भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय बाविसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय बाविसावा

रावणाची सुटका

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची दुर्दशा :

माहिष्मतीनामें नगरी । तेथें सहस्त्रार्जुन राज्य करी ।
तयाचे बंदीं श्रीराघवारी । कित्येक दिवस पडियेला ॥१॥
श्वानावाणी शूकरावाणी । जाई मार्गे खरावाणी ।
दाही शिरीं वाहे पाणी । अनालागोनी रावण ॥२॥
ऐसा कित्येक दिवसपर्यंत । माहिष्मतीनगरी भीक मागत ।
विसांहातीं कांती सूत । उदरार्थ दशानन ॥३॥
तंव येरीकडे प्रहस्त प्रधान । पौलस्तिमुनीसी स्वर्गीं जाऊन ।
सांगितलें स्वामी रावणालागून । सहस्त्रार्जुने बंधन केलें ॥४॥
माहिष्मतीनगराआंत । रावण असे भीक मागत ।
नगराबाहेर येवों नेदित । कोंडोनि तेथ राखिला ॥५॥

रावणाचा पिता माहिष्मतीला निघाला :

ऐकोनि रावणासि बंधन । कोपें खवळला ब्रह्मनंदन ।
पुत्रस्नेहें कळवळोन । वायुवेगें चालिला ॥६॥
मनोवेग सांडोनि मागें । त्वरें चालिला बहुत रागें ।
माहिष्मतीप्रांतास वेगें । येवोनि नगर देखिलें ॥७॥
दूरोनि देखिली नगरी । जैसी इंद्राची अमरापुरी ।
जेथें अर्जुन वसे महाक्षत्री । सहपरिवारीं मिळोनी ॥८॥
नगरीं नाहीं दुःखदैन्य । नगरीं नाहींत दरिद्री जन ।
लोक वसती धार्मिक संपन्न । स्वप्नीं अधर्म पैं नाहीं ॥९॥
पौलस्ति ब्रह्मयाचा नंदन । तपस्तेजें देदीप्यमान ।
जैसा गगनी सहस्त्रकिरण । पुरीं प्रवेश पैं केला ॥१०॥
आला महाद्वारासंमुख । द्वारपाळां जाणवी मुनिटिळक ।
म्हणे रायासि सांगा आवश्यक । पौलस्ति ऋषि आलासे ॥११॥
द्वाररक्षकें नृपनथा । जाणविली ते व्यवस्था ।
म्हणे राया पुलस्ति तत्वतां । आला असे महाद्वारीं ॥१२॥

पौलस्तीचा अर्जुनाकडून सत्कार :

द्वारपाळमुखें वचन । रायें ऐकोनि तेचि क्षण ।
पाचारोनि पुरोहित ब्राह्मण । सर्व आमोग्रीसीं निघाला ॥१३॥
सवें पूजेचा संभार । रायें जोडोनि दोन्ही कर ।
निघालासे ऋषीसमोर । अति नम्र होवोनी ॥१४॥
पुढें पुरोहित मागें नृपती । शीघ्र आले ऋषीपती ।
साष्टांगें नमूनि पुलस्ती । मग पूजा पैं केली ॥१५॥
ब्राह्मणा दिधले गोदान । मंगलतुरें वाद्यें लावून ।
पुढे पुलस्ति मुनि करुन । राजमंदिरीं प्रवेशला ॥१६॥
पुनरपि मंदिरीं मागुतीं । पूजा केली अति निगुतीं ।
स्नानें करवोनि पिप्रपंक्ती । समस्तां भोजन पैं झालें ॥१७॥
हात जोडोनि पुलस्तीप्रती । अर्जुन करीतसे विनंती ।
म्हणे स्वामी तुम्ही आलेती । म्हणोनि चरणांप्रती लागला ॥१८॥
आजि माझें सफळ जन्म । आजि माझें सफळ कर्म ।
आजि माझें सफळ धाम । स्वामीनें आगमन पैं केलें ॥१९॥
आजि माझी सफळ नगरीं । आजि मी सफळ संसारीं ।
तुम्ही आलेति येथवरी । जे नाना तपीं न भेटां ॥२०॥
राजा म्हणे ऋषीप्रती । हें राज्य ऐश्वर्य पुत्र संपत्ती ।
सर्व स्वामीचेनि निश्चितीं । मी आज्ञाधार किंकर ॥२१॥
ऐकोनि रायाचें धर्मवचन । नगरीं देखोनि सज्जन जन ।
काय बोलिला ब्राह्मण । तें सावधान अवधारिजे ॥२२॥
मुनि म्हणे नृपसत्तमासी । राया कमळनयना परियेसीं ।
तुझ्या तुळणे न पावती रविशशी । पराक्रमियांमाजि पंचानन ॥२३॥
ऐक राया सावधान । तुझ्या पराक्रमासि ठेंगणे गगन ।
यक्ष गंधर्व सिद्ध चारण । आज्ञाधारक जयाचे ॥२४॥
जेणें वरदबळें सृष्टीं जाण । जिंतिले सकळही नृपगण ।
जयाचे बंदी सुरगण । इंद्र आदिकरोनियां ॥२५॥
ऐसा पराक्रमी दशानन । तुवां जिंतिला न लागतां क्षण ।
तुझी कीर्ति मी ऐकोन । तुझिये भेटीस पैं आलों ॥२६॥

पौलस्तीच्या मागणीप्रमाणे अर्जुनाने रावणाला मुक्त केले :

माझें मागणें नाहीं अर्थ । माझें मागणें एक लंकानाथ ।
तो द्यावा मजलागीं त्वरित । उदार चित्त करोनियां ॥२७॥
ऐकोनि ऋषीचें वचन । रायें आदरें सोडिला दशानन ।
रत्नजडित मुकुट देवोन । सर्वालंकारीं शृंगारिला ॥२८॥
मैत्री करोनि रावणासीं । ब्राह्मण देव अग्नि साक्षीसीं ।
करोनि रायें सोडिलें त्यासी । श्रीराम ऐसी काथा झाली ॥२९॥
मग पुलस्ति मुनिवर । आलिंगून दशशिर ।
म्हणे बा रे श्रमलासि थोर । नगरीं विपत्ति फार भोगूनी ॥३०॥
ऐकोनि पित्याचें वचन । लाजिला तो दशानन ।
म्हणे वाचल्याचें फळ कोण । याहूनि मरण पैं भलें ॥३१॥
पुलस्तीनें यया रीतीं । सोडवोनि लंकापती ।
आपण गेला ब्रह्मलोकाप्रती । सावध वृत्ती करोनियां ॥३२॥
दश इंद्रियीं जो अति समर्थ । तयासि म्हणती लंकानाथ ।
तो पुलस्तीनें करोनि मुक्त । आपण ब्रह्मलोका पैं गेला ॥३३॥
याउपरी तो लंकापती । मागुतेन विचरता झाला क्षितीं ।
पुढें कथा वर्तली ते श्रोतीं । सावधवृत्ती श्रवण कीजे ॥३५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणबंधमुक्तिर्नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥ ओंव्यां ॥३५॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय बाविसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *