भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा

लंकादहन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दाढी – मिशा जळाल्यामुळे रावणाची उडालेली धांदल :

पुच्छाग्नि फुंकितां रावण । भडक्यानें उठला हुताशन ।
हनुमंत पित्यासी सांगे आपण । करीं अपमान रावणा ॥ १ ॥
एकोनि पुत्राचें वचन । वायु वन्हि प्रज्वळून ।
रावणाचें मुख पोळून । केलें दहन खांडमिशां ॥ २ ॥
अपमानला दशानन । ओष्ठ पोळले दारूण ।
शंख करूं न शके रावण । टिरी पिटोन आक्रंदें ॥ ३ ॥
उफराटें शंखस्फुरण । गुद त्राहाटोनि करी रावण ।
प्रथम पावला अपमान । पुच्छदहन भलें नव्हे ॥ ४ ॥
रावणा विचारी विवेकमार्गी । आम्हीं पुच्छासीं लाविली आगी ।
तें हित आम्हांलागीं । वानर सर्वांगीं निःशंक ॥ ५ ॥
छळोनि जाळितां कपीसी । छळण न चले रामभक्तांसीं ।
छळितां जाळिलें माझ्या मुखासी । दाढ्यामिशांसी दहानानें ॥ ६ ॥
दीप्तपुच्छ हनुमंत । शोभे जैसा बाळादित्य ।
पुच्छतेज तें किरणावर्त । निशाचरांत कपिपुच्छ ॥ ७ ॥
उगवल्या कपिदिनकर । अस्त पावती निशाचर ।
रावणा निर्दळी अंधार । घेवोनि समग्र गर्वरात्रीं ॥ ८ ॥

पाशातून मारूतीची सुटका :

उड्डाण देतां वानरास । छेदिले रज्जुपाश द्रुमपाश ।
निर्दळोनि ब्रह्मपाश । नामें भवपाश छेदिले ॥ ९ ॥
रामनामाच्या आवर्तीं । सप्तपाशांसी निवृत्ती ।
पावोनियां स्वयें मारूती । गर्जे त्रिजगतीं स्वानंदें ॥ १० ॥
काळपाश कर्मपाश । जन्मपाश ब्रह्मपाश ।
मायापाश मोहपाश । जन्मपाश सातवा ॥ ११ ॥
काळपाश तो आयुष्यघात । कर्मपाश तो अनैश्वर्यवंत ।
धर्मपाश तो आश्रमागत । वेदविहितार्थ ब्रह्मपाश ॥ १२ ॥
देहममता तो मोहपाश । मुख्य माया तो आशापाश ।
कनककांता हा जन्मपाश । सप्तपाशीं जीव बद्ध ॥ १३ ॥
सप्तपाशांची निवृत्ती । रामें करी मारूती ।
येरांच्या न चलती युक्ती । पडे गुंती देहपाशीं ॥ १४ ॥
आठवा पाश तो वितंड । त्याचे पोटीं पाश उदंड ।
त्याचें नाम पापंड । काळें तोंड कर्त्याचें ॥ १५ ॥
सकळ पाशांचे छेदन । करावयां रामनाम प्रवीण ।
नामें हनुमंत संपन्न । पाशछेदन केलें तेणे ॥ १६ ॥
पुच्छीं धडाडितां वन्ही । हनुमंत लोळे गडबडोनी ।
पाशधर गेले पळोनि । धकधकोनी अपधाकें ॥ १७ ॥
जंव जंव पुच्छ धडाडित । तंव तंव पळे हनुमंत ।
द्वंद्वनिरासीं साह्य रघुनाथ । नित्य निजभक्तसाहाकारी ॥ १८ ॥
द्वंद्वनिरासीं वाडेंकोडें । सूक्ष्मस्वरूप निजनिवाडें ।
श्रीरामभक्तां मागेंपुढें । चहूंकडे कोंदाटे ॥ १९ ॥
ऐसा साह्य श्रीरघुनाथ । द्वंद्वबाधा कैंची तेथ ।
द्वंद्व तें सुखरूप होत । द्वंद्वनिर्मुक्त हनुमंत ॥ २० ॥
पुच्छीं धडाडी हुताश । हनुमंतासी अति संतोष ।
पुच्छीं बांधिलां अमृतांश । ऐसा उल्लास वानरा ॥ २१ ॥
पुच्छीं पेटला वैश्वानर । खेंवा आला शरच्चंद्र ।
ऐसा उल्लासे कपींद्र । रामचंद्र निजसाह्य ॥ २२ ॥
रामनामाची नवलगोष्टी । द्वंद्वाचिये पाठी पोटीं ।
राम चिद्रूप दावी दृष्टी । निर्द्वंद्व सृष्टी रामनामें ॥ २३ ॥
रामनामापरतें । साधन नाहीं सरतें ।
अग्नि बांधू न शके मातें । कृपा रघुनाथें मज केली ॥ २४ ॥

मारूतीचा आवाका :

पुढील कथेचा कथितार्थ । जंव जव पुच्छ धडाडित ।
तंव तंव हनुमान तळमळित । राक्षस शांत करावया ॥ २५ ॥
नेत्रीं लाविली अर्धचंद्रीं । खरसी आणिली मुखांतरीं ।
पुच्छ पसरोनि धरेवरी । मरणानुकारी निचेष्ट ॥ २६ ॥

तो मेला असे समजून राक्षसांची प्रतिक्रिया :

राक्षस योवोनि समस्त । त्यातें हालवोनि पहात ।
तंव तो न हालवी पाय हात । वानरें दांत विचकिले ॥ २७ ॥
एक उलथे पालथें करिती । एक उफराटें धरिती ।
तंव पुच्छाग्नीनें पोळती । मग पळती माघारे ॥ २८ ॥
एक ढुंगीं घालिती काड्या । एक हाणिती फडफडां ।
वानरू निःशंक गाढा । दांत दाढा हालवीना ॥ २९ ॥
मास करोनि अति निगुतीं । हालों नेदी पातया पातीं ।
म्हणती निमाला मारूती । करोनि ख्याती रणमारें ॥ ३० ॥
वानरा वीर जगजेठी । मारिल्या राक्षसांच्या कोटी ।
इंद्रजित रावणा धुकधुक मोठी । अवघ्यांचे पोटीं अति धाक ॥ ३१ ॥
जरी हा मरण न पावता । करिता अवघ्यांचे घाता ।
गाढी बुद्धि लंकानाथा । छळे हनुमंता मारिलें ॥ ३२ ॥
आमुचे दळीं इंद्रजित बळी । त्याची केली रणरांगोळी ।
वीर मारिले आतुर्बळी । कोशण त्यासवें फळी घेवों शके ॥ ३३ ॥
रावणासीं नाहीं बळ । परी करूं जाणें सव्यें छळ ।
पेटवोनियां लांगूळ । गोळांगूळ मारिला ॥ ३४ ॥
सत्यवादी वानर पूर्ण । पाळोनि श्रीरामाची आण ।
सांगोनियां निजमरण । आपणा आपण मारविलें ॥ ३५ ॥
वैद्य पाहती विचक्षण । म्हणती ह्रदयीं आहे प्राण ।
तोही अतिशयेंसी क्षीण । क्षणार्धे पूर्ण निमेल ॥ ३६ ॥
हनुमंत निमाला ऐकोनि वाणी । धावो घातला निशाणीं ।
इंद्रजित हर्षला मनीं । रावणें शेरणी वांटिली ॥ ३७ ॥
राक्षसी सांगती सीतेपासीं । तुवां संवाद केला ज्या कपीसीं ।
आगी लावोनि त्याचे पुच्छासीं । रावणें त्यासी मारिलें ॥ ३८ ॥

सीतेचा अविश्वास, मारूती मरणे अशक्य :

मारिलें ऐकोनि कपीसी । सीता जाहली कासाविसी ।
जठराग्नि आणोनि ध्यानासीं । स्वयें त्यासी प्रार्थिंत ॥ ३९ ॥
जरी मज श्रीरामाची गुरूभक्ती । श्रीरामसेवा तप : संपत्ती ।
श्रीरामभक्ती जरी हनुमंती । तरी मारूती वांचवी ॥ ४० ॥
ऐकोनि सीतेचें वचन । अग्नि घाली लोटांगण ।
वाहतों श्रीरामाची आण । नाहीं मरण हनुमंता ॥ ४१ ॥
ऐकें हनुमंताची प्रौढी । लंका जाळील रोकडी ।
मारील राक्षसांच्या कोडी । जाळिली दाढी रावणाची ॥ ४२ ॥
रावणाचा अपमान । हनुमान करी पुरदहन ।
ऐसें ऐकोनियां वचन । सुखसंपन्न जानकी ॥ ४३ ॥

जळत्या शेपटीने उडवलेला अनर्थ व हाहाःकार :

हनुमंत निमाला निःशेख । पाहों आले अवघे लोक ।
त्याचें पहावया मुख । एक एक दाटले ॥ ४४ ॥
मिळवावया राक्षसमंदी । मीस घेतलें निजबुद्धीं ।
अवघियां वधावया त्रिशुद्धी । पेटले द्वंद्वीं तें ऐका ॥ ४५ ॥
दाटलिया राक्षसांच्या हारी । जळत पुच्छ घाली त्यांवरी ।
तंव ते पोळती उरीं शिरीं । आली महामारी राक्षसां ॥ ४६ ॥
पळों जातां पैं बाहेरी । जळत पुच्छ लावी द्वारीं ।
अवघ्यां केली कोंडमारी । निशाचरी आकांत ॥ ४७ ॥
घुसघुसऊ बाबरझोंटी । लोंबलिया राक्षसपृष्टीं ।
पुच्छ तयांमाजी दाटी । बोंब उठी देहदाहें ॥ ४८ ॥
एकाच्या वस्त्रा लाविली आगी । तेणेंचि जळती सर्वांगीं ।
पुच्छ घाली एकाचे ढुंगीं । नेसण्या आही लावी एका ॥ ४९ ॥
एकाचीं मुंडासीं जळत । फेडूं जातां पोळले हात ।
एकाचे झगे जळत । एकाचें जळत कटिबंध ॥ ५० ॥
आगी लागली धोत्रासी । द्विज पोळले लिंगप्रदेशी ।
नागवे नाचती रावणापासीं । दाविती त्यासी निजलिंग ॥ ५१ ॥
रावणा तेथें लावीं हात । कांहीं तरी व्यथा होईल शांत ।
वेदविभागी तू पुण्यवंत । पद्महस्त पैं तुझा ॥ ५२ ॥
कन्यासंक्रांती दुष्कर्म । करूं नये श्मश्रुकर्म ।
शष्पें वाढलीं पैं परम । कोपामुक्रम न करावा ॥ ५३ ॥
हनुमान मारिला राजद्वारीं । निशाणें त्राहाटिल्या भेरी ।
जळो जळो रावणा तुझी थोरी । जोहारमारी त्वां केली ॥ ५४ ॥
लंका नागविली वस्त्रासाठीं । तेलातुपा पाडिली तुटी ।
दीप लावणें खुंटली गोष्टी । शिखीं जीवा आटी मांडिली ॥ ५५ ॥
रावण म्हणे गा हनुमंता । लोकां जाळिसी कवण्या अर्था ।
सावध ऐकें लंकानाथा । तुज तत्वतां सांगेन ॥ ५६ ॥
पुच्छासीं मरण आलें निश्चित । मरणभयें झडा देत ।
भेणे लोकामाजि दडत । त्यासी म्यां येथ काय कीजे ॥ ५७ ॥
एकाचे चरण धरित । एकाचें पाठीं रिघत ।
एकाचे पालवा झोंबत । मरणभयांतें चुकवावया ॥ ५८ ॥
एकासी होतें शरणागत । एकासी गळां पडत ।
विनवोनियां लंकानाथ । मरणमुक्त करा म्हणे ॥ ५९ ॥
उरीं शिरीं जाळी सर्वांसी । या नांव तूं शरण म्हणसी ।
भली बुद्धि तुज हनुमंतासी । राक्षसांसी मारावया ॥ ६० ॥
पुच्छ खवळलिया येथ । रावणा चुकलासी निश्चित ।
तो ही सांगेन गुह्यार्थ । सावचित्त अवधारीं ॥ ६१ ॥
पुच्छ उघडें पडल्या तिळभरी । मरण नये पुच्छावरी ।
करील लंकेची बोहरी । महामारी राक्षसां ॥ ६२ ॥
पूर्वीं म्या सांगितलें होतें । तुवां उपेक्षोनियां त्यातें ।
न सांभाळितां पुच्छातें । अग्नि तेथे लाविला ॥ ६३ ॥
पुच्छ तीं ठायी उघडें होते । तेणें मरण न येचि त्यांतें ।
परतलें अग्निक्षोभार्थें । त्रिविधघातें घातावया ॥ ६४ ॥
राक्षस मारील महाबळी । करील लंकेची होळी ।
बुजोनि खंदकाची पाळी । पाडील पौळी दुर्गाची ॥ ६५ ॥
पुच्छ क्षोभलें अति क्षोभकता । माझेनि निवारेना आतां ।
सत्य जाण गा लंकानाथा । करील घाता लंकेशा ॥ ६६ ॥
जरी असेल आंगवण । तरी पुच्छासी करावें रण ।
माझेनि निवारेना जाण । क्षोभले पूर्ण कपिपुच्छ ॥ ६७ ॥
ऐसें बोलतां हनुमंता । जळत पुच्छ राक्षसमाथां ।
वाजलें पैं अति निघाता । वीरविघाता मांडिलें ॥ ६८ ॥
पुच्छाभिघात महाबळी । सवेंचि अग्नि सर्वांगें जाळी ।
राक्षसां मांडली महाहोळी । करील रांगोळी महावीरा ॥ ६९ ॥
रावणापासीं हनुमंत । निःशंक बैसला सावचित्त ।
पुच्छें मांडिला आकांत । अग्निसंताप राक्षसां ॥ ७० ॥
राक्षससैन्यमाझारीं । बोंब सुटली एकसरीं ।
अग्नि पोळीत उरीं शिरीं । पुच्छ महामारीं मारित ॥ ७१ ॥
मिळोनि महावीर समस्त । मारावया हनुमंत ।
धांविन्नले शतसहस्त्र । जेंवी कां मत्त मातंग ॥ ७२ ॥
वीर करूं येतां घात । हनुमंत स्वानंदे नाचत ।
उड्डाण करोनि अद्‌भुत । मग गर्जन भुभुःकारें ॥ ७३ ॥
जैंसे गिरिशिखराकार । तैंसे राजगृहाचें पूर्वद्वार ।
तेथे बैसला वानर । निशाचर लक्षोनी ॥ ७४ ॥
पूर्वद्वारीं अर्गळा होती । तीस घेवोनियां हातीं ।
रणीं मिसळला मारूती । राक्षसां शांती करीतचि ॥ ७५ ॥
पुच्छ महावीरांते जाळी । हनुमान मारी आतुर्बळी ।
राक्षसांची रणरांगोळी । केली तत्काळीं वानरें ॥ ७६ ॥
हनुमान निमाला म्हणोनी । निशाणघायीं वाटली शरणीं ।
तोचि उठिला राक्षसनिर्दळणीं । महापळणीं मांडली ॥ ७७ ॥
पळावया पैं पुरती । सवडी नाहीं यथारिती ।
लंका पेटली दहनावर्तीं । द्वंद्वा मारूती पेटला ॥ ७८ ॥
पुच्छ म्हणिजे अग्निकल्लोळ । लंकापौळी जाळी सकळ ।
राक्षस करिती तळमळ । न चले बळ पुच्छासीं ॥ ७९ ॥
रावण अन्यायी परोपरी । वस्त्रे गविलीं नगरीं ।
तेलातुपा करोनि बोहरी । पुच्छ वानरी पेटविलें ॥ ८० ॥
पुच्छ पेटविलें मारायासी । तेंचि हत्यार जाहलें त्यासी ।
जाळों लागलें लंकेसी । राक्षसांसी देहदाहो ॥ ८१ ॥
हनुमान विचारी निजमानसीं । अग्नि लागला माझें कांसेसीं ।
परमातिथ्य करूं यासीं । देऊं भक्षावयासी गृहें उत्तम ॥ ८२ ॥
विचारितां मूळानुवादु । वेदानुवादें सखें बंधु ।
दोहींचा वायु पिता प्रसिद्धु । परम सुह्रदु आप्तत्वें ॥ ८३ ॥
सखा बंधु साचोकारें । तृप्ती देऊं परमादरें ।
रत्‍नखचित माडिया गोपुरें । हेममंदिरें मणियुक्त ॥ ८४ ॥
ज्येष्ठ बंधु अति वरिष्ठ । भोजनीं लंकाभुवन ताट ।
राजमंदिरें परम श्रेष्ठ । भक्ष्य चोखट तें एका ॥ ८५ ॥
श्वेत पीत क्षौमांबरें । प्रथम भोजनीं क्षीरसाकरें ।
मणिमुक्तहारसंभारें । घृताभिघारें शोभती ॥ ८६ ॥
चंदनमंदिरें तें ओदन । उपस्कर तें वरान्न ।
पताका खडखडिती जाण । कथिका पूर्ण फुरफुरित ॥ ८७ ॥
तिळतंडुळकणांचे राशी । घृतशर्करा प्राणाहुतींसीं ।
नगरगृहें ग्रासोग्रासीं । पूर्ण तृप्तीसीं भक्षावया ॥ ८८ ॥
जे जे आवडेल गोडी । ते ते पुरवीन रोकडी ।
घरोघरींच्या उतरंडी । स्वेच्छा परवडी सेवावी ॥ ८९ ॥
जे जे गृहीं गृहसामुग्रीं । ते ते लोणची कोशिंबिरी ।
तिखट शस्त्रें रायतीं खरीं । कवाडें करी पापड ॥ ९० ॥
विचित्र पडदे आणि वितानें । नानाकुसरींची वरासनें ।
तींचि परवडी पक्वान्नें । चांदवें ते चाकुळिया ॥ ९१ ॥
बांधलें बोचकें लाडूभक्षण । स्त्रियांची पोतीं तिळवे जाण ।
पर्यंक आणि परिस्तरण । फेणिया पूर्ण सपदरा ॥ ९२ ॥
गादिया पसारे पोतडीं । सांड्या काचर्या कुरवडी ।
तेयेंचि पैं मुगवडी । तबक परवडी आंबवडे ॥ ९३ ॥
ध्वजस्तंभ वरी लवण । मंडपदाह दधिओदन ।
तृणघराचें जें दहन । उत्तरापोशन समाप्ती ॥ ९४ ॥
सखा बंधु हुताशन । आदरें द्यावया भोजन ।
हनुमंतासी उल्लास पूर्ण । पुरदहन अवधारा ॥ ९५ ॥
अनिळानळ हनुमंत । दीर्घ क्षोभले अत्यद्‌भुत ।
लंका करावया हुत । तिघे समवेत चालिले ॥ ९६ ॥
पुच्छाग्नि अति प्रदीप्त । हनुमान विचरे लंकेआंत ।
अग्नि लावी जेथींचा तेथ । अति आकांत लंकेसी ॥ ९७ ॥
कपि बैसोनि लंकाशिखरीं । आगी लावी घरोघरीं ।
कळकळती नरनारी । आपांपरी राक्षसां ॥ ९८ ॥
जळती घरें धवलारें । हाट हटवटिया चौंबारें ।
माड्या उपरिया गृहें गोपुरें । अग्नि वानरें लाविला ॥ ९९ ॥
घरें तळघरें वोवरें । पीतांबर सांठवण पेटारे ।
मठ मंडप चत्वरें । आगीं वानरें लाविली ॥ १०० ॥
पाकशाळा पाठशाळा । आगी लावी विचित्रशाळा ।
यंत्र तंत्र मृदंगशाळा । निघती ज्वाळा धडधडित ॥ १०१ ॥
अश्वशाळा गजशाळा । कनककोठारें संग्रहशाळा ।
रंगशाळा भोगशाळा । गंधर्वशाळा जाळित ॥ १०२ ॥
लंकादुर्गी सभोंवतें । गडपाळ सैन्य पैं जाळित ।
तेंही छळें बळें समस्त । हनुमंते जालिलें ॥ १०३ ॥
लंकादुर्ग दारवंटे । जाळिल्या अर्गळा कपाटें ।
मोकळे सातही दारवंटे । आगड मर्कटें बुजविलें ॥ १०४ ॥
आगी लावोन प्रबळबळीं । खचले हुडे दुर्गांच्या पौळी ।
आगड बुजिले तत्काळीं । मांडिली होळी दुर्गाची ॥ १०५ ॥
आगी लावोनि भडभडां । दुर्गाचे हुडे चहूंकडां ।
खचोनि पडती धडधडां । होत रगडा राक्षसां ॥ १०६ ॥
हुडे खचती धडधडां । तळीं राक्षसांचा होय चुराडा ।
तेणेंचि बुजित आगडा । पुढें झगडा जिंतावया ॥ १०७ ॥
पाडित दुर्गांचिया पौळी । आगड बुजीत समूळीं ।
श्रीराम यावया सहदळीं । वाट मोकळी करितसे ॥ १०८ ॥
हनुमान बैसला निवांत । पुच्छ धांवे जेथीचें तेथ ।
आगी लावोन समस्त । ज्वाळाकुळित केली लंका ॥ १०९ ॥
कपि म्हणे पित्या पवनासी । भोजन देतां सख्या बंधूसी ।
ज्येष्ठ बंधू पूज्य आम्हांसी । साह्य त्यासी त्वां व्हावें ॥ ११० ॥
ऐसें विनवितां मारूती । वायु सुखावला चित्तीं ।
दोघें बंधू पढियंती । साह्य सर्वार्थी तो जाहला ॥ १११ ॥
अग्नि वायूचा ज्येष्ठसुत । भेटला कनिष्ठ हनुमंत ।
सुतें आलिंगिला सुत । उल्लासत स्वयें वायु ॥ ११२ ॥
वायु साह्य जाहला अग्नीसी । लंका कवळोनि चौपासीं ।
ज्वाळा उठिल्या बहुवर्णेसीं । सावकासीं अवधारा ॥ ११३ ॥
कोठें काचवर्णज्वाळा । कोठें केवळ पिंवळा ।
कोठें कर्कोटकाळा । भासती ज्वाळा अग्नीच्या ॥ ११४ ॥
कोठें हिरण्यवर्ण निर्मळा । भासती अतिशुभ्र ज्वाळा ।
कोठें अशोककुसुमकळा । आरक्त ज्वाळा भासती ॥ ११५ ॥
किंशुक फुलले वसंती । तैसी सिंदूरवर्ण दीप्ती ।
कोठें ज्वाळा धुमाकुळिती । कोठें लखलखिती सोज्ज्वळा ॥ ११६ ॥
आरक्त श्याम एकत्र प्रभा । इंद्रधनुष्यासम शोभा ।
नीलोत्पलसन्निभा । पद्मगर्भा भासती ॥ ११७ ॥
ज्येष्ठ पुष्करीं कमळानेका । तैसी ज्वाळाकुळित लंका ।
विमानीं आभासत लोकां । आणि सकळिकां भूतळीं ॥ ११८ ॥
ज्वाळा भरतांचि गगनीं । जावोनि झोंबलिया विमानीं ।
ज्वाळमाळाकिंकिणी । पडती धरणीं विमानें ॥ ११९ ॥
वेंचल्या निजपुण्यसंपत्ती । जेंवी स्वर्गस्थां होय च्युती ।
तेंवी विमानें ज्वाळाकुळिती । सवेग पडती भूतळीं ॥ १२० ॥
जैसा प्रळयकाळीचा अग्नी । जाय सत्यलोका ठाकोंनी ।
तेंवी लंकादहनवन्ही । झोंबे धांवोनि निराळीं ॥ १२१ ॥
श्वापदें पळालीं जीव घेऊनी । पक्षी किलकिलतीं गगनीं ।
देव पळती विमानीं । पाताळीं पळती पन्नग ॥ १२२ ॥
मारूत मारूती आणि वन्ही । लंका जाळिती तिघीं जणीं ।
तापें तापली धरणी । सर्व फणी पोळले ॥ १२३ ॥
सर्व पोळोनियां फणी । दडाले अर्णवजीवनीं ।
शेष पोळेना फणिमणी । शेषशयनीं श्रीराम ॥ १२४ ॥
लंका जाळितां मारूती । तापें तापली त्रिजगतीं ।
लंकाजन अति आवर्ती । आली शांती राक्षसां ॥ १२५ ॥
राक्षस सांगती रावणातें । तुवां पुच्छ पेटवोनियां येथें ।
कां खवळिलें वानरातें । मारिलीं समस्तें कपिपुच्छें ॥ १२६ ॥
पहिलें कपिपुच्छ दुर्धर । त्यासीं अग्नि जाहला साहाकार ।
लंका जाळिली गिरिकंदर । दुर्ग समग्र जाळिले ॥ १२७ ॥
अग्निबळाच्या समेळीं । दुर्गाची रे करोनि होळी ।
पाडोनि दुर्गांचियां पौळी । खंदक समूळीं बूजिला ॥ १२८ ॥
बळें दुर्धर माकड । आवलीळा हाणोनि झड ।
दुर्ग पाडोनि आगड । सभोंता बूजिला ॥ १२९ ॥
दुर्गासभोंवतीं चौफेरें । भरली होतीं अग्नियंत्रे ।
आगी लाविता वानरें । तीं एकसरें सुटली ॥ १३० ॥
एक वेळे समकाळ । सुटलें यंत्रांचे यंत्रगोळ ।
नगरीं उठला हलकल्लोळ । वीर सबळ निमाले ॥ १३१ ॥
पडोनि दुर्गाची पैं भटी । नगर जाळिलें उठाउठीं ।
वृद्धें आतुरें अति संकटीं । स्त्रियां बाळांपाठीं लावी अग्नि ॥ १३२ ॥
जरी वीरांचे बळ गाढें । काय करिती अग्निपुढें ।
रावणा तुवां केलें कुडें । मरण रोकडें तुज आलें ॥ १३३ ॥
अग्नि लावला चौफेरीं । बोंब उठली एकसरीं ।
अति आकांत घरोघरीं । आपांपरी स्त्रियां बाळां ॥ १३४ ॥
अगे तूं जळसी रोकडी । दुजी पाउलें आसुंडी ।
तंव ते नागवी उघडी । पडे उपडी लोकामाजे ॥ १३५ ॥
पुच्छ येतां देखोनि बिदीं । जन पळती सांदोसांदीं ।
जेथें देखें बहुत मांदी । पुच्छ त्रिशुद्धी घाली तेथें ॥ १३६ ॥
आगी लाविली वस्त्रातें । मरणभयें तें फेडित ।
मागें पुढें देवोनि हात । स्त्रियां धांवत नगरीं पैं ॥ १३७ ॥
अग्नीनें पोळलीं बहुत । एक कण्हती कुंथत ।
एक अतिशयें थकित । तळमळती एक पैं ॥ १३८ ॥
अग्नि देखोनि चौफेर । बाळ वृद्ध दीन आतुर ।
स्त्रिया घेवोनि कुमार । अति सत्वर धांवती ॥ १३९ ॥
एकएकाचें धरोनि हात । हाकाहाक बोंब करित ।
पिता पुत्रातें पाचारित । पुत्र हाकीत पित्यातें ॥ १४० ॥
दाहो देखोनि स्वधामा । आपांपरी सकळ ग्रामा ।
राम्या पेम्या धांव रे धर्म्या । पाव रे परम्या आकांतीं ॥ १४१ ॥
धाव वेंकटेशा पाव वितंकमुखा । धांव रे सुपुत्रा दुर्मुखा ।
ऐशा आक्रंदें देती हाका । वानरें लंका जाळिली ॥ १४२ ॥
निघावया ग्रामाबाहेरी । मिळोनियां जनांच्या हारी ।
वेगीं येतां नगरद्वारीं । तंव चौफेरी कपिपुच्छ ॥ १४३ ॥
जे जे द्वारीं रिघों जात । पुच्छ धगधगगीत दिसे तेथ ।
निर्गम न पुरे निश्चित । जन भ्रमत अति भ्रांतीं ॥ १४४ ॥
जळत्या घरामाझारीं । माता सांडोनि म्हातारी ।
खांदीं घेवोनि निजनारी । पळे बाहेरी स्त्रीलोभें ॥ १४५ ॥
पति सांडोनि जळत्या घरीं । हाती कुमरू कडिये क्वारी ।
स्त्री निघे घराबाहेरी । तुम्ही बरव्या परी घर राखा ॥ १४६ ॥
जळत चण्याचें पहिले टेंक । फुटाणे खावे लागल्या भूक ।
माथणी भरली शीतोदक । घर सम्यक राखावें ॥ १४७ ॥
घरधणी राखण घरीं । बाळें पडोत अग्निबाहेरी ।
लेंकरें घेवोनि कडियेवरी । पळती नारी सवेग ॥ १४८ ॥
एकी एकासी म्हणे आतां । तुझी मी होईन कांता ।
स्वपति न भेटे आकांता । म्यां तो सर्वथा सांडिला ॥ १४९ ॥
एक भुलली सुंदर । भेटे त्यासी म्हणे भर्तार ।
मी तंव तुझी स्वदार । अंगीकार करीं माझा ॥ १५० ॥
ऐसीं भ्रमलीं नेणों किती । नगरामाजी परिभ्रमती ।
धुमाकूळ तें नेत्र स्वती । आक्रंदती अति दुःखे ॥ १५१ ॥
हिरे वैदूर्य प्रवाळे । रत्‍न माणिकें मुक्तांफळें ।
रत्‍नखचित राउळे । जाळिलीं सकळें वन्हिजाळीं ॥ १५२ ॥
जंव जंव जाळी लंकाभवन । तृप्ति न पवेचि हुताशन ।
लंका न जाळावी आपण । मन न मानी मारूतीचें ॥ १५३ ॥
अग्नि आणि हनुमंत । पिता वायु साह्य तेथ ।
लंका जाळोनि समस्त । केले वाताहत राक्षस ॥ १५४ ॥
ऐसी जाळोनियां नगरी । आला रावणाचे गृहावरी ।
अग्नि लाविला राजमंदिरीं । आपांपरी राणिवसा ॥ १५५ ॥
रावणाचीं समस्त घरें । सातखणी नवखणीं मंदिरें ।
माड्या उपर्या गोपुरें । घरें तळघरें जाळिली ॥ १५६ ॥
रावणाचे सेजागार । निद्रा करितें मंदिर ।
राणिवसाचें घरोनघर । वानरें समग्र जाळिलें ॥ १५७ ॥
लंकेच्या कड्याकपाटांत । मंदोदरीसमवेत ।
राणिया लपाल्या समस्त । अग्नि तेथ पावेना ॥ १५८ ॥
रावण बैसला होता जेथ । कपिपुच्छ पावलें तेथ ।
राक्षस मिळोनि समस्त । अति आकांत मांदिला ॥ १५९ ॥
रावणा काढावा बाहेरी । नाहीं तरी पुच्छ पाडील जोहरीं ।
दुर्ग पाडून निशाचरीं । केला माग बहुकष्टें ॥ १६० ॥
बाप कपिपुच्छाची थोरी । जळत पुच्छ ठाकिलें द्वारीं ।
निर्गम पुरेना बाहेरी । हाहाकारीं गर्जती ॥ १६१ ॥
विघ्न आलें रावणावरी । बोंब उठली निशाचरी ।
इंद्रजित धाके निजजिव्हारीं । होईल बोहरी रायाची ॥ १६२ ॥
तये काळीं निशाचर । निवडोनियां निधडे वीर ।
सन्नद्धबद्धशस्त्रास्त्र । वानरावरी लोटले ॥ १६३ ॥

राक्षसांचे मारूतीवर आवेशाने आक्रमण :

सतेज शूळ असमसाहस । वोडण खड्ग पाश फरश ।
आदित्यवर्ण बाण बहुवस । हाणिती राक्षस हनुमंता ॥ १६४ ॥
हाणिती नानापरींची शस्त्रें । सोडिती नानापरींची यंत्रें ।
फोडिती भिंडिमाळा पांगोरे । राक्षस समग्र क्षोभले ॥ १६५ ॥
रावणाचे दृष्टीपुढें । युद्ध मांडलें रोकडें ।
वीर वाटिवे अति निधडे । रणीं वेगांडें उठावले ॥ १६६ ॥
निशाणें त्राहाटिल्या भेरी । चिणकाहळा रणमोहरी ।
सिंहनाद करोनि वीरीं । वानरावरी लोटले ॥ १६७ ॥
इकडे वाजतां वाजंत्रीं विविध । वीर करिती सिंहनाद ।
तिकडे हाका बोंबा प्रसिद्ध । महाशब्द जनांचे ॥ १६८ ॥
मध्यें हनुमंत अग्रगणीं । आलिया देखोनि वीरश्रेणीं ।
पुच्छ नाचवीत रणांगणीं । घेई धणी युद्धाची ॥ १६९ ॥
कपि म्हणे निजपुच्छासी । लंका जाळिली चौपासीं ।
तूं अतिशये भागलासी । विसांव्यासी घे आतां ॥ १७० ॥
आलिया राक्षसवीरश्रेणी । त्यांतें मारीन अर्धक्षणीं ।
पुच्छ धांवोनि लागे चरणीं । ऐसें स्वामींनीं न करावें ॥ १७१ ॥
अर्धसंग्राम सुग्रासितां । मुखींचा ग्रास हनुमंता ।
काढों नये गा सर्वथा । राजधर्मता विचारीं ॥ १७२ ॥
स्वामी मी सेवक तुझा । माझा संग्राम पाहे कपिराजा ।
आलिया राक्षसांच्या फौजा । रणसमाजा मर्दीन ॥ १७३ ॥
राक्षसें बापुडीं काइसीं । तूं कशासाठी उठसी ।
तूं असतां माझ्या पाठीसीं । या मशकांसी कोन पाड ॥ १७४ ॥
ऐसें निजपुच्छें सांगतां । हासूं आले हनुमंता ।
आलिंगूनिया प्रेमता । होय चुंबितां निजपुच्छ ॥ १७५ ॥
कपिपुच्छ होय साह्यता । माजें मज स्फुरण नावरतां ।
आम्ही तुम्ही समसाम्यता । वीरां समस्तां निर्दाळूं ॥ १७६ ॥
पुच्छ म्हणे ऐसेंच भलें । स्वामीचें वचन पाहिजे केलें ।
ऐसे कपिपुच्छ समजलें । सरसावले संग्रामीं ॥ १७७ ॥
कपि पुच्छासरी करी एकांत । मारूं नको लंकानाथ ।
त्याचा श्रीराम करील घात । इंद्रजिताचा लक्ष्मण ॥ १७८ ॥
उरले राक्षस समस्त । त्यांचा आम्ही करूं घात ।
ऐसा करोनि इत्यर्थ । मग युद्धार्थ चालिला ॥ १७९ ॥
तूं आकळीं मी निर्दळीं । ऐसी राक्षसमंडळी ।
करूं आजी रणरांगोळी । पिटिली टाळी कपिपुच्छें ॥ १८० ॥
करितां वाद्यांचा गजर । राक्षसभार अति दुर्धर ।
येवोन हनुमंत समोर । शस्त्रसंभार सोडिती ॥ १८१ ॥
रावणाचे दृष्टीपुढां । होईल निर्वाण झगडा ।
हनुमंत करील रणरगडा । करील नितोडा राक्षसां ॥ १८२ ॥
राक्षसवीर अत्यंत क्रूर । करीत आले हाहाकार ।
हनुमंत स्वस्थानीं स्थिर । अणुमात्र ढळेना ॥ १८३ ॥
अंगीं राक्षसांचे घाये । लागती तंव उगाचि राहे ।
मग उठोनियां लवलाहें । केलें काय तें ऐका ॥ १८४ ॥
राक्षसांचे शस्त्रनिर्घाता । भय नाहीं हनुमंता ।
करावया राक्षसांचे घाता । केले तत्वतां तें ऐका ॥ १८५ ॥
रत्‍नखचित हेमालंकार । सभामंडपीं खांब थोर ।
वानरें उपटिला सत्वर । निशाचर मारावया ॥ १८६ ॥
शस्त्रें हाणितां दुर्धर । आला राक्षसांचा भार ।
खांब उपटोनि अष्टधार । रणीं वानर मिसळला ॥ १८७ ॥
मी रामाचा रामदूत । आलों राक्षसां करावया घात ।
बाण सारोनियां तेथ । खांब भोंवंडीत शतावर्तीं ॥ १८८ ॥
वीर हाणिती शस्त्रास्त्रीं । पुच्छे निवारी वरचेवरी ।
खांब हाणितां वीरां शिरीं । करील चुरी शतसहस्त्रीं ॥ १८९ ॥
पुच्छ स्वेच्छा वीरांतें जाळी । उरी शिरीं सर्वांग पोळी ।
खांब हाणोनि हनुमान बळी । करी रांगोळी वीरांची ॥ १९० ॥
कपीस मारावया रोकडे । कवची खड्गी वीर वेंगाढे ।
थरकोनि सरकोनि चहूंकडे । घाय देवडे हाणिती ॥ १९१ ॥
चुकवोनि पुच्छाचा आघात । संमुख चुकवोनियां घात ।
वीर तळपोनि हाय घाणित । रणीं हनुमंत मारावया ॥ १९२ ॥
हनुमान विचारी पोटांत । वीर खवळले समस्त ।
यांचा पाहूं पुरूषार्थ । अंगीं आघात साहोनि ॥ १९३ ॥

मारूतीचे राक्षसांच्या शस्त्रागारात लपून राहणे व प्रकट होणे :

यांच्या शस्त्रांचे समेळीं । माझी न तुटे रोमावळी ।
शस्त्रें हाणिती महाबळी । रणकल्लोळीं भिडोनी ॥ १९४ ॥
दडाला त्यांचे शस्त्रांतळीं । वीरीं दिधली आरोळी ।
अवघे म्हणती बळी रे बळी । कपि भूतळीं पाडिला ॥ १९५ ॥
संमुख हाणिती तोमर । मागोन हाणिती महावज्र ।
वाम सव्य विंधिती तीर । वर्षती शस्त्रें गगनींहूनी ॥ १९६ ॥
राहिलें उड्डाण किराण । निःशेष गेला त्याचा प्राण ।
आमची गाढी आंगवण । भेरी निशाणें त्राहाटिलीं ॥ १९७ ॥
एक म्हणे म्या शस्त्रघातें । संमुख पाडिला हनुमंते ।
एक म्हणे उराआंत । शूळघात म्यां खोचिला ॥ १९८ ॥
एक म्हणे म्यां खड्गधारीं । पुरा केला मस्तकावरी ।
एक म्हणे बाणशरधारीं । सर्वांग शिरीं खिळिलें ॥ १९९ ॥
ऐशा वाटिवा गर्जती वीर । हर्षे वाटिती साखर ।
आतां विझंवा लंकापुर । रणीं वानर मारिला ॥ २०० ॥
वानरें थोर केली ख्याती । तरी आम्ही भद्रजातीं ।
हारीं आणिला मारूती । शस्त्रप्रयुक्तीं रणमारे ॥ २०१ ॥
रणशोधा रे सत्वर । कोणे ठायीं मेला कपिकुंजर ।
तंव तेथें देवोनि भुभुःकार । वेगीं वानर उसळला ॥ २०२ ॥
ऐकोनि कपीचें गर्जन । कांपन्निला दशानन ।
राक्षसांचा पळाला प्राण । रोकडें मरण देखोनि ॥ २०३ ॥
पुच्छ कवळोनि समसगट । अवघे केले एकवट ।
खांब हाणोनि घनदाट । केलें पीठे अवघ्यांचे ॥ २०४ ॥
हात पाय ना मनगट । ना त्या अस्थि शिर ना कंठ ।
पाठीचें पोटींचें करोनि पीठ । केली एकवट अवघ्यांसी ॥ २०५ ॥
ना ते भूतळीं ना ते पाताळीं । शेखीं नेलेच रसातळीं ।
हनुमंत ते महाबळीं । नेले तत्काळीं निर्गुणत्वा ॥ २०६ ॥
इंद्रियें अव्यक्त देहाभिव्यक्ती । नांव रूप त्रिगुणजाती ।
निर्दळोनियां मारूतीं । गुणातींती ते नेले ॥ २०७ ॥
श्रीरामभक्ताच्या निजहस्तीं । जे जे निमती मारकयुक्तीं ।
ते ते पावती गुणातीती । भक्तीची ख्याती पैं ऐसी ॥ २०८ ॥
श्रीराम भक्ताच्या दृष्टीपुढे । मरे त्याचें भाग्य चोखडें ।
जिणोनि त्रिगुणाचें सांकडें । पावें रोकडें परब्रह्म ॥ २०९ ॥
श्रीरामाचें अखंड स्मरणीं । अथवा सार तें ऐकिल्या कानीं ।
कर्माकर्मा होय धुणी । निजनिर्गुणीं तो पावे ॥ २१० ॥
श्रीराम ज्याच्या वदनी । श्रीरामनाम ज्याच्या ध्यानीं ।
नित्य सावधान श्रीरामभजनीं । धन्य त्रिभुवनीं तो एक ॥ २११ ॥
ऐसी श्रीरामाची भक्ती । नित्य नांदे हनुमंतीं ।
रणीं राक्षस लावोनि ख्याती । दिधली मुक्ती कपिराजे ॥ २१२ ॥
रावणासी म्हणे हनुमंत । तुझा सर्वथा न करी घात ।
आजि सोडिला जीवें जीत । तुज रघुनाथ वधील ॥ २१३ ॥
एकाजनार्दना शरण । जाहलें लंकापुरदहन ।
हनुमंताचे पुनरागमन । सावधान अवधारा ॥ २१४ ॥
कैसी घेईल श्रीरामभेटी । कैशा सांगेल सीतेच्या गोष्टी ।
कथा अति गोड गोमटी । कृपादृष्टीं अवधारा ॥ २१५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमंतलंकादहनं नाम एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
॥ ओव्यां २१५ ॥ श्लोक २५ ॥ एवं संख्या २४० ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय एकोणिसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *