भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा

सीतेचा शोध करून हनुमंताचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लंकादहन झाल्यावर सीतेची आज्ञा घेऊन मारूती परत येण्यास निघाला :

आश्वासोनि श्रीरामकांता । भेटावया श्रीरघुनाथा ।
हनुमंत होय निघता । तेचि कथा अवधारा ॥ १ ॥
लंकादहन करोनि संपूर्ण । हनुमंतासी करितां गमन ।
घ्यावया सीतेंचें दर्शन । आला परतोन तीपासीं ॥ २ ॥
सीता सर्वांगीं अक्षत । पाहोनियां सावचित्त ।
हनुमंत हर्षयुक्त । निघे त्वरित तें ऐका ॥ ३ ॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । हनुमंतासीं त्वरा मोठी ।
वंदोनि सीता गोरटी । उठाउठीं निघाला ॥ ४ ॥
वेगीं उल्लंघावया सागर । चौफेर अवलोकी वानर ।
देखिला अरिष्ट गिरिवर । तेथे सत्वर वळंघला ॥ ५ ॥
सकळ असिष्टां आधार । यालागीं अतिष्ट गिरिवर ।
अनुवादती ऋषीश्वर । त्याचा विस्तार अवधारा ॥ ६ ॥

अरिष्ट पर्वतावरून उड्डाण, त्या दडपणामुळे पर्वत जमीनदोस्त झाला

दश इंद्रियीं विक्षेपकता । दशयोजन रूंदी पर्वता ।
वासनविस्तार ऊर्ध्वता । शतयोजनता ते उंची ॥ ७ ॥
जागृति स्वप्न सुषुप्तिता । श्रीरामस्मरण हनुमंता ।
यालागीं चढला अरिष्टमाथां । हाणी लाता नामनेटें ॥ ८ ॥
पूर्ण कृपा श्रीरघुनाथा । पूर्ण प्राप्ती ते हनुमंता ।
चढोनि अरिष्टाचे माथां । हाणी लाता नामनेटें ॥ ९ ॥
हनुमंताचें नामनेट । उड्डाणाचा कडकडाट ।
पृथ्वींत रूपला अरिष्ट । केला सपाट भूमिसम ॥ १० ॥
वृक्षशिखरें समसगट । भूमीं दाटला गिरिकूट ।
श्रीरामभजनीं निजनिष्ठ । केला सपाट हनुमंतें ॥ ११ ॥
हनुमान रामनामें आतुर्बळीं । उड्डाणाच्या कल्लोळीं ।
अरिष्ट मेळविला धुळी । करोनि रांगोळी नामनेटें ॥ १२ ॥

भगवद्‌भजनमहिमा :

स्वयें अरिष्टाचिये माथां । निर्दळणें हाणोनि लाता ।
हें ब्रीद साजे हनुमंता । श्रीरघुनाथाचेनि भजनें ॥ १३ ॥
परम भाग्याची भाग्यस्थिती । मनुष्यजन्मातें नर येती ।
शोधितसत्वाची सत्ववृत्ती । जन्म पावती ब्राह्मणाचा ॥ १४ ॥
तेथेंही वेदशास्त्रव्युत्पत्ती । जेणें परब्रह्म आतुडे हातीं ।
ती सांडोनि मूढमती । बुद्धि यदर्थीं अति योग्य ॥ १५ ॥
मुक्तत्वाचा निजाभिमान । वाग्वादीं अति निपुण ।
नाहीं भगवद्‌भावभजन । अलोट पतन तयांसी ॥ १६ ॥
येवोनि ब्रह्मप्राप्तीचे घरा । मुक्ताभिमान नागवी नरा ।
भार भगवद्‌भजनीं पाठिमोरा । ऐशिया नरा अधः पात ॥ १७ ॥
भगवद्‌भजनीं जो पाठिमोरा । त्यासी जन्ममरणयेरझारा ।
कोट्यनुकोटि योनिद्वारा । अधः पात खरा त्या नांव ॥ १८ ॥
करेनि पत्रावलंबन । परीक्षा म्हणे माझें ज्ञान ।
हें ज्ञान कीं ज्ञानाभिमान । अधः पतन तयासी ॥ १९ ॥
अहंसोहं कोहं अभिमान । भक्त न धरती अति सज्ञान ।
त्यासी बंधू न शके विघ्न । विघ्नासी दमन श्रीरामनाम ॥ २० ॥
रामनामाच्या निजशक्ती । भक्त विघ्नमाथां चढती ।
शेखीं विघ्न निर्दाळिती । नित्यनिर्वृती रामनामें ॥ २१ ॥
चारा घालोनि मुखाआंत । जेंवी पक्षिणी पिलीं पोशित ।
तेंवी आपुले निजभक्त । रक्षी भगवंत अहर्निशीं ॥ २२ ॥
विघ्न न येचि नामापासीं । तें केवीं ये भक्तापासीं ।
भगवंत रक्षी अहर्निशीं । विघ्न भक्तांसी निर्विघ्न ॥ २३ ॥
विघ्न करूं ये छळनार्थ । विघ्नाचा आत्मा तो भगवंत ।
विघ्न निर्विघ्न होय तेथ । भूतें भगवद्रूप भक्तांसीं ॥ २४ ॥
सर्वभूतीं भगवद्‌भाव । तेथें विघ्नासीं कैंचा ठाव ।
विघ्नीं विघ्नत्वा अभाव । विघ्न स्वयमेव देव झाला ॥ २५ ॥
भगवद्‌भावें चालतां भक्तां । विघ्नें ओढविती मांथा ।
ऐसी हरिभक्ति हनुमंता । श्रीरघुनाथाचेनि नामें ॥ २६ ॥

व अशा रीतीने अरिष्ट पर्वत परब्रह्मी प्रविष्ट झाला :

श्रीरामनामें हनुमान बळीं । अरिष्ट पर्वत पायांतळीं ।
करोनियां पैं रांगोळी । मिळविला धुळी हरिनामें ॥ २७ ॥
अरिष्टाचें भाग्य श्रेष्ठ । लागतां हनुमंताचा अंगुष्ठ ।
विरोनियां गिरिकूट । जाला प्रविष्ट परब्रह्मा ॥ २८ ॥
अरिष्टाची भाग्यावळी । हनुमंताचें पायांतळीं ।
नुरेचि भूतळीं पाताळीं । मिनला तत्काळीं परब्रह्मा ॥ २९ ॥
दशशतयोजन विस्तार । नामें अरिष्ट गिरिवर ।
हनुमंतें हाणोनि पादप्रहार । केला उद्धार अरिष्टाचा ॥ ३० ॥
कपीनें हाणोनि पांपरा । जडत्व दवडोनि भूधरा ।
ऐक्य केलें धराधरा । गिरिवरा अरिष्टा ॥ ३१ ॥
करावया अरिष्टाचा उद्धार । श्रीरामभक्त हनुमंत वीर ।
जो करी जडाचा उद्धार । तोचि साचार हरिभक्त ॥ ३२ ॥
धरा धरी तो धराधर । त्यासीं अरिष्टाचा ऐक्याकार ।
श्रीरामभजनें करी वानर । जगदुद्धार हनुमंतें ॥ ३३ ॥
पुढील कथेची संगती । समुद्र लंघावया मारूती ।
चढला अरिष्ट पर्वतीं । तेही उपपत्ती अवधारा ॥ ३४ ॥

त्याचा व या कथेचा संबंध :

हनुमान उडतां महाबळी । पर्वत दडपला पायांतळीं ।
सर्प दडपती पाताळीं । वमिती ते काळीं विषगरळा ॥ ३५ ॥
भारें दडपला पर्वतु । श्वेत पीत आरक्त धातु ।
स्त्र्वोनि निजशोभा शोभतु । जेवीं वसंत निजसुमनीं ॥ ३६ ॥
जेंवी पर्वत पक्षमेळीं । जैसा कपि जातसे नभोमंडळीं ।
असे अडकलीं बाहुमूळीं । वक्षःस्थळीं कपीच्या ॥ ३७ ॥
उत्तरीयवास राजलीळा । वानरा आली राजकळा ।
सुनीळ भासतसे नीळा । घनसांवळा मारूती ॥ ३८ ॥
अभ्रें अडकलीं हनुमंता । आंगा आली घनश्यामता ।
पावला श्रीरामसारूप्यता । भासें समस्तां सुरसिद्धा ॥ ३९ ॥
देखोनियां महेंद्रगिरी । हर्ष कोंदला वानरीं ।
प्रळयांबुदगिरागजरीं । भुभुःकारीं गर्जिन्नला ॥ ४० ॥
श्रीरामचापीं सुटला शर । तैसा लंघीत सागर ।
सवेग जातसे वानर । सुरासुर विस्मित ॥ ४१ ॥
नाद कोंदला अंबरीं । नाद कोंदला सागरीं ।
नाद कोंदला कपींद्रीं । जे महेंद्रीं राहविलें ॥ ४२ ॥

मारूतीच्या उड्डाणाचा नाद ऐकून महेंद्रा पर्वतावरील वानरांना हर्ष

ऐकोनि गिरागजर । महेंद्रीं राहिले होते वानर ।
तेही सावधान होती समग्र । तैसें गंभीर गर्जिन्नला ॥ ४३ ॥
गजर ऐकोनि अत्यद्‌भुत । वानरां सांगे जांबवंत ।
पैल आला रे हनुमंत । सीताशुद्ध्यर्थ लक्षोनी ॥ ४४ ॥
साधोनियां सीताशुद्ध्यर्थ । हर्षे गर्जे हनुमंत ।
अंगदादि वानरांआंत । सांगे जांबवंत दूतचिन्ह ॥ ४५ ॥
कार्य न साधितां जाण । मुख्य दुश्चित्त म्लानवदन ।
त्याचे वाचेसीं पडे मौन । गिरागर्जन त्या कैंचें ॥ ४६ ॥
सीताशुद्धीचा इत्यर्थ । साधूनि आला हनुमंत ।
तेणें आल्हादें गर्जत । केला निश्चायार्थ जांबवंतें ॥ ४७ ॥
ऊरूवेग बाहुवेग । हनुमंताचा लागवेग ।
कार्य साधोनियां सांग । येतो सवेग मारूती ॥ ४८ ॥
ऐसा जांबवंती इत्यर्थ । ऐकोनि वानर समस्त ।
अत्यंत आल्हादे नाचत । सीताशुद्ध्यर्थ साधला ॥ ४९ ॥

सर्व वानरांकडून हार्दिक स्वागत :

साधूनि सीताशुद्ध्यर्थ । पैल आला रे हनुमंत ।
इंद्रकीळ नीळपर्वत । तैसा शोभत मारूती ॥ ५० ॥
येतां देखोनि हनुमंत । वानरवीर हर्षयुक्त ।
उभे ठाकले समस्त । उभय हस्त जोडोनी ॥ ५१ ॥
फळीं पुष्पीं वृक्षयुक्त । महेंद्रगिरि सुशोभित ।
हनुमंत स्ववेगें आला तेथ । वानर जेथ उभे असती ॥ ५२ ॥
एकें उड्डाणें हनुमंत । समुद्र लंघोनि समस्त ।
वेगें आला महेंद्रांत । वानर जेथ उभे असती ॥ ५३ ॥
धावतां हनुमंताचेनि वेगें । वायु टणकोनि राहिला मागें ।
मनोवेगाहूनि वेगें । आला सवेग मारूती ॥ ५४ ॥
नाहीं लागली पैं धाप । नाहीं स्वेद नाहीं कंप ।
श्रीराम स्मरतां चिद्रूप । आला सुखरूप हनुमंत ॥ ५५ ॥
जैसा श्रीरामाचा बाण । कार्य साधोनि संपूर्ण ।
परतोनि हाता ये आपण । तैसें आगमन कपीचें ॥ ५६ ॥
नळ नील जांबुवंत । अंगदादि वीर समस्त ।
त्यांतें देखोनि हनुमंत । नाम गर्जत आनंदें ॥ ५७ ॥
श्रीराम जयराम या गजरीं । हनुमान गर्जत अंबरीं ।
वानरीं गर्जविला गिरी । नामोच्चारीं जय जय राम ॥ ५८ ॥
श्रीराम जय राम नाम । गर्जताती प्लवंगम ।
नादें गर्जवीत व्योम । आला सप्रेम हनुमंत ॥ ५९ ॥
नामें कोंदलें अंबर । नामें कोंदलें गिरिकंदर ।
करीत नामाचा गजर । आला वानर हनुमंत ॥ ६० ॥
देखोनिया वानरगण । करीत श्रीरामाचे स्मरण ।
हनुमान घाली लोटांगण । वंदीत चरण सर्वांचे ॥ ६१ ॥
साधोनि आलों सीताशुद्ध्यर्थ । गर्व नाहीं हनुमंतांत ।
ज्यातें त्यातें अभिवंदित । भूतीं भगवंत देखोनि ॥ ६२ ॥
वृद्धत्वें जांबुवंत गुरू । प्रथम त्यासी नमस्कारू ।
अंगद जो कां राजकुमरू । केला नमस्कारू तयासी ॥ ६३ ॥
एवं युक्तपरंपरा । हनुमान वंदित वानरां ।
तेणें आल्हाद समग्रां । पवनपुत्रा देखोनि ॥ ६४ ॥
सन्मानोनि हनुमंतातें । मध्ये बैसवोनि तयातें ।
वानर बैसले सभोंवते । सीताशुद्धीतें पुसावया ॥ ६५ ॥
जांबुवंतादि पूज्य समस्त । तिहीं पूजिला हनुमंत ।
तेणें आल्हादें सांगत । सीताशुद्ध्यर्थ साक्षेपें ॥ ६६ ॥
लंका नगरी वसें सागरीं । तेथें रावण राज्य करी ।
तेथील प्रवेश अंटक भारी । सुरासुरीं दुर्धर ॥ ६७ ॥
रामनामाचे निजनेटें । उड्डाण करोनियां नेटें ।
लंका शोधिली त्रिकूटें । समसगटें पुरगृहें ॥ ६८ ॥
रावणाच्या निजभवनीं । सीता भेटली अशोकवनीं ।
तियें धाडिलें खूण देउनी । मस्तकमणि हा सीतेचा ॥ ६९ ॥
मणि देखोनि अलंकार । वानरीं केला जयजयकार ।
रामनामाचा गजर । नामें वानर गर्जती ॥ ७० ॥
सीता भेटली साचार । मणि मस्तकालंकार ।
तें देखोनिया वानर । केला भुभुःकार स्वानंदे ॥ ७१ ॥

वानरांचा हर्षातिरेक व लीळा वा हनुमंताची भेट

वृक्षींहोनि वृक्षांतरी । पर्वताहोनि पर्वतावरी ।
हरीखें उडिजे वानरीं । सीता सुंदरी सांपडली ॥ ७२ ॥
श्वेत सुनीळ आरक्त । शाखा कपिपुच्छीं पुष्पित ।
जैशा वस्त्रगुढिया गगनाआंत । तैसी शोभा कपिपुच्छीं ॥ ७३ ॥
फळित पुष्पित शाखांवरीं । पुच्छगुढिया गगनांतरीं ।
उभवोनि नाचिजे वानरीं । सीता सुंदरी सांपडली ॥ ७४ ॥
सीतामस्तकींचे मणिरत्‍न । पहावया अवघे जण ।
हरिखें करोनि उड्डाण । वानरगण दाटले ॥ ७५ ॥
मस्तकमणि देखोनि डोळा । हरिख वानरां सकळां ।
पुच्छ उभविती अंतराळां । स्वानंदलीळा नाचती ॥ ७६ ॥
येरयेरां हाणिती धडका । येरयेरां लाविती चडका ।
येरयेरां देती धक्का । पाडिती देखा येरयेरां ॥ ७७ ॥
येरयेरां दाविती वांकुल्या । येरयेरां गटांगुळिया ।
येरयेरां गुदगुदलिया । कर्णांगुळिया येरयेरां ॥ ७८ ॥
येरयेरां कौतुकीं । जानुघातें हाणिती ढक्की ।
येरयेरां हाणिती बुक्की । वानर हर्षी उपरमोनी ॥ ७९ ॥
येरयेरां निंखंदिती । येरयेरां उपहासती ।
येरयेरां निर्भत्सिती । वीर गर्जती आल्हादें ॥ ८० ॥
एक कळकिळती वानरजाती । एक रामनामें गर्जती ।
एक भुभुःकार देती । सीता सती सांपडली ॥ ८१ ॥
अधीं मधीं हनुमंता । कोण वंदील पाहों आतां ।
उडिया टाकोनि असंख्यता । चरणीं माथा ठेविती ॥ ८२ ॥
जीव देणें हे गोड गोष्टी । हनुमान वीर जगजेठी ।
शुद्धि आणिली उठाउठी । वानरकोटी नाचती ॥ ८३ ॥
विचित्र शाखा धरोनि पुच्छाग्रीं । पुच्छ उभवोनि अंबरीं ।
वानर नाचती सुखोद्गारीं । सीता सुंदरी सांपडली ॥ ८४ ॥
वानरीं मिळोनि एकमेळीं । रामनामाच्या कल्लोळीं ।
अवघीं पिटोनिया टाळी । हनुमानाजवळी मिनले ॥ ८५ ॥
वानरीं मिळोनि समस्त । हनुमंताची स्तुति करित ।
अनुक्रमे आलिंगित । अभिवंदित स्वानंदें ॥ ८६ ॥

अंगादाची सविस्तर वृत्त निवेदन करण्याची विनंती

अंगदयुवराज प्रज्ञावंत । नळ नीळ पनस जांबवंत ।
गज गवय गवाक्षयुक्त । जुत्पती समस्त बैसले ॥ ८७ ॥
मध्यें बैसविला हनुमान वीर । घायीं सर्वांग जर्जर ।
तें देखोनि वीर झुंझार । विस्मयो थोर पावले ॥ ८८ ॥
हनुमंत हा वज्रदेही । तोही ओरखडला घायीं ।
दारूण युद्ध जालें पाहीं । कपीतें कांहीं सांगेना ॥ ८९ ॥
आणिकही वानरभार । देखोनि हनुमान घायी जर्जर ।
म्हणती युद्ध घोरांदर । अति दुस्तर येणें केलें ॥ ९० ॥
ऐकावया हनुमंताचे रण । वानरां येतसे स्फुरण ।
करोनि सीताशुद्धिप्रश्न । रणकंदन पुसावें ॥ ९१ ॥
हा तंव बलाढ्य स्वयें । हनुमंतें युद्ध केलें आहे ।
हनुमंताचे निजघाये । कोण साहे रणरंगीं ॥ ९२ ॥
सिंह बोराटी ओरबडे । तैसे शस्त्रांचे वरखडे ।
हनुमंताचे मागेंपुढें । चहूंकडे दिसताती ॥ ९३ ॥
आपुलें युद्धाची निजख्याती । स्वमुखें न सांगे मारूती ।
सीताशुद्धीच्या प्रश्नोक्तीं । युद्धव्युत्पत्ती पुसावी ॥ ९४ ॥
अंगद जो कां युवराजा । वार्ता पुसे पवनात्मजा ।
कैसेनि भेटली रामभाजा । समूळ ओजा मज सांगें ॥ ९५ ॥
कोणे भुवनीं कोणे स्थानीं । तुज भेटली सीता जननी ।
कैसेनि दिधला मस्तकमणी । समूळ कहाणी मज सांगें ॥ ९६ ॥
ऐकोनि अंगदाचा प्रश्न । हनुमंत परम विचक्षण ।
सीताशुद्धीचें लक्षण । स्वमुखें आपण सांगत ॥ ९७ ॥

हनुमंताचे संक्षेपाने कथन :

अंगदाचें शुभवचन । ऐकोनि हनुमंत हास्यवदन ।
सीताशुद्धीचें लक्षण । करोनि गौरवा सांगत ॥ ९८ ॥
अंगद युवराजा समर्थ । नळ नीळ जांबुवंत ।
ऐका वानरवीर समस्त । सीताशुद्ध्यर्थ संक्षेपे ॥ ९९ ॥
लंकादुर्ग अति दुर्धर । सभोंवता समुद्र दुस्तर ।
त्यामाजी रावणाचें नगर । लंकापुर ज्या नांव ॥ १०० ॥
तेथें रिघतां अति दुर्घट । मीहि पावलों परम कष्ट ।
नामें निरसोनि संकट । विघ्नें सपाट रामनामें ॥ १०१ ॥
त्याहीमाजी रावणभुवन । त्याहीमाजी राणिवसा गहन ।
त्याहीमाजी अशोकवन । सीताचिद्रत्‍न त्यामाजी ॥ १०२ ॥
सीते पासीं संरक्षण । कराळ विक्राळ दारूण ।
भयानका राक्षसीं रक्षण । तेथें कोण रिघों शके ॥ १०३ ॥
दुष्ट दुर्मुख दारूण । ब्रह्मराक्षस रक्षोगण ।
सप्तावर्तीं भ्यासुर पूर्ण । तेथें कोण रिघों शकें ॥ १०४ ॥
अशोकवन अति दुर्घट । वारया तेथें न फुटे वाट ।
तेथेंही रिघालों करूनि कष्ट । अनेक संकटें सोसूनी ॥ १०५ ॥
सीता स्वयमेव देखिली दृष्टी । तरी घेवों न शके भेटी ।
भोंवती राक्षसांची घरटी । वृक्षसंपुटी मी लपालों ॥ १०६ ॥
सीतानिजदुःखदर्शन । नाहीं आस्तरण ना प्रावरण ।
एक वस्त्र परिधान । अति मळिणा मळगंधी ॥ १०७ ॥
नाहीं स्नान ना भोजन । उपवासें कृश दीन ।
वेणी वळिली जटाबंधन । मंगलस्नान असेना ॥ १०८ ॥
तरी धन्य सीता सती । श्रीरामभजनीं अति प्रीती ।
जागृती स्वप्न आणि सुषुप्तीं । श्रीरामस्मृती विसरेना ॥ १०९ ॥
सीता सती सावधान । करितां श्रीरामस्मरण ।
वृक्ष वल्ली तृण पाषाण । श्रीरामभजन जपताती ॥ ११० ॥
धन्य सीतेची रामभक्तीं । सर्वेंद्रियीं श्रीरामस्फूर्तीं ।
राम देखें सर्वां भूतीं । त्रिजगतीं रामनामें ॥ १११ ॥
ऐसीं असतां सहजस्थिती । श्रीरामभेटीची अत्यासक्ती ।
मजलागीं ये काकुळती । श्रीरघुपति भेटवीं ॥ ११२ ॥
म्यां सांगितली गुह्य गोष्टी । श्रीरामा तुझी आवडी मोठी ।
मज धाडिलें शुद्धीसाठीं । सीता गोरटी कोठें आहे ॥ २१३ ॥
तुझी ठायीं पडलिया शुद्धी । घेवोनि वानरांची मादीं ।
श्रीराम येईल त्रिशुद्धी । दिधली मुदी रामाची ॥ २१४ ॥
मुद्रिका देखतांचि दृष्टीं । हरिखली सीता गोरटी ।
हरिखें माझी पाठी थापटी । जाईं उठाउठीं शुद्धी सांगें ॥ २१५ ॥
सखा जिवलग मज तूं आतां । तुझें चरणीं ठेवितें माथा ।
शीघ्र जावोनि हनुमंता । श्रीरघुनाथा आणावें ॥ २१६ ॥
शीघ्र करावया गमन । म्यां मागितलें अभिज्ञान ।
मस्तकमणि घेवोनि खूण । आलों धांवोनि तुम्हांपासीं ॥ २१७ ॥
लंकेसीं आहे सीता सती । शुद्धि म्यां आणिली निश्चितीं ।
विकल्प न धरावा चित्तीं । चला रघुपतीला शुद्धि सांगों ॥ २१८ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । वानरां तळमळ पूर्ण ।
न सांगेचि युद्ध दारूण । बुद्धि कोण करावी ॥ २१९ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । अंगद सुखावला आपण ।
सीताशुद्धि तुवां आणून । रामाचा प्राण वांचविला ॥ १२० ॥
वानरांच्या कोट्यनुकोटी । पडल्या होत्या प्राणसंकटीं ।
तुवां वांचविल्या उठाउठीं । शुद्धिसाठीं सीतेच्या ॥ १२१ ॥
धन्य जीवित्व हनुमंता । शुद्धि आणिली तत्वतां ।
हर्ष सांगावया रघुनाथा । उल्लासता अंगदा ॥ १२२ ॥
तंव बोलिला जांबवंत । निधडा वीर हा हनुमंत ।
कैसेनि भेटला लंकानाथ । युद्धकंदनार्थ कां जाला ॥ १२३ ॥

हनुमंताच्या शरीरावर शस्त्रांचे घाव
दिसल्यावरून जांबुवंत युद्धाचा वृत्तांत विचारतात

जांबुवंत म्हणे हनुमंता । तूं वज्रदेही तत्वतां ।
तुझे अंगीं देखों शस्त्रघाता । त्या युद्धार्था सांगावें ॥ १२४ ॥
रावण क्रूर आणि कपटी । कैसी त्यासीं जाली भेटी ।
सीता भेटली संकटीं । त्या गुह्य गोष्टी सांगाव्या ॥ १२५ ॥
तुवा गांजिला इंद्रजित । पिता पवन होता सांगत ।
त्या नीळासीं एकांत । पुत्रपुरूषार्थ तो वदला ॥ १२६ ॥
त्या युद्धाची समूळ कथा । कृपेनें सांगावी हनुमंता ।
समुद्रलंघनाची वार्ता । तेही तत्वतां सांगावी ॥ १२७ ॥
येचिविशीं हनुमंती । पूर्वीं बुद्धि स्फुरली होती ।
वार्ता पुसलिया श्रीरघुपती । स्वमुखें कीर्ति नये सांगों ॥ १२८ ॥
स्वामीनें पुशिलिया जाण । वार्ता वंचू नये आपण ।
वंचितांचि लागे दूषण । बुद्धि कोण करावी ॥ १२९ ॥
स्वमुखें सांगों नये कीर्ती । वंचूं नये स्वामीप्रती ।
ऐसिये संकटीं मारूती । प्रजापती विनविला ॥ १३० ॥

स्वतः चा पराक्रम स्वमुखाने वर्णन करणे अप्रशस्त म्हणून
हनुमंताचे विनंतीवरून ब्रह्मदेवाने पराक्रम वर्णनाचा लेख लिहिला

वंदोनि ब्रह्मयाचे चरण । हनुमंत विनवी पैं आपण ।
लंकेमाजी झालें वर्तन । पत्र एल्होन मज द्यावें ॥ १३१ ॥
स्वामीपासीं निजपुरूषार्थ । जो सांगे तो मूर्खोन्मत्त ।
वंचितां पावे अधः पात । हा शास्त्रार्थ स्वामीचा ॥ १३२ ॥
नाहीं दुसरा सांगाती । तो सांगता माझी कीर्ति ।
मज माझी पडली गुंती । पत्र तदर्थीं मज द्यावें ॥ १३३ ॥
माझा समस्तही पुरूषार्थ । ब्रह्महस्तींचें ब्रह्मलिखित ।
सत्य मानील श्रीरघुनाथ । निश्चितार्थ मज माजा ॥ १३४ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । हासिंन्नला चतुरानन ।
परम प्रीतीं आलिंगून । पत्र लेहोन दिधलें ॥ १३५ ॥
वीर शूर गुणगंभीर । शास्त्रवेत्ता आणि चतुर ।
समयोचित जाणोनि विचार । निधडा वीर हनुमंत ॥ १३६ ॥
उल्लासोनि प्रजापती । आदरें स्तवोनि मारूती ।
अत्यंत कपीची ख्याती । पत्र प्रीती दिधलें ॥ १३७ ॥
तेंचि ब्रह्मपत्र घेवोनि हातीं । उल्लासें उडोनि मारूती ।
वंदोनियां सीता सती । वानरांप्रतीं स्वयें आला ॥ १३८ ॥

त्या लेखाचा अर्थ कळणार नाही म्हणून त्याचे वाचन
श्रीरामांशिवाय करणे अयोग्य म्हणून तो तसाच ठेविला

जांबवंतें पुसतां ख्याती । ब्रह्मलिखित दिधलें हातीं ।
रिसासी नव्हे अर्थप्राप्ती । पडली गुंती गुणगुणित ॥ १३९ ॥
लक्ष्मणासीं वाचनशक्तीं । तो तंव शेषावरतारमूर्तीं ।
कां अर्थ जाणें श्रीरघुपती । येरांची युक्ति सरेना ॥ १४० ॥
जांबवंताची बुद्धि कैसी । अर्थ न कळे आपणासी ।
कळों नेदीच वानरांसी । युक्ति विशेषीं चालविली ॥ १४१ ॥
ब्रह्मलिखित संपूर्ण । श्रीरामावांचोन आपण ।
वाचितां लागे दूषण । पत्र घेवोन तेथें जावें ॥ १४२ ॥
बैसवोनि श्रीराममूर्ती । बैसवोनि सुग्रीव कपिपती ।
पत्र देवोनि सौमित्राप्रती । अर्थयुक्तीं वाचावें ॥ १४३ ॥
युक्ति मानली समस्तां । शुद्धि सांगोनियां सीता ।
अवश्य भेटावें श्रीरघुनाथा । मग पत्रार्था वाचावें ॥ १४४ ॥
ऐसा करोनि संप्रधार । उठिला वानरांचा भार ।
अवघी केला जयजयकार । श्रीरामचंद्र लक्षोनी ॥ १४५ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतासी रामदर्शन ।
आनंदें ओसंडले गगन । सुखसंपन्न श्रीराम ॥ १४६ ॥
वाचितां ब्रह्मलिखितार्थ । उल्लासेल श्रीरघुनाथ ।
वानरां वानरां उल्लास अद्‌भुत । तो कथार्थ अवधारा ॥ १४७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताशुद्धिहनुमदागमनं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥
॥ ओव्यां १४७ ॥ श्लोक ३५ ॥ एवं संख्या १८२ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय तेविसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *