संत नामदेव

संत नामदेव गाथा विठाचे-अभंग

संत नामदेव गाथा विठाचे-अभंग एकूण ५३ अभंग


साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा ॥१॥
तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं ॥२॥
गोपाळाचे मेळीं खेळे वनमाळी । यमुने पाबळी वेणु वाहे ॥३॥
शंख चक्र करीं मोरपिच्छ शिरीं । कानीं मकराकारी मुक्ताफळें ॥४॥
गळां वनमाळा कासे सोबसळा । देखूनि व्रजबाळा तन्मय झाल्या ॥५॥
नंदाचे नंदनें मोहियेलें मन । लामलेंसे ध्यान गोविंदाचें ॥६॥
विठा नामयाचा चरणींचा रज । भेटवा यादवराज द्वारकेचा ॥७॥



मग साधुसंत म्हणती विठ्या जाय । मम तूं याचे पाच सोडूं नको ॥१॥
अठ्ठाविस युगें एकाचें धरणें । तेथें हें नामणें दुसरें कोठें ॥२॥
एकाची मागणी मागें पैं होईल । मग तुजसी येईल बोलतां दु:ख ॥३॥
म्हणोनी पंढरिनाथु खूणची दावीं तूं । नामयाचा विठा पुसतू वेव्हारी धीटु ॥४॥



विठा नामायाचा आला पंढरपुरा । भेटला सोयरा विटेवरी ॥१॥
सुखदु:ख अवघें सांगितलें श्रीहरी । धरणें तुझे द्वारीं घेईन देवा ॥२॥
नामयासारिखा आणिक कोणी आहे । सृष्टिमाजी पाहें विचारुनी ॥३॥
नामा माझा सखा जिवाचा तो जीव । त्याचा आहे भाव माझे ठायीं ॥४॥
मजवांचूनि नामा दुजें नेणे कांहीं । मी त्याचे ह्रदयी सदा असें ॥५॥
नामयानें नाम जोडिलें निधान । ठेविलें सर्व धन तुझ्या पायीं ॥६॥
समर्थासी कांहीं बोलूं नये आतां । ठेवणें कृपानाथा देईं वेगीं ॥७॥
चहूं युगीं नामा सांगातेचि आहे । वेगळा कांहीं नोहे क्षणभरी ॥८॥
माझिया बापाची तुजजवळ ठेवी । विठा म्हणे द्यावी केशीराजा ॥९॥



पूर्वजन्मीं आराधितां । तुझें वर्म आलें आमुच्या हातां । नामदेवें सांगितलें जातां । तें सर्वथा देईंजे ॥१॥
आमुचे वडिलीं गा जोडिले । तें तुझे पायीं गा ठेविलें । गौप्य करितो नोव्हे गा भलें । दे उगलें गा दातारा ॥२॥
आमुचें आम्हांसी गा देतां । कां बा नये तुझ्या चित्ता । गार्‍हाणें देईन संता । चौघां देखतां घेईन ॥३॥
तुझा दारवंटा राखेन हरी । तुज रीघों नेदीं बाहेरी । जरीमोकलिसी अधांतरीं । तरी हे लाज कवणातें ॥४॥
आणिक कांहीं न मागें तूंतें । सेवावृत्ति द्यावी मातें । मज निरवावें संतांतें । आपुला दास म्हणोन ॥५॥
नामयाचा विठा म्हणे । यांत कांहीं करिसी उणें । तरी आमुच्या वडिलाचें निरूपणें । बांधलासी गा विठ्ठला ॥६॥



आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥
कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥
तें देगा आमुचें नको करूं विचारू । नामा तुझा डिंगरू त्याचे आम्ही ॥३॥
जुनें नाणें आमुच्या वडिलाचें ठेवणें । बहुता कष्टीं तेणें जोडियेलें ॥४॥
तें आम्हांलागोनी ठेविलें तुझ्या पायीं । आमुचें आम्हां देईं केशीराजा ॥५॥
तूं अनाथा कोंवसा दीनाचा कृपाळू । तरी आमुचा सांभाळू करीं कां वेगें ॥६॥
आमुचे संचितार्भ आम्हासी देउनी । यश घे त्रिभुवनीं म्हणे विठा ॥७॥



आमुचें ठेवणें जुगादीचें नाणें । जातां नामथानें सांगितलें ॥१॥
इतके दिवस पाहिली तुझी वाट । परि तूं उदास न बोलसी ॥२॥
तुजवांचोनी आम्हां कोण असे पोशिता । देईं कृपावंता नामप्रेम ॥३॥
आम्ही तुझीं सेवकें रंकाहुनी रंक । कठीण बोलणें निकें वदें तुज ॥४॥
म्हणोनी वेळोवेळां लागें तुझ्या पायीं । लटकीच गोबाई करूं नको ॥५॥
तुज आम्हासी वेगळीक नाहीं । तरी तूं न धरीं कांहीं दुजामाव ॥६॥
आपुलें म्हणावें अंधारीं ओळखावें । नामप्रेम यावें म्हणे विठा ॥७॥



हरिनामाचा ध्वनि ऐकोनी श्रवणी । जाईन लोटांगणीं तेथवरी ॥१॥
माझे सखे अवघे वैष्णवजन । त्यांचें मज दर्शन कैं होईल ॥२॥
एक उभे गाती एक बैसुनी ऐकती । ह्रदयीं आलिंगिती गोपिनाथू ॥३॥
ऐशियांचे संगतीं आहे बाप माझा । विनवितो विठा सहजा नामयाचा ॥४॥



आमुचा बाप अग्रज तुझा । तूं बा आम्हां होसी आजा ॥१॥
कैसें आम्हां धरिलें दुरी । सांग कृपालूवा हरी ॥२॥
तूं आमुचा मूळपुरुष । आम्ही अवघे तुझे अंश ॥३॥
आम्ही तुझी तिसरी पिढी । संत जाणताती प्रौढी ॥४॥
अरे कायशीं शतें लोटलीं । कैशी लाघावळी तुटली ॥५॥
हांसोनि बोले केशीराज । विठया अवघॆं घेईं मज ॥६॥



माझिया बापाचा तुजपाशीं ठेवा । विठो म्हणे द्यावा केशीराजा ॥१॥
ठेविलें ठेवणें झडकरी देईं । नेव्हार कांहीं लावूं नको ॥२॥
आपुलें मागतों कोण आड येईल । आतां जाणवेल तुझें माझें ॥३॥
विटेसहित चरणीं घालीन मिठी । करीन संवसाटी जन्मोजन्मीं ॥४॥
विठा म्हणे मज खवळिसी वांयां । पिसाळलिया पायां झोंवेन तरी ॥५॥


१०
मायबापें काय नसती आमुचीं । लेंकरें आमचीं त्याचे हातीं ॥१॥
माझें देईं माझ्या हातीं लवलाही । होईं उतराई केशीराजा ॥२॥
तुझ्या पायीं माझा बांधीन गळा । न भियें कळिकाळा सत्य जाणा ॥३॥
जितुकें देणें तितुकें घेईन मी आतां । नामयानें जातां सांगितलें ॥४॥
रगठया पाठोळ्यासी पडियेली मिठी । आतां जगजेठी तुज मज ॥५॥
बोरी काटे कांहो केळी आहो फाटे । नामयाचे विठे खवळलें ॥६॥


११
खवळलें आतां न भियेंरे तुज । सांडियेली लाज लौकिकाची ॥१॥
आम्हीं दीन सिंपे यातीचे हो हीन । दे माझें ठेवणें केशाराजा ॥२॥
साठी लक्ष चौर्‍याण्णव कोडी । त्यांतून एक कवडी न सोडीं मी ॥३॥
आणिक याहुनी असेल आगळें । तें घेईन बळें न सोडीं तुज ॥४॥
तुज थोरपण काईगा हें देवा । आम्हां दुर्बळाच ठेवा अभिलाषसी ॥५॥
पोरटीं म्हणोनी अभिलाष करिसी । ते कोठें निस्तरिसी म्हणे विठा ॥६॥


१२
तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी ॥१॥
लाजिरवाणें नको करूं देवा आतां । देईंगा कृपावंता नामप्रेम ॥२॥
शरणागता वज्रपंजर म्हणवीसी । तरी कां तूं न देसी आम्हां आमुचें ॥३॥
माझ्या नामयानें जन्मोनि जोडिलें । तें देगा वहिलें म्हणे विठा ॥४॥


१३
उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा पती । तरी कां काकुळती चित्तीं वाहासी ॥१॥
आम्हां दुर्बंळाचें ठेवणें कां ठेविलें । दिवाळें निघाळें काय तुझें ॥२॥
ज्याचें घेसी त्याचें ऐसेंचि करिसी । तें न चले वजपाशीं केशीराजा ॥३॥
चौघाचारीं तुज वेढीन आतां । मग बैसेल माथां अपकींर्ति ॥४॥
अठराही बोलती साही सत्य वाचा । उदारठायींचा कां न होसी ॥५॥
देणें घेणें तुज न सुटेथा । विचाररूनि आतां म्हणहें मनीं ॥६॥
नामयाचें ठेवणें तुजजवळीं आहे । न सोडीं-तुझें पाय म्हणे विठा ॥७॥


१४
माझिया बापाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपास पारणें राखें दारवंटा । केला भाग्य वांटा आम्हांलागीं ॥२॥
तुजपरतें दुजें नेणें आणिक कांहीं । देखें सर्वांठायीं रूप तुझें ॥३॥
तुझ्या सुखें धाला तुजमाजी निवाला । आपुला विसरला देहभाव ॥४॥
आम्हांसी घातलें तुझीये आभारी । विठा म्हणे अंगिकारीं नारायणा ॥५॥


१५
हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी ॥१॥
खेप ठिकाणाची वस्तु सवंगाची । सवाई निढळाची उणी नव्हे ॥२॥
चोहाटा चौकाचा दुकान नाक्याचा । जागा मिराशीचा पुरातन ॥३॥
हरिनाम केणें नित्य हमेशाई । तेव्हां तोटा नाहीं कोणें काळीं ॥४॥
विठा म्हणे वजन केली वैकुंठीची । गुणी निर्गुणींची कडासन ॥५॥


१६
माझिया बापासी तुझाचि विश्वास । म्हणवी तुझा दास अंतरंग ॥१॥
वृत्तिसहित मन ठेवुनी तुझ्यापाय़ीं । तुजपरतें कांहीं जाणेचिना ॥२॥
तों आम्हांलागीं शब्दें न पुससी । विसरोनी गेलासी दीनानाथा ॥३॥
जागे ठाणांतरी पंढरी चोहोटा । राखे दारवंटा रात्रंदिवस ॥४॥
छत्रचवर धरूं हाडपी डोळे करूं । जाणवी आवसरू सेवा विधी ॥५॥
शरीर प्राणाचा देऊनियां बळी । धरिले ह्रदयकमळीं चरण तुझे ॥६॥
विठा म्हणे तुज नाहीं आठवण । सहज तूं निर्गुण पंढरिराया ॥७॥


१७
भूतळीचीं तीर्थें नामा जंव करी । गांजीयेलें पोरी नामयाच्या ॥१॥
तुमचें ठेवणें खेचराचे पायीं । आणिकाचे वाहीं पडों नका ॥२॥
वायां मृगजळ दाविसील आम्हां । सर्वथा पुरुषोत्तमा न सोडीं मी ॥३॥
झोंडाचें ठेवणें ठेवावें कवणें । झोंडापरिस होणें झोंड जेणें ॥४॥
नामायाचा विठा झोंड पैं झाला । बिठो उभा केला भक्तिसुखें ॥५॥


१८
माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥
सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥
दोही कटावरी ठेऊनियां हात । कैसा हा पाहात घर घेणें ॥३॥
तुझिया पायासीं बांधीन मी गळा । व नीय़ें कळिकाळा सत्य जाण ॥४॥
दारकोंड करोनि बैसेन दारवंटा । नामयाचा विठा हालों नेदी ॥५॥


१९
पंढरीराया माझिया बापें । प्रसन्न केलें तुजप्रतापें ॥१॥
आम्हां दिलें तुझे हातीं । पाळीं म्हणे प्रेमभक्ती ॥२॥
तृप्त सहित माझिया मना । क्षेम घालीन तुझिया चरणा ॥३॥
तुझें गुणनाम कीर्तन । हे मज देईंगा जीवदान ॥४॥
देऊनियां प्रेमाचें भातुकें । खेळविसी त्या कौतुकें ॥५॥
विठा म्हणे नामयाचा । प्रसाद तुझीय़े कृपेचा ॥६॥


२०
तुझ्या प्रेमाचे कारणे । म्हणे म्यां घेतलें धरणें ॥१॥
विठा देगा झडकरी । मी तर न सोडीं निर्धारीं ॥२॥
शीर फोडीन कर्वती । नये तुज काकुळती ॥३॥
देह घालीन गोराजनीं । मोकलिसी मज लागोनी ॥४॥
तुझे द्वारीं देईन प्राण । तरी तूं पाहासी निर्वाण ॥५॥
विठा म्हणे पंढरिराया । आम्हा शिणवूं नको काया ॥६॥


२१
तुजसारिखा पंढरिनाथा । स्वामि शिरावरी असतां ॥१॥
तरी मी आणिकांचा मागता । लाज कोणासी समर्था ॥२॥
असोनी क्षीरसिंधू जवळी । क्षुधाक्रांत तळमळी ॥३॥
कामधेनु तें वोळगतां । न पुरे कामना सर्वथा ॥४॥
विठा म्हणे नारायण । आतां शरण जाऊं कोणा ॥५॥


२२
जननी बाळका कोपे रागें । परि ते आहार तिसची मागे ॥१॥
तैसा तुज मी शरण । पंढरिराया निरुता जाण ॥२॥
खेटी म्हणोनि परतें लोटी । परि ते चरणीं घाली मिठी ॥३॥
टाकोनी जाय कडीये नेघे । परि तें धांवे तियेचि मागें ॥४॥
विठा म्हणे पंढरिनाथा । आम्हां नुपेक्षीं सर्वथा ॥५॥


२३
हिंडतां श्रमलों बहु श्रम झाला । अजूनि माझी तुला करुणा नये ॥१॥
मज काय देतां होईल तुझें उणें । किती होसी कृपण पांडुरंगा ॥२॥
घेउनी धरणें बैसलों महाद्वारीं । झालों पैं भिकारी पंढरीचा ॥३॥
विठा म्हणे देवा माझें मज देया । लौकिक कां वांयां करितोसी ॥४॥


२४
जननी बाळकांचें जीवन । जरी तें नेणे भूकतहान ॥१॥
तरी तें कशानें बांचती । विचारावें कमळापती ॥२॥
वत्सालागी तान्हीं । लागूं नेदी आपुल्या स्तनीं ॥३॥
कूर्मी आपुलिया बाळा । नाव लोकीं वेळोवेळां ॥४॥
विठा म्हणे जगज्जीवना । आतां नुपेक्षावें दीना ॥५॥


२५
आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें ॥१॥
तुम्हां न विसंबे सर्वथा । तुमचा भार माझ्या माथां ॥२॥
करीन तळहात साउली । तुमची अवघी वशावळी ॥३॥
विठा म्हणे विसरलासी । आम्हां शब्दीं न पुससी ॥४॥


२६
पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी कां हां झोंड येता पंढरीसी ॥१॥
वेव्हार करितां आम्हासी जिंकिलें । जन्ममरण केलें देशधडी ॥२॥
विठा म्हणे यानें बुडविले अपार । पुढती हा चोर कबुल नाहीं ॥३॥


२७
माझे बापाचे निधनें वडिवार बोलसी । ते तूं घेवोनि आलासी उजागरपणें ॥१॥
उगलाची देईं लावूं नको दावा । केशवासी ठावा आहे तुझा जीवभाव ॥२॥
सरता पुरता आमुचेनि झालासी । तें तूं आणिका सांगसी कोण्या तोंडे ॥३॥
सांगतां बहुत होईल पैं व्याजें । मग सोई मज तुज लाविती कां ॥४॥
ते म्हणती ऋणबोडा हा ठायींचा । अहो यासी बोला वाचा बुद्धिवंती ॥५॥
तूं नामयाच्या विठया धीर आणि चतुर । तुजसी खेचर काय बोलिला ॥६॥


२८
उदमाचा करून झाडा । कर्म कदबा अवघा फाडा ॥१॥
मग येणें जाणें नाहीं । पुढें वेव्हार न लगे कांहीं ॥२॥
व्याज मुद्दल देऊन उजू । तिहीं लोकीं व्हावें रुजू ॥३॥
केशव म्हणे लिगाड तोडा । सुखसागर विठ्ठल जोडा ॥४॥


२९
निज आत्मज्ञान डोहीं । जे बुडोन गेले पाहीं ॥१॥
तनु त्याग होतां त्यांची । मग सगुणा भेटी कैंची ॥२॥
अहंभाव वांटून प्याले । ते जिवंतचि मुक्त झाले ॥३॥
केशव म्हणे डोळां । ते पहावे वेळोवेळां ॥४॥


३०
तुझे पाय माझिया गळ्यासी । करीन एक मग उगलाची देसी ॥१॥
आपुलें मागतां झणें धिक्कारिसी । चोरासी सांगसी निजगुज ॥२॥
सांपडलीया लाथ बुक्की साहावी । जीवीं धूर धरावी विठो ऐसी ॥३॥
मग होणार तें हो या शरीरा । सांपडलीया परा जीवें भावें ॥४॥
धुरेसी झगडा करावा सैरा । या रांडपोरां खवळसी काय ॥५॥
केशव म्हणे विठा झुंजार तूं भला । खेचरू दाखविला ठेवा तुझ्या बापाचा ॥६॥


३१
खेचरापासी जाय पुससी सागसी तें आहे । येरा आणिका काय उमगेना ॥१॥
जाय जाय वेगीं लवलाहे पाहें । खेचराचे पाय सोडूं नको ॥२॥
तो सांगेल तें उगलेंच घेई । आणिकाचे बाहीं पडूं नको ॥३॥
केशव म्हणे नामयाचा विठया भक्तराया । आलिंगुनी चहूं बाह्या दिधलें क्षेम ॥४॥


३२
तंव धांउनी गेला चरणीं लागला । देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा ॥१॥
जाऊन तो धरीन न सोडीं मी आतां । जे मज पंढरिनाथा ग्वाही दिधली ॥२॥
तंव खेचरु तेथें स्नानसंध्या करी । तंव ओढोनी पाय धरी विठा नामयाचा ॥३॥
तंव तो अवचिता खडबडोनी भ्याला । कोठोनी घाला पडिला धाडी मजवरी ॥४॥
उठी परता तूं कोणाचारे काय । ठाईं ठाईं राहें हालूं नको ॥५॥
तुझिया वडिलासी जाब देईन । धरोनी नेईन हें पोर कोणाचें ॥६॥
लाडिकें लडिवाळ आपुलें बा धांवे पायीं । तुज कोणी नाहीं मग तूं निलाजिरे ॥७॥
छंद ना बंद झोबतोसी धीटा । बांधेन चोहटा चौघाचारी ॥८॥
फजीत करतील तुज कीं मज जाण । खेचर विसोबा म्हणती जा तुज विठोबाची आण ॥९॥


३३
सुखाचा निज ठेवा तुमचा केशला । भाग्यें नामदेवा जोडलासी ॥१॥
तेणें तुझी सेवा केली मनोभावें । म्हणोनिया देणें घेतली धांव ॥२॥
उदंड हें निधन निक्षेपें ठेविलें । थोडें बहूत दिधलें भाग्यवंता ॥३॥
अभिलाषी वस्तु तुझें पायीं ठेविलीं । ते आम्हा उगवली म्हणे विठा ॥४॥


३४
माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक ॥१॥
साधुसंत जण सोईरे हे जाण । वंदीन वरण भावें त्यांचें ॥२॥
मिजाचे खोईरे कां गा नोळखसी । भ्रमें भुललासी मायाजाळीं ॥३॥
पाळिलों पोसिलों जन्मोनी जयाचा । उतराई त्याचा काई होऊं ॥४॥
पाहेपा परतौनी मूळिचा तूं कोण । सदुरुशी शरण रिणें वेगीं ॥५॥
सद्रुरू दयाळें लेवविलें अंजन । मज जनार्दन अवघा मासे ॥६॥
विठा म्हणे तारीं आपुल्या शरणागता । अनाथाच्या नाथा पांडुरंगा ॥७॥


विठाचे अभंग – उपदेश अभंग १ ते १९

१.
देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥
स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥
गाडे घोडे म्हौसी सेवक आणि दासी । सांडोनियां जासी एकलाची ॥३॥
मी कोणरे काय कसा आलों येथें । हित कीं अनहित करोनी जातों ॥४॥
हें तंव सूचेना नाठवे ज्याच्या मना । जुंपिलें तें घाणा चौर्‍यांसींच्या ॥५॥
विठा म्हणे तया कोण सोडविता । वेगीं पंढरिनाथा शरण जावें ॥६॥

२.
माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥
पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥
पाषाण बांधोनि नदीये निघाला । सांगा कोण गेला पैलतीरा ॥३॥
ब्राम्हणाचे परी मैंद वेष धरी  । घालावया करीं फांसे जैसे ॥४॥
विहा म्हणे संतन म्हणता त्यासीं । जाती नरकासी अध:पाता ॥५॥

३.
उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥
आपण बुडाले आणिकां बुडविती । हात धरुनी जाती यमलोका ॥३॥
दुरी पंथ जाणे तया यमपुरी । पापाची शिदोरी बांधोनियां ॥४॥
विठा म्हणे काय करूं त्याच्या कपाळा । पापाचा कंटाळा न धरिती ॥५॥

४.
मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे ॥१॥
तैंसा नव्हेरे संन्यास । धांवे विषयावरी हव्यास ॥२॥
वेश्या झाली पट्टराणी । स्मरीना पूर्वील करणी ॥३॥
सर्प प्रतिवर्षीं पालटे । परि अहंकार न पालटे ॥४॥
पहिलें पोशिलें मर्कटा । कोणें शिकविल्या चेष्टा ॥५॥
म्हणे नामयाचा विठ । विज्र लागो या ल्ल्लाटा ॥६॥

५.
कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥
कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं ।  तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥
ऋद्धि आणि सिद्धि विठोबाच्या दासी । तया ह्रषिकेशी शरण जावें ॥३॥
इंद्र आणि चंद्र विठोबाचे किंकर । देव सुरवर ध्याती ज्यातें ॥४॥
राव आणि रंक विठोबाचे मागते । ते कायरे तूंतें देती बापा ॥५॥
ऐसा कोण आहे सर्व पुरविता । एका भग वंता वांचोनियां ॥६॥
मुखीं नाम असें पुण्य ज्या पदरीं । कळींकाळावरी सत्ता त्याची ॥७॥
विठा म्हणे शरण जाय ह्रषिकेशी । मग निजसुखासी पावसील ॥८॥

६.
जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत ॥१॥
तेथें माझ्या मना नव्हे समाधान । न पाविजे खूण संतांवीण ॥२॥
संत तेचि जाणा शांत ज्याचें मन । अणूचें प्रमाण दुजें नाहीं ॥३॥
विठा म्हणे तेथें स्थिरावलें मन । झालें समाधाम त्याचेसंगें ॥४॥

७.
अनंत अपरंपार नाम हें सधर । नाम सुखसागर अमृत लहरी ॥१॥
नाम हेंचि तारूं नाम हेंचि तारक । भवमूळ छेदक नाम तुझें ॥२॥
नाम हेंचि जीवन नाम हें निधान । नाम हें कारण आनंदाचें ॥३॥
नाम हें सांठा तोचि वैकुंठींचा मोठा म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥

८.
नाम तारी पतितासी । ते कां अव्हेरी भक्तांसी ॥१॥
प्रेमळ देवा चें लडिवाळ । करी निजांगें प्रतिपाळ ॥१॥
सेवाऋणें वागवी भार । जन्मोजन्मींचा दातार ॥२॥
स्वामि स्वये अंगिकारी । वोळगा कांहो दारोदारीं ॥३॥
निष्ठुर नव्हे कोणेकाळीं । कृपाकटाक्षें कुरवाळी ॥४॥
दास विठा म्हणे वेगें । यात्ने जावें माझें संगें ॥५॥

९.
हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥
अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥
नामयाचा विठा संतचरणीं ठेवोनि माथा । कीर्तनेंबीण वृथा नको गोष्टी ॥३॥

१०.
धर्म अर्थ मोक्ष काम । हाकारितां रामराम ॥१॥
जें जें आवडे मनासी । त्यानें जावें पंडरीसी ॥२॥
चला आनंदें कौतुकें । पेठ भरली पुंडलिकें ॥३॥
न चले कोणाची थोरी । राया रंका एकी खरी ॥४॥
सांडोनियां आहे भाव । हाचि करावा व्यवसाव ॥५॥
विठा म्हणे विष्णुदास । आणिक न लगे सायास ॥६॥

११.
बरवें बरवें वाळचंद्र । काय इच्छिसी वैकुंठ ॥१॥
हें सुख तेथें नाहीं । मुक्ति घेउनी करिसी काई ॥२॥
म्हणे नामयाचा विठा । बापा नको जाऊं वैकुंठा ॥३॥

१२.
देखुनी पंढरीच्य सुखा । मोक्षपद आलें फुका ॥१॥
अवघें विठ्ठलचि झालें । येणें पुंडलिकें केलें ॥२॥
ऋद्धि सिद्धि पंढरपुरीं । होवोनी वोळती कामारी ॥३॥
मुक्ति वागती अंगणीं । घरोघरीं वाहे पाणी ॥४॥
तीर्थ चिंतवणी करिती । पुढें आमुची कोण गती ॥५॥
आला कळिकाळा त्रासू । विठा म्हणे विष्णुदासू ॥६॥

१३.
बहुतां पुंण्याचे कष्ट । त्यासी प्राप्त हें वैकुंठ ॥१॥
तैसी नोहे ही पंढरी । पतित पापियातें तारी ॥२॥
बहुता तपाचें प्रत्यक्ष । त्यासी अपकारी मोक्ष ॥३॥
जेणें केलीं तप तीर्थें । तोचि आवडे मुक्तीतें ॥४॥
देह यासी नानविधि । त्यासी प्राप्त होय सिद्धी ॥५॥
विठा म्हणे नामघोष । पळ काढील महा दोष ॥६॥

१४.
ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं ॥१॥
त्यासी जाची यमदूत । सकळ पूर्वजांसहित ॥२॥
जया नावडे हरिनाम । तया कुंभपाकीं धाम ॥३॥
जया नावडती संत । ते चालती यमपंथ ॥४॥
जया नावडे भीमरथी । तेचि अघोरीं पचती ॥५॥
या बोलाचा धरीं विश्वास । विठा म्हणे विष्णुदास ॥६॥

१५.
हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा ॥१॥
निश्चित होऊनि ऐकतां श्रवणीं । यमाची करणी न लगे कांहीं ॥२॥
आतां रामकृष्ण म्हणे कांरे वाचा । कळिकाळ मोचा बाहतील ॥३॥
विठा म्हणे संतीं अवधान द्यावें । ह्रदयीं धरावें केशवनाम ॥४॥

१६.
काय गाणीव काय जाणीव । काय शहाणीव कीर्तनाची ॥१॥
थाक तोडिलें डोळे मोडिले । लोकां मानवलें बरें गातो ॥२॥
हरिचें नाम तूं नेणसी । वांयां कीर्तनीं उभा ठाकसी ॥३॥
हरीचें नाम तुम्ही गारे प्रेमें । विठा म्हणे माझ्या बापाच्या नांवें ॥४॥

१७.
जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें ॥१॥
न करी घातमात न लावी वेळू । तेणें हा गोपाळू अंतरला ॥२॥
दुधावरील साय मधेसी गोडी । तैसी धरी आवडी रामनामीं ॥३॥
जतीचा साटा तो वैष्णव लाटा । म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥

१८.
यात्रे  बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी ॥१॥
विठोबा कृपेचा कोंवळा । बहु भक्तांचा कळवळा ॥२॥
भक्त आठवती चित्तीं । देवा वाटे परम खंती ॥३॥
देव अवज्ञा अनुचित । पृथक सत्ता आत्मघात ॥४॥
ऋण वारी भगवंत । दुबळा नव्हे लक्ष्मीकांत ॥५॥
दास विठा म्हणे त्वरा । यात्ना पंढरीची करा ॥६॥

१९.
द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र ॥१॥
माव याची अभिन्नव । वाव मानसीं उपाव ॥२॥
जंव लाधला तो आपण । केलें तृप्त त्रिभुवन ॥३॥
सेवा घेउनी सारी काम । अंगें चैतन्य निष्काम ॥४॥
याच्या छळें आकर्षिला । बळिचा द्वारपाळ झाला ॥५॥
भक्तियोगें द्वेषेंभयें । वेघ लाउनी सन्मुख होये ॥६॥
दोही बाही आपण देव । काय नेणा पंढरिराव ॥७॥
दास विठा म्हणे धंदा । कृपा देवाची सपादा ॥८॥


३५
कृष्ण गौळियाचे लोणी चोरी । तंव अवचिता शेंडी सांपडली हरी । घेवोनी आलिया बाहेरी । तंव यशोदे वोसंगा ॥१॥
चाकाटलिया गौळणी । देवो विसरल्या गार्‍हाणीं । लाजें मौन्य धरोनी । अवलोकिती गोविंदा ॥२॥
आम्हां अवघियापासीं असे । पैल यशोदा वोसंगा दिसे । हें स्वप्न कीं साच असे । म्हणती मानसें वेडावलीं ॥३॥
ऐशा अनेक परिच्या वेदश्रुती । वाचे वर्णावया न येती । विठा विनवी विष्णुदासाप्रती । ऐसा यशोदेचा कान्हया ॥४॥


३६
त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो । पुंडलिका कारणें तिष्ठत भीमातीरीं हो ॥१॥
उदो बोला उदो बोला विठाबाई माउलीचा हो ॥ध्रु०॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवना माझारी हो ॥२॥
चौक साधियला नामीं कळस ठेविला वरी हो ॥३॥
गोंधळ्या माझारी एक पुंडलिक नेटका हो । घातला गोंधळ विठाई दाविली तिहीं लोकां हो ॥४॥
गोंधळ घालीत गेली कैसी रावणाच्या घरा हो । शरणागत रक्षिलें वधियलें दशाशिरा हो ॥५॥
आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो । येती सनकादिक गरुड टेकेयांची दाटी हो ॥६॥
करुनी गूपाळकाला गोंधळ घाली वेणूनादीं हो । गोपिकांसहित सवे गोपाळांची मांदी हो ॥७॥
नामयाचा विठा कैसा गोंधळी नेटका हो । वडिलांची विठाई कुलस्वामिनी अंबिका हो ॥८॥

“संत नामदेव गाथा” विठाचे-अभंग एकूण ५३ अभंग समाप्त

संत नामदेव गाथा विठाचे-अभंग


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव अभंग । संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये ।
संत नामदेव फोटो । 

संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । संत नामदेव गाथा विठाचे-अभंग । 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *