भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा

श्रीरामांचे चित्रकूटावर गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांच्या प्रयाणानंतर दशरथ व राण्या त्यांच्या मागून धावत जातातः

वना निघतां श्रीरघुनाथ । राजा महामोहें मूर्च्छित ।
तो होवोनियां सावचित्त । पुसे दशरथ राम कोठें ॥१॥
त्यासी स्त्रिया सांगती मात । तुम्हीं दिधला निजरथ ।
त्यावरी बैसोनि रघुनाथ । गेला निश्चित वनवासा ॥२॥
एक सांगती रायासी । राम आश्वासीत जनांसी ।
आहे नगरद्वारापासीं । तंव राव वेगेंसी धाविंनला ॥३॥

अथ राजा वृतः स्त्रीभिः सद्विजो दीनमानसः ।
निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामि च वनं गतम् ॥१॥

सातशें राणियांसमवेत । धाविंनला दशरथ ।
कोठें कोठे माझा रघुनाथ । स्वयें पुसत सर्वांतें ॥४॥
मग आक्रंदे दिधली हाक । श्रीरामा दाखवीरे निजमुख ।
तुज जालिया विमुख । परम दुःख सर्वांसी ॥५॥
कैकेयीयें घेवोनि भाक । मज दिधलें महादुःख ।
तुझे देखिलिया श्रीमुख । परम सुख मज होय ॥६॥
श्रीराम स्मरतां हृदयांत । सकळा दुःखांचा होय अंत ।
भाग्यें अभागी मी दशरथा । वना रघुनाथ धाडिला ॥७॥
धांव पावें गा राघवा । भेटी देई परम कणवा ।
सुख होईल माझ्या जीवा । म्हणॊनि धांवा पोकारिला ॥८॥
गेला गेला रे रघुनाथ । म्हणॊनि आक्रंदे गर्जत ।
रडत रडत स्वयें धांवत । पडे मूर्छित अति दुःखी ॥९॥
राम म्हणे येथें राहतां । दृढ वाढेल मोहममता ।
रावा मजपासीं न येतां । वेगीं सुमंता रथ हाकीं ॥१०॥
श्रीराम नयेचि परतोनी । दशरथ रथ देखे नयनीं ।
दृष्टी मुरडेना तेथोनी । ठेली जडोनी रामरूपीं ॥११॥

यावत्तु निर्यतस्तस्य रजोरुपमदृश्यत ।
तावव्द्यवर्धतेवास्य धरणां पुत्रदर्शने ॥२॥
तदार्तश्च विषण्णश्च पपात धरणितले ॥

सर्वांचा विलाप :

श्रीआम देखतां दृष्टीं । दृष्टी लागली रामापाठीं ।
श्रीराम न देखतां दृष्टीं । बैसली शेवटी ध्वजस्तंभी ॥१२॥
दृष्टी अंतरलिया ध्वज । राजा पाहे रथाचें रज ।
न देखतां श्रीरामाचें रज । पडे भूभुज मूर्छित ॥१३॥
आठवितां श्रीरामासी । राजा विसरे निजदेहासी ।
तेणें मूर्च्र्छा आली त्यासी । देहभावासी विसरला ॥१४॥
स्त्रिया करिती दिर्घ रुदन । रुदन करिती सकळ जन ।
गाई न सेविती तृणजीवन । वत्स स्तनपान न करिती ॥१५॥
अश्व न खाती चारापाणी । गज निजकवळ न घालिती वदनीं ।
आहार त्यजिला पौरजनीं । अयोध्याभुवनीं आकांत ॥१६॥
दिवस गेला अस्तमानीं । राजा सावध केला राणियांनीं ।
प्रवेशतां अयोध्याभुवनीं । सुख स्वप्नीं दिसेना ॥१७॥
दीपदीपिका नाहीं कोठें । ओस हाटाबटिया चौहटे ।
जो तो रडताचि वाटे । श्रीराम कोठें पुसताती ॥१८॥
श्रीराम प्रवेशलिया वनीं । घरोघरीं दीर्घ रडणी ।
अंदरोळ पडला अयोध्याभुवनीं । अन्न कोणी न खाय ॥१९॥

वसिष्ठांनी धीर दिल्यावर सर्वजण अयोध्येकडे परत फिरतात :

न सहावे श्रीरामवियोगदुःख । राजा राणीया सकळ लोक ।
अवघे म्हणती घेवों विख । वसिष्ठें देख निवारिलें ॥२०॥
चौदा वर्षे वनवासीं । रामी क्रमील निमेषार्धैसीं ।
लाहोनि त्रिभुवनशयासी । अयोध्येसी येईल ॥२१॥
मारोनि राक्षसांच्या क्रोडी । सोडवोनि देवांची बांदवडी ।
उभवोनि रामराज्याची गुढी । येईल तांतडी श्रीराम ॥२२॥
माझें वचन माना प्रमाण । वाहतों श्रीरामाची आण ।
विष घेवोनि देतां प्राण । अंधःपतन पावाल ॥२३॥
ऐकोनि वसिष्ठाची वाणी । राजा प्रवेशला राजभवनीं ।
श्रीराम आठवितां मनीं । पडला धरणीं मूर्च्छित ॥२४॥

ब्राह्मण श्रीरामांच्या मागून धावत जातात :

येरीकडे श्रीराम आपण । शिघ्र करितां वनप्रयाण ।
पाठीं लागले ब्राह्मण । राहविल्या जाण न राहती ॥२५॥
रामें रथ पेलिला उठाउठीं । द्विज धांवती पाठॊपाठीं ।
श्रीरामाची प्रीती मोठी । प्रेम पोटीं अनिवार ॥२६॥

चकर्षवे गुणैर्बद्धं जनं पुरनिवासिनम् ॥३॥
ते द्विजास्त्रिविधं वृद्धा ज्ञानेन वयसौजसा ।
वयःप्रकंपशिरसो दूरादूचुरिदं वचः ॥४॥
वहंतो जवना रामं भो भो जात्यास्तुरंगमाः ।
उपवाह्यस्तु वो भर्ता नापवाह्यः पुराद्वनम् ॥५॥
एवमार्तप्रलापांस्तान्वृद्धानप्रलपतो द्विजान् ।
अवेक्ष्य सहसा रामो रथादवततार ह ॥६॥

श्रीरामांच्या संगतीं । वनवासीं करावया वस्ती ।
दृष्टी ठेवोनियां रथीं । ब्राह्मण धांवती लवलाहें ॥२७॥
वृद्ध वृद्धवेदपाठक । तपस्वी अग्निहोत्री याज्ञिक ।
आणिकही बहुसाल लोक । मोठेनि हांक तिहीं दिधली ॥२८॥
शीघ्र नेतां श्रीरामासी । शरण रथाच्या वारुवसीं ।
राम आणावा आम्हांपासी । वेगीं वनवासीं न न्यावा ॥२९॥
रथ चालवितो अलोलिक । त्या सारथियासी नमन देख ।
रथ पेलावा नगरासन्मुख । वना श्रीराम न न्यावा ॥३०॥
श्रीराम जंव मागें पाहे । तंव जनसमुदाय धांवताहे ।
उडी टाकोनि लवलाहें । वंदोनि पाये बोलत ॥३१॥
स्वामी कष्टलेती बहुत दुरी । म्हणॊनि द्विजांचे चरण चुरी ।
वनवास दंडकारण्यमाझारी । तुम्ही कैशापरी याल तेथें ॥३२॥
श्रीरामा तुझिया संगतीं । आम्ही पावों ब्रह्म्नप्राप्ती ।
वनवास तो बापुडा किती । भय निश्चितीं आम्हां नाहीं ॥३३॥
परतोनि जाणें मागुती । निश्चय आम्हां नाहीं रघुपती ।
स्वामीनें न्यावें वनाप्रती । वनासांगाती वनवासीं ॥३४॥
तूं जैं सांडोनि जासील दुरी । तैं आम्ही होऊ रानभरी ।
आम्हांवरी कृपा करीं । दीनोद्वारीं चालावें ॥३५॥
ऐकोनियां द्विजोक्ती । श्रीराम विचारी पैं चित्तीं ।
हे निजनगरासी स्वयें जाती । ऐसी युक्ती योजावी ॥३६॥
श्रीराम लक्ष्मणा आज्ञा करी । म्हणॆ चालतां द्विज शिणले भारी ।
आजि वस्ती तमसातीरीं । सीता उतरीं वृक्षातळीं ॥३७॥
श्रीराम नेघेची पैं अन्न । अवघी केले अंबुप्राशन ।
सीतेसहित आपण । केलें शयन तृणशय्ये । ॥३८॥
श्रीराम सांगे लक्षणाप्रती । ब्राह्मण राहवितां न राहती ।
हे जंव निजलें आहेती । तंव शीघ्रहतीं निघावें ॥३९॥
सुमंत रथ सिद्ध करी । मार्ग दाविला अयोध्यामोहरी ।
रिघोनि तमसेमाझारीं । परतीरीं उतरलें ॥४०॥
ब्राह्मण प्रतःकाळीं पाहती । माग देखिला अयुध्येप्रती ।
उल्हासें अवघे नगरा येती । तंव रघुपती पुढें गेला ॥४१॥
तयांसी पुसती नगरस्थ । कोठे आहे श्रीरघुनाथ ।
ते म्हणती राम आला येथ । जन हांसत ब्राह्मणांसी ॥४२॥
बहुतां पाडोनियां भ्रांती । श्रीराम गेला हातोहातीं ।
श्रीरामाची अगम्य गती । न कळे वेदोक्ती ब्राह्मणां ॥४३॥
हृदयीं असतां आत्माराम । जनांसी पडला मोहभ्रम ।
अवघे जाले विषयकाम । कल्पांती राम न भेटे ॥४४॥
फुकाचें जे रामनाम । नुच्चारिती ते अभागी परम ।
असो ते पावती अंधतम । जे आत्माराम नाठविती ॥४५॥

गुहकाचे भागीरथीच्या तीरावर आगमन :

असो हें येरीकडे रघुपती । दुसरे दिवसीं दिनांती ।
इंगुदीवृक्षीं केली वस्ती । निकट भागीरथीप्रवाहो ॥४६॥
वना आलिया श्रीराममूर्ती । ऐकोनि गुहक निषादपती ।
भेटों आला अति प्रीतीं । घातले क्षितीं लोटांगण ॥४७॥
देखतां श्रीरामाचें मुख । गुहका जाला परम हरिख ।
रामें आलिंगतां देख । द्वंद्वदुःख विसरला ॥४८॥
विसरला धर्म अधर्म । विसरला अधम उत्तम ।
सद्‌भावें देखतां श्रीराम । रणजन्म विसरला ॥४९॥
विसरला कर्मकर्तेपण । विसरलासे मीतूंपण ।
देखतां श्रीरामाचे चरण । समाधान गुहकासी ॥५०॥
करितां श्रीरामनामस्मरण । समूळ निदें जन्ममरण ।
त्यांचे देखतां श्रीचरण । बोळावण भवभावा ॥५१॥
गुहकें आणिला फळसंभार । राम न करीच फळाहार ।
करोनि जळाचा जळाहार । केला सेजार विक्षमूळीं ॥५२॥
केला सीतेसी सेजार । निद्रा न करीच सौमित्र ।
सावधान अहोरात्र । सेवेसी तत्पर श्रीरामीं ॥५३॥
श्रीराम गुहक एकांती । संवाद करिती अति प्रीतीं ।
निमेषार्धै गेली राती । जाली प्राप्ती अरुणादया ॥५४॥

पुढे प्रयाण करतेवेळी तेथूनच सुमंताला परत पाठविला :

श्रीरामा म्हणे गुहकासी । वेगीं आणवीं नौकेसी ।
जाणें आहे परतीरासी । आजि वस्ती प्रयागीं ॥५५॥
सुमंतें सज्ज केला रथ । तयासी बोले श्रीरघुनाथ ।
आतां तेथेनियां परत । जावें त्वरित अयोध्यें ॥५६॥
तमसातीरींहून रथ । परतवावा हा निश्चितार्थ ।
ब्राह्मणसंगाच्या त्यागार्थ । तुज येथपर्यंत आणिलें ॥५७॥

सुमंताची विनंती :

ऐकोनि श्रीरामाचे वचन । सुमंत पडला मूर्च्छापन्न ।
दीर्घ आक्रंदे करी रुदन । राम सच्चिद्घन अंतरला ॥५८॥
रिता देखोनियां रथ । होईल अयोध्येसी आकांत ।
प्राण सांडील दशरथ । नको तेथें मज धाडूं ॥५९॥
तुज सांडोनि रघुनाथा । अयोध्येमाजि मज जातां ।
सुख न पावें गा सर्वथा । चरणीं माथा ठेविला ॥६०॥
कृपा करीं श्रीरघुपती । मी येईन वनाप्रती ।
सेवा करीन अहोरात्रीं । विघ्नें रथगतीं वारीन ॥६१॥

श्रीरामांचे उत्तरः

श्रीराम म्हणे गा सुमंता । गुज सांगेन मी तुज आतां ।
तुज अयोध्येसी नवजातां । कैकेयी दशरथा पीडील ॥६२॥
रायें देवोनियां रथ । कोठें धाडिला रघुनाथ ।
माझेनि रागें दशरथ । करवील घात भरताचा ॥६३॥
पायीं जावें वनवासासी । साक्षेपें रथ का दिधला त्यासी ।
मारावया भरतासी । रायें रामासी पाठविलें ॥६४॥
भरता मारविलियापाठीं । राम बैसवावा राज्यपटीं ।
विकल्प कैकेयीच्या पोटीं । तो तूं गेलियापाठीं सांडील ॥६५॥
रितें देखोनियां रथासी । राम जाला वनवासी ।
सत्य मानेल कैकेयीसी । या कार्यासी तूं जायीं ॥६६॥
माझी आज्ञा आहे ऐशी । तुवां जावें अयोध्येसी ।
दशरथ आणि कौसल्येसी । सुख उपदेशीं ब्राह्मणां ॥६७॥
वचन ऐकोनियां सांकडे । सुमंत संकोचला रडें ।
कांही न बोलवेचि पुढें । रथेंसीं मुरडे अति दुःखी ॥६८॥

गुहकाकडून झाडाचा चीक आणवून जटाबंधन :

श्रीराम बोलिला उत्तर । गुहका आणवी न्यग्रोधक्षीर ।
वेगीं बांधावा जटाभार । रामसौमित्र वनवासी ॥६९॥
गुहकें आणोनियां क्षीर । जटामुकुट अति सुंदर ।
दोघांचे बांधिले मनोहर । राम सौमित्र शोभती ॥७०॥
आज्ञा देवोनि सुमंतासी । श्रीराम आला नावेपासीं ।
वेगीं बैसवोनि सौमित्रासी । सीता त्यापासी बैसविलि ॥७१॥

गुहकाच्या आईची प्रार्थना :

श्रीराम नावेसी बैसतां । आक्रंर्दे गर्जे निषादमाता ।
आम्हा समस्तांच्या घाता । श्रीरघुनाथा करूं नको ॥७२॥
तुझी लीला अगाध गहन । नेणो श्रीराममहिमान ।
चरणीं उभ्दरिले पाषाण । जडतारण श्रीराम ॥७३॥
नावेवरी आमुचे जिणें । ते उभ्दरेल तुझेनि चरणें ।
मग आम्हीं काय करणें । येणें जाणे खुंटलें ॥७४॥

क्षालयामि तव पादपंकज नाथ दारु दृषदोः किमंतरम् ।
मानुषीकरणचूर्णमस्ति ते पादयोरिती कथा प्रथीयसी ॥७॥

ऐसे अगाध तुझे चरण । तुझे पदींचे रजःकरण ।
लागतां जडाचें उद्धरण । त्यांचे क्षाळण करीन मी ॥७५॥

श्रीरामांना संतोष :

देखोनि निषादीचा भावो । संतोषला श्रीरामरावो ।
दीन उद्धरावया पाहों । वनीं निर्वाहो श्रीरामा ॥७६॥
करावया दीनोद्धारण । श्रीरामाचे वनप्रयाण ।
एकाजनार्दना शरण । भवतारण श्रीराम ॥७७॥

गंगापार होऊन त्रिरात्र मुक्काम, त्रिवेणीदर्शन, गंगायमुनेस आनंद :

यापरी श्रीरामचंद्र । उतरोनियां गंगापार ।
श्रीराम सीता सौमित्र । तिघें एकत्र निघाली ॥७८॥
पुढें पद्मपुष्करिणी । तेथें त्रिरात्रीं वसोनी ।
कमळकिंजल्क सेवूनी । प्रभातीं त्रिवेणी पावतीं जालीं ॥७९॥
राम लक्ष्मण सीता तिन्ही । देखोनियां श्रीत्रिवेणी ।
उल्हास गंगेच्या मनीं । श्रीरामचरणीं विनटावया ॥८०॥
गंगा म्हणे माझें भाग्य गहन । यमुना म्हणे मी अति पावन ।
सरस्वती म्हणे मी धन्य । श्रीरामचरणस्पर्शनीं ॥८१॥
लागतां श्रीरामाच्या चरणीं । आम्ही पावन तिघी जणी ।
म्हणोनि आनंदली त्रिवेणी । तिघी जणी सनाथ ॥८२॥
प्रयोग करोनियां पावन । सीतासमवेत लक्ष्मण ।
श्रीराम करी संध्यास्नान । जपविधान यथोक्य ॥८३॥

नित्यविधी उरकून भरद्वाजाश्रमास गमन, तिथेच राहण्याबद्दल ऋषींचा आग्रह :

श्रीराम लक्ष्मण सीतेसहित । भरद्वाजाश्रमा येत ।
ऋषींने देखोनि श्रीरघुनाथ । आला धांवत सामोरा ॥८४॥
स्वयें श्रीराम आपण केलें साष्टांगीं नमन ।
सौमित्रें घातलें लोटांगण । वंदिले चरण जानकीनें ॥८५॥
आला देखोनि रघुनाथ । आनंद भारद्वाजा अद्‌भुत ।
आजु माझें कुळ पुनीत । पितर तृप्त आजि माझे ॥८६॥

अद्य नः पितरस्पृप्ता अद्य नः पावितं कुलम् ।
अद्य नो वंशजाः सर्वे यद् भवान् गृहमागतः ॥ ८ ॥

आजि माझा वंश धन्य । अजि माझा आश्रम पावन ।
आजि माझे याग संपूर्ण । सफळ ध्यान अजि माझें ॥८७॥
आजि माझे धन्य नयन । आजि विश्रांतीस आलें समाधान ।
झालीं ध्येय ध्याता ध्यान संपन्न । श्रीरामचरण देखोनि ॥८८॥
स्वभावें देखतां रघुपती । ज्ञानेंसीं निज्ञानाची प्राप्ती ।
आजि जीवशिवासी विश्रांती । श्रीरामपूर्ती देखोनि ॥८९॥
हर्षे करितां स्तवन । अशुपूर्ण जाले नयन ।
हृदयीं धरितां रघुनंदन । समाधान ऋषिवर्या ॥९०॥
ऋषि पावोनि समाधान । केलें अर्घ्यपाद्यादि पूजन ।
फळें आणोनि संपूर्ण । दिधलें भोजन फळाहार ॥९१॥
ऋषि सभ्दावें निर्मळ । श्रीरामीं अर्पिता फळ ।
देहगेह रामाचे केवळ । सुफळीं सकळ श्रीराम ॥९२॥
ऐसी सर्व समाधि असता । धणी नपुरे ऋषीच्या चित्ता ।
श्रीरामसेवासुख सेवितां । समाधिअवस्था ते तुच्छ ॥९३॥
ऋषि म्हणॆ श्रीरामासी । दूरी वनवासा तूं कां जासी ।
प्रयाग तीर्थरावो सर्व तीर्थांसी । चौदा वर्षे येथेच राहें ॥९४॥

आपण राहिल्यामुळे अयोध्येचे नागरिक येऊन शांतिभंग होईल वगैरे अडचणींचा निर्देश :

श्रीराम म्हणे ऋषिनाथा । मज निश्चयें येथे राहता ।
अयोध्येच्या प्रजा समस्ता । देखोनि समीपता धांवतील ॥९५॥
चुकवोनि आलों मी द्विजपण । अवश्य येतील ते ब्राह्मण ।
स्त्रिया वृद्ध अति दीन । समस्त जन येतील ॥९६॥
येतील पुरोहित प्रधान । येतील नटनाटकगण ।
वारांगना येतील संपूर्ण । सेवक जाण येतील ॥९७॥
श्रीरामभेटी आणि प्रयागस्नान । पर्वकाळ अति पावन ।
जनक येईल धांवोन । सीताभिगमन माहेरा ॥९८॥
सीता का नेतां वनवासीं । इसी धाडावें माहेरासी ।
म्यां काय बोलावें जनकासी । वनवासासी मुख्य विघ्न ॥९९॥
येथे येईल दशरथ । तेव्हा भाक होईल व्यर्थ ।
यालागीं येथोनियां गुप्त । जावें दूर वनवासा ॥१००॥

ते भारद्वाजांनी मान्य करून चित्रकूटाचे नाव सुचविले :

ऋषि म्हणे सत्य वचनार्थ । येथोनि चित्रकूट पर्वत ।
पुष्पीं फळीं प्रफुल्लित । त्या वनांत तुम्हीं राहावे ॥१॥
तो पर्वत पुण्यशीळ । जननिवासापरीसं निर्मळ ।
वृक्ष तेथें सदाफळ । सुख पावाल सर्वही ॥२॥
मार्गी सिद्धवट विख्यात । त्यासी वंदावें भावयुक्त ।
त्याचनि सफळित पुरुषार्थ । निर्विघ्नार्थ वंदावा ॥३॥

सिद्धवटदर्शन , सीतेची प्रार्थना :

मग करोनि भारद्वाजा नमन । तिघीं जणीं केलें प्रयाण ।
ऋषि बोळवित आपण । अर्ध योजन स्वयें आला ॥४॥
रामें ऋषीस राहवोनी । तिघें यमुनेतें उतरोनी ।
पाहत शोभा लक्षसंख्य ॥७॥
वटीं वसे वटसावित्री । तिसीं पूजीन अलंकारवस्त्रीं ।
ऐसे बोलोनि सीता सुंदरी । नमस्कारी वटातें ॥८॥

चित्रकूटी आगमन :

तेथोनियां शीघ्रवत । पावलीं चित्रकूट पर्वत ।
शोभा देखोनि अत्यद्‌भूत । श्रीरघुनाथ सुखावला ॥९॥
पर्वत देखोनि शोभायमान । मार्गश्रमा जाली बोळवण ।
तीं तिघें जालीं सुखसंपन्न । येथे आपण राहावें ॥११०॥

आश्रम बाधण्याची लक्ष्मणाला आज्ञा :

राम म्हणॆ सौमित्रासी । वेगीं रचावें आश्रयासी ।
आणोनि गजभग्नवृक्षांसी । पर्णशाळेसी निर्मावें ॥११॥
श्रीरामाचें निजसेजार । रचिलें अति मनोहर ।
दुसरी शाळा सविस्तर । ऋषीश्वररहिवासा ॥१२॥
आणोनियां जळफळांसी । सौमित्र अर्पीं सीतेपासी ।
जागृत राहे अहर्निशीं । रामसेवेसी निवटला ॥१३॥
मुखीं नित्य श्रीरामनाम । सर्व इंद्रियीं श्रीराम कर्म ।
हृदयीं परमात्मा श्रीराम । भक्तोत्तम सौमित्र ॥१४॥
श्रीरामसेवा अति निर्वाण । लक्ष्मणासी फावली पूर्ण ।
एकजनार्दना शरण । भरतागमन अवधारा ॥१५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसीता लक्ष्मणचित्रकूटपर्वतगमनं नाम नवमोऽयायः ॥९ ॥
॥ ओव्या ११५ ॥ श्लोक ८ ॥ एवं १२३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय नववा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *