भावार्थरामायण अध्याय

 भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा

 भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा

रावणाचे अशोकवनात आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मारूतीचे अशोकवनात आगमन :

पूर्वप्रसंगाप्रती । दूतिकांमागें मारूती ।
आला अशोकवनाप्रती । सीता सती वंदावया ॥ १ ॥
देखोनियां अशोकवन । हनुमान घाली लोटांगण ।
करोनियां श्रीरामस्मरण । सीतादर्शन करूं निघे ॥ २ ॥

अशोकवनाचे वर्णन :

साधावया सीता चिद्रत्‍न । हनुमान क्षण एक धरी ध्यान ।
देखोनियां अशोकवन । आलें स्फुरण हनुमंता ॥ ३ ॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसें करोनि उड्डाण ।
अशोकवनामाजी जाण । आला आपण हनुमंत ॥ ४ ॥
वृक्ष सफळ आणि सरळ । वन देखोनि विशाळ ।
करी हर्षाचा गोंधळ । घोंटी लाळ मिटक्या देत ॥ ५ ॥
दाट देखोनियां झाडां । उल्लास आला माकडा ।
वृक्षोवृक्षीं उडें तडतडां । नाचवीं पुढां निजपुच्छ ॥ ६ ॥
सांपडली श्रीरामाची कांता । फिटली आधिव्याधिचिंता ।
विचकोनियां निजदांतां । देवां देवतां वांकुल्या दावी ॥ ७ ॥
नारळी घडघडती घडें । हनुमान पाहे तिकडे ।
पक्व खर्जूरी देखोनि पुढें । वेगें उडे गटकावया ॥ ८ ॥
पिकले आंबे देखोनि तेथ । हनुमान डोळे मिचकावित ।
द्राक्षांचे घड लोंबत । हालवी तेथ निजपुच्छ ॥ ९ ॥
मातुलिंगी आणि नारिंगी । देखोनि हनुमान नाचे रंगी ।
माझे दांत सभाग्यभागी । फलांलागीं करंडावया ॥ १० ॥
फणसें परिपक्व घनदाटें । हनुमतें नखे खुडिले कांटे ।
पिकली केळें चेपोनि बोटें । निंबेम आंबटे मी नेघें ॥ ११ ॥
जांबुळें देखोनि कुळकुळितें । हनुमान विचकीं दातांतें ।
आंवळें न सेवीच हातें । कार्तिकव्रतें स्वीकारी ॥ १२ ॥
देखोनि उंबरें टेंबरें । बिब्बे विधामणें चारें बोरें ।
पिकलीं करवंदें नागरें । मिटक्या वानरें देइजेति ॥ १३ ॥
तोरणें अळुवें मव्हकें घोटीं । वाळकें कांकड्या भरल्या पाटीं ।
मोहळे मधु देखोनि दाटी । लाळ घोटी वानर ॥ १४ ॥
भरले खर्बुजांचे भारे । देखोनि पिकलीं भोंकरे ।
उल्लास कीजे पै वानरें । पुच्छ पुढारें नाचवित ॥ १५ ॥
देखोनि साकरेची राशी । हनुमान खाजवी दोन्ही कुशी ।
कोण खाईल या गुळासी । नाबदेसी गटकावूं ॥ १६ ॥
देखोनियां ऊंसपेरणी । वानर नाचे पैं रंगणी ।
रसें देखोनि भरली मांदणी । पुच्छ घाली त्यामाजी ॥ १७ ॥
त्या प्रक्षाळून निर्मळ जळी । गुज सांगे पुच्छाजवळी ।
भेटलिया जनकबाळी । वनरवंदळी मग करूं ॥ १८ ॥
हनुमान पुच्छासी करकी एकांत । सीतेसी पुसोनि वृत्तांत ।
मग या फळांसी लावूं हात । तंववरी शांत त्वां असावें ॥ १९ ॥

मारूतीचे तटावर आरोहण :

ऐसी सांगोनि निजखूण । वेगें करोनि उड्डाण ।
प्राकारावरी जाण । हनुमान आपण वळंघला ॥ २० ॥
अशोकवनामाझारीं । रावणाची शृगांरओवरी ।
उपराउपरी गोपुरी । हनुमान त्यावरी वळंघला ॥ २१ ॥

तेथून त्याला दिसलेली रमणीयता :

