भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा

तापसी-हनुमंत-संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सावध झाल्यावर त्या वानरांना सभोवती सुवर्णभुवन दिसते :

वानर होवोनि सावधान । पाहती तंव हेमभुवन ।
हेमशय्या हेमासन । उपरी आस्तरण हेमाचें ॥१॥
हेममय तेथींची क्षिती । हेममय अवघ्या भिंती ।
हेमदीपिका हेमदीप्ती । पात्रपंक्ती हेममय ॥२॥
हेमविमानें हेमांबरें । हेमबद्ध सरोवरें ।
हेममत्स्य हेमनगरें । जळचरें हेममय ॥३॥
मुक्ताफळें हेमरत्‍नें । हेमपदकें हेमभूषणें ।
हेममय उपकरणें । हेमाभरणें पशुपक्षी ॥४॥

ते विवर सर्व समृद्धीने निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण :

विवरीं धनधान्यसमृद्धी । विवरीं परमामृतनदी ।
विवरामांजि ऋद्धिसिद्धी । सुख त्रिशुद्धी वानरां ॥५॥
नसोनि रविचंद्रभास । विवरामाजी नित्य प्रकाश ।
तेणें वानरां अति उल्लास । पाहती वास वायपुत्राची ॥६॥
ऐसिये रमणीय स्थानीं हनुमंत पाहोनियां नयनीं ।
मनुष्यमात्र न दिसे नयनीं । सकळ भुवनीं शोधितां ॥७॥

त्या निर्जन प्रदेशात एका कुमारी तापसीचे दर्शन :

अपूर्व देखिलें मंदिरामाझारीं । चीरकृष्णाजिनधारी ।
तापसी बैसली एक कुमारी । तेजेंकरीं देदीप्यमान ॥८॥
तपःप्रताप आगळा । अंगीं तेजाचा उमाळा ।
तिसी देखतांचि डोळां । वानरपाळा शंकला ॥९॥

हनुमंताचा तिला प्रश्न :

तिचा शोधावया मुख्यार्थ । पुसता झाला हनुमंत ।
तूं कोण या भुवनाआंत । बिलवृतत्तांत मज सांगें ॥१०॥

आत्मनस्त्वनुभावाद्वा कस्य चेदं महब्दिलम् ।
अजानतां नः सर्वेषां सर्वमाख्यातुमर्हसि ॥१॥

तूं एकाकी स्त्री अबळा । तपःप्रभावें तेजःप्रबळा ।
कोणें निर्मिलें या बिळा । तुज या स्थळा केंवी प्राप्ति ॥११॥
विवरीं समृद्धि संपूर्ण । सुखरुप शोभे भुवन ।
येथील राजा सांग कोण । तेणें हें कां स्थान त्यजियेलें ॥१२॥
आश्रमासी आलों येथ । आम्ही तुझे अभ्यागत ।
पुसिला सांगोनि वृत्तांत । करीं स्वागत अतिथींचे ॥१३॥

एवमुक्ता हनुमंता तापसी धर्मचारिणी ।
प्रत्युवाच हनुमंतं सर्वभूतहिते रतम् ॥२॥
मयो नमा महातेजा मायावी दानवर्षभः ।
पुरा दानवमुख्यानां विश्वकर्मा बभूव सः ॥३॥
तेनेदं कांचनं सर्वं निर्मितं मायया वनम् ।
कथं चेदं बिलं दुर्गं युष्माभिरुपलक्षितम् ॥४॥

त्या गुप्त विवरात आल्याबद्दल तिला आश्चर्य :

ऐसें पुसतां हनुमंत । तापसी जाली अति विस्मित ।
हें विवर अति गुप्त । वानर येथ केंवी आले ॥१४॥
यक्षराक्षसां दुर्गम नित्य । देवदानवां विवर गुप्त ।
तुम्ही काय श्रीरामभक्त । तरीच येथें आलेती ॥१५॥

श्रीरामनामाचा प्रभाव :

श्रीरामनामाचा विश्वास ज्यांसी । नामीं आवडी अहर्निशीं ।
दुर्गमीं रिघ त्या भक्तांसी । निश्चयेंसी मी जाणें ॥१६॥
नाम आवडे मानसीं । स्मरण न करीच अति आळसी ।
वांझ गाय कपिला जैसी । जाण तैसी ते भक्ति ॥१७॥
श्रीरामनाम आवडे पोटीं । नामेंवीण टवाळ गोष्टी ।
तेही आवडी समूळ खोटी । नये शेवटीं उपयोगा ॥१८॥
मुलाम्याचीं नाणीं जैसीं । घातकी होतीं ज्याचीं त्यासी ।
दांभिक भक्ति जाण तैसी । साधकांसी अपघाती ॥१९॥
निजात्मप्रतीति कैंची त्यासी । भजन नुरे ज्यांचे त्यासी ।
विकल्प होळ पडिलें भक्तीसीं । लोंभे त्यासी नागविलें ॥२०॥
तुम्ही नेटाचे श्रीरामभक्त । विवरीं प्रवेशतां येथ ।
देहलोभें नित्यनिर्मुक्त । तुम्ही समस्त मज पूज्य ॥२१॥
जन्ममरणाची भयशारी । तुम्हीं घालोनि तोडरी ।
प्रवेशलेती या विवरीं । राम निर्धारीं भक्तांचा ॥२२॥
रामस्मरण अहर्निशीं । विघ्ने निर्विघ्न होती त्यासी ।
तो प्रताप तुम्हां वानरांसी । तुमची दासी मी आतां ॥२३॥
तुम्हां वानरां समस्तां । मुख्य भक्त तूं श्रीहनुमंता ।
श्रीरामभजनीं एकाग्रता । तुम्हां समस्तां तारक ॥२४॥

तपःसामर्थ्याने तिला हनुमंताविषयी ज्ञान व आदर :

म्यां जें केलें अनुष्ठान । तेणैं मज जालें ज्ञान ।
हनुमंताचे भक्तिसमान । नाहीं आन तिहीं लोकीं ॥२५॥
ऐसें बोलतां तापसी । प्रेम लोटलें तियेसी ।
लोटांगणीं हनुमंतासी । उकसाबुकसी स्फुंदत ॥२६॥
अग्निकापुरा होतां भेटी। विरोनि येरयेरांचे पोटीं ।
निरालंब उरे शेवटीं । तैसीच गोष्टी तेथे जाली ॥२७॥
निर्धारितां हनुमंतरुप । तापसी झाली अरुप ।
पाहतां तापसीचें रुप । सुखस्वरुप हनुमंत ॥२८॥
भक्तभेटीचें लक्षण । लक्षालक्षातीत गहन ।
मनीं मनें चैतन्य । समाधान येरयेरां ॥२९॥
म्यां तप केलें निष्काममतीं । त्या तपाची जाली फलप्राप्ती ।
भाग्यें भेटलासी मारुती । भवनिर्मुक्ती तारक ॥३०॥
श्रीरामभक्त ज्यांस भेटती । दर्शन स्पर्शन संवाद स्थिती ।
भावें भवभावनिर्मुक्ती । हेही प्रतीती मज आली ॥३१॥
ऐसें बोलोनि तत्वतां । हनुमंतचरणी ठेविला माथा ।
जें तवां पुसिलें हनुमंता । समूळ कथा सांगेन ॥३२॥

तापसीची साद्यंत कथा, हैमदानवनिर्मितीचे स्थळ :

मयदानव तेजोराशी । मायविंदान तयापासीं ।
दानवीं देखोनि लाघवासी । केलें त्यासी विश्वकर्मा ॥३३॥
दानवांची पुरें मंदिरें । कवचें यंत्रें शस्रांस्रं ।
हेमविमानें छत्रचामरें । अति विचित्रें निर्मिलीं ॥३४॥
मुक्ताफळें हिरे रत्‍नें । हेमभूषणें हेमोपकरणें ।
मायालाघवविंदानें । जें करणें तें मायिक ॥३५॥
मायालाघवी चपळ । निजवस्तीलागी प्रबळ ।
तेणें निर्मिलें हेमबिळ । अर्तक्य स्थळ अति गुप्त ॥३६॥
येथें नसतां रविचंद्रांसी । नित्य प्रकाश विवरासी ।
हें लाघव तयापासी । अतर्क्य कोणासी तर्केना ॥३७॥
हेमतरुतर स्वादफळीं । हेमसरोवर अमृतजळीं ।
हेमजळचर क्रीडती तळीं । हेमकमळीं सुगंध ॥३८॥
हेममंदीरें हेमभिंती । हेमभूमिका हेमक्षिती ।
मय मायिक मायावी स्थिती । जाण निश्चितीं कपिराजा ॥३९॥

स तु वर्षसहस्राणि तपस्तप्त्वा महावने ।
पितामहाद्वरं लेभे सर्वमौशनसं धनम ॥५॥
विधाय सर्वबलवान्सर्वकामेश्वरस्तदा ।
उवास सुखितः कालं किंचिदस्मिन्महाबिले ॥६॥

मयासुराचे तप, ब्रह्मदेवाजवळ मरणरहित अवस्थेची याचना :

तेणें मयासुरें येथ । बैसोनियां महावनांत ।
ब्रह्मा प्रसन्न केला तपोयुक्त । तपनेमार्थ साधोनि ॥४०॥
मय वरद मागे आपण । म्यां शत्रु मारावे संपूर्ण ।
मज न यावें मरण । ऐसें वरदान मज द्यावें ॥४१॥
ऐकोनि मयाचें वचन । ब्रह्मा झाला हास्यवदन ।
जन्मासवें नित्य मरण । वरदान केंवी लाभे ॥४२॥
निर्मरणवरु मागतां । हिरण्यकशिपु निजयोग्यता ।
सजीव निर्जीव नको म्हणतां । नखाग्रता निमाला ॥४३॥
मयासुरा तेचि कथा । मरण नको वर मागतां ।
यासी आली मरणावस्था । निर्मरणता केवीं लाभे ॥४४॥
देहाभिमानाचिये माथां । नित्य वसे मरणावस्था ।
अहंममता न सांडितां । निर्मरणता केंवी लाभे ॥४५॥
ऐक माझें वरदान । विवरीं असतां नये मरण ।
बाहेर निघतांचि जाण । वैरी प्राण घेतील ॥४६॥
वैरी आलिया विवरांत । तुझेनि हातें पावती घात ।
बाहेर निघतां निःशंकत । तेथींचा तेथ निमसील ॥४७॥
मयासुरा ऐक निश्चित । जो जाला विषयासक्त ।
त्यावरी करी काळ घात । सत्य वाक्यार्थ ब्रह्मवाणी ॥४८॥
विवरात मृत्यू येणार नाही असे त्याला वरदानः
ब्रह्मा वदे वरदार्थ । सवेंचि पडिला विचारांत ।
सुरवर लोभें निघतां येथ । विवरीं समस्त निमतील ॥४९॥
यालागीं सुरवरां अतर्कित । बिळद्वार केलें गुप्त ।
मयासुर होता नांदत । तोही मरणार्थ पावला ॥५०॥

विवर गुप्त ठेवून तेथूनच असुरांच्या हस्ते देवांवर जारणमारणाचे आभिचारिक प्रयोग :

तापसीस पुसे हनुमंत । मरण नये विवरांत ।
ऐसा ब्रह्मयाचा वरदार्थ । मयासुर मृत्यु कां पावला ॥५१॥
मयासुर बैसोनि विवराप्रती । जारण मारण इंद्रवधार्थी ।
दैत्यदानवांस सांगे युक्ती । मंत्रयंत्रोक्ति मोहका ॥५२॥
यालागी मयासुरवधार्थ । इंद्र साक्षेपें टपत ।
रिघों न पावे विवरांत । द्वारीं तिष्ठत सर्वदा ॥५३॥
बाहेर येणें नाही मयासी । इंद्र मारूं न शके त्यासीं ।
तो स्वयें पुसे ब्रह्मयासी । मय मरावयासी निजयुक्ति ॥५४॥
ब्रह्मा सांगे इंद्रापती । मयासी कामिनीकामप्रीती ।
बाहेर आणोनि प्रमदायुक्तीं । त्यासी तूं घातीं अमरेंद्रा ॥५५॥

तमप्सरसि हेमायां सक्तं दानवपुंगवम् ।
शनैर्निष्क्रांतमालोक्य निजधान पुरंदरः ॥७॥

ब्रह्मदेवाच्या सूचनेवरुन त्याच्या प्रलोभनासाठी हेमा अप्सरेची नेमणूक :

हेमा अप्सरी सुंदरी । माझी सखी निजनिर्धारीं ।
ब्रह्मयाने घातली विवरी । मयासुरा मरणार्थ ॥५६॥
कामिनीकामचा आल्हाद । शुंभनिशुंभ सुंदोपसुंद ।
पुरुष निमाले वििवध । मरण प्रसिद्ध स्रीकामें ॥५७॥
कामिनीकामाची आसक्ती । मागें निमाले नेणों किती ।
पुढें स्रीकामेंही मरती । अधोगती स्रीकामें ॥५८॥
हेमाप्सरी सुंदरी । येतां देखोनी विवरीं ।
मयासुर पडिला फेरीं । भाग्यें करीं आलीसी ॥५९॥
हेमाकामिनीं काम गहन । दोघीं केलें मद्यपान ।
करीत गायन नर्तन । बाहेरी आगमन दोघांचे ॥६०॥

तिच्याबरोबर बाहेर आल्यावर इंद्राचा त्याच्यावर वज्राघात :

कामिनिकामें नृत्यगीतस्वरीं । तीसवें आला विवराबाहेरी ।
इंद्रें साधूनियां वैरी । वज्रेंकरी मारिला ॥६१॥

ब्रह्मदेवाने सुवर्णमय भुवन तिला दिले :

मय मायिक हेममंडन । ब्रह्मा होवोनि प्रसन्न ।
हेममय करोनि भुवन । दिधलें स्थान हेमेसी ॥६२॥

इदं च ब्रह्मणा दत्तं हेमायै वनमुत्तमम् ।
शाश्वतः कामभोगश्च गृहं चेदं हिरण्ययम् ॥८॥
दुहिता मेरुसावर्णेरहं तस्याः स्वयंप्रभा ।
मम प्रियसखी हेमा नृत्यगीतविशारदा ॥९॥
तया दत्तवरं चेदं रक्षामि भवनं महत् ॥१०॥

ब्रह्मा होवोनि सुप्रसन्न । हेमेसी हेममय भुवन ।
स्वयें दिधलें संतोषोन । आणि स्थान अति दुर्गम ॥६३॥

सुवर्णमनूची स्वयंप्रभा नावाची कन्या :

सुवर्णमनूची मी दुहिता । स्वयंप्रभा नामांकिता ।
हेमा सखी माझी आप्तता । एकात्मता दोहींसी ॥६४॥
तेचि काळीं म्यां आपण । ब्रह्मयासी मागितलें वरदान ।
द्यावें निष्काम अनुष्ठान । मुक्तत्व पूर्ण मज द्यावें ॥६५॥

ब्रह्मदेवाच्या कृपेनें निष्काम अनुष्ठानाचे तिला वरदान :

ऐकोनि माझी विनंती । संतोषला प्रजापती ।
आवडीं मानोनी वचनोक्ती । अति प्रीतीं स्वयें वदला ॥६६॥
धन्य निष्कामाचें वदन । धन्य निष्कामाचें वचन ।
धन्य निष्कामआगमन । जग पावन  निष्कामें ॥६७॥
निष्कामाचे मज कौतुक । निष्कामाचें मज सुख ।
देखोनि निष्कामांचें मुख । परम हरिख हरिहरां ॥६८॥
ये विवरीं हरिहर स्थान । पावसी निष्काम अनुष्ठान ।
स्वयंप्रभे सत्य जाण । हें वरदान तुज माझें ॥६९॥

श्रीरामभक्तांशिवाय दुसरे येथे कोणीही येणार नाही अशी वरप्राप्ती :

आणिका रीघ नव्हे येथ । विवरां येती श्रीरामभक्त ।
त्यांचें केलिया आतिथ्य । नित्यमुक्त त्यांचेनि ॥७०॥
हरिदासदर्शनस्पर्शन । अभिनंदन संभाषण ।
आतिथ्य करितां संपूर्ण । मुक्तपण निजवंद्य ॥७१॥
हरिदासांची संगती । भाग्येंवीण नव्हे प्राप्ती ।
हरिदासांची सद्‌भक्ती । नित्यमुक्ती स्वभावें ॥७२॥
ऐसें मज देवोनि वरदान । अदृश्य जाला चतुरानन ।
हेमा माझी सखी जाण । तिचें हें भुवन ब्रह्मदत्त ॥७३॥
हेमा सकाम कामसक्ती । येथें नाहीं पुरुषप्राप्ती ।
मज ठेवोनि रक्षणार्थी । स्वर्गाप्रती ते गेली ॥७४॥
ब्रह्मवाणी सत्यभूत । ते हे तुम्ही श्रीरामभक्त ।
माझेनि भाग्यें आलेती येथ । मज निर्मुक्त करावया ॥७५॥
ऐसें बोलोनियां जाण । तापसी घाली लोटांगण ।
वंदोनि हनुमंताचे चरण । काय आपण विनवित ॥७६॥
क्षुधें पीडिले वानर । वनीं रिघोनि समग्र ।
फळं भक्षावीं मधुर । प्राशावें नीर स्वादिष्ठ ॥७७॥

अर्थी चास्मि प्रयच्छार्थं रणधर्ममनुत्तमम् ।
प्रीयमाणा निराहारान्संजीवय तपोधने ॥११॥

भुकेल्या वानरांसाठी आहाराची याचना :

ऐकोनि तापसीचें वचन । हनुमंत बोले आपण ।
भुकें वानरांचे जाती प्राण । वृक्षारोहण न करवे ॥७८॥
वानर असते सावधान । मघांची विध्वंसिते वन ।
तुज पुसावया राहतें कोण । क्षुधेनें क्षीणबळशक्ति ॥७९॥
वानरांची शक्ती क्षीण । वृक्षीं न करवे उड्डाण ।
आणोनि द्यावें आपण । वांचवीं प्राण क्षुधितांचे ॥८०॥

अभिगम्योत्तमं दानं दानमाहूय मध्यमम् ।
याच्यमानं तु अधमं सेवादानं ततोऽधमम् ॥१२॥

दानचे प्रकार, स्वयंदान अत्युतम :

आणून देणें जें आपण । हें दानामाजी उत्तम दान ।
जें द्यावें घरा पाचारुन । मध्यम दान त्या नांव ॥८१॥
वेळोवेळां काकुळती । येवोनि याचक मागती ।
ऐसें देणें तयांप्रती । दानस्थिति ते निंद्य ॥८२॥
वसवसुन देती अन्न । एक देती निर्भर्त्सून ।
तें तें अधमाधम दान । पात्रा निंदोन जे दे ॥८३॥
सेवा घेवोनि आपण । द्विजांसी देती जें दान ।
दान नव्हे ते मजुरी जाण । दातृत्व पूर्ण अधमाधम ॥८४।
यालागीं स्वधर्मक्षण । करावया स्वयंप्रभे जाण ।
आततांसी फळें अर्पून । वांचवीं प्राण वानरांचे ॥८५॥

साधोस्तस्य वचः श्रुत्वा तापसी ब्रह्मचारिणी ।
आदाय फलमूलानि विधिनोपाहस्तदा ॥१३॥
भक्षयित्वा च ते सर्व पीत्वा च विमलं जलम् ।
प्रसन्नवदनाः सर्वे सर्वे संतुष्टमानसाः ॥१४॥
सर्वेऽपि बलवीर्याढ्यास्तत्रासन्हरियूथपाः ।
अपश्यन्सर्व एवैते दिशो वानरपुंगवाः ॥१५॥

तापसीने स्वतः फळे आणून वानरांना दिली :

ऐकोनि हनुमंताचे वचन । तापसी फळें आणूनि पूर्ण ।
करोनि विधियुक्त पूजन । दिधलें भोजन तें ऐका ॥८६॥
पृथु चक्रवर्ती आपण । जैसें करी भगवत्पूजन ।
तेंवी हनमंतासि वानरगण । पूजी संपूर्ण उल्लासें ॥८७॥
जया जैसें आवडे फळ । जया जैसें आवडे मूळ ।
तया तैसें अर्पूनि जळ । सुपरिमळ शिखरणी ॥८८॥
वानरां हेमाचीं ताटें । फळें ओगरिली चोखटें ।
नाना  रसीं भरिले वाटे । अपूर्ण कोठें पडो नेदी ॥८९॥
आम्ररसें मधुरसें । अमृतरसें सुरस रसें ।
वानरां पीडिलें मासोपवासें । अति उल्लासें भक्षिती ॥९०॥

फळाचें अंतर्दृष्टीने वर्णन :

एके विडुळलीं सकाम वातें । एके हिरवीं करकरितें ।
एकें बहुबीजें बुचबुचितें । एकें कचकचित अर्धकाचीं ॥९१॥
एकें जडजाड्यें जारठली । एकें सकाम लोभें सारटलीं ।
विकल्पमुरडें मुरकुटलीं । झडोन पडलीं अमार्गीच ॥९२॥
एकें अभावववातें झडली । वनिताकुचकर्दमीं पडलीं ।
सवेंचि तेथोनि गडबडलीं । ती बुडालीं अंधतमीं ॥९३॥
एकें विवादकर्मठें । विधिनिषेधअतिअंबटें ।
एके तपस्तेजें तिखटें । एकें तिरटें मतमुद्रा ॥९४॥
एकें वरिवरी बरवंटें । आंत द्विजद्वेषाचें कांटे ।
एकें दिसताती चोखटे । अति कडवटें परनिंदा ॥९५॥
एकें भेदवादें खणुवालीं । सभेदाच्या बुचबुचित आळीं ।
त्यांसी न सेविती काउळी । पडिल्या धुळीतें मिळती ॥९६॥
गारठेलीं फळें अशांत । पडोनि फुटलीं जेथींची तेथ ।
वानर त्यांसी न लाविती हात । दुर्गंधि ते अति दुष्ट ॥९७॥
एक समेळ फळांचे घड गाढे । आदळले पाखाडियापुढें ।
फुटोनि होती पैं तुकडें । पडती किडे सुळसुळती ॥९८॥
एकें संज्ञानतेचिया शिखरीं । पडोनि जालीं काचरीं ।
त्यांसी न सेविजे वानरीं । झडपिती घारी गर्वाच्या ॥९९॥
वनिता हातींहूनि निसटलीं । अहमंमतादेठींहूनि सुटलीं ।
संकल्पविकल्पें तुटलीं । फळें आलीं परिपाका ॥१००॥
नित्य निर्विकारें पाडा आलीं । शांतिसेजे स्वयें मुरालीं ।
जी नैराश्यें मघमघिलीं । फळें सेविलीं वानरीं ॥१०१॥
शांत दांत अरुवारलीं । आंत बीज न बाहेरी साली ।
सुखस्वरुपें साकारिलीं । फळें सेविलीं वानरीं ॥१०२॥
निजात्मबोधे मघमधित । नित्य नैराश्यें रस गळत ।
जेथें हंस शुक झेंपावत । तीं फळें भक्षित वानर ॥१०३॥
अहंकोहं सोहंविहीन । ब्रह्मी ब्रह्मत्वही लीन ।
सांडोनियां मीतूंपण । फळें परिपूर्ण सेविती ॥१०४॥
बहुकाळाचे बुभुक्षित । केले परिपूर्ण नित्य तृप्त ।
बाप कृपाळु श्रीरघुनाथ । संकटीं भक्त वांचविले ॥१०५॥
संकट बाधू जाती भक्त । संकटीं निकट श्रीरघुनाथ ।
द्वंद तेथें निर्द्वद्व होत । भक्त निर्मुक्त श्रीरामें ॥१०६॥
ऐसिया पूर्णत्वाचे सिद्धीं । वानरां जाली पारणाविधी ।
श्रीराम कृपाळु द्वंद्वबाधी । भक्त त्रिशुद्धीक वांचविले ॥१०७॥
ग्रंथीं बोलतों त्रिशुद्धी । त्रिशुद्धीची कवण विधी ।
सद्‌गुरुवीण नव्हे सिद्धीं । सावध बुद्धी अवधारा ॥१०८॥
शब्द निःशब्द शब्दशुद्धी । आशा निराशा मनःबुद्धी ।
देहीं विदेहत्व देहशुद्धी । जाणा त्रिशुद्धी पावन ॥१०९॥
ऐशिया त्रिशुद्धीं वानर । पावोनि तृप्त अभयंकर ।
देती स्वानंदे उद्‌गार । तेणें अंबर गर्जत ॥११०॥

वानरांची तृप्ती :

फळें खाती गटागटां । मिटक्या देती मटमटां ।
लाळ येतसे नीळकंठा । भक्तवाटा सेवावया ॥१११॥
वांकुल्या दाविती सुरवरां । वांकुल्या दाविती ऋषीश्वरां ।
फळें सेवितां वानरां । दुःखा दुस्तरा मुकले ॥११२॥
वानर भोजनसमाजें । मिटक्या देतां अंबर गाजे।
तापसी धाडिली श्रीरघुराजें । कपिसमाजा वांचवावया ॥११३॥
संरक्षावया निजभक्तांसी । श्रीरामें निर्मिली विवरासी ।
श्रीरामें धाडिली तापसी । वानरांसी वांचवावया ॥११४॥

बुभुक्षितांना अन्नदान, सर्व दानाहून श्रेष्ठ :

बुभुक्षितांसी तृप्तिभोजन । तेणें सुखी श्रीभगवान ।
तापसीचें भाग्य गहन । श्रीरामजन सुखी केलें ॥११५॥
दुष्काळींचें द्विजभोजन । राजसुर्ययागाहूनि गहन ।
अश्वमेधादिक रज्ञ । मशक होय त्यापुढें ॥११६॥
बुभुक्षितां दिधलें अन्न । सुखी केले दीपजन ।
तेणें सुखावे श्रीभगवान । यज्ञादि पुण्य तें मशक ॥११७॥
तापसीचें भाग्य गहन । फळें आणोनि संपूर्ण ।
वानरां देतांचि भोजन । सावधान ते जाले ॥११८॥
विधिनोपाहरत्तदा । याचि धरोनि श्र्लोकाच्या पदा ।
वानरजनसंपदा । ग्रंथानुवादा मी वदलों ॥११९॥
व्यर्थ वाढविले ग्रंध्रा । ऐंसे न म्हणावें श्रोतां ।
मुनीच्या धरोनि पदार्था । ग्रंथी ग्रंथता राम वदवी ॥१२०॥
नेणें वेदशास्त्रश्रवण । माजे अंगीं मूर्खपण ।
माझें हिरोनि मीपण । राम रामायण स्वयें वदवी ॥१२१॥
श्रोते म्हणती नवलावो । वानरभोजनअभिप्रावो ।
शुद्ध साधूनी भक्तिसद्‌भावो । ब्रह्मान्वयो स्थापिला ॥१२२॥
आधींच रम्य रामायण । वरीं हें रसाळ निरुपण ।
कथा नव्हे ब्रह्म पूर्ण । सुखी पूर्णं आम्हां केलें ॥१२३॥
ऐकोनि श्रोतियांचे वचन । एकाजनार्दनी लोटांगण ।
जें देखाल माझें न्यून । तें तें संपूर्ण तुम्हीं कीजे ॥१२४॥
श्रोते म्हणती नवल आंता । स्वयें श्रीराम वदनीं वक्तां ।
रामें रम्य रामकथा । न्यूनपूर्णता असेना ॥१२५॥
एकाजनार्दना प्रबोधी । वानरा जालीं पारणाविधी ।
पुढें लाभेल सीताशुद्धी शोधनविधी अवधारा ॥१२६॥
स्वति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
तापसीहनुमंतसंवादो नाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
॥ ओंव्या १२६ ॥ श्लोक १५ ॥ एवं १४१ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय पंधरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *