भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा

हनुमंतपराक्रमवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन

धन्य धन्य तें ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता हनुमंत ।
सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥ १ ॥
सौमित्र वाची ब्रह्मलिक्जित । ऐकतां पत्रिकेचा अर्थ ।
श्रीराम स्वानंदे डुल्लत । हनुमंतचरित्र परिसोनी ॥ २ ॥
शुद्धि न लभे सीता सती । कळी लाविली लंकेप्रती ।
सभा नागविली रात्रीं । हनुमंत ख्याती तें ऐका ॥ ३ ॥
हनुमंताचें आचारित । अचळ समूळ समस्त ।
ब्रह्मयानें लिहिलें ब्रह्मलिखित । सावचित्त अवधारा ॥ ४ ॥

गुप्त राहून हनुमंताने नगराता केलेला हलकल्लोळ

गुप्त राहोनि नगरद्वारीं । वानरचेष्टा नानापरी ।
कलहो लाविला निशाचरीं । कपिकुसरी ते ऐका ॥ ५ ॥
पुच्छीं गोंवोनि नगरनारी । कलशस्फोट राजद्वारीं ।
भरलिया जाऊं देना घागरी । तोटा नगरीं उदकाचा ॥ ६ ॥
राजा – निमाला दशकंठ । त्याचेनि नावें घटस्फोट ।
राजद्वारीं होती स्पष्ट । नारी व्यथिष्ट कळकळती ॥ ७ ॥
गजारूढ गजपती । त्या गजांची खुंटली गती ।
मागील महामत्त हस्ती । आणि त्यांप्रती संग्रामा ॥ ८ ॥
गज भिडती गजांसी । महावत महावतांसी ।
कपि गुप्तत्वें बांधोनि पुच्छांसीं । दोनी तोंडघशीं आदळती ॥ ९ ॥
गज आदळतां तडफडती । वीर रगडले चरफडती ।
राजद्वारीं ऐशा रीतीं । कलहप्राप्ती कपिपुच्छें ॥ १० ॥
अश्वस्वाराचिया हारी । हो हो मा मा जी जी करी ।
नाचती चंव पायांवरी । राजद्वारीं कपि पाडी ॥ ११ ॥
अश्व पाडोनि ऐसे रीतीं । हनुमान गांजी कलहप्राप्ती ।
तैसेचि अतिरथी महारथी । गांजी मारूती गुप्तत्वें ॥ १२ ॥
पुढील मल्लाची शेंडी ओढी । मागील मल्ल त्यावरी पाडी ।
मल्लविद्या कडोविकडी । केली बापुडी हनुमंतें ॥ १३ ॥
मल्ल अति बळें उन्मत्त । परस्परें कलहो होत ।
हनुमंतें करोनि घात । पाडिले कुंथत राजद्वारीं ॥ १४ ॥
विवादती वेदपाठक । सानुनासिक अनुनासिक ।
रामस्मरणीं नाहीं विवेक । निर्नासिक कपि मानी ॥ १५ ॥
अस्मात् कस्मात् उपपत्ती । विद्वांसी विवेकयुक्ती ।
नामस्मरणीं नाही मती । मानी मारूती भूभार ॥ १६ ॥
प्रधान गर्वे अति सन्मानीं । बैसोनि येतां सुखासनीं ।
हनुमान अत्यंतविंदानी । भोयांचे कानीं भोवंडी पुच्छ ॥ १७ ॥
भोई ओसरता दचकोनी । धूर आदळतां धरणीं ।
धुळी निघालीसे वदनीं । दंतभग्नी कुंथत ॥ १८ ॥
रायापासीं अति सन्मान । त्यांसी राजद्वारीं अपमान ।
हांसताती लंकेचे जन । तेणें प्रधाना क्षोभले ॥ १९ ॥
सघृतभातें चौशेरी । उंच वरान्न भोजन घरीं ।
आम्हांसी पाडिलें राजद्वारीं । सुबद्ध मारी भोयांतें ॥ २० ॥
भोई म्हणती ऐका मात । व्यर्थ का करा आमुचा घात ।
सीतेनें सोडिला पुच्छकेत । दंतभग्नार्थ तेणें तुम्हा ॥ २१ ॥
सीता आहे लंकेप्रती । नगरलोक अनुवादती ।
कोणे ठायीं नेमे निश्चितीं । शुद्धि मारूती न लभेचि ॥ २२ ॥
ऐसें करितां जाली राती । शुद्धि साधावया सीता सती ।
निघाला रावणसभेप्रती । केली ख्याती ते ऐका ॥ २३ ॥
सिंहासनीं दशशिर । सभेंसीं निशाचर वीर ।
निकट प्रधान आणि कुमर । सभा सुंदर शोभत ॥ २४ ॥
सभेंसीं येवोनि घरटीकार । करोनि रावणासी जोहार ।
सांगती नगरींचा समाचार । विघ्न दुर्धर दिसताहे ॥ २५ ॥
मुख्य विघ्नांची पैं थोरी । अतर्क्य कलहो राजद्वारीं ।
गज रथ यांसी हारी । महावीरी अपमान ॥ २६ ॥
राजगृहीं अति सन्मान । पालखीपदस्थ प्रधान ।
शिबिका राजद्वारी भंगोन । दंतभग्न पावले ॥ २७ ॥
घटस्फोट राजद्वारीं । कळकळती नरनारी ।
उदकाचा तोटा नगरीं । घरोघरी आकांत ॥ २८ ॥
लोक जल्पती समसकट । नगरी निमाला दशकंठ ।
त्याचेनि नांवें घटस्फोट । नारी यथेष्ट कळकळती ॥ २९ ॥

दिवे मालवून सर्वत्र अंधार व त्याचे परिणाम

रावणें ऐकतां उत्तर । कोपा चढला दुर्धर ।
धरा मारा घरटीकार । अपवित्र अनुवादती ॥ ३० ॥
माझा सांगता विघ्नप्रकार । जरी मारिला घरटीकार ।
तरी मी हनुमान भूमिकार । केला चमत्कार तो ऐका ॥ ३१ ॥
सुगंधस्नेहदीपिका । कर्पूरदीपिका अनेका ।
अठरा लक्ष दोहीं बाहीं देखा । लखलखिता शोभत ॥ ३२ ॥
तंव वानरें पुच्छ हाणितां देख । विझविल्या दीपिका एकाएक ।
ऐसें पाहतां जनलोक । सभा सकळिक गजबजिली ॥ ३३ ॥
सभेसीं पडतां अंधार । जिंही बांधिला घरटीकार ।
ते धुमसोनि निशाचर । करी वानर मुक्त त्यासी ॥ ३४ ॥
घरटीकार करोनि मुक्त । सभेसी क्षोभला हनुमंत ।
जें जें केले अत्यद्‌भुत । सावचित्त अवधारा ॥ ३५ ॥
सभेसीं पडता अंधारीं । हनुमंते मांडिली चोरी ।
वस्त्रें अलंकारहारी । शस्त्रें वस्त्रें नागविलीं ॥ ३६ ॥
एक म्हणे नेलीं माझीं त्वां वस्त्रें । तो म्हणे नेलीं माझी शस्त्रें ।
भट्ट म्हणती नेलीं धोत्रें । गुप्त वानरें नागविलें ॥ ३७ ॥
कुंडलें घेतां कान तोडी । वस्त्रें घेतां डोळे फोडी ।
बाहुवटें घेतां बाहु मोडी । गांजी कडोविकडी राक्षसां ॥ ३८ ॥
मुकुट घेतां मस्तक फोडी । कटिसूत्रासाठीं माज मोडी ।
मुद्रिकानिमित्त आंगोळ्या तोडी । केलीं वेडीं राक्षसें ॥ ३९ ॥
कंठमाळा घेतां कंठ मुरडी । पदकासाठीं ह्रदय फोडी ।
नेसणीं घेतां लिंगें तोडी । केलीं बापुडी राक्षसें ॥ ४० ॥
नेसणीं सोडा रे लौकरी । नातरीं लिंगा होय बाहेरी ।
नपुसंकता संसारीं । कैशा परी सोसवेल ॥ ४१ ॥
पायीं बिरूदें वीरांची पूर्ण । तयांसाठीं मोडी चरण ।
बोंबलूं जातां छेदीं घ्राण । फें फें वचन राक्षसां ॥ ४२ ॥
येरयेरां सांगती बुद्धी । बोंबलूं नका रे त्रिशुद्धी ।
बोंबलूं जातां नाक छेदी । निःशब्दवादीं राहा उगे ॥ ४३ ॥
वस्त्रें अलंकार जोडती पुढें । तैसें नाक तंव ना जोडे ।
ख्याति लाविली माकडें । यरू दडे येरा मागे ॥ ४४ ॥
जें बोलिला घरटीकार । तें विघ्न आलें साचार ।
सीता क्षोभली दुर्धर । दशशिरवधार्थी ॥ ४५ ॥
जानकीक्षोभ अत्यद्‌भुत । तिणें सोडिला पुच्छकेत ।
रावण मेला किंवा जित । कोणी मात सांगेना ॥ ४६ ॥
रावण निमाला अंधारीं । विघ्न आलें त्याचियेवरी ।
बोंब पडली सभेमाझारी । आपांपरी राक्षसां ॥ ४७ ॥
मारिला इंद्रजित कुंभकर्ण । तयामागें येथें रावण ।
आतां धांवण्या धांवेल कोण । राक्षसगण कांपती ॥ ४८ ॥
पिता क्षोभला पवन । दीपिकांते जाय विझवोन ।
राक्षसां होताहे कंदन । दशानन निमाला ॥ ४९ ॥
भंगलें राजाज्ञेंचें सूत्र । सभेमाजी निघाले चोर ।
नागविले थोर थोर । निशाचर पळों पाहती ॥ ५० ॥
जो कोणी निघे सभेबाहेरी । त्यासी पुच्छ सुबद्ध मारी ।
अवघीं दडालीं अंधारीं । कोंडमारी राक्षसां ॥ ५१ ॥
सीता क्षोभली उद्‌भट । राक्षसां आलें अति संकट ।
बाहेरी जावया न फुटे वाट । मरण दुर्घट ओढवलें ॥ ५२ ॥
अंधारीं रावणाचा मुकुट । पुच्छाग्रीं ओढी मर्कट ।
तेणें धाकें दशकंठ । म्हणे मज शेवट पैं आला ॥ ५३ ॥
रावणाच्या उरीं शिरीं । हनुमान सुबद्ध टोले मारी ।
तेणें त्यासी आली अंधारी । धाकेंकरी न बोलवे ॥ ५४ ॥
अंधारीं न दिसे पैं व्यक्त । अंगीं वाजती अति आघात ।
तेणें भयें लंकानाथ । चळीं कांपत थरथरां ॥ ५५ ॥
सत्य बोलिला घरटीकार । विघ्न मज आलें साचार ।
गुप्त आघात दुर्धर । लागती निष्ठुर प्राणांत ॥ ५६ ॥
हनुमान सांगे दशशिर । तुवां चोरली सीता सुंदर ।
तुझें छेदावया शिर । आलों साचार मी रामदूत ॥ ५७ ॥

रावणावर प्रहार व त्याला ताकीद

रावणाचीं दश शिरें । हनुमान छेदिता नखाग्रें ।
परी वारिला होता श्रीरामचंद्रे । म्हणोनि वानरें सोडिला ॥ ५८ ॥
तुवां मारिल्या लंकानाथ । माझा पुरूषार्थ होईल व्यर्थ ।
ऐसें बोलिला रघुनाथ । तेणें हनुमंत न मारीच ॥ ५९ ॥
नागवोनि राक्षसपंक्ती । गांजोनियां लंकापती ।
सभेसीं लावोनियां ख्याती । मग मारूती निघाला ॥ ६० ॥
वानरें लावितांचि हात । रावण झाला मूर्च्छाभ्रांत ।
कपि कानीं जल्पिला गुह्यार्थ । लंकानाथ तो नेणे ॥ ६१ ॥
नांव ऐकतां हनुमंत । एक फळफळां मुतत ।
एकां सुटला अधोवात । जाला भ्रांत रावण ॥ ६२ ॥

श्रोत्यांचा हर्ष :

ऐसें वाचितां ब्रह्मलिखित । लक्ष्मण गदगदां हासत ।
वानरां मुरकुंडी वळत । हास्य करी श्रीराम ॥ ६३ ॥
गांजोनियां लंकापती । सभा नागविली काळे रातीं ।
ऐकतां हनुमंताची कीर्ती । श्रीरघुपति सुखावे ॥ ६४ ॥
सुखावला लक्ष्मण । सुग्रीव सुखावे संपूर्ण ।
सुखावले वानरगण । गाढी आंगवण हनुमंता ॥ ६५ ॥

हनुमंत अशोकवनात जातो :

गांजोनि सभेचा पुरूषार्थ । रावणा करोनि हताहत ।
आला अशोका वनाआंत । हनुमंत महाबळी ॥ ६६ ॥
सीतेसीं करावया एकांत । हनुमान वृक्षीं अति गुप्त ।
सीता विरहें विषयासक्त । लंकानाथ तेथें आला ॥ ६७ ॥

तेथे रावणाचे सीतेला आव्हान :

सीतेसी सांगे स्वयें रावण । माझें करावें त्वां वरण ।
तुज मी महिषी करीन । आण प्रमाण शिव साक्षी ॥ ६८ ॥
श्रीराम वनवासी हीन । राज्यभ्रष्ट अति दीन ।
त्याचें सांडोनियां ध्यान । राजा रावण वरीं सीते ॥ ६९ ॥
सीते तूं तंव समूळ वेडी । पाहें माझी प्रतापप्रौढी ।
देव जे कां तेहतीस कोटी । बांधवडीं पैं माझें ॥ ७० ॥
इंद्र बारी चंद्र कर्हेरी । वसंत सेजेचा फुलारी ।
रावणा मारिल्या सीता सुंदरी । सुरासुरीं वंदिजे ॥ ७१ ॥
मुख्य करोनि मंदोदरी । ऎंशीं सहस्त्र माझ्या नारी ।
त्या करीन तुझ्या किंकरीं । आज्ञाधारी सेवेंसीं ॥ ७२ ॥
माझें करावया वरण । तुज मी होतों अनन्य शरण ।
तुझे वंदितो मी चरण । पाणिग्रहण करीं माझें ॥ ७३ ॥
जो मी प्रतापी लंकानाथ । सुरनरां काळकृतांत ।
तुझा होतों शरणागत । त्यजीं रघुनाथ भजें मज ॥ ७४ ॥

रावणाला सीतेचे अत्यंत कडक शब्दात उत्तर

ऐकोनि रावणाचें वचन । सीता बोले हास्यवदन ।
जळो तुझें हें महिमान । काळें वदन लंकेशा ॥ ७५ ॥
स्वयंवरी वाहतां हरकोदंड । तुझें जाहलें काळें तोंड ।
श्रीरामें केले दुखंड । वृथा बळवंड जल्पसी ॥ ७६ ॥
बाळपणीं विंधोनि बाण । घेतला ताटकेचा प्राण ।
सुबाहु मारोनियां जाण । केला संपूर्ण गुरूयाग ॥ ७७ ॥
शूर्पणखा विटंबून । चवदा सहस्त्र राक्षसगण ।
मारिले त्रिशिरा खर दूषण । दिधलें जनस्थान द्विजांसी ॥ ७८ ॥
नाहीं रघुनाथा सारथी । श्रीराम एकला पदाती ।
तेणें येव्हढी केली ख्याती । तुझी अपकीर्ति तूं ऐकें ॥ ७९ ॥
सहितभवानी त्रिपुरारी । आंदोळिला कैसालगिरी ।
तो तूं श्रीरामभयेंकरीं । झालासी भिकारी सन्यासी ॥ ८० ॥
कपटी होवोनि संन्यासी । शेखीं परदारा चोरिसी ।
नाहीं पुरूषार्थ तुजपासीं । वृथा जल्पसी वाढीव ॥ ८१ ॥
श्रीराम परब्रह्मपुतळा । रावणा तूं काळा डोंबकावळा ।
सीता मानी त्याचे विटाळा । कल्पांतकाळी स्पर्शेना ॥ ८२ ॥
चोरितां श्रीरामनायिका । निंद्य जालासी तिहीं लोका ।
रावणा तूं तव शूकरमुखा । तुज मी देखा नातळें ॥ ८३ ॥
वायसाचा पांथीकर । जेंवी नव्हेचि चंद्रचकोर ।
तेंवी सांडोनि श्रीरामचंद्र । दशवक्त्र स्पर्शेना ॥ ८४ ॥
लक्ष्मणाचिया मर्यादारेखा । तूतें नुल्लंघवेचि दशमुखा ।
श्वान शूकर काळमुखा । तुज मी देखा स्पर्शेना ॥ ८५ ॥

त्या उत्तरामुळे रावण संतप्त :

साधु सज्जन सौम्य संत । कदा विष्ठेसी न लावी हात ।
तेंवी तूं अपवित्र लंकानाथ । तुज मी निश्चित स्पर्शेना ॥ ८६ ॥
ऐकोनि सीतेंचे वचन । वर्मीं खोंचला दशानन ।
जिव्हा सांडा रे छेदून । निंद्य वचन दिसताहे ॥ ८७ ॥
बळेंचि इसी मज भोगितां । कोण निवारील आतां ।
केंवी राखवेल रघुनाथा । सती परिव्रता पाहूं कैसी ॥ ८८ ॥

ते पाहून हनुमंताचा क्षोभ :

ऐसें बोलतां लंकानाथ । ऐकोनि क्षोभला हनुमंत ।
करावया रावणाचा घात । वृक्षाआंत खवळला ॥ ८९ ॥
टवकारिले नेत्रवाट । वळिला पुच्छाचा पैं साट ।
छेदावया दशकंठकंठ । बळें उद्‌भट गुरगुरी ॥ ९० ॥
मजदेखतां गांजी सीता । मी काय वार्तिकार आतां ।
रडत जावोनि सांगू रघुनाथा । नपुंसकता मज आली ॥ ९१ ॥
सीतेसी लावितांचि हात । जीवें मारीन लंकानाथ ।
येणें बळें हनुमंत । वृक्षाआंत गुरगुरी ॥ ९२ ॥
त्याची ऐकता गुरगुर । कापिंन्नला दशशिर ।
सीतारक्षणीं श्रीरामचंद्र । अति सत्वर पातला ॥ ९३ ॥

मंदोदरीचे तेथे आगमन व तिच्यासह रावणाचे आपल्या भुवनात गमन

रावण पडिला विचारीं । तंव पातली मंदोदरी ।
लंकापति धरोनि करीं । निजमंदिरी तो नेला ॥ ९४ ॥
गुज सांगे तयासी । अखंड राम सीतेपासीं ।
हात लाविता तियेसी । वृथा तूं मरसी रावणा ॥ ९५ ॥

सीतेचा अनुताप व शोक पाहून मारूती श्रीरामांची मुद्रिका तिच्या पुढ्यात टाकतो

ऐसी सांगतांचि गोष्टी । रावणा धुकधुकी लागली पोटीं ।
येरीकडे सीता गोरटी । वृक्षसंपुटीं विलपत ॥ ९६ ॥
लक्ष्मण छळितां श्रीरामभक्त । तेणें अंतरला श्रीरघुनाथ ।
मज आकळी लंकानाथ । भक्तच्छळण महापाप ॥ ९७ ॥
श्रीरामाज्ञेंचें रक्षण । मजपासी लक्ष्मण ।
त्याचें करितां म्यां छळण । बंदीं रावण मज घाली ॥ ९८ ॥
छळवाद्याचें वदन । कदा न पाहे रघुनंदन ।
मज सांडिलें निंद्य म्हणोन । शोकनिमग्न छळणार्थीं ॥ ९९ ॥
श्रीरामभक्ताचें छळण । पंचमहापापांहूनि दारूण ।
मज क्षोभला रघुनंदन । बंदीमोचन कोण करीं ॥ १०० ॥
श्रीरामभातां दुर्धर शर । लंका विध्वंसी साचार ।
रावण निर्दळी सहपरिवार । मज रघुवीर कोपला ॥ १०१ ॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । मशक बापुडें तें रावण ।
मज क्षोभला रघुनंदन । सखा लक्ष्मण छळितांचि ॥ १०२ ॥
न लागतां निमेषमात्र । श्रीराम वधिता दशवक्त्र ।
म्यां छळिला सखा सौमित्र । तेणें रघुवीर क्षोभला ॥ १०३ ॥
दासासी दंडण शिरोमुंडण । स्त्रियेसी दंडण उपेक्षण ।
ऐसें बोलोनि आपण । दीर्घ रूदन करी सीता ॥ १०४ ॥
श्रीरामें उपेक्षिलियापाठीं । जीवें जीत मी करंटी ।
प्राण द्यावया उठाउठीं । सीता गोरटी अनुतापी ॥ १०५ ॥
करितां श्रीरामस्मरण । स्वेद रोमांच अश्रुपूर्ण ।
सीतेसी करितां स्फुंदन । आलें रूदन हनुमंता ॥ १०६ ॥
कळवळ उपजली कपींद्रा । तेव्हां टाकिली श्रीराममुद्रा ।
मुद्रा देखोनि सीता सुंदरा । निद्रा तंद्रा विसरली ॥ १०७ ॥

मुद्रिका पाहून सीतेवर झालेला परिणाम

दोनी टवकारिले नयन । चिंता गेली हरपोन ।
मनी पांगुळलें मन । विस्मयपन्न जानकी ॥ १०८ ॥
श्रीराममुद्रेचा बडिवार । दुःख निर्दाळोनि समग्र ।
सुख द्यावें अपरंपार । चिदचिन्मात्र राममुद्रा ॥ १०९ ॥
दीपिकातेज अंधारयुक्त । श्रीराममुद्रा ग्रासी समस्त ।
करोनि शशिसूर्य खद्योत । प्रकाशवंत राममुद्रा ॥ ११० ॥
मुद्रिका शोभे नामेंकरीं । श्रीरामनाम मुद्रिकेवरी ।
राममुद्रिका बाह्यांतरीं । सीता सुंदरी स्वयें देखे ॥ १११ ॥
मुद्रिका पीठपत्रावळी । सहस्त्रनामप्रभावळी ।
अक्षरीं अक्षरें लिहिल्या ओळीं । अक्षरें न्याहाळी जानकी ॥ ११२ ॥
अक्षरीं अक्षरमुद्रिका । दशावतार त्यावरी टीका ।
जडित चरित्रमालिका । सुखदायका सीतेसी ॥ ११३ ॥
मुद्रिकागर्भ अति पवित्र । त्याहीमाजीं परत्पर ।
श्रीरामनाम निजाक्षर । क्षराक्षरातीत ॥ ११४ ॥
ऐसी मुद्रिका आनंदयुक्त । देखोनि सीता सद्गदित ।
नेत्रीं आनंदजळ स्त्रवत । रोमांचित जानकी ॥ ११५ ॥
मुख्यमुद्रा तें सुवर्ण । त्यावरी श्रीराम सुवर्णवर्ण ।
देखोनि मुद्रेचें महिमान । सुखसंपन्न जानकी ॥ ११६ ॥
तेथें चमत्कार जाहला । मुद्रा नव्हे श्रीराम आला ।
ऐसा सीतेसी भाव गमला । सरसाविला अंचळ ॥ ११७ ॥
श्रीराम आले एकाएकीं । लाजे जाली अधोमुखी ।
सर्वांगें हरिखली जानकी । सुखोन्मुखी डुल्लत ॥ ११८ ॥
केउता आहे लक्ष्मण । दुष्ट दुरूक्तीं केलें छळण ।
त्याचे केशीं झाडीन चरण । लोटांगण त्या माझें ॥ ११९ ॥
सवेंचि श्रीरामेंसीं गोडी । घ्या जी फोडी देईन विडी ।
आलेति मजकारणें तांतडीं । चरण झाडीन निजकेशीं ॥ १२० ॥
ब्रह्मलिखित निरूपम । सीताचरित्र अनुपम ।
ऐकतां श्रीरामा आलें प्रेम । अति संभ्रम तो ऐका ॥ १२१ ॥

त्या वर्णनाचा श्रीरामांवर झालेला परिणाम :

सीता देईं आलिंगन । म्हणोनि उठला रघुनंदन ।
पैल दिसे सीता चिद्रत्‍न । आली धांवोनि भेटावया ॥ १२२ ॥
दोनी बाह्या पसरोन । हर्षें धांवे रघुनंदन ।
सीता देखिली चिद्रत्‍न । आलिंगनालागून उभा असे ॥ १२३ ॥
ऐसा धांवतां रघुनंदन । विस्मयो पावती कपिगण ।
सुग्रीव पडिला मूर्च्छापन्न । मूर्च्छित लक्ष्मण पत्रार्थी ॥ १२४ ॥
हर्षे ओसंडे रघुनाथ । पदोपदीं होय नाचता ।
धन्य सुदिन हनुमंता । माझी मज सीता भेटाविली ॥ १२५ ॥

श्रीरामांची शोकाकुल अवस्था पाहून मारूतीला खेद व उड्डाण करण्यासी तयारी

ऐकोनि म्हणे हनुमंत । थोर चुकलो मीं तेथ ।
सीता आणितों जरी येथ । श्रीरघुनाथ सुखावता ॥ १२६ ॥
अति अनुताप हनुमंता । चुकलों मी सर्वथा ।
मज काय आली नपुसंकता । निमेषें सीता आणीन ॥ १२७ ॥
क्षण एक धीर धरीं रघुनाथा । सवेग आणीन मी सीता ।
चरणीं ठेवोनियां माथा । होय उडता हनुमंत ॥ १२८ ॥

श्रीराम हनुमंताचे सांत्वन करितात

वेगें उडतां हनुमंता । उमज पडला श्रीरघुनाथा ।
स्वयें धांवोनि होय धरिता । ऐक आतां सांगेन ॥ १२९ ॥
ब्रह्मलिखित ऐकतां । प्रेम उसळलें चित्ता ।
दुश्चित तें वदलों सीता सीता । तुवां त्या अर्था नवजावें ॥ १३० ॥
घेवोनि श्रीरघुनाथ । वेगें उडों पाहे हनुमंत ।
अंगदें देखोनि तो अर्थ । धांवोनि धरित हनुमंता ॥ १३१ ॥
अंगद श्रीरामांसवेत । उडों पाहे हनुमंत ।
तें देखोनि जांबुवंत । स्वयें धरित तिघांसीं ॥ १३२ ॥
घेवोनिया तिघे जण । हनुमान करूं पाहें उड्डाण ।
सुग्रीव होवोनि सावधान । धरी धांवोन हनुमंता ॥ १३३ ॥
सुग्रीवाही समस्त । उडों पाहे हनुमंत ।
तों लक्ष्मणें धांवोनिया तेथ । आंवरीत निजबळें ॥ १३४ ॥
स्फुरणें खवळला हनुमंत । अंगद सुग्रीवा जांबवंत ।
रामलक्ष्मणांसमवेत । लंकेआंत नेवों पाहे ॥ १३५ ॥
पंच फळें वृक्षावरी । तेंवी पांच वीर ते अवसरीं ।
नेवों पाहे लंकेभीतरीं । तेही परी अवधारा ॥ १३६ ॥
श्रीराम मारील रावण । इंद्रजित मारील लक्ष्मण ।
आम्ही मर्दूं राक्षसगण । सीता घेवोन येवों सुखें ॥ १३७ ॥
ऐसें कपीचें मनोगत । जाणोनियां श्रीरघुनाथ ।
हनुमंताचे चरण धरित । क्षमा निश्चित पैं कीजे ॥ १३८ ॥
श्रीरामें धरितां चरण । हनुमान घाली लोटांगण ।
तुझी आज्ञा अणुप्रमाण । प्राणांतीं आपण नुल्लंघीं ॥ १३९ ॥
तुज कळली सीतेची अवस्था । तिसी आणावया शीघ्रता ।
धीटपण केले म्यां आतां । क्षमा सर्वथा मज कीजे ॥ १४० ॥
ऐसें बोलोनि आपण । धरिले श्रीरामाचे चरण ।
रामें दिधलें आलिंगन । समाधान स्वामिभक्तां ॥ १४१ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंताचे बळ संपूर्ण ।
सुग्रीव आणि लक्ष्मण । वानरगण वानिती ॥ १४२ ॥
बळ अद्‌भुत हनुमंता । पुढील सीतेची अवस्था ।
ब्रह्मलिखिताची कथा । सावधान अवधारा ॥ १४३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितहनुमंतपराक्रमवर्णनं नाम सप्तविंशतितमोऽध्याया : ॥ २७ ॥
॥ ओव्यां १४३ ॥ श्लोक – ॥ एवं संख्या १४३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सत्ताविसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *