संत एकनाथ

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९ – संत एकनाथ गाथा

रामचरित्र

९११

दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्ययाग केला ॥१॥
सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥
पुसों जावं जी डोहळीयां । जें जें प्रिया मागती ॥३॥
ऐका कौसल्या संभ्रम । उदरीं संभवला राम ॥४॥
पुसों जातां डोहळे । आन अन्य तें वर्तलें ॥५॥
जनार्दन उदरा आला । एकाएकीं डोळिया घाला ॥६॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती

९१२

एकपणेंविण प्रसवला । विदेही जन्मला श्रीराम ॥१॥
पूर्वी पितामहाचा पिता । तया प्रसन्न सुभानु होतां ॥२॥
यालागीं सुर्यवंशीं तंव पिता । जन्म जाला श्रीराम ॥३॥
एका जनार्दनीं श्रीराम । सर्वहरतील श्रमा ॥४॥

९१३

रीघ नाही कोणा पाहुं आले जना । फिटलें पारणा लोचनाचे ॥१॥
नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव दाविताती ॥२॥
स्तुति करीशेष न वर्णवें वेदांसी । स्तवन विरिंची करीतसे ॥३॥
करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी त्यासी न्हाणिताती ॥४॥
नीति नाहीं गुण विश्वाचा जनिता । तयाचिया माथा पाणी घाली ॥५॥
घाली तेल माथां माखील ते टाळू । दीनाचा दयाळू कुर्वाळिती ॥६॥
तीर्थे वास करिती जयचिये चरणीं । पायांवरी न्हाणी त्यासी माता ॥७॥
लाउनी पालव रामासी पुसिलें । वेगीं फुंकियेले कान दोन्हीं ॥८॥
दोघांदोहीकडे सिद्धि बुद्धि जाणा । घातिलें पाळणां रामराजा ॥९॥
त्यांनी धणीवरी गाईला पाळणा । एका जनार्दनीं पहुडविले ॥१०॥

९१४

पोटीं भय आतां तुजला कशाचें । ध्येय हेंशिवाचें अवतरलें ॥१॥
तरले अपार पापी मुढ जन । ऐकतां चिंतन देव तोषे ॥२॥
तोषोनिया गुरु म्हणे लागे पायां । कौसल्या ही जाया नोहे तुझी ॥३॥
तुझी भक्ति वाड केली आली फळा । तो सुखसोहळा पाहें आतां ॥४॥
आतां करुं स्तुति श्रीराम रक्षितां । तारी निजभक्ति सत्ताबळें ॥५॥
बळें गेला लग्ना सागरासे पोटीं । तेथें तो कपटी घात करी ॥६॥
करी विघ्न तारुं बुडविलें सागरीं । एका जनार्दनीं निर्धारी देव राखे ॥७॥

९१५

पहा ऋषि आले मागावया दान । शांति करुं यज्ञ ऋषीचिया ॥१॥
ऋषीलागीं पूजा सिद्धि नेऊं पैजा । राक्षसांच्या फौजा मारुं बळें ॥२॥
मारुं बळें आतां त्राटिका सुबाहु । द्विजालागीं देऊं सुख मोठें ॥३॥
भेटे पुढें कार्य ऋषिभार्या वनीं । लाउनी चरण उद्धरावी ॥४॥
उद्धरावे तृण पशु आणि पक्षी । जया जे अपेक्षी देऊं तया ॥५॥
तया ऋषिसंगें जनकाचा याग । एका जनार्दनीं मग धनुष्य भंगी ॥६॥

९१६

तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥
देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी ॥२॥
भार्गव पातला आला गर्वराशी । कोणें धनुष्यासी सोडियलें ॥३॥
भंगियेला गर्व तोषला भार्गव । एका जनार्दनीं अपुर्व आशीर्वाद ॥४॥

९१७

श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥
देव म्हणती ब्रह्मायासी । तुझें आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥
सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षसकंदन । तेणें देवासी बंधमोचन । एका जनार्दनीं होईल ॥३॥

९१८

लंकाबंदी पडले देव । सुटका चिंतिताती सर्व ॥१॥
रामा रामा रामा दशकंठनिकंदन रामा । भवबंधविमोचना तारी । कृपा करी हो मेघःश्यामा ॥धृ॥
वेगीं बांधोनी सत्याचा सेतु । करी अधर्मा रावणाचा घातु ॥२॥
थोर पसरैत वासना भुजा । तुजवांचुनी छेदितां नाहीं दुजां ॥३॥
अहं गर्वित रावणु । छेदी सोडुनी कृपेची बाणू ॥४॥
त्रिगुण लंका हे जाळूनी । सीत प्रकृती सोडवी निजपत्नी ॥५॥
अखंड लावुनी अनुसंधान । तोडी देहबुद्धी बंधन ॥६॥
अनन्य शरण जनार्दन एका । त्यासी राज्य करुनी दिधलें देखा ॥७॥

९१९

सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥
इंद्रबारी चंद्र कर्‍हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥
अश्विनी देव दोन्हीं । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥
मारको केली तरळी । सटवी बाळातें पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥
मैराळ देव कानडा । करी राक्षसांच्या दाढ । आरसा न दाखवी ज्यापुढा । तो रोकडा बुकाली ॥५॥
विघ्न राहुं न शके ज्यापुढें । तो गणेशबापुडें । गाढवांचें कळप गाढे । एका जनार्दनीं वळीत ॥६॥

९२०

अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस । नानापरीचे स्पर्शदोष । धूई अहर्निशीं धुपधुपीत ॥१॥
उदक सेवा वरुणा हातीं । विंजणें सेवा नित्य वसती । निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥
ऐसे आम्हीं देव समस्त । रावणाचे नित्यांकित । लंके आलिया रघुनाथ । एका जनार्दनीं बंधमुक्त करील ॥३॥

९२१

रघुनंदन पायीं गेला । रथ त्वां कां रे आणिला ॥१॥
सूर्यवंशी नारायणा । माझा राघव जातो वनां ॥२॥
सुर्यवंशीं दिनकरा । तपुं नको तुं भास्करा ॥३॥
अहो धरणी मायबहिणी । सांभाळा हो कोदंडपाणी ॥४॥
एका जनार्दनीं भाव । पदोपदीं राघवराव ॥५॥

९२२

कपींद्रा सुखी आहे कीं षडगुण तरु हा राम ॥धृ॥
कनक कुरंग पाठी श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥
मज विरहित त्या निद्रा कैंची । अखिल लोकभिराम ॥२॥
सौमित्रा दुर्वाक्यें छळिलें । त्याचा हा परिणाम ॥३॥
त्र्यंबक भंगीं एका जनार्दन । करिती विबुध प्रणाम ॥४॥

९२३

कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ॥
मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । कीं मजला सांगा बा० ॥१॥
साधु छळले माझें मज कळलें । वनीं राक्षस संगती । कीं मजला० ॥२॥
एका जनार्दनीं आश्रय तुझा । सज्जन जन जाणती । कीं मजला० ॥३॥

९२४

कपटें रावण हो गेला । रामु तंव कळला त्याचा कपट भावो ।
सकळ वृत्ति रामचि देखे फिटला देह संदेहो ।
सबाह्म अभ्यंतरींरामु नांदे सीतेसी नाहीं तेथें ठावो रया ॥१॥
राम राम राम अवघाची राम फिटला रावणाचा भ्रम ।
भोग्य भोग भोक्ता रामचि जाला कैंचा । उठी तेथ कामु रया ॥धृ॥
जनीं रामु वनीं रामु नरनारी देखे रामु । तो हा रामु कीं कामु निःसिम नेमु ।
सरला भावनेचा भ्रमु । कामचेनि काजें कपटें रामु । होता फिटला तयाचा जन्मु श्रुमु रया ॥२॥
ऐसा सकळरुपें रामु स्वरुपें आला काय कीजे त्यासी पुजा ।
रामाचा वाणीसी रे छेदुनी चरणींवाहातसे वोजा ।
रामाचा विश्वासु बाणला त्या रावणासी रे निघती अधिक पैजा ॥३॥
हृदयीं रामु तेंचि अमृत कुपिका । म्हणोनि शिरें निघती तया देखा ।
शिरांची लाखोली रामासी वाहिली । अधिकचि येतसे हरिखा ।
अवघाचि राम गिळियेला रावणें । देह कुरंवडी केला तया सुखा रया ॥४॥
शरणागत दिधलें तें तंव उणें । म्हणोनि अधिक घेतलें रावणें रामाचे यश तें रावण ।
विजय गुढीं विचारुनि पहा पां मनें । अरि मित्रा समता समान एकपदीं एकाएकीं केलें जनार्दनीं रया ॥५॥

९२५

साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥
राम हें माझे जीवींचे जीवन । पाहता मन हें जाले उन्मन ॥धृ०॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेही मार्ग न दिसे आकाशा ।
खुटली गति श्वासोच्छावासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥२॥
यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण ।
कृपा होय परिपूर्ण । तरीच साधे हेंसाधन ॥३॥


सीता मंदोदरी संवाद

९२६
ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥
जीवामाजीं घालुनी जीव । परिसतां हे अर्थगौरव । तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥
असो आतां जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी । पुसती झाली वेगेंसी । रामानुभव तो कैसा ॥३॥
सांगे एका जनार्दनीं । चित्त करा समाधान । अनुभवाचें लक्षण । सावधान ऐकावें ॥४॥


मंदोदरी प्रश्न – अभंग ९२७ ते ९२८

९२७

श्रीराम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजपाशी । सकळ देहीं श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥
जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खाण । आत्माराम हें अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥
जरी त्यातें व्यापक म्हणसी । तरी तो सर्व भूतनिवासी । तेथें उपेक्षितां रावणासी । अद्वैत भजनासी अभाव ॥३॥
एका जनार्दनीं । भेद भाष्यवचन । राम परमात्मा जाण । सर्वगत निर्धारें ॥४॥

९२८

ब्रह्मा धरुनी मुंगीवरी । रामव्यापक चराचरीं । तो रावणाचे शरीरीं । इंद्रियव्यापारीं नांदत ॥१॥
रामानुसंधान रावणीं । भजतां होय कोण हानी । हें सांगावें साजणी । प्रीति करुनी मजलागीं ॥२॥
हांसोनिया सीता सुंदरी । उत्तर देती अति कुसरीं । तें परिसोनि मंदोदरी । विश्रांति थोर पावेल ॥३॥
शरण एका जनार्दनीं । दृश्यादृश्य वचन । परिसोनी समाधान । देहस्थिति निरसे ॥४॥


सीता उत्तर – अभंग ९२९ ते ९३१

९२९

सावध ऐकें साजणी । प्रवेशतां रामानुसंधांनीं । चित्त चित्तपणा विसरुणी । राम होउनी स्वयें राहे ॥१॥
द्रष्टा परिछिन्न होय । तैं दृश्य दृश्यत्वें दिसों लाहे । श्रीराम स्वयें तैसा नोहे । परी तें माय सांगेन ॥२॥
श्रीराम हो उनी व्याप्य एक । असतां राम होआवें व्यापक । त्रिपुटीचा आभावो देख । व्याप्य व्यापक तेथें कैचें ॥३॥
म्हणती सर्वांच्या अंतरीं । राम असे चराचरीं । तो रावणाचे शरीरीं । एका जनार्दनीं नांदत ॥४॥
९३०
राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये । तेथें रामरावणु कोठें आहे । सांग माय यथार्थ ॥१॥
भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथें रावण कैंचा आणिसी । जें तयासी भोगावें ॥२॥
दृश्याचिये भेटी । दृश्यपणें उठी । होता तेणेंसी तुटी । तोही शेवटीं असेना ॥३॥
आतां नाहींपण असे । असेतोचि दिसे । एका जनार्दनीं पिसें । रावणाचें कायसें ॥४॥
सीतावचनमात्रें मंदोदरी पूर्णावस्था
९३१
ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥
इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥
बाप सदगुरुचें सामर्थ्य । अलोकिक अति अदभुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥
नाहीं हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनामात्रें दिधलें सुख । एका जनार्दनीं सरेना ॥४॥


राम रावण युद्ध – अभंग ९३२ ते ९३३

९३२
तेहतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका बंदीखान बंदिमोचन रामचिंतन देव करिती ध्यान ।
अंत गती सीता सती चोरुनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार वीरचालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥
राम चढत रथ क्षिती डौलत त्रैलोक्य कंपायमान । रथु घडघडी शेषु फडफडी कूर्म लपवी मान ।
वराह बुडी दाढा तडतडी समुद्रा घाली पलाण । मेरु कुळाचळ कांपती चळचळ राक्षसा निधान ॥धृ॥
हनुमान बळी फाळी आसाळी अखय पौळी उपटितु । ब्रह्मा ब्रह्मापाशी बांधोनी त्यासी आणी लंकेसी अनर्थु ।
रावणु यासी हाणें खर्गेसीं घाव हनुमंत हाणतु । घावो पोचटु कैसा पैलु जैसा रामेसी कैसा भीडसी तुं ॥२॥
पुंसी लावुनि आंगी हनुमान रागी दावो सवेगी तेणें केला ।
बिभिषणु ते वेळीं रावणाजवळीं बुद्धि सोज्वळीं भेदला ।
त्यासी हाणिनि लाथा दवडी सर्वथा शरण रघुनाथा तो आला ।
न जाणता रावण लंकादान पूर्व संकल्प रामें घातला ॥३॥
रामाची ख्याती वाणूं किती शिळा तरती सागर । स्वयें बुडती आणिका बुडविती तरोनि तारीती वानर ।
लंका पारी सुवेळा गीरी रामु भारी दुर्धर । दाहा छत्रे लंकेवरी रावण पाहे नर वानर ।
येकु बाण सोडी काढुनी वोढी दहा छत्रे पाडी रघुवीर ॥४॥
शिष्टाई करितां अंगदु धरितां मंडपु अवचिता आणिला ।
मंडपु शिरीं देखोनी दुरी राम भारी कोपला ।
लंका बिभीषणा दिधली जाणा तेथील अर्थु कांआणिला ।
स्वामीबळें उडतां बैसलां माथां मजहीं न कळतां पैं आला ।
तेणेची उडडाणें आनंदें तेणें सभेसी मंडप सांडिला ॥५॥
हुडहुडां तत्काळीं वानर महाबळी वीरा खंदवी करिती ।
दांडें गुंडे पर्वत खांडे बळी अतुर्बळी हाणती ।
खंड्डे त्रीशुळ कौती मुदगल हातीं भाले कपाळां रोविती ।
पुच्छी धरुनी वानरां भवंडिती गरगरां येरे निशाचरां उपटिती ॥६॥
सेली सांबाळधर कोतेकर आढा उंचव्हाणका तोमर ।
आळगाईत बाणाईत त्रिशुळ चक्र धनुर्धर ।
अश्व गजपती नरपती नावाणगे वीर थोर थोर ।
नरांतक सुरांतक रणकर्कश दुर्धर ।
काळांतक यमांतक विकटमुखें भ्यासुर ॥७॥
नळनीळागंद जाबुवंत सुग्रीव महावीर ।
तार तरळ गव गवाक्ष गंधमर्दन दुर्धर ।
हनुमान महावीर अजरामर सुखें नुदधी मुखदुस्तर ।
वृक्ष पर्वत हातींन मिळे जुप्तती चालिले करिती भुभूःकार ॥८॥
वीरां वानरां रणीं झोट धरणी मागें कोण्ही न सरती ।
निशाणा दणदण खडगें खणखण बाण सणसणां सुटती ।
उतीं शिरीं माथां घायें देतां टणके कैसे उठती ।
वृक्षें रथु मोडिती गज झोडिती वीर पाडिती पैं क्षिती ।
लंकेपुढा अशुद्ध भडभडा रणनदी वाहती ॥९॥
रावनसेना मोडिली जाणा कोपू दशानना पैं आला ।
ढोल टमक भेरी रण मोहरी घावो निशाणा घातला ।
निशाचर वीर आला आपार भारदुर्धर चालिला ।
दहा छतेरे शिरीं रावणावरी रामु सन्मुख लोटला ।
वानर बहरी सपरिवारी रामु कैसा दिखिला ॥१०॥
श्यामसुंदर अति मनोहर मूर्ति रेखिला अति निगुती ।
कुंडलें साकार टिळकू पिवळा रेखिला अति निगुती ।
कुंडलें साकार निराकार श्रवणें विकार लोपली ।
देखोनी वदन कोटी मदन लज्जा अनंगा ते होती ।
चंद्र क्षीण बापुडा उपमें थोडा पुर्ण इंदु रघुपती ॥११॥
ऐसा मुख्य मयंकनिष्कंलक आर्त चकोर सेविती ।
आबाहु भावो अजानुबाहो धनुष्य मिरवे त्या हाती ।
द्वैत दळण करी पुर्ण बाणु शोभा सदगती ।
विजुकासे विसरळी अस्तगती । चरणींतोडरु गर्जे घोर विवरी कांपती ॥१२॥
रामु रावण वरुषे बाण पवन पुर्ण खिळिला ।
बाणाचा वळसा फिरतो कैसा लोह धुळासे उठिला ।
शर पिसारा सुटला वारा रावणू अंबरा उडविला ।
वाहाटुळी पान भ्रमें जाण तेवीं दशानन भ्रमला ।
न लगतां घावो रावण पाहो युद्ध क्रोधु सांडिला ।
कुंभकर्ण बळी तियेवेळीं देउनी आरोळी उठिला ॥१३॥
महामोह धूर्ण कुंभकर्ण अर्धचंद्रे निवाटिला ।
निकुंबळागिरी आटकभारी हानु आग्रीं चालिला ।
इंद्रजित निकटे कोटी कपटे करी सपाटे येकला ।
बाळ ब्रह्माचारी निराहारी तेणें इंद्रजीत मारिला ।
तें देखोनि रावण कोपला पुर्ण राम गर्जोनि हांकिला ॥१४॥
रामनाम जल्प फेडी पाप करी निष्पाप नामें एकें ।
रामावेगळें जाण न विधे आन अनुसंधानें नेटकें ।
तंव गजी राम ध्वजीं राम रामरुप आसके ।
रामु नर रामु वानर रामु निशाचर निमींखे ।
पाहे लंकेकडे राम चहुंकडे मागें पुढें रामु देखें ।
धनुष्य बाणा रामपुर्ण आपण्या राम वोळखें ॥१५॥
ऐसें युद्ध देखे परम सुख रावण हरिखें कोंदला ।
छेदुनी दशमुख केला विश्वमुख राम सम्यकु तुष्टला ।
नैश्वरासाठीं स्वरुपीं भेटीं रामु कृपाळु होय भला ।
राजपद गेलें स्वपद दिधलें आत्माराम प्रगटला ।
एका जनार्दनीं आनंदु त्रिभुवनीं देह विदेह रामु जाहला ॥१६॥

९३३

राम रावण रणांगणीं । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेरातें लक्षुणीं । स्वयें विधों पाहे ॥१॥
तंव गज ध्वजीं राम । रामाचि धनुष्यबाण । रामरुप आपण । आपणा देखें ॥२॥
रावणा पाडलें ठक । रामरुप कटक । पारिकें आणीक । तया न दिसें कांहीं ॥३॥
रामरुप नर । रामरुप वानर । वैरी निशाचर । रामरुप ॥४॥
रावण पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे । सबाह्म चहूकडे । राम दिसे ॥५॥
ऐसें निर्वाण युद्ध । विसरला द्वंद्वभेद । एका जनार्दनीं आनंद प्रगटला ॥६॥


भिल्लिण – अभंग ९३४

९३४
भिल्लिणी बाळा वनीं वेंचितां फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां ॥१॥
गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥
देखोनी रामरावो कैसा झाला भावो । सेवितां कंदमुळें आम्हां दिसतो देवो ॥३॥
सफळिता तरुवरीं साचें राम आभासे । पहा जनी वनीं अवघा रामचि दिसे ॥४॥
चारा हरवेठीं बोरा भरुनियां पाटी । फळामाजीं फळ राम सफळीत दृष्टी ॥५॥
आसनी शयनीं आम्हां आणीक बोधु । एका जनार्दनीं गोड लाविला वेधू ॥६॥


सीताशुद्धी – अभंग ९३५

९३५

देवासी ना गवे ग्रहांचाहीं ग्रहो तो राम रावणें आणिला रणा ।
सुरनर वानर भक्ता निशाचर समुह मीनलीसे सेना ।
चैत्यन्य चोरटी ते रुपें गोरटी आणिली राम अंगना रे ॥ध्रु॥
राम देखोनी दिठी हरिखली गोरटी । स्वानंदाची सृष्टी हेलावतु ।
जानकी पाहे रघुनाथा राम न पाहे सीता । चरणावरी माथा ठेवूं नेदी ॥१॥
तंव देव म्हणती देवा सीतेचिया भावा नमस्कार घ्यावा अनुसरु आतां ।
विनविती जगत्पत्ति ऐकें सीतापती । उभी आहेतिष्ठती जनकतनया ।
विनवी बिभीषण म्रुदुबचनी लक्षुमण । सीतेलागीं रावण निर्दाळिला ।
जीलागीं शिणविलें तिसीं । कां दुर्‍हांविलें । हनुमंत म्हणे बोले सांगास्वामी ॥२॥
तुं जीवींचें न सांगसी आणि मौन्याचि राहसी । तें गुढ वेदशास्त्रांसी नकळे मा ।
आम्हीं तंव वानरें प्रकृतीचीं पामरें । तेंकेवीं वनचरें जाणोन बा ।
सीता सीता घोकणी ते जनकनंदिनी ।
उभी असे येउनी जवळी मा । जवळी आल्या पाठी तुंन पहासी दृष्टी ।
कुसरी हे उफराटी न कळे आम्हां ॥३॥
पाहोनी प्लवंगम नहीं । हे परपुरु मीनली ऐसी झाली बोली । प्रकृति अंगिकारिली कैसी जाय ।
तरी हे जीवाची मोहिनी कामजनित जननी । देखतां नयनीं भुलवी जगा ।
तरी हेंदिव्य देउनि पाहा हो दाखवूं शुद्ध भावो । संज्ञा रामरावो करुनी ठेला ॥४॥
हें देखोनि समस्त राहिले तटस्थ । हनुमंत काय तेथें करिता झाला ।
हेंविषम विश्वकुंड पेटविले प्रचंड । सहजाग्नि उदंड प्रज्वाळिला ।
येरी कुंडाकडे पाहे तंव रामरुप दिसताहे । नवल दिव्यमाय आरंभिलें ।
येथें भावचि प्रमाण । अग्निमाजीं स्नान । करुनी रामचरण दृढ धरीन ॥५॥
अगा परिसें तेजोराशी तूं साक्षीं या कर्मासी । जठरींचा जठरवासी जठराग्नी ।
चपल चंचल योगें मन जेथें जाय वेगें । सरिसा पुढे मागें अवघा राम ।
राम साडोनि मना विषयो ये जरी ध्याना । तरी देह हुताशना दग्ध करी ॥६॥
वाचिक व्यापारु स्वरवराण उच्चारु । रामेविण अक्षरु केवीं निघें ।
वचना वदनीं राम कथे मेघःश्याम । रामेवीण उपशम शब्द नाहीं ।
वाचा जे वावडे तें तें राम घडे । रामेवीण उघडे वचन नाहीं ।
हाकीं हांकितां हाका हाकेमाजीं राम देखा । नाहीं तरी देव मुखा दहन करीं ॥७॥
हे काया आतळे तेथेंचि राम मिळे । रामाविन वेगळें उरलेंनाहीं ।
देहो देहो बहुतांसी संदेहो । देहीं रामरावो प्रकट नांदे । राम श्वासोश्वास रामनिमिष निमिष ।
रामामाजीं वास रामपणें । रामेविण शरीर क्षीण जाय आन मोहर । तरी देहो हा वैष्वानर भस्म करीं ॥८॥
जागृती जें जें दिसें तें राम असे । स्वप्नीं जें आभासें तेंही रामु । सुषुप्तीचें सुख केवळ राम देख ।
रामेविणं आणिक नाहीं नाहीं । आम्हां रामरुपीं उप्तत्ती रामरुपी स्थिती । अंती तेही मती रामराम ।
तेथें अग्नीसी तो अतौता अग्निअमाजीं सीता । राम म्हणोनि तत्त्वता उडीघाली ॥९॥
तेथें बुजालीं वानरें भ्यालीं निशाचरें । सुरनर खेंचरें चाकाटलीं । उडीसारसी देख सकळां पडिली शंक ।
अवघीच टकमक पहात ठेली । तेथें तम धुमाचे घोळ रजरक्तकल्लोळ । राहिलें निश्चय सीतातेजें ।
धगधगीत इंगळ लखलखीत ज्वाळा । लोपुनी जनकबाळा मिरवे किसी ॥१०॥
दहनदिप्ती सुखा मुळ ते सीता देखा । अग्निचिया शिखा शाखा सीता । सीता अंगमेळे अग्निचे पाप जळे ।
जें रावणाच्या घरीं मेळे धुतां घडलें । हे पतिवरता निर्दोष अग्नि जाला चोख । जयजयकारें घोष अवघे करिती ।
तें देखोनी राघवा जाकळीलें कणवा । अवघेपणें अवघा खेंवा आला ॥११॥
प्रकृति पुरुषा भेटी खेवां पडीली मिठी । येरयेरां पोटीं हारपली । तेथें योग काहीं स्मरतां स्मरतें नाहीं ।
मीतुंपणा पाहीं बुजावणी । रामरुपीं तत्त्वतां मिळोनी गेली सीता । न निवडे सर्वथा कांही केलिया ।
अशोकाचे शोक वियोगाचें दुःख । हरुनी म्हणावें सुख तंव म्हणतें नाहीं ॥१२॥
शीवशक्ति संयोग अभ्यांसेंवीण योग । कल्पनेविण भोग भोगीतसे । एका जनार्दनीं सहजेसी मिळणी ।
प्रकृती रामचरणीं सती झाली । एकपणाचेनि आले नुरेचि पैं वेगळें । रामरुपीं सगळें सामावलें ॥
नवल पैं लाघव देहें देहीं राघव । देव पुढें दिव्य उतरील बा ॥१३॥


पदप्राप्ति – अभंग ९३६

अहिरावणे राम धरुनियां नेला थोर मांडिले निर्वाण ।
घायातळीं राम उभा करुनियां म्हणतसे करीं रे स्मरण ॥१॥
जगाच्या संकटीं रामातें स्मरती राम स्मरावें कवण ॥धृ०॥
देवांचें मरण भक्तें चुकविलें म्हणोनि अमर केला हनुमंतु ।
न तुटे न जळे न बुदे न ढळे संसारी असोनी अलिप्तु ॥२॥
दुसरेनि अवतारें रामासी जन्मु परी हनुमंत जन्मातीतु ।
देवासी जन्ममरण दिसते अविनासी । एका जनार्दनीं केले भक्तु रे या ॥३॥


राम सहवास – अभंग ९३७ ते ९४४

९३७

कौसल्या यज्ञशे सेउनी राम जन्मला तियेचें पोटीं । वनवासासी जातां वियोग पावली दुःख शोकें हिंपुटीं ॥१॥
धन्य धन्य ते अहिल्या शिळा । हरीच्या पावली चरणकमळा ॥धृ॥
त्र्यंबकभजनीं जानकी पर्णिली । केली एक पतिव्रता रणी । रामा वेगळी रावणें चोरुनियां नेली । दुःखीत अशोक वनीं ॥२॥
रामें रणांगणीं राक्षस मारिले । ते मरणातीत होऊनि ठेले । देवांची बंधनें तोडिली रामें । शेखी अमर ते प्रळयीं निमाले ॥३॥
दशरथ पिता निमाला । त्याचें कलेवर पचे तैल द्रौणीं । सकुळी अयोध्या वैकुंठासी । नेली अभिनव श्रीरामकरणीं ॥४॥
सुरांचा कैवारी कीम असुरांचा वैरी । ऐसें न मानीच रामरावो । वैरियांचा बंधु बिभीषण आप्तु । एका जनार्दनीं समभावो ॥५॥

९३८

अवलोकितां रामराणा । धणी न पुरे मन नयना ॥१॥
पाहतां नयन लोधले । सुरवर वानर बोधले ॥२॥
भरत राम अलिगनीं । रामीं हारपलें दोन्हीं ॥३॥
एका जनार्दनीं काज । एकछत्रीं रामराज्य ॥४॥

९३९

दोघें शरणागत आले श्रीरामासी । मारिलें वालीसी एका बाणें ॥१॥
बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगी । श्रीरामें वोसंगीं धरियेले ॥२॥
धरियेलें हातें तारा सुग्रीवानें । वैराचें खंडण झालें तेव्हा ॥३॥
तेव्हा वानरांचीं बोलावली सेना । लंकेवरी ज्यांना पाठविलें ॥४॥
विळब न होता धाडी हनुमंता । जाळियेली वार्तां सीता सांगे ॥५॥
सांग लंकाजळीं सन्निधा उदधी । लंघुनियां शुद्धि रामा सांगे ॥६॥
सांगे रामा तेव्हा बांधवा सागर । आणुनि अपार पर्वतांसी ॥७॥
शिळासेतु रामचरणाची ख्याती । तारुनी पुढती ख्याती केली ॥८॥
बांधोनिया सेतु राम आला लंके । मारियेलें मुख्य राक्षसासी ॥९॥
मारी कुंभकर्ण इंद्रजित रावणा । होता लक्ष्मणा शक्तिपात ॥१०॥
आणियला गिरी दिव्य तो द्रोणादी । उठविली मादी वानरांची ॥११॥
शिरे उडविली लंकापतीचीं । मुख्य राक्षस साचे छेदियेलें ॥१२॥
लिगाड तोडिले वैरत्व खुटलें । लंकाराज्य दिलें बिभीषणा ॥१३॥
तोडियली बेडी नवग्रहं सोडी । उभविली गुढी रामराज्य ॥१४॥
इंद्रचंद्रपद ब्रह्मीयांचे । देउनी तयांचें सुखी केलें ॥१५॥
केलें समाधान आणविली सीता । अयोध्यें मागुता राम आला ॥१६॥
आलासे भरत लागला चरणीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ॥१७॥
चिंता दुःख द्वेष पळाले बाहेरी । एका जनार्दनीं करी राज्य सुखें ॥१८॥

९४०

अवतरला श्रीराम परब्रह्मा पुतळा । सुहास्य मुख सुंदर कांसे पितांबर पिवळा ॥१॥
दशरथनंदन रामपाहतां वो मनी ध्यातां । देहबुद्धी हरपली डोळें भरी पहातां ॥२॥
वसिष्ठ गुरुंनींआध्यात्माचा रस बिंबविला । ताटिका समुळ मर्दुनी याग रक्षिला ॥३॥
त्र्यंबक धनुष्य भंगुनीं जनकदुहिता आणिसी । कैकयीवरदें दशरथ निमाला श्रीराम गेले वनवासीं ॥४॥
येवोनियां वनीं रावणें केलें जानकीहरण । सीताविरहें राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥५॥
वाली वधुनी सुग्रीवा दिली किष्किंदा नगरी । सीताशुद्धी करुनी आला वानर केसरी ॥६॥
सेतुबंधन करुनी सुवेळी आला श्रीराम । राक्षसांसहित रावणा दिलें निजधाम ॥७॥
बिभीषण स्थापिला आणिली जनकनंदिनी । सीतेसह राम बैसले पुष्पक विमानीं ॥८॥
आला श्रीराम सकळां आनंद झाला । भरतभेटीसमयीं राम हृदयीं गहिंवरला ॥९॥
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वामांगीं सीता । सिंहासनीं बैसविलें वोवाळिलें रघुनाथा ॥१०॥
झाला जयजयकार आनंदें पिटिली टाळी । एका जनार्दनीं नाचती आनंदें सकळीं ॥११॥

९४१

गोड साखरसे गोड साखरसे । रामनाम रसे चवी आली ॥१॥
देठीचें फळ देठीं पिके । रान तोडितां चवी चाखे ॥२॥
न फोडी न तोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥
एका जनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी मी न सोडी ॥४॥

९४२

रघुवीरस्मरणें चित्त माझें रंगलें वो बाई ।
आसनींशयनीं भोजनीं भोजनीं त्याविण न रुचे काई ॥१॥
जीवींचे जीवन माझें त्रैलोक्याचें सुख । त्यासी पाहतां सर्व हरली तहानभुक ।
ब्रह्मानंदें नाचूं लागे निरसुनी गेलें दुःख ॥२॥
दीनबंधु सखा जीवलग अयोध्येचा राजा । निर्वाणी सकंटी धावें भक्ताचिया काजा ।
कनवाळु तोचि प्राण विसावा माझा ॥३॥
श्यामवर्ण गोमटी गळां वैजयंती माळा । वामांगी घवघवीत शोभे जनकाची बाळा ।
एका जनार्दनीं तो म्यां राम देखिला डॊळा ॥४॥

९४३

अंगे येऊनियां रामें नवल पैं केलें भवाब्धी बांधिली सेतु । अतिशयेसी जड दगड तैसें मुढ नामेंचि तारितु ।
अविश्वासिया तेथे मार्गचि न कळे स्वेतबंधीं भवें आवर्तु रया ॥१॥
रामीं आरामु त्या संसार समु अभिमानियां तोचि पशु ।
अंतरीं बोध नाहीं बाहेरी ज्ञातेपण लटक्याचा न घेती त्रासु ॥धृ ॥
सर्वातरीं राम म्हणोनि बोलती परी बोला ऐसी नाहींस्थिती ।
चरणीं लागल्या शीळा उद्धारल्या हें तव रायाची ख्याती ।
तेंचि रामु हृदयीं अविश्वासें नरका जाती रया ॥२॥
राम म्हणता गणिका उद्धरिली सरला संसारलेशु । सकळ शास्त्र मंथुनि श्रुति वाखणितां नये चित्तींचा विश्वासु ।
वेश्यें निपटा रे वाचुनियां जालों मी नुरेचि संसारपाशु रया ॥३॥
अंतरीं रामनाम सांगती कानीं परी न सांगती वेदध्वनीं । वेदांचा विश्वासु कर्म प्रकृति परी राम तारिल निर्वाणीं ।
तोचि राम जीतां विश्वासें भजाल तरी सेवक होईल निदानीं ॥४॥
सांडोनि अभिमान विश्वासें भजाल तरी स्वयोंचि व्हाल राम । मातीयेची मूर्ति द्रोण करुनिया कीं लौकिका फावला भावो ।
एका जनार्दनीं एकपणें भजतां संसारासी नुरे ठावो रया ॥५॥

९४४

इंद्रिया देवाची सुटली बांदवडी । स्वानंदें उभाविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥
रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सदगुरुचेनि बोले ॥२॥
अहं रावणु रामें मारिला प्रचंडु । धरी मारी देही सरला इंद्रिय दंडु ॥३॥
त्रिकुटशिखरी पिटलें रामराज्य धेंडे । क्रोधादि असुर गेलें करुनी काळीं तोडे ॥४॥
विषयांचेकारभार कामिनी करिती अंतु । राम रामराज्यें विराला मन्मथु ॥५॥
रामनाम तेथें कळिकाळ कांपती । रामनामें सम अधमोत्तमा मुक्ति ॥६॥
शरणागत निज स्थापिलें निजपदीं । रामनामें जड तरती भवाब्धी ॥७॥
एका जनार्दनीं रामनाम जपे । रामराज्य झालें सदगुरुकृपें ॥८॥


शिवमाहात्म्य – अभंग ९४५ ते ९८८

९४५

आरोहण ज्याचें नंदीवरी । वामांकी शोभे गिरिजां नारी ॥१॥
त्रिशुळ डमरु शंख कपाल । मस्तकी गंगा चंद्रभाळ ॥२॥
अंकीं षडानन गजवदन । सदा प्रसन्न ज्याचें ध्यान ॥३॥
भुतें वेताळ शोभती । हर्षयुक्त उमापती ॥४॥
अंगीं विभूति लेपन । सदा समाधि तल्लीन ॥५॥
मुखीं रामनाम छंद । एका जनार्दनीं परमानंद ॥६॥

९४६

भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥
भोळे याचे गळां शोभे रुडमाळा । अर्धांगी तें बाळा पर्वताची ॥२॥
भोळें ज्याचें मन भोळें ज्यांचें ध्यान । भोळें ज्याचे वदन शोभतसे ॥३॥
एका जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळां सदोदित ॥४॥

९४७

पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथें भेटी ॥१॥
छत्तिसां वेगळा । भरला असें तो निराळा ॥२॥
चाळिसाचे ध्यानीं मनीं । कदा नये शुळपाणी ॥३॥
ऐसे विचारे भागले । तया नाहीं रुप कळलें ॥४॥
एका जनार्दनीं रुप । स्वयं प्रकाश अमूप ॥५॥

९४८

पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥
कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥
विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥
एका जनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥

९४९

श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण ॥ महादेव ॥१॥
इंद्रियां अतीत आपण । देखिजें हें ज्ञान कारण ॥ महादेव ॥२॥
जन वन जीवन निरंजन । यामाजीं कवण करुं भजन ॥ महादेव ॥३॥
एका जनार्दनीं जन । तो भजकां तो मुख्य भजन ॥ महादेव ॥४॥

९५०

निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥
चहूं वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥
ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥
एका जनार्दनीं नामरुपा वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव जाणा ॥४॥

९५१

परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥
आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहूं वांचा शिव जाणा ॥२॥
एका जनार्दनीं जीवांचें जीवन । सर्वां घटीं पूर्ण शिव जाणा ॥३॥

९५२

एक दोन तीन पांचा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥१॥
सात पांच बारा चौदा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥२॥
भेदा अभेदा सोळांसी वेगळा । एका जनार्दनीं निराळा शिव एक ॥३॥

९५३

हृदयीं परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥
जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्मा ॥२॥
भाव अभावना जया जैसी पाही । एका जनार्दनीं देहीं परब्रह्मा ॥३॥

९५४

अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥
अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥
प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥
द्वैता अद्वैता वेगळांचि जाण । एका जनार्दनीं पूर्ण शिव एक ॥५॥

९५५

वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥
तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥
सकळ इंद्रियां झालीं पैं विश्रांती । पाहतां ती मूर्ती शंकराची ॥३॥
एका जनार्दनीं शिव हा भजावा । संसार करावा सुखरुप ॥४॥

९५६

शिव भोळा चक्रवती । त्याचे पाय माझे चित्तीं ॥१॥
वाचे वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखतां प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनीं शिव । निवारी कलिकाळाचा भेव ॥४॥

९५७

स्वरुप सुंदर अति विशाळ । नेत्रीं निघती अग्निज्वाळ । हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥
वाचे वदे हरहर शब्द । तेणें निरसे भवबंध ॥धृ ॥
माथां जटा शोभे पिंगटवर्ण । मध्यें गंगा वाहे परिपुर्ण । हृदयीं सदा रामध्यान । तयासी पाहतां निवे मन ॥२॥
शिव शिव नाम हें तारक । जया ध्याती ब्रह्मादिक । सिद्ध साधक वानिती अनेक । तया ध्यातां सुख अलोकिक ॥३॥
वामांगीं गौरी सुंदर । तेजें लोपतसें दिनकर । ह्रुदयीं ध्यातां परात्पर । एका जनार्दन तुटे विरझार ॥४॥

९५८

ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र ॥१॥
नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावें ॥२॥
मस्तक ठेवावें संतांचे चरणीं । सदा वसो वाणी शिवनाम ॥३॥
शिव शिव ऐसें उच्चारावें मुखें । जन्ममरण दुःखें नासताती ॥४॥
वायां जाऊं देऊं नये एक क्षण । भक्तीचे लक्षण जाणावें हें ॥५॥
यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एका जनार्दनीं नित्य नाम गाय ॥६॥

९५९

कर्मे नित्य नैमित्तीक । करावी तीं आवश्यक ॥१॥
तेचि होय शिवपुजा । चित्तशुद्धि ते सहजा ॥२॥
मनःस्थिर तें कारण । करा शंकराचें ध्यान ॥३॥
गुरु होऊनि शंकर । ज्ञान उपदेशीं सत्वर ॥४॥
तेणें अज्ञानाचा नाश । प्राप्त होय अविनाश ॥५॥
एका जनार्दनीं धर्म । ब्रह्माप्राप्तीचे हें वर्म ॥६॥

९६०

ज्ञानाचें जें अधिष्ठान । महादेव एकचि जाण ॥१॥
कर्म उपासना साधन । पैं शिवचि अधिष्ठान ॥२॥
तेथुनी प्राप्त सर्व देवां । मुखीं शंकर वदावा ॥३॥
याकारणें शिवशक्ति । जनहो करा दिनरात्रीं ॥४॥
एका जनार्दनीं शंकर । पावती भवसिंधु पार ॥५॥

९६१

नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥
दुजें नाहीं पैं साधन । वाचे वादावा इशान ॥२॥
ऋद्धिसिद्धि पाया लागे । हृदयीं सदाशिव जागे ॥३॥
शंकर हा जया चित्तीं । जवळी तया भुक्ति मुक्ति ॥४॥
एका जनार्दनीं सर्वदा । महादेव वाचे वदा ॥५॥

९६२

सहज नाम आठवितां । यमा पडे धाक सर्वथा ॥१॥
ऐसें शिवनाम समर्थ । कळिकाळ पायां पडत ॥२॥
शुद्ध भावें आठवितां । मुक्ति होय सायुज्यता ॥३॥
ऐशी आहे वेदवाणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥

९६३

भक्तांचिया मनासरिसा । धांव घाली तो विश्वेशा ॥१॥
ऐसी कृपाळु माउली । शिव अनाथाची साउली ॥२॥
नामीं जडतां सदा मन । आनंदे शिवांचें भजन ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम । शिवनामें निष्काम ॥४॥

९६४

शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि ॥१॥
हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥
मागें बहुतीं घेतली खांदीं । ते उतरले पैलपार भवनदी ॥३॥
ज्ञानदेव कावड घेतां । सुख समाधान वाटे चित्ता ॥४॥
निवृत्ति सोपान चांगदेव भारी । कावडीचे अधिकारी ॥५॥
एका जनार्दनीं त्यांचा दास । कावड घेतां बहु उल्हास ॥६॥

९६५

ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं ॥१॥
शिवनाम तुम्हीं घ्या रे । शिवस्मरणीं तुम्हीं रहा रे ॥२॥
हरिहर कावड घेतली खांदी । भोवती गर्जती संतमांदी ॥३॥
एका जनार्दनीं कावड बरी । भक्ति फरारा तयावरी ॥४॥

९६६

जनार्दनें कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥
सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरिहर ॥२॥
बहुत साधनें न करिता । अनायासें आलें होतां ॥३॥
पूर्ण कॄपें जनार्दन । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥

९६७

मन हें ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥
तयालागीं स्थिर करीं । चित्तीं महादेव धरी ॥२॥
तरी तुज होय सुख । येर अवघें तें दुःख ॥३॥
चित्तींची वासना । जंव नाहीं गेली जाणा ॥४॥
एका जनार्दनीं मन । असो द्यावें समाधान ॥५॥

९६८

जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा ॥१॥
वाचे उच्चारी हरहर । तेणें सुखरुप संसार ॥२॥
शिवनामीं होई रत । सदा समाधान चित्त ॥३॥
म्हणे एका जनार्दन । शिवनामें भरो वदन ॥४॥

९६९

महादेव नाम वदे नित्य मुखें । तेथें सर्व सुखें वसताती ॥१॥
शिवनामें कामक्रोधाचे दहन । त्रिविध ताप शमन पावताती ॥२॥
शिवनामें भुक्ति शिवनामें मुक्ति । चुके यातायाती शिवनामें ॥३॥
ऋद्धिसिद्धि हात जोडती तयासी । मुखीं अहर्निशीं शिव जया ॥४॥
एका जनार्दनीं शिवनाम सार । भवसिंधु पार पावावया ॥५॥

९७०

धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥
हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
हास्य विनोद कथा । तेणें मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥
एका जनार्दनीं जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥

९७१

शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे । जपावा परिकर नित्य नेमें ॥१॥
न बाधिच विघ्न संसाराचें भान । धन्य तें भजन शिवनामें ॥२॥
एका जनार्दनीं नाम शिव ईशान । वदतां घडे पुण्य कोटी यज्ञ ॥३॥

९७२

सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥
न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥
घडे जप तप अनुष्ठान । वाचें वदतां शिव जाण ॥३॥
एका जनार्दनीं सोपें । शिवनामें जाती पापें ॥४॥

९७३

सदाशिव अक्षरें चार । जो जपे निरंतर ॥१॥
तया न बाधी संसार । वाचे वदतां हरहर ॥२॥
ऐसें शिवाचें महिमान । उच्चारितां नोहे पतन ॥३॥
एका जनार्दनीं शिव । वाचे वदतां निरसे भेव ॥४॥

९७४

शिवनाम उच्चारा । तेणें कळिकाळासी दरारा ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमां निगमां ॥२॥
सकळ मंत्राचें माहेर । शिवमंत्र पंचाक्षर ॥३॥
एका जनार्दनीं वाचे । शिवनाम जपा साचें ॥४॥

९७५

सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ ॥१॥
आवडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकित । स्मरतांचि मोक्ष देत ॥३॥
एका जनार्दनीं उदार । देणें त्रिभुवनीं साचार ॥४॥

९७६

पाहोनियां भक्तनाथा । स्वयें दे आपुली कांता ॥१॥
देतां न पाहे मागेंपुढें । उदार त्रिभुवन थोकडें ॥२॥
देणें जयाचें अचाट । म्हणोनि नाम नीलकंठ ॥३॥
एका जनार्दनीं भोळा । पाळों जाणें भक्तलळा ॥४॥

९७७

उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥
शरण आलिया तत्त्वतां । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥
न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तिफळ ॥३॥
ऐसा पतीत पावन । शरण एका जनार्दन ॥४॥

९७८

अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे ॥१॥
भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशनें पापें जातीं ॥२॥
एका जनार्दनीं नाम जपा होटीं । पातकें नाशाकोटी हेळामात्रें ॥३॥

९७९

त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥
जे चिंती जया वासना । पुरवणें त्याची क्षणा ॥२॥
यातीं कुळ न पाहे कांहीं । वास कैलासीं त्या देई ॥३॥
एका जनार्दनीं सोपें । शिवनाम पवित्र जपें ॥४॥

९८०

सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हें कलीं ॥१॥
जपतां चार अक्षरें । मुक्ति जगासी निर्धारें ॥२॥
नामें सर्वांवरी सत्ता । ऐसें वदे पैं गीता ॥३॥
तें नाम जपा पावन । शरण एका जनार्दन ॥४॥

९८१

नाम उत्तम पावन । शिव शिव वरिष्ठ जाण ॥१॥
ऐसा पुराणीं महिमा । न कळे वेदशास्त्रां सीमा ॥२॥
जयासाठीं वेवादती । तो शिव स्वयं ज्योती ॥३॥
रुपा अरुपावेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

९८२

सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥
शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥
सदा सर्वकाळ शिवाचें कीर्तन । आनंदें नर्तन भेदरहित ॥३॥
ऐसा जया भाव सदोदित मनीं । तयाचें चरणीं मिठी घाली ॥४॥
एका जनार्दनीं व्रताचा महिमा । नकळेंचि ब्रह्मा उपरमला ॥५॥

९८३

देखोनिया हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥
मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी ॥२॥
व्रत न करी शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥
ऐशियासी यमपुरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

९८४

शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ॥१॥
चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये तेणें ॥२॥
एक बिल्वदळ चंदन अक्षता । पुजन तत्त्वतां सोपें बहु ॥३॥
एका जनार्दनीं पूजितां साचार । इच्छिलें हरिहर पुर्ण करिती ॥४॥

९८५

सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळविता ॥१॥
शरण जाता ज्याच्या पायां । सर्व हारपली माया ॥२॥
भेदाभेद निवारिले । सर्व स्वरुप कोंदलें ॥३॥
एका जनार्दनीं शिवें । जीवपणा मुकलों जीवें ॥४॥

९८६

शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥
शिव शिव नाम । जपे कां रे उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥
दो अक्षरीं काम । वाचे घेई तूं नाम । आणीक तें वर्म । सोपे नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं । शिव जप ध्यानीं मनीं । वेद शास्त्र पुराणीं । बोलियेलें ॥४॥

९८७

शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥
धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥
सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥
एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥

९८८

ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥
सोपा मंत्र रामनाम । तेणें झालें सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥
बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं । तयासी अवनीं । सोपी दिसे ॥३॥
बरवें साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम । गातां तुमचें नाम । वंद्य तिहें लोकीं ॥४॥
जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपें केलें । रामराम जप वहिलें । थोर साधन हें ॥५॥
अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा । एका जनार्दनीं नामाचा । वाढविला महिमा ॥६॥


हरिहर ऐक्य – अभंग ९८९ ते १००७

९८९

एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥
एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥
एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥
एका रुंडमाळा कंठीं शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥
एका जनार्दनीं सारखे । पाहतां आन न दिसे पारखें ॥५॥

९९०

एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥
एका शोभेंपाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥
एका करी पद्मगदा । एकपरशु वाहे सदा ॥३॥
ऐसे परस्परें ते दोघे । शोभताती ब्रह्मानंदें ॥४॥
एका जनार्दनीं ध्याऊं । तया चरणीं लीन होऊं ॥५॥

९९१

एका जटा मस्तकी शोभती । एका कीरीट कुंडलें तळपती ॥१॥
एका अर्धांगी कमळा । एका विराजे हिमबाळा ॥२॥
एका गजचर्म आसन । एक हृदयींश्रीवत्सलांछन ॥३॥
एका जटा जुट गंगा । एका शोभें लक्ष्मी पैं गा ॥४॥
एका जनार्दनीं दोघे । तयां पदीं नमन माझें ॥५॥

९९२

एका शोभे कौपीन । एका पीतांबर परिधान ॥१॥
एका कंठीं वैजयंती । एका रुद्राक्ष शोभती ॥२॥
एका उदास वृत्ति सदा । एका भक्तापांशीं तिष्ठे सदा ॥३॥
एका एका ध्यान करिती । एक एकातें चिंतिती ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । तया चरणीं मज थार ॥५॥

९९३

एक ध्याती एकामेंकीं । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥
ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥
एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥
एका जनार्दनीं साचार । सर्वभावें भुजा हरिहर ॥४॥

९९४

हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥
ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥
सुख पाहता आनंद । एका जनार्दनीं परमानंद ॥३॥

९९५

हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥
हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥
गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हरिहर म्हणतां । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥

९९६

एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं ॥१॥
हरिहर शब्द वदतां । यमदुतां पडतसे चिंता ॥२॥
कीर्तनीं नाचतां अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥
एका जनार्दनीं सुख संतोष । हरिहर म्हणतां देख ॥४॥

९९७

होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥
त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥
एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥

९९८

होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥
तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥
मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिहीं लोकां ॥३॥
एका जनार्दनीं शिव । उच्चारितां नाहीं भेव ॥४॥

९९९

शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥
जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥
तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥
एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोची शिव ऐसा निर्वाहो ॥४॥

१०००

हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥
नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥
पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥
विनोदें हरिहर म्हणतां । मोक्षप्राप्ती तयां तत्त्वतां ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥

१००१

भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार ॥१॥
हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥
संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥
एका जनार्दनीं नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥

१००२

हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥
वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥
आदिनाथ परंपरा । चालत आली तो पसारा । जनार्दनें निर्धारा । उघडे केलें ॥३॥
गुह्मा जाप्य शिवांचें । उघडें केलें पां साचें । एका जनार्दनीं वाचे । रामनाम ॥४॥

१००३

एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥
अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी ॥२॥
ऐसा नाहीं जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥
एका जनार्दनीं शरण । एकपणे जनार्दन ॥४॥

१००४

ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगीं नाचतो जया वैकुंठपति । माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास । त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊं नेदीं ॥४॥
ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी । एका जनार्दनीं सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्हीं देव ॥५॥

१००५

अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥
नाम भिन्न रुप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥
गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥
जीव शिव नामें भिन्न । एकपणें एकचि जाण ॥४॥
एका जनार्दनीं शरण । भेदरुपें दिसे भिन्न ॥५॥

१००६

जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥
पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥
ज्या कारणें योगी साधन साधिती । ती हे उभी मुर्ति भीमातटीं ॥३॥
एका जनार्दनीं भक्त करुणाकर । ठेवुनी कटीं कर उभा विटे ॥४॥

१००७

अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥
येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥
आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लातें । तेणेंचि सरतें । तुम्हीं व्हाल त्रिलोकीं ॥४॥
दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव । एका जनार्दनीं भेव । नाहीं मग काळाचें ॥५॥


दत्तनाममहिमा – अभंग १००८ ते १०५५

१००८

धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥

१००९

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥
पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥

१०१०

जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥
करितां उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥
पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥

१०११

दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली तिभुती ॥३॥
काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळीं ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥

१०१२

दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥
त्रिशुळ घेऊनियां करीं । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥
भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । रुप राहिलें हृदयांत ॥५॥

१०१३

हातीं कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगीं चर्चिली विभुती । हृदयीं वसे क्षमा शांती ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । तद्रुप हें झालें चित्त ॥५॥

१०१४

आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥
धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥
मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥
काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥
दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥

१०१५

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥
अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥
तुजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा ॥३॥
महादोषी पतितालागीं । करा वेगी उद्धार ॥४॥
एका जनार्दनीं दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥

१०१६

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझे जन दत्त माझें मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एका जनार्दनीं दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावें त्याच्या ॥४॥

१०१७

वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥
ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ॥३॥
एका जनार्दनीं भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥

१०१८

ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥
जीवें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥
घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥
ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥

१०१९

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणीं घातली मिठी प्रेम दुनावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥

१०१९

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळां दत्तराव ॥१॥
चरणीं घातली मिठी प्रेम दुणावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥

१०२०

दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥
आम्हां प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥
एका जनार्दनीं । दत्तराज मायबहिणी ॥५॥

१०२१

दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥
दत्ताविण नसे दुजें । दत्त मायबाप माझें ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाहीं कळिकाळाचें भय ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥

१०२२

आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेंचि आमुचें व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥
तयाविण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥
एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥

१०२३

माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥
तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

१०२४

आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥
पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥
नामें पवन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥
एका जनर्दनीं छंद । दत्तनामें लागला वेधु ॥४॥

१०२५

श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्‍यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥
दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ॥
सोहं गुढी तेथें उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनीं वनीं एकात्मता खाणी । एका जनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥

१०२६

स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥
विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥
असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥
एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥

१०२७

मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥
म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावाचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥
पाहतां पाहणें परतलें मन । पाहण्याचें विंदान विसरलें ॥३॥
एका जनार्दनीं परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥

१०२८

माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥
फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥
एका जनार्दनीं दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥

१०२९

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥
मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥
परात्पर पहावा हृदयीं तैसा ध्यावा । एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥

१०३०

माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥
भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥
एका जनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतीत ॥४॥

१०३१

एकाएकीं एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वयें प्रगटला ॥१॥
दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥
मुक्त मंडपामाझारीं निजनाम नगरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारीं ॥३॥
भेटणें भेटीं उठी दत्ता आली भेटी । सांगणें ऐकणें दत्त होऊनि उठी ॥४॥
कीर्तनी आतौता नाम श्रीदत्त दत्ता । निजकीर्ति ऐकोनि डोळे तत्त्वतां ॥५॥
जळा सबाह्म आंतरी मनकर्णिका तीरीं । दत्त स्नान करी आत्ममुद्रेवरी ॥६॥
दत्त जंगमीं स्थावरी विश्वी विश्व धरी । तोचि दत्त घरोघरीं नित्य भिक्षा करी ॥७॥
एका जनार्दनीं दत्तवचनें देख । प्रपंच परमार्थ मीच चालवी एक ॥८॥

१०३२

दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥
सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥
संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥
त्याचें नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥

१०३३

परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥
कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशीं स्वयें पाळिती निजभक्त ॥२॥
वत्सालागीं जैसी व्याली धेणु धांवे । निजभक्तांकारणें दता तैसा पावे ॥३॥
भक्त कीर्तनें तोषला दत्त संतोषला । हरिजागरीं स्वयें सिद्ध प्रगटला ॥४॥
निजात्मास्थिति लीला मनीं सुमनमाळा । एका जनार्दनीं दत्त घाली गळां ॥५॥

१०३४

लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥
तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणें तुं अघोरा पावशील ॥३॥
एका जनार्दनीं चित्तीं दत्तपायां । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥

१०३५

वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥
मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥
आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥
एका जनार्दनीं लोकां । विसरुं नका सांगतों ॥४॥

१०३६

वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥
दत्तरुपीं लागतां दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥
दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानीं मनीं ॥३॥
दत्तालागीं आलिंगना । कर समर्थ हें जाणा ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । सदा वसे हृदयांत ॥५॥

१०३७

धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥
त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥

१०३८

उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥
त्याचे चरणीं लीन व्हावें । शुद्धभावें करुनी ॥२॥
मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥
पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥
म्हणे एका जनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥

१०३९

कलियुगी तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥
त्याचें नाम नित्य गावें । भवसिंधुसि तरावें ॥२॥
दत्तमूर्ति हृदयीं ध्यातां । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥
दत्त वसे जया मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदभरित ॥५॥

१०४०

त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥
पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥
योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणतां होटी सव जोडे ॥३॥
एका जनार्दनीं वदतां दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥

१०४१

आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥
प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामें ती समाधी ॥२॥
योगयागादि साधन । गुरुभक्त पावे जाण ॥३॥
विवेक वैराग्य शमादी । हस्ती व्यसे निष्कर्मसिद्धि ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । सदा हृदयीं तिष्ठत ॥५॥

१०४२

दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्कामा ॥१॥
तया नाहीं द्वैतभाव । दृष्टी दिसे गुरुराव ॥२॥
दत्ताविण नसे स्थान । दत्तरुप जन वन ॥३॥
ध्यानीं मनीं दत्तराज । दत्तविण नाही काज ॥४॥
एका जनार्दनीं जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥

१०४३

दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥
दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण कांही नोहे ॥२॥
दत्त जनीं दत्त वनीं । दत्तरुप हें अवनीं ॥३॥
दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनीं विश्रांती ॥४॥

१०४४

खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥
तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥
कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥
एका जानार्दनीं लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥

१०४५

दत्त देतां आलिंगन । कैसे होताहें अभिन्न ॥१॥
स्वलीला स्वरुपता । तिन्हीं दावी अभिन्नता ॥२॥
लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥
मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥
एका जनार्दनीं दत्त पुढें मागें । सगुन निर्गुण रुपें लागला संगे ॥५॥

१०४६

दत्त नामाचा उच्चार । मुखीं वास निरंतर ॥१॥
तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥
सर्व सुखें तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥
भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरनीं ॥४॥
म्हणे एका जनार्दनीं । मना लागलेंसे ध्यान ॥५॥

१०४७

दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥
मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥
दत्तरुप पाहे डोळां । तेणें भय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनीं जपा । मंत्र द्वयाक्षरीं हा सोपा ॥४॥

१०४८

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥
म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥
काळ वेळ कांहीं न लगे तत्त्वतां । नाम उच्चिरितां दरुशनं ॥३॥
भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥
एका जनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भवताप दरुशनें ॥५॥

१०४९

म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥
दत्तनामाचा निजंछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥
निज भाव समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥३॥
एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥

१०५०

प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥
आणीक लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ॥२॥
न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणें कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं वेधलें मन । मनचि जालें उन्मन ॥४॥

१०५१

दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें ॥१॥
दत्तचरणीं ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥
दत्तरुप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ॥४॥

१०५२

श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसी प्रचीत पहा देहीं । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥
एका जनार्दनीं दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥

१०५३

दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥
ऐसा जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥
दत्त आलिंगनीं समाधान । तेणें नासे मीतूपण ॥३॥
एका जनार्दनीं वेधु । दत्तनामें लागला छंदु ॥४॥

१०५४

दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखीं नाहीं दुजा ॥१॥
भावें दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥
दत्ताचें पैं रुप ज्याचे वसे नेत्रीं । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥
गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥
दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्याचेनीं पवित्र होते तीर्थ ॥५॥
ज्याचे चित्तीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥६॥
दत्तालागीं अपीं तन मन धन । परब्रह्मा पुर्ण तोचि झाला ॥७॥
दत्तचरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥८॥
दत्तावरुनियां कुरवंडी काया । तयाचिया पाया मोक्ष लागे ॥९॥
एका जनार्दनीं मुखीं दत्तनाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥१०॥

१०५५

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥
आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥
आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनीं सहज वोवाळीत ॥३॥


दत्तमानसपूजा – अभंग १०५६ ते १०७०

१०५६

केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन ॥१॥
भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥
गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥
एका जनार्दनीं खुण । विश्वी भरला परिपुर्ण ॥४॥

१०५७

सहज सुखासनीं अनुसुयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ती निवे ॥१॥
बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥
कारण प्रकाऋती न घेचि तो माथा । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥
एका जनार्दनीं हृदयीं आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥

१०५८

अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥
प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥
घेऊनियां तीर्थ इंद्रियें तो धांलीं । सकळ निवालीं जनार्दनीं ॥३॥

१०५९

चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥
जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥
इंद्रिय क्रियाजात । कांहीं उचित अनुचित ॥३॥
आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनीं स्वस्थ ॥४॥

१०६०

संचित क्रियामाण । केलें सर्वाचें आचमनक ॥१॥
प्रारब्ध शेष उरलें यथा । तेथें ध्याऊं सदगुरुदत्त ॥२॥
झालें सकळ मंगळ । एका जनार्दनीं फळ ॥३॥

१०६१

साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥
अर्पियले स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन होऊनियां ॥२॥
चित्त हें शीतळ गेली तळमळ । पाहिलें निढळ अमूर्तासी ॥३॥
एका जनार्दनीं केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्हीं लोकीं ॥४॥

१०६२

वर्णावर्ण नाहीं । हेंचि प्रावराण त्याचे ठायीं ॥१॥
परभक्तिईच्या पालवीं । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥
करा करा जन्मोद्धार । हरिभक्तीचा बडीवार ॥३॥
एका जनार्दनीं बोध । दत्तापायीं तो स्वानंद ॥४॥

१०६३

गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटी मांडिली सर्वथा ॥१॥
सुबुद्धि सुगंध चंदन । केलें दत्तात्रया अर्पण ॥२॥
शांति क्षमा अक्षता । तिलक रेखिला तत्त्वतां ॥३॥
एका जनार्दनीं । करुनि साष्टांगें नमन ॥४॥

१०६४

सहस्त्रदल कमलाकर । कंठीं अर्पिले हार ॥१॥
सोळा बार अठरा चार । मांथां वाहुंक पुष्पभार ॥२॥
एका जनार्दनीं अलिकुळु । दत्त चरणाब्ज निर्मळू ॥३॥

१०६५

आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥
तेणें मातला परिमळ । पिंडब्रह्मांडीं सकळ ॥२॥
वासाचा निजवास । एका जनार्दनीं सुवास ॥३॥

१०६६

ज्ञानदीपिका उजळी । नाहीं चितेंची काजळीं ॥१॥
ओवाळिला देवदत्त । प्रेमें आनंद भरित ।२॥
उष्ण चांदणें अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥
भेदाभेद मावळले । सर्व विकार गळाले ॥४॥
एका मिळाली जनार्दनीं । तेजीं मिळाला आपण ॥५॥

१०६७

अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥
चतुर्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटें ॥२॥
मन पवन समर्पिलें । भोग्य भोक्तृत्व हारपलें ॥३॥
एका जनार्दनीं भोजन । तृप्त झालें त्रिभुवन ॥४॥

१०६८

नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥
दत्त जीवींचे जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥
अनुसूयात्मजा पाही । देहभाव उरला नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं दर्शन । चित्त झालें समाधान ॥४॥

१०६९

दत्त सबाह्म अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥
दत्तात्रय माझें मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥
मुळीं सिंहाद्री पर्वती । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥
भक्तां मनीं केला वास । एका जनार्दनीं विश्वास ॥४॥

१०७०

नाम निजभावेंसमर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥१॥
वाचे म्हणता देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळां ॥३॥
दत्तनामाचा निजछंद । नामीं प्रगटे परमानंद ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदें भरीत ॥५॥


हरिनाममहिमा – अभंग १०७१ ते १११९

१०७१

कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥
सर्वभावें भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥
दोषी अजामेळ तोहि नामें तरला । हरिनामें गणिकेल्चा उद्धार जाहला ॥३॥
एका जनार्दनीं नाम सारांचें सार । स्त्रियादि अत्यंजा एका दांचि उद्धार ॥४॥

१०७२

जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥
उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥
अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणें कलीकाळाचा धाक नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें ॥४॥

१०७३

नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥
बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥
काळाचा तो फांसा पडला नाही देहीं । म्हणोनी लवलाही लाहो करा ॥३॥
एका जनार्दनीं लाहो कर बळें । सर्वदा सर्वकाळें लाहो करा ॥४॥

१०७४

दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम ॥१॥
कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥
यम न पाहे तयाकडे । वांडें कोंडे नमस्कारी ॥३॥
विधी शची उमारमण । वंदिती चरण आवडी ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । उपाय नेटका कलियुगीं ॥५॥

१०७५

सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥
साधन सोपें पाहतां जगीं । सांडावी उगी तळमळ ॥२॥
रामनामें करा ध्यास । व्हा रे उदास प्रपंची ॥३॥
एका जनार्दनीं मन । करा वज्राहुनी कठीण ॥४॥

१०७६

नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या ॥१॥
घेई नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चयें ॥२॥
हो कां पंडित ब्रह्माज्ञानीं । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनीं । नाम उच्चरणीं आनंद ॥३॥

१०७७

काळाचेंशासन । गातां श्रीहरीचे गुण ॥१॥
ऐसें सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥
संसाराचा छंद । येणें तुटे भवकंद ॥३॥
एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥

१०७८

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥
देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥
नामस्मरणीं रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥
त्याचे तुळणें दुजा नाहीं । एका पाही जनार्दनीं ॥४॥

१०७९

हरिनामें तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥
ऐशी व्याख्या वेदशास्त्रीं । पुराणें सांगताती वक्त्री ॥२॥
नामें प्रल्हाद तरला । उपमन्यु अढळपदीं बैसला ॥३॥
नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥
हनुमंत ज्ञानी नामें । गणिका निजधामीं नामें ॥५॥
नामें पावन वाल्मिक । नामें अजामेळ शुद्ध देख ॥६॥
नामें चोखामेळा केला पावन । नामें कबीर कमाल तरले जाण ॥७॥
नामें उंच नीच तारिले । एका जनार्दनीं नाम बोले ॥८॥

१०८०

हरीचे नामें हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥
दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥
वृक्ष पाषाणादि तृण । हरिनामें ते पावन ॥३॥
पशु पक्षी अबला । एका जनार्दनीं तरल्या ॥४॥

१०८१

हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥
सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥
सख्यत्वयोगें अर्जुन तरला । प्रत्यक्ष भेटला कृष्णराव ॥३॥
दास्यत्व निकटीं हनुमंता भेटी । हृदय संपुटीं राम वसे ॥४॥
नामधारकपणें प्रल्हादु तरला । प्रत्यक्ष देखिला नरहरी ॥५॥
उपमन्यु बाळक दुधाचिया छंदें । तयासी गोविंदे कृपा केली ॥६॥
ऐसें अपरंपार तरलें नामस्मरणी । एका जनार्दनीं नाम जपे ॥७॥

१०८२

जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥
नाम निर्दाळीं पापातें । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥
पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥
नाम जप जनार्दन । एका जनार्दनीं पावन ॥४॥

१०८३

ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध ॥१॥
एका नामासाठीं सोपें । नारी अमुपें पातकी ॥२॥
शुद्ध अथवा अशुद्ध याती । होत सरती हरिनामें ॥३॥
एका जनार्दनीं नाम सार । उतरी पार भवनदी ॥४॥

१०८४

सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥
हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥
वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामें होती मुक्त महापापी ॥३॥
एका जनार्दनीं वेदांचें निजसार । नाम परात्पर जपती सर्व ॥४॥

१०८५

भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती ॥१॥
धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारी हरिनाम ॥२॥
प्रपंचाचें नोहें कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥
एका जनार्दनीं नाम गोड । होय निवाड जन्माचा ॥४॥

१०८६

हरि म्हणा बोलतां हरि म्हणा चालतां । हरि म्हणा खेळतां बाळपणीं ॥१॥
म्हणा हरिनाम पुरती सकळ काम । हरिनामें ब्रह्मा हातां चढें ॥२॥
हरि म्हणा उठतां हरि म्हणा बैसतां । हरि म्हणा पाहतां लोकलीला ॥३॥
हरि म्हणा आसनीं हरि म्हणा शयनीं । हरि अम्हणा भोजनीं ग्रासोग्रासीं ॥४॥
हरि म्हणा जागतां हरि म्हणा निजतां । हरिम्हणा झुंजतां रणांगणां ॥५॥
हरि महणा एकटीं हरि म्हणा संकटीं । हरि धरा पोटींभावबळें ॥६॥
हरि म्हणा हिंडतां हरि म्हणा भांडतां । हरि म्हणा कांडितां साळी दाळी ॥७॥
हरि म्हणा देतां हरि म्हणा मागतां । हरि म्हणा गातां पदोपदीं ॥८॥
हरि म्हणा देशीं हरि म्हणा परदेशीं । हरि म्हणा अहर्निशी सावधान ॥९॥
हरि म्हणा एकांतीं हरि म्हणा लोकांती । हरि म्हणा अंतीं देहत्यागीं ॥१०॥
हरि म्हणा धर्मता हरि म्हणा अर्थता । हरि म्हणा कामता सकाम काम ॥११॥
हरि म्हणा स्वार्थी हरि म्हणा परमार्थी । हरि म्हणा ब्रह्माप्राप्तीलागीं ॥१२॥
हरि म्हणा भावता हरि म्हणा अभावता । हरि म्हणा पावतां मोक्षपद ॥१३॥
हरि म्हणा निजनिधी हरि म्हणा आनंदि । हरि परमानंदि आनंद तो ॥१४॥
हरि म्हणा जनीं हरि म्हणा विजनीं । एका जनार्दनीं हरि नांदें ॥१५॥

१०८७

हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम ॥१॥
धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥
नेणती शीण योग यागीं । घेती जगीं हरिनाम ॥३॥
एका जनार्दनीं हरिनाम । उमेशी सांगे राम जप करी ॥४॥

१०८८

हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं ॥१॥
सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥
एका जनार्दनीं भरुनि उरला । तो म्या देखियेला विटेवरी ॥३॥

१०८९

नाम जनार्दन वाचे । भय नाहीं कळिकाळाचें । सार्थक जन्माचे । नाम गातां निश्चयें ॥१॥
सोपा मंत्र जनार्दन । जग व्यापक परिपुर्ण । जन वन जनार्दन । एका रुप नाम घेतां ॥२॥
एका शरण जनार्दन । जनार्दन एकपणीं । आदि मध्य अवासानी । दाता एका जनार्दनीं ॥३॥

१०९०

योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥
मुखें गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढें नाचे । भय नाहीं पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥
ना करुं वाउग्या खटपटा । आगमनिगमांचा न घेऊ ताठा । वाउग्या त्या चेष्टा । नामविण न करुं ॥३॥
योगयाग न करुं तीर्थाटन । सुखें गाऊं जनार्दन । एका जनार्दनीं भजन । मुख्य मंत्र सोपरा ॥४॥

१०९१

नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म ॥१॥
अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥
अबद्ध मंत्र जपतां जापक चळे । अबद्ध नाम जपतां जडमुढ उद्धरले ॥३॥
स्वधर्म कर्म करी पडे व्यंग । विष्णुस्मरणें तें समूळ होय सांग ॥४॥
मनापाशीं नाहीं विधिविधान । आसनीं शयनीं भोजनीं नाम पावन ॥५॥
एका जनार्दनीं नाम निकटीं । ब्रह्मानंदी भरली सृष्टी ॥६॥

१०९२

जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें ॥१॥
पाहता ब्रह्मांडीं व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥
एका जनार्दनीं रिता ठाव कोठें । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥

१०९३

श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥
माना हाचि रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावें ॥२॥
योगयाग कसवटी । नको नको कोरड्या गोष्टी । वांयाचि हिंपुटी । शिणती मुर्ख ॥३॥
शरण रिघा जनार्दनीं । एकपणें मन करुनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । चिंतन तें असों द्यावें ॥४॥

१०९४

कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥
वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥
भोजनाची आस न धरा मानसीं । धांवतो त्वरेसी नाम घेतां ॥३॥
एका जनार्दनीं नामाची आवडी । घालितासे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

१०९५

हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची ॥१॥
वेदशास्त्र देती ग्वाही । पुराणे तोहि बोलती ॥२॥
नामस्मरणे निरसे भेद । तुटे समुळ कंद संसार ॥३॥
निरसे भोग दुःखव्याधी । तुटे उपाधी शरीर ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे । नाम गाणें सतत ॥५॥

१०९६

जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति ॥१॥
ऐसें वेदशास्त्रें गर्जती । विवादतीं पुराणें ॥२॥
नाम निरंतर मुखीं सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥
एका जनार्दनीं शरण । भुक्तिमुक्तिची नाहीं कारण ॥४॥

१०९७

हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥
तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥
एका जनार्दनीं छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥

१०९८

मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥
पायांचा व्यापार । करावें तीर्थाटन निर्धार ॥२॥
हातांचा व्यापार । करावें दानधर्म सार ॥३॥
एका जनार्दनाचा निर्धार । मुखीं नामाचा उच्चार ॥४॥

१०९९

आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥
तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं भावाचे माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ॥३॥

११००

आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान ॥१॥
मग न जाय सैरावैरा । चुके जन्माच्या वेरझारा ॥२॥
एका जनार्दनीं ध्यान । सदा मनीं नारायण ॥३॥

११०१

सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥
नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

११०२

नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा ॥१॥
ऐसा पुराणीचा बोध । वाचे गोविंदा आठवा ॥२॥
एका जनार्दनीं वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥

११०३

नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥
भलते वेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावळी ॥२॥
न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥
एका जनार्दनीं नेम । सोपें नाम जपतां ॥४॥

११०४

नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥
नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥
नाम निजधीर मानुनी भरंवसा । गाती ते उल्हासा रात्रंदिन ॥३॥
एका जनार्दनीं ध्यानीं आणि मनीं । नाम संजीवनीं जपतसे ॥४॥

११०५

अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगें कासया करिसी ॥१॥
मनीं हरि धरीं मनीं हरि धरीं । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥
साधन फुकट वाउगे ते कष्ट । वेगें धरीं हरि वरिष्ठ मनामाजीं ॥३॥
साधन साधितां शिणताती मुनी । तो हरि कीर्तनीं नाचतसे ॥४॥
सायास न लगे करावें तें कांही । एका जनार्दनीं पायीं बुडी दिली ॥५॥

११०६

साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥
म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
सांडी सांडी थोरपण । व्हावें लीन कीर्तनीं ॥३॥
शरण एका जनार्दनीं । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥

११०७

सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥
करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ति ॥२॥
हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥
एक करितां हरिभक्ति । एका जनार्दनीं तृप्ती ॥४॥

११०८

असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥
प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥
हरि नाम वचन एकचि प्रमाण । हें तो अप्रमाण करील कोण ॥३॥
जनार्दनाचे वचनीं द्यावे अनुमोदन । एका जनार्दनीं प्रमण तेंचि होय ॥४॥

११०९

आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥
नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥
नाहीं येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥
एका शरण जनार्दनीं । जनार्दन जनीं वनीं ॥४॥

१११०

आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥
काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥
धरुं वैष्णवांचा संग । टाकूं कुसंग लाजोनी ॥३॥
म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनीं निजदास ॥४॥

११११

मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥
नित्यरामकृष्णहरी । वदतसे पैं वैखरी ॥२॥
करिती देवाचे पैं ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥
एका जनार्दनीं नाम । हेंचि पाववी निजधाम ॥४॥

१११२

महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखें ॥१॥
जगीं नाम तारक नौका । आन उपाय नाहीं देखां । साधन साधितां साधकां । नामापरते थोर नाहीं ॥२॥
धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनीं भय पोटीं । नाहीं तुम्हा काळाचें ॥३॥

१११३

टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥
न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥
ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणें ॥३॥
एका जनार्दनीं धरितां पायीं भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥

१११४

सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥
धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥
मन करीं गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनीं वाट । सोपी मग सहजची ॥३॥

१११५

येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥
गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥
गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥
प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥
दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥
एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥

१११६

देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन ॥१॥
मुगुट कुंडलें मेखळा । कांसे शोभे सोनसळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म । सदा उदार मेघःश्याम ॥३॥
ऐसा हृदयीं आठवा । एका जनार्दनीं सांठवा ॥४॥

१११७

जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥
अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥
अवतार चरित्र नामें । परिसतां निवारे कर्में ॥३॥
जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥
धन्य धन्य ते भाग्याचे । हरिगुण वर्णिती वाचे ॥५॥
कांहीं सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि देंहीं देव ॥६॥
एकपणे वेगळा । एका जनार्दनीं देखिला ॥७॥

१११८

जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरीं करीन महोत्सव ॥१॥
शांति सिंहासनीं बैसवीन भावें । बैसावें अवघें हारकारीन ॥२॥
द्वैत विसरुनि करीन पादपुजा । तेणें गरुडध्वजा पंचामृत ॥३॥
शुद्धोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञानें स्वरुपासी परिमार्जन ॥४॥
सत्त्व क्षीरोदक देवानेसवीन । राजन प्रावर्ण पीतांबर ॥५॥
दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिती लेईल स्वामी माझा ॥६॥
भक्त नवविध घालूनि सिंहासन । एका जनार्दनीं पूजा करी ॥७॥

१११९

पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥
करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥
एका जनार्दनीं सर्व भावें पूजन । जनीं जनार्दन पूजियेला ॥३॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref: transliteral

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

संत एकनाथ अभंग ९११ते१११९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *