तीर्थक्षेत्र मैलार खंडोबा

तीर्थक्षेत्र मैलार खंडोबा

तीर्थक्षेत्र मैलार खंडोबा

मैलापुरचे आदीमैलार मंदिर

बेल्लारी जिल्ह्यातील मृणमैलारचे दर्शन घेतल्यानंतर उत्तर पूर्व दिशेला गंगावती-रायचूर -सिंदनुर मार्गे सुमारे 300किलोमीटर यादगिरीनजीक मैलापूरचा आदीमैलार मंदिर लागते. निसर्गाचा अदभूत चमत्कार व कारागिरांचे कसब हे येथे निदर्शनाला येते. मंदिर भग्न झालेल्या अजस्त्र शिळेमध्ये कोरलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर एका शिळेतील गुहेत हे मंदिर आहे. अवघा डोंगरच भग्न झालेल्या अजस्त्र शिळांचा आहे. मंदिरापासून 100फूट उंचीवर दोन अजस्त्र शिळा (दगडावर -दगड) असून त्यावर दगडी दिवटी आहे. भग्न शिळामधून वाट काढून जीवावर उदार होत. सुळका चढून जात दिवटीमध्ये तेल घालून पेटविणारे विशिष्ट समाजबांधव येथे आहेत. वंशपरंपरेने त्यांना तो मान आहे. मैलार हा कानडी भाषिकांचा कुलदेव असल्याने विवाह झाल्यानंतर वधू-वर येथे येत देवदर्शन घेतात. येथे पुरणपोळी, पुरणाची करंजी (दिंडे) यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पुरण वाटणासाठी मंदिर आवारात मोठमोठे पाटे-वरवंटे आहेत. दगडी शिळा कोरून येथे अनेक मंदिरे, खोल्या तयार करण्यात आल्याचे दिसते. वंशपरंपरागत गुरव पुजाऱ्यांची तीस ते चाळीस घरे येथे आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव होतो.

श्री क्षेत्र मैलार मंदिर

 

श्री क्षेत्र मैलार – मल्हारी -म्हाळसाकांत – सदर ठिकाणी दोन मंदिरे असून (१) खंडोबा म्हाळसाकांत (२) गंगी माळम्मा म्हाळसादेवी .
देऊळ जुने असून सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे. ते हेमाडपंथी बांधणीचे आहे. मुख्य उत्सव चंपाषष्टी. चंपाषष्ठीचे दिवशी एकवीस किलो हळद अधिक लिंबू पाणी यांचे मिश्रण करून देवास लेप देतात. त्या आधी देवास तेलाचा अभिषेक केला जातो. येथील मूळ मूर्ती शंकराची असून ती वारुळाच्या मातीपासून झालेली आहे. सदरची मूर्ती स्वयंभू आहे व ती ५’ उंच असून मूर्तीस ४ हात आहेत प्रत्येक हातात त्रिशूळ, भंडारा, डमरू व खड्‍ग आहे.

मुख्य देवालयाचे बाजूस २ द्वारपाल आहेत. मूर्तीचे मांडीखाली २ राक्षस असून पैकी १ मल्लासुर व दुसरा मणिकासुर. आश्विन शु. १ ते दसरा घटस्थापना व नंतर पालखी निघते. ती गावातून निघून शेजारील म्हाळसादेवी मंदिरात जाते. येथे ती दुसरे दिवशी सकाळी ७ पर्यंत असते. नंतर पंचपक्वान्नाचे जेवण होते. देवस्थानाचे २ पुजारी असून ते ६-६ महिन्यांनी बदलतात. देवस्थानाचा खर्च प्रतिवर्षी अंदाजे रु. ५ लक्ष हा भक्तांचा देणगीतून करतात. देवास नवस बोलल्यास तो पूर्ण होतो.

जेजुरी- द्वादश खंडोबा म्हणजेच 12 मल्हारलिंग तीर्थाटनातील चौथे मंदिर मृणमैलार-देवरगुड्डा आहे. कानडी भाषेत गुड्डा म्हणजे डोंगर व देवर म्हणजे देवाचा देवाचा डोंगर असे म्हटले जाते. हे तीर्थस्थान बेळगाव पासून बंगळुरू मार्गावर 200कि.मी.अंतरावर राणीबेंन्नूर तालुका जि. हवेरी मध्ये येते. राणीबेंन्नूर लोहमार्गापासून केवळ 10 कि.मी. अंतरावर व राज्यमार्गापासून डाव्या बाजूने कोंकाळ फाट्यापासून मंदिराकडे जाता येते. सपाटीपासून 200फूट उंच टेकडीवर हे स्थान आहे.वाहन टेकडीवर जाते. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य मंदिरात मैलार मूर्तींसह स्वयंभू शिवलिंग आहे.
यामंदिरात पुजेला स्रियांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाही. दगडी बांधणीचे मंदीर हेमाडपंथी आहे. मंदिराच्या कामावर मुस्लिम राजवटीची छाप दिसून येते ते अलीकडच्या म्हणजेच तीन-चारशे वर्षांपूर्वीचे काळातील असावे. भक्तांना निवासासाठी मंदिर आवारात सुसज्ज भक्तनिवास व्यवस्था आहे. ब्रम्हपुराणामध्ये मंदिराचा उल्लेख आढळतो. दंतकथा अशी आहे की, मणी व मल्ल दैत्याबरोबर देवाचे या ठिकाणी युद्ध झाले. यामध्ये जेथे छत व पाणी नाही, अशा ठिकाणी मल्ल (मालकेश) देवाने वध केला, म्हणून या ठिकाणी पाणी नाही. तुंगभद्रा नदीवरून पाण्याची सोय येथे केली आहे. वंशपरंपरागत येथे गुरव पुजारी आहेत. येथे 12 पौर्णिमा उत्सव, चंपाषष्ठी उत्सव साजरे होतात. माघ पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. येथील वाघ्ये नऊ दिवस उपवास करतात. अखेरच्या दिवशी त्यांच्याकडून पीक, पाणी, पाऊस, हवामानाच्या अंदाजाची पारंपरिक भाकणूक केली जाते.
या वाघ्यांना गोकयय, वगगया असेही म्हंटले जाते. घोंगडीचा रंगीबेरंगी पायघोळ अंगरखा, गळ्यात भंडारचिलू, हाती डमरू, त्रिशूल, कोटबा, सोटा, घंटी असा वेष असलेले वाघ्ये मोठ्या प्रमाणात मंदिर आवारात दिसून येतात. गुरव पुजारी वर्गाकडून मंदिरातील पूजा-अभिषेक आदीविधी होतात तर व्यवस्थापन पाहण्यासाठी देवसंस्थान ट्रस्ट आहे. वैशाख पौर्णिमा ते ज्येष्ठ पौर्णिमा देवाची पालखी निघते. देवांच्या नैवेद्य व पूजा विधींसाठी अनेक भाविक भक्त असलेल्या घराण्यांनी इनाम-वतीने जमिनी दिल्याचे उल्लेख दप्तरामध्ये आढळून येत असल्याची माहीती येथील सुभाष पुजारी यांनी दिली. येथे बहुतांश विधी -व्यवहार कानडी भाषेतून होतात.
मृणमैलार (बेल्लारी)देवरगुड्डा –
मृणमैलार (बेल्लारी)देवरगुड्डा पासून उत्तर दिशेला 20की. मी. अंतरावर बेल्लारी जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या किनारी मृणमैलार भव्य दगडी बांधणीचे मंदिर आहे. येथे काळ्या पाषाणात कोरलेली मृणमैलार (भैरवाची) मूर्ती आहे. तर पूजा-अभिषेक विधींसाठी स्वयंभू शिवलिंग आहे. म्हाळसादेवींची मूर्ती स्वतंत्र्य मंदिरात आहे. येथे मल्लदैत्याचा वध देवांनी केल्याचे सांगितले जाते. मंदिरात ब्राम्हण, लिंगायत, गुरव, गोरप्प यांची पूजा होते. देवरगुड्डा प्रमाणेच येथे वागगय (वाघ्ये) मोठ्या संख्येने आढळतात. अंगात घोंगडीचा रंगीबेरंगी अंगरखा पायी घुंगरू, हाती डमरू असलेले वाघ्ये फेर धरून सामूहिक नुत्य करीत देवांची कानडी भाषेत गीते गात भक्ती करतात. ऐलकोट, ऐलकोट, सांगबोलो, असा जयघोष करीत मूर्तीच्या पायावर भंडारा वाहून दर्शन घेतले जाते. भांडाऱ्याचा रंग येथे शेंदरी व केशरी पहावयास मिळतो.

मार्ग

  • बेल्लारी ते होस्पेट – मैलार
  • हवेरीचे वरून डाव्या बाजूस वळून हरिहरचे अलिकडे १७ कि.मी. अंतरावर मैलार
  • राणीबेन्नर रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून बसने मैलारला जाणे. अंतर ३६ कि.मी.
  • गुंटला ते मैलार – देवरगुड्डा १७ कि.मी. रस्त्याने

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

तीर्थक्षेत्र मैलार खंडोबा तीर्थक्षेत्र मैलार खंडोबा 

Leave a Comment

Your email address will not be published.