तीर्थक्षेत्र

श्री तीर्थक्षेत्र देहू

देहू

देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.

देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. 
इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे

देहू जवळ, इंद्रायणी काठी गाथा मंदिर

तुकाराम बीज या दिवसाचे महत्त्व

तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो .

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्‍या, तसेच आपल्या अभंगातून सार्‍या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्‍या संत तुकारामांची महती थोडक्यात देत आहे.

संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील
एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे

श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.

संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असल्याने देहात असूनही
नसल्यासारखेच असणे आणि म्हणून त्यांच्यात पूर्णरूपी देवत्व असणे

संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प, म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते.

संत तुकाराम महाराज साक्षीभूत अवस्थेत असणे

त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते, हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या त्या स्तरावर लिखाण करून त्यांतील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात, तेच यातून लक्षात येते.

देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला
वृक्ष तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलणे

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.

प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते;
कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे

प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ईश्‍वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.

देहूला वैकुंठगमन केलेल्या
स्थानी असलेला वृक्ष तुकाराम बिजेच्या दिवशी
बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलण्यामागील अध्यात्मशास्त्र

अ. वैकुंठगमन केलेल्या स्थानी श्रीविष्णुतत्त्वाशी संबंधित
क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत असणे

देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी विष्णुतत्त्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते अन् वैकुंठातील विष्णु-ऊर्जा स्थळाला १२.०२ मिनिटांनी स्पर्श करते. त्याचवेळी विष्णुतत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलतांना दिसतात.

आ. भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या
श्रद्धेपायी श्रीविष्णूची क्रियाशक्तीनामक काळऊर्जा
तुकाराम बिजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी
वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या दिशेने येणे
आणि हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असणे

नांदुरकी वृक्ष हलणे, यामागे स्थळमहात्म्य असण्याबरोबरच काळमहात्म्यही आहे. येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी वैकुंठगमन केले. या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठलोकातून खाली आली, ती तेथेच, म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली; कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाजमंडळी एकत्रित जमली होती. श्रीविष्णूचा वैकुंठलोक हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे. आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवर्‍याच्या रूपात वास करत आहे. अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेपायी वैकुंठलोकातून ही काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या दिशेने येते. हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते.

इ. ज्या वेळी ही काळाच्या स्तरावरील ऊर्जा
भूमीतील स्थळविषयक ऊर्जेला बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी
स्पर्श करते, त्या वेळी नांदुरकी वृक्ष आपादमस्तक हलतो.
त्याचे हलणे आपल्याला पानांच्या हलण्याच्या रूपात दिसते.

ई. नांदुरकी वृक्ष हलतो, याची प्रत्यक्ष प्रचीती आम्हाला घेता येणे

याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला आहे. भारतातील संतपरंपरा आणि या परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्षे भक्तकल्याणासाठी देव देत असलेली ही अवतरण साक्ष किती महान आहे, याचीच आम्हाला या वेळी प्रत्यक्ष प्रचीती घेता आली. याचे आम्ही चित्रीकरणही केले आहे.

उ. नांदुरकी वृक्ष हलतो, त्या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होणे

या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते. जणुकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात, असे वाटते.

ऊ. वैकुंठलोकातून येणारी
काळऊर्जा भूमीवर अवतरीत झाल्याने नांदुरकी वृक्ष हलणे

तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक क्रियाशक्तीच्या भोवर्‍याला बरोबर तुकाराम बिजेदिवशी वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा ज्या वेळी स्पर्श करते, त्या वेळीच याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो

संत तुकाराम
 
मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म माघ शुद्ध ५, शके १५२८, [१ फेब्रुवारी १६०७ ]
देहू, महाराष्ट्र
निर्वाण फाल्गुन कृ.२ , शके १५७१, [१९ मार्च १६५०]
देहू, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर
शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषा मराठी
साहित्यरचना तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे देहू
व्यवसाय वाणी
वडील बोल्होबा अंबिले
आई कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी आवली
अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

संत तुकाराम महाराज


संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचाविठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु ‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

  • गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा “गीतगाथा” हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.
  • तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू लिपीत लिप्यंतर (लेखक – कर्णे गजेंद्र भारती महाराज)
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.