संत भानुदास

संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य

संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य गाथा – एकूण १४ अभंग

अनादि परब्रह्मा जें कां निजधाम ।
तें ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥
जें दुर्लभ तिहिं लोकां न कळे ब्रह्मादिकां ।
तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥
जयातें पहातं श्रुती परतल्या नेति नेति ।
ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ॥३॥
वेदं मौन्य पड़े श्रुतीसी सांकड़े ।
वर्णितां कुवाड़ें पुरणांसी ॥४॥
ज्ञानियांचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान ।
ते परब्रह्मा निधान विटेवरी ॥५॥
पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा ।
भानुदास देवा सेवा मागे ॥६॥


अद्वय आनंद तो हा परमानंद ।
शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥
सांवळें रूपडें गुणा आगोचर ।
उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥
पीतांबर परिधान चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥
भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर ।
नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥


१०

वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें ।
तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥
वाळंवंटीं बुंथीं श्रीविठठ्लनामें ।
सनकादिक प्रेमें गाती जया ॥२॥
भानुदास म्हणे तो हरि देखिला ।
हृदयीं सांठविला आनंदभरित ॥३॥


११

चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी ।
विठ्ठल राज्य करी पंढरीये ॥१॥
ऋद्धिसिद्धि धृति वोळंगती परिवार ।
न साहती अवसर बह्मादिकां ॥२॥
सांडोनि तितुलें यथाबीजें केलें ।
कवणें चाळविलें कानडीयासी ॥३॥
उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन ।
भीवरा चंदन पाट वाहे ॥४॥
रंभा तिलोत्तमा ऊर्वशी मेनिका ।
कामारी आणिका येती सर्वे ॥५॥
कनकाचे परयेंळीं रत्नाचे दीपक ।
सुंदर श्रीमुख ओवाळिती ॥६॥
संत भागवत सकळ पारुषले ।
निःशब्द होऊनि ठेले तुजविण ॥७॥
रुक्माबाई ती जाहलीसे उदार ।
पुंडलीअका कैसे पंडिले मौन ॥८॥
येसी तरी येई पंढरीच्या राया ।
अगा कृपावर्या पांडुरंगा ॥९॥
धन्य पंढरपूर विश्रांती माहेर ।
धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥
भानुदास म्हणे चला आम्हांसवें ।
वाचा ऋन देव आठवावें ॥११॥


१२

जैसा उपनिषदंचा गाभा । तैसा विटेवरी उभा ।
अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥
उगवती या सुरज्या । नवरत्‍नें बांधू पूजा ।
मुगुटीं भाव पैं दुजा । उपमा नाहीं ॥२॥
दोन्हीं कर कटीं । पीतांबर माळ गांठी ।
माळ वैजयंती कंठीं । कौस्तुंभ झळके ॥३॥
कल्पदुम छत्राकार । तळीं त्रिभंगीं बिढार ।
मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥
वेणुचेनि गोडपणें । पवन पांगुळला तेणें ।
तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥
अहो लेणियाचे लेणें । नादसुखासी पैं उणें ।
विश्व बोधिले येणें । गोपाळवेषें ॥६॥
पुंडलिकाचेनि भावें । श्रीविठ्ठला येणें नावें ।
भानुदास म्हणे दैवें । जोडले आम्हां ॥७॥


१३

शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु ।
चरणीं ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥१॥
बरवा बरवा केशिराजु । गरुडवहन चतुर्भूजु ।
कंठी कौस्तुभ झळके बिजु । मेघःशाम देखोनी ॥२॥
करी सृष्टिची रचना । नाभी जन्म चतुरानाना ।
जग हें वाखाणी मदना । तें लेंकरुं तयाचें ॥३॥
कमळा विलासली पायीं । आर्तं तुळशीचे ठायीं ।
ब्रह्मादिकां अवसरु नाहीं । तो यशोदे वोसंगा ॥४॥
उपमा द्यावी कवणे अंगा । चरणीं जन्मली पै गंगा ।
सोळा सहस्त्र संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥
आधिष्ठान गोदातीरीं । श्रुद्धिसिद्धि तिष्ठती द्वारीं ।
भानुदास पूजा करी । वाक् पुष्पें अनुपम्य ॥६॥


१४

लावण्य रुपड़े पहा डोळेभरी ।
मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा आई ।
गरुड हनुमंत ठायीं उभे असती ॥२॥
चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी ।
दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥
वेणुनादीं काला गोपाळ करिती ।
भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥


१५

देखितांचि रूप विटेवरी गोजिरें ।
पाहतां साजिरें चरणकमळ ॥१॥
पाहतां पाहतां दृष्टीं धाये जेणें ।
वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥२॥
भानुदास म्हणे लावण्य पुतळा ।
देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥


१६

चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े ।
पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडलें ।
भुषण मिरवलें मकराकार ॥२॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा ।
कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें ।
भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥


१७

गोंड साजिरें रूपस । उभा आहे हृषिकेश ।
योगी ध्याती जयास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥
रूप मंडीत सगुण । शंख चक्र पद्म जाण ।
गळा वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥
कस्तुरी चंदनाचा टिळा । मस्तकीं मुकुट रेखिला ।
घवघवीत वनसावळा । नंदरायाचा नंदनु ॥३॥
हरूषे भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे ।
प्रेम विठोबाचें । अंगीं वसे सर्वदा ॥४॥


१८

उन्मनीं समाधीं नाठवे मनासी ।
पहातां विठोबासी सुख बहु ॥१॥
आनंदाआनंद अवघा परमानंद ।
आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे ।
पाहतां साठवे रूप मनीं ॥३॥
नित्यता दिवाळी नित्यता दसरा ।
पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥
भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान ।
विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥


१९

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें ।
म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास ।
माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥
आणिका दैवता नेघे माझें चित्त ।
गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझें ॥४॥
भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे ।
सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥


२०

आलों दृढ धरुनी जीवीं ।
तो गोसावी भेटला ॥१॥
जन्ममरण हरला पांग ।
तुटला लाग प्रपंच ॥२॥
इच्छा केली ती पावलों ।
धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥
भानुदास म्हणे देवा ।
घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ॥४॥


२१

वेदशास्त्राचें सार ।
तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥
पुढें शोभे चंद्रभागा ।
स्नाने उद्धार या जगा ॥२॥
पद्मतळें गोपाळपुर ।
भक्त आणि हरिहर ॥३॥
भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥

संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य समाप्त


हे पण वाचा: संत भानुदास यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *