भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकसष्टावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकसष्टावा

श्रीरामाचे अगस्त्याश्रमांत गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

शत्रुघ्न गेला मधुपुरीसी । मागें श्रीराम भरत लक्ष्मणेसीं ।
राज्य करितां अयोध्येसी । पुढें काय वर्तलें ॥१॥

रामांच्या अधर्मचरणानेच आपला लहान
मुलगा मृत्यु पावला अशी एका ब्राह्मणाची शंका :

कोणी एक द्विज पुण्य पवित्र । अग्निहोत्री महापंडित ।
चारी वेद मुखोद्गत । धर्मीं तत्पर स्वधर्में ॥२॥
ऐसा तो गुणसंपन्न । तयाचें बाळक पांचसात वर्षांचे जाण ।
ते अकाळीं पावलें मरण । दुःख दारुण विप्रासी ॥३॥
तेणें द्विजें घेवोनि बाळक । महाद्वारा आला करीत शोक ।
स्नेहें रुदन करी देख । नाना विलापें कपाळपिटी ॥४॥
म्हणे मी नाहीं आचरलों अधर्म । म्यां नाहीं केलें निंद्य कर्म ।
वादीं छळिले नाहींत ब्राह्मण । स्वकर्मा जाण चुकलों नाहीं ॥५॥
म्यां कोणाचा न केला अपराध । म्यां कोणासीं न केला विवाद ।
मी अबद्ध जपलों नाहीं वेद । कोणाचा नाहीं अपवाद उच्चरिला ॥६॥
पंचवार्षिक माझें बाळ । तारुण्य जरा न येतां केवळ ।
साधूनियां काळ वेळ । माझें तान्हें बाळ हरिलें कैसें ॥७॥
रघुनाथराज्यीं पूर्ण आयुष्य । काळाचा तेथें नाहीं प्रवेश ।
अधर्माचा नाहीं लेश । तरी मी कां क्लेश पावलों ॥८॥
माझें एकुलतें तान्हें जाण । कोणें पापें पावलें मरण ।
तयासवें आम्ही प्राण । श्रीरामद्वारीं देह सांडूं ॥९॥
ऐसें पूर्वी नाहीं ऐकिलें । श्रीरामराज्यीं अपूर्व झालें ।
याबरोबर आम्ही सकळें । आपुलें देह पैं त्यागूं ॥१०॥
श्रीरामाचे अधर्मे करुन । माझें बाळक पावलें मरण ।
यदर्थीं कांही संदेह जाण । अनुप्रमाण असेना ॥११॥
ऐसी द्विजोत्तमाची करुणा । ऐकोनि जानकीरमणा ।
बाळकदुःखें तया जाणा । थोर खेद पावला ॥१२॥

रामांचा सर्व ऋषींना प्रश्न :

श्रीरामें बाळ देखोन । अत्यंत करुणा उंचबळोन ।
सभे बैसले तेही जन । थोर आश्चर्य पावले ॥१३॥
मग बोलावोनि ऋषीश्वर । वसिष्ठ वामदेव थोर थोर ।
गौतम जाबाली अत्रि आणिक मुनिवर । सभे येवोनि बैसले ॥१४॥
तयांसि करोनि नमन । अभिवंदन आणि पूजन ।
आसनें उत्तम द्वोन । तपोधन बैसविले ॥१५॥
नारदही तेथें आला । श्रीरामें आलिंगून पूजिला ।
वरासनीं बैसविला । तपोधनांजवळी हो ॥१६॥
मृतबाळकाच्या वृत्तांता । श्रीरामें सांगितलें समस्तां ।
तंव नारद झाला बोलता । धर्मशस्त्रनीतीतें ॥१७॥

नारदांचे धर्मशास्त्रांचे दिद्गर्शन :

ऐकें गा श्रीरघुपती । बाळक निमालें जे अर्थी ।
पूर्वी कृतयुगाप्रती । ब्राह्मण तप करित होते ॥१८॥
विप्रावेगळे तपीं तत्पर । इतरांसी नाहीं अधिकार ।
त्रेतायुगाचे ठायीं राजन्यां अधिकार । तपीं असे राजेंद्रा ॥१९॥
आणिक कृतत्रेतायुगीचें जन । आपुले स्वधर्मी असती जाण ।
तेथें नाहीं अकाळ मरण । दोहीं युगांचा हा महिमा ॥२०॥
त्रेतायुगीं करोनि नेम । स्थापिले चारी वर्ण उत्तम ।
अनधिकारी तप करोनि अधर्म । एक चरणीं चालता झाला ॥२१॥
अधर्माचा प्रथम चरण । श्रीरामा प्रवर्तला जाण ।
जे राष्ट्रीं अनधिकारी साधन । करिताती जाण तैं मृत्यु पावे ॥२२॥
अनधिकारी करितां तप । अनधिकारी करितां जप ।
अनधिकारी पूजापडप । घेती ते जनां मृत्युपीडा ॥२३॥
त्रेतायुगाभीतरीं । तप करिती वैश्यशूद्र अनधिकारी ।
तयांचें पापें पीडा भारी । रायासि होय राजेंद्रा ॥२४॥
तयांचे अधर्मे अनृतेंकरोन । प्रजेसी पीडा वर्षे पर्जन्य ।
बहुकाळ पडे अवर्षण । राज्यपद जाण स्थिर नव्हे ॥२५॥

शूद्रांच्या पापाचरणामुळे ब्राह्मणपुत्राचा मृत्यु :

द्वापरीं तप त्रिवर्णांसी । ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांसी ।
शूद्रें न करावें तपासी । निजकर्म आचरावें ॥२६॥
तयाच्या पापेंकरुन । द्विजबाळक पावले मरण ।
यदर्थीं संदेह नाहीं जाण । पृथ्वीशोधन करावें ॥२७॥
राजा होत्साता जाण । जो न करी पापपुण्यविवेचन ।
तयासि होय अधःपतन । संदेह जाण असेना ॥२८॥
ऐसी असे धर्मनीती । हे शीघ्र विचारोनि जानकीपती ।
पुढील कार्याची उत्कंठा चित्तीं । धरोनि राहटी करावी ॥२९॥

मृत बालकास तेलाच्या द्रोणींत ठेवावयास
सांगून पुष्पक विमानांतून संचारार्थ निघाले :

ऐसें नारदाचें वचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
वेगीं पाचरोनि लक्ष्मण । काय बोलता पैं झाला ॥३०॥
ऐसें सौमित्रा झडकरी । द्विजा आश्वासोनि मधुरोत्तरीं ।
बाळकाचें शरीर स्नेहाभीरतीं । तळोनियां राखावें ॥३१॥
बाळकाची वपु तैलीं तळून । द्रोणामाजि ठेववि करोनि यत्न ।
नानापरींचें सुगंध पाळून । संस्थापन करावें ॥३२॥
ऐकोनी श्रीरामाचे वचन । सौमित्रें विप्रा आश्वासून ।
बाळकाचें शरीर तैलीं तळून । द्रोणीमाजि स्थापून रामाजवळी आला ॥३३॥
श्रीरामें क्षण एक धरोनि ध्यान । केलें पुष्पकाचें आवाहन ।
तत्काळ पुष्पक येवोनि जाण । कर जोडून राहिलें ॥३४॥
पुष्पक म्हणे श्रीरामा । तुमची आज्ञा प्रमाण पुरुषोत्तमा ।
तूंचि माझा निजात्मा । सत्य मीं किंकर स्वामीचा ॥३५॥
ऐकोनि पुष्पकाचें वचन । संतोषोनि रघुनंदन ।
ऋषीस करोनियां नमन । विमानारुढ पैं झाला ॥३६॥

पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेस रामांना अधर्मचरण आढळले नाही :

श्रीराम चापशरपाणी । ये शुद्ध पश्चिम देखोनि ।
अधर्माची वार्ता कानीं । ते दिशीं न पडली ॥३७॥
नगरीं स्थापोनि भरतलक्ष्मण । आपण करिता झाला प्रयाण ।
नाना वनें उल्लघोंनि जाण । पश्चिमदिशे पैं आला ॥३८॥
तदनंतरें उत्तरदिशेसी । श्रीराम निघाला शोधनासी ।
हिमाचळाचे प्रदेशीं । तापसी स्वधर्मे अनुष्ठान करिती ॥३९॥
तेथें नाहीं पापाचा लवलेश । शुद्ध सात्विक जन बहुवस ।
सदा भगवद्भजनीं उल्हास । आशापाश सांडोनी ॥४०॥
तयाउपरी पूर्वदिशेसी । श्रीराम निघे शुद्धीसी ।
जगन्नथपर्यंत पहातां त्यासी । अधर्म दृष्टीसी दिसेना ॥४१॥
नीळकंठ नेपाळ वैजनाथ । पूर्वबंगाल वोडसा समस्त ।
कैकट मागध गया तेथ । देश त्वरित शोधिले ॥४२॥
सर्वां ठायी भगवद्भजन । ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र जन ।
आपुलाले स्वधर्मी होवोनि लीन । श्रीरामकीर्तन पैं करिती ॥४३॥

दक्षिणदिशेला एका तापस शूद्राला
धूम्रपान करताना पाहून रामांचा त्याला प्रश्न :

तयाउपरी दक्षिणदिशेसी । श्रीराम निघाला शोधावयासी ।
शेळाचळाचे उत्तरपार्श्वी । सरोवर एक देखिलें ॥४४॥
अति रमणीय तोयपूर्ण । परिवेष्टित कमळिणी जाण ।
तयाचे तीरीं तापस धूम्रपान । अधोमुखें करीतसे ॥४५॥
अधःशिर ऊर्ध्वचरण । मुखीं नळिका लावोनि जाण ।
करीतसे धूम्रपान । तया रघुनंदन देखता झाला ॥४६॥
श्रीराम समीप येवोनी । बोलता झाला मधुर वचनीं ।
म्हणे धन्य धन्य तूं मुनी । देखोनि नयनीं सुख झालें ॥४७॥
कोण याति कोण वर्ण । कोण ग्राम कोण अभिधान ।
तप करावया काय कारण । कोण इच्छा हृदयीं असे ॥४८॥
विनोदार्थ महामुनीं । हें मज सांगें विस्तारोनी ।
स्वर्गप्राप्तीलागीं धूम्रपानीं । प्रवर्तलासी तापसा ॥४९॥
एवढे करोनि सायास । कोण कार्या चिंतितोस ।
येरें ऐकोनि श्रीरामवचनास । उत्तर देता पैं झाला ॥५०॥

तापसी शूद्राचे उत्तर ऐकून रामांकडून त्याचा शिरच्छेद; देवांना आनंद :

म्हणे ऐकें गा ये शरचापपाणी । मी प्रवर्तलों धूम्रपानीं ।
त्या फळाची इच्छा तुजलागोनी । आणिक स्वयातिही प्रकट करीन ॥५१॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जाण । या तीन्ही याति नाहींत मजलागून ।
केवळ शूद्र मी अनुष्ठान । कार्या कारण करितसें ॥५२॥
येणें शरीरें देवत्व प्राप्त । व्हावया तप करितों निश्चित ।
पूज्य व्हावें लोकांत । मान महत्त्व पावावया ॥५३॥
ऐकोनि तापसाचें वचन । श्रीरामें खड्.ग घेवोनि जाण ।
मस्तकीं हाणोनि शिर छेदून । धरणीवरी पाडिलें ॥५४॥
शिर पडतां धरणीवरी । स्वर्गी देव जयजयकारीं ।
इंद्रादिक सामोरे येवोनि ते अवसरीं । श्रीरामासि स्तविते झाले ॥५५॥
भला भला गा धरणिजापती । म्हणोनि पुष्पवर्षाव करिती ।
देवकार्यालागोनि रघुपती । अवतरलासी रविवंशीं ॥५६॥
हा दुरात्मा भला मारिला । त्रैलोक्यासी आनांद झाला ।
देव म्हणती वर माग वहिला । प्रसन्न झालों तुजलागीं ॥५७॥
जें मागसी तें यें समयीं । श्रीराम सत्य देऊं पाहीं ।
ऐसें बोलोनि ते सर्वही । थोर आनंद पावले ॥५८॥

मृतबालकास जिवंत करण्याचा वर श्रीराम देवांजवळ मागतात :

सुरांचे मुखीं बळीचें वचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
म्हणे स्वामी झालेति प्रसन्न । तरी मृतबाळका उठवावें ॥५९॥
अयोध्येमाजी वृद्ध द्विजाचें बाळ । मृत्यु पावलें अकाळ ।
उठवोनि तुम्हीं प्रबळ । यश मज पैं द्यावें ॥६०॥
देव म्हणती श्रीरामा । हा वधिला दुष्टात्मा ।
तेव्हांच त्या बाळाकाचा आत्मा । कुडीमाजी प्रवेशला ॥६१॥
जे काळीं शिर छेदिलें । तेव्हाच तयाचे प्राण आले ।
त्याच्या मातापित्यांसी सुखा झालें । सुहृद स्वजनगोत्रांसीं ॥६२॥
देवऋषी म्हणती श्रीरामा । आम्ही जातों अगस्त्याश्रमा ।
दीक्षा घेतलीसे पुरुषोत्तमा । जळी वास अगस्तीनें केला ॥६३॥
द्वादशवर्षपर्यंत । जळीं शय्या करी अगस्ति तेथ ।
तयाचे व्रतपरिपूर्णार्थ । जाऊं तेथ श्रीरामा ॥६४॥
तुम्हींही तेथवरी यावें । अगस्तीचें दर्शन घ्यावें ।
तयाचें व्रत श्रीराघवें । परिपूर्ण आघवें करावें ॥६५॥

श्रीरामांचे अगस्तींच्या आश्रमाला आगमन :

ऐकोनि देवांचे वचन । पुष्पकीं आरुढोनि रघुनंदन ।
देवांसहित आला जाण । अगस्तिआश्रमा ते काळीं ॥६६॥
देव भेटले अगस्तीसी । घेवोनि पूजा षोडशोपचारेंसीं ।
श्रीरामें वृत्तांत अगस्तीसीं । विस्तारेंसीं सांगितला ॥६७॥
नमन करोनि अगस्तीसी । देव निघाले निजाश्रमासी ।
तयाउपरी श्रीरामें कुंभोद्भवासी । नमन साष्टांगेंसी पैं केलें ॥६८॥
ऋषीस केला नमस्कार । अगस्तीनें केला आदर ।
फळ मूळ घेवोनि रघुवीर । सुख अपार पावला ॥६९॥
अगस्ति म्हणे श्रीरामासी । थोर भाग्यें आश्रमा आलासी ।
तुझिये प्राप्तीलागीं ऋषी । नाना सायास करिताती ॥७०॥
तुझिये प्राप्तीलागून । एकीं सेविलेंसे बन ।
एक करिती धूम्रपान । एक पंचाग्निसाधन साधिती ॥७१॥
एक झाले निराहारी । एक झाले चीरकृष्णाजिनजटाधारी ।
एक ते झाले फळाहारी । निराहारी पैं एक ॥७२॥
ऐसे तुझे प्राप्तीकरण । करिताती नाना साधन ।
तो तूं स्वभावें दर्शन । आम्हालागून देतोसी ॥७३॥
श्रीरामा माझ्या प्रीतीलागीं । हीं उत्तम आभरणें लेई अंगीं ।
जयांचें तेज त्रिजगीं । बाणलिया प्रकाशे ॥७४॥
हीं उत्तम आभरणे जाण । विश्वकर्म्यानें केलीं निर्माण ।
तीं अंगीकारोनि आपण । विराजमान पैं व्हावें ॥७५॥
ऋषीची देखोनि परम प्रीती । संतोषोनियां श्रीरघुपती ।
आभरणें लेतां गगनीं दीप्तीं । तया तेजाची फांकली ॥७६॥
श्रीराम म्हणे कुंभोद्भवा । हीं आभरणें कोणाचीं कोणीं दिधलीं केव्हां ।
सविस्तर सांगें मुनिपुंगवा । थोर आनंदेंकरोनी ॥७७॥
ऐकोनी दाशरथीचें वचन । बोलता झाला अगस्ति जाण ।
त्रेतायुगीचें कथन । ऐक सावध श्रीरामा ॥७८॥
एका जनार्दना शरण । अगस्तिश्रीराम संवादकथन ।
श्रोते होवोनि सावधान । रामायण अवधारा ॥७९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीराम अगस्त्याश्रमगमनं नाम एकषष्ठितमोऽध्यायः ॥६१॥ ओंव्या ॥७९॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकसष्टावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *