संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग

संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग

संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग गाथा एकूण ३४

संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – १.

आगमी न साधे ते । नाम साधे जाणा ।
नित्य रामकृष्ण । जपिजे सुखे ।
जपता नाम वाचे । वैकुंठ जळी ।
पापा होय होळी । रामनामे ।
येक तत्त्व हरि । रामनाम सार ।
आणिक उच्चार । करूं नकों ।
सोपान सांगत । रामनामें जपा ।
अंतरल्या व्यथा । मरणजन्मा


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – २.

चिदानंद रूप । पहावया डोळुलें ।
पुण्य असावें जवळे । येहिमेळी ॥१॥
नाममार्ग सोपा । रामनाम उच्चार ।
तरेल संसार । येका नमें ॥२॥
गणिका उतरलें । विमान पैं आलें ।
राम म्हणता नुरले । विष्णुलोकां ॥३॥
सनकादिक । सर्वनित्यरंगलहरी ।
वैकुंठाभीतरी । वासल्या ॥४॥
प्रल्हाद परीक्षीती । बळि चक्रवर्ती ।
तयासी श्रीपती । रक्षक सदां ॥५॥
सोपान म्हणे नाम । शांति दया क्षमा ।
करूणा कारूण्य हा नेमा ।
नित्य तया जवळ ॥६॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ३.

सर्वाभूती भाव जै होय स्वयमेव ।
तरीच देवाधी देव कृपा कर ॥१॥
नांवेचि भाळला कृपेने वोळला ।
तो अखंड जवळा संतसंगीं ॥२॥
जगाचा जनक जनार्दन येक ।
ऐसे वेदादिक बोलताती ॥३॥
नमने घेण्याचे ते पशुपक्षी साचे ।
असे वेदशास्त्राचे वचन एका ॥४॥
जन्मोनि उदरी नमि जे जो श्रीहरी ।
जन्माधी व्रतघोरी पंचशी देखा ॥५॥
सोपान सलगी श्री विठ्ठल वेगीं ।
नाचतसे रंगी पंढरी ये ॥६॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ४.

संतचरण धुळी । लागो कानीडोळी ।
तेणे भूमंडळी । होईन सरता ॥१॥
सार्‍यांचे जे सार । रात्रंदिन घर ।
विठ्ठल उच्चारी । करीन मी ॥२॥
सदा भक्तीचिया काजा । मन हे वारीन ।
अखंड उद्धरीन । जैसी देखा ॥३॥
जीवशिव दोन्ही । येकामेळें नांदेन ।
मग वैकुंठी होईन । चतुर्भुज ॥४॥
या सुखाचा सार । न पातिते मूर्ख ।
म्हणऊनि जन्म दुःख । भोगिताती ॥५॥
सोपान म्हणे हा । मार्ग सोपा देखा ।
आम्ही जन्म मरणा दुःखा । अंतरलो ॥६॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ५.

हरिध्यानचित्ती । मनोमन तुम्ही ।
येकानामे विश्रांती । होय आम्हा ॥१॥
रामकृष्ण कथा । उच्चारण वाचे ।
तुटतिल प्रेमाचे । यमपाश ॥२॥
सोपे हे साधक । श्रीराम उच्चार ।
हरिकृपे साचार । मोक्ष लाभे ॥३॥
सोपान सर्वस्वी । नामापाठी लगे ।
प्रपंच वाउगे । गेले जाण ॥४॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ६.

हरि प्रेमभावे । उच्चारी तो नित्य ।
आपले पै सत्य । येकाभावे ॥१॥
नामपाठ केले । ते हरिच जाले ।
ऐसे गीता बोले । अर्जुनासी ॥२॥
न म्हणता राम । नाही उद्धरण ।
कैसेनी पावन । प्राणी होय ॥३॥
सोपान जपत । नामाचा महिमा ।
सर्वत्र पौर्णिमा । आम्हां घरी ॥४॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ७.

चला रे गोपाल हो जाऊ पंढरीशी ।
वाळवंटी काला केला ब्रह्मराशी ॥१॥
मन मिळाले गोपाळ घालीताती हुंबरी ।
आनंद वांकुल्या दावित चालले पंढरी ॥२॥
वेणुनादकाला केला आसमास ।
विमानी बैसोनिया जाताति वैकुंठास ॥३॥
नित्यदेही जालें पिंडदान देता ।
चतुर्भुज होऊनि गेले क्षण न भरतां ॥४॥
दहिभातेंमुद्रा झेलीती गोपाळ ।
मुख पसरूनिया धावे विठ्ठल तो कृपाळ ॥५॥
पुडरीके पोहे घातली वैकुंठमागें ।
पंढरीप्रति येणे केले पांडुरंगे ॥६॥
वैष्णवांचा मेळा ब्रम्हही भुललें ।
प्रेमामृत खुणें साजनि दोहीले ॥७॥
निवाले हरिदास जाले सुख शोधू ।
सोपान म्हणे आत्मा विठ्ठल नामी जाला बोधू ॥८॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ८.

पंढरीचा आनंद । पाहता एथ भेदानि ।
परी अधिकता न येणे । देखो देखा ॥१॥
दिनरात्री कीर्तन । नामे गर्जताती संत ।
आणि जे भागवत । पूर्णराशी ॥२॥
तीही लोकी पदि कर । इच्छिताती अमर ।
नामे चंद्रशंकर । निवताहे ॥३॥
सडे रंग माळा । नौक ते गोमटे ।
जेणे भवकंद तुटे । कीर्तन करीता ॥४॥
विठ्ठल नामे धणी । घेतली पूर्णपणे ।
प्रत्यक्ष दर्शने । नामदेवा ॥५॥
सोपान म्हणे आम्ही । तुजशी शरण ।
चूकले जन्मरण । भवव्यथें ॥६॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – ९.

काळे ना सांवळे । धवळे ना पिवळे ।
नाद बिंदा वेगळे । ते कवण रे चांगया ॥१॥
गोडा परीस गोह । गगना परीस वाड ।
चौदा भुवन ज्याचि चाड । ते कवण चांगयां ॥२॥
ज्ञानदेवा मानले । माझें मज पुढे दाविलें ।
दोहींचे येक केले । भले जाले चांगयां ॥३॥
काळिकां उन्मनी । गोल्हाट कळली ।
सत्रावी जळली । आम्हा नाहाणी ॥४॥
हेची खुण घेई । सोपाना जवळी ।
मनाचि काजळी । उरून देई ॥५॥
निवृत्ती तो ज्ञान । सोपानासि सांग ।
आणिकांचा पांग । नाही त्यासी ॥६॥


संत सोपानदेव अप्रसिद्ध अभंग – १०.

तिहीचे त्रिगुण । रज तम निश्चित ।
त्यामाजी त्वरीत । जन्म माझा ॥१॥
पूर्ण पुण्य चोख । आचरलो आम्ही ।
तरीच या जन्मी । भक्ति आम्हा ॥२॥
शांती दया क्षमा । निवृत्ती माऊली ।
अखंड सावली । कासवदृष्टी ॥३॥
सोपान – म्हणे ते । जगा जीवन मोल ।
भिवरा विठ्ठल । दैवते आम्हा ॥४॥


११.

निर्वृत्ति सोपान । परिसा भागवत ।
पंढरी निवांत । विठ्ठल गाती ॥१॥
धन्य तोचि नामा । ज्ञानदेव पाही ।
सनकादिक बाही । उभे देखा ॥२॥
पुंडलीक भक्त । देव मुनी सर्व ।
शुद्धचरणी भाव । अर्पिताती ॥३॥
सोपान डिंगर । आनंदे नाचत ।
प्रेमे वोवाळित । हरिच्या दासा ॥४॥


१२.

रूप हे सावळे । भोगिताती डोळे ।
उद्धवासी सोहळे । अक्रराशि ॥१॥
पदरज वंदी । ध्यान ते गोविंदी ।
उद्धव मुकुंदी । तल्लीनता ॥२॥
विदुर सुखाचा । नाम जपे वाचा ।
श्रीकृष्ण तयाचा । अंगिकारी ॥३॥
निवृत्तिचे ध्यान । ज्ञानदेवखुण ।
सोपान आपण । नामपाठ ॥४॥


१३.

कर्माचे पेटारे । किती वहावे शिरी ।
लटिके गा मुरारी । न जाय ओझे ॥१॥
घे कर्म शिदोरी । तुझचि वाहीन ।
नित्यता सेविन । चरण तुझे ॥२॥
न होता परिपूर्ण । बाधासे बाध एक तो मुकुंद ।
आम्हा पुरे ॥३॥
सोपान म्हणे कर्म । ब्रह्म हा एक ।
वेदाचा विवेक । ब्रह्म हा एक ॥४॥


१४.

कृष्ण ब्रह्म काळे । पुराणी गर्जिती ।
व्यासेचि निश्चिती । अर्थ केला ॥१॥
लक्षात न येता । देव ब्रह्म रूप ।
पडिले अमुप । भवचक्री ॥२॥
सत्य रज तम । त्रिगुण विस्तारले ।
महाकारण वहिले । पाहे बापा ॥३॥
सोपानदेव बोले । चैतन्याचि वाणी ।
व्यर्थ धरोनि मौती । हिंडताती ॥४॥


१५.

गुळावरी जैशी । बैसलिशे माशी ।
उठवितां तयेसि । न उठेचि ॥१॥
तैसी गुरूभक्ती । असावी वासना ।
ग्रासुनि कामना । राहो नीट ॥२॥
आम्ही नेणों काही । गुरवीण तत्वता ।
म्हणतसे सर्वथा । सोपानदेव ॥३॥


१६.

घोंगडीयासाठी । पंढरीये पेठीं ।
वैष्णवाची दाटी । होती तेथें ॥१॥
घोंगड्यांचे मोल । पैं खरें होई ।
रामटका देई । एक पुरे ॥२॥
घोंगडी घोंगडिया । पाड दाविताती ।
एक एक दाविती । एकपुढे ॥३॥
सोपान घोंगडी । पाहे घडी केली ।
चरणी राहिली । निवृत्तीच्या ॥४॥


१७.

माझी अपूर्णता । गुरुनामी संपन्न ।
निवृत्ती निधान । पूर्णकरी ॥१॥
अमृताचा पाट । वाहे इंद्रायणी ।
नित्यता पर्वणी । हरीच्या दासा ॥२॥
ज्ञानदेवनिधी । पूर्ण माझे मन ।
मुक्ताईने खूण । सांगितली ॥३॥
सोपान बागडा सेवे सवंगडा ।
नित्य तो पवाडा । विठोबाचा ॥४॥


१८.
जनार्दन पाठे । जाइजे वैकुंठे ।
हरिनाम गोमटे । मुखी घेई ॥१॥
वायाच भ्रमसी । कारे गुणराशी ।
वेगी केशवासी । भजते जायें ॥२॥
शरीर पोसिशी । काबाड उपसिशी ।
हे नये कामाशी । अंती तुझ्या ॥३॥
सोपान सांगत । ऐके तू दृष्टांत ।
हरीच मुखोद्गत । गायवेगीं ॥४॥


१९.

मन जालें उन्मन । चित्त जालें अचित्त ।
बुद्धि तेही होत । अबुद्धिरूप ॥१॥
इंद्रिये समस्त । जालि येकाकार ।
ब्रह्मी तदाकार । होऊनि ठेली ॥२॥
रूप झाले अरूप । आभास भासत ।
केले पै समस्त । निराकारी ॥३॥
सोपान परब्रह्मी । लीन होऊनि ठेला ।
जितांचि गेला । गुरुकृपे ॥४॥


२०.
शुभ्रवर्ण संगे । पीत होय रक्त ।
जग तैसे घडत । ब्रह्माहुनि ॥१॥
कृष्णाचे नियोगे । पीत होय हरित ।
जग लया जात । तया परी ॥२॥
मध्यापाशी सर्व । जनहि फिरत ।
यापरी असत । विश्व जाणा ॥३॥
सहजी ब्रह्मरूपी । सोपान लगत ।
सिंधुसी मिळत । लवण जेवी ॥४॥


२१.

तुझे निजसुख । तुजपासि आहे ।
विचारूनी पाहे । गुरुमुखे ॥१॥
विवेक वैराग्य । शोधूनिया पाहे ।
तेणे तुज होय । ब्रम्ह प्राप्ती ॥२॥
त्रिपुटी भेदुनी । जपावे स्मरणें ।
हरि नारायण । सर्वकाळ ॥३॥
सोपान धारणा । हरिकथा सार ।
नेणों आन । मोहर प्रपंच्याचीं ॥४॥


२२.

अखंड स्मरण । रामनाम चित्तीं ।
तो येक जगती । तरला देखा ॥१॥
हरिनाम सार । वाचेसी उच्चार ।
पावले पैं पार । हरि कथेनें ॥२॥
त्रिपुटी भेदुनी । जपावे स्मरणें ।
हरि नारायण । सर्वकाळ ॥३॥
सोपान धारणा । हरिकथा सार ।
नेणों आन । मोहर प्रपंच्याचीं ॥४॥


२३.
आधीचे हे देहक्षणा ।
नासोनी जाईल । रे मना ॥१॥
ठाईच सावध होई ।
विठ्ठला शरण जाई । रे मना ॥२॥
हे हित नोहे अनहित ।
राम चिंतनी रत होई । रे मना ॥३॥
म्हणे होशील दुश्चित ।
तरी काळ नेईल अवचित । रे मना ॥४॥
देह आहे तो लाहो घेई वाहिले ।
सोपान म्हणे निवृत्तिस आले । रे मना ॥५॥


२४.

नामामृत राशी । सेविका सुखेंसी ।
पुढती तूं न येसी । गर्भवासा ॥१॥
रामकृष्ण गोविंद । हरिकृष्ण गोविंद ।
नित्य तो पैं छंद । ऐसा घेई ॥२॥
स्मरता नामावळी । पावशील गोपाळी ।
वैष्णवाचे मेळीं । अरे जना ॥३॥
सोपान राजसु । केशव विश्वासु ।
नामाचा सौरसु । मुखी धरा ॥४॥


२५.

नैश्वर्य देह । साधना साधनी ।
एक तत्त्व धरूनी । तत्त्वबोध ॥१॥
सांडी मांडी तत्त्वी । करी रे सर्वथा ।
एक तत्त्व चित्ता । हरी फावे ॥२॥
देहाचेनि माये । एकवृत्ती फावे ।
समरसे जीवशिव । ऐक्य झालें ॥३॥
सोपान निमला । अंबरी अंबर ।
ब्रह्म तदाकार । ऐक्या जाला ॥४॥


२६.

जवळील सुख । सांडुनिया दुरी ।
हिंडे घरोघरी । तरणोपाय ॥१॥
हरिहर म्हणे । नाम जपें भलते ।
तयासि केउते । उद्धरीजे ॥२॥
कैचे न भजता । हरिनाम उद्धरण ।
मनाचेंही मौन पडे जेथें ॥३॥
सोपान अलगत । हरिनाम उच्चार ।
तारील संसार । येक्या नामें ॥४॥


२७.

येक तत्त्व धरा । श्रीराम माहेरा ।
आपो आप संसारा । तरसी जना ॥१॥
राम नाम मात्रें । हें सर्वही सोपे ।
लोपतील पापें । अनंत कोटी ॥२॥
स्मरतां श्रीराम । वैकुंठ जवळीं ।
महादोष होळी । नाम पाठे ॥३॥
सोपान सांगती । रामनाममंत्र ।
उभयता शस्त्र । रामकृष्ण ॥४॥


२८.

सोडी मांडीशी कां । करीशी हव्यास ।
हरिनामी विश्वास । दृढ ठेवीं ॥१॥
रामनाम वाचे । उच्चारीं रे हेळा ।
तरशील गोवळा । भाक माझी ॥२॥
अंती तो तुज । होईल सोडविता ।
राम हा सर्वथा । तारील सत्य ॥३॥
सोपानदेव म्हणे । सफळ हें पूर्ण ।
राम हें जीवन । अमृत घेई ॥४॥


२९.

जीवशील भाव । आपणचि देव ।
केला अनुभव । गुरुमुखें ॥१॥
मी तूं पणा मन । ठेविवेले पूर्णी ।
वासना हे जनी । ब्रह्म जाली ॥२॥
सोपान हा ब्रम्ह । वर्ततसे सम ।
प्रपंचाचे काम । नाही येथे ॥३॥


३०.

श्री राम कर्ता सोपान कवन रामनाम चित्ती ।
अखंड धरावे तरीच तरावे इथे देही ॥१॥
हरिहर जप करीता रे जना ।
न पावसी पतना यमाचिया ॥२॥
आगमी निर्धार सुगमी पैं नाम ।
सर्वत्र पैं नेम करणे ऐसा ॥३॥
सोपानाचा मार्ग रामनाम आचार ।
सर्वत्र निर्धार पैं नाम आस ॥४॥


३१.
काहीं रूपरेखा । मुळी स्थान छान ।
ब्रह्म निरंजन । निराकार ॥१॥
मृगजळ भानू । पासाव जन्मले ।
जग ते कल्पिले । याची परी ॥२॥
सहज सोपान । भेदूनिया कळा ।
राहिला निराळा । दृश्याहूनी ॥३॥


३२.

अर्ध मात्रा ब्रह्म । संयोगाचि येक ।
उन्मनी निःशेष । सर्वा ठाई ॥१॥
पहाता नीजरुप । ब्रह्म सर्व दीसे ।
ज्ञानाचेही पीसे । ऐलीकडे ॥२॥
सोपानदेवाचा । बोल वोळखीजे ।
निरंजन सहजे । चहुकडे ॥३॥


३३.

संसारी आलीया । कारे नोळखशी ।
नरहरी न म्हणशी । ऐक्याभावें ॥१॥
जपनाम विद्या । जपनाम विद्या ।
संसारी अविद्या । जन्मवृथा ॥२॥
वर्मबीज सांगावे । कवणें हे सांगावे ।
सोपानदेवें पैं । जोडियेलें धन ।
नित्य हे स्मरण । रामनाम ॥४॥


३४.

लज्या नाही तुंम्हा । पुरातसा नाम ।
दौश विनघाव । पडला आसें ॥१॥
वेदशास्त्रे पुराणे । सांगताहे ज्ञान ।
कैसे नाव अजून । ठावे नाही ॥२॥
सैधवाचा खडा । सिंधु माजीही विरे ।
तेथे कैचे उरे । नामरूप ॥३॥
अवघाचि ॐकार । दृश्य पदार्थ भाव ।
म्हणति सोपानदेव । नाम माझे ॥४॥


हे पण वाचा: संत बहिणाबाईंची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *