संत एकनाथ अभंग

संत एकनाथ अभंग ३३४४ते३४८७

संत एकनाथ अभंग ३३४४ते३४८७ – संत एकनाथ गाथा

दशावतार

३३४४
वेद नेतां शंखासुरी । मत्स्य अवतार होय हरी ॥१॥
मारुनियां शंखासुरा । ब्रम्हया तोषविलें निर्धारा ॥२॥
रसातळा जातां अवनी । तळीं कांसव चक्रपाणी ॥३॥
काढोनियां चौदा रत्ने । गौरविला सुरभूषण ॥४॥
हिरण्याक्षें नेतां धरा । आपण सूकर पै जाहला ॥५॥
मारुनि दैत्यासी । सुखी केलें देवांसी ॥६॥
प्रल्हादाकारणें । स्तंभामाजीं गुरगुरणें ॥७॥
धरुनियां जानूवरी । वधिला हिरण्यकश्यपू निर्धारीं ॥८॥
इंद्राच्या कैवारें धांवून । रुप धरिलें वामन ॥९॥
बळी पाताळीं घातिला । आपण द्वारपाळ जाहला ॥१०॥
सहस्त्रार्जुनें पीडिलें । आपण परशराम जाहले ॥११॥
पितृआज्ञा मानुनी खरी । माता वधिली निर्धारीं ॥१२॥
सीतेचें करुनी मीस । केला राक्षसांचा नाश ॥१३॥
चौदा वर्षें वनांतरीं । वनवास सेवी हरी ॥१४॥
वसुदेवदेवकीसाष्ठीं । अवतार धरिलां पोटीं ॥१५॥
मारुनियां कंसासुर । उतरिला मेदिनीचा भार ॥१६॥
येऊनियां पंढरपुरा । धरिला विटेवरी थारा ॥१७॥
पुंडलिकासाठीं उभा । एका जनार्दनीं शोभा ॥१८॥
३३४५.
वेदान उद्धरते । मीनरुपेण जगन्निवहते । कच्छरुपेण भूगोल ते । पृथ्वी चक्रमुद्विभ्रामंते ॥१॥
ऊर्ध्व धारयंते । हिरण्याक्ष दैत्य शोधियंते । दंतावरी पृथ्वी धारयंते । वराहरुपेण दैत्य मारियंते ॥२॥
दैत्य प्रल्हाद छळयंते । स्तंभी प्रगट रुपंते । हिरण्यकशिपु विदारयंते । नृसिंहरुपेण ते ॥३॥
बळी दैत्य छळयंते । क्षत्र निक्षत्र कुर्वंते । त्रिपाद पृथ्वी दान मागंते । वामनरुपेण दारंते ॥४॥
क्षत्रिय कुल नाशो कुर्वंते । जमदग्नीरेणुका उद्वरंते । सहस्त्र अर्जुन दैत्य मारियंते ।
नि:क्षत्रिय पॄथ्वी कुर्वंते । परशुरामरुपेण ॥५॥
पौलस्ती रावण जयंते सीता रत्न चोरियंते । रामरुपेण लंका हालयंते । रावण सहकुल वधियंते ॥६॥
द्वापारीं कलह कलहयंते । शिशुपाल वक्रदंत कंस ते । विध्वंसी रामभद्र रुपंते । करुणादया वृंद माते ॥७॥
म्लेंच्छ नित्यज्यान्मूर्छयंते विश्व बोधरुपेण ते । नाशयंते कलिरुपेणते । एका जनार्दनीं तया कृपें वर्णिते ॥८॥
३३४६.
मच्छरुप धरुनी शंखासुर मारिला । तेव्हां श्रमोनी जघनीं कर ठेविले ॥१॥
कूर्मरुप धरुनी पृथ्वी धरलीं पृष्ठीं । तेणें श्रमोनी कर ठेविले कटीं ॥२॥
हिरण्याक्ष मर्दुनी दाढेवरी धरली अवनी । तेणें श्रमोनी कर धरिले जघनीं ॥३॥
रक्षिला प्रल्हाद भक्त विदारिला क्रूर दैत्य । भागला तेणें कटावर कर मिरवत ॥४॥
बळीं पाताळीं घातला दार राखंता श्रम जाला । म्हणोनि कटावरी कर ठेऊनी राहिला ॥५॥
एकवीस वेळां निक्षत्री निवैर धरित्री । तेणें श्रमोनी कर जघनीं धरिले ॥६॥
लंकेपुढें वज्रठाण मांडिले रावणातें भंगिलें । म्हणोनी कर जघनी धरियेले ॥७॥
लागला काळयवन पाठीं पळतां जाला कष्टी । म्हणोनी उभा येथें कर ठेउनी कटीं ॥८॥
लोक देखोनी उन्मत दारा धनी आसक्त । न बोले बौध्दरुप ठेविले जघनी हात ॥९॥
पुढें म्लेच्छ संहार म्हणोनी कर कटीं । एका जनार्दनीं पाहतां चरणीं घातली मिठी ॥१०॥
३३४७.
वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥
तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥
घेउनी अवतार वेद आणियेले । ब्रम्हासी स्थापिलें ब्रम्हपुरीं ॥३॥
शंखासुर वधुनी विजयी पैं झाला । वर्णितां पैं धाला जनार्दन ॥४॥
३३४८.
इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥
तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥
एका जनार्दनी रत्नं चौदा काढिलीं । देव सुरवर जेणें सुखीं केलीं ॥३॥
३३४९.
रसातळां जातां अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥
तोचि महाराज पुंडलिकासाठीं । कर ठेऊनी कटीं उभा विटे ॥२॥
हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव । एका जनार्दनी त्याचे पायीं ठाव ॥३॥
३३५०.
भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥
तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥
एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥
३३५१.
बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥
तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटीं पावलें दोन्हीं साजिरीं ॥२॥
भक्ताचिया काजा विटे उभा राहिला । एका जनार्दनीं देव डोळां पाहिला ॥३॥
३३५२.
मातेच्या कैवारा सहस्त्रार्जुन वधी । एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय शोधी ॥१॥
तोचि मायबाप चंद्रभागेतीरीं । कर कटावरी ठेउनी उभा ॥२॥
एका जनार्दनीं ज्याची कीर्ति वर्णितां । द्वैत हारपलें ममता देशधडी चिंता ॥३॥
३३५३.
सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनियां लंके बिभीषण स्थापिला ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागेतीरीं । कट दोनी धरुनी उभा विटेवरी ॥२॥
एका जनार्दनीं रामनाम कीर्ति । त्याचें चरित्र ऎकतां समाधान वृत्ति ॥३॥
३३५४.
द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा ॥१॥
तो़चि महाराज चंद्रभागेतटीं । उभा राहिलासे कर ठेऊनि कटीं ॥२॥
एका जनार्दनीं चरणीं पडली मिठी । आठवा आठवितां तुटे जन्मकोटी ॥३॥
३३५५.
पुंलिकाकारणें वाळुवंटीं उभा । भक्ताच्या कैवारें दिसतसे शोभा ॥१॥
पुढें चंद्रभागा वाहे अमृतमय । आषाढी कार्तिक वैष्णवांची दाटी होय ॥२॥
एका जनार्दनीं जया वैष्णव गाती । विठ्ठलनाम उच्चारितां सायुज्यमुक्ति ॥३॥
३३५६.
कलंकी अवतार पुढें होईल श्रीहरी । लोपोनी जातां धर्म मग अवतार धरी ॥१॥
दहा अवतार भक्ताकारणें घेतो । भक्ताची आवडी म्हणोनी गर्भवासा येतो ॥२॥
अंबऋषी कैवारें दहा अवतार घेतले । एका जनार्दनी त्याचें चरित्र वर्णिलें ॥३॥
३३५७.
लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऎसीयासी कोण । विश्वासेल ॥१॥
मागतां बळें बळी । उदकीं देत चळी । अतिशय तळमळी । मीन जैसा ॥२॥
मागतां मांसा मासा । मुरुडूं धांवे घसा । डावेनी हातें कैसा । शंख करी ॥३॥
अतिशय कृपण । शरण एका जनार्दन । बाळा दे स्तनपान । पिलीं पोसी ॥४॥
३३५८.
मागतां देखोनि दिठी । हातपाय घालूनि पोटीं । पर्वत पडिल्या पाठीं । देणॆं नाहीं ॥१॥
मागतां न देसी । दांतीं भोये धरिसी । पांढरा डुकर होसी । तेणें कर्में ॥२॥
ठेवणें न देंतां । जावों नेदी सर्वथा । बळीचिया ऎसा आतां । बांधीन पायीं ॥३॥
मागत निजनिर्धार । खांबामाजी तूं गुरगुरी । तिखट नखें बोचकरी । क्रोधें करुनी ॥४॥
एका जनार्दनीं त्यातें । माग त्याच्या बापातें । फ़ाडोनी आतें । ठेविलें निश्चितें देणें नाहीं ॥५॥
३३५९.
मागतां कवतुक । दीन होऊनी रंक । दारोदारीं भीक । मागें धांवे ॥१॥
मग ते करी काय । पाठी देउनी पाय । रसातळीं पाहे । घालूं धावें ॥२॥
मागों जातां पुढें । मायेचें काढी मढें । उकसाबुकसी रडे । माये माये म्हणोनी ॥३॥
फ़रश घेउनी करीं । ज्यातें त्यातें मारी । रक्तें रक्त उरी । परि देणें नाहीं ॥४॥
मागतां रोकडें । एका जनार्दनीं सांकडें । मेळवोनि माकडें । पाठीं लागे ॥५॥
३३६०.
ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी ॥१॥
गांठी घ्यावया नाहीं । आतां करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥
तेथेंही न संडी परी । दहीं दूध चोरी । भोगिल्या परनारी । मूळ माईके ॥३॥
बुध्दी बोध ठेला । एका जनार्दनीं अबोला । कांही न बोल बोला । ठेवणें गट्ट करुनी ठेला ॥४॥
३३६१.
मागतां पैं कैवाडें । लुंची लागे मुंडे । नागवा होऊनी पुढें । उभा ठाके ॥१॥
मागतां फ़ाडोवाडे । घाऊनियां घोडा चढे । स्वर्ग घेऊनि वाढे । करी मारामारी ॥२॥
कलंकी होऊनि पुढें ऋणामाजीं बुडे । कलीच्या अंती घडे । कर्म ऎसें ॥३॥
मागतां दाटोदाटी । नवल त्याची गोठी । लाविली लंगोटी । एका जनार्दनीं नारदासी ॥४॥
३३६२.
सनकादिक वेडे । शुक नागवे उघडे । भुलविले रोकडे । जडभरतासी ॥१॥
पुंडलिकें जगजेठी । उभा केला वाळुवंटी । अद्यापि पैं नुठी । धरणें त्याचें ॥२॥
कटीवर ठेउनी हात । उभा असे तिष्ठत । घेतलें तें निश्चित । देणॆं नाहीं ॥३॥
धरणें न मागतां पूर्ण । उडवी माणुसपण । जीवा जीवपण । उरों नेदी ॥४॥
एका जनार्दनीं एकपणाच्या वाणी । आपणा देउनी । देवो समूळ खत फ़ाडी ॥५॥
३३६३.
एका अयोध्ये अवतार । दुजा गोकुळीं निर्धार ॥१॥
एकें ताटिका मारिली । एकें पूतना शोषिली ॥२॥
एकें अहिल्या उध्दरिली । एकें कुब्जा पावन केली ॥३॥
एका एकपत्नीव्रत । एक गोपीं तें भोगीत ॥४॥
एक हिंडे वनोवनी । एक हिंडे वृंदावनीं ॥५॥
एकें रावण मर्दिला । एकें शिशुपाळ वधिला ॥६॥
एकें बिभिषणा पाळिले । एकें अर्जुना सांभाळिले ॥७॥
एका वहनी हनुमंत । एका गरुड शोभत ॥८॥
एका शोभे धनुष्यबाण । एका काठी कांबळी संपूर्ण ॥९॥
ऎसा भक्तांचा कळवळा । एका जनार्दनीं बोधिला ॥१०॥
३३६४.
एके वनवास सेविला । एक नंदगेहीं राहिला ॥१॥
एकें समुद्री पायवाट केली । एकें द्वारका वसविली ॥२॥
एकें वान्नर मिळविले । एका गोपाळ सवंगडे ॥३॥
एकें पर्णियली सीता । एकें भीमकी तत्वतां ॥४॥
एका शोभे पीताबंर । एका मिरवे वैजयंती हार ॥५॥
ऎसे दोघे ते समर्थ । एका जनार्दनी शरणागत ॥६॥


एकादशीमहात्म्य 

३३६५.
ऎका पुण्य पवित्र कथा । सावधान व्हावें श्रोतां । जयाचेनि अवधानें सर्वथा । कलिकल्मषें नासती ॥१॥
जें आचरला अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी । तेंचि व्रत एकादशी । निजधर्मासी सांगेन ॥२॥
परिसा एकादशीचा महिमा । तोचि दिवस प्रिय पुरुषोत्तमा । मुगुटमणी सकल धर्मा । विचित्र कर्मा सोडवण ॥३॥
तिथिजयचें महिमान । त्रैरुपें अभिन्न जाण । परिसा तियेचें लक्षण । तात्विकार्थ तो ऎसा ॥४॥
दशमी जाणा महाविष्णु । एकादशी श्रीनारायणु । द्वादशी श्रीभगवानु । भक्त साहाय्याकारणें ॥५॥
संक्रमणादि दान श्रेष्ठ । याहुनी ग्रहणीचें वरिष्ठ । ग्रहणाहुनी वरिष्ठ । व्यतिपात वैधृति ॥६॥
याहुनी अनंत गुणें अधिक । एकादशीचें दान विशेष । दानमिषें एकाएक । देवचि देख पैं लाभे ॥७॥
यालागी एकदशीचें दान । तें होय देवाची समान । दानयोगें तेणें जाण । देव अपैसा पैं केला ॥८॥
अर्धोदय कपिलाषष्ठी एकादशीच्या चरणांगुआष्ठीं । योगयागाची कोटी । टाळीसाठीं नासरती ॥९॥
दशमी व्राताचा आरंभु । दिडीपुढें समारंभु । मिळोनि वैष्णवांचा कदबु । गीत नृत्य उत्साह ॥१०॥
आली एकादशी परिसोनी । उल्हास उपजे ज्याचे मनीं । धन्य धन्य त्याची जननी । पवित्र अवनी तेणें केली ॥११॥
अनंत व्रतांचिया राशी । पायां लागती एकादशी । यालागी हरिदिनीं आख्या ऎशी । त्या दिवसा पैं आली ॥१२॥
एकादशी हरीचा प्रसंग । आठही प्रहर तें अष्टांग । जे नर भाग्याचे सभाग्य । पूजा सांग करिताती ॥१३॥
प्रात:काळापासून । तेथें प्रगटे नारायण । त्यासीच म्हणती हरिदिन । व्यास वाल्मिकी नारद ॥१४॥
यालागी तो हरीचा दिवस । तो सत्य जाणा हृषीकेश । धन्य धन्य भाग्य सारस । गीत नृत्य उत्साह ॥१५॥
ऎशी हरितनु एकादशी । म्हणोनी आवडे वैष्णवासी । नारद प्रल्हाद अंबऋषी । या व्रतासी विनटले ॥१६॥
बरवें करावें हरि पूजन । श्र्वुंगारावें देवसदन । आठहि प्रहर हरिकीर्तन । जाग्रण करावें उल्हासें ॥१७॥
जाग्रणा एकादशी । येतां होती पुण्यराशी । पदोपदीं कोटी यागांसी । फ़ळ समारंभेसी जोडती ॥१८॥
जें तेथें बैसोनि सावधान । परिसती हरिकीर्तन । त्याचें निरसें भवबंधन । समाधान ते पावत ॥१९॥
वैष्णव होऊनी एकादशी । अंग चोरी हरिकीर्तनासी । भाग्य विन्मुख जालें त्यासी । मुळ्यापासीं तेणें केलें ॥२०॥
यालागीं एकादशीस वाडेंकोडें । नामासाठीं मोक्ष जोडे । तेथेंही अभिमान चढे । रवरव पुढें तयासी ॥२१॥
एकादशी रंगापुढें । रंगी नाचती वेडेबागडें । नाम गर्जती साबडें । ते आवडे गोविंदा ॥२२॥
नामासरसी वाजे टाळी । महादोषा होय होळी । सांडोनि वैकुंठ नव्हाळी । तयाजवळी हरी तिष्ठे ॥२३॥
जाग्रणा येऊनि एकादशी । जो हरिभक्तासी उपहासी । तो जाणावा पापराशी । नरक त्यासी पैं भीती ॥२४॥
देखोनि निंदकाचा भावो । रवरवा पडिला संदेहो । निंदेपरतें पाप पहा हो । जगामाजीं पैं नाहीं ॥२५॥
जेणें निंदिली एकादशी । तो जिताची नरकवासी । कुषठ लाविलें मुखासी । ये मुखासी मुखरोग ॥२६॥
ज्यासी न माने माने एकादशी । तनु जाणावी ती राक्षसी । त्यासी संगती घडे ज्यासी । नरकवासी तो होय ॥२७॥
जे एकादशीस भक्षिती अन्न । तें श्वानविष्टेसमान । तांबूल ते रुधिरपान । रजस्वले स्त्रियेचें ॥२८॥
एकादशीस स्त्रीभोग । तयासी लागे क्षयरोग । यमयातना दु:खें अनेग । व्यथा अंगीं तो पावे ॥२९॥
बाह्य मिरवी एकादशी । चोरुनी खाये अन्नासी । उदरशुळ लागे त्यासी । नातरी कुक्षीं गुल्म होती ॥३०॥
एकादशीस स्नेहमार्जन । बुध्दि अंध होय तेणें । नेत्ररोगासी उटणें । क्षुद्र पहाणॆं हरिभक्ता ॥३१॥
जो निंदी एकादशी । नरका जाणॆं न लगे त्यासी । तो स्वयेंचि नरकवासी । झणीं आतळला ॥३२॥
जेणें दूषिलें एकादशी । झणी त्याचें नाम घेसी । रामराम म्हणतां वेगेसी । त्या पापासी प्रायश्चित ॥३३॥
ज्यासी निष्ठ एकादशीचें भजन । त्यासी सर्वथा नाहीं पतन । पूर्वज उध्दरती जाण । यमयातनेपासुनी ॥३४॥
गर्जती हरिनामाचा घोष । त्यांचा यमदूतां पडे धाक । नामें प्रायश्चित शीक । लागली भीक महात्तपा ॥३५॥
यमयातनेचें पितर । वाछिताती निरंतर । एकादशी हरिजागर । वंशी तत्पर हो कोणी ॥३६॥
पुत्र अथवा भ्रातृपुत्रा । दुहित्र अथवा दुहिता । करितां एकादशी हरिजागर । यमप्रहार ते चुके ॥३७॥
जो एकादशी व्रत धरी । तो अतिशय पढीये हरी । यालागीं देव त्याचे घरीं । निरंतर तिष्ठत ॥३८॥
जेथें राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ । ब्रम्हानंदें पिकली पेठ । ग्राहिक तेथें हरिभक्त ॥३९॥
ऎसें एकादशीचें व्रत । निर्विकल्प जे आचरत । त्याचे घरीं हरि तिष्ठत । कांतेसहवर्तमा ॥४०॥
तीर्थव्रताचें पारडें । तुकितां एकादशी पुढें थोडें । तेथेंही जागरण घडे । भाग्य केवढें तयाचें ॥४१॥
द्वादशीस शीत मात्र अन्न। तें होय मेरुमंदारासमान । तेथेंही निर्विकल्प ब्राम्हणभोजन । आत्मा गमन तेणें चुके ॥४२॥
द्वादशीचें अन्नदानीं । देव भक्ताचा जाला ऋणी । यालागी पैं चक्रपाणी । भक्तवाणी नुल्लंघी ॥४३॥
द्वादशीचें फ़ळ संधान । अमर्याद पुण्य गहन । कोटीयागांचे श्रेय जाण । निंबलोण करिताती ॥४४॥
द्वादशीच्या ग्रासोग्रासीं । तृप्ति होय यज्ञपुरुषीं । तें फ़ळ लाधलें अंबऋषी । गर्भवासीं देव पैं आला ॥४५॥
एवं जालिया पारणें विधि । जो आरंभी क्षीराब्धी । भक्तामाजीं तो आधीं । वैकुठपीठीं राहे ॥४६॥
क्षीराब्धीचा प्राप्तकाळ । मिळोनि वैष्णवांचा मेळ । नाना परी करिती गदारोळ । तो सोहळा हरिप्रिय ॥४७॥
एकादशी देवजागरा आला । क्षीरापतिलागीं ठोकों लागला । जैसा बुभुक्षु दुकाळला । तैसा वाट पहातसे ॥४८॥
ऎकोनि क्षीरापतीच्या गोष्टी । आवडी देव लाळ घोटी । हरीख न समाय सृष्टी । उल्हास पोटीं न समाये ॥४९॥
क्षीरापती वाळुवटीं । संत वैष्णवांची दाटी । देखोनि देवा आवडी मोठी । येत उठाउठी पैं तेथें ॥५०॥
क्षीरापती सेवितां वैष्णव । मुखामाजीं मुख घालितो देव । नवल भावार्थाचा भाव । अगम्य पहाहो सुरनरां ॥५१॥
सेवितां क्षीरापतीची गोडी । येरयेरापुढें घालिती उडी। हर्षे नाचतां आवडी । धरिती गोडी उल्हासें ॥५२॥
क्षीरापति घालितां वैष्णवांचे मुखीं । तेणें सुखें देव होय सुखी । धन्य भाग्याचें इहलोकीं । व्रत वोळखी त्या जाली ॥५३॥
पडली वैष्णवाचे पायातळीं । जो सेवी क्षीरापतीची रवाळी । सकळ पापा होय धुळी । हरी जवळी तो पावे ॥५४॥
सेवितां वैष्णंवांचे शेष । कलिकल्मषा होये नाश । पायां लागे मोक्षसुख । स्वात्मसुख तो पावे ॥५५॥
यापरी एकादशी । भक्त उद्वरती दोष पक्षी । मोक्षचिया राशी । तिथियत्रा जोडिती ॥५६॥
धरी जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रगटे देव । करुनी संसार वाव । निजात्मा ठाव निजपदीं ॥५७॥
व्रतातपांचें काबाड । सकळ धर्मांचें पुरें कोड । धरलिया एकादशीची चाड । सकळही फ़ळें लाभतीं ॥५८॥
जो एकादशीचा व्रती । त्यासी तीर्थे पैं सेविती । तेणें पुण्यें भगवत्प्राप्ती । क्षणमात्र न लागतां ॥५९॥
एकादशीच्या उपवासीं । रुक्मांगद सूर्यवंशीं । नगरी नेली वैकुंठासी । निजसुखासी पावला ॥६०॥
तैशीच जाणावी द्वादशी । प्रसन्न जाली अंबऋषी । दहा गर्भवास सोशी । उणें भक्तासी येवों नेदी ॥६१॥
ज्यासी असे मोक्षाची चाड । तींही नाना साधनें काबाड । सांडोनियां दृढ । व्रत एकादशी करावें ॥६२॥
एका जनार्दनीं सांगे । कां शिणाल योगयागें । एकादशीच्या प्रसंगें । देवची अंगे लाधला ॥६३॥


रुक्मांगदाची कथा 

३३६६.
ऎका पुण्यपावन व्रताचें महिमान आचरतां जन दोष जाती ॥१॥
सर्वांमाजीं सार व्रत एकादशी । रुक्मांगद सूर्यवंशी करी नेमें ॥२॥
तिथि नेमें व्रत करीत आदरें । पूजन स्मरण जागरे यथाविधि ॥३॥
एका जनार्दनी पुण्यपावन व्रत । आदरें आचरत रुक्मांगद ॥४॥
३३६७.
कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं ॥१॥
सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥
न्यायनीती राज्य पाळी ब्राम्हणासी । मूर्तिमंत धर्मासी स्थापियेले ॥३॥
दीनाचें रक्षण साधूचें पूजन । संतांचें वचन मान्य सदा ॥४॥
एका जनार्दनी साधियेला नेम । परि काहीं कर्म वोढवलें ॥५॥
३३६८.
पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथें ॥१॥
जाणोनियां इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें कांतीयेची ॥२॥
देवाच्या पूजना सूमनें न मिळतां । राय पाचारीत वनमाळा ॥३॥
सेवक म्हणती सायंकाळी कांही । दिसों येत नाहीं रात्रीमाजीं ॥४॥
रात्रीं जाग्रणा बैसली रक्षक । लाविला वृंतारक अग्नीकाष्ठीं ॥५॥
सावधान ठायी जागती सर्वही । विमान तें समयीं आलें तेथें ॥६॥
तोडिली सुमनें गुप्तरुपें त्यांनी । विमान तों तेथोनी न चलेची ॥७॥
एका जनार्दनीं देवदूत कष्टीं । न चले त्यांची युक्ति काहीं केल्या ॥८॥
३३६९.
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥
उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥
इंद्रें पाठविले न्यावया सुमनें । तुम्ही पुण्यवंत जाण म्हणोनियां ॥३॥
धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आम्हांलागी विघ्न कां हें आलें ॥४॥
राहावया तुम्हां कोणतें कारण । लागला धूम्र जाण वृंतारकाचा ॥५॥
एका जनार्दनीं यासी उपाय । पतिव्रता होय एकादशी व्रतीं ॥६॥
३३७०.
आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें ॥१॥
आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजीं ॥२॥
पतिव्रता हो का भलते यातीची । शुध्द वासनेची एकनिष्ठ ॥३॥
एका जनार्दनीं घडेल एकादशी । तिचें पुण्य हातीं विमान जाये ॥४॥
३३७१.
रात्रीं जाग्रण नामस्मरण चित्तीं । घडली ते तिथी एकादशी ॥१॥
तियेचे हातीं विमानासी गती । चालावया पंथी वेळ नाहीं ॥२॥
तेव्हा पाचारिल्या अन्य याती नारी । नेणत्या कुमारी होत्या त्याही ॥३॥
तिळभरी नाहीं चालावया रीग । दवंडी पिटी वेगें शीघ्र राजा ॥४॥
एका जनार्दनी निघालिया सर्व । तो तेथें अपूर्व नवलाव ॥५॥
३३७२.
तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥
धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥
येरी म्हणे मी तों कुळींची निर्दोष । शुध्द माझा वंश रजकाचा ॥३॥
ऎकिला संवाद दौंडीकरें त्याचा । आणि विनोदाचा समाचार ॥४॥
एका जनार्दनीं धाऊनियां दूत । रायासी ती मात सांगताती ॥५॥
३३७३.
पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥
साशंकित राजा लावीं म्हणे हात । विमान क्षणांत उचलिलें ॥२॥
धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा । रजकाचेवे भाजा धन्य जाली ॥३॥
सांगे सकळांसी एकादशीर करा । हरिदिनीं जागरा निजूं नका ॥४॥
एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । तेव्हांची साध्य होय ॥५॥
३३७४.
निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी ॥१॥
राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥
हरिकीर्तनाच्या भरियेल्या रासी । भेदीत आकाशीं पुण्य जाये ॥३॥
मध्यें आला कांही व्रता अंतराय । अपाय तो पाहे मोहनीचा ॥४॥
एका जनार्दनी होतां स्त्रीसंग । नेमा होय भंग तात्काळीक ॥५॥
३३७५.
भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज खोळंबिला ॥१॥
राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुबुध्द एकादशी ॥२॥
बहुदिन होतां न कळे रायासी । मोहोनियां पाशीं बांधियेला ॥३॥
पुढें आली जाणा तेव्हां हरिदिनीं । लोकांलागीं राणी सांगताहे ॥४॥
धेंडा पिटविला श्रीहरि जागरु । करा निरंतरु निजूं नका ॥५॥
एका जनार्दनी नृपें ऎकिलें कानीं । धिग म्हणोनि प्राणी जन्मा आलों ॥६॥
३३७६.
उतरला तळीं टाकियेली शय्या । स्नान केलें तया शीतोदकें ॥१॥
बैसे घालोनियां तृणाचें आसन । सारी नित्य नेम यथाविधी ॥२॥
नेम भंग जाला वर्जिली मोहिनी । नायके तो ध्यानीं बैसला ॥३॥
एका जनार्दनीं अनुतापावांचून । न घडे नामस्मरणं कालत्रयीं ॥४॥
३३७७.
अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥
आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्वाचें हरण करुं पाहे ॥२॥
मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा हे माझी खरी जाली ॥३॥
देई मज आशा सोडी कां उदक । सुकृत सम्यक व्रताचें तें ॥४॥
चिंतावला राजा मागें म्हणॆ पाटलासी । इच्छिलें पदार्थांसी देईन मी ॥५॥
येरी म्हणे तुझा कुळींचा दीपक । तो देई सम्यक मजलागीं ॥६॥
नाहीं चाड मज पदार्थी अनेकां । कापोनियां दे कां मस्तकासी ॥७॥
एक जनार्दनीं राजिया संकट । न सुचे आणीक कांही तया ॥८॥
३३७८.
धांवे देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोण्ही ॥१॥
भुली पडली विषयसुखें । पात्र जालों महादु:खें ॥२॥
विसरलों हित । नेणें बुडालें स्वहित ॥३॥
एका जनार्दनीं । भुललासें नाहीं कोण्ही ॥४॥
३३७९.
मात कळों सरे पत्नीपुत्रा वेगें । पातलीसे दोघें रायापाशीं ॥१॥
गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानीं बोले तिला माग काई ॥२॥
येरी म्हणे शीर तुझिया पुत्राचें । आपुलिये वाचे रायें दिलें ॥३॥
एका जनार्दनीं मोहिनीचा शब्द । ऎकोनी धर्मांगद काय बोले ॥४॥
३३८०.
पित्याचिये काजा देह हें वेंचावें । तेव्हांची बरवें दिसे लोकीं ॥१॥
सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हातीं ॥२॥
तोषेल श्रीपती मज ऎसे किती । पुत्र तुम्हां होती सत्वधीर ॥३॥
एका जनार्दनी सत्वाचा आगळा । प्रिय तो गोपाळ तोचि एक ॥४॥
३३८१.
वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद ॥१॥
घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥
अंतकाळीं केल्या देवाचें स्मरण । तेव्हा नारायण धांव घाली ॥३॥
धरियेला हात माथां ठेवी कर । म्हणे माग वर मज कांहीं ॥४॥
एका जनार्दनीं नाम आलें मुखा । पांडुरंग सखा होय त्याचा ॥५॥
३३८२.
आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥
नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥
पातली मोहनी म्हणे देवराया । सांडिसी कां वायां मजलागीं ॥३॥
कोण अपराध घडलासे मज । दीनानाथ साजे नाम तुम्हां ॥४॥
इंद्र आज्ञेमुळें छळियेलें राया । एका जनार्दनीं पायां लागतसे ॥५॥
३३८३.
आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं ॥१॥
पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥
त्याचें पुण्य फ़ळ तुजलागीं प्राप्त । हो कां जरी आप्त मज प्रिये ॥३॥
तया पुण्यें तुझा होईल उध्दार । देऊनियां वर ठेवियेली ॥४॥
एका जनार्दनीं उक्ती हे भागवतीं । तुम्हां सर्वांप्रती निवेदली ॥५॥
३३८४.
सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुठ भुवनीं पावविला ॥१॥
करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विजपंक्ती ॥२॥
दिवसा सावध हरीचें चिंतन । रात्रीं जागरण कीर्तनसार ॥३॥
एका जनार्दनीं साधावें हें व्रत । तेणे मोक्ष प्राप्त अर्धक्षणीं ॥४॥
३३८५.
व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥
अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचें विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥
टाळ मृदंग वाजती गजरें । विठ्ठल प्रेमभरें नाचतसे ॥३॥
एका जनार्दनीं व्रताचा छंद । तेणें परमानंद सुख पावे ॥४॥
३३८६.
आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥
निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥
व्रत आचरती हरिकथा करिती । नामघोष गाती आवडीनें ॥३॥
प्रदक्षणा तीर्थ आचरें सेविती । पूर्वज ते जाती वैंकुठासी ॥४॥
पुडलिकाचें दरुशन चंद्रभागे स्नान । विठठल दरुशनें धन्य होती ॥५॥
एका जनार्दनीं ऎसा ज्यांचा नेम । तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ॥६॥
३३८७.
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमानें । तया वैंकुठीचें पेणें ॥२॥
नामस्मरण जाग्रण । वाचें गाये नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥
३३८८.
व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥
भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥
स्वमुख देव आवडीने सांगे । तयाचिये मागें हिंडे देवो ॥३॥
एका जनार्दनीं भोळा देव । भक्ताचा गौरव करीतुसे ॥४॥
३३८९.
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥
एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥
ऎसें व्रत तीन दिन । करी जो आदरें परिपूर्ण । एका जनार्दनीं बंधन । तया नाहीं सर्वथा ॥३॥
३३९०.
क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥
एकादशी देव आला । क्षीरपतीलागीं टोकत ठेला ॥३॥
द्बादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडी देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवा मुखीं । तेणें मुखें होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजीं मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखीं । एकाएकीं तेणें होतसे सुखी ॥८॥
३३९१.
रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणॆं द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणें हरिनामाचा छंद । तेणें परमानंद प्रगटला ॥३॥
एका जनार्दनीं एकविधा छंद । तेणॆं परमानंद प्रगटला ॥४॥
३३९२.
मागें संतें सांगितलें । तें हें आलें फ़ळासी ॥१॥
जावें शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥
करावें व्रत एकादशी । द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥
नेमें जावें पंढरीसी । तेणें चौर्‍यांयशी चुकती ॥४॥
एका जनार्दनीं हेचिं सार । वाया भार कासया ॥५॥
३३९३.
नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाहीं ॥१॥
घडतां तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥
एका जनार्दनीं भाक । पुन्हां जन्म नाहीं देख । साधन आणिक । दुजें नको करणें ॥३॥
३३९४.
करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें ॥१॥
रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥ध्रुव॥
नित्य वाचे नामावळी । वदे वदे सर्व काळीं । पातकांची होळी । क्षणमात्रें होईल ॥२॥
जनांसी तारक वासुदेव नाम । आणीक नको साधन वायांचि नेम ।
गावें तूं सुखें जनीं जनार्दन । एकाभावें वंदी एका जनार्दन ॥३॥


तुळशीमहात्म्य 

३३९५.
वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली ॥१॥
वंदिती जया हरिहरा । सर्व करिती नमस्कारा ॥२॥
देव इंद्रादिक सर्व । तुळशी पूजनें गौरव ॥३॥
ऎशी तुळशी माउली । एका जनार्दनीं वंदिली ॥४॥
३३९६.
धन्य तुळशीचा महिमा । नाहीं आणीक उपमा ॥१॥
प्रात:काळीं दरुशन । घडतां पुण्य कोटीयज्ञ ॥२॥
नाम वदतां हे तुळशी । इच्छीलें पुरवीं मानसीं ॥३॥
तुळशी नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥
३३९७.
तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान ॥१॥
उठोनियां प्रात:काळीं । वंदी तुळशी माउली ॥२॥
मनींचे मनोरथ । पुरती हेंचि सत्य ॥३॥
तुळशीचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३३९८.
तुळशी काष्ठाची माळ । गळां घालावी निर्मळ ॥१॥
होतां एकचि स्नान । सर्व तीर्थांचे मार्जन ॥२॥
नित्य वंदितां तुळशी । काळ पळे देशोदेशीं ॥३॥
तुळशीचें पाणी । वसे त्रैलोक्यचरणीं ॥४॥
एका जनार्दनीं ध्याऊं । नित्य पाहूं तुळशीसी ॥५॥
३३९९.
तुळशी ऎसें नाम । वदतां हरे क्रोध काम ॥१॥
नाहीं आणीक साधन । एक पूजन तुळशीचें ॥२॥
न लगे तीर्थाटन जाणें । नित्य पूजनें तुळशीसी ॥३॥
योगयाग न लगे काहीं । तुळशीवांचुनी देव नाहीं ॥४॥
तुळशीचे ठायीं वसे । एका जनार्दन देव भासे ॥५॥
३४०१.
जोडोनियां पाणी । वंदा तुळशी निशिदिनीं ॥१॥
द्वारी घालुनी वृंदावन । वरी तुळशी बीजारोपण ॥२॥
तया घालितां हो पाणी । पाप नुरेची मेदिनीं ॥३॥
तुळशीची सेवा । एका जनार्दनीं देवा ॥४॥
३४०२.
देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे ॥१॥
पुरे एक तुळशीपान नाहीं आणीक कारण ॥२॥
जन्मजन्मांतरींची सेवा । फ़लद्रुप होय देवा ॥३॥
पूजनाचे भावें जाण । एकाजनार्दनीं तुष्टे आपण ॥४॥
३४०३.
कोणे एके दिनीं । तुळशीं घालितां हो पाणी ॥१॥
देव मानी त्याचा भार । तोडितसे वेरझार ॥२॥
शीण भाग काहीं । तया येऊं देत नाहीं ॥३॥
ऎसा कपाळु जनार्दन । एका वंदितसे चरण ॥४॥
३४०४.
तुळशी वंदितां मस्तकीं । धन्य धन्य तिही लोकीं ॥१॥
तुळशी करतां नमस्कार । उतरे पार संसार ॥२॥
तुळशीचे नाम घेतां । हरे भवभवयाची चिंता ॥३॥
तुळशीचा करतां जप । नुरे पाप जन्मांतरींचें ॥४॥
तुळशीची करता सेवा । होय देवा प्रिय तो ॥५॥
तुळशीचें अनुष्ठान । एका जनार्दनीं शरण ॥६॥
३४०५.
कलीमाजीं सोपा । तुळशी तुळशी मंत्र जपा ॥१॥
नको खटपट आणीक । तुळशी नामें उत्तम देख ॥२॥
आवडी धरुनी नाम घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥३॥
३४०६.
पाहूं गेलों तुळशी बन । वृंदावनीं जनार्दन ॥१॥
मूळ डाळ पाहतां पान । तुळशी वास जनार्दन ॥२॥
तुळशीविण कोष्ठें जावो । तुळशीमाजीं दिसे देवो ॥३॥
एका जनार्दनीं भावो । तुळशी जाला कृष्ण रावो ॥४॥
३४०७.
तुळशी पाहतां आपोआप । सहज जाय पापताप ॥१॥
तुळशी सेवा रे जननी । जे पढिये जनार्दनीं ॥२॥
करितां प्रदक्षणा मनें । भवरोगा उपशमन ॥३॥
मुळीं निक्षेपितां जळ । कळिकाळा सुटे पळ ॥४॥
जिचे लागतां सिंतोडे । कर्माकर्म समूळ उडे ॥५॥
भावें करितां पूजन । भगवंती होय समाधान ॥६॥
मुळी मृत्तिका कपाळीं । जन्ममरणा होय होळी ॥७॥
सेवी एका जनार्दन । तुळशी सबाह्य हरी पूर्ण ॥८॥
३४०८.
धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते ॥१॥
घेतां त्यांचे दरुदर्शन । नोहे पतन पूर्वजां ॥२॥
नाम जप अहर्निशीं । यम पळे भिउनी त्यांसी ॥३॥
ऐसा महिमा तुळशीचा । एका जनार्दनी साचा ॥४॥


सत्यभामाव्रत 

३४०९.
कृष्ण सर्वागीं सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्यभामा म्हणे हा वर । जन्मोजन्मीं पावावा ॥१॥
ऎसें विचारितां मनीं । तंव पातले नारदमुनी । चरणां लागली धांवोनी । वरासनीं बैसविलें ॥२॥
ऎका विनोद कथा विचित्र । नारद सत्यभामेसी सांगत । दान दिधलिया कृष्णनाथ । सोडवूं आतां ते नेणें ॥३॥
करुनि षोडशोपचारें पूजा । मग म्हणे जी योगिराजा । तुम्हांसारिखा न देख दुजा । परियेसी माझा निर्धारु ॥४॥
मज मनीं ऎसा भावो । जन्मोंजन्मीं कृष्ण नाहो । पावावया सुगम उपावो । व्रतें तपें कीं दानें ॥५॥
ऎकोनि हांसे नारदमुनी । म्हणे हें नाही मिनली कृष्ण मिळणी । म्हणोनि जन्मजन्मांतर सोसणी । विषयबुध्दि करीतसे ॥६॥
पाहूनि अधिकाराचा भेदु । तैसाचि उपदेश करिती साधु । इचा झडे गर्व मदु । तैसा विनोद करुं आजी ॥७॥
म्हणती दिधल्यावांचून नाहीं पावणें । ऎसी बोलती पुराणें । येविषयीं स्मृतिवचनें । पूर्वदत्तें पाविजे ॥८॥
जरी हा कृष्ण दानासी देसी । तरी जन्मोजन्मी पावसी । हे जरी मानेल मानसीं । तरी कृष्ण दानासी तूं देई ॥९॥
सत्यभामा म्हणे कृष्णासी । तुम्हासीं देईन दानासी । हें जरी मानेल मानसीं । तरी आज्ञा मज द्यावी ॥१०॥
ऎकोनि हासिन्नले देवो । म्हणे नारदें विंदान मांडिलें पहा हो । जाणोनि तियेचा अभिप्रावो । धन्य भावो प्रिये तुझा ॥११॥
म्हणे तुझी प्रिति मज बहु । तुज मनीं जैसा जिऊ । तुज तैसा भाऊ । भीमकी पैं नाहीं ॥१२॥
दाना न करी वो उशीरु । आजिचा पर्वकाळ थोरु । शुध्द सप्तमी रविवारु । मकरीं सूर्यो गुरुयुक्त ॥१३॥
सत्यभामा म्हणे ब्राम्हणासी । तुम्हांसी कृष्ण देईन दानासी । ते म्हणती गिळील अनुष्ठानासी । ध्येय ध्यानासी उच्छेदु ॥१४॥
जेणें हिरोनी परात्पर नोवरी । येणें घातली निजमंदिरीं । अहं मामा जीवें मारी । अकर्मे करी हा कृष्ण ॥१५॥
आम्ही भिक्षुक ब्राम्हण । कृष्णासी पाहिजे मिष्टान्न । कैंचें पीतांबर परिधान । आम्ही तयासी पुरवावें ॥१६॥
तो सदाचा परदारीं । कर्मे तितुकीं अकर्मे करी । विटाळ न व्हावा य़ाचा घरीं । आम्हां सोंवळें स्वयंपाका ॥१७।
सत्यभामा म्हणे नारदासी । ब्राम्हण दान न घेती कृष्णासी । काय करुं वो देवऋषी । तूं दानासी अंगिकारीं ॥१८॥
म्हणवुनी धरिले दोनी चरण । कृष्णदासासी तूं पात्र धन्य । आजीचें मानावें वचन । व्रत जेणें परिपूर्ण होय ॥१९॥
नारद म्हणे भले आतां । व्रते तपेंविण कृष्णा ये हातां । कवण सरे मागुता । कर्मकरंटा कर्मिष्ठु ॥२०॥
सेवकापदीं स्वामी ठावो । सेवेचा सेवक होईल देवो । न कळे दोहींचा अभिप्रावो । येरी लवलाहो दानाचा ॥२१॥
सत्यभामेनें श्रीकृष्ण । आणिला सालंकृत श्रुंगारुन । आपुलेनि पल्लवें झांकून । नारदा करीं देतसे ॥२२॥
येरी म्हणे प्रतिग्रहिताम । प्रतिगृण्हामि नारद म्हणतां । नमामि म्हणोनि कृष्णनाथा । मग संकल्पें घातला ॥२३॥
नारद म्हणे रे कृष्णा । बोध बांधुनी घेईं ब्रम्हाविणा । तुटों नेदी मुळींच्या खुणा । जिवींचा जिव्हाळा राखावा ॥२४॥
पैल माझिया सिध्द पादुका । सावधानें जवळी घे कां । येरे वंदिलिया मस्तका । ब्राम्हणाच्या म्हणवुनी ॥२५॥
अरे हे देवपूजा घेऊनि खांदीं । माझी बांधोनियां त्रिशुध्दी । बोधें बांधिनियां बुध्दी । अलिप्तपणीं वागवावी ॥२६॥
ओंवळेपणें नातळें क्षिती । विटाल न व्हावा महाभूतीं । पाउला पाउलीं आत्मस्थिती । देव निगुती आणावो ॥२७॥
पुढें चालिला नारद । मागें मागें गोविंद । येरु म्हणे कां रे मंदमंद । गृहसंबंध न सुटे ॥२८॥
नेणसी वैराग्याची ओढी । सांडीं स्त्रीपुत्राची गोडी । देहगेहाची आवडी । ते खोडी मज नावडे ॥२९॥
नारद म्हणे रे कृष्णा । शौचविधिसी उदक आणा । मृतिका अवलोकुनी नयना । जीवेंविण आणावी ॥३०॥
येरु म्हणे न दिसे जीऊपद । अवघे भूमंडळीची शुध्द । कोपेंविण कोपला नारद । वेद विरोध बोलतसे ॥३१॥
अरे हे ब्रह्मीं ब्रह्माचर्याची कसोटी । जीवा जीवनें प्रक्षाळिलीं गोमटी । सोंवळें पाहोनियां दृष्टी । वरी वाळे घालावी ॥३२॥
येरु म्हणे न दिसे वोवळे । अवघे त्रिभुवनचि सोंवळें । विकल्प कल्पना विटाळें । शुध्दासी मळ म्हणताती ॥३३॥
कृष्णें केलें नारदाचे चरणक्षालन । तें तीर्थ मुखीं मस्तकीं वंदून । ह्रदयी धरिलें आलिंगून श्रीवत्सलांछनाहुनी आध ॥३४॥
कृष्णें तीर्थाचे केलें वंदन । कृक्ष्णतीर्थाचें जन्मस्थान । तोही करी ब्राम्हणपूजन । धरा अमर पूजी जे ॥३५॥
कृष्ण चुरी नारदाचे चरण । म्हणे मी आजी धन्य धन्य । तुम्हांसी दिधलें दान । परम पावन मी झालों ॥३६॥
अलक्ष दोघांचें महिमान । कवण स्वामी सेवक कोण ब्रम्हांदिकां न कळे जाण । विस्मित जन द्वारकेचे ॥३७॥
जन म्हणती हा नारद जाण । आम्हां देखतां वंदी श्रीकृष्ण चरण । त्यास हाता आलिया कृष्ण । येणें माणुसपणा सांडियेलें ॥३८॥
नीच सेवकाची गती । सेवा घेतो कृष्ण हातीं । बाईलेच्या भिडा श्रीपती । नारदहातीं सांपडला ॥३९॥
नारद कृष्णासी नेतां दुरी । सत्यभामा रुदन करी । अंतरलें श्रीहरी । जन्मांतरीं कोण पावे ॥४०॥
नारदें ठकिलें ठकिलें गे फ़ुडी । मजचि बुध्दि ठाकी कुडी । युगासमान जातसे घडी । अति चरफ़डी मीन जैसी ॥४१॥
सत्यभामेच्या मंदिरीं । मिळाल्या सोळा सहस्त्र नारी । भली प्रवर्तली सवती मत्सरी । आपणया आपण नाडियेलें ॥४२॥
नाक कापुनी आपुलें । वैरियां अपशकुन केलें । तें तुवां साच दाविलें । दाना दिधले निजपती ॥४३॥
मग बोलली नागर जयंती । तुवां आस्वली आणिली आम्हां भोंवती । अवघिया श्रेष्ठ जांबुवंती । जाली सवती तुझेनी ॥४४॥
कृष्णाअंगीं लागली चोरी । सामास घातला विवरीं । आस्वला वरपडा केला श्रीहरी । पूर्व वोळखी वांचला ॥४५॥
तंव बोलली मित्रवृंदा । तुझी दुष्टबुध्दी गे सदा । भोगणें सांडूनियां परमानंदा । आजन्मांतर पर इच्छिसी ॥४६॥
अहंभावें सोहं धरणी । तुवां भांडविला सारंगपाणी । कृष्ण पडिला विकल्पा बाणीं । कुडी तूं धरणी लोळसी ॥४७॥
आम्ही सदाच्या समभाग । तेणें उमजला श्रीरंग । भेदुनी अहंभावाचे अंग । वरासनीं श्रीकृष्ण ॥४८॥
तेणें परिणल्या अनंत शक्ती । सोळा सहस्त्र आणिल्या सवती । हें तंव तुझीच ख्याती । न लाजसी चित्तीं निर्लज्जे ॥४९॥
मग बोलिली लक्षुमणा । थोर भुलली गे देहाच्या बरवेपणा । केली जन्मांतर तृष्णा । ते तंव कृष्णासी नावडे ॥५०॥
आजन्म न जन्मे श्रीहरी । कैंचा पावसी जन्मांतरी । नाडलीस दोहोंपरी । येथें न तेथेंसें जालें तुज ॥५१॥
तंव बोलिली कालिंदी । तुझी दृष्टी गे देहबुध्दी । कृष्ण परमात्मा त्रिशुध्दी । मन बुध्दि नातळे ॥५२॥
त्यासी तूं गे निजकल्पना । आणूं पहासी जन्मबंधना । तुझी तुज गे फ़ळली वासना । दुष्ट बुध्दी ॥५३॥
हांसोनी बोलिली जांबुवंती । जैसी घटामाजीं गभस्ती । असोनि अलिप्त चित्तीं । तैसा श्रीपती विषयासी ॥५४॥
भोग भोगुनी अभोक्ता । कर्म करुनी अकर्ता । त्यासी कैंची जन्मकथा । कृष्ण सर्वथा अजन्म ॥५५॥
हा साक्षात्कार ब्रह्म जाण । चिन्मात्रैक चैतन्यघन । त्यासी तूं माणूस म्हणसी कृष्ण । कुडी कल्पना हे तुझी ॥५६॥
ज्यासी जैसी गे भावना । त्यासी फ़ळे वासना । तुझी तुज भोंवे कल्पना । निजबंधना भवमूळ ॥५७॥
मग बोले सुभद्रा । तुवां कलंक लाविला कृष्णचंद्रा । तुझी बुडाली ज्ञानमुद्रा । जन्मसमुद्रा पडलीसी ॥५८॥
कृष्ण सबाह्य परिपूर्ण । चिन्मात्रैक चैतन्यघन । तयासी कैसें जन्ममरण । जीवा जीवन श्रीकृष्ण ॥५९॥
तेथें पावली देवकी । म्हणे ज्ञानमुढे सत्राजिताचे लेकी । म्यां नवमास वाहिली कीं । तूं दानासी स्वामिनी ॥६०॥
तुझेनि बापें घातला आळ । विवरी सूदला माझा बाळ । रीसा वरपडा गोपाळ । निजभाग्यें वांचला ॥६१॥
तुझेनि बापें तुज वर । केला सत्यभामा निर्धार । तूं दाटुनी निघालीस घर । मणी आंदणा म्हणवुनी ॥६२॥
त्या मणियाच्या लोभें जाणा । तुझा बाप मुकला प्राणा । तुवां मारिलें सत्यभामा । आणि पळविला अक्रुर ॥६३॥
जैं आणविले हनुमंता । ते तुज म्हणीतले होये सीता । नानावेष आणितां । परि सर्वथा नव्हेसी ॥६४॥
लाजा झालीस काळमुखी । तंव पाचारिली भीमकी । वचनमात्रें झाली जानकी । रामरुपीं आरुप ॥६५॥
थितें अंतरलें कृष्णसुख । सत्यभामा अधोमुख । मरमर करिती सकळही लोक । तेणें दु:ख दुणावें ॥६६॥
जैसी कां चोराची माये । धाय मोकलोनी रडो न लाहे । तैशीच दशा होत आहे । आंतचे आंत चरफ़डी ॥६७॥
हें ऎकोनी कोपला । बळिभद्र जाणा । म्हणे वारु पालानारे पालाना । घाव घातला निशाणा । धांवे धांवण्या बंधूच्या ॥६८॥
कृष्ण पदांकिता वाट । लागे मागे लगबग सुभट । अश्व राजांचे पैं थाट । घडघडाट पैं रथांचे ॥६९॥
आम्ही म्हणों ब्रह्मनिष्ठा नारद । हा तंव विश्वासघातमी मैंद । आमुचा मुगुटमणि गोविंद । ठकवूनियां नेतसे ॥७०॥
कृष्ण सांगे नारदापुढें । कोपें बलिदेव पातले गाढे । ज्येष्ठपणें दडती पुढें । म्यां कवणीकडे पळावें ॥७१॥
नारद म्हणे कृष्णासी । तूं स्त्री ना पुरुष होसी । शेखीं नपुंसक नव्हेसी । भवभयासी भिसी तूं ॥७२॥
ऎसाचि तूं सदा भ्याडू । जरासंध युध्दीं काढिला मोडू । काळयवना भेणें आडू । मुदकुंदाचे रिघालासी ॥७३॥
कृष्ण कांपतसे गदगदां । नारद हांसे खदखदां । सेवक बळेंविण गोविंदा । नामरुप तुज नाहीं ॥७४॥
अवघीं आपुलाची जाणसी । आपण आपणीया कां भिसी । तूं राहे माझे पाठीसी । मी कळिकाळासी पैं जाणें ॥७५॥
नारद म्हणे यादवांसी । अभिमान धरावा देवासी । ते आपण या दिधलें दानासी । संबध तुम्हांसी पैं नाहीं ॥७६॥
देउनी मागुती घेसी दानाती । ते तंव होती रवरवासी । तेथोनी निर्गती नाहीं त्यासी । जेवीं आचळ पां धर ॥७७॥
कृष्ण मर दिधला दाना । हें काय समस्त नेणां । छळणोक्ति करतां ब्राम्हणा । कुलक्षयो पावाल ॥७८॥
जारे पुसा सत्यभामेसी । प्रत्यक्षासी साक्ष या कृष्णासी । ठकऊनि नेईल यादवांसी । तरी दंडासी पैं लाभें ॥७९॥
तेथें पातले वसुदेव उग्रसेन । समस्त यादव मिळोन । धरिले नारदाचे चरण । जीवदान द्यावें आम्हां ॥८०॥
कृष्णाच्या पालटासी । जें मागाल तें देवऋषी । तें देउनी पदार्थासी । परीं कृष्णासी सोडावे ॥८१॥
नारद म्हणे मज म्हातारपण । म्हणऊन कृष्ण घेतला दान । एकलिया न करवे गमन । हा सांगाती जीवाचा ॥८२॥
एक म्हणे ती देऊं साठा । नारद म्हणे तो काय करंटा । चालों नेणें आमुचिया वाटा । फ़ुकट पोटा कोण घाली ॥८३॥
आमुच्या चालीं कृष्णासी चालणें । आमुच्या कर्मकर्तव्यपणें । आमुच्या गुणें होय सगुणें । धर्मसंरक्षण श्रीकृष्ण ॥८४॥
पाहतां श्रीकृष्णाचें मुख । फ़िकें होय समाधिसुख । स्वप्नीं न देखीजे दु:ख । हरीखें हरीखें कोंदाटे ॥८५॥
ऎसी कृष्णाची आस केली मोठी । म्हणोनि जीवेंभावें घातली मिठी । तुम्ही आम्हां भोंवतें शेवटीं । दिधलें दान मागतसां ॥८६॥
जळो जळो हें आमुचें दु:ख । आशा सांडिली नि:शेष । तुम्हांसी तंव द्यावें दु:ख । अज्ञान मूर्ख म्हणाल ॥८७॥
कृष्णाच्या पालटासी । कवण मागों पदार्थेंसी । जें जें उचित मानेल तुम्हांसी । शुध्द वस्तु मज द्यावी ॥८८॥
श्रीकृष्ण पालट सीमंतमणी । नेघों म्हणती नारदमुनी । होईल सत्राजिताचे वानी । देहघातनीं पैं लाभे ॥८९॥
जितुकें केलें कृष्णाचें तुक । तितुकें देऊनि कनक । नारद म्हणे आवश्यक । किती आग्रह करावा ॥९०॥
तुला उभविली झडझडा । कृष्ण दिधला दाना । तरी मी सोडवीन जाणा । मज मर्यादा नाहीं धना । मणी आंदणा बापाचा ॥९२॥
कृष्ण सोडवीन अभिमानेसी । म्हणवुनी घाली कनकरासी । कृष्ण न तुके अहंकारासी । लगड मासी तैसें सोनें ॥९३॥
नि:शेष सोनें सरलिया देखा । सत्यभामा अधोमुखा । तंव उठलिया यदुनायका । सोळा सळस्त्र सहमेळी ॥९४॥
कृष्ण सोडवावा आपण । उपरा उपरी घालिती सुवर्ण । धनासमान नाहीं कृष्ण । नाहीं होणें कल्पांती ॥९५॥
गजामुखीं जैसी राई । तैसें सोनें झालें पाही । गोपिका म्हणती अगे आई । आतां काई घालावें ॥९६॥
विशेष द्रव्य वेंचिलियावरी । लाजलिया सोळासहस्त्र नारी । धनवंता नातुडे श्रीहरी । सखा हरी दीनाचा ॥९७॥
घातलें द्वारकेचें भांडार । कुमरा कुमरीचे अळंकार । सकळ सुनांचें श्रुंगार । तुला भार तरी नव्हेचि ॥९८॥
नगर नागरिक लोक । देती आपुलालें कनक । द्वारका निर्धन केली देख । तुळा जोख तर्‍ही नव्हे ॥९९॥
मोहें पातली देवकी । माझा बाळ मीच सोडवी निकी । म्हणवुनी वरुषली कनकी । वसुदेवा अच्युत ॥१००॥
मोहें घातलें कनक । मोहासमान नव्हे कृष्णतुक । मेरुपुढें जेवीं मशक । तैसें कनक होउनी ठेलें ॥१॥
रुपें तांबें पितळ । सिसे कांसे वाटोळ । धातु घातलिया सकळ । तुळा आढळ तें न ढळे ॥२॥
कृष्ण स्थूळ सूक्ष न अचाट । सर्व सर्वांगीं निघोट । मेरुपरिस घनदाट । धराधरु बैसलासे ॥३॥
वस्त्रें भूषणें याची फ़ेडा । काहीं भार होईल थोडा । एक म्हणती कृष्णाचि कुडा । येणें वेडा लावियेलें ॥४॥
भोळी सत्यभामा बापुडी । नारदें बुध्दि दिधली कुडी । कृष्ण अनुमोदनी फ़ुडी । आपणा दान देवविलें ॥५॥
एक ठक एक महाठक । ठकिले द्वारकेचे लोक । तरी न सुटे यदुनायक । तुळा तुक अपुरें ॥६॥
रत्नप्रवाळें मुक्ताफ़ळें । तुका घातलें सकळें । नारदें केलें वाटोळें । तरी गोपाळ न सुटे ॥७॥
नुचलें कृष्णाचें पारडें । धाये मोकलूनि देवकी रडे । वैरीण सत्यभामेनें केलें कुडें । उपाव पुढें दिसेना ॥८॥
मागें देखिलें ना ऎकिलें । तें तुवां दान इया केलें । भ्रतारासी दान दिधलें । ना ऎकिलें पुराणीं ॥९॥
देवकी धरी नारदाचे चरण । म्हणे मज दे गा पुत्रदान । नाहीं वालभरी सुवर्ण । तुझी आण वहातसें ११०॥
नारद म्हणे भीमकीपासीं । आहेत कनकाच्या राशी । वेगीं बोलावा तियेसी । ते कृष्णासी सोडवील ॥११॥
सत्य जनीं जनार्दन । सकळासी मानलें हें वचन । भीमकीचें शुध्द पुण्य । कृष्न सोडवण ते करील ॥१२॥
उध्दव पाठविला भीमकीपाशीं । साष्टांग नमन केलें तियेसी । मग सांगे वृत्तांतासी । येरी मानसीं हासिन्नली ॥१३॥
सपर्वत समूळ धरा । न पुरे कृष्णाचिया भारा । नारद लाघवी खरा । गर्व परिहारा यादवांच्या ॥१४॥
दोघांनाही दोन्हीपण । नारद तोचि नारायण । कवण जाणें हें विंदान । विचित्र खूण दोघांची ॥१५॥
मग जाऊनि वृंदावना । केली तुळसीस प्रदक्षिणा । पक्वदळ घेतलें जाणा । अपक्व तुका पैं न ये ॥१६॥
तें घालुनी कनक ताटीं । वरी झांकुनी क्षीरोदक दुटी । निजात्मभावें गोरटी । चरित्र दृष्टी पाहूं आली ॥१७॥
केलें नारदासी नमन । घेतलें चरणतीर्थ प्रार्थून । मग षोडशोपचारीं पूजा करोन । जवळी पैं आली ॥१८॥
भिन्नभावें भजे देवासी । गंगा तळपे सागरीं जैसी । निजभावें कृष्णचरणांसी । तुळा तुळसी ठेविलें ॥१९॥
भावार्थाचे बळ गाढें । उचललें कृष्णाचे पारडें । सुवर्ण अधिक जालें पुढें । तें काढिती लवलाहे ॥१२०॥
भीमकी भावार्थाची देख । तुळसीदळ एकलें एक । देवासमान झालें तुक । पडिलें ठक सुरनरां ॥२१॥
भावार्थ विकला देव । अर्थासी या नाहीं संदेह । जयासी जैसा भाव । तैसा देव तयासी ॥२२॥
केवळ तुळसी़च्या दळीं । सोडविला वनमाळी । धन्य धन्य भीमकबाळी । पिटली टाळी एकदांची ॥२३॥
ऎका भावार्थाचा भावो । भावें सोडविला देवो । भावार्थीं संदेहो । अगम्य भावो भीमकीचा ॥२४॥
कृष्ण देव तैं हे देवता । कृष्ण राम तैं हे सीता । कृष्ण वसंत तैं हे सुगंधता । सर्वांगीं समरस ॥२५॥
कृष्ण मंत्र हे मातृका । कृष्ण देव हे वेदिका । कृष्णयज्ञ हे यज्ञसीखा । अनन्यपणें दोघे ॥२६॥
कृष्ण पुरुष हे प्रकृति । कृष्ण चैतन्य हे चितशक्ती । कृष्ण परमात्मा हे परमज्योती । अनन्य स्थिती दोघांची ॥२७॥
कृष्ण ज्ञेय तैं तें ज्ञान । कृष्ण ध्येय तैं तें ध्यान । कृष्ण साध्य तैं हें साधन । अनन्यपणें पतिव्रता ॥२८॥
सुवर्ण अधिक जालें जोखुनी काढूनि टाकिलें धरणीं । कर पदक कंकणीं । नाना अलंकार स्त्रियांचे ॥२९॥
तेथें मीनलिया नारी । जैशा आमिषालागी घारी । झोंबताती परस्परीं । माझें तुझें म्हणउनी ॥३०॥
एकी म्हणती माझा चुडा । दुजी म्हणे ओळख फ़ुडा । तिजी म्हणे याचा जोडा । पाहें माझा मजपाशीं ॥३१॥
एकी म्हणती गे फ़ळगट । तेझें कांखेचें माझें ताट । तिजी म्हणे संपुष्ट । माझें आंदण बापाचें ॥३२॥
एकी म्हणे हें माझें कारलें । दुजी म्हणे ही खेंकीं सीजलें । तिजी म्हणे डोळां दांतवण नाहीं केले । बुरसा स्वार्थ इचा घाण तो ॥३३॥
येरी म्हणे गे मोठी चोखाट । सलोभ ईष्टा माखले ओठ । बोल घाणताही मठ । सांडी खटपट देई माझे ॥३४॥
एकी म्हणती माझी जडीत जाळी राखडीसी । दुजी म्हणे डोळ्यांची आंबली पुसी ।
तिजी म्हणे नयनीं विटाळसी जालासी । जालासी रजकीं न लाविसी विटाळ ॥३५॥
येरी म्हणे कटाकटा मठ । म्हणो ये आंबट । किती करशील खटपट । माझा वांटा नीट देई ॥३६॥
येरी म्हणे माझें पदक । दुजी म्हणे वोजी वोळख । तिजी म्हणे जीवा सुख । बोलोन कां करिसी ॥३७॥
अगे हे माझे हातसर । दुजी म्हणे परती सर । तिजी म्हणे मरमर । ते अलंकार पैं माझे ॥३८॥
एकी म्हणे तें हें माझेचि रुपें । कृष्ण घडिले हे सोपे । दुजी म्हणे माझेनि बापें । मज आंद्ण दिधलें ॥३९॥
तुझे हातींची माझी झारी । तुझा गळाची माझी सरी । फ़ुकटा चावटा बेरी । तेल्या घरीं घाण्याची ॥१४०॥
सुनेस म्हणे देवकी । अगे अगे ओढाळाचे लेंकी । ते अलंकार माझे कीं । तूं कैसेनी नेतेसी ॥४१॥
येरी म्हणे मा मिसें । तुम्हांसी लागलें धनपिसें । म्हतारपणें घेतलीत सोसें । माझें माझें म्हणतसां ॥४२॥
यापरी जन विगुंतले सुवर्णा । रुक्मिणी घेउनी गेली कृष्णा । बाप धनलोभाची तृष्णा । निजपति कृष्णा विसरल्या ॥४३॥
मोह रचिला विधातेनी । कनक आणि कामिनी । जी विन्मुख यापासुनी । तोचि जनीं जनार्दन ॥४४॥
नारदें नमस्कारिली ती भीमकी । म्हणे कृष्ण अनुभवीं तूंचि एकी । भली उतरलीस तुकीं । परम सुखी मी झालों ॥४५॥
दोघां केली प्रदक्षिणा । नमस्कारुनी कृष्णचरणा । मग वाहुनी ब्रम्हवीणा । ऊर्ध्व पंथ चालविला ॥४६॥
ऎसी कृष्णलीला विचित्र । महा पातकीयां करी पवित्र । जे आवडी गाती कृष्णचरित्र । धन्य धन्य जीवित्व तयांचें ॥४७॥
एका जनार्दनी नमन । संकल्पेंसी केलें दान । तेणें निरसिलें मीतूंपण । कथाकीर्तन तो सेवी ॥१४८॥


श्रीदत्तात्रेयजन्म 

३४१०.
ऎका दत्तात्रेय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजीं पूर्ण । अनसुया जाण पवित्रता ॥१॥
ऎकोनी शिवाची वाणी । गदगदां हासे भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥
गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज कळेल ॥३॥
ऎकोनि पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतीक्षा करीत । तंव तो मुनी अकस्मात । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥
देखोनियां नारदमुनी । षोडशोपचारें पूजी भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । आणीक कोणी असेना ॥५॥
ऎकोनी हांसला नारदमुनी । ऎकें पार्वती चित्त देउनी । अनसूया अत्रिपत्नी । तुम्हां तिघींहुनी पतित्रता ॥६॥
तुम्हां तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ॥७॥
तों पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥
नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । ब्रिदें तुमचे देईल सोडून । मग गर्व सहजचि गळेल ॥९॥
पार्वतीसी ऎसें सागोनी । स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी आदरें तयातें ॥१०॥
कर जोडूनि करी विनंती । काहीं नवल सांगा स्थिती । मागें झाली जे रीती । वदला प्रति विनोदें ॥११॥
म्हणे धन्य अनसूया पतिव्रता । तुम्हां तिघींहूनि समर्था । तुमचे पुतळे तत्वतां । तिनें तोडरीं बांधिले ॥१२॥
ऎकोनी तटस्थ झाली रमा । आतां काय करुं पुरुषोत्तमा । मजहुनी वाढ ऎसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥
नारद म्हणे उपाय एक । तेथें पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागावें देख । तेणें ते छळेल ॥१४॥
सांगोनी ऎसा वृत्तान्त । सत्यलोकासी गेला ब्रम्हसुत । सावित्री पुसे त्वरित । काहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥
मग तो म्हणे सावित्रीसी । अनसूया ऎशी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशीं । पदा तिघींसी बांधिलें ॥१६॥
सावित्री म्हणे नारदाप्रत । कैसा उपाय करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आम्हांतें येईल ॥१७॥
पाहतां आम्हांपासूनि उत्पत्ती । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोखूं शके ॥१८॥
आम्हांहुनि काय वाड । ऎसें पीडिलें महागूढ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥
मग ती म्हणे नारदासी । काय उपाय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशीं । ऎक तुजसी सांगेन ॥२०॥
प्रार्थूनियां चतुरानना । पाठवावें अत्रिभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥
म्हणावे हे नग्न भोजन । तेणें होईल तिचें छळण । मग यावें सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥
ऎसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती ॥२३॥
ऎकुनी ऎसें वचनीं । तिघे निघाले तत्क्षणीं । स्त्रियांची करुणा देखुनी मनीं । कृपा आली तयांसी ॥२४॥
मग पवनवेगें ते अवसरीं । तिघे प्रवेशले आश्रमाभीतरीं । वाहनें ठेवूनियां दुरी । माध्यन्हकाळीं पैं आले ॥२५॥
तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणें अनसूयादर्शन । ऋषीनें आज्ञा करुन । दाराबाहेर पाठविली ॥२६॥
ते देखोनि अत्रिऋषीनें । तिघांचे केलें सांग पूजने । मग म्हणे येणें काय कारणें । आवश्यक पैं झालें ॥२७॥
तंव दाराबाहेर तिन्ही मूर्ति । ब्रम्हा शिव कमळापती । नमस्कारु झालिया पुसती । काय आज्ञा ते सांगिजे ॥२८॥
ते म्हणे अनसूयेसी । तूं पतिव्रतेमाजीं श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतों तें देई आम्हांसी । म्हणोनि भाकेसी गोंविलें ॥२९॥
मग म्हणती तयाप्रयी । तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुम्ही मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥
देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांसी घालावें भोजन । अनसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली ॥३१॥
ठेवूनियां तिघांचे मस्तकी कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होऊनि सत्वर । करवी स्तनपान तयांतें ॥३२॥
करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनि पालखीप्रती । गाती झाली तेधवां ॥३३॥
मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥३४॥
याकारणें केलें बाळ । आतां राहिलें कर्तुत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा करावी ॥३५॥
जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तंव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्टसंहार पैं केलें ॥३६॥
तैं पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया ॥३७॥
जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा । बहु श्रम पावलासी ॥३८॥
तरी आतां सुखें निद्रा करी । कुमारत्व पावले यापरी । आतां क्लेश नाहीं तरी । पालखींभीतरीं पहुडावें ॥३९॥
आसे आखेद स्तनपान । पालखींत निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीत गायन । भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥
ऎसें गेले बहुत दिवस । मार्ग नाहीं जावयास । न सुटे बाळपणाचा वेष । सामर्थ्य विशेष अनसूयेचें ॥४१॥
उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केलें नारदें ॥४२॥
मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चिंत बैसल्याती । बाळकें करुन तिघांप्रती । अनुसया सती खेळवितसे ॥४३॥
नित्य करवी स्तनपान । षण्मासांचें बाळें करुन । पाळण्यामाजीं निजवून । गीत गायन करीतसे ॥४४॥
पाहतां ऋषिपत्नी जाण । परी सामर्थ्य आगळें तुम्हांहुन । तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन । आतां जाणें शरण तियेशीं ॥४५॥
तंव त्या तिघीजणी बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमुचे सामर्थ्य त्रिजगतीं । प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥
सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमुच्या सामर्थ्या थोर । चराचर नादंत ॥४७॥
तरी आमुचे आम्हीच पती । सोडवूं आपुले सामर्थी । अनसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥
ऎसें बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या ते क्षणीं । लगबग आल्या धांवुनी । अनसूया भुवनीं तत्काळ ॥४९॥
ते देखोनियां ऋषीश्वरें । तिघीं पूजिल्या षोडशोपचारे । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरें सांगिजे ॥५०॥
त्या तिघीजणी बोलती । पाठवावें अनसूयाप्रती । येरें आज्ञा करुनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविलें ॥५१॥
तंव ते पातलीसे त्वरें । केला तिघींस नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती ॥५२॥
तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकांच्या मूर्ती । पुढें क्षितीं ठेविल्या ॥५३॥
तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलूं नेणती वचनीं । तिघी चकित झाल्या मनीं । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥
सर्वही सामर्थ्य वेंचलें । अभिमान धैर्य गळालें । मग लोटांगण घातलें । चरण वंदिले सतीचे ॥५५॥
अनसूया थोर तूं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्हीं लीन जाहलों पहातां । नको निष्ठुरता करुं माये ॥५६॥
जैसे होते आमुचे पती । तैसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥
ऎकोनी सतीत्रयीचें वचन । तिघांचे मस्तकीं स्पर्शे करुन । कृपायुक्त अवलोकून । पूर्वचर्यां ते आणिले ॥५८॥
तिघांचे स्वरुप जैसें होतीं । तैशा केल्या तिन्ही मूर्ती । देव अंतरिक्षीं कवतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥
दुदंभी वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरीं । बोलिले सत्वरीं । अनसूया तूं पतिव्रता ॥६०॥
त्रये देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करुं हो ॥६१॥
मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचें दरुशन । मज न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥
तरी तिघे रुप असावें । एवढें वरदान मज द्यावें । आणीक न लगे स्वभावें । म्हणोनी भावें प्रार्थितसे ॥६३॥
मग देवत्रयाची मूर्ती । करकमळीं जाली शीघ्रगती । दत्तात्रेय नामें ऎसी ख्याती । तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥
वर देऊनि गेला स्वस्थाना । शक्तीसहित आरुढलें वाहना । सर्व देवसमुदाय जाणा । स्वर्गभुवन पातले ॥६५॥
येरीकडे दत्तात्रेय मूर्ती । बालरुपें अनसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कळा ॥६६॥
एका जनार्दन म्हणे । दत्तात्रेय जन्मकथन । भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचें ॥६७॥


हनुमानजन्म

३४११.
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥
श्रूंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकेई रुसली तेथें विघ्न जालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें जाली कथा श्रवण करा ॥६॥
३४१२.
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव जाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऎसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैसे माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥
३४१३.
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां जाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥


प्रल्हादचरित्र 

३४१४.
हिरण्यकश्यपाचे पोटीं । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥
सदा वाचें नारायण । छंद आन नाहीं दुजा ॥२॥
एका जनार्दनीं पाहुनी पिता । क्रोधें तत्वतां बोलत ॥३॥
३४१५.
वायां जन्मलें हें पोर । सदा हरी उच्चार करितसे ॥१॥
न कळे आपुली पैं याती । येणें धरिली हरिभक्ति ॥२॥
एका जनार्दनीं निर्धार । याचा आमुचा वैराकार ॥३॥
३४१६.
करी विचार मानसीं । काय उपदेश पुत्रासी ॥१॥
नावडीचें राज्य धन । सदा पुत्रीं गुतलें मन ॥२॥
काय जन्मला पामर । एका जनार्दनीं भूमीभार ॥३॥
३४१७.
बोलावुनी एकांतासी । सांगे विद्याअभ्यासासी ॥१॥
सकळ विद्यांचें जीवन । मनीं धरी नारायण ॥२॥
एका जनार्दनी जाण । सदा घोकी नारायण ॥३॥
३४१८.
नारायणीं बैसला भाव । दुजा ठाव शून्य दिसे ॥१॥
काया वाचा आणि मन । गुंतला प्राण नारायणी ॥२॥
एका जनार्दनीं हेत । बैसला चित्तांत सर्वदा ॥३॥
३४१९.
पिता क्रोधें पुसे बाळा । काय शिकला तें सांगें ॥१॥
येरु म्हणे नारायण । काहीं यावांचून मी नेणें ॥२॥
एका जनार्दनीं ऎकतां मात । जाहला संतप्त मानसीं ॥३॥
३४२०.
ऎसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय ॥१॥
मुख्य आमुचा जो वैरी । त्यासी चिंती हा निर्धारीं ॥२॥
बाळ नोहे केवळ काळ । एका जनार्दनीं लडिवाळ ॥३॥
३४२१.
सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्वक्ती ॥१॥
यासी आतां करावें काय । शिकविलें ऎको न जाय ॥२॥
एका जनार्दनीं मन । येणें धरिला नारायण ॥३॥
३४२२.
माता म्हणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी ॥१॥
कांहीं नायकशी शिकविलें । विद्याभ्यास वहिलें ॥२॥
एका जनार्दनीं ऎकुनी मात । प्रत्युत्तर तया देत ॥३॥
३४२३.
सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानीं चिंती तो ॥१॥
मज आणिकांचे नाहीं काम । माझा सखा पुरुषोत्तम ॥२॥
मायबाप सर्व गोत । एका जनार्दनीं भगवंत ॥३॥
३४२४.
ऎकोनियां पुत्राचें वचन । मातेनें वर्तमान कथियेलें ॥१॥
तेणें तया क्रोध भरलासे मनीं । दूतालागुनी तत्क्षणीं आज्ञा केली ॥२॥
एका जनार्दनीं करिती यातना । परी नारायणा आठवीत ॥३॥
३४२५.
नानापरी दूत मारिती निष्ठूर । शस्त्रांचें दुस्तर धाय हाणती ॥१॥
अग्नींत घालिती पाणीये बुडविती । ढकलोनियां देता पर्वतशिखरी ॥२॥
एका जनार्दनीं रक्षी नारायण । कोण करीं विघ्न तया भक्ता ॥३॥
३४२६.
विषाची पाजिती पुरीं ढकलिती । परि निर्भय तो चित्ती घेत नाम ॥१॥
संतप्त होउनी पुसताती बाळा । काय वेळोवेळां आठविसी ॥२॥
एका जनार्दनीं नाम जपे होटीं । मानीच चावटी बोल त्याचे ॥३॥
३४२७.
क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥
येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥
एका जनार्दनीं ऎकातांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥
३४२८.
दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥
धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण । स्वयें नारायण करितसे ॥३॥
३४२९.
अवतार नरहरी । केली दैत्याची बोहरी ॥१॥
प्रल्हादासी आलिंगन । स्वयें देत नारायण ॥२॥
भक्तवचनाचें मान । एका जनार्दनीं सत्य जाण ॥३॥
३४३०.
स्तंभ फ़ोडीत कटकट । दाढा व्यंकट विकट । उध्दट वीर विकट । नरकेसरी ॥१॥
जिव्हा लळलळित लटलट । धुरधुरीत कंठ । श्वासें नासापुट उतट । पिंगट जटाजूट दाट ॥२॥
बाण सणसणाट । वज्र दणद्णाट । नखें तिखें तिकट बोट । रागें फ़ोडी पोट ॥३॥
हात तट सुभट भट । नेत्र गरगराट । चंद्र सूर्य गरगराट रे ॥४॥
शब्द कट कट । साधनीं कष्ट फ़ुकट । एका जनार्दनीं नामें वैकुंठपीठ रे ॥५॥


ध्रुवचरित्र 

३४३१.
सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥
भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥
प्रजेचें समाधान अपत्याचें परी । ऐसा राज्य करी न्याय नीती ॥३॥
एका जनार्दनीं होउनी सावधान । ऐका वर्तमान काय पुढें ॥४॥
३४३२.
वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया नसे काहीं ॥१॥
वडील पट्टराणी ममता तिजवरी । धाकुलीस अव्हेरी क्षणक्षणां २॥
ऐसा कांही काळ लोटलियावरी । धाकुलीस निर्धारीं पुत्र जाहला ॥३॥
तयाचें तें नाम ध्रुव पैं ठेविलें । एका जनार्दनीं जाहलें नवल तेथें ॥४॥
३४३३.
पंच वर्षीय बाळ खेळे नाना खेळ । मेळवोनि मेळ सवंगडियांचा ॥१॥
सवंगड्यांत खेळे विटीदांडु चेंडू । नामाचा छंद मुखी सदा ॥२॥
खेळतां खेळतां राजावाड्या आला । न कळे तयाला राजा कवण ॥३॥
एका जनार्दनीं पाहूनियां बाळ । मोहें त्या तात्काळ उचलिलें ॥४॥
३४३४.
अंकावरी घेउनी खेळवी नानापरी । मोहाची तो थोरी ऐशी आहे ॥१॥
वडील ती स्त्री येऊनियां पाहे । राजअंकी आहे कोण बाळ ॥२॥
सापत्न तो भाव धरुनियां पोटी । पदें तया लोटी अंकावरुनी ॥३॥
रडत रडत तेथोनी निघाला । एका जनार्दमीं आला माता जेथें ॥४॥
३४३५.
सांगे मातेप्रती सापत्नें लोटिलें । म्हणोनी वाटलें दु:ख मज ॥१॥
येरी म्हणे बाळा नको करु खेद । दैव नाहीं शुध्द आपुलें तें ॥२॥
आपुलिया दैवीं देवे जें लिहिलें । भोगणें प्राप्त जाहलें आपणांसी ॥३॥
एका जनार्दनीं देवाविण शीण । निवारील कोण दुजा बापा ॥४॥
३४३६.
माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्त त्याचें गुतलें देवीं ॥१॥
मातेलागीं पुसे देव कोठें आहे । येरी म्हणे सबाह्य कोंदलासे ॥२॥
एका जनार्दनीं ऐकोनियां मात । केला प्राणिपात मातेलागें ॥३॥
३४३७.
सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी ॥१॥
नुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला त्वरित वनालागीं ॥२॥
एका जनार्दनीं माता मागें लागे । पुढें लागवेगें पळतसे ॥३॥
३४३८.
जाउनी निरंजनीं तप आरंभिलें । धांवे देवा वहिलें बोभातसे ॥१॥
प्रारब्धाचा ठेवा वैष्णावांचा रावो । नारद तो हा हो आला तेथें ॥२॥
पाहिलासे बाळ सुकुमार सांवळा । दृष्टी कळवळा आला मनीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहुनी निर्धारीं । मंत्र द्वाद्शाक्षरीं सांगतसे ॥४॥
३४३९.
ठेवूनियां हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला ॥१॥
उच्चार करितां त्रिभुवन ठेंगणें । विसरला मनें सापत्न दु:ख ॥२॥
आठवे गोविंद माधव अच्युत । वाचेसी जपत रामनाम ॥३॥
एका जनार्दमीं दासाची कळकळ । धांवला तात्काळ देवराव ॥४॥
३४४०.
वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी ॥१॥
धांवूनियां देव गळां घाली मिठी । आलिंगला पोटीं सदगदित ॥२॥
म्हणे बाळा काय इच्छा पोटीं आहे । माग लवलाहे पुरवीन ॥३॥
एका जनार्दनीं नुठवी दुजी आई । ऐसें कांही देई मजलागीं ॥४॥
३४४१.
ऐकोनियां ऐसें कोमल उत्तर । भक्त करुणाकर काय करी ॥१॥
अढळ ते पदीं स्थापियेला बाळ । जाहला जयजयकार तयेवेळीं ॥२॥
नुठवे दुजी आई ऐसा स्थापियेला । आपण निघाला वैकुंठासी ॥३॥
एका जनार्दनीं भक्ताचें चरित्र । स्वयें राजीवनेत्र वदतसे ॥४॥
३४४२.
अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे ॥१॥
अनंत भक्तांचें अनंते धांवणे । वाढविलें तेणें नामासाठीं ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचा अंकित । हाकेसरसा त्वरित उडी घाली ॥३॥
३४४३.
न पाहे यातीकुळाचा प्रचार । धांवे सर्वेश्वर नामासाठीं ॥१॥
आपुलेंचि नाम आपण वाढवी । भक्तपणा मिरवी आपणची ॥२॥
स्वयें अवतार आपणाचि घेत । एका जनार्दनीं मात ऐका त्याची ॥३॥


उपमन्युकथा 

३४४४.

होऊनि सावधान चित्ता । उपमन्यूची कथा । एका भावें ऐकतां । सायुज्यता पाविजे ॥१॥
उपमन्यु मागितलें । देवें तयासी दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देऊनी परियेसा ॥२॥
ब्राम्हणासी पुत्र झाला । पित्यासी हर्ष वाटला । थोर कष्टें वाढविला । स्नेहो आशा धरुनी ॥३॥
बाळक तो जाणता । पित्यासी उपजली चिंता । एका जनार्दनीं तत्वतां । वचनार्थ परिसावा ॥४॥
३४४५.
मातेसी म्हणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । मातें देईं भोजना ॥१॥
मग ते करड्या वांटूनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध म्हणोनी । वाटीयें भात कालविला ॥२॥
तंव शेजारीं ब्राम्हणें श्राध्द केलें । तयाचिया घरां जेवावया नेलें । बरवें उत्तम पक्वान्न वाढिलें । नानापरी भोजना ॥३॥
बाळासी वाढिली दूध क्षीरी । तें जेविलें पोटभरी । एका जनार्दनीं निर्धारी । गेलें आपुल्या गृहासी ॥४॥
३४४६.
गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥
पुढें ती करड्या वांटुनी । काढिले शुभ्रपाणी । येरें टाकिलें थुंकोनी । म्हणे माते कालीचें नव्हे ॥२॥
बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दिधली दूध क्षीरी । आम्हां दुष्कृताचे घरीं । तें कैंचे रे बाळका ॥३॥
कोठें आहे तो श्रीहरी । दाखवी मज निर्धारी । एका जनार्दनीं परी । ध्यान लागलें हरीचें ॥४॥
३४४७.
बरवी श्रीहरीची मूर्ती । देव्हारा पूजिली होती । बारे हा लक्ष्मीचा पती । दुध मागे तयासी ॥१॥
ऐशीं तिघें उपवास करिती । मातापितरें चिंतेत पडती । जन मिळाले बहुती । तयासी उठवूं आदरिलें ॥२॥
बाळा रे तुज कारण । बांधूं सहस्त्र गोधन । येरु म्हणे नायके वचन । मज देईल श्रीहरी ॥३॥
माता म्हणतां हे वचन । दुध आणिलें ब्राम्हणाचे घरींहून । एका जनार्दनीं वचन । असंतोषित बाळ ते ॥४॥
३४४८.
दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥
पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥
तंव बोले उपमन्यु । भोजन न करी दुधावांचून । श्रीहरी देईल मजलागुन तरीच भोजन करीन ॥३॥
देवा त्वां ध्रुवा अढळपद दिलें । मजलागी निष्ठुर मन केलें । एका जनार्दनीं बोले । बाल वाचे सदद ॥४॥
३४४९.
ऐकोनी दुधाची बोली । का मनीं निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥
अंबऋषीच्या बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनि उणिवाला । दूध कांहे न देसी ॥२॥
शरीर कर्वतीं भेदीन । अष्टांग योग साधीन । भक्तिबळे तुज काढीन । हुडकोनी तत्वतां ॥३॥
ऐकोनी तो शब्द करुणा । एका जनार्दनीं धांवे जाणा । माझिया भक्ताचिया वचना । उणिवता येऊं नेदी ॥४॥
३४५०.
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥
बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥
देव म्हणे बाळकातें । काय अपेक्षा माग मातें । बाळ बोले दूधभातें । मातें देईं सत्वर ॥३॥
हासे वैकुंठीचा राणा । बाळक हें अज्ञाना । एका जनार्दनीं शरण । काय मागणें मागत ॥४॥
३४५१.
ऐके देवा सावधान । एवढे पुरवावें जाण । दुधावांचुनी दुसरें आन । न मागे मी सर्वथा ॥१॥
मातापिता उपमन्यु । तिघे गरुडावर बैसून । क्षीरसागरीं नेऊन । इच्छा त्यांची पुरविली ॥२॥
राज्य दिधलें क्षीरसागरीचें । अमर शरीर केलें त्यांचे । नित्य दर्शन श्रीहरीचें । सायुज्यता दिधली ॥३॥
एका जनार्दनीं शरण । उपमन्यु आख्यान पावन । श्रीव्यासें कथिले जाण । तेंचि येथें वर्णिलें ॥४॥


सुदामचरित्र 

३४५२.
सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी ॥१॥
बाळपणीं खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृहीं ॥२॥
कृष्ण द्वारकेसी आला । सुदामा राहिला सुदामपुरीं ॥३॥
एका जनार्दनीं साचे । परिसा चरित्र भक्ताचें ॥४॥
३४५३.
पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण ॥१॥
समर्थे तीं सत्व टाकिती बापुडीं । दुबळ्या तांतडीं कोण पुसे ॥२॥
एका जनार्दनीं काळाचें तें मान । सुदामा ब्राम्हण दैन्यवाणा ॥३॥
३४५४.
कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले ॥१॥
आणूनियां तृण बीज तें भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥
वस्तीसी त्या ठाव न देती कोण्ही । दुर्बळ म्हणोनि उपहासीती ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें भोगी दु:ख । तयासी तें सुख स्वप्नीं नाहीं ॥४॥
३४५५.
एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी ॥१॥
कांता पुत्र स्वयें क्षुधेनें मरती । होतसे फ़जिती प्रपंचाची ॥२॥
बैसोनियां कांता विचार सांगे । द्वारके लागवेगें जावें तुम्हीं ॥३॥
कृष्णाजी कृपाळु बंधु तुम्हां मानी । एका जनार्दनीं कांता बोले ॥४॥
३४५६.
तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥
पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥
राक्षसाचे कुळीं बिभिषण जाण । लंकेसी स्थापन चंद्रार्क तो ॥३॥
एका जनार्दनीं उदार सर्वज्ञ । एक नारायण समर्थ तो ॥४॥
३४५७.
ऐकोनियां कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचें ॥१॥
म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥
देव द्विज गुरु या तिघांचें दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥
एका जनार्दनीं करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
३४५८.
पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥
अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देईं मज ॥२॥
ऐकोनियां ऐसें पतिव्रतेचें वचन । जाहलें समाधान चित्त तेणें ॥३॥
एका जनार्दनीं हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
३४५९.
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥
पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥
शत एक ग्रंथी वस्त्रासी बांधोनी । निघाला तेथोनि झडझडा ॥३॥
पतिव्रता बोले लवकरी यावें । एका जनार्दनीं बरबों म्हणोनि निघे ॥४॥
३४६०.
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणें संतोषलें चित्त त्याचे ॥१॥
तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥
एका जनार्दनीं द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण तें निश्चितीं सांगा द्विजा ॥३॥
३४६१.
करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती ॥१॥
ऐकोनियां दूत हांसती मानसीं । जगदबंधु सर्वांसी होय दुरी ॥२॥
एका जनार्दनीं वंदुनी सांगती । द्विज एक अवचितीं बंधु म्हणे ॥३॥
३४६२.
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपणींचा जाण सुदामा तो ॥१॥
उठोनि सत्वर धावें आलिंगना । वैकुंठीचा राणा लवलाहे ॥२॥
एका जनार्दनीं देउनी आलिंगन । आणिला संबोखून सुदामा तो ॥३॥
३४६३.
आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥
वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥
अष्टनायकादि मिळालीसे मांदी । नमिती आनंदी सुदाम्यासी ॥३॥
एका जनार्दनीं सारुनी भोजन । सुखरुप शयन करविलें ॥४॥
३४६४.
प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥
सोळा सहस्त्र शत अष्ट त्या नाइका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥
घालूनियाम स्नान वस्त्र अलंकार देती । भोजन सारिती यादवपंक्ती ॥३॥
एका जनार्दनीं बैसले निवांत । मग कृष्णनाथ काय बोले ॥४॥
३४६५.
वहिनीनें आम्हां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥
म्हणे माझें वस्त्र ग्रंथीं कोठें आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥
बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वतां बोलतसे ॥३॥
सोडोनियां ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवें ॥४॥
एक ग्रास मुखीं घालितांचि जाण । एका जनार्दनीं खूण समजली ॥५॥
३४६६.
मनामधीं तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥
म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥
आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनीं ॥३॥
एका जनार्दनीं हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥
३४६७.
अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फ़ार कष्ट ॥१॥
विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हां । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥
जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगीं ॥३॥
एका जनार्दनीं तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचें तें ॥४॥
३४६८.
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥
विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥
एका जनार्दनीं ऐसें करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥
३४६९.
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ ॥१॥
एक मास येथें राहिलें निवांत । घरची तों मात न कळे कांही ॥२॥
जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आतां ॥३॥
एका जनार्दनीं नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥
३४७०.
रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणुनि द्यावें ॥१॥
आणूनियां ग्रंथीं देई जगन्माता । वस्त्र अलंकार तत्वतां काढुनी ठेवा ॥२॥
जीर्ण तें वस्त्र करुनी परिधान । वंदिले चरण कृष्णजीचे ॥३॥
एका जनार्दनीं करुनी नमन । निघाला ब्राम्हण तेथोनियां ॥४॥
३४७१.
ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान ॥१॥
जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों द्यावा ॥२॥
एका जनार्दनीं बोलोनियां ऐसें । तांतडी निघतसे क्रमीत मार्ग ॥३॥
३४७२.
बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥
आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथें नारायणें काय कीजे ॥२॥
एका जनार्दनीं करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥
३४७३.
चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे ॥१॥
श्रमलासे मनीं न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलों ॥२॥
एका जनार्दनीं करी कवतुक । प्रधान सेवक दूत आले ॥३॥
३४७४.
सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचें ॥१॥
तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी । द्वारकेसम पुरी पोह्यांसाठी ॥२॥
भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठपती । ऐशी ज्याची कीर्ति त्रिभुवनीं ॥३॥
एका जनार्दनीं देव तो तुष्टला । राज्याधीश केला अकिंचन ॥४॥


संदीपनकथा 

३४७५.
आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषी ॥१॥
कृष्ण बळिराम सुदामा । आले सदगुरुच्या ग्रामा ॥२॥
लोटांगण नमन करिती । कर जोडोनि तिष्ठती ॥३॥
स्वामी करा अंगीकार । आम्ही विद्यार्थी अनुचर ॥४॥
अनन्य भावें आलों शरण । एका विनवी जनार्दन ॥५॥
३४७६.
करिती सडा संमार्जन । आणि गोमूत्र जीवन ॥१॥
वस्त्रें पात्रें प्रक्षाळिती । गुरुसेवेंत सेविती ॥२॥
चौदा विद्या चौसष्ट कळा । शस्त्रास्त्र धनुर्विद्या सकळा ॥३॥
उपासना बीज मंत्र । आत्मज्ञान देव शास्त्र ॥४॥
गुरुसेवें सर्व प्राप्ती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥
३४७७.
गुरुपत्नीं आज्ञापिलें । तिघे इंधनासी गेले ॥१॥
घोर क्रमिती कांतार । माथां बांधोनी काष्ठभार ॥२॥
रात्र झाली सुटला वारा । मेघ वर्षे मुसळधारा ॥३॥
म्हणे चपळा गारा रिचवती । तिघे थरथरां कांपती ॥४॥
म्हणे एक जनार्दनु । मग उदया आला भानु ॥५॥
३४७८.
कळला गुरुसी वृत्तान्त । आले वन धुंडाळीत ॥१॥
गुरु शिष्या हांका मारी । तिघे आले त्या अवसरीं ॥२॥
पोटासी धरुनी आणिलें घरां । उतरिला काष्ठभारा ॥३॥
मुख कुर्वाळुनी हातें । वर दिला सदगुरुनाथें ॥४॥
म्हणे मागा गुरुदक्षिणा । एका विनवी जनार्दना ॥५॥
३४७९.
मग बोले संदीपन । माझा पुत्र दे आणून ॥१॥
स्नान करितां अकस्मात । बुडाला तो सागरात ॥२॥
गोष्ट ऐकोनी रामकृष्ण । गेले समुद्रीं धाऊन ॥३॥
सिंधु पायासीं लागला । गुरुपुत्र पांचजन्यें नेला ॥४॥
शोधोनि वधियेला नित्य । गुरुपुत्र नाहीं तेथें ॥५॥
वधियला पांचजन्य । एका विनवी जनार्दन ॥६॥


पांडवगृही ब्राह्मणभोजन 

३४८०.
पांडवांचे गृहीं जाण । असंख्य जेविले ब्राम्हण । धर्माचें विस्मित मन । संख्येलागीं ॥१॥
तें कळलें वैकुंठा । निर्मिली तेव्हां घंटा । तेव्हां ते गर्जे देखा । संख्या नाद ॥२॥
तेथें व्यास देवाचा सुत । शुकदेव अवधूत । ब्राम्हण शेष व्हावे प्राप्त । म्हणोनि येतां जाहला ॥३॥
रात्रसमयीं सुखी एकीं । शीत घातलें मुखीं । घंटानाद सकळिकीं । ऐकिला कानीं ॥४॥
कृष्ण पाहे ध्यानीं । शुक्रदेव आणिला धुंडोनी । पूजा नमस्कार करुनी । गेलासे वना ॥५॥
एका जनार्दनीं जाण । धर्मे केला प्रश्न । तोचि सखा श्रीकृष्ण । सांगतसे ॥६॥


काशीमाहिमा 

३४८१.
धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथें वास करी विश्वनाथ ॥१॥
तयाच्या दर्शनें प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती पायां लागताती ॥२॥
भागीरथी स्नान जयालागीं घडे । समूळ हें झडें पाप त्याचें ॥३॥
काळभैरवाचें दर्शन घेईल । तात्काळ जाईल वैकुंठासी ॥४॥
प्रदक्षणा पंचक्रोशीची जो करी । होईल अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥
धुंडिराजस्वामी दृष्टी जो न्याहाळी । होईल त्या होळी सर्व पापा ॥६॥
तेथें जाउनियां करी अन्नदान । तया नारायण ह्रदयी वसे ॥७॥
एका जनार्दनीं नित्य काशीवास । परम सुखास पात्र झालों ॥८॥


रामरावणाची एकरूपता 

३४८२.
रावण म्हणे नवल चोज । माझें कटक पारखे मज । अश्व आणि नर गज । रामजी स्वयें ॥१॥
निशाचर वीर । राम बाणले साचार । रामरुप वानर । सरसावले ॥२॥
युध्दीं ठक पडिलें लंकानाथा । जीऊचि पारिखा आतां । इंद्रियांची सत्ता । रामरुप जाली ॥३॥
शस्त्रांचें तिखटपण । राम जाला आपण । शत्रुमित्र संपूर्ण । राम स्वयें ॥४॥
युध्दीं पारखें अंत:करण । मन जालें उन्मन । अहं तें सोहं जाण । होउनी ठेलें ॥५॥
चित्त जालें चैतन्य । बुध्दि ते समाधी धन । देह तो विदेह पूर्ण । राम जाला ॥६॥
राम पारखें केले लंकागड । दृढ राम जाला दुर्ग आगड । न झुंजतां अवघड । घेतला रामें ॥७॥
रामें घेतलें घर । राम जाला कलत्रपुत्र । अवयव अलंकार । राम झाला ॥८॥
मी म्हणे हा अवघड गड । तंव राम जाला गडीचे दगड । महामार अति गूढ । राम जाला ॥९॥
आतां कायसी निज देह निकुंभिला । येथें कोण मानी मोह कुंभकर्णाचे बळ । बळाच्या सबळ बळा । राम जाला ॥१०॥
एका जनार्दनीं निजभावें युध्द पूर्ण । रावणचि आपण राम जाला ॥११॥
३४८३.
रामें रावण रणीं । निवटिला निजबोध वाणीं । येर सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला ॥१॥
दहा मुखांते छेदिलें । शेखीं विश्वमुखें केलें । रणीं रामें सुख दिधलें । परम सुख ॥२॥
राम तो वैरी नव्हे राजा । सखा जिवलग माझा । दहा मुखें वीस भुजा । फ़ेडिला केरु ॥३॥
नश्वरा राज्य नेलें । रावणपण गेलें । अक्षयीं राज्य दिधलें । श्रीरघुनाथें ॥४॥
माझे देह संदेह छेदिलें । ली वेदामृत पाजिलें । ऐसें बोलतां बोलें । बोलवेना ॥५॥
राम रावण रणीं । बोधाची झोट धरणी । एका जनार्दनीं । मिनलें एकपणीं ॥६॥


सीता-मंदोदरींची एकरूपता 

३४८४.
मंदोदरी पोटीं । सीतेसी व्हावी भेटी तयेसी करुं गोष्टी । स्वानुभवें ॥१॥
तंव दशानना मनीं । वश्य व्हावी शयनीं । धाडिली अशोकवनीं । मंदोदरी ॥२॥
तंव दृश्या दृश्य मिळे । विरालियाही वरदळे । मिनलिया प्रीति मिळे । अहंत्यागें ॥३॥
परेसहित गोष्टी । परतोनी पडली मिठी । शब्द निमाला पोटीं । नभाचिये ॥४॥
निखळ सावधानें । बोलेविण बोलणें । परिसतीं शहाणे । सर्वांग श्रोते ॥५॥
तेथींची ही मात । आहाच न चढे हातां । जीव हा जीवा आंत । घालूनि पहा ॥६॥
नवल मंदोदरी छंदु । सीतेसी अनुवादु । रामरुपीं संवादु । स्वानुभवाचा ॥७॥
राम सकळ देहोदेहीं । रावणीं काय नाहीं । दुराग्रह तुझा ठायीं । जानकीये ॥८॥
राम सकळां देहीं आहे । रावणें केलें काये । हेंचि सांगणें माये । विशद करोनी ॥९॥
रामीं ठेवुनी रती । रावणीं अति प्रीती । करितां काय स्थिती । उणी होय ॥१०॥
येरी म्हणे अभेद रामराणा । उरी कैंची रावणा । साच ती मीतूंपणा । ठाव नाहीं ॥११॥
ऐसीये हातवटी । रावंणां कैंची भेटी । समूळ तुझिया गोष्टी । आहाच गे बाईये ॥१२॥
राम व्यापक कीं एकदेशी । सांगे पां मजपाशीं । सकळ देह त्यासी । रिते कीं पूर्ण ॥१३॥
येरी म्हणे रावणा वेगळे देख । व्याप असावे एक । तरी त्यासी व्यापक । होईल सुखें व्यापक ॥१४॥
व्याप व्यापक दोन्ही । गेली हारपोनी । रामरावण मानी । कवण तेथें ॥१५॥
दृश्याचिये भेटी । दृश्यपणेंसी उठी । तेणेंसी झालिया तुटी । तेंही नाहीं ॥१६॥
नाहींपणें असे । असें तेचि दिसे । तेथें रावणाचें पिसें । कायसें गे बाईये ॥१७॥
तेथें अवस्था मंदोदरी । स्वेद कंप शरीरीं । चढली आनंदहरी । स्वानुभवाची ॥१८॥
कष्टी म्हणे माय । देखिले तुझे पाय । सुख झालें काय । केवीं सांगों ॥१९॥
ऐसें बोलतां बाष्प कंठी । मन मागुती नुठी । चित्तें घातली आठी । चैतन्यासी ॥२०॥
पाहे सावधान । निरसूनियां मन । रामरुपीं नयन निडारले ॥२१॥
न्याहाळितां आत्मबिंब । उचटत आहे नभ । तंव त्या दोघी स्वयंभ । तेचि जाहलिया ॥२२॥
एका जनार्दनीं । एक जालिया दोन्ही । ऐसिये अशोकवनीं । शोक कैंचा गे बाईये ॥२३॥


शिवशक्ती विवाह 

३४८५.
हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥
मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥
नांवा येव्हडिया बाळा अति नोवरा । कुवारीच्या संसारा शून्य जालें ॥३॥
येणें जाणें ठेलें भोगणें खुंटलें । नारदाचेनी बोलें ऐसी दशा ॥४॥
काय कुमारी तया दिधली हे बाळा । इचिया कपाळीं कवण जाणे ॥५॥
शकुनालागीं दासी उभ्या पूर्ण कळसासी । पांच मुखें वरासी तिन्ही डोळे ॥६॥
दारा वरु आला मुद पैं वोवाळी । साजुकासी घाली माळ गळां ॥७॥
सासू म्हणे कवणीं दिधली दुर्बुध्दी । विकल्याचा नंदी गोमाशा लावी ॥८॥
लग्नघडी आली अंतरपाटू धरा । अतिशयें नोवरा उंच देखा ॥९॥
डोळ्यासी पुरे ऐसा नव्हे नोवरा । अंतरपाटू पुढा काय धरुं ॥१०॥
कन्यादान वरा गोत्र पैं उच्चारा । वृध्द परंपरा आहे वेगीं ॥११॥
बापु तो नाठवे माय ते मी नेणें । कूळ गोत्र लाहणें नाहीं आम्हां ॥१२॥
बहुला वधुवरें संभ्रम सोहळा । अक्षवाणें बाळा करुं आल्या ॥१३॥
तंव कंठीचा वासुकी दीपा फ़णु करी । धुधु:कारें नारी पळालिया ॥१४॥
प्रात:काळ जालीया काढिला भस्मारा । विभूती शरीरां लावियेली ॥१५॥
अगे हा काळाचाही काळु नव्हे धारी जाणा । संसारी लाहाणा जांवई नव्हे ॥१६॥
लग्ना येरे दिसीं उटणें मांडलें । धवळ आरभिलें संभ्रमेशी ॥१७॥
धवळामाजीं गाणीं गाईलें रामानाम । ऐकोनियां प्रेम वरा आलें ॥१८॥
रामनाम ध्वनी ऐकतांच कानीं । स्वेदु कंपु नयनीं अश्रु आले ॥१९॥
उन्मळिता दृष्टी बाष्पु दाटे कंठीं । मूर्च्छा पूर्ण सृष्टी विकळ पडे ॥२०॥
वरा पायरवूं रक्षा पैं कपाळा । त्रितीय नेत्रीं ज्वाळा उठलिया ॥२१॥
नोवरा हा नव्हे संसारु विवसी । देहभावें कवणासी नेदी उरो ॥२२॥
वेगीं वधुवरा चौक न्हाणें करा । उकलिती सुंदरा जटाभारु ॥२३॥
वराचिया माथां सोज्वळ सुंदरी । येरी म्हणे नोवरी मी महेशाची ॥२४॥
गौरी ते अर्धांगीं सवती बैसे माथां । ऐसी याची कांता उमा गेली ॥२५॥
हा अकुळी अती वृध्द कां केला समंधु । जिवेसी विरोधु पडिला साचें ॥२६॥
जेथें वडिलाधारें नाहीं तेथें बोळवण काई । कुंवारी कवणे ठायीं दिधली देखा ॥२७॥
जेथें संघात अभाव तेथें येव जावो । जिण्यामरणा ठावो नुरेची ईसी ॥२८॥
विवेकेंसी जेथें परतलिया श्रुति । गौरी त्याचे हाता लावियेली ॥२९॥
माया माहेर खुंटलें संकल्पें तुटलें । ममत्व विटलें आजिचेनी ॥३०॥
बहु काळा जुनाट त्यासी शेषपाटु । संसारा शेवटु जाला माये ॥३१॥
एका जनार्दनीं प्रकृति प्राणेश्वरें । मिरवती बोहरें एकपणें ॥३२॥


गंगा गौरी कलह 

३४८६.
जगाचा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासी विद्या अविद्या दोघी कांता । एकी माथां अर्धांगी ॥१॥
पाहता ईश्वर करणी । माथां बैसविली राणी । हा महिमा वेदीं पुराणीं । गाती कीर्तनीं निरंतर ॥२॥
अविद्या आणि ईश्वर । दोहीं मांडिला घराचार । कैसी अनन्य भक्ति सधर । आवडी थोर पैं देखा ॥३॥
दोघां एकची नेसणें । दोघां एक सत्ता बैसणें । एकें अंगां दोनीपणें । संपादणी करिताती ॥४॥
दोघां एकची चाखणें । दोघा एकची देखणें । दोघां आनु माजी असणें । सावकाश सहजें ॥५॥
दोघां आवडी कैसा देख । येरयेरांविण नेघे उदक । दोघां मिळोनी एक सुख । अति संतोष येरयेरां ॥६॥
जैं उभयां मेळविलें । तैंचि शिवा शिवत्व कळे । प्रियानें देखतां सगळें । शिवत्वही सांडिजे ॥७॥
दोघा एकत्र बसणें । दोघा मिळोनी एक करणें । दोघे वर्तती एके प्राणें । दोनी दावणें एकपणी ॥८॥
शिवत्व लोपुनी शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता अहेवें । रुपें नांवें शिव पूजी ॥९॥
दोघांपासुनी जालें जग । परि न दिसे तिसरें अंग । न तुटे अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दाखवितां ॥१०॥
पतीविण जे पतिव्रता । अवघीच विरे पैं तत्वतां । जी विण असतुची नसतां । होये सर्वथा गोसावी ॥११॥
शिव नि:संगु जो पैं सदा । क्रिया करणेंविण नुसुधा । त्यासही सुखदु:खाची बाधा । या प्रमदा भोवविजे ॥१२॥
यापरी तो नोवरा । अविद्या गोंविला घराचारा । मग त्याचियाची शरीरा । अर्धांगीं बैसविली ॥१३॥
गंगे न देखवे दृष्टीं । सवतीमत्सरु उठिला पोटीं । सद्विभागें जटाजुटीं । होती मुकुटीं मौळली ॥१४॥
सविद्या गंगा मुकुटीं । वैराग्याचे प्रवाह लोटी । शिवाची उपरमली दृष्टी । न करी गोष्टी भोगाची ॥१५॥
अखंड वसे ते एकांतीं । प्रकृति न साहे पार्वती । सांडुनी अवघी हे प्रवृत्ति । मग अद्वैतीं रहिवासू ॥१६॥
ते संधी आला नारदमुनी । देखोनि शिव शंकला मनीं । मग बैसला तो ध्यानीं । म्हणे कळी हा झणीं लावा ॥१७॥
गुज सांगितलें प्रियेसी । वेगीं लावी ऋषीसी । हासें आलें नारदासी । मग कलहासी उत्पादी ॥१८॥
नारद नमी पार्वतीसी । सांगे शिव केवी गुंतले ध्यानासी । आवो तूं भोळी ऐसी कैसी । तो आणिकीसी रतला ॥१९॥
मी कळीलावा हें पुढें । माझें वचन मानिसी कुडें । पैल पाहें मुगुटाकडे । दिसे रुपडे सुरेख ॥२०॥
आधींच तंव ते उताविळ । वरी नारदें चेतविली प्रबळ । मज असतां कोण गे बरळ । मुकुटीं सर्व मोकाट ॥२१॥
येरी म्हणे बाई तुम्ही कां नेणा । शिव शिवप्रिया मी अंगना । मान राखो वडीलपणा । कोपू मना नाणावा ॥२२॥
पापें जया वसे पैं गा । तेणें आलिंगिजे गंगा । ते तूं जडली शिवा अंगा । नातळे लिंगा उधटे ॥२३॥
माझेनी अंगे पाप पळे । हें जाणिजे आश्वनिळे । विष निस्तारिजे माझेनी मेळे । द्वेष कुटिळे सांडी पां ॥२४॥
चढला कोपाचा बासटु । गंगे तुझा बहु गे नेटु । ठकारे भुलविला निळकुंठ । माझा विठु घालिसी ॥२५॥
अगे तूं गौतमें नेलीसी । निर्लज्जे मागुती आलिसी । येरी म्हणे शिव रावणा दिधलीसी । माझेनी बापें सोडविले ॥२६॥
गंगे तूं नुसुधें उदक । तुजमाजीं कई रमणीय सुख । येरी म्हणे जनीं त्र्यंबक । जेणें मस्तकें धरियलें ॥२७॥
अगे तुज जवळी भगवें । आणिक बोडिकें अवघें । जट्याळ गाट्याळ तुजसवें । तेथें काय शिवें भोगिजे ॥२८॥
गिरिजे नोळखिसी पायरी । मी मस्तकें तूं पायांवरी । तुझ्या अंगीं दोष भारी । परि नव्हेरी भोळा हा ॥२९॥
जैं गे झालें तुझें लग्न । भटा झालें वीर्यस्खलन । एव्हढें अंगीचे लक्षण । केवीं मस्तक इच्छिसी ॥३०॥
गंगे तूं वाजट गळदट । माथा वाहिलीसी धीट । कांहीन बोलसी नीट । विद्या उध्दट तुजमाजीं ॥३१॥
अगे तुं शिवें शापिलासी । तैं गे शांतनीनें नेलिसी । तैथें हिंवसुतें व्यालिसी । केवीं आलिसी मस्तका ॥३२॥
उमे भीतसों तुझिया कोपा । आगीं रिघोनी मारविलें बापा । नरसुरां आटूं पहा पां । सुधी संतापा पैं नाहीं ॥३३॥
दक्षा मारविलें यज्ञिष्टा । ब्रम्हहत्या तुझा वांटा । येव्हढा अंगीं दोष मोठा । झणे नीळकंठा आतळसी ॥३४॥
गंगे तुजमजीं खळाळ । तेणें तूं गर्जसी सबळ । शिवें सोसिजें खळखळ । माझें कपाळ उठिलें ॥३५॥
माझें लागतां खळाळ । तरले सुरनर सकळ । तुझेंचि कां कठीण कपाळ । द्वेषें छळण करितेसी ॥३६॥
गंगे तुज ऐसी ओंगळ । आन न देखें मी कुश्चिळ । मच्छ कच्छ विष्टा तें जळ । आणि शेवाळ सर्वांगीं ॥३७॥
ऐकोनि गंगे आलें हांसें । काय बोलसी वावसे । चराचर जें दिसतसे । तें तें असें मजमाजीं ॥३८॥
गंगे तूं जासी सागरा पोटीं । हें प्रत्यक्ष जगु देखें दिठी । पुराणी ही त्याची गोठी । गंगा सागरगामिनी ॥३९॥
उमे तुझा खोटा भावो । गिरिसागर माझा देवो । शिवावांचोनि पहाहो गमनागमन मज नाहीं ॥४०॥
गौरी गंगेतें म्हणें धांगडी । येरी म्हणे घर रिगालिसी आवडी । बापें बेल वहावया मिसें लाविली गोडी । तैसी फ़ुडी मी नव्हे ॥४१॥
वर्मे क्रोधे चढल्या क्रोधा । नारदु हांसतु खदखदां । भलिया मिनलों विनोदा । दोहीच्या शब्दा साक्षी तो ॥४२॥
तुज कुटिल जाणोनि मानसीं । शिरु तारकु ब्रम्ह उपदेशी । भावों नाहीं त्या वचनासी । छळूं जासी श्रीरामा ॥४३॥
देववचनीं नाहीं भावो । तंववरी न तुटे देहसंदेहो । कैसेनि राहे काम कलहो । न्याय अन्यायो न कळे ॥४४॥
तूं अविद्या सदा विन्मुख । यालागीं नेणसी निज सुख । जगाचे देखसी दोख । कामें सुख मानिसी ॥४५॥
आम्ही तंव शिववचनीं सन्मुख । अखंड आम्हां आत्मसुख । शिवावांचूनियां देख । आन नाहीं सर्वथा ॥४६॥
तुझा जावयासी द्वेष । कळे भांडण्याचें मिष । कलहो अंतीं उपजे सुख । परम निर्दोष त्या नांव ॥४७॥
पाहे पां मुळींच्या मिळणी । आम्ही तुम्ही एकी दोघीजणी । शिणलिसी माय गे बहिणी । द्वेषु मनीं न धरावा ॥४८॥
जें सांगितलें सदाशिवें । तें ह्रदयी धरावें निजभावें । तेणें द्वेषाद्वेष न संभवे । पालट पावे वृत्तीशीं ॥४९॥
त्याची वृत्ति परतोनी पाही । देहीं प्रगटेल विदेहीं । मग देह विदेह दोन्ही नाहीं । निजतत्व ठायीं होउनी ठासी ॥५०॥
ऐकतां गंगेचें वचन । गिरिजें चालिलें स्फ़ुदंन । धांवूनि दिधलें आलिंगन । समाधान पैं झालें ॥५१॥
ते वेळीं मिनले मनामन । उपनिषदां पडिलें मौन । देखणें ठेलें भिन्नाभिन्न । शिवचैतन्य अनुभवीं ॥५२॥
शिव तो निजरुप सकळ । गंगा सच्छक्ति निर्मळ । येरी अविद्या चपळ । नारदु केवळ निजबोधु ॥५३॥
दोहीं शक्तींचा फ़िटला भेदु । सकळीं सकळा शिवूचि श्रध्दु । एका जनार्दनीं बोधु । परमानंदु प्रगटला ॥५४॥


रुक्मिणीस्वयंवर हळदुली 

३४८७.
काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झालें तिये ॥१॥
अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥
शेष कूर्मासनीं सतशक्तिपासुनी । भूमिका शोधूनि शुध्द केली ॥३॥
तयावरी देख बहुलें सुरेख । देखतांची सुख होय मना ॥४॥
उठिती वधूवरें हळदुली स्वानंदे । लाज मध्यें मध्यें परम प्रीती ॥५॥
नोवरा मेघश्याम बहुलाल पुरुषोत्तम । उटणी या संभ्रम मूळ केलें ॥६॥
कृष्णमेचु अलंकार लेवूनि सनागर । बैसली सुंदर वामभागीं ॥७॥
वराअंगी भली नोवरी बिंबिली । म्हणती प्रकाशली पुरुषोत्तमें ॥८॥
नोवरी शहाणी आपुला निजगुणी । वश्य चक्रपाणी करुनी ठेली ॥९॥
मुळें पाठविल्या आल्या बारा सोळा । करवली वेल्हाळा उन्मनी चाले ॥१०॥
पदोपदीं त्याग करितसे आनेग । वराचें तें अंग टाकूनि आली ॥११॥
आणिक नवजणी आल्या व-हाडिणी । जयाच्या वचनीं वरु वर्ते ॥१२॥
त्या हितगुजाचिया वरा निजाचिया । सदा यशाचिया काय समीप असती ॥१३॥
सकलांमाजीं वृध्द शांति पैं प्रबुध्द । ते म्हणे हा विध ऐसा आहे ॥१४॥
सर्व स्वयंवरा कुरवंडी करा । मग पाय धरा उटणीया ॥१५॥
उजळूनियां वाती अक्षता पैं देती । भीमकीये म्हणती वेगु करी ॥१६॥
तंव भवया देऊनियां गाठीं न पाहे ते दिठी । सखी म्हणे गोठी कळली मज ॥१७॥
तंव शांति म्हणे सरा सांगेन ते करा । कुरवंडी या वरा ऐसी नोहे ॥१८॥
जया दीपमेळी नाहीं धूम काजळी ।तो दीपु उजळी निरंजना ॥१९॥
ऐकोनि ते बोली भीमकी आनंदली । मनीं म्हणे भली साधु होसी ॥२०॥
मनोगत कळे ऐसें संवाद जे मिळे । तें दैव न कळे काय वश्य झाली ॥२१॥
तेज बीज रुप प्रकाश अमुप । चिद्रत्नाचे दीप भीमकी लावी ॥२२॥
ते प्रकाशता प्रभा सूर्या लोपे उभा । कोंदलेसे नभा लखलखीत ॥२३॥
तो पाहतां प्रकाशु अवघा ह्रषीकेशु । तंव तंव उल्हासु भीमकीयेसी ॥२४॥
त्या प्रकाशावेगळी न निवडे ते बाळी । निजभावें वोवाळी प्राणनाथा ॥२५॥
धन्य तुझें दैव सिध्दी गेले भाव । घेऊनियां नांव पाय मागें ॥२६॥
येरी म्हणे पोटीं काय बोलो ओठी । नांवांची हे गोठी नाहीं यासी ॥२७॥
याच्या नामभेदा नेणवेचि वेदां । नेती म्हणोनि सदा परतला तो ॥२८॥
जेथें रुपाचा दुष्काळू नामाचा विटाळू । उच्चारीचा चळू केवीं चळे ॥२९॥
म्हणे कळलें आतां गो इंद्रिया नियंता । गोवळा म्हणतां दोष नाहीं ॥३०॥
ऐसे विचारुनि बाळा न्याहाळी चरणकमळा । मग म्हणे गोवळा पाय देसी ॥३१॥
तंव पिटली टाळ्या टाळी होसीजे सकळी । भीमकीया रांडोळी भली केली ॥३२॥
त्या वचना संतोषला देतुसे पाउला । वर्तती आंतुला खुणा दोघे ॥३३॥
कृष्ण बहु काळा उटी वेळोवेळां । उठुनी सोज्वळा करुं पाहे ॥३४॥
जैं कृष्ण अंगी लागे तें मागुतें न निघे । मळी लागवेगें निघेल कैंची ॥३५॥
मळी काढावयालागीं पाहे नख भागीं । अभिन्नव तें अंगीं देखियेलें ॥३६॥
सहित रवि चंद्र आणि क्षीरसागर । बिंबसे अरुवार नखामाजीं ॥३७॥
शेषाचिया बहुला श्रीकृष्ण नोवरा । उटणे सुंदरा करवी त्या ती ॥३८॥
तेथें व-हाडी हे देव बैसलेजी सर्व । अक्रुर उध्दव चवरे ढाळा ॥३९॥
देवकन्या व-हाडिणी भोंवल्या सवासिणी । हळदी लावी चरणीं क्षीरात्मजा ॥४०॥
ऐसे कृष्णनखी देखे एकाएकी । देखतां भीमकी मूर्च्छित झाली ॥४१॥
तेथें आश्वासित गुरु म्हणे स्थिरु स्थिरु । निर्धारेंसी धरी धिरु बाळे ॥४२॥
तंव बाष्प दाटे कंठी कंप जाली गोरटी । उन्मळितां दृष्टी होउनी ठेली ॥४३॥
तंव धांविन्नली धाये म्हणे झाले काये । झणे तुज माये दिठी लागे ॥४४॥
जें दृष्टी देखिले तें न बोलवे बोले । धायें तें वरिलें संज्ञेनें ॥४५॥
कृष्ण ओहणीचें बिरडें फ़ेडी आपुले चाडे । सुभद्रा हे लाडे बोलतीसे ॥४६॥
मेहुणे म्हणती जगजेठी जाणे हातवटी । यमुनेच्या तटीं अभ्यासू केला ॥४७॥
तंव यादव म्हणती कृष्णा उशीर कां येसणा । बिरडिया फ़ेसण पाहूं आम्हां ॥४८॥
झुंझारा विराचें बिरडें फ़ेडिलें । मग इथें परणीलें राजबाळें ॥४९॥
कृष्ण पाहे दृष्टी तंव बिरडें सुटे गांठी । कांचोळी समदृष्टी द्वैताची फ़ेडी ॥५०॥
पाहा गे नवल केलें डोळांचि उगविलें । बिरडें काढिलें नयनबळें ॥५१॥
कृष्णदृष्टीपुढें फ़िटे संसार बिरडें । मग हें केवढें नवल त्यासी ॥५२॥
व्रत तप याग करितां न टिके अंग । परि भाग्य सभाग्य भीमकी्चें ॥५३॥
मुखां मुख सन्मुखी बैसविली भीमकी । लाजे अधोमुखीं होउनी ठेली ॥५४॥
तंव तळीं कृष्णमुख देखिलें सन्मुख । पाठिमोरी देख होउनी ठेली ॥५५॥
मागाहीं ते मूर्ति सन्मुख श्रीपती । म्हणे मी केउती रिघों आतां ॥५६॥
वाम सख्य दिशा पडिला कृष्ण ठसा । लाज ह्रषीकेशा माजीं नुरे ॥५७॥
यापरी गोरटी कृष्णी लाजे भेटी । मग उघडियेली दृष्टी स्वरुप बळें ॥५८॥
सुभद्रा म्हणे चांग उटी ईचें आंग । स्वलीला श्रीरंग हळदी घेती ॥५९॥
तंव रेवती म्हणे देवा आधीं घ्यावें नांवा । हळदुली मग लावा उटी इसी ॥६०॥
मज नांव घेतां लाज नाहीं आतां । सावधान चित्ता ऐका तुम्ही ॥६१॥
नामा हे रुपाची गुणमयी गुणाची । प्रिया हे कोणाची कवण जाणे ॥६२॥
माझें येथें लक्ष वधुवरासी साक्ष । पुसा पां प्रत्यक्ष रुक्मिणीसी ॥६३॥
ऐकोनी तया नांवा गहिंवरु उध्दवा । तटस्थ यादवा सुरवरांसी ॥६४॥
कवण जाणे लीळा आकळ याची कळा । हांसती सकळ व-हाडिणी ॥६५॥
यावरी श्रीरंगे हळदी घेऊनि स्वांगे । उटीतु अष्टांगें रुक्मिणीचीं ॥६६॥
कृष्णकरयोगें सबाह्य निवों लागे । जाणतील अंगे अनुभवीये ॥६७॥
लाभु चरणकमळा जाणें ब्रम्हबाळा । त्याचिया करतळा वैदर्भी भोगी ॥६८॥
हा ईशु ब्रम्हादिकी तो सेवक भीमकी । केलासे कवतीकी हळदी मिसें ॥६९॥
दासाचाही दासु साचा ह्रषीकेशु । भीमकीया उल्हासु देतु असे ॥७०॥
जया जैसा भावो तया तैसा देवो । भक्तीचा निर्वाहो हाचि जाणें ॥७१॥
कृष्णचरणावरती सुरंग अक्षता । भीमकीये माथां ठेवी वेगीं ॥७२॥
येरी आनंदली रोमांचित जाली । कपाळा पैं आली दशा आजी ॥७३॥
तंव सखीया देखोन दिठी लाज आली पोटीं । तोचि भेदु दृष्टी आशंकेचा ॥७४॥
तेणें चुकविलें समचरण तत्वतां न लगती अक्षता । नमस्कारी माथां भूमि लागे ॥७५॥
तंव अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळीं । नमन इये वेळीं चुकों नेदी ॥७६॥
मस्तक जंव लोटी तंव पायां पडे फ़ुटी । अभिमानें तुटी चरणकमळा ॥७७॥
नमस्कार भले मागुतें अवंगिलें । तंव समचरणीं पाउलें दिसों नेदी ॥७८॥
अभिमानाचें बळ तें जाली पटळ । नेणें चरणकमळ अंतरले ॥७९॥
उश्वासें निश्वासें स्फ़ुंदे ते कामिनी । आसुवें लोचनीं पूर्ण आलीं ॥८०॥
मनीं ऐसी आस नमीन सावकाश । ते दैव उदास आजी जालें ॥८१॥
म्हणे कटकटा धांत्रया विकटा । चरण लल्लाट न भेटती ॥८२॥
आजि हें कपाळ जालें हें निर्फ़ळ । कृष्णचरणकमळ नातळती ॥८३॥
चंडवातें केळी कांपे चळचळी । त्याहुनी वेगळी भीमकी दिसे ॥८४॥
गळती कांकणें अवस्था भूषणें । अवशेष प्राणें मूर्च्छित जाली ॥८५॥
देखोनि तो भावो गहिंवरे उध्दव । एकाएकीं देव निष्ठुर जाले ॥८६॥
भीमकी आनंद मेळीं न संडे उकळी । उध्दव ते वोसंडला ॥८७॥
नेत्रीं आनंदजळ वहातसे सोज्वळ । म्हणे धन्य बाळ भीमकाची ॥८८॥
धरुनी तिची बाहे म्हणी उठी माये । नमस्कारी पाये या वरिष्ठाचे ॥८९॥
सांडिली लाज अभिमान निर्विकल्प मन । मस्तकीं श्रीचरण धरुनी ठेली ॥९०॥
यापरी कामिनी घाली लोटांगणी । जडली कृष्णचरणीं उठवेना ॥९१॥
तें अभिनव मुख फ़िटलें जन्मदु:ख । विसरली नि:शेख देहभावा ॥९२॥
तेथें सुखें वांकुलिया बोधाच्या गुतकुलीया । उसळती उकलीया आनंदाच्या ॥९३॥
अहं सोहं गांठी सुटल्या चरणभेटी । आनंदुची सृष्टी हेलावतु ॥९४॥
सेव्य सेवक भावो नाठवे विवाहो । देवी आणि देवो एक जाली ॥९५॥
सच्चिद पाउली स्वानंदु तळवटी । जाहली उठाउठी सहजीं निज ॥९६॥
तेथें वाच्यवाचक मौन ना जल्पक । म्हणावें ते एक म्हणतें नाहीं ॥९७॥
हरी म्हणे वेल्हाळ झणीं होय बरळ । करिती कोल्हाळ सोयरे या ॥९८॥
उपराटी विकडी देवासी सांकडी । सावध हे किडी केवीं होय ॥९९॥
त्या सुखाचे अंतरीं प्रवेशले हरी । तंव विसरली सुंदरी सावध करुं ॥१००॥
दोघां एक सुख लागली टकमक । चेतविते देख कवणा कवण ॥१॥
त्या मुखा वेगळी न निवडे ते बाळी । सुखेसी वेल्हाळी उठविली ॥२॥
त्या देहा जरी येणें तरी देह मी न म्हणें । अवघी कृष्णपणें रचली असे ॥३॥
चराचर दिसे तें मजमाजींच असे । रचले मदांशें ब्रह्मगोळ ॥४॥
ऐसी कृष्ण रुक्मिणी बैसली ऐक्य होउनी । तटस्थ अस्तानी काय सकळीकेसी ॥५॥
तो सोहळा देखोनि एका जनार्दनीं । उल्हासु जनीं वनीं साठवेना ॥६॥
त्या आनंदाचा लोंढा न कळे उदंडा । तेणें सुखें झेंडा नाचतसे ॥७॥
एका जनार्दनीं बोलतांची मौनी । हळदुली कैसेनी हातां आली ॥८॥
पितामहाचा पिता सुभानु तत्वतां । हळदुली हे कथा येथुनी जाली ॥९॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *