भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा

कैकेयी-दशरथ संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आज्ञाप तु महाराजो राघवस्याभिषेचनम् ।
उपस्थानमनुज्ञाप्य प्रविवेश निवेशनम् ॥१॥
प्रियार्हां प्रियमाख्यातुं विवेशांतःपुरं वशी ।
स कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः ॥२॥
न ददर्श स्त्रियं राजा कैकेयीं शयनोत्तमें ।
स कामबलसंयुक्तो । रत्यर्थी मनुजाधिपः ॥३॥
अपश्यन्दयितां भार्यां पप्रच्छ विषसाद च ।
नहि तस्य पुरा देवी तां वेलामत्यवर्तत ॥४॥
प्रतहारी त्वथोवाच संत्रस्ता तु कृतांजलिः ।
देव देवी भृशं क्रुद्धा क्रोधागारमाभिद्रुता ॥५॥

अभिषेकाची सिद्धता, दशरथ कैकेयीच्या भवनात येतो, तेथील चमत्कारीक स्थिती :

श्रीरामासी अभिषेकार्थ । प्रातःकाळीं पुष्य समुहुर्त ।
सिद्ध सामग्री करावया समस्त । आज्ञा नेमस्त रायें केली ॥१॥
मग रतिकामसंभोगासीं । आला कैकेयीभवनासी ।
गृहीं न देखोनियां तिसी । पुसे समस्तांसी प्रिया कोठें ॥२॥
तेथें दास दासी सेवक । कोणी न बोलती रायासन्मुख ।
अवघी राहिलीं अधोमुख । तेणे साशंक नृप जाला ॥३॥
कुब्जां राहोनियां दुरी । खुणाविली छत्रधारी ।
ते रायातें नमस्कारी । भयभीत भारी बोलावया ॥४॥
तिसी नाभीकारयुक्त । राजा पुसतसें वृत्तांत ।
ते म्हणे कैकेयी क्रोधे मूर्च्छित । अति संतप्त भोगत्यागें ॥५॥
सांडोनि वस्त्राभरणांसी । भूमिशय्या मळिणवासासीं ।
कैकेयी होती तमःप्रदेशी । तेथें रायासीं तिणें नेलें ॥६॥

राजाशी अस्वस्थता, कैकेयीचा अनुनय :

देखोनि कैकेयीची अवस्था । परम दुःख झाले दशरथा ।
तुज काय कोणें केलें आतां । तें तत्वतां मज सांगे ॥७॥
तुज कोणे दाविला हात । त्याचा समूळ करीन घात ।
तुज बोलती जे विरुद्धार्थ । जिव्हा सदंत छेदीन त्यांची ॥८॥
ज्यासी म्हणसी करा समर्थ । गजांतलक्ष्मी देईन तेथ ।
करावें म्हणसी ज्यासी निर्मुक्त । बंधनिर्मुक्त करीन मी ॥९॥
मी असतां शिरावरी । त्वां कां तोडिली गळसरी ।
भूमिशय्या प्रेतापरी । अशुभकारी हे चिन्ह ॥१०॥

कैकेयी राजाची निर्भर्त्सना करते :

तिसी लांवू जातां हाता । तिणें झांजडिलें नृपनाथा ।
तिचें मुख पाहूं जातां । मुख सर्वथा ते दावीना ॥११॥
प्रिया पाहों नेदी वदन । रायासी आलें जी रुदन ।
धांवोनि तिचे धरिले चरण । प्रियें तुजविण मी परदेशी ॥१२॥
येरी आसुंडिले पाये । उठी येथोनि परता जायें ।
मुख दाविसी काये । निर्लज्ज पाहें तूं एक ॥१३॥
सुणा येतां सुणी वसससी । कैकेयी दशरथासी तैसी ।
स्त्रीलोभाची दशा ऐसी । अपभ्रंशी स्त्रीलोभु ॥१४॥
राजा दशरथ सूर्यवंशी । त्याची स्त्रीलोभें दशा ऐसी ।
इता पुरुष स्त्रियांच्या दासी । स्त्रीलोभापासीं हा बडिवारू ॥१५॥
मज कायसी गळसरी । तू मज कैंचा शिरावरी ।
प्राण सांडीन उपराउपरी । तुझी मजवरी अति प्रीती ॥१६॥
राजा बोले प्रीतियुक्त । सांगे तुझे मनोगत ।
तें मी करीन समस्त । तुज कां अत्यंत क्रोधे आला ॥१७॥

दोन स्त्रियांच्या पतीची केविलवाणी अवस्था :

दोघीं स्त्रियांचा जो पती । त्यासी सत्यत्व नाहीं शास्त्रार्थीं ।
त्याची साक्ष साधु न मानिती । तुज मज प्रीती सत्य कैंची ॥१८॥
दोहीं स्त्रियांचा पति तो शठ । तूं तिघींचा अति पापिश्ठ ।
माझा अपमान करोनियां स्पष्ट । राज्यपट कौसल्ये ॥१९॥
मज तुझिया अति प्रीतीं । स्वर्गी इंद्रादिक पूजिती ।
ते माझी करोनि अप्रीती । कौसल्येप्रती राज्यपट ॥२०॥

दशरथावर दोषारोप :

तुवां मांडिलें मजसीं वैर । मातुळा धाडुनि माझे कुमर ।
श्रीराम करिसी राज्यधर । कपटी साचार तूं एक ॥२१॥

दशरथाचे निराकरण :

राजा म्हणे कैकेयीसी । तुंवाची करोनि आग्रहासी ।
पुत्र धाडिले मातुळासी । शेखीं म्हणसी मज कपटी ॥२२॥
राज्याधिकार ज्येष्ठ पुत्रासी । तो केवी लाभे कनिष्ठासी ।
विवेक नाहीं तुजपासीं । व्यर्थ कां करिसी अति क्रोध ॥२३॥
अनधिकारीं राज्याधिकारू । ब्रह्मा आलिया न शके करूं ।
तुज काय जाला भूतसंचारू क्रोध तुझा ॥२४॥

क्रोधमहिमा :

क्रोध पित्यापुत्रातें बाधी । क्रोध स्त्रीपुरुषांसी विरोधी ।
क्रोध पित्याची प्रीती छेदी । क्रोध त्रिशुद्धीं अनर्थ ॥२५॥
क्रोध निजज्ञाना निर्दाळी । क्रोध तापातें छळी ।
क्रोध स्वार्थाची करी होळी । क्रोध महाबळी अनर्थी ॥२६॥
क्रोध साहाकारी कामासी । शेखीं क्रोध आलिया काम नाशी ।
क्रोध विवेकातें ग्रासी । तो तुजपासीं अति क्रोध ॥२७॥
तुज श्रीरामीं प्रीती त्रिशुद्धी । ते तुझी कोणे छळिली बुद्धी ।
दारुण उपजली दुर्बुद्धी । अति विरोधी श्रीरामीं ॥२८॥
विरोध करितां श्रीरामासीं । ऐहिकपरत्रातें मुकसी ।
जगीं अत्यंत निंद्य होसी । हितोपदेशीं तुज सांगो ॥२९॥
माझी तुज समक्षा भारी । वचन निलंघिसी तिळभरी ।
ते तूं आजी मजवरी । अति धिककारीं जल्पसीं ॥३०॥
तुझा झाला बुद्धीपालट । येथून तुज मज शेवट ।
अति दुःखाचा राज्यपट । पावस स्पष्ट अति क्रोधें ॥३१॥

उदकस्य रसः

शैत्यमन्नस्य स्वादरो रसः ।
आनुकूल्यं रसः स्त्रीणां मित्रस्यावंचनं रसः ॥६॥

शीतळता ते उदकगोडी । मिष्टान्ना आदरें चवी गाढी ।
अनादरें कोटि परवडी । लागली पाडी विषाचिया ॥३२॥
अवंचकता परिपूर्ण । तेंचि मित्रत्वें गोडपण ।
वंचकता जालिया जाण । मित्र मित्रपण विटंबिलें ॥३३॥

विकल्पाचे दुष्परिणाम :

अनुकूलता स्त्रियांसी गाढी । तंव तंव स्त्रीपुरुषांची अति गोडी ।
जालिय विकल्पाची सवडी । तुटी रोकडी स्त्रीपुरुषां ॥३४॥
कैकेयी विकल्प् धरिल्या पोटीं । स्त्रीपुरुषां पडे तुटी ।
तुझ्या कळवळ्याकरितां सांगतों गोष्टी । विवेक दृष्टिविचारें ॥३५॥
तुझी नव्हें ही सुबुद्धी । नेंणों कोणें दिधली दुर्बुद्धी ।
क्रोध सांडोनिया त्रिशुद्धी । भोगसमृद्धी सुखें भोगीं ॥३६॥
श्रीराम सर्वांचा आवडता । तुज रामासीं एकत्मता ।
कोणें विकल्प घातला चित्ता । तो सांडीं सर्वथा कैकेयी ॥३७॥
तुझी मज प्रीती पूर्ण । जें मागसी तें देईन जाण ।
वाहतों श्रीरामाची आण । परम प्रमाण हें माझें ॥३८॥

कैकेयीचे हृदयपरिवर्तन :

ऐकोनि रासाची हे गोष्टी । कैकेयी विकल्प सांडी पोटीं ।
भरत अयोग्य राज्यपटीं । मागता सृष्टी मी निंद्य ॥३९॥
अयोग्य मागता राज्यभार । मज निंदितील ऋषीश्वर ।
मरमर करितील लहान थोर । हा विचार अति निंद्य ॥४०॥

मंथरेने केलेली खूण, कैकेयीवर अनुकूल परिणाम :

तें चिन्ह कळले मंथरेसी । म्हणे काय जालें इयेसी ।
घालोनियां विवेकासी । केली पिशाची नृपनाथें ॥४१॥
म्यां तव शिकविला हितार्थ । परी ईस न कळी निजस्वार्थ ।
माझें शिकविलें गेलें व्यर्थ । अति चरफडित मंथरा ॥४२॥
दुष्टासी ऐकतां धर्मवार्ता । अति क्रोध उपजे चित्ता ।
कैकेय़ीमन द्रवलें देखतां । मंथरा तत्वंता कुसमुसी ॥४३॥
आंतचे आंत हात चुरी । म्हणे आतां काय करी ।
राज्य दिधलें रामाकरीं । आम्हां रोकडी देशवटा ॥४४॥
रामासी नाहीं माया जाण । आम्हांवरी निष्ठुर पूर्ण ।
त्यासी जालिया राज्याभिबिंचन । पुनरागमन नाहीं आम्हां ॥४५॥
तें संधी खुणावी मंथरा । म्हणे सोडूं नको पूर्वनिर्धारा ।
अन्यथा न करीं वो विचारा । दोन्हीं वरां मागें वेगीं ॥४६॥
मंथरा देखतांचि दृष्टीं । विकल्प बळावला पोटीं ।
मग रायासीं मांडिल्या गोष्टी । क्रोधदृष्टीं पाहूनी ॥४७॥

कैकेयी वरपूर्तीचे राजाला आव्हान देते :

वाहिली श्रीरामाची आण । तें मज मानलें प्रमाण ।
मारोन तें द्यावें आपण । अन्यथा वचन न करावे ॥४८॥
तुम्हीच मज पूर्वीं दिधलें । तेंचि मी मागेन आपुलें ।
राजा सुखावला येणें बोलें । मागें वहिलें म्हणे तिसी ॥४९॥
तुम्हीच युद्धीं सुखावोन । दिधलें दों वरीं वरदान ।
तें मी मागेन आपण । कृपणपण न करावें ॥५०॥
राजा म्हणे आवश्यक । जें जें मागसी अलोकिक ।
तें तें मी तुज देईन देख । पूर्ण भाक पैं माझी ॥५१॥
सत्य न करितां पूर्वभाक । हांसतील हरिश्चंद्रादिक ।
पूर्वज शापितील आवश्यक । मजही नरक होईल ॥५२॥
कल्पतरु कामधेन । पाताळींचें अमृतपान ।
जें जें मागसील तें देईन । सत्य संपूर्ण करीन मी ॥५३॥
असतां साह्य श्रीराम मजसी । काय दुर्लभ मज द्यावयासी ।
मग दशरथ अति उल्लासेंसीं । कैकेयीसीं तुष्टला ॥५४॥
भोळेपणाचेनि लवलाहें । राजा गर्जे उभवोनि बाहे ।
स्त्रियांचे कृत्रिम हृदय आहे । तें ठावें नव्हे पुरुषांसी ॥५५॥
संवचोराचा सांगात । तैसा स्त्रियांचा वृत्तांत ।
सर्वस्वें ठकोनि करावा घात । नरककपात स्त्रीसंगे ॥५६॥
ऐकोनि रायाची वचनोक्ती । कैकेयी बोले रायाप्रती ।
मागेन माझिया वरदोक्ती । एकें निश्चितीं मागतें ॥५७॥

दोन वरांनी दोन हेतूंची पूर्ती :

एकें वरदें भरतासी । स्वयें द्यावें निजराज्यासी ।
जैसा उल्लास रामाभिषेकासी । तेणें उल्लासीं अभिषेकी ॥५८॥
दुसया वरदें श्रीरामासी । धाडावें दंडकारण्यासी ।
गोदातीरीं वनवासी । चवदा वर्षे वनवास ॥५९॥
मज नाहीं अति स्वार्थ । चवदा वर्षें नेमस्त ।
राज्य करील माझा भरत । पुढे रघुनाथ राज्य करो ॥६०॥
चवदा वर्षांमाझारी । चवदा भुवनें भरत आंवरी ।
राम आलियाहीवरी । मग कैशापरी राज्य पावे ॥६१॥
वनीं दंडकारण्यांत । राक्षसांचा अति घात ।
ते गिळतील रघुनाथ । मग राज्यीं भरत अक्षयी ॥६२॥
रामासवें गेल्या लक्ष्मण । त्याचेंही राक्षस करितील भक्षण ।
तेव्हां निष्कंटक राज्य पूर्ण । भरत आपण भोगील ॥६३॥
दृढ विचार हा पोटांत । संबोधावया दशरथ ।
चवदा वर्षे जीं नेमस्त । स्वयें सांगत मर्यादा ॥६४॥
अयोध्यानिकटप्रदेशीं । श्रीराम जालिया वनवासी ।
अयोध्या जाईल त्यापासीं । मग भरता उद्वसीं राज्य कैचें ॥६५॥
राम आवडे प्रजांसी । राम आवडे प्रधानांसी ।
राम आवडे सर्व सैन्यासी । ते त्यापासीं जातील ॥६६॥
रामापासीं जातील समग्र । मग अयोध्या ओस नगर ।
तेथे भरत राज्यभर । हा मिथ्या विचार समूळ ॥६७॥
यालागीं दंडकारण्यासी । अवश्य धाडावें श्रीरामासी ।
गोदातीरीं वनवासी । वल्कलांबरेंसीं रहिवासु ॥६८॥
राज्यामधील अणुप्रमाण । श्रीरामासी न द्यावें आपण ।
जटाधारी वल्कलपरिधान । करावें गमन गोदातीरीं ॥६९॥

असंगसंगदोषेण साधवो यांति विक्रयाम् ।
एकरात्रप्रसंगेन काष्ठघंटाविडंबना ॥७॥

ओढाळ धेनुच्या संगतीं । धर्मधेनु चरतां शेतीं ।
ओढाळ पळे अतर्क्यगती । धर्मधेनूप्रती लोढणें ॥७०॥
तैसें कैकेयीपाशीं जाण । मंथरेचें आप्तपण ।
भरतराज्याचें भूषण । लोढणें संपूर्ण वैधव्याचें ॥७१॥
अवगणोनिया निजपती । द्वेष करिता श्रीरघुनाथीं ।
पावेल वैधव्याची प्राप्ती । दुष्टसंगतीचें ऐसें फळ ॥७२॥

वरपूर्तीचा हट्टाग्रह पाहून राजा मूर्च्छित :

असो हा अति कथार्थ । ऐकतां कैकेयी वचनार्थ ।
दशरथा धरणीं पडे मूर्च्छित । अवस्था प्राणांत ओढावली ॥७३॥
श्रीरामवियोगाचे बाण । हृदयी खडतरले दारुण ।
अर्धकंठीं धरिला प्राण । श्रीरामदर्शन घ्यावया ॥७४॥
कैकेयीचें वचन व्रज । रामवियोग सतेज धार ।
मरणांत घाव लागला थोर । घायें नृपवर मूर्च्छापन्न ॥७५॥
ऐसा अंतरी विव्हळ । रामवियोगाची तळमळ ।
नेत्रांवाटे वाहे जळ । स्वेद प्रबळ चालिला ॥७६॥
अंगी घाव न देखे वैद्य । यालागीं न चलें औषध ।
अंतरीं खोंचला सुबद्ध । पोटीं अशुद्ध दृढ पडिलें ॥७७॥
राजा होवोनि सावधान । म्हणे मी काय देखतां दुष्ट स्वप्न ।
श्रीराम सर्वांचे जीवन । त्यासी वनप्रयाण कोण नेमी ॥७८॥
कैकेयीची मज आवडी । तेचि मोहक मद्य उघडी ।
श्रीराम वनवासा दवडी । प्रिय प्रियाधाडी मज आली ॥७९॥

स्त्रीलोभामुळे दशरथाला पश्चाताप :

स्त्री वल्लभा आप्तपण । जो मानी तो मूर्ख पूर्ण ।
श्रीरामासी वनवासप्रयाण । आली नागवण स्त्रीलोभें ॥८०॥
पुरुषें प्रलोभें न द्यावी भाक । स्वयें मागणें नाही तें देख ।
संधि साधोनियां अटक । नरकदायक मागणें ॥८१॥
दुष्ट दुर्धर स्त्रीचरित्र । सर्वदा बोलतें वेदशास्त्र ।
तें मी न मानोनी पामर । जालॊं पात्र अति दुःखा ॥८२॥
जेंवी उच्छिष्टें पाळिजे श्वान । तैसा मी जालों स्त्रियांचे अधीन ।
तें फळ पावलों संपूर्ण । वनाभिगमन श्रीरामा ॥८३॥

कैकेयीवर राजा संतापतो :

पाहोनि कैकेयींचे वदन । रायसी आला क्रोध दारुण ।
नष्टे दुष्टे दुर्भगे जाण । द्वेषी संपूर्ण श्रीरामीं ॥८४॥
रामें काय केला अपराध । त्यावरी तुझा दुर्धर क्रोध ।
दंडकारण्य अति विरुद्ध । भाषनिर्बंध वनवासा ॥८५॥
भरतापरिस अति प्रीती । श्रीरामावरी तुझी होती ।
कोणें विकल्प घातला चित्तीं । श्रीरामप्रति अति द्वेष ॥८६॥
कौसल्येपरिस अधिक । श्रीराम तुझा निजसेवक ।
सेवा करोनि अवंचक । त्यासी तूं दुःख देवों पाहसी ॥८७॥
माझी घेवोनियां भाक । मजचि देवों पाहसी दुःख ।
जळो तुझें काळें मुख । दुःख तें सुख मानिसी ॥८८॥
श्रीराम परमात्मा परेश । त्याचा तू करितां द्वेष ।
होईल सर्वस्वाचा नाश । पावसी त्रास निंदेचा ॥८९॥

कैकेयीला विनवणी :

ना भरत ना श्रीराम । ऐसें होईल विरुद्ध कर्म ।
यालागीं करीं वो उपशम । द्वेष दुर्गम सांडोनी ॥९०॥
श्रीरामीं सांडी दुष्टपण । यालागीं धरितों तुझे चरण ।
वरदानाचें दृढपण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥९१॥

तिचा सत्यपरिपालनाचा आग्रह , पूर्वेतिहास :

ऐकोनि रायाचें वचन । कैकेयी म्हणे होसी सर्वज्ञ ।
सूर्यवंशीं वरदान । मिथ्या वचन नाहीं केलें ॥९३॥
नपुंसक तूं सूर्यवंशीं । राम न धाडवे वनवासासी ।
उणें आणिलें पूर्वजांसी । दिधले भाकेसी नेदूनी ॥९४॥
कपोताच्या वरदानासी । शिबीनें तुकिलें निजमांसासी ।
सत्य करोनि वचनासी । वैकुठासी नेली नगरी ॥९५॥
राजा रुक्मांगद अयोध्येसी । धर्मांदग पुत्र तयासी ।
तेणें जिंकोनि सप्तद्वीपांसी ।
नाना अर्थ पितयासी । सद्‌भावेंसीं अर्पिलें ॥९६॥
पृथ्वी समुद्रवलयांकित । धर्मांगदा पितयासी एकचि सुत ।
पितृसेवनार्थ अति उदित । आणि हरिभक्त सर्वस्वें ॥९७॥
मोहिनीच्या वरदासीं । पिता वधी धर्मांगदासी ।
नगरी नेली वैकुंठासी । एकादशीव्रताच्या प्रतापें ॥९८॥
तेंचि वंशीं तूं दशरथा । वना न धाडवे रघुनाथा ।
वरद न देववे म्हणसी आतां । हे नपुंसकता तुजचि साजे ॥९९॥
स्त्रीवाक्य अति तीक्ष्ण । ऐकतां निवटे जीव प्राण ।
राजा पडला मूर्च्छापन्न । संज्ञा संपूर्ण बुडाली ॥१००॥
स्त्रीविषय विष संपूर्ण । दुर्धरत्वें अति दारुण ।
सेविलिया अवश्य आणी मरण । तें संपूर्ण कैकेयीनें केलें ॥१॥

कैकेयीला पुनः प्रार्थना :

राजा अति दुःखें मूर्छापन्न । तो स्वयें पावोनि संज्ञा संपूर्ण ।
कैकेयीप्रति आपण । विनीत कारुण्यें बोलत ॥२॥
श्रीरामी तुझी कृपा पूर्ण । तेथें अत्यंत कठिणपण ।
धरावया तुज काय कारण । अति दारुण निर्दयत्वें ॥३॥
सुंदर सुकुमार सुखैकघन । श्रीराम हा राजीवनयन ।
त्यासी चरणचालीं गमन । दुर्धर वन केंवि कंठे । ॥४॥
सुखवासी श्रीरघुवीर । त्यासी परिधान वल्कलांबर ।
शीत उष्ण अति दुर्धर । श्रीरामचंद्र केंवि साहे ॥५॥
मृदु अरुवार सुखसेजेसीं । सुमनें खुपती श्रीरामासी ।
तृणपर्णी शयनासीं । कैसेनि सोसील श्रीराम ॥६॥
पंचामृत अति चोखटें । सेवितां श्रीरामाचें मन विटे ।
त्यासी तिखट आंबट तुरटें । फळें मुळें कडवटें केंवि खाये ॥७॥
सेना प्रधान सेवक आप्त । तेणेसीं विचरे श्रीरघुनाथ ।
तो एकला वनांत । चौदा वर्षें केंवि राहे ॥८॥
जळो माझें काळें वदन । प्रमादी प्रमदागुप्तवरदान ।
श्रीराम लागलें दृढ बंधन । म्हणोनि रुदन करी रावो ॥९॥

रामवनवासाने होणारे दुष्परिणाम :

श्रीरामाचें वनप्रयाण । त्या सांगातें जाईल लक्ष्मण ।
त्यासवें जाईल माझा प्राण । सत्य जाण कैकेयी ॥११०॥
दुःखें कौसल्या त्यजील प्राण । सुमित्रा मरेल सत्य जाण ।
तेवढें जालिया कंदन । सुखसंपन्न तूं होसी ॥११॥
दुर्धर करोनियां आकांत । राज्यीं स्थापूं पहासी भरत ।
येवढा न करीं तू अनर्थ । शरणागत मी तुझा ॥१२॥
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । क्षमा करीं मज दशरथा ।
न मागावी हे वरदकथा । वना रघुनाथा न दवडावें ॥१३॥
राम असों दे मजपासीं । राज्य देतों मी भरतासी ।
प्रतिभूं देतो वसिष्ठासी । तो आम्हांसी नियंता ॥१४॥

राजाचे लोटांगण व कैकेयीकडून धिक्कार :

म्हणोनि घातलें लोटांगण । धरिले मस्तकीं तिचें चरण ।
तंव ते क्षोभली दारुण । म्हणे शठा नष्टपण कां करिसी ॥१५॥
अति हीन दीन तूं होसी । लाज लाविली सूर्यवंशासी ।
बोलिला बोल पैं सांडिसी । कृपण होसी नृपनाथा ॥१६॥
पायां पडलियासाठीं । मी न सांडी वरदगोष्टी ।
देणें नाहीं तुझे पोटीं । महाहट्टी होसी राया ॥१७॥
तूं तंव न देसी वरदान । मज म्हणसी महाविघ्न ।
तरी मी आपुला देईन प्राण । सुख संपूर्ण हो तुम्हां ॥१८॥
माझा हाचि परमार्थ । सुखी व्हावा निजकांत ।
माझा करोनियां घात । सुखी दशरथ हो तेथें ॥१९॥
वरदभाष्य करितां मिथ्या । माझी तुजवरी पडेल हत्या ।
मग तूं अभिषेकीं रघुनाथा । सुख समस्तां होईल ॥१२०॥

राजाची बिकट स्थिती :

अति उग्र कैकेयीचें वचन । तेणें रायासी आलें रुदन ।
सवेंचि पडे मूर्च्छापन्न । भ्रमे मन रायाचें ॥२१॥
देशोदेशींचे भूपती । आणिले रामाभिषेकार्थीं ।
ते मज दिगंती निंदिती । स्त्रीवंश स्त्रीजित दशरथ ॥२२॥
प्रधानादि जन समस्त । घरोघरीं निंदिती बहुत ।
निंदापात्र मी निश्चित । वना रघुनाथ दवडितां ॥२५॥
कैकेयीचें परम सुख । इहलोक ना परलोक ।
जगा द्यावया परम दुःख । सुंदरी परम विख कैकेयी ॥२४॥
कैकेयी केवळ काळराती । म्या पाळिली अति प्रीतीं ।
ते माझी बोहली मजभोवतीं । म्यां कोणाप्रती सागावें ॥२५॥
राम धाडावया वनाप्रती । वचनें तळमाळितां भूपति ।
दुःख सोसितां सरली रीती । उदयप्राप्ती होऊन पाहे ॥२६॥
प्रबोधितां श्रीदशरथ । कैकेयी करील विपरीत ।
वधावया राक्षस समस्त । वना श्रीरघुनाथ निघेल ॥२७॥
एकाजनार्दना शरण । कथारम्य रामायण ।
श्रोतीं द्यावें अवधान । वनप्रयाण श्रीरामा ॥१२८॥
स्वस्ति श्रीभावर्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
कैकेयी-दशरथसंवादो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
॥ ओंव्या १२८ ॥ श्लोक ७ ॥ एवं ॥ १३५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *