भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा

त्रिशिरा व खर राक्षसांचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दूषणाच्या वधानंतर खर व त्रिशिरा हे पुढे येतात; त्यांच्या वल्गना :

श्रीरामें मारिल्या सैन्य धुरा । तेणें दुर्धर कोप आला खरा ।
त्यासी पुसोनियां त्रिशिरा । श्रीरामचंद्रावरी आला ॥ १ ॥
खर म्हणे त्रिशिर्‍यासी । रणीं मर्दिलें दूषणासी ।
म्हणोनि भिवो नको रामासी । तुझे पाठीसीं मी आहें ॥ २ ॥
मनुष्य खाजें राक्षसांसी ।त्याचें भय काय आम्हांसी ।
काटें देखोनि फणसासी । खाणारासी भय नाहीं ॥ ३ ॥
चिरोनि फणसाचे कांटे । काढोनि अमृताचे सांठे ।
मग सेविती घटघटें । युद्धसंकटें तेंवि श्रीराम ॥ ४ ॥
श्रीराम बाणकटकेंसीं । अति दुर्धर राक्षसांसी ।
तो गोड भखितां आम्हांसी । रणीं रामासी निर्दाळीं ॥ ५ ॥
ऐकोनि खराचें वचन । दुसरा खर भुंके जाण ।
तैसा त्रिशिरा आपण । की गर्जन तिहीं मुखीं ॥ ६ ॥
वेंगीं बैसोनियां रथा । राहें साहें म्हणे रघुनाथा ।
धनुष्य मर्दोनियां हाता । होय वर्षता बहु बाण ॥ ७ ॥

ततः प्रहृष्टस्त्रिशिराश्चापमुद्यम्य वीर्यवान् ।
गच्छ युद्ध्येत्यनुज्ञातो राघवाभिमुखो ययौ ॥१॥

त्या दोघांची गर्वोक्ती, श्रीरामांचे प्रत्युत्तर :

खरासी म्हणे त्रिशिरा । कोण पाडू रणीं रघुवीरा ।
बाणीं खिळोनि करीन पुरा । शस्त्रसंभारा तूं पाहें ॥ ८ ॥
मग त्रिशिरा म्हणे श्रीरघुनाथा । वधोनि राक्षसां बहूता ।
पळों नको गा मागुता । तुज मी आतां वधीन ॥ ९ ॥
लहाना मत्स्या मत्स्यु आकळी । तेंवी राक्षसां केली त्वां होळी ।
त्या तुज मी सगळेंचि गिळीं । रामा तुज मी गिळूं आलों ॥ १० ॥
श्रीराम म्हणे त्रिशिराप्रती । खराश्वयोगें जन्मप्राप्ती ।
तो तूं खराचा सांगाती । वेसरउत्पत्ती भारवाही ॥ ११ ॥
तूं भारवाही वेसर खरा । वाहसी त्रिशिरांच्या भारा ।
तिहीं मुखीं जल्पसीं सैरा । नाहीं विचारा एक मुख ॥ १२ ॥
त्रिजात त्रिशिरांचा तूं राक्षस देख । त्रिमुखा युद्धीं नव्हे एक मुख ।
पळोनि जासी खराभिमुख । वल्गना भुंकभुंकसी ॥ १३ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । त्रिशिरा वर्षे अमित बाण ।
आच्छादोनि श्रीरघुनंदन । बाणीं गगन व्यापिलें ॥ १४ ॥
देखोनि श्रीराम बाणीं आच्छन्न । राक्षसांचें शेष सैन्य ।
अवघें परतलें गर्जोन । रघुनंदन निर्दळिला ॥ १५ ॥

श्रीरामबाणांनी रथ, घोडे व सारथी यांचा नाश झाल्यावर त्रिशिरा विरथी होऊन लढतो :

त्रिशिरा तूं योद्धा भला भला । रणीं श्रीराम निवटिला ।
राक्षसीं गजबजु पैं केला । तेणें क्षोभला श्रीराम ॥ १६ ॥
श्रीरामें विंधितांचि जाणा । बाण आदळती बाणां ।
भाळीं वाजती खणखणा । ठिणग्या गगना न माती ॥ १७ ॥
श्रीरामबाणांचा कडकडाट । राक्षसबाणांचा अति नेट ।
घायीं उठला हव्यवाट । दोघे सुभट महायोद्धे ॥ १८ ॥
गरुड नखें सर्प चिरी । तेंवी श्रीराम बाणें बाण विदारी ।
तोडोनियां भूमीवरी । भुजंगाकारीं पसरिले ॥ १९ ॥
राक्षसांचे बाणजाळ । वायु तोडी जेंवी आभाळ ।
तेंवी श्रीरामें तोडिलें सकळ । त्रिशिरा प्रबळ कोपळा ॥ २० ॥
त्रिशिरा ती बाणीं रघुनाथा । लागवेगीं विंधिलें माथां ।
तेणें श्रीरामा नव्हेचि व्याथा । म्हणे गंधाक्षता मज केली ॥ २१ ॥
तीं बाणांची मऊ मवाळी । रणीं अर्पिली पुष्पांजळी ।
तुज पूजीन बाणजाळीं । श्रीराम महाबळी क्षोभला ॥ २२ ॥
तुझे म्यां साहिले तीन बान । माझे तूं साहें शर दारुण ।
ऐसें बोलोनि श्रीरघुनंदन । चौदा बाण सोडिले ॥ २३ ॥
चौदा विद्यांची अति गती । तैसी बाणांची निजशक्ती ।
निवरणाची न चले युक्ती । धनुष्य हातींचें छेदिलें ॥ २४ ॥

कार्तिकस्वामीच्या वराने प्राप्त झालेली शक्ती हातात घेतोः

चहूं बाणीं चारी वारु । एकें सारथियासी मारु ।
एकें ध्वज तोडिला सत्वरु । एकें रहंवरु छेदिला ॥ २५ ॥
विरथ त्रिशिरा आणिला भुयीं । श्रीरामावर धांवला पायीं ।
त्यासी सामर्थ्य न चले कांही । निर्वाण पाहीं मांडलें ॥ २६ ॥
कुमारवरदाचे निजप्राप्तीं । त्रिशिर्‍यापासीं निर्वाणशक्ती ।
ते तंव सज्जूनियां हातीं । श्रीरामप्रति धांविन्नला ॥ २७ ॥

त्यामुळे सर्वजण सचिंत :

कुमारशक्ति त्रिशिर्‍याहातीं । देखोनि सुरवर कांपती ।
भूतळीं ऋषीश्वर धांवती । केंवी रघुपति वांचेल ॥ २८ ॥
कुमारशक्तिमाराभेणें । इंद्र चळीं कांपे आपण ।
धाकें कांपती रुद्रगण । यम वरुण कांपती ॥ २९ ॥
धाकें कांपती सुरासुर । धाकें कांपती यक्ष किन्नर ।
शक्ति अतिशयेसीं दुर्धर । केंवी श्रीरघुवीर साहेल ॥ ३० ॥
शस्त्र दुर्धर त्रिजगती । केंवी श्रीरघुवीर साहेल ॥ ३० ॥
शस्त्र दुर्धर त्रिजगतीं । त्रिशिरा क्षोभोनियां चित्तीं ।
श्रीरामाच्या निजघातीं । सक्रोध शक्तीं मोकलिली ॥ ३१ ॥

त्रिशिर्‍याने सोडलेली शक्ती श्रीरामांना वंदन करुन त्यांच्याच भात्यात जाते :

सर्वशक्तींची श्रीराम शक्ती । त्यावरी न चले शक्तीची गती ।
शक्तीनें वंदोनि श्रीराममूर्ती । चरणीं विश्रांति पावली ॥ ३२ ॥
शस्त्रदेवता म्हणे आपण । होतां श्रीराम दर्शन ।
माझें झालें बंदीमोचन । काळें वदन त्रिशिर्‍याचें ॥ ३३ ॥
करावया राक्षसघात । शक्ति रिघाली श्रीरामभात्यांत ।
देखोनि त्रिशिर्‍यासी चिंता अद्भुत । विपरीत अवस्था ओढवली ॥ ३४ ॥
माझी जे कां निजशक्ती । ते वश्य झाली श्रीरामाप्रती ।
आतां आमुची खुंटली गती । राक्षसशांति श्रीरामें ॥ ३५ ॥

श्रीरामांच्या सुवर्णपखी बाणाने त्रिशिराचा गोंधळ व त्यातच त्याचा अंत :

रणीं मारणें का मारणें । हा निश्चयो करोनि तेणें ।
खर्ग तुळोनि तळपणें । हाकी सत्राणें श्रीरामा ॥ ३६ ॥
श्रीरामें सोडिला त्रिधरा । तेणें तोडिल्या खर्गधारा ।
त्रिशिर्‍यासी लागला पिसारा । तेणें अंबरा उडविला ॥ ३७ ॥
पिसार्‍याचे प्रबळ बळ । रविचंद्रादि ऋषिमंडळ ।
दाखविलें धुव्रमंडळ । रणकल्लोळ श्रीराम ॥ ३८ ॥
घायेंवीण आली भोंवंडी । तळीं पडली मुरकुंडी ।
रुधिर वाहे नाकी तोंडी । बाणार्धखंडीं दंडिला ॥ ३९ ॥
त्रिशिरा सावध होवोनि पाहे । अंग प्रत्यंगी न देखे घाये ।
म्हणे मजला जालें काये । मिथ्या भय रामाचें ॥ ४० ॥
जाला सर्वांगीं सावध । शस्त्रास्त्रीं सन्नद्ध ।
करावया श्रीरामाचा वध । अति सक्रोध चालिला ॥ ४१ ॥
जेंवी पतंग दीपासीं । मागें सरणें नाहीं त्यासी ।
तेंवी गिळावया श्रीरामासी । अति क्रोधेसी निघाला ॥ ४२ ॥
हाक देखोनिया तवकें । पसरोनियां तिन्हीं मुखें ।
आला श्रीरामासन्मुखें । जेंवी अतंक प्रळयांतीं ॥ ४३ ॥
श्रीराम गिळावया एकसरें । काम क्रोध लोभ दरें ।
मुखें पसरिलीं तदाकारें । अति दुर्धरें समसमितें ॥ ४४ ॥
नातरी गिळावया निर्गुण । जेंवी खवळती तिन्ही गुण ।
तैशीं तिन्हीं मुखें जाण । श्रीरामनिधान गिळावय ॥ ४५ ॥
ऐसें देखोनि त्रिशिरा । हासे आलें श्रीरघुवीरा ।
धनुष्यीं सज्जोनियां शरा । निजनिर्धारा उद्यत ॥ ४६ ॥
तीन बाण घेवोनि हातां । त्रिशिरा विंधिलासे माथां ।
तो म्हणे हे पुष्पाक्षता । बाणीं रघुनाथा बळ नाहीं ॥ ४७ ॥
बाण रुतले फुलां ऐसे । त्रिशिरा खदखदा हांसे ।
श्रीरामबाणीं बळचि नसे । अति आवेशें नाचत ॥ ४८ ॥
हांसोनि उपडितां बाण । तंव ते अतिशयेंसी कठिण ।
सरली त्रिशिर्‍याची आंगवण । माथींचे बाण नुपडती ॥ ४९ ॥
जंव जंव बाण उपडीत जाये । तंव तंव घायें घुसती पाहें ।
तरी तें विपरीत जालें आहे । म्हणे म्यां काय करावें ॥ ५० ॥
पहिले बाण फुलाऐसे । त्रिशिरा खदखदां हांसे ।
श्रीरामबाणां बळचि नसे । अति आवेशें नाचत ॥ ५१ ॥
पहिले बाण अहाचगती । आणि उपडूं जातां खडतरती ।
श्रीरामबाणांची हे ख्याती । जीवघाती श्रीराम ॥ ५२ ॥
बाण उपडितां दारुण । भेणें पळाली आंगवण ।
सपिच्छ बुडाले संपूर्ण । भेदले पूर्ण ब्रह्मांडीं ॥ ५३ ॥
लागतां वज्राचा पैं घात । उलथोनि पडे जेंवी पर्वत ।
तेंवी त्रिशिरा रणांआंत । पाडी रघुनाथ निजबाणीं ॥ ५४ ॥
त्रिशिरा पडतांचि भूतळीं । निधा उठिला पाताळीं ।
बैसलीं दिग्गजांचीं टाळीं । राक्षसदळीं थरकांप ॥ ५५ ॥
श्रीराम आला जीवघाती । एकापुढें एक पळती ।
बाणीं लाविली ख्याती । प्रळयप्राप्ती राक्षसां ॥ ५६ ॥
चौदा सहस्त्र राक्षससैन्य । उरलें शतेक किंचिन्न्यून ।
श्रीरामाबाणांच्या माराभेण । पलायमान सकंप ॥ ५७ ॥

हतशेषास्तथा भग्ना राक्षसाः खरसंश्रयाः ।
तान्खरो द्रवतो दृष्ट्वा निवार्य च ततः स्वयम् ॥२॥

श्रीरामें राक्षसां केला नाश । सैन्य निर्दाळिलें निःशेष ।
उरले तिही घेतला त्रास । दशदिशा पळताती ॥ ५८ ॥
एक सांगती एकासी । कोण निवारी श्रीरामबाणांसी ।
तरी ठाकोनि जावें खरापाशीं । तो आम्हांसी रक्षील ॥ ५९ ॥

खर राक्षस व श्रीरामांचा रणसंग्राम :

धाकें पळती निशाचर । देखोनि परतलासे खर ।
सैन्या देऊनि नाभीकर । श्रीरामासमोर तो आला ॥ ६० ॥
श्रीराम देखतांचि दृष्टीं । खरासी कांप सुटला पोटीं ।
दूषण मारिला जगजेठी । त्रिशिरा हठी निर्दळीला ॥ ६१ ॥
एकला पायउतारा रघुवीर । धुरा मारिल्या थोर थोर ।
सेना मारिली चौदा सहस्त्र । श्रीराम दुर्धर धनुर्वाडा ॥ ६ ॥
निधडां होय योद्धा श्रीरघुनाथ । युद्ध करितां अति अदभुत ।
म्हणोनि खरें पेलिला रथ । धनुष्य हस्तें सज्ज्जोनि ॥ ६३ ॥
धीरा वीरा राहें साहें । बळ तुझें मजसी काये ।
माझें लागलिया घाये । कोण माय राखेल ॥ ६४ ॥
अवचटें लागोनियां बाण । मारिला त्रिशिरा आणि दूषण ।
माझे सन्मुख साहसी बाण । तैं आंगवण मी मानीं ॥ ६५ ॥
रणीं समोर जाल्या खर । अंतकासी न धरवे धीर ।
म्यां मर्दिले सुरासुर । तूं रघुवीर तो किती ॥ ६६ ॥
माझें सुटल्या शरसंधान । कोदंडा खंडीन सबाण ।
तुझा घेईन मी प्राण । रणांगण पाहें माझें ॥ ६७ ॥
तंव हासोनि म्हणे श्रीरामचंद । खराचा पराक्रम थोर ।
मी जाणतों समग्र । ऐक साचार महावीरा ॥ ६८ ॥
संवदणीं तिमिले रजकहस्तीं । जगाचीं मळें खर वाहती ।
नातरी कुलाल वाहे माती । हे मुख्य ख्याती खराची ॥ ६९ ॥
काळे कोळसे वाहती खाती । कुलालपल्ल्यां लगडा वाहती ।
जगाचे उकिरडे घोळीती । हे एक ख्याती खराची ॥ ७० ॥
खर पालणिती वोड । त्यावरी वाहती स्वेच्छा दगड ।
पाठीं खटीं सोललें बूड । थोर सुरवाड माशांचें ॥ ७१ ॥
खरी देखोनियां दुरी । खर भुकें दीर्घस्वरीं ।
लाथा हाणिती उरावरी । तें सुख भारी खरासी ॥ ७२ ॥
मुख्य खराचें भूषण । थोर करी नित्य लोळण ।
जगाची विष्ठा प्रियभोजन । हे महिमान खराचें ॥ ७३ ॥
ऐसी खराची प्रतिष्ठा । प्रिय भोजन जगाची विष्ठा ।
मरमर दुःशीळा पापिष्ठा । ऋषिवरिष्ठां मारिलें ॥ ७४ ॥
त्यांचा घेवोनि सूड कैवाडें । बाणीं फोडिन चांभाडें ।
तूं पळसील कोणीकडे । बाणांपुढे पैं माझ्या ॥ ७५ ॥
खरासी लागतां गोमासी । तडफडित पळे चौंपासीं ।
माझे बाण लागतां सपिच्छी । तूं पळसी खरु जैसा ॥ ७६ ॥
ऐसें ऐकोनि श्रीरामाचें वचन । खर जाला कोपायमान ।
धनुष्यीं वाहोनियां गुण । अमित बाण वर्षला ॥ ७७ ॥
खर वर्षला बहुत बाण । दिशां विदिशां शर संपूर्ण ।
तें देखोनि क्षोभला रघुनंदन । चाप सज्जोन चालिला ॥ ७८ ॥
जेंवी गजावरी केसरी । तेंवी श्रीराम राक्षसांवरी ।
प्रळयांबुद धारावर्षभारीं । तेवी शरधारीं वर्षत ॥ ७९ ॥
बाण वर्षतां श्रीरघुवीरा । बाणपिसारें सुटला वारा ।
तेणें चळकांप निशाचरां । बाणीं भेदरा लाविला ॥ ८० ॥
बाणीं रणीं खिळिला वारा । बाणीं खिळिली मुख्य धुरा ।
रणीं उठिला धुळोरा । बाणें अंबरा व्यापिलें ॥ ८१ ॥
खररामबाणीं खणखणाट । घायीं उठिला हव्यावाटे ।
तेणें बाणपिसारा पेटे । धूम्रांकित खरनेत्र ॥ ८२ ॥
बाणीं कोंद भूतळ । बाणीं कोंदलें नभोमंडळ ।
श्रीरामाचें बाणजाळ । रविमंडळ झांकिलें ॥ ८३ ॥
बाणीं कोंदलें आकाश । तिळभरी नाहीं अवकाश ।
बाणीं राक्षसां लाविला त्रास । कासाविस खर तेणें ॥ ८४ ॥
रणीं पडली आंधारी । श्रीरामाच्या प्रभेंकरी ।
युद्ध कीजे दोघीं वीरीं । महामारीं पेटले ॥ ८५ ॥

ततोऽस्य सशरं चापं मुष्टिदेशे महाबलः ।
खरश्चिच्छेद रामस्थ दर्शयन्पाणिलाघवम् ॥ ३ ॥

खराने सोडलेल्या वरदबाणांची निष्फळता :

खर कोपोनि निर्वाण । सोडिताहे वरद बाण ।
श्रीराम तुझा घेईन प्राण । हस्तविंदान पाहें माझें ॥ ८६ ॥
ऐसें बोलोनि महाहठी । बाणवरदाचिया निजनेटीं ।
श्रीरामधनुष्य छेदिलें मुष्टीं । पाडिलें सृष्टीं लघुहस्तें ॥ ८७ ॥
निजनिर्वाणाचे पूर्ण । सवेंच घेवोनि सात बाण ।
श्रीरामहृदय लक्षोन । वेगीं गर्जोन विंधिले ॥ ८८ ॥
श्रीरामकवच अभेद्य पूर्ण । अभेद्यकवचीं न रुते बाण ।
वरदें केलें निजनिर्वाण । सावधान अवधारा ॥ ८९ ॥

रामकवचबंधनाचा खराने केलेला छेद :

कवच न भेदे बाणांसी । वरदशक्तीची क्रिया कैसी ।
छेदोनि बंध बिरड्यासी । कवच भूमीसीं पाडिलें ॥ ९० ॥
चाप कवच छेदितां देख । कांपिन्नले तिन्ही लोक ।
गगनीं देवांसी असुख । परम दुःख इंद्रासी ॥ ९१ ॥
कवच पडतांचि धरणीं । अभ्रांमधून निघे तरणी ।
तैसा श्रीराम शोभे रणीं । गिरा गर्जोनी बोलत ॥ ९२ ॥

खराचा मुकुट पाडून त्याला बाणांनी घायाळ :

वरद बाण तुझे समस्त । क्रोधें सांडोनि केले व्यर्थ ।
तुझा संपला पुरुषार्थ । आंत घात करीन तुझा ॥ ९३ ॥
मग जो चाप अगस्तिदत्त । सज्जोनियां श्रीरघुनाथ ।
रणीं चालिला गर्जत । शरसंपात सूटला ॥ ९४ ॥
खराचे बाण प्रबळ । श्रीरामें निवटिले सकळ ।
जेंवी गुड पाडी कृषीवल । तेंवी बाणजाळ छेदिलें ॥ ९५ ॥
हेमपत्री बाण सबीज । सोडोनि खर केला निर्बुज ।
रथीं छेदोनियां ध्वज । रणीं रघुराज क्षोभला ॥ ९६ ॥
जैसा स्वर्गभोगच्युत । पुण्यक्षयें होय पतित ।
तैसा ध्वज लखलखित । पताकायुक्त पाडिला ॥ ९७ ॥
बाण सोडोनि वरिष्ठ । पाडिला शिरींचा मुकुट ।
धनुष्य छदिलें उद्भट । रणसंकट खरासी ॥ ९८ ॥

तं चतुर्भिः खरः क्रुद्धो रामं गात्रेषु मार्गणैः ।
विव्याध हृदि मर्मज्ञो मातंगमिव तोयदैः ॥ ४ ॥

खराने सोडलेली शक्तीही श्रीरामांच्या भात्यांत प्रविष्ट झाली :

खरे देखोनि रणसंकट । श्रीराम वधीन मी वरिष्ठ ।
शक्तिवरदाचे बाणीं श्रेष्ठ । वधावया दुष्ट चालिला ॥ ९९ ॥
चाप सज्जोनि आकर्ण । शक्तिवरदाचे निर्वाणबाण ।
घायें घेती परांचें प्राण । अति दारुण अनिवार ॥ १०० ॥
तेचि बाण घेवोनि चारी । शक्ती आवाहूनि बीजमंत्रीं ।
खरें मोकलिले श्रीरामावरी । सतजधारी धगधगित ॥ १ ॥
भूतळीं गजबजले ऋषीश्वर । स्वर्गी कांपती सुरवर ।
शक्तिवरद अति दुर्धर । श्रीरामचंद्र केंवी वांचे ॥ २ ॥
बाण सुटतां कडाडी । पडली सुरवरांसी झांपडी ।
दुर्धर तेजाची प्रौढी । बापुडीं मूर्च्छित ॥ ३ ॥
बाण लागतां हृदयावरी । शस्त्रदेवता श्रीरामोदरीं।
तिणे बाण धरितां चारी । श्रीरामतूणीरीं रिघाले ॥ ४ ॥
खर म्हणे झालें विपरीत । वरदशक्ति श्रीरामा भजत ।
तितें मांडिला आमचा घात । श्रीरघुनाथ नाटोपे ॥ ५ ॥
श्रीरामाची अगाध थोरी । बाण निवारिले वरद चारी ।
जयजयकार ऋषीश्वरीं । केला सुरवरीं महानाद ॥ ६ ॥

श्रीरामांनी निर्वाणीचे बाण खरावर सोडले :

बाण निवारिले चारी । श्रीराम कोपलासे भारी ।
तीन बाण खरावरी । महामारीं मोकलिले ॥ ६ ॥
श्रीरामबाण देखोनि दृष्टीं । निवारणीं चिंता पोटीं ।
तंव एकें धनुष्य छेदोनि मुष्टीं । पाडिलें सृष्टी दुखंड ॥ ८ ॥
ध्वज छेदिला बाणें एकें । आंख छेदी एकें तवकें ।
दों बाणीं छेदिली दोन्ही चाकें । त्रिवेणुं आणिकें छेदिले ॥ ९ ॥
चहूं बाणीं चारी वारु । तीन बानीं छेदिला रहंवरुं ।
एकें बाणें विधिला खरु । रुधिरोग्दारु प्रवाहे ॥ ११० ॥
हत वारु हत सारथी । खर रणीं केला विरथी ।
मग गदा घेवोनि हातीं । श्रीरामाप्रति धांविन्नला ॥ ११ ॥
गदा घेवोनियां हातीं । म्हणे घायें मारीन श्रीरघुपती ।
सरक थरक दावई दिप्ती । गती विगती तळपत ॥ १२ ॥

खराचा धिक्कार :

हतरथ हतसारथी । नष्टलासी सैन्यसंपत्ती ।
श्रीराम म्हणतूं निर्लज्ज चितीं । कासया गदागती दाविसी ॥ १३ ॥
तुजपासोनि गेली शक्ती । वृथा वल्गसी गदाहस्ती ।
गदेसहित पाडीन क्षितीं । तूं पापमूर्ति पापात्मा ॥ १४ ॥
ऋषी मारिले श्रेष्ठ श्रेष्ठ । तापस भक्षिले वरिष्ठ ।
त्याचें फळ भोगिसी स्पष्ट । बाणीं यथेष्ट दंडीन ॥ १५ ॥
ब्राह्मण भक्षिले बहुत । ब्रह्महत्येचा दोष अदभुत ।
बाणधारीं प्रायश्चित । मी निश्चित तुज देईन ॥ १६ ॥
दंडकारण्यीं तू कंटक । बाणीं छेदीन आवश्यक ।
वना करीन निष्कंटक । ऋषी निःशंक विचरावया ॥ १७ ॥
निर्नासिक देखतां दृष्टीं । तेथें यशाची कायसी गोष्टी ।
ससैन्य धूर मरे शेवटीं । भेतल्या नकटी फळ ऐसें ॥ १८ ॥
ते नकटी तुम्हांसांगातें । तुम्हांसी यश कैचें येथे ।
नकातियें निर्दळिलें निश्चितें । हे करातें लक्षेना ॥ १९ ॥
नांवे खर रुपें खर । शस्त्रभार वाहे खर ।
न कळे बुद्धीचा विचार । ऐसा मूर्ख थोर तूं होसी ॥ १२० ॥

गदेचा श्रीरामांवर हल्ला, मातंग अस्त्राचा प्रयोग :

वर्मभेदी श्रीरामवचन । खर दुर्धर कोपायमान ।
भूमीस हात पाय घंसोन । गदा घेवोनि धांवला ॥ २१ ॥
किती जल्पसी सैरावैरा । बोलों नको श्रीरामचंद्रा ।
बहु बडबड न साजे वीरा । रणनिर्धारा पाहें पां ॥ २२ ॥
राहें साहें श्रीरघुवीरा । तुवां मरिल्या बहुत धुरा ।
तुझ्या घेवोनियां रुधिरा । मारिल्या धूरा तर्पीन ॥ २३ ॥
तुझिया रुधिराचें तर्पणें । तृप्त होतील राक्षसगण ।
गदाघायें घेईन प्राण । सत्य संपूर्ण पण माझा ॥ २४ ॥
सावध पाहें श्रीरामचंद्रा । एकेंचि घाये करोन पुरा ।
दांत खातसे करकरां । गदा गरगरां भोवंडी ॥ २५ ॥
धुम्र निघे नेत्रद्वारा । रागें कांपत थरथरां ।
डासों धांवे श्रीरामचंद्रा । कंठींच्या रुधिरा प्राशावया ॥ २६ ॥
तुझे नळीचें करीन रक्तपान । तेव्हां मी संतृप्त होईन ।
वटारिले दोनी नयन । श्रीरघुनंदन देखोनी ॥ २७ ॥
निःशेष मारावया रघुवीरा । आव्हानिलें मातंगशस्त्रा ।
बीजें जपोनि घातकमंत्रा । शस्त्रीं अस्त्रा योजिलें ॥ २८ ॥
ऐसें साधोनि निर्वाण । तेणें उन्मूळत वृक्ष तृण ।
पृथ्वी होय कंपायमान । मूर्च्छापन्न पशुपक्षी ॥ २९ ॥

सा क्षिप्ता बहुवेगेन प्रदीप्ता महती गदा ।
भस्म वृक्षांश्च गुल्मांश्च कृत्वागात्तत्वमीपतः ॥५॥

गदा खराची तेजें दारुण । भस्मभूत केले तृण ।
गुल्म पर्वत कंपायमान । वृक्ष उन्मळोन पडताती ॥ १३० ॥
गदा उसळतां अंबरा । विमानीं पळणी सुरवरां ।
चळकांप रविनक्षत्रां । अस्त्रमंत्राचेनि धाकें ॥ ३१ ॥

मातंगशास्त्राचे श्रीरामांनी रुद्रमंत्राने केलेले निवारण :

अस्त्र दुर्धर देखोन । श्रीराम नित्य सावधान ।
अघोर रुद्रमंत्र जपोन । बाण दारुण सोडिले ॥ ३२ ॥
बाण देखोनि दारुण । अस्त्रमातंगी आली शरण ।
माझा बांचवावा प्राण । श्रीरामचरण तिये धरिले ॥ ३३ ॥
बाण लागतां उद्भट । गदा जाली शतकूट ।
घायें दुमदुमिलें वैकुंठ । करोनि पीठ पाडिली ॥ ३४ ॥
खर जाला रणोन्मत्त । निर्वाणगदा जाली व्यर्थ ।
चिंता विसरले चित्त । श्रीरघुनाथ देखोनी ॥ ३५ ॥
बाणें गदेचा जाला निःपात । अशेष सैन्या केला घात ।
शस्त्र सामोग्री करोनि व्यर्थ । श्रीरामभात्यांत बाण आला ॥ ३६ ॥
एकला खर उरला रणीं । श्रीरामें जर्जर केला बाणीं ।
परी खर बाणांतें न गणी । श्रीराम लक्षोनी लोतला ॥ ३७ ॥
सगळा राम मी खाय घोंटी । हेचि धरोनियां पोटीं ।
धांविन्नला महाहट्टी । निर्वाणदृष्टी लक्षोनी ॥ ३८ ॥

रणे प्रहरणस्यार्थे सर्वतो ह्यवलोकयन् ।
स ददर्श महाशालमविदूरे निशाचरः ॥ ६ ॥
स तमुत्पाटयामास संदष्टदशनच्छदम् ।
राममुद्दिश्य चिक्षेप हतस्त्वमिति चाव्रवीत् ॥ ७ ॥

निःशस्त्र होताच खराने वृक्षप्रहार केला, त्याचा बाणाने संहार :

श्रीरामें छेदिली शस्त्रसामोग्री । हातेर न दिसे चौफेरीं ।
विशाल वृक्ष उपडोनि करीं । श्रीरामावरी धांविन्नला ॥ ३९ ॥
येणें वृक्षाचेनि घातें । श्रीरामा मारिले जाण म्यां तूंतें ।
ऐसा गर्जोनि अत्यदभुतें । गीं वृक्षातें सोडिलें ॥ १४० ॥
वृक्ष देखोनि प्रचंड । श्रीरामें बाण सोडिला वितंड ।
दुखंड तिखंड नवखंड । करोनि शतखंड पाडिला ॥ ४१ ॥
वृक्ष निवटोनि दुर्धर । अंगप्रत्यंगीं खोंचला खर ।
वाहत रुधिराचे पूर । रणीं रघुवीर क्षोभला ॥ ४२ ॥

अंतकशस्त्राचा प्रयोग करुन खराचा शिरच्छेद :

रणीं निर्दळावया खर । वाणीं योजिलें अंतकशस्त्र ।
प्रळयरुद्र महामंत्र । जपोनि शस्त्र सोडिलें ॥ ४३ ॥
देहबुद्धीस मुकला खर । झुंजण्या पळण्या पडे विसर ।
धरणें मारणें धैर्यनिर्धार । हाही विचार विसरला ॥ ४४ ॥
जेवी कां ज्ञाता नित्यात्मसिद्धी । निश्चयें राहे रामपदीं ।
तेंवीं श्रीराम देखतां त्रिशुद्धी । रणसमाधी खरासी ॥ ४५ ॥
निरसोनि तत्वांचा विकार । समाधि पावे मुनिश्वर ।
तेंवी लक्षितां श्रीरामचंद्र । निर्विकार खर जाला ॥ ४६ ॥
येवोनि श्रीरामाचा बाण । माझा घेईल निजप्राण ।
हेही नाहीं आठवण । श्रीरामा रणसुखकारी ॥ ४७ ॥
श्रीरामबाण अति दुर्धर । खराचें उडविलें शिर ।
रणीं पाडिला महावीर । धन्य रघुवीर खर म्हणे ॥ ४८ ॥

खराने केलेले श्रीरामस्तोत्र :

देहापासोनी सुतल्या देख । स्तुति वदे खराचें मुख ।
श्रीरामें छेदोनि द्वंद्वदुःख । दिधलें निजसुख शरघातें ॥ ४९ ॥
छेदोनियां जन्ममरणदुःख । छेदोनियां तहान भूक ।
छेदोनि जीवींची धुकधुक । दिधलें निजसुख शरघातें ॥ १५० ॥
छेदोनियां ज्ञानाज्ञान । सुखसंपन्न शरघात ॥ ५१ ॥
श्रीरामबाणाचा प्रताप । छेदिलें माझें पुण्यपाप ।
छेदोनियां संकल्पविकल्प । केलें सुखरुप शरघातें ॥ ५२ ॥
श्रीरामाचा सतेज बाण । छेदिलें स्थूळ लिंग कारण ।
छेदोनियां मीतूंपण । सुखसंपन्न शरघातें ॥ ५३ ॥
छेदोनि माझा राक्षसविधी । छेदोनि माझी आधिव्याधी ।
छेदोनि माझी देहबुद्धी । श्रीरामें त्रिशुद्धी सुखी केलें ॥ ५४ ॥
श्रीराम रणयोद्धा निकरेंसीं । परी तो सुखरुप घायेंसी ।
ऐसें वदोनिया स्तुतीसी । पायांपासी शिर आलें ॥ ५५ ॥

खराला उत्तम गतीची प्राप्ती :

जे गति नव्हे तापसांसी । जे गति नव्हे योगिसंन्याशांसी ।
ते गती दीधली खरासी । घायासरसीं श्रीरामें ॥ ५६ ॥
जे गति न लभे योगयोगीं । जे गति न लभे सर्वत्यागीं ।
ते गति दिधली खरालागीं । रणरंगीं श्रीरामें ॥ ५७ ॥
जे गति न लभे वेदविधी । जे गति न लभे शास्त्रसिद्धी ।
ते गति दीधली बाणवेधीं । घाये त्रिशुद्धी खरासी ॥ ५८ ॥
जे गति न लभे कर्म करितां । जे गति न लभे ध्यान धरितां ।
ते गति आली खराच्या हाता । बाणाग्रता श्रीरामें ॥ ५६ ॥
जो जो श्रीरामदृष्टीं रणीं पडे । तो तो सायुज्यासी चढे ।
राक्षसांचे भाग्य चोखडें । रणीं रोकडें सायुज्य ॥ १६० ॥

खराचे शौर्याची प्रशंसा :

सुरनरां खर दुर्धर । खरासी शंके दशशिर ।
तो श्रीरामें रणीं हाणिला खर । जयजयकार द्विजदेवां ॥ ६१ ॥

युद्ध पाहून चकित झालेल्या सुरनरांना आनंद व श्रीरामांची स्तुती :

युद्ध पहावया सुरवरीं । गगनीं विमानांच्या हारी ।
वर्षती सुमनांच्या संभारीं । जयजयकारीं गर्जती ॥ ६२ ॥
युद्ध पाहों आला ब्रह्मदेव । युद्ध पाहों आला सदाशिव ।
जयजयकार करिती सर्व । रणीं श्रीराघव निजविजयी ॥ ६३ ॥
गगनीं वाजे सिद्धांची टाळी । जयजयकार ऋषींचा भूतळीं ।
श्रीरामें मर्दिलें राक्षस बळी । भूमंडळीं आल्हाद ॥ ६४ ॥
श्रीरामप्रतापाचें पूर्ण । स्वर्गी लागलें निशाण ।
हरिखे नाचती सुरगण । श्रीराम रावण निर्दाळील ॥ ६५ ॥

लक्ष्मण-सीतेचे अभिवादन :

श्रीरामाचें युद्ध देखोन । श्रीरामसेज उतरुन ।
सीतासौमित्र योवोन । लोटांगणें श्रीरामा ॥ ६६ ॥
हरिखाचें उल्हासता । सीता आलिंगीं श्रीरघुनाथा ।
श्रीरामें आश्वासोनि सीता । होय आलिंगिता सौमित्रा ॥ ६७ ॥

श्रीरामांचा ऋषींना नमस्कार, आशीर्वादमहिमा :

पाचारोनि ऋषिगण । श्रीराम घाली लोटांगण ।
राक्षसीं गांजिले ब्राह्मण । तें मी उत्तीर्ण पैं जालों ॥ ६८ ॥
राक्षयभयाते निवारीं । ते म्यां आज्ञा वंदोनि शिरी ।
तुमचिये कृपेकरीं । केली बोहरी राक्षसां ॥ ६९ ॥
तुमचिया कृपायुक्ती । मज जाली यशःप्राप्ती ।
राक्षस मारिले जाली कीर्ती । सत्संगतिनिजबळे ॥ १७० ॥
जयाचे पाठीसीं द्विजवर । देवोनि असती नाभीकार ।
एकला जिंके तो चराचर कृपा सधर द्विजांची ॥ ७१ ॥

समस्तसंतत्समवाप्तिहेतवः समुत्थितापत्कुलधूमकेतवः ।
अपारसंसारसमुद्रसेतवः पुनन्तु मां ब्राह्मणपादपांसवः ॥८॥

सद्गुण संपत्तीचें कारण । ब्राह्मणांचा चरणरेणुप्रमाण ।
परमापत्तिकुळनिर्दळण । द्विजचरणप्रसादें ॥ ७२ ॥
अपार भवसागराआतुं । द्विजपदरजसन्नद्ध सेतु ।
पडणें बुडणें नाहीं आवर्तु । सुखस्वार्थु द्विजचरणीं ॥ ७३ ॥
ब्राह्मणांचे चरणतीर्थी । गंगादि तीर्थें पवित्र होती ।
दास्य करिती चार्‍ही मुक्ती । सभाग्य भगती द्विजचरणीं ॥ ७४ ॥
त्या तुमची नित्ससंगती । भाग्यें मज जाली प्राप्ती ।
तेणें पावलों अगाध कीर्ती । वानूं किती द्विजमहिमा ॥ ७५ ॥
तुम्हांसी कांही द्यावें दान । ब्रह्मार्पण जन्मस्थान ।
करोनि स्वधर्मानुष्ठान । सुखसंपन्न असावें ॥ ७६ ॥
अरुणा वारुणा सरस्वती । ब्रह्मगिरी अष्टतीर्थी ।
करितां शंकों नका चित्तीं । आज्ञानुवर्ती मी तुमचा ॥ ७७ ॥
ऐसें बोलोनि श्रीरघुनंदन । पुढती घाली लोटांगण ।
सुखी जाहले ब्राह्मण । श्रीरामगुण वर्णिती ॥ ७८ ॥

ब्राह्मण-ऋषींकडून श्रीरामांचे अभिनंदन :

वानिती श्रीरामाची कीर्ती । वंदिती श्रीरामाची मूर्ती ।
श्रीरामगुण गीती । द्विज गर्जती श्रीरामनामें ॥ ७९ ॥
द्विजीं घेतलें जनस्थान । राक्षसपल्या पलायमान ।
हिरोनि घेतलें धनधान्य । वस्त्रभूषण ते हरिती ॥ १८० ॥
गंगातीरींचें ब्राह्मण । अतिशयेंसीं महाकठिण ।
आम्हांसी नागविती संपूर्ण । त्यांसी कोण निवारी ॥ ८१ ॥
पुरुषांची जातिव्यक्ती । श्रीरामें रणीं लाविली ख्याती ।
आम्हीं रांडातें द्विज नागविती । धाकें मुततीं सांगती शूर्पणखे ॥ ८२ ॥
राक्षसपत्‍न्या पैं विमानीं । त्यामाजी नकटी मुखरणी ।
भेडसावितां ब्राह्मणीं । जीव घेवोनि पळाल्या ॥ ८३ ॥
ऋषी राहिले जनस्थानी । श्रीराम राहिला स्वस्थानीं ।
एका शरण जनार्दनीं । रामायणीं सुखस्वादु ॥ ८४ ॥
रामायणीं भुक्ति मुक्ती । रामायणीं अगाध कीर्ती ।
रामायणीं ब्रह्मप्राप्ती । असे निष्ठत श्रवणार्थे ॥ ८५ ॥
एकाजनार्दना शरण । जीवां रमणीय रामायण ।
खरादिराक्षसमर्दन । श्रीरघुनंदन निजविजयी ॥ ८६ ॥
इति श्रीभावार्थरामायणे‌ऽरण्यकांडे एकाकारटीकायां
खरमर्दनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
॥ ओंव्या १८६ ॥ श्लोक ८ ॥ एवं १९४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय अकरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *