं पाणी झालें ॥४०॥
विठोबानें तेव्हां आलिंगिली जनी । म्हणे माय बहिणी श्रमलीसी ॥४१॥
जनी म्हणे देवा तूं पाठीसी असतां । नाहीं भय चिंता आम्हालागीं ॥४२॥
श्रुत झाली वार्ता राजया लागोनी । शूळासूद्धां पाणी शस्त्रें झालीं ॥४३॥
समजलें तेव्हां तयाचे अंतरीं । जनीला श्रीहरी सांभाळितो ॥४४॥
चला जाऊं आतां जनीच्या दर्शना । सिद्ध झाली सेना पाय चाली ॥४५॥
क्षमा करीं माते आमुचे अन्याय । कृपा द्दष्टी पाहें आम्हांकडे ॥४६॥
देऊनियां वस्त्रें भूषणें जनीसी । गेला आश्रमासी राजा तेव्हां ॥४७॥
समजलें तेव्हां पंढरीच्या लोकां । जनीचा हा सखा पांडुरंग ॥४८॥
जनीचे अभंग लिहीत नारायण । करिती श्रवण साधुसंत ॥४९॥
धन्य तेचि जन धन्य तिची भक्ति । नामदेव स्तुति करीतसें ॥५०॥

२.
सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥
लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥
जालों निधडा नि:शंक । गायनाचें कौतुक ॥३॥
प्रेमभरित सर्वदा । मुखीं नाम हरि गोविंदा ॥४॥
ऐसा सर्वकाळ गाय । भावें विठोबाचे पाय ॥५॥
नामा म्हणे ऐकें हरी । दासी जनीची वाट करी ॥६॥


संत गोरोबा कुंभार अभंग १ ते ४

१.
प्रेम अंगीं सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥
असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥
कालवुनी माती तुडवीत गोरा । आठवीत वरा रखूमाईच्या ॥३॥
प्रेम आंगीं से झांकुनी नयन । करीत भजन विठोबाचें ॥४॥
तयाचिये कांता आणूं गेली जळ । खेळतसे बाळ आंगणांत ॥५॥
रांगत लेंकरूं गेलें असे तेथें । तुडविलें त्यातें न कळतां ॥६॥
तत्क्षणीं त्याचा गेला तेव्हां प्राण । घेउनी जीवन आली कांता ॥७॥
पाहती तों चिखलांत दिसे रक्तमांस । केला तो आक्रोश मोठा तिनें ॥८॥
पिटीयेलें तेव्हां आपुलें वदन । जळो हें भजन तुझें आतां ॥९॥
डोळे असोनियां जाहलासी आंधळा । कोठोनी कपाळा पडलासी ॥१०॥
कसाबासी तरी कांहीं येती दया । कांरे बाळराया तुडविलें ॥११॥
विठोबानें कैसें लावियेलें वेड । नाहीं मागेंपुढें पाहिलेंसी ॥१२॥
निर्दयाची तुज लागली संगती । अधर्मीं श्रीपति देखियेला ॥१३॥
काय तुझा यानें केला असे अन्याय । दूर परता होय चांडाळा तूं ॥१४॥
होतीं लोटोनियां केला तो परता । आग लाव आतां विठोबासी ॥१५॥
ऐकूनियां शब्द सावध तो जाहला । कांगे भंग केला भजनाचा ॥१६॥
विठोबासी । माझ्या कांगे त्वां गांजिलें । कर्म ओढवलें बाळकाचें ॥१७॥
सांग मज ऐसें कोणाचें तें जालें । पुण्य फळा आलें लेंकुराचें ॥१८॥
याजसाठीं माझ्या गांजिलेंसे देवा । पाठी लागे तेव्हां मारावया ॥१९॥
हात बोट मज लावशील आतां । आण तुज सर्वथा विठोबाची ॥२०॥
ऐकतांचि ऐसें ठेवियेली काठी । राहिला उगाची गोरा तेव्हां ॥२१॥
न करी तो कांहीं तयेसीं भाषण । वर्जियेली तेणें कांता तेचि ॥२२॥
विनवीते कांता गोरिया लागुनी । न मोडीं मी आण विठोबाची ॥२३॥
जाली तेव्हां श्रमी वंश बुडविला । विठोबा कोपला मजवरी ॥२४॥
मनामाजी तेणें केला तो विचार । करावें दुसरें लग्न याचें ॥२५॥
बोलाविला तिनें आपुला तो पिता । सांगितली वार्तां त्याजलागीं ॥२६॥
कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा । नको या विचारा पाहूं आतां ॥२७॥
अवश्य म्हणूनियां विनविला गोरा । लग्नाची हे त्वरा केली तेव्हां ॥२८॥
लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा । दोघीसही पाळा समानची ॥२९॥
न पाळितां आण तुम्हा विठोबाची । धरा या शब्दाची आठवण ॥॥३०॥
अवश्य म्हणोनियां निघाला तो गोरा । आला असे घरा आपूलिया ॥३१॥
कनिष्ठ स्त्रियेसी आलें असे न्हाण । न करी भाषण तिसीं कांहीं ॥३२॥
येऊ म्हणे बाई कैसा हा भ्रतार । करूं मी विचार कैसा आतां ॥३३॥
पहिली ती कांता बिनवी गोरियातें । अंगिकारा इतें स्वामी आतां ॥३४॥
मामानें ही मज घातलीसे आण । दोघींचें पाळण समान करा ॥३५॥
गेला तरी आतां जावो माझा प्राण । न मोडी मी आण विठोबाची ॥३६॥
जाहल्या दोघी श्रमी कपाळ पिटिती । पुरविली पाठी विठोबानें ॥३७॥
वंश बुडविला ह्या मेल्या काळयाने । जळो थोरपण याचें आतां ॥३८॥
बेडे मेले लोक घेती दरुशन । नसावें भाषण यासीं कांहीं ॥३९॥
होवोनियां श्रमी बिसल्या घरांत । काढियेली युक्ति कनिष्ठेनें ॥४०॥
म्हणे बाई आतां मोडूं याची आण । करील भाषण आपणची ॥४१॥
निजतो हा जेथें तेथें हो जाऊन । करावें शयन दोघीनीं तें ॥४२॥
निद्रेमाजी उरस्थळीं याचे हात । ठेऊं अवचित आपूलिया ॥४३॥
मग हा करील सहजचि भाषण । न लगे सांगणें कोणासी तें ॥४४॥
निद्रेमाजी गोरा जाहला तोनिमग्न । दोघींनीं शयन केलें तेथें ॥४५॥
उचलोनियाम कर ठेविले शरीरीं । नाहीं देहावरी गोरा तेथें ॥४६॥
सावध होवोनी पाहियेलें तेणें । अन्याय हातानें केला माझ्या ॥४७॥
विठोबाची माझ्या मोडियेली आण । टाकाबे तोडून हातचि हे ॥४८॥
घेऊनियां शस्त्र तोडियेली कर । आनंदला फार मोरा तेव्हां ॥४९॥
समजलें तेव्हां लोकां त्या सकळां । भक्त हा आगळा देखियेला ॥५०॥
कैसा बाई आतां करावा विचार । बुडाला संसार सर्वस्व हा ॥५१॥
आतां शरण जाऊं तया पांडुरंगा । करील तो चिंता आमुचीय़े ॥५२॥
सांगूं वर्तमान रुक्मिणीजवळी । विनची वनमाळी आम्हांविसी ॥५३॥
शरणागतां हरी नेदीच अंतर । वर्णिताती । शास्त्रें मोठींमोठी ॥५४॥
संत हें गाताती बाई सदोदीत । पाहूं तो अनंत कैसा असे ॥५५॥
दोघी तेव्हां गेल्या रुक्मिणीजवळी । विनविली बाळी रुक्मिणी ॥५६॥
सांगितला तिसी सकळ वृत्तांत । विनवी हा कांत आम्हाविसीं ॥५७॥
ऐकेलग बाई तुझें तो वचन । समजलें पूर्ण आम्हांलागीं ॥५८॥
करीं माते आम्हा येवढा उपकार । न पडे विसर जन्मोजन्मीं ॥५९॥
करुनी प्रार्थना आल्या त्या अश्रमा । उभा होता नामा कीर्तनासी ॥६०॥
आवडीनें गोरा करीत श्रवण । आणीक सज्जन हरिभक्त ॥६१॥
नामयानें टाळीं पिटीली गजरें । गोरियासी कर फुटले ते ॥६२॥
रांगत लेंकरूं आलें तयावेळीं । मातेच्या जवळी आनंदानें ॥६३॥
आलिंगुनी तिणें धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥६४॥
आलिंगुनी गोरा बोले मेघ :— शाम । करीं घराश्रम सुखें आतां ॥६५॥
संशयाची जात नको धरूं चित्ता । आण तुज आतां माझी असे ॥६६॥
ऐकोनियां गोरा वर्ते घराश्रमी । लक्ष असे नामीं विठोबाच्या ॥६७॥
ऐसिया संतांचे आठवितां गुण । जाती हे जळोन सर्व दोष ॥६८॥
नामदेव त्यासी करी विनवणी । ठाव ह्या चरणीं तुमचीया ॥६९॥
हेंचि तुम्ही आतां मज द्यावें दान । आठवीन गुण वारंवार ॥७०॥

२.
आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी ॥१॥
यांचे समागमें जात असे खुळें । स्मरे वेळोवेळे विठ्ठासी ॥२॥
धन्य पुण्यतिथि आली एकादशी । पावले क्षेत्नासी विश्वजन ॥३॥
स्नानविधि करोनि समस्तां भेटला । कीर्तनीं बैसला हरिदास ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान सांवता । नामयाची कथा ऐकताती ॥५॥
तंव तो म्हणे करा नामाचा उच्चार । टाळीचा गजर करूनियां ॥६॥
गोरियाचे नेत्नीं आले जळबिंदु । मज कां गोविंदु विसरला ॥७॥
कां गा केशिराजा मोकलिलें मातें । शरण कोणातें जाऊं आतां ॥८॥
तुजविण मज न दिसे निर्वाणीं । माय बाप धई ग्ण गोत ॥९॥
आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण आतां कोणी नाहीं ॥१०॥
अनाथाचा नाथ दिनाचा कैवारी । पावला झडकरीं आपुल्या दासा ॥११॥
गोरियाचे हात आले तत्‌क्षणीं । गर्जोनि नामध्वनी उभा ठेला ॥१२॥
सकळ संत जनीं देखोनि नयनीं । टाळिया पिटोनि गर्जतती ॥१३॥
निधला म्हणती भक्त हा वैषणव । अघटीत भाव न कळे याचा ॥१४॥
कैसा येणें केला ऋणी पंढरीनाथा । आहे पंढरीनाथ याचे उदरीं ॥१५॥
पूर्वीं तो प्रर्‍हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतांमधीं ॥१६॥
नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥१७॥

३.
कां गा केशिराजा मोकलीलें मातें । शरण मी कोणातें जाऊं आतां ॥१॥
तुजविण मज न दिसे निर्वाणीं । मायबाप धणी गणगोत ॥२॥
आतां माझी लाज राखें पंढरीनाथा । तुजविण अनंता आणिक नाहीं ॥३॥
अनाथांचा नाथ दीनांचा कैवारी । पाव झडकरी आपुल्या दासा ॥४॥
गोरियाचे हात आलेचि तत्क्षणीं । नामा कीर्ति वर्णीं विठोबाची ॥५॥

४.
माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग ॥१॥
गोरोबाची कांता पाणियासी जातां । पुत्राला पाहतां खेळतसे ॥२॥
द्दष्टी असों द्यावी स्वामि बाळावरी । नाहीं कोणी घरीं सांभाळाया ॥३॥
नामा म्हणे नाहीं गोरा देहावर । सर्वही निर्धार पांडूरंगीं ॥४॥


संत राका कुंभार

कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥
पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥
करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥
घडोनि भाजणें ठेविली घरांत । व्याली डेरियांत मांजर ते ॥४॥
न देखितां त्यानें आवा तो रचिला । अग्नि तो लाविला तेचि वेळां ॥५॥
फिरूनि मांजर घरासि ते आली । नाहींत तीं पिल्लीं डेरा तोही ॥६॥
आव्यापाशीं तेव्हां आली ती धांवत । ओरडत फिरत भउताली ॥७॥
पाहूनि राका समजला मनीं । आहा चक्रपाणी काय केलें ॥८॥
जळो जळो माझा प्रपंच व्यवहार । नाहीं म्यां विचार केला देवा ॥९॥
करावया गेलों प्रपंचाचें हित । पापाचे पर्वत झाले माथां ॥१०॥
अज्ञान हीं बाळें जळतील आतां । धांव पंढरीनाथा येचि वेळां ॥११॥
पांडव ते रक्षिले लाक्षातें जोहरी । तैसी करी परि पिल्लियांसी ॥१२॥
आगीमाजी तुवां प्रल्हाद रक्षिला । अगाध हें तुला काय झालें ॥१३॥
रक्षीं यासी आतां येऊनियां अंगें । घेईन वैराग्य नवस हाचि ॥१४॥
तिघांजईं तेव्हां त्यजिलें अन्नपाणी । धांव चक्रपाणी लवलाहीं ॥१५॥
तीन रोज झाले शांत झाला अग्नि । पाहाती उकलूनि आवा तेव्हां ॥१६॥
सर्वस्व भाजणें भाभूनियां गेलीं । खेळताती पिल्लीं डेरियांत ॥१७॥
कच्च असे डेरा नसे आंच त्याला । माझें नवसास पावला पांडुरंग ॥१८॥
पाहती सकळ पंढरीचे लोक । अगाध कवतुक देवाजीचे ॥१९॥
आनंदोनी राका बोलवी ब्राम्हण । दिलें तें लुटून घर तेव्हां ॥२०॥
वेंचूनियां चिंध्या लाविती ढुंगासी । भावें ह्रषिकेशी आळविती ॥२१॥
जाऊनियां वनीं वेंचिताती काष्ठें । उदरापुरतें विकिताती ॥२२॥
अखंड करिती नामाचा गजर । ध्यानीं मनीं वर रखुबाईचा ॥२३॥
बंका गेली असे चंद्रभागे स्नाना । नामयाचि कन्या धुया आली ॥२४॥
बंका बोले बाई सिंतोडे येतील । ऐकूनियां बोले येरी तिसी ॥२५॥
जातीची कुंभार कामीक वैराग्य । घेतलेंसे सोंग कासीयासी ॥२६॥
ऐकूनियां बंका करीत उत्तर  । बौद्ध अवतार पांडुरंग ॥२७॥
रडका हा नामा घॆतलीसे आळी । त्यानें वनमाळी बोलविला ॥२८॥
अबोल हा देव बोलविला यानें । काय थोरपण आलें यासी ॥२९॥
वाढविली कीर्ति जगांत डांगोरा । बोलविला खरा पांडुरंग ॥३०॥
चंद्रभागे तीरीं झाला वृत्तांत । श्रुत झाली मात नामयासी ॥३१॥
नामदेव तेव्हां आले राउळासी । विनंति देवासी करुनी बोले ॥३२॥
राकाकुंभारानें घेतलेंसे वैराग्य । कांहो केला त्याग संसारींचा ॥३३॥
बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती । दावितों प्रचिती तुजलागी ॥३४॥
विठ्ठल रखुमाई नामा असे संगें । आलीं तेव्हां तिघें बनाप्राती ॥३५॥
रुक्मिणीनें तेव्हां काढुनी कंकण । ठेविलें झांकून काष्ठामाजी ॥३६॥
राका बंका वंका वेंचिताती काष्ठ । आली अव्चित तया ठायां ॥३७॥
उचलितां काष्ठ देखिलें कंकण । दिलें तें ढाकून तेचि वेळां ॥३८॥
म्हणती याजलागीं विटाळ जाहला । न घेती तयाला म्हणोनियां ॥३९॥
पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत । निष्काम हे भक्त देखीयेले ॥४०॥
बोले रखुमबाई अहो पांडुरंगा । भेटावें श्रीरंगा याज लागीं ॥४१॥
नामा म्हणे देवा वंदितों मी चरण । धरा आलिंगून तिघांजणा ॥४२॥
होती हे आवडी देवाजीचे चित्तीं । आलिंगिलीं प्रीतीं तिघेजण ॥४३॥
राका बंका वंदिती चरण । कांहो येणें केलें देवराया ॥४४॥
उष्णकाळ दिन श्रमली माझी आई । बैसा रसुमाबाई छायेखालीं ॥४५॥
ऐसी असे ज्याची देवावरी माया । करी त्यासी दया पांडुरंग ॥४६॥
नामदेव बोले त्यचा मी हा दास । शरण तयास वारंवार ॥४७॥


संत नरसी मेहता अभंग १ ते ३

१.
नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त ॥१॥
वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यीं ॥२॥
तया कुळीं झाला भक्तराज पाहीं । धन तें सर्वहि धर्म केलें ॥३॥
अकस्मात्‌ नगरींत यात्रेकरी आले । द्वारके चालिले देवकाजा ॥४॥
मार्गीं बहु कष्ट चोरीव आगळी । म्हणोनि मंडळी भयाभीत ॥५॥
समागमें द्रव्य निभावे कैसेनि । यालागीं चिंतनी हुंडियेचे ॥६॥
ग्रामाचे भीतरीं हिंडती घरोघरीं । हुंडी द्यावी बरी द्रव्य घेईं ॥७॥
ऐसें ऐकतां ते लबाड छळक । उत्तर हो देख देते झाले ॥८॥
नरसी मेहता परम भक्त थोर । आहे सावकार हुंडीवाला ॥९॥
तयाचे निकटीं जावे बहू त्वरें । तुम्हासी तो खरे वाटे लावी ॥१०॥
म्हणोनि प्रेमाचे यात्रेकरी साचे । पुसत मेहताचे घरा आले ॥११॥
देखतांचि मेहता समोरा उठोन । येऊनि नमन करिता झाला ॥१२॥
करूनि पूजन धूपदीप सारे । समर्पण बरे उपचार ॥१३॥
मग करि प्रश्न काय काजा बोला । आम्हां योगें भला असे तोचि ॥१४॥
यात्रेकरी म्हणे जाणें द्वारकेसी । म्हणोनि हुंडीसी करणें असे ॥१५॥
तीन शतें साठ रुपये टाकिले । येरु म्हणे भलें देई हुंडी ॥१६॥
तयेकाळीं हुंडी लिहिली द्वारकेसी । नामा म्हणे साची पेठ खरी ॥१७॥

२.
स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधें ॥१॥
दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥
यात्रेकरी यानें राखिले रुपये । तीन शतें साठ द्यावे यांसी ॥३॥
ऐसें पत्र दिलें हुंडी ते लिहून । नगरीचे बाम्हण पाचारिले ॥४॥
बोलावुनी त्यांसी वांटी दक्षिणेसी । यात्नेकरी यासी विस्मय वाटे ॥५॥
म्हणती धर्मात्मा सुशील मेहता । दानशूर दाता जगीं खरा ॥६॥
घेवोनी द्रव्यातें दिलें ब्राम्हणांसी । लिहुनी हुंडीसी दिधलें तेणें ॥७॥
नामा म्हणे धन्य नरसी मेहती । ऋणी देव होता हुंडी भरी ॥८॥
३.
चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें ॥१॥
पहावया घर दुकान हुंडीचें । न दिसे हो साचें तत्क्षणीं ॥२॥
सायंकाळ पडला सांपडेना कोठें । प्राणासी संकट देणें आलें ॥३॥
देश दूर झाला नसे खर्ची कांहीं । देहपात पाहीं करीन आतां ॥४॥
करूनि नेमासी प्राण ते द्यायासी । समीप तीर्थासी केलें असे ॥५॥
ऐसा भाव देव पाहूनि त्वरित । आला हूडकीत तीर्थाजवळी ॥६॥
हुंडी कोठें आहे नरसी मेहत्याची । रुपये साठींची तिनशें वरी ॥७॥
रणछोड आहे नाम माझें पाहीं । रुपये ते घेईं देतों तुज ॥८॥
ऐकतां वचन संतोषला मनीं । धरिलें चरणीं प्रेमभावें ॥९॥
धन्य धन्य तूंरे पाहतां मजला । घेऊनि द्रव्याला आलासीरे ॥१०॥
देउनी रुपये दर्शन दाविलें । जगविख्यात केलें मेहत्यासी ॥११॥
करूनि यात्रेसी जुनागडा आला । भावें हो वंदिला मेहता तो ॥१२॥
म्हणे तुजयोगें झालें मज पाहीं । दर्शन तें ठायीं रणछोडा ॥१३॥
ऐकतांच वाणी प्रेम मनीं भरे । धरिले चरण त्वरें तयाचे हो ॥१४॥
नामा ऐसा देव ऋणी भक्तां । पुरवित होता सर्व ठायीं ॥१५॥


संत चोखामेळा

चोखामेळियानें पाजियेलें दहीं । पडों दिलें नाहीं उणें त्याचें ॥१॥
तयाचें चरित्र परिसावें सादर । करितों नमस्कार सतजनां ॥२॥
तयाची जे कांता तयाच सारिखी । भावार्थ नेटकी आवडीची ॥३॥
साधन द्वादशी आली एके काळीं । उठोनि प्रात :— काळीं काय बोले ॥४॥
उठीं उठीं कांते स्वयंपाक करीं । आतां येतील हरि पारण्यासी ॥५॥
तंव एक्या ब्राम्हणें आइकिली मात । तेणें दिवाणांत सांगितलें ॥६॥
दिवाणानें दूत उआठविले त्यासी । चोखामेळियासी धरूनि आणा ॥७॥
दूतीं जाऊनियां धरुनी आणिलें । म्हणे काय झालें चोखामेळा ॥८॥
विठोबासी दहीं पाजीत असतां । कांहो माझ्या हाता आंसडीलें ॥९॥
रडतो हा कांरे सभेसी पुसती । तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला ॥१०॥
रुसूनियां विठो गेल म्हणऊनि । रडे दीर्घध्वनी करूनियां ॥११॥
म्हणती या महारानें देव बाटविला । जिवें मारायाला बैल जुंपा ॥१२॥
बांधोनियां पाय हांकियले बैल । धरूनि शिवळ विठो उभा ॥१३॥
उडती आसुड बइलांचे पाठी । मारितां हिंपुटीं थोर झाली ॥१४॥
तयाची ते कांता उभी राहूनियां । म्हणे देवराया हात काढी ॥१५॥
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारूं पाहसी ॥१६॥
पाळिलें पोसिलें माझिया धन्याशी । उतराई झालासी ओढावया ॥१७॥
अन्नाची त्वां क्रिया नाहींरे राखिली । रांडकी त्वां केली चोखियाची ॥१८॥
काढीं हात आतां जाय परता उसण्या । जया पोट पोसण्या येथूनियां ॥१९॥
चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा । संतांचा देखणा विठो माझा ॥२०॥
जन लोक पुसती कोणा बोलतीस । ते म्हणे तुम्हांस काय दिसे ॥२१॥
अनंत ब्रम्हांडें जयाचे उदरीं । त्यानें चहूंकरीं धरियलें ॥२२॥
पीतांबरधारी घन:शाम मूर्ती  । रखुमाईचा पति विठ्ठल हा ॥२३॥
समस्तांसी तेव्हां दिलें दरुशन । केलें समाधान नामा म्हणे ॥२४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *