तीर्थक्षेत्र

भीमाशंकर

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे. गुप्त भीमाशंकर – भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा – भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम – कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी – आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

कथा-

प्राचीन कथेनुसार, कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली, काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. 


त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधीत झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातुन स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले.

 

मान्यता 
जो भक्त श्रद्धेने या मंदिरात दररोज सकाळी महादेवाचे दर्शन घेतो, त्याचे सात जन्माचे पाप नष्ट होतात तसेच त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात.

 

कसेजावे

 भीमाशंकराला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे. पुणेकरांनी स्वारगेटवरून एस.टी. अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे खांडस ते कर्जत सुमारे ३४ कि.मी. चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने येण्याची सोय होते. खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.

बस

गणेश घाट : खांडस गावातून दोनकि.मी. अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाटा अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एकगणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात. शिडी घाट : पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते. या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तीसऱ्या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडीमध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र होतात. येथे चहा-पाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यांपाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.

 

 

https://www.youtube.com/watch?v=MI_IzBLJjyg

 

https://www.youtube.com/watch?v=OMMeYTGDZq4

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.