भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा

हनुमंताचा लंकाप्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंताच्या उड्डाणात सिंहिकेचे विघ्न :

सुरसा देवविघ्नातें । स्वयें जिणानि हनुमंते ।
पुढें लंघोनि समुद्रातें । सिंहिका तेथें ग्रासूं आली ॥१॥

प्लवमानं तु तं द्दष्ट्वा सिंहिका नाम राक्षसी ।
मनसा चिंतयामास प्रकृद्धा कामरुपिणी ॥१॥
इदं हि सुमहत्सत्वं चिरस्य वशमागतम् ।
इति संचित्य मनसा छायामस्य समक्षिपत् ॥२॥

गगनीं उडतां हनुमंत । छाया पडती समुद्रांत ।
सिंहिकेचा मनोरथ । ग्रासावया हनुमंत वाढली ॥२॥
शिववरद सिंहिकेसी । छाया धरितां प्राणी ग्रासी ।
छायाग्रह नांव तिसी । ते हनुमंतासीं गिळों आली ॥३॥
कपिच्छाया पडतां जळीं । सिंहिका ते छाया गिळी ।
हनुमंताची गति खुंटली । देहाची वळली मुरकुंडी ॥४॥

छायायां संगृहीतायां चिंतयामास वानरः ।
किमाक्षिप्तोऽस्मि सहसा निरुद्ध इव पर्वतः ॥३॥
तिर्यगृर्ध्वमधश्चापि विक्षमाणस्तदा कपिः ।
छायाग्राहि महाविर्यः तदिदं नात्र संशयः ॥४॥

छाया ग्रासितां सिंहिकेसीं । गति खुंटली हनुमंतासी ।
तेणें तो जाला कासाविसी । पाहे चौपासीं गजबजिला ॥५॥
स्मरोनियां रघुनाथ । अध ऊर्ध्व हनुमान पाहात ।
तंव देखिली जळाआंत । अति अद्‌भुत राक्षसी ॥६॥
छायाग्रहो निजनामता । ते हे राक्षसी तत्वतां ।
वैरी राहूचिये माता । इच्या घाता मी करीन ॥७॥
समुद्रामाजीं हें महाविघ्न । तें मी करीन निर्विघ्न ।
म्हणोनियां हनुमंते आपण । साटोप पूर्ण मांडिला ॥८॥
सिंहिका पसरोनि मुख । आली हनुमंतासन्मुख ।
कपि वाढे अधिकाधिक । तिणेंही आत्यंतिक मुख पसरिलें ॥९॥

तिच्या पोटात शिरुन तिचे उदरविदारण व नाश :

एक जाभाड पाताळीं । दुजें लाविलें नभोमंडळी ।
हनुमान गिळावया महाबळी । गर्जोनि किंकाळी टाकिली ॥१०॥
तिच्या मुखामाजी उडी । हनुमंत घाली लवडसवडीं ।
दातांतळीं जंव ते रगडी । तंव घाटीबुडीं रिघाला ॥११॥

तस्याळ संविवृते वक्त्रे निपपात महाकपिः ।
अत्राण्यादाय सर्वाणि वेगेनापसृतो मुखात् ॥५॥
हृतजीवा हनुमंता न्यपतल्लवणांभसि ॥६॥

रिघोनि तिच्या उदरांतरी । नखाग्रीं तिचें काळीज चिरी ।
अंत्रमाळा घेवोनि करीं । निघे बाहेरी वानर ॥१२॥
नाहीं दांतांतळी अडकलें । नाहीं चावितां चाखिलें ।
नाहीं मेद मांस भक्षिलें । जीवें घेतलें वानरें ॥१३॥
मी म्हणें हें अल्पपशु । तंव हा वानरू अति कर्कशु ।
भरुं न शकतांचि घासु । जीवनाशु येणें केला ॥१४॥
याची धरूं जातां छाया । छाया माया नाशिली काया ।
उद्धरलें मी कपिराया । तुझे पायाचेनि रजें ॥१५॥
श्रीरामभक्तांचे रजःकण । निःषेश नाशिती जन्ममरण ।
घातक्या देती ब्रह्म पूर्ण । साधु सज्जन कृपालु ॥१६॥
करावी श्रीरामाची भक्ती । पढावी श्रीरामाची कीर्ती ।
श्रीरामनामाच्या आवर्ती । जड मूढ उद्धरती तिहीं लोकीं ॥१७॥
ऐसी देवोनि आरोळी । सिंहिका पडे समुद्रजळीं ।
स्वर्गीं देवीं पिटिली टाळी । आतुर्बळी हनुमंत ॥१८॥
राहूपासोनि सुटे चंद्र । तैसा शोभला तो कपींद्र ।
त्यासी देखोनि स्तवीत इंद्र । ब्रह्मा शंकर देखोनी ॥१९॥

भीममद्य कृतं कर्म महत्सत्वं त्वया हतम् ।
साधयार्थमभिप्रेतमरिष्टं प्लवतां वर ॥७॥
तस्य त्वेतानि चत्वारि वानरेंद्र तथा तव ।
धृतिर्मतिबलं दाक्ष्यं स कर्मसु सीदति ॥८॥

मारुतीचा पराक्रम व चातुर्य :

छायाग्रही जीवें मारी । दुष्ट नष्ट कामाचारी ।
भयानक क्रूर भारी । ते वानरें नखाग्रीं मारिली ॥२०॥
करितां समुद्री उड्डाण । चारी पराक्रम अति गहन ।
तुवं दाखविली आंगवण । श्रीरामभजननिजनेटीं ॥२१॥
रामनामीं दृढ भक्ती । रामस्मरणीं दृढमती ।
अति दक्षता रामभक्तीं । श्रीरामशक्ती बळिष्ठ ॥२२॥
तेणें बळें अपांपती । उल्लंघितां केली ख्याती ।
त्या त्या प्रतापाची किर्ती । स्वर्गीं वर्णिती सुरवर ॥२३॥
प्रथमोड्डाणीं महाबळी । महेंद्र दाटला भूतळीं ।
सर्प दडपलें पर्वतातळीं । नाग पाताळीं हडबडिती ॥२४॥
हे प्रथमोड्डाणाची ख्याती । दुसरी हनुमंताची कीर्ती ।
मैनाद्रि देतां विश्रांती । न घेचि कपिपति महाबाहु ॥२५॥
विश्रांती न घेवोनि महाबळी । पर्वतीं ठेवितां आंगोळी ।
भारें बुडाला समुद्रजळीं । बैसला तळीं भारभूत ॥२६॥
तेणें अतळ वितळ सुतळ । रसातळ आणि तळातळ ।
हडबडिले सप्त पाताळ । भारें प्रबळ गिरी दाटी ॥२७॥
आंगोळी लाविता हनुमंत । भारें कोंदला पर्वत ।
हा दुजा पवाडा समुद्रात । केला विख्यात वानरें ॥२८॥
उल्लंघितां अपांपती । तिसरी केली महाख्याती ।
सुरसा केवळ कपटमूर्ती । निजात्मशक्तीं जिंकिली ॥२९॥
सुरसा दनुदानवमाता । छळणें छळितसें समस्ता ।
छळण न चलेचि हनुमंता । होय निघता पुरुषार्थें ॥३०॥
ऋषि आणि दानवमानवा । सुरसा छळी दळणें देवां ।
तीमाजी करोनि रिघावा । केला निघावा हनुमंते ॥३१॥
सुरसा हनुमंत गिळिला । परंतु जीवे नाहीं गेला ।
तिचा घात नाहीं केला । झाडा घेतला कपटाचा ॥३२॥
तिचिया कपटाची करितां झाडी । सुरसा जाली ते बापुडी ।
पायां लागोनि तातडीं । वंदी आवडीं हनुमंता ॥३३॥
आजीपासोनि आतां । निमाली कपटवार्ता ।
विजयी होसील हनुमंता । श्रीरघुनाथा कृतकार्या ॥३४॥
करोनि कपटाची झाडी । रामकार्याचिये तांतडी ।
हनुमान निघाला आवडीं । घालावया उडी लंकेसी ॥३५॥
तिसरी हनुमंताची ख्याती । अति पावन त्रिजगतीं ।
देव ब्राह्मण वंदिती । अगाध कीर्ती हनुमंता ॥३६॥
आणिक चौथा पवाडा । हनुमंते केला गाढा ।
सिंहिका निर्दाळोनि होडां । निघाला पुढां लंकेसी ॥३७॥
सिंहिका राक्षसी दुर्धर । हनुमंत गिळिला अति सत्वर ।
नखें निवटोनि निजविहार । निघे वानर बाहेरी ॥३८॥
सिंहिका राक्षसी दुर्धर । हनुमंत गिळिला अति सत्वर ।
नखें निवटोनि निजविव्हार । निघे वानर बाहरी ॥३८॥
छायाग्रहण दुष्ट भारी । जळींची संहारी ।
स्थळचरांतें जीवें मारी । घोंट भरी खेचराचा ॥३९॥
तिचें उघडोनि पोट । समुद्री वाहती केली वाट ।
चौथी कीर्ती हे उद्‌भट । केली वरिष्ठ वानरें ॥४०॥
त्रिविध भूतांचें भक्षक । प्राणिमात्रांचे जें दुःख ।
ऐसी सिंहिका मारोनि देख । तिन्ही लोक सुखी केले ॥४१॥
ऐसी चतुर्विध कीर्ती । करोनि निघाला मारुती ।
पुढें जे जे केली ख्याती । ते तें ग्रंथीं अवधारा ॥४२॥
सिंहिकेच्या उदराप्रती । िवदारण केलें मारुतीं ।
तेचि त्यासी अति विश्रांती । पुढील ख्याती अवधारा ॥४३॥
सिंहिकाविदारण स्थितीं । विश्रांति पावला मारुती ।
ते चौगुणीं वाढली शक्ती । लंकेप्रती जावया ॥४४॥

पुढे उड्डाण करुन पडलंकेस आगमन :

करोनि सिंहिकाविदारण । हनुमंते केलें उड्डाण ।
लंका सांडोनियां जाण । गेला आपण पडलंके ॥४५॥
पडलंकाराज्यस्थानीं । क्रौंचा रावणाची भगिनी ।
घर्घर राक्षसाची पत्‍नी । राज्यस्थानीं ती मुख्य ॥४६॥

घर्घर राक्षसाची पत्‍नी व रावणाची बहीण क्रौंचा राणी :

रावणइंद्रासीं युद्ध घोर । घर्घर क्रौंचेचा भ्रतार ।
युद्धीं पडिला महाशूर । राक्षसभार गांजोनी ॥४७॥
इंद्रे युद्ध केलें दारुण । राक्षसीं दांतीं धरिलें तृण ।
युद्धी आक्रंदे रावण । रणकंदन देखोनि ॥४८॥
रावण धरितां रणांरणीं पाठिराखा न देखे कोणी ।
सेनाप्रधान गेले पळोनी । निद्रास्थानीं कुंभकर्ण ॥४९॥
युद्धी साह्य जाला घर्घर । युद्ध केलें अति दुर्धर ।
इंद्रें मािरला हाणोनि वज्र । केला चकचूर हाडांचा ॥५०॥
शिववरदाचिये शक्तीं । इंद्रजित पावला गुप्तगती ।
अतर्क्य आभिचाराची युक्ती । अमरपति धरिला तेणें ॥५१॥
इंद्रासी लावोनि गळबंधन । लंके आणिला आपण ।
इंद्रजित आभिधान । तैंपासून पावला ॥५२॥
रावणाच्या निजसाह्यांसी । घर्घर पडिला रणभूमीसीं ।
तेणें आदरें क्रौंचेसी। दिधली राज्यांसीं पडलंका ॥५३॥
चवदा सहस्र निशाचारी । ठेविल्या क्रौंचेच्या सेवेकरी ।
अतिशयेंसी दुर्धरी । निजझुंजारी खेचरा ॥५४॥

क्रौंचा हनुमंत यांचा संघर्ष :

ते पडलंकापडिपाडीं । उत्तरस्रोताचिये थडीं ।
हनुमंताची पडली उडी । अति कडाडीं दुर्धर ॥५५॥
दुमदुमिलें पडलंकापीठ । दुमदुमिलें लंकात्रिकूट ।
निकुंबळेंसी कडकडाट । अति उद्धट ऊठिला ॥५६॥
भूकंप लंकेमाझारी । तेणें कांपती नरनारी ।
सीता आणिली करोनि चोरी । तैंहूनि जगरीं बहु विघ्नें ॥५७॥
तेणें नादें पडलंकेसी । बाहेर धांविन्नल्या राक्षसी ।
तंव देखिलें हनुमंतासी । तिंही चौपासीं वेढिलें ॥५८॥
हनुमंत बालब्रह्मचारी । पुरुर्षार्थ न करीच स्त्रियांवरी ।
तेणें तो बांधोनि खेचरीं । नेला भीतरीं पडलंके ॥५९॥
हनुमंत रुप धरी सामान्य । क्रौंचा देखे दीनवदन ।
लाविलें देखोनि  गळबंधन । वानर कोण कोणाचें ॥६०॥
तिंसी सांगती खेचरी । दणका उठिला उड्डाणेंकरीं ।
ते हा आणिला भक्ष झडकरीं । फळाहारीं तुम्हांसी ॥६१॥
करावया कपीचा घात । क्रौंचा शस्त्रासी घाली हात ।
तें देखोनि हनुमंत हांसत । माझा भक्षार्थ तुम्ही नेणां ॥६२॥
जडत्वे मांस नाहीं भीतरीं । म्हणोनि उडों झाडावरी ।
निष्काळजी निजशरीरीं । गिरीकंदरीं तेणें वसों ॥६३॥
रुधिरपूर्ण देहस्थिती । भेद करितां जिरेल क्षितीं ।
मग काय खाशील वो माती । ऐसी युक्ती न करावी ॥६४॥
मांस नाहीं मजभीतरीं । मरणभय नाही शरीरीं ।
देह लावावा परोपकारीं । सजळ्याचें करी भक्षण ॥६५॥
मज सगळें गिळिल्यावरी । चवी चाखिसी तोंडावरी ।
माझे निजपुष्टीची थोरी । क्षणामाझारी पावसी ॥६६॥
ऐकोनि हनुमंताची युक्ती । क्रौंचा सत्य मानी चित्तीं ।
सवेंचि गिळावया मारुती । वदनावृत्ती पसरली ॥६७॥
तिणें पसरितोंची जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी ।
आकळितां जिव्हालडबडी । तंव घाटीबुडी रिघाला ॥६८॥
न कळेचि जिव्हामूळीं । नाडळेचि दांतांतळी ।
वदन वाफु जाली होळी । चाटी अवाळी राक्षसी ॥६९॥
आंबट तिखट ना खारट । गोड अथवा तें तुरट ।
चवी न कळें पैं स्पष्ट । करी कटकट राक्षसी ॥७०॥
ऐसी सांगतां निजगोष्टी । कपि काळीज धरी मुष्टीं ।
तवं तियेसीं शूळ उठे पोटी । लोळे सृष्टीं गडबडां ॥७१॥
काळिज धरोनी मुष्टीसीं । वानर पाहे विस्मयेंसीं ।
बांधावया कोटिकुंजरांसी । देखे दोहीं कुशीं बहुवाडी ॥७२॥
जठराग्नीमाजि जाणा । पडिले पर्वत होती चुना
असो हे तिची विचारणा । कपिकथना अवधारा ॥७३॥

तिचें काळीज बाहेर काढून तिच्या पोटात पुच्छ खुपसून तिचा नाश :

काळिज धरितांचि रोकडें । क्रौचां लोळे गडबडें ।
सगळें गिळोनि केलें कुडें । अति वाबडें वानर ॥७४॥
वानर नाढळेचि दांतीं । परी जावोनि तें बैसलें पित्तीं ।
ओखद खावयाची उपपत्ती । केली आइती ते ऐका ॥७५॥
निंबाचीं शतानुशत झाडें । खसखसां रगडितसे दाढें ।
चुळोदकीं हनुमंत बुडें । तेणें तो उडे उदरांत ॥७६॥
उदरीं वानर उडतां । क्रौंचा पावे परम व्यथा ।
तिच्या करावया निजघाता । बुद्धि हनुमंता आठवली ॥७७॥
पुच्छ वाढवोनि वानरें । कंठी सूदलीं पुच्छाग्रें ।
तेणें ते खोकोनि गजरें । मग ओकारी सूटली ॥७८॥
पुढें देतां ओकारें । मागे अधोवात सरे ।
गांजूं आदरिलें वानरें । हागी ओकारें लागलें ॥७९॥
अधोवाताचे गजरीं । उडविल्या निशाचरी ।
त्या परिभ्रमाोनि अंबरीं । पडोनि सागरीं बुडाल्या ॥८०॥
आइजीचे अतिश्रद्धेनें । दुर्गंधे निर्बुजलीं घ्राणें ।
राक्षसी धाकती निजप्राणें । मागें राहणें धड नव्हे ॥८१॥
दीर्घ देतां पैं ओकारी । पुच्छ आलें मुखाभीतरी ।
क्रौंचा धरोनियां करीं । ओढी बाहेरी अति कष्टें ॥८२॥
ओढा ओढा गे झडकरीं । ओढिती दहा वीस नारी ।
तंव तें ओढेना तिळभरी । शतसहस्त्रीं ओढितां ॥८३॥
चवदा सहस्र राक्षसी श्रेष्ठ । ओढिताती अति उद्‌भट ।
तरी पुच्छाचा नव्हे शेवट । फुगलें पोट क्रौचेंचें ॥८४॥
पहिलें सामान्य दिसे वानर । उदरीं वाढलें अति थोर ।
न लभे पुच्छाचा परपार । येर शरीर कोण जाणें ॥८५॥
आइजींचे भाग्य थोर । वमनें उन्मळलें वानर ।
येरवीं करिंते हें संहार । ओढा समग्र समयोगें ॥८६॥
चवदा सहस्त्र निशाचरी । पुच्छ ओढिती बळें भारी ।
काळीज घेवोनियां करीं । निघे बाहरी हनुमंत ॥८७॥
काळीज उपडितां समूळीं । क्रौंचेनें दिधली आरोळी ।
आदळलिया भूतळीं । प्राण तत्काळीं सांडिला ॥८८॥
क्रौंचचें गजरें भारी । निधा उठिला गिरिकंदरीं ।
तेणें निकुंबळ थरारी । लंकेमाझारी भूकंप ॥८९॥
चवदा सहस्त्र निशाचरी । आकळोनि पुच्छेंकरी ।
झुगारिल्या पैं सागरीं । नेल्या जळचरीं भक्षार्थ ॥९०॥

पडलंकेच्या उड्डाणाला कालिका खंडाचा आधार :

हनुमंताचें पडलंके उड्डाण । हें काळिकाखडींचें निरूपण ।
श्रोतीं पाहोनि सावधान । वृथा भाषण न म्हणावें ॥९१॥
हे तंव रामायणी कथा । जरी मी बोलिलो वृथा ।
तरी तारक तत्वतां । याहीवरी श्रोतां क्षमा कीजे ॥९२॥

सर्व नगरीच्या नाशातून एक वृद्धा जिवंत राहिली :

पडलंकेच्या माझारीं । एक उरली वृद्धा नारी ।
येर मारिल्या समग्री । केली बोहरी हनुमंतें ॥९३॥
वृद्धेकडे हनुमंत । कृपादृष्टीं अवलोकित ।
पुसेन तो सांगे वृत्तांत । नाहीं तरी घात मी करीन ॥९४॥

तिच्याकडून माहिती घेऊन हनुमंताचे लंकेकडे गमन :

येथोनियां पुढारीं । लंका आहे किती दुरी ।
येरी म्हणे राहिली माघारी । पाहों पां हारी कळसांच्या ॥९५॥
परतोनि पाहे लंकापुरी । रावणमंदिराची थोरी ।
कनककळसांचिया हारी । माडिया गोपुरी रत्‍नांक ॥९६॥
कैसे शोभती रत्‍न कळस । तेजें लोपविती तरणीस ।
लंका देखोनि सावकाश । अति उल्लास हनुमंता ॥९७॥
शोधावया श्रीरामकांता । घरधांडोळी घेईन आतां ।
जाजावोनि लंकानाथा । करीन घाता राक्षसांचे ॥९८॥
मर्दोनि इंद्रजिताचा प्राण । त्यांसी करीन रणकंदन ।
रणीं मारीन राक्षसगण । सीतारत्‍न शोधावया ॥९९॥
ऐकोनि राक्षसीचें वचन । मागें देखोनि लंकाभुवन ।
करोनि उफराटे किराण । आला आपण लंकेसी ॥१००॥

रावणाचा विजयध्वज उपटून लंकेत फेकला :

रावणाचा विजयकेत । त्याचा पुच्छें केला घात ।
संमुख पाडिला लंकेआंत । तेणें आकांत राक्षसां ॥१०१॥
सहित शिखरें विजयकेत । पडिला देखे लंकेआंत ।
तेणें दचकला लंकानाथ । आला अनर्थ लंकेसीं ॥१०२॥
नाहीं वायूचा झडाडा । नाहीं मेघांचा गडाडा ।
शिखरें खचलीं कडाडां । भंगिला दृढ विजयकेतु ॥१०३॥
रावणें हरिली श्रीरामरमा । तेथूनि विजयो नाहीं आम्हां ।
राजा रातला अधर्मा । मरणधर्मा पावेल ॥१०४॥
ऐकोनि जनांचिया गोष्टी । उल्लास हनुमंताच्या पोटीं ।
पुच्छी बांधोनि शकुनगांठी । राक्षसकोटी मारावया ॥१०५॥
शोधावया सीतारत्‍न । स्वरुप धरी आनें आन ।
केसें कैसें करील चिन्ह । सावधान अवधारा ॥१०६॥
ससागरं दानवपन्नगायुतं बलेन विक्रम्य महोर्मिमालिनम् ।
निपत्य तीरे च महोदधेस्तदा । ददर्श लंकाममरावतीमिव ॥९॥
अति दुर्धर हनुमंत वीर । वाढलासे पर्वताकार ।
शोधावया सीता सुंदर । करी विचार निजमानसीं ॥१०७॥
साधावया रामकार्यार्था । स्थूळ रुपें न लभे सीता ।
शुद्धि न लभेचि तत्वतां । तरी कां वृथा कष्टावें ॥१०८॥
ऐसा करोनि विचार । जाला सामान्य वानर ।
कोठें गोचर कोठें अगोचर । सीतार्थ नगर शोधावया ॥१०९॥
माझा आत्मा श्रीरामचंद्र । हा हनुमंतीं  निजनिर्धार ।
तेणें जाणोनि विघ्नसंभार । हेला समुद्र लंधिला ॥११०॥
भंगोनि रावणविजयकेत । आला केतकीवनाआंत ।
सीता शोधावया हनुमंत । करी आकांत लंकेसीं ॥१११॥
करोनि पडलंकेची झाडी । आतां लंकेसीं आली धाडी ।
मारोनि राक्षसांच्या कोडी । सीता धडफुडी शोधीन ॥११२॥
सीतेचिया शुद्धीसांठीं । पुरवीन इंद्रजिताची पाठी ।
मारोनि राक्षसाच्या थाटी । सीता गोरटी शोधीन ॥११३॥
करितां सीतेच्या शुद्धीसी । रावणा गांजीन सभेसीं ।
क्षोभवोनि निजपुच्छासी । लंका चौपासीं जाळीन ॥११४॥
ऐसा हनुमंताचा आवांका । समूळ शोधावया लंका ।
जें जें विंदान करीन देखा । तें तें ऐका चरित्र ॥११५॥
रावणाच्या उपर्यांवरी । नारिकेळींचिया हारी ।
हनुमंत सामान्य रुप धरी । चढला त्यांवरी अति गुप्त ॥११६॥
तेथोनि पाहे लंकापुरी । जैसी अलकावती नगरी ।
ना ते अमरावती दुसरी । त्यांहूनि थोरी लंकेची ॥११७॥
त्रैलोक्यींचे वैभव । लंकेसीं आणिलें असे सर्व ।
अमरपुरी हूनि अपूर्व । दिसे गौरव लंकेचें ॥११८॥
ख्याति करोनि समुद्रांत । लंके आला हनुमंत ।
किष्किंधाकांडाचा अर्थ । जाला समाप्त श्रीरामें ॥११९॥
व्यर्थ वानिलें हनुमंता । जिव्हा झडे ऐंसे म्हणतां ।
श्रीरामबळें तो सपुरता । अणि पढियंता श्रीरामाचा ॥१२०॥
सीताशुद्धीचें कैवाड । सुंदरकांड अति गोड ।
हनुमंत ख्याति करील दृढ । सुखसुरवाड श्रोतियांसी ॥१२१॥
हनुमंताच्या बळबंडा । बाणपिसारा लावील भवंडा ।
तेणें श्रीरामभजनीं होवोनि गाढा । किष्किंधाकांडा संपविलें ॥१२२॥
सुग्रीवाच्या दुःखदुर्वाडा ।  छेदोनियां सप्त ताडां ।
ठेंचोनि वाळीचिया तोंडा । किष्किंधाकांडा संपविलें ॥१२३॥
सुग्रीवें सीताशुद्धीच्या कैवाडा । वानर धाडिले चहूंकडा ।
हनुमंते अर्थ साधोनि गाढा । किष्किंधाकांडा संपविलें ॥१२४॥
सीताशुद्धीचेनि केवाडा । वानरां मरण आलें रोकडां ।
संपाती सीता दावूनि पुढां । किष्किंधाकांडा संपविलें ॥१२५॥
सीताशुद्धीचिया चाडा । घेवोनि हेमा तापसीच्या झाडा ।
समुद्र लंघोनि रोकडां । किष्किंधाकांडा संपविले ॥१२६॥
समुद्र लंघावया पुढां । वानर पडिले सांकडां ।
हनुमान कैवारी धडफुडा । किष्किंधाकंडा संपविलें ॥१२७॥
संपविलें किष्किंधाकांड । पुढें सुंदरकांड अति गोड ।
पुरे श्रोतयांचे कोड । सरे चाड वक्त्याची ॥१२८॥
एकाजनार्दना रण । कथाकौतुक रामायण ।
श्रोतीं दिधले अवधान । ब्रह्म समाधान श्रवणार्थे ॥१२९॥
कथा ऐकतां सादर । निरसोनियां क्षराक्षर ।
श्रीराम पाविजे चिन्मात्र । कथा पवित्र रामायणी ॥१३०॥
रामकथेचें अक्षर । क्षराक्षरातीर पर ।
अवघी कथा सन्मत्र । चिदचिन्मात्र रामायण ॥१३१॥
एकाजनार्दना शरण । किष्किंधाकांड जालें संपूर्ण ।
पुढें गोड निरुपण । सावधान अवधारा ॥१३२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
हनुमंतलंकाप्रवेशो नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
॥ ओंव्या १३२ ॥ श्लोक ९ ॥ एवं १४१ ॥

किष्किंधाकांडं समाप्तम्
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *