भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा

॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥

यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग

राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।
पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥
प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।
अग्निहोत्रें घरोघर । याग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥
पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।
घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥
भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।
पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥

अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन

राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।
आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना ॥ ५ ॥
नमन केले रायासी । इंद्रें पाठविले तुम्हांपासीं ।
काय अनुज्ञा आम्हासी । त्या कृतकार्यासी प्रेरावें ॥ ६ ॥
राजा म्हणे तया अप्सरासी । प्रलोभोनि आणावे ऋष्यशृंगासी ।
कळो न द्यावे विभांडकासी । अचुक कार्यासी साधावें ॥ ७ ॥
विभांडक गेला अनुष्ठानासी । एकला ऋष्यशृंग गुंफेसीं ।
प्रमदा पातल्या तयापासीं । हावभावेंसीं उद्यत ॥ ८ ॥
अप्सरांना पाहून झालेली ऋष्यशृंगाची अवस्था
त्यांसी देखतांचि दृष्टी । ऋष्यशृंगें सांडिली पर्णकुटी ।
होतां डोळियां डोळेभेटी । पळे उठाउठी मृगभावें ॥ ९ ॥
मुख मुरडी मागिलीकडे । परतोनि पाहें तयांकडे ।
स्वेग पाउलीं पळे पुढें । रहों राहों उडे सत्राणें ॥ १० ॥
दुरोनि पाहे दृष्टी । मा कैसेनि होईल भेटी ।
बोलण्याच्या खुंटल्या गोष्टी । नातुडे दृष्टी मृगभावें ॥ ११ ॥
झाली विभांडकाची वेळ । प्रमदा गेल्या सकळ ।
ऋष्यशृंग अति विकळ । आला तत्काळ गुंफेसीं ॥ १२ ॥
करितां पितयाचे सेवेसी । त्या आठवतीं मानसीं ।
कैसे आले होते तापसी । अति विव्हळे ऋषीश्वर ॥ १३ ॥
पिता पुसे पुत्रासी । आजि दुश्चित कां मानसीं ।
तो म्हणे आले होते तापसी । तुमचे भेटीसी अति साधु ॥ १४ ॥
त्यांच्या जटांसीं मवाळी । मनोहर अंगें सोज्ज्वळीं ।
मज पळतां तत्काळीं । अदृश्य ते वेळी ते झाले ॥ १५ ॥
मी न घे त्यांचे दर्शन । व्यर्थ केले पलायन ।
क्षणक्षणां होय आठवण । उद्वेग पूर्ण त्यांचेनि मी ॥ १६ ॥
येरू न सांगे जीवींची गोष्टी । त्यांची लागली आवडी पोटीं ।
केव्हा होईल त्यांची भेटी । जीवीं चटपटीं मोठी लागली ॥ १७ ॥

ऋष्यशृंगाची मनोव्यथा

आश्रमा आले अतिथी । तेपूजावे अति प्रीतीं ।
मी वंचलों देहभयअीशक्ती । मज त्यांची भक्ति नघडेचि ॥ १८ ॥
नाहीं पुसलें आगमन । नाहीं दिधलें अभ्युत्थान ।
न करींच पूजाविधन । विमुख सज्जन म्यां केले ॥ १९ ॥
त्यांसी म्यां केले नाहीं नमन । नाहीं बोलिलों मृदु वचन ।
देहलोभें ठकलो पूर्ण । विमुख सज्जन म्यां केले ॥ २० ॥
त्यांची मागुती होईल जरी भेटी । तरी पुसूं त्यांसी गृह्य गोष्टी ।
हृदयीं आवडी बैसली मोठी । केव्हा ते दृष्टी देखेन ॥ २१ ॥
ऐसी करितां तळमळ । तंव झाला प्रातःकाळ ।
विभांडक अनुष्ठानशील । गेला तत्काळ स्नानासी ॥ २२ ॥

ऋष्यशृंग मोहजालात अडकतो

एकाकी पुत्र पर्णकुटीं । देखोनि प्रमदा आल्या उठाउठीं ।
त्यांसी देखोनियां दृष्टी । करितां गोष्टी साशंक ॥ २३ ॥
धैर्य धरोनि उभा ठाके । मृग स्वभावें मागे चवके ।
आवडीचेनि भावें खुडके । सवेंचि फडके गजबजिला ॥ २४ ॥
तिहीं झणत्कारिला वीणा । नाद संचरला श्रवणा ।
मोह उपजला अंतःकरणा । गमनागमना विसरला ॥ २५ ॥
घ्हंटो पारधी जैसा । मधुरनादें मृगमानसा ।
भुलवोनियां पाडी फांसा । तैसी दशा पावला ॥ २६ ॥
टवकारली कर्णकुटी । उचलोनियां ग्रीवागांठी ।
प्रमदा लक्षोनि दृष्टी । मान त्यांच्या कंठी घातली ॥ २७ ॥
मृगाचा स्वभाव पूर्ण । व्हावें नादाअधीन ।
जंव जंव ऐके गायन । अंव तंव आपण नाचत ॥२८ ॥
कोण तुमचे वस्तीचें स्थान । कोण्या अर्थें येथें आगमन ।
तुमचे हृदयीं व्यथा कोण । गंडें अति तीक्ष्ण दिसताती ॥ २९ ॥
तुझे माथां शृंग तीक्ष्ण । तुज ऋष्यशृंग अभिधान ।
आमचे हृदयीं गंडे तीक्ष्ण । गंडऋषी जाण आम्हांसी म्हणती ॥ ३० ॥
आमचें रतिमण स्थान । चाख पां येथील जीवन ।
म्हणोनि करविती रसपान । देती चुंबन अधरामृतें ॥ ३१ ॥
आमचें सर्वांग सिद्ध अनुष्ठान । आमच्या गंडांचे स्पर्शन ।
करितां सुखसमाधान । म्हणोनि आलिंगन त्यासी देती ॥ ३२ ॥
आमचे वनींचा फळपाडे । म्हणोनि देती साकरेचे लाडु ।
ये वनीं नाहीं हा सुरवाडु । अति दुर्वाडु अनुष्ठान ॥ ३३ ॥
ही आमुची समाधीस्तिती । म्हणोनि रतिमुद्रा लाविती ।
रत्यासनीं बैसविती । झाला वशवतीं तयांसी ॥ ३४ ॥
विसरला आश्रमस्थिती । विसरला आपुली गती ।
यावें परतोनि मागुती । हें निश्चिंतीं विसरला ॥ ३५ ॥
विसरला संध्यास्नान । विसरला अनुष्ठान ।
विसरला जपध्यान । गमनागमन विसरला ॥ ३६ ॥
विसरला स्थितिगई । विसरला प्राप्ति अप्राप्ती ।
विसरला पितृभक्ती । स्त्रियानुवतीं वर्तत ॥ ३७ ॥
विसरला निजअभवस्था । विसरला निजस्वार्था ।
विसरला जो निजपिता । स्त्रियां तत्वतां वश्य केला ॥ ३८ ॥
विसरला वेदाध्ययन । विसरला शास्त्रपठण ।
विसरला मी तूं कोण । स्त्रियांधीन तो झाला ॥ ३९ ॥

स्त्रीसंगाचे दुष्परिणाम

क्षणार्ध स्त्रियांची संगती । वनवासी होय वशवतीं ।
जे नित्य स्त्रियांतें सेविती । त्यांची निर्गति कैसेनि होय ॥ ४० ॥
स्त्रिया वश्य केले वनवासी । स्त्रियां केले किंकर ग्रामवासी ।
अपभ्रंशता स्त्रियांपासी । घात मुक्तीसी स्त्रीसंगे ॥ ४१ ॥
स्त्रियांचे दर्शन स्पर्शन । स्त्रियांचे जें भाषण ।
स्त्रियांची जी आठवण । अपभ्रंश संपूर्ण स्त्रीसंग ॥ ४२ ॥
नको स्त्रियांची संगती । ऋष्यशृंग झाला वशवतीं ।
भुलोनियां स्त्रियांप्रती । आणिला निश्चितीं नगरासी ॥ ४४ ॥

ऋष्यशृंगाचा शांतनेशी विवाह

आणिले देखोनि ऋष्यशृंगासी । परम आल्हाद दशरथासी ।
शृंगारिले नगरासी । गुढिया चौपासीं उभविल्या ॥ ४५ ॥
मखरें तोरणे टिळे माळा । वस्त्रें भूषणें लोकां सकळां ।
शृगारिलें गाई गोवळां । विभांडकें सोहळा देखावया ॥ ४६ ॥
मेळवोनि ऋषी सज्जन । वसिष्ठें निर्धारिलें लग्न ।
ऋष्यशृंगासी कन्यादान । केले सुलग्न शांतनेसीं ॥ ४७ ॥
शांतनेचा पिता शांतन । राजाचा मित्र जीवप्राण ।
तो आणिला पाचारून । लग्नालागूनी शांतनेच्या ॥ ४८ ॥
राजा दशरथ भाग्यनिधी । वसिष्ठ कुलगुरू सद्‌बुद्धी ।
विवाहहोम लग्नसिद्धी । कार्य त्रिशुद्धीं साधिलें ॥ ४९ ॥
विभांडक आला आश्रमासी । न देखे ऋष्यशृंग पुत्रासी ।
ठकवूनि दशरहें नेलें त्यासी । अति क्रोधेंसीं चालिला ॥ ५० ॥
आला अयोद्या प्रांतासी । देखे शृंगारिले नगरासी ।
गाई गोवळे शृंगारेंसीं । मार्गीं त्यासी पैं भेटले ॥ ५१ ॥
चाळवोनि आणिलें माझ्या बाळा । कायसा ये नगरीं सोहळा ।
पुसाअ झाला गोवळां । भेटला सकळां मार्गस्थां ॥ ५२ ॥
ते ऐसा संगती वृतांत । ऋष्यशृंग मृगीसुत ।
त्यासी कन्या दे दशरथ । सोहळा नगरांत लग्नाचा ॥ ५३ ॥
मूळ धाडिलें विभांडकासी । तो त्यातें न भेटे वनवासी ।
विधियुक्त लाविलें लग्नासी । उल्हासेंसीं दशरथें ॥ ५४ ॥

विभांडकाला आनंद

ऐकतां पुत्र विवाहासी । विभांडक अति उल्हासी ।
संतोष झाला मानसीं । प्रसन्नतेसीं तो आला ॥ ५५ ॥
राव वेगें सामोरा आला । धांवोनियां चरणां लागला ।
अति प्रीतीने आलिंगिला । म्हणे भला भला दशरथा ॥ ५६ ॥
सर्वालंकारभूषणेंसी । वाहिली देखोनि वोहरासी ।
विभांडक सुखसंतोषी । दशरथासी तुष्टला ॥ ५७ ॥
राया जे जे तुझे मनोरथ । ते ते पुरवीन मी समस्त ।
म्हणोनि आल्हादयुक्त । पुत्रप्रीतीं दशरथा प्रिय झाला ॥ ५८ ॥
विष्टरोक्त वरासन । षोडशोपचारें पूजन ।
केलें चरणतीर्थप्राशन । ऋषि प्रसन्न रायासीं ॥ ५९ ॥

लोमपादाच्या राज्यात अवर्षण

शांतन आणि मित्र रायासी । लोमपाद म्हणती तयासी ।
अवर्षण त्याच्या देशीं । तेणें दशरथासी प्रार्थिलें ॥ ६० ॥
विभांडक द्यावा मजपासीं । करवीन पर्जन्येष्टियागासी ।
पीडा निवारेल भूतांसी । गोब्राह्मणांसी सुख करील ॥ ६१ ॥
दशरथासी उदार स्थिती । अवंचक मित्रकार्यार्थीं ।
लोमपादाचे कार्याप्रती । प्रार्थिला निश्चितीं विभांडक ॥ ६२ ॥
विभांडक प्रेमें आपण । म्हणे भावार्थेंसीं मी तुज अधीन ।
राया तुझें निल्लंघीं वचन । करीन यज्ञ लोमपादाचा ॥ ६३ ॥
विभांडकें करिता यज्ञ । राष्ट्रीं वर्षला पर्जन्य ।
तृणधान्यें मेदिनी पूर्ण । गोब्राह्मणां आल्हाद ॥ ६४ ॥
पूजोनियां विभांडकासी । आणिला दशरथापासीं ।
ऋषि येतांचि अयोध्येसी । रायें यागासी आरंभिले ॥ ६५ ॥

ऋष्यशृंगाकडून पुत्रकामेष्टी यज्ञ

वसिष्ठ श्रेष्ठ कुळगुरू । दुजा विभांडक ऋषीवरू ।
ऋष्यशृंग हर्षनिर्भरू । यज्ञांगीकारू तेणें केला ॥ ६६ ॥
ऋष्यशृंग म्हणे रायासी । मी पुत्र देईन तुम्हांसी ।
म्हणोन अति उल्हासेंसीं । स्वयें यागासी प्रवर्तला ॥ ६७ ॥
निमूनियां निजपिता । वसिष्ठ वंदोनि तत्वता ।
दसह्रथाच्या निजस्वार्था । यज्ञ करी ऋष्यशृंग ॥ ६८ ॥
कुंड मंडप वेदिका सुलक्षण । इध्मा बर्हि त्रिसंधान ।
करोनियां परिस्तरण । अग्निस्थापन तेणें केले ॥ ६९ ॥
प्रणीतापात्रें परिपूर्ण । आज्यस्थाली बर्हिआस्तरण ।
स्रुक्‌स्रुवा परिमार्जन । केलें प्रोक्षण यज्ञोपचारां ॥ ७० ॥

यज्ञपुरुष प्रकट होतो

ऋष्यशृंगाचें अनुष्ठान । अतिशयें श्रेष्ठ संपूर्ण ।
होम करितां प्रधान । यज्ञपुरुष आपण प्रकट झाला ॥ ७१ ॥
गगन झालें देदीप्यमान । परी त्या तेजाचें लक्षण ।
नव्हे अति शीत ना उष्ण । स्वानंदपरिपूर्ण निजतेजें ॥ ७२ ॥
वसिष्ठासी विस्मय पूर्ण । विस्मय पावे विभांडक आपण ।
विस्मय पावले ऋषीगण । अयोध्येचे जन तटस्थ ॥ ७३ ॥
खुंटली श्वासोच्छ्वासाची गरी । लवों विसरलीं नेत्रपाईं ।
ऋष्यशृंगतपाची खाती । यज्ञमूर्ति प्र्कटली ॥ ७४ ॥
मागें यज्ञ केले बहुतीं । तेणें पावले फळप्राप्ती ।
परी यज्ञीं प्रकटे यज्ञमूर्ती । हे केली ख्याती ऋष्यशृंगें ॥ ७५ ॥

पायसदान

उदरा येईल रघुपती । यालागीं यज्ञी यज्ञमूर्ती ।
पायसपात्र घेवोनि हातीं । ऋष्यशृंगाप्रति देता झाला ॥ ७६ ॥
हा यज्ञपुरोडाश संपूर्ण । द्यावा राजपत्निमयांसी विभागून ।
येणें पुरोडाशें जाण । पुत्रसंतान होईल ॥ ७७ ॥
येणें प्रसादें पुत्रप्राप्ती । त्याचेनि पावन त्रिजगती ।
ऐसी निर्माण पुत्रसंतती । होईल निश्चितीं रायासी ॥ ७८ ॥
विलंब न करावा अर्धक्षण । तत्काळ करावा प्राशन ।
विलंबीं उपजेल विघ्न । हे सांगोनि आपण अदृश्य झाला ॥ ७९ ॥
अदृष्य जालिया यज्ञमूर्ती । तें पायसपात्र घेवोनि हातीं ।
ऋष्यशृंग दे रायाप्रती । पुत्रार्थी प्रसाद ॥ ८० ॥
गुह्य सांगे वसिष्ठासी । विलंबू करूं नये यासी ।
समभाग दे राणियांसी । विलंबासी अति विघ्न ॥ ८१ ॥
फं मूलं तथा तीर्थं प्रसादो राघवस्य च ।
शीघ्रमेवानुसेवेत विलंबः कार्यनाशकः ॥ १ ॥

वसिष्ठांकडून यज्ञप्रसादाचें विभाजन

यालागीं तुझे नांव वसिष्ठ । कुळगुरु अति श्रेष्ठ ।
कार्य साधावें उद्‌भट विभागीं इष्टविभागें ॥ ८२ ॥
जाणोनि भविष्याची स्थिती । वसिष्ठ पायस घेवोनि हातीं ।
भाग केले यथानिगुती । विभागस्थिती अवधारा ॥ ८३ ॥
कौसल्या ते धर्मपत्नीी । सुमित्रा वरिली साध्वी म्हणोनि ।
कैकेयी वरिली सुंदरपणीं । रूपयौवनीं गर्विष्ठ ॥ ८५ ॥

कैकेयीचा असंतोष, वसिष्ठांचे उत्तर

कैकेयी म्हणे वसिष्ठाप्रती । मी रायाची पढियंतीं ।
ज्येष्ठ भाग देई मजप्रती । येरें निरुती वारिली ॥ ८६ ॥
ज्येष्ठ भाग ज्येष्ठेप्रती । तो केवी ये कनिष्ठेप्रती ।
जेवीं गजाची भूषणस्थिती । अजेप्रति अतिभार ॥ ८७ ॥
जरी अमोलिक हिरे होती । ते शालीग्रामास पूज्य न होती ।
तू जालियाही पढियंती । ज्येष्ठ भागाप्रती अयोग्य ॥८८ ॥
ज्येष्ठ भाग दिधला कौसल्येसी । दुजा दिधला सुमित्रेसी ।
तिजा दिधला कैकेयीसी । तिच्या मानसीं अति क्रोध ॥ ८९ ॥
कांही न चाले वसिष्ठावरी । क्रोधे द्वेष गुरूचा करी ।
विभाग आलियाही करीं सुख जिव्हारी असेना ॥ ९० ॥
मी गेले होतें स्वर्गाप्रती । म्यां भोगिल्या स्वर्गसंपत्ती ।
ज्येष्ठ पिंड नये माझ्या हातीं । तो द्वेष चित्तीं गुरूचा ॥ ९१ ॥
करावया पिंडप्राशन । दोघी केलें शुद्धाचमन ।
कैकेयी पाहे रायांचे वदन । तो विलंब विघ्न वोढवलें ॥ ९२ ॥

घारीचा पूर्वजन्मवृत्तांत

जे न मानिती गुरुवचन । त्यांसी तत्काळ होय विघ्न ।
तेचि अर्थांचे निरूपण । कथानुसंधान अवधारा ॥ ९३ ॥
सुवर्चसा अति नाचणी । नाचों आली मद्य सेवूनी ।
ताल चुकतां तत्क्षणीं । तिसी ब्रह्मयानें शापिले ॥ ९४ ॥
सत्यलोकी मद्यपान । अत्यंत पैं निंद्य जाण ।
ताल चुकली आपण । हे लक्षण मद्याचें ॥ ९५ ॥
निर्लज्जे उन्मत्ते सुंदरी । नष्ट पापिणी होय घारी ।
ताल चुकोनि जासी चांचरी । तसें तूं करी परिभ्रमण ॥ ९६ ॥
शाप ऐकोनि दारुण । उःशाप मागे अति दीन ।
प्रसन्न केला चतुरानन । वरदवचन तो वदला ॥ ९७ ॥
दशरथायाग पुत्रजन्य । तेथें यज्ञपुरोडाश परमान्न ।
त्रिधा भागें विभागिती अन्न । एक भाग प्राशन करावा ॥ ९८ ॥
ज्येष्ठभागीं तुज नाहीं गती । मध्यभागीं न पावे शक्ती ।
कनिष्ठा कनिष्ठभागप्रती । तेणें न्र्मुक्ती निजशापा ॥ ९९ ॥
हें होईल अयोध्यानगरीं । यलागीं ते जाणावी खरी ।
मोक्षाची प्रथम पुरी । वेदशास्त्रां निजगजर ॥ १०० ॥
काशी मुक्तिक्षेत्र होय पाहीं । मेल्या मुक्ति तियेच्या ठायीं ।
सकळ वैकुंठा गेली नाहीं । अयोध्येची नवाई अपूर्व ॥ १ ॥
काशीहूनि ते वहिली । अयोध्येची उदारता भाली ।
त्रिवार नगरी वैकुंठा नेली । नमरता केली सहकुटुंब मुक्त ॥ २ ॥
प्रथम रुक्मांगदे नेली । दुजी शिबीने ख्याती केली ।
तिजी श्रीरामें वहिली । वैकुंठा नेली निजगजरें ॥ ३ ॥
आणि चौथेनि ही मागुती । अयोध्या जाअईल वैकुंठाप्रती ।
ऐसी वसिष्ठादिकांची ख्याती । अयोध्येप्रति असे पैं ॥ ४ ॥
यालागी मुक्तिक्षेत्राच्या शिरीं । अयोध्या जाण प्रथम पुरी ।
जड जीवांतें उद्धरी । शाप निवारी स्नानमात्रें ॥ ५ ॥
ते अयोध्येसी भागप्राशन । केलिया तुज शापमोचन ।
ऐसे बोलिला चतुरानन । अप्सरा आपण घारी जाली ॥ ६ ॥

कैकेयीच्या प्रसादावर घारीची झडप

ते ऐशीं सहस्र वर्षेंवरी । भोंवे अयोध्येच्या महाद्वारी ।
यज्ञभाग देखतां करीं । झडप मारी तत्काळ ॥ ७ ॥
कौसल्या सत्य पतिव्रता । तीवरी न घालवेचि सर्वथा ।
सुमित्रा शुद्ध सात्विकता । तीहीवरी तत्वता न घालवेची ॥ ८ ॥
कैकेयी अति क्रोधायमान । निजभागीं नाहीं मन ।
रागें पाहे रायाचें वदन । तंव घारीनें हिरोन भाग नेला ॥ ९ ॥
तोंडावरी हाणी पाखीं । हात ओरबाडिला नखीं ।
भाग घालोनियां मुखीं । गेली एकाएकीं गगनासी ॥ ११० ॥
लोक करिती हाहाकार । एक सवेग विंधिती तीर ।
अवघे पाहती ऊर्ध्वशिर । थोर चमत्कार सर्वांसी ॥ ११ ॥
लागतां पांखाची झडे । कैकेयी उलथोनि क्षितीं पडे ।
भाग गेला मग रडे । रायाकडे पाहोनी ॥ १२ ॥
रायास म्हणे पाहतां काय । येरू म्हणे मी करूं काय ।
तुझा गर्व तुज आडवा होय । येथें उपाय न चालती ॥ १३ ॥
घारी भाग करितां प्राशन । तुटले तिचें देहबंधन ।
खुंटलें गमनागमन । सुखसंपन्न ती जाली ॥ १४ ॥
तोचि भाग उपेक्षितां । कैकेयीसी परमावस्था ।
बाप गर्वाची अति गर्वता । निजस्वार्था अति घात ॥ १५ ॥
जेवीं उपेक्षितां आत्मज्ञान । अंगी आदळे अज्ञान ।
विषयी पावई अधःपतन । ते दशा परिपूर्ण कैकेयीसी ॥ १६ ॥

कैकेयीचा आक्रोश

काय मायबाप बहुत दिवस जितां । पुत्र उपेक्षी हेळसितां ।
रडे मेल्यामागें तर्पण करितां । पिंड देतां सद्‍६गति ॥ १७ ॥
तैसी दशा कैकेयीसी । उपेक्षिले निजभागासी ।
गेलीया मागें कुसमुसी । उसकाबुकसीं स्फुंदन ॥ १८ ॥
जे मी रायाची पढियंती । ते मी जालें अभाग्य क्षितीं ।
मज नव्हेचि पुत्रसंतती । निंद्य सर्वार्थीं मी जालें ॥ १९ ॥
माझें रायासी अति कोड । तें कोणासी नव्हेची गोड ।
जळो माझें काळें तोंड । लोक वितंड निंदिता मज ॥ २० ॥
ज्येष्ठ भाग मागतां आवडी । तंव कनिष्ठासीच आली घाडी ।
मज हे थडी ना ते थडी । निंद्य रोकडी मी जालें ॥ २१ ॥
स्वार्था नाडलें मी संपूर्ण । जिवों न लाहें लोकांभेणें ।
मज येतें कां वो मरण । रडे दारुण संतापें ॥ २२ ॥
स्वर्गीं जे मी सुरवरा वंद्य । ते मी मृत्युलोकी निंद्य ।
विभागीं भाग्य माझे मंद । पाषाणवत मी झाले ॥ २३ ॥
जे मी रायाची आवडई । तेणेंचि जगा नावडती ।
पाषाणवर माझी स्थिती । देवपिररार्थी अति निंद्य ॥ २४ ॥
अंधाहातींचे रत्न पडे । तें त्याचें त्यास न सांपडे ।
कैकेयीही तेणेंचि पाडें । रडे पडे अति दुःखी ॥ २५ ॥
केश सुटले मोकळे । गडगडां पृथ्वीवरी लोळे ।
अश्रुधारा स्रवती डोळे । अति तळमळे तळमळीं ॥ २६ ॥
देखोनि कैकेयीचें दुःख । कौसल्या कळवळली देख ।
हरूनि तिचें असुख । प्रवतें देख उपकारार्थीं ॥ २७ ॥
श्रीभावार्थरामायण । एका जनार्दना शरण ।
जालें येथवर निरूपण । पिंडप्राशन अवधारा ॥ २८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
पुरोडाशविभागो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
॥ ओव्या १२८ ॥ श्लोक ० ॥ एवं १२८ ॥

हे पण वाचा: एकनाथी भागवत 


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय दुसरा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *