श्री तीर्थक्षेत्र भगवानगड
(जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिक, पुणे) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत.भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.
भगवान गड :
भगवान गड हे महाराष्ट्र राज्यातील बीड–अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमहा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वंजारी संत भगवानबाबा यांनी बांधला आहे.
इतिहास :
या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्यऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण ‘धौम्यगड’ किंवा ‘धुम्यागड’ म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्यऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
धौम्यगडाचा जीर्णोद्धार :
यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वत: वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वत:च्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत
मंदिराची रचना :
श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्यऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामीयांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे.व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
श्री तीर्थक्षेत्र भगवानगड श्री तीर्थक्षेत्र भगवानगड
Glorious.