त्यावरी बैसोनि आपण । अवलोकी अशोकवन ।
नित्य वसंते शोभायमान । सदा संपन्न फळपुष्पीं ॥ २२ ॥
अशोकवनाचियां आंत । नित्य नांदे वसंत ।
सदा सफळित सर्व वृक्ष । देखे हनुमंत स्वानंदें ॥ २३ ॥
शाल तमाल तरू तमाळ । सरळ शोभा अति विशाळ ।
कर्णिकारी पुष्प प्रबळ । अशोकीं विशाळ विश्रांति ॥ २४ ॥
कल्पित्थ बिल्व चूत चंपक । पिचुमंद नीप शिंसिपक ।
आंवळी सालफळी मधुक । वृक्ष अनेक शोभती ॥ २५ ॥
नागपंचक उधाळक । मांदार कल्पतरू पारिजातक ।
फणस पाटल नंदानक । टवटवित शोभती ॥ २६ ॥
रजतवृक्ष कैलासगिरीं । रावणें प्रार्थोनि त्रिपुरारी ।
सार्द्रसुमनसुगंध भारी । अशोकामाझारी रजतवृक्ष ॥ २७ ॥
विभांडोनि कुबेर नगरी । सुमनवृक्ष नानापरी ।
सुगंध न माये अंबरी । अशोकामाझारीं रावण आणी ॥ २८ ॥
यज्ञ राखितां सुगंधिनी । सार्द्रा सुवर्णकमलिनी ।
रावण आणिलिया हिरोनी । अशोकवनीं घमघमिती ॥ २९ ॥
सुवर्ण रजतवृक्षमेळीं । पुष्पें सुगंध पांढरी पिवळीं ।
फळें स्वादिष्ठ चवी आगळी । बीजरत्‍नावळी त्यांमाजी ॥ ३० ॥
तया बीजापासोनि पुढतीं । नव्हे वृक्षाची उत्पत्ती ।
एक वेळ फळें येती । मग शोभती नुसतींचि ॥ ३१ ॥
ऐशिया वृक्षांचिया जाती । अशोकवनीं नेणों किती ।
शोभा स्वयें शोभती । उडे मारूती त्यामाजी ॥ ३२ ॥
वृक्षशोभा देखिल्यावरी । मन मूर्च्छित त्यामाझारीं ।
दृष्टि जावोनी विसरे बाहेरी । सुगंध हरी घ्राणातें ॥ ३३ ॥
ऐशिया वृक्षावृक्षीं जाण । गदापाणि वीर दारूण ।
राक्षस ठेविलें रक्षण । पाहें कोण तयांकडे ॥ ३४ ॥
दुर्धर वृक्षांमाझारी । हनुमान स्वइच्छा क्रीडा करी ।
राक्षसबळाची थोरी । तृणावारी गणीना ॥ ३५ ॥

त्या वनातील देवळे व प्रासाद राक्षसांनी सुरक्षित :

अशोकवनीं देऊळ । रावण करी अति विशाळ ।
सहस्त्रस्तंभांचे प्रबळ । रत्‍नप्रवाळें मेखळां ॥ ३६ ॥
पाच पाचुका माणिके वरी । हिरे मुक्ताफळें हारोहारीं ।
कळस लखलखिती अंबरीं । तयावरी पताका ॥ ३७ ॥
सुवर्णवेदिका दोहीं बाहीं । रत्‍नें जडली त्यांमाजी पाहीं ।
ओठंगणें ठायी ठायीं । दिसे भुयीं प्रतिबिंब ॥ ३८ ॥
नंदनवन चैत्रवन । त्यांहूनि दिसे शोभायमान ।
आनंदवनेंसीं समान । कैलासभुवन तेंवी शोभे ॥ ३९ ॥
वनद्वारीं प्रासादद्वारीं । राक्षस सावधान शस्त्रास्त्रीं ।
वारा यावया वाट नव्हे भीतरी । सुरासुरीं दुर्धर ॥ ४० ॥
बोट दाखविता हात तोडी । डोळा दाखविल्या डोळा फोडी ।
दुर्धर राक्षसपरवडी । कडोविकडी घर राखत ॥ ४१ ॥
लंकेप्रति आड सागर । पुढें दुर्ग अति दुर्धर ।
त्यामाजी रावण मंदिर । अति दुस्तर प्रवेश ॥ ४२ ॥
त्याहीमाजी स्त्रियांचे भुवन । अतिशयेंसी दुर्गम गमन ।
त्याचि माजी अशोकभुवन । दुर्गम गमन सुरासुरां ॥ ४३ ॥
दुर्गमीं रिघावया हनुमंत । अति दक्ष आणि समर्थ ।
हेमरजतवृक्षाआंत । निःशंक क्रीडत तें ऐका ॥ ४४ ॥
असो हा वनविचार । सीतादर्शनीं अति सादर ।
संमुख चालिला वानर । धरोनि सूत्र लक्षाचें ॥ ४५ ॥

सीतेची आंतर्बाह्य अवस्था :

वरीवरी सीता दिसे समळ । अंतरी रामध्यानें निर्मळ ।
बाह्य अति चिंते व्याकुळ । अंतरीं निश्चळ चिन्मय राम ॥ ४६ ॥
बाह्य उपवासें आक्षिप्त । अंतरीं परमानंदें तृप्त ।
बाह्य दिसे बंदीं प्राप्त । आंत निर्मुक्त चहूं देहीं ॥ ४७ ॥
बाह्य रोडेली दिसे काष्ठ । अंतरीं रामनामें धष्टपुष्ट ।
बाह्य राक्षसां मानी दुष्ट । अंतरीं निर्दुष्ट आत्मा मानी ॥ ४८ ॥
बाह्य रामें दिसे वियुक्त । अंतरीं श्रीरामें नित्ययुक्त ।
बाह्य दिसे दुःखाभिभूत । अंतरी सदोदित स्वानंदें ॥ ४९ ॥
बाह्य दिसे हीन दीन । अंतरी दिसे सुप्रसन्न ।
बाह्य दिसे अति खिन्न । अंतरीं चैतन्यचिन्मात्रज्योति ॥ ५० ॥
बाह्य दिसे लंके नेली । परी ते रामापासोनि नाहीं ढळली ।
बाह्य दिसे कोमाइली । अंतरीं टवटविली श्रीरामें ॥ ५१ ॥
बाह्य दिसे मलिनांबर । अंतरी शोभे चिदंबर ।
बाह्य दिसे अनलंकार । अंतरीं शृगांर श्रीरामें ॥ ५२ ॥
दिसे श्रीरामावेगळी । परी ते सबाह्य रामें रचिली ।
ऐसी देखोनि जनकबाळी । पिटिली टाळी हनुमंते ॥ ५३ ॥

सीतेचे रूपलावण्य :

सीता अनुभवी रामचंद्रा । कैसेनि कळलें वानरा ।
श्रीरामें दिधली निजमुद्रा । तेणें कपींद्रा लक्षलें ॥ ५४ ॥
सांगतां सीतेचें लक्षण । श्रीरामें सांगितली जी जी खूण ।
त्याची स्थिती पाहतां जाण । देखे पूर्ण वानर ॥ ५५ ॥
ऐसे सीतेचे पूर्णपण । हनुमान लक्षी स्वयें आपण ।
बाह्य लौकिक लक्षण । दिसे तें चिन्ह अवधारा ॥ ५६ ॥
निधानाभोंवती विवसी । तैशा राक्षसी सीतेपासीं ।
खाऊं गिळूं घेऊं रक्तासी । देखे चौपांसीं हनुमंत ॥ ५७ ॥
गजपतीचे चुकोनी । पांगडीमाजी पडे हस्तिनी ।
तैसी सीता अशोकवनीं । दीनवदनी दिसत ॥ ५८ ॥
नाहीं अभ्यंग ना स्नान । तेणें सर्वांग मलिन संपूर्ण ।
वस्त्र पीतांबर अति जीर्ण । नाहीं प्रावरण दुसरे ॥ ५९ ॥
कुचासी उदर आच्छादोनी । दोनी गुडघे ह्रदयी धरूनी ।
बैसली असे श्रीरामपत्‍नी । चित्तीं अनुदानी श्रीराम ॥ ६० ॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । आत्मा धरिलासें कंठी ।
ऐसियापरी सीता गोरटी । देखे दृष्टी हनुमंत ॥ ६१ ॥

तिची शांत व निर्भय वृत्ती :

कराळ विकराळ दुष्ट नष्टी । भोंवत्या राक्षसींच्या कोटी ।
सीतेसी त्यांचे भय नुठी । निर्भय पोटीं श्रीराम ॥ ६२ ॥
जंव नाठवे श्रीरघुनाथ । तंवचि भयाचा आवर्त ।
श्रीराम आठवल्या ह्र्दयाआंत । भवभयार्थ मग कैंचा ॥ ६३ ॥
देखतां राक्षसी क्रूरदर्शन । सीता श्रीराम देखे संपूर्ण ।
वृक्षवल्ली तृण पाषाण । देखे परिपूर्ण श्रीराम ॥ ६४ ॥
भय पावलें भयाप्रती । सुख पावले सुखावर्तीं ।
ऐशिया निष्ठे सीता सती । देखे मारूती आनंदें ॥ ६५ ॥
ह्रदयीं श्रीरामप्रतीती । श्रीराम देखे सर्वां भूतीं ।
भयामाजी निर्भयप्राप्ती । सीता सती सव्यें भोगीं ॥ ६६ ॥
श्रीराम देखतां सर्वां भूतीं । सकळ भयांसी समाप्ती ।
भय तें होय ब्रह्ममूर्ती । सुखसंवित्ती श्रीरामें ॥ ६७ ॥

अखंड नामस्मरण, नाममहिमा :

ऐसिया अनुभवेंसीं जाण । श्रीरामनाम मुख्य साधन ।
नामें निरसें जन्ममरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ ६८ ॥
नामापासीं विरक्ति शांती । नामस्मरणें परम भक्ती ।
नामापासीं चारी मुक्ती । नामें निश्चितीं परब्रह्म ॥ ६९ ॥
नामासीं नाहीं स्नान बंधन । नाहीं नामापासीं विधिविधान ।
अबद्ध नाम अति पावन । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ ७० ॥
नामें दूषण होय भूषण । नामें पापी अति पावन ।
नाम स्मरतां यम शरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ ७१ ॥
नामासी नाही कर्मबंधन । वेगळ्या कर्मा नामस्मरण ।
अच्युतनामें कर्म पावन । हें स्मृतिवचन श्रुत्यर्थ ॥ ७२ ॥
नामीं नाहीं अनध्यावो । नामापासीं नित्य स्वाध्यावो ।
नाम परब्रह्म स्वयमेवो । नामनिर्वाहो सभाग्य ॥ ७३ ॥
नाम चैतन्याचा मुढा । नाम परब्रह्माचा हुडा ।
ब्रह्म नामाचिया पुंढा । नाचे घडघडां स्वानंदे ॥ ७४ ॥
स्त्रियांसी रामनामस्मरण । तें भूषणाचें निजभूषण ।
अहेवपणा अहेवपण । नामें पावन स्त्रीशूद्र ॥ ७५ ॥
स्त्रियांसी गळसरी कृष्णमणी । पुरूषां गळसरी नामस्मरणी ।
ते तुटलिय़ा रांडपणीं । काळकर्मणी करावी ॥ ७६ ॥
सीतेसी श्रीराम स्वधर्म । सीतेसी श्रीराम नित्यकर्म ।
सीतेसी भ्रतार श्रीराम । राम परब्रह्म सीतेसी ॥ ७७ ॥
श्रीरामनाम स्मरतां सीता । देहीं वर्ते विदेहता ।
भय न मानी लंकानाथा । हेंही हनुमंता कळों सरलें ॥ ७८ ॥
श्रीरामनामांकित सीतापत्‍नी । भूषणा भूषणशिरोमणी ।
नामें निःशंक अशोकवनीं । अनुदिनीं निर्द्वंद ॥ ७९ ॥

मारूतीला भेटीची उत्सुकता :

ऐसी देखोनि जनकबाळी । हनुमान भेटीसी तळमळी ।
कराळा राक्षसींच्या किंकाळी । देखोनि जवळी शंकला ॥ ८० ॥
जैसी नारायणाची रमा । तैसी सीता श्रीरामा ।
तिची भेटी घेतां आम्हां । राक्षसी अधमा प्रतिबंध ॥ ८१ ॥
यांदेखतां भेटी घेतां । या मज झोंबती सर्वथा ।
यांच्या की करिता घातां । रावण सीता वधील ॥ ८२ ॥
वधिलिया रामकांता । माझे कष्ट जाती वृथा ।
म्यां मारिलियां लंकानाथा । सुख रघुनाथा उपजेना ॥ ८३ ॥
यालागीं आपण तत्वतां । जंव राक्षसी होती निद्रिस्ता ।
तंव वृक्षी राहूं गुप्तता । एकांती सीता जंव भेटे ॥ ८४ ॥
ऐसें स्वयें विचारून । हनुमान वृक्षी होय लीन ।
जेंवी कां चपळ पवन । होय सुलीन आकाशीं ॥ ८५ ॥
जेंवी अभ्रामाजी भास्वत । स्वयें असे अति गुप्त ।
तेंवी वृक्षांमाजी हनुमंत । सावचित गुप्तत्वें ॥ ८६ ॥
जेंवी आत्मा ह्रदयाआंत । असोनि न देखती समस्त ।
तेंवी वृक्षीं हनुमंत । अति गुप्त राहिला ॥ ८७ ॥
जेंवी का वेदींचा वेदार्थ । असोनि कोणा नव्हे व्यक्त ।
तेंवी वृक्षी हनुमंत । अति गुप्त राहिला ॥ ८८ ॥

अरूणोदय वेळा व वर्णन :

वृक्षीं राहतां मारूती । जाहली अरूणोदयप्राप्ती ।
गौळी दोहावा करिती । गोपी आरंभिती गोरसमंथन ॥ ८९ ॥
वेदपाठक वेदाध्ययनीं । राजद्वारीं मंगळध्वनी ।
ललितगंधर्व गायनीं । जयजयध्वनीं देवद्वारीं ॥ ९० ॥
अग्निहोत्रिमाज्यगंध । उन्मत्त गजांचा मदगंध ।
शुद्ध सुमनांचा सुगंध । सुधूपगंध देवालयीं ॥ ९१ ॥
नेसली प्रिया काळिमाबुंथी । सोडोनि पीतांबर दे पती ।
तेंवी अंधार त्यजोनि राती । दे गभस्ती पीतप्रभा ॥ ९२ ॥
झाली सूर्योदयप्राप्ती । व्यवहारपर त्रिजगती ।
निशाचरें लीन होती । सुखसंभूती दिवाचरां ॥ ९३ ॥
हनुमंताचे निजचित्तीं । एकांती भेटावी सीता सती ।
अति शीघ्र व्हावी राती । वृक्षांतरवर्ती तिष्ठत ॥ ९४ ॥

हनुमंताची उत्कंठा व सूर्यास्त :

ऐसे हनुमंते धरितां चित्ती । श्रीरामकार्याचे निजस्वार्थी ।
कपीस भेटावया सीता सती । गेला गभस्ती अस्तमाना ॥ ९५ ॥
जैसी श्यामसुंदर बाळी । लेइली मोतियांची जाळी ।
तैशा नक्षत्रांच्या ओळी । नभोमंडळीं शोभती ॥ ९६ ॥
रात्री नव्हे ते सखी हनुमंता । भेटावया श्रीरामकांता ।
दोघा संवाद गुप्तकथा । साधूं एकांता आली असे ॥ ९७ ॥
भेटावया सीता स्वामिनी । रात्री नव्हे ती सखी जननी ।
जानकी संवादपान्हा पाजूनी । समाधानीं बैसवील ॥ ९८ ॥
संवादपान्ह्याचे तुष्टपुष्टीं । अखयाक्षयासी करी भेटी ।
इंद्रजिताची पुरवोनि पाठी । राक्षसकोटी गांजील ॥ ९९ ॥
रात्री नव्हे ते महाकाळी । येवोन हनुमंताजवळी ।
भेटवोनि जनकबाळी । करीळ होळी लंकेची ॥ १०० ॥
रात्री नव्हे ते सप्तशती । शुंभनिशुंभा केली समाप्ती ।
आतां येवोनि हनुमंताप्रती । करील शांती राक्षसां ॥ १०१ ॥
रात्री नव्हे ते चामुंडा । धरोनि काळिमेचे बळबंडा ।
छेदावया रावणाच्या मुंडा । कपी प्रचंडा भेटों आली ॥ १०२ ॥
रात्री नव्हे ते काळरात्री । प्रवेशोनि कपींद्रीं ।
रिघोनियां लंकेमाझारी । करील बोहरी राक्षसां ॥ १०३ ॥
ऐसी देखोनियां राती । रावणा आठवें सीता सती ।
जाली विरहज्वरप्राप्ती । सीताकामार्थी सकाम ॥ १०४ ॥
ऐसी देखोनियां राती । आनंदें उल्लासेम मारुती ।
पुढील कथेची अनुवृत्ती । सावध श्रोतीं परिसावी ॥ १०५ ॥

रावणाची मन : स्थिती, सीतेचे चिंतन :

वस्त्राभरणी दूषित । दिव्यचंदन अगरूलिप्त ।
सीताकामें लंकानाथ । पुष्पसेजेंआंत तलमळी ॥ १०६ ॥
जैसे का खदिरांगार । तैसा लागे सुमनसेजार ।
सुमनमाळा पोळी जिव्हार । चंदने शरीर तप्त होय ॥ १०७ ॥
नावडती भोगोपचार । नावडे वीणातंती मधुर ।
नावडे स्त्रियांसी सेजार । नावडे मधुर रसपान ॥ १०८ ॥
जैसी देखिली स्वयंवरी । तैसी आठवली सीता सुंदरीं ।
शेंदूरचर्चित भांग शिरीं । चांफेगोरटी सुकुमार ॥ १०९ ॥
कमलनयन कमलवदन । ठाणमाण गुणलक्षण ।
आठवितां घनस्तन । मूर्च्छापन्न रावण ॥ ११० ॥
नावडे दुजयाचा संचार । नावडे गायन सुस्वर ।
सीतेने झडपिला दशशिर । भूतसंचार जानकी ॥ १११ ॥
सीता लागली महद्‌भूत । जींवे घेईल लंकानाथ ।
झाडणी भरणी न चले तेथ । सांडणीची मात मानीना ॥ ११२ ॥
आंवरूं न शके निजचित्ता । सीता लागली तिहीं अवस्था ।
धीर न धरवे लंकानाथा । सकामता विव्हळ ॥ ११३ ॥
सीताकामें कामातुर । त्यजिली शय्या स्त्रीशेजार ।
अल्पही होतां संचार । कोपे दुर्धर सेवकीं ॥ ११४ ॥
ब्रह्मा वेद पढे घडघडाट । पढती नित्य शांतिपाठ ।
त्यांसी वारिती राजभाट । मौननिष्ठ राहा स्वामी ॥ ११५ ॥

सर्वत्र निःस्तब्ध शांतता :

दूत म्हणती बृहस्पती । वृथा बडबड करिसी किती ।
जल्पसी इंद्रसभेप्रती । तैसी वदंती न करावी ॥ ११६ ॥
नारदा वीणा आंवरीं । तुंबरा आलाप पुरे करीं ।
रावणा स्वस्थता नाहीं शरीरीं । नाचणी दूरी दवडाव्या ॥ ११७ ॥
भाटीं गर्जावें ना बाहेरीं । ब्रीदें पढावी ना कैवारीं ।
उगे रहावें समग्रीं । रावणशरीरीं अति व्यथा ॥ ११८ ॥
दूत ब्रह्मयातें नमस्कारिती । समयो नव्हे अध्ययनाप्रती ।
कोण व्यथा लंकापती । पुसे प्रजापति दूतांसी ॥ ११९ ॥

रावणाची अस्वस्थता :

दूत म्हणती हे गुप्त मात । प्रकट करों नये लोकांआंत ।
तुमचा समर्थ वचनार्थ । ऐका वृत्तांत व्यथेचा ॥ १२० ॥
सीतेचा भांग शेंदूराचर्चित । तोचि भाला धगधगित ।
रूतला रावणाचे ह्रदयांआंत । तेणें अस्वस्थ लंकेश ॥ १२१ ॥
जानकीकामें रावण भ्रांत । सर्वथा नेणे निजस्वार्थ ।
हित सांगे त्याचा करी घात । सीतासन्निपात लंकेशा ॥ १२२ ॥
ब्रह्मवंशज लंकानाथ । न सांगावा जानकीमुख्यार्थ ।
करूं धांवेल अति अनर्थ । सीतासन्निपात रावणा ॥ १२३ ॥
ऐशा सांगतां एकांतगोष्टी । अशोकवन लक्षोनि दृष्टीं ।
रावण कामक्षोभें उठी । सीता गोरटी देखावया ॥ १२४ ॥
चारी महिनें म्यां सीता । अशोकवनी ठेविली वृथा ।
बळेंचि भोगीन मी आतां । म्हणोनि सकामता ऊठिला ॥ १२५ ॥

अशोकवनात सीतेकडे जाणे, बरोबर स्त्रियांचा लवाजमा :

कामोन्मत्त चाले लंकापती । सवें योषिता शतानुशतीं ।
सुवर्णदीपिका घेवोनि हातीं । तैल सिंचिती सुगंध ॥ १२६ ॥
कनकदंडें युक्त माणिकी । शशांकच्छत्रें धरिलीं एकीं ।
व्यजने वारिती अनेकी । विडिया कितेंकी देताती ॥ १२७ ॥
कांसे पाटोळा नीलांबर । त्यासी कटिसूत्र कटार ।
किंकिणीज्वाळमाळा विचित्र । ब्रह्मसूत्र सांगद ॥ १२८ ॥
मुकुट कुंडलें अलंकार । मणि मुक्तामाळा नीळहार ।
वांकी अंदुवांचा गजर । चरणीं तोडर ब्रीदांचा ॥ १२९ ॥
सुगंध चंदनाची उटी । पदकें शोभती दशकंठीं ।
खड्ग वसवोनि मुष्टीं । सीताभेटी चालिला ॥ १३० ॥
चालिला अशोकवनाप्रती । सवें स्त्रिया नेणों किती ।
एक दीपिका दाविती । बळी ये म्हणती पैं एकी ॥ १३१ ॥
दडापती द्राक्षांचीं आळीं । खचती नागवेलीपाळी ।
लखलखिती सोनकेळी । वरिल्या पौळी चालिला ॥ १३२ ॥
देखोनि बनकरांचा थाट । स्त्रिया चालती घडघडाट ।
लवोन वृक्ष होती सपाट । स्पर्श दुष्ट स्त्रियांचा ॥ १३३ ॥
स्त्रियांच्या स्पर्शाखालीं । वाटिकां वाळती समूळीं ।
वृक्ष झडती पुष्पीं फळीं । वरिल्या पौळीं चालिला ॥ १३४ ॥
दीपिकातेजाचे कडाडीं । वृक्षां होईल फलपानझडी ।
अमृतवल्ली तडातडी । रोपें रोकडीं जळतील ॥ १३५ ॥
स्त्रिया आघातें मोडती चांफे । मोडती हेमकमळिणीचाफे ।
वारिले पौळीचे साटोपें । सीतेसमीप तो आला ॥ १३६ ॥

रावण्याच्या येण्यामुळे मारूतीचा क्रोध :

रावण येतां सीतेप्रती । कोप हनुमंताचे चित्तीं ।
वृक्षीं सरसावला मारूती । लंकापतीतें घुमसावया ॥ १३७ ॥
रावण झोंबतां सीतेंसी । बोंब नेतां रामापासीं ।
सांगों जातां सुग्रीवासी । लाजेल मजसी पुरूषार्थ ॥ १३८ ॥
हेंचि वानरें सांगों जातां । हनुमान म्हणे नपुंसकता ।
घाये मारीन लंकानाथा । न पुसतां श्रीरामासी ॥ १३९ ॥
मजदेखतां श्रीरामभाजा । गांजो जातां राक्षसराजा ।
दाही शिरें वीस भुजा । घायें पूजा करीन मी ॥ १४० ॥
पंचोन्मत्त रावणाचे वर्तनावरून पुढील उपक्रम :
आधींच न करावा घात । सीतेपासीं लंकानाथ ।
कैसी कैसी बोली बोलत । तो वृत्तांत ऐकों पां ॥ १४१ ॥
सीता अनुसरली रावणासी । हे तों न घडे कदा काळेंसीं ।
जरी हा भोगील बळेंसीं । तरी मी यासी धुमसीन ॥ १४२ ॥
मानोन्मत्त पानोन्मत्त । राज्योन्मत्त बळोन्मत्त ।
ज्ञानगर्वें ज्ञानोन्मत्त । पंचोन्मत्त रावण ॥ १४३ ॥
पंचोन्मत्त अति उन्मत्त । यालागीं त्यातें क्षीब म्हणत ।
सीताकामें अति भ्रांत । भ्रमोन्मत्त रावण ॥ १४४ ॥
यापरी अशोकवनांत । लंकानाथ आणि हनुमंत ।
साधूं पाहती निजस्वार्थ । तो कथार्थ अवधारा ॥ १४५ ॥
आधींच गोड रामायण । श्रीरामाचें चरित्र गहन ।
त्याहीमाजी हनुमंतकथन । गोड निरूपण अवधारा ॥ १४६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणाशोकवनाभिगमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥
॥ ओव्यां १४६ ॥ श्लोक – ॥ एवं संख्या १४६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

 भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा

 भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा  भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा  भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा  भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा  भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा  भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सातवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *