तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरशिखर शिंगणापूर मंदिर

शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे. येथे, सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे.

स्थान


सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. फलटणपासून अग्नेयीस सुमारे ३७ किमी. एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.

शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रम


स. ६.०० : काकड आरती करून देवाला उठवले जाते.

दु.१२.०० : देवाची आरती 

रा.८.०० : सांज आरती करून मंदिर बंद केले जाते.

रा. ९.०० : शेजारती 

प्रत्येक आरती नंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नेवेद्य दाखवला जातो. 

देवाच्या झोपण्या साठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो. शयना साठी गादीवर व्याघ्रांबर घातले जाते. देवाच्या उशाला पाण्याचा तांबा, दोन पानाचे विडे ठेवले जाते.

देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम:

महाशिवरात्री: महाशिवरात्री हि शंकराच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो.

वारी : दर अमावास्येला शिखर शिंगणापूर ची वारी असते. अनेक भक्तगण अमावास्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात. आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात.

यात्रा: यात्रा म्हणजे देवाचे लग्न. हा वार्षिक उत्साव अतिशय नयन रम्य असा सोहळा असतो. त्याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी.

ऐतिहासिक महत्त्व

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.

शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्‍ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.

आध्यात्मिक महत्त्व

शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासुन ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पुर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्‍हाडी म्हणून येतात आणि शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे शिखर(कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर(कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभु महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा “हर हर हर महादेव” च्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.

मुंगी घाट सोहळा

  चैत्र शुद्ध द्वादशीस, मुंगी घाटातून कावड आणताना

चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

परिसर

पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेष लागते. हि वेष शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोधाराच्या वेळी बांधली असून तिला जिजाऊ वेष असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला शेंडगे दरवाजा म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. 

शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहचतो. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. डाव्या हाताला नगर खाना आहे आणि समोरच पंच नंदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरी वर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेली पार्वतीचे शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे, शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. 

शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याचे नाव पुष्कराज तलाव असून तो मालोजी राजे यांनी बांधला आहे. शिंगणापूर देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे. 

ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरावांना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात. गाड्शी जमातीतील लोक नगार खाण्याची व्यवस्था पाहतात. सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पवित्र पाद्स्पर्शाने पावन झालेले हे तीर्थ क्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणाला दिसतो. या अष्टकोनात शिवाजी महाराजांनी शंभू राजांचे शुद्धीकरण करून घेतले होते. महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे. लिंगावर अनेक लेप लाऊन आता ते गुळगुळीत झाले आहे. शिंगणापुरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते.

मंदिरा बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसविला आहे. नंदीचा मंडप शंभर कमळाच्या बनविला आहे.

अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोरटी सोमनाथ मंदिरातील गडगंज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा या देवळाच्या व देवाचा विध्वंस केला. यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथाचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर येथे स्थापले गेले अशी अख्यायिका आहे. आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात. 

लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारतांना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठो घंटा दिसते. हि घंटा पंच धातूची असून पोर्तुगीज चर्च मधून आणली असावी असा अंदाज आहे. या घंटा वर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिले आहे. 

मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव “विरू बाई” होते. प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्या बाहेर गणपतीची प्रतीष्टापणा केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट महणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहे. पुरातन शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. मंडपाच्या एका भिंतीवर कलींया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते.

मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उप प्रवेशद्वार आहेत. दक्षिणे कडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचं स्मृती स्थळ पाहायला मिळते. मंदिराच्या दक्षिण दिशेल सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडी वर दगडी बांधकाम आढळून येते. येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी हि स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत. पश्चिमे कडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून, मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट सोळाशे एकोण्याशी मध्ये संभाजी महाराजाची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.

मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप. सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत. संपूर्ण मंदिराच्या खांबांवर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरलेल्या आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शवली आहे. तसेच कुत्र्यांचा वापर शिकारी साठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे काही खांब हे फुल-वेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत. शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी शिळांमध्ये घडवलेले आहे. मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा. 

मंदिरात जाण्या साठी सुमारे दीडशे पायऱ्या चढाव्या लागतात परंतु आता रस्त्याचे काम केल्याने गाड्या सरळ देवळाजवळ जातात. हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून परिसराचे नाव “शिंगणापूर” हे यादव राजा”शृंगारपुर” यांच्या नावावरून देण्यात आले आहे. यादव कालीन हे मंदिर हेमाडपंती बांधकामाची साक्ष देते. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोधार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली. हे मंदिर इ. स. पू. बाराशे शतकातील असूनही आज भक्कम आहे. 

शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खुर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूर च्या डोंगरावर शिव पार्वतीचे लग्न विष्णू ने लावून दिले . शिव आणि हरी हे वेगळे नसून एकाच आहे आणि भक्तांनी भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिराच्या खांबा वर दिसते. त्यात एक हत्ती आणि नंदी आहे. हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णूचे वाहन आहे. 

शिखर शिंगणापूरच यात्रा

शिखर शिंगणापूर यात्रा


शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाहोते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. 

एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. 

शिखर शिंगणापूरची यात्रा
कावड सोहळा

शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी.

श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते. 

भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्तीत होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीलाशिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे. 

दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते.

सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.

कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.

आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात.

शिखर शिंगणापूर दर्शन

शिखर शिंगणापूर कावड सोहळा

You may also like...

1 Comment

  1. GUNDERAO D KULKARNI says:

    very very nice historyof sambhu mahdev

Leave a Reply

Your email address will not be published.