भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा

लवाला पकडले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

येरीकडे श्रीरामाचा वारू । निघाला भूमीवरी नव्हे स्थिरू ।
चालतां हेलावे सागरू । तेजें दिनकरु लोपला ॥१॥
तेजें हीन दशेचा प्रांत । वारुतेजें लखलखित ।
अंगभारें गजगती चालत । जेंवी आदित्य पूर्वेसी ॥२॥
मागे दळभार अगणित । सांगातें वीर अपरिमित ।
शत्रुघ्न आणि भरत । समवेत निघाले ॥३॥
मार्गीं राखितां ठायीं ठायीं । उल्लंघिले देश नाना पाहीं ।
ऐसें क्रमोनि वनें घोर महीं । वाल्मीकाश्रमा वारु आला ॥४॥
तेथें झाला चमत्कार । वना गेला होता कुश कुमर ।
आश्रमीं लहु परम शूर । मातेजवळी खेळत असे ॥५॥

लवाने अश्वमेधाचा घोडा पकडला :

तेथें जाहली नवलपरी । लहु खेळतां निघाला बाहेरी ।
तंव वारु आश्रमाचें परिसरीं । येतां देखिला तयानें ॥६॥
घोड्याभोंवतालें पाहे । खालतें वरतें देखत आहे ।
हास्य करोनि म्हणे सुंदर हें । घोडें कोणाचें येथें आलें ॥७॥
शिरींची सोडिली पत्रिका । कुकुममंडित सुरेखा ।
वाचितां तया बाळका । अर्थ तेथींचा अवधारा ॥८॥
सूर्यवंशीं श्रीरघुनाथ । जयाचा पिता श्रीदशरथ ।
चवघां बंधूंसमवेत । करित राज्य अयोध्येचें ॥९॥
तयाचा हा जाणा वारू । पृथ्वीवरी सोडिला अति सुंदरू ।
जॊ असेल वीर शुरू । तयानें हा राखावा ॥१०॥
याच्या सोडवण्याकारणें । सवें असे अमित सैन्य ।
तें जिंतून मग श्रीरघुनंदन । तदनंतरें सोडवील ॥११॥
वाचून लहूनें पत्रिका । हांसोनिया फाडिली देखा ।
त्याउपरी तया बाळका । काय बुद्धी आठवली ॥१२॥
वारूचे कंठींचीं रत्नमाळा । घालोनियां आपुले गळां ।
आनंदला तये वेळा । वारू शेंडिये धरोनी ॥१३॥
गळां घालोनी अंगोस्तर । अश्व कर्दळीवना ने कुमर ।
तेथें बांधोनि सुकुमार । युद्धालागीं सिद्ध झाला ॥१४॥
तंव आले रक्षकगण । म्हणती वारू हरिला कवणें ।
विचारिते झाले बळवान । लहुवा पुढें देखिलें ॥१५॥
म्हणती हें दहा वर्षांचे बाळक । श्रीसीतेसारिखें रुप सुरेख ।
ठाणमाण अलोलिक । पाहती कौतुक तयाचें ॥१६॥

वाल्मीकींना चिंता :

मुनींनीं जाणविला सीते वृत्तांत । माते तुझ्या लहूने केला अनर्थ ।
घोडा चोरोनि कर्दळीवनांत । ठेवोनि तेथ उभा असे ॥१७॥
तया वारूचें सोडविणे । आलें वीरांचें धांवणें ।
अश्व गज अगणित सैन्यें । तिहीं आश्रम वेढिला ॥१८॥
आम्हीं सांगींतलें लहूसी । अश्व सोडीं म्हणितलें त्यासी ।
नायके आमुचिया बोलासी । म्हणोनि तुजपासीं निरुपिलें ॥१९॥
येणें न्याय मोठा केला । वारू कैंचा येणें धरिला ।
आतां दळभार चालिला । नेणों कैसे होईल ॥२०॥
कुश गेला वना फळांसी । आतां सीते कैसें करिसी ।
अवधि पुरली आमुच्या जिण्यासी । पुढें कांहीं सुचेना ॥२१॥
याचा अन्याय परम मोठा । वारू चोरोनि बांधिला खांबटा ।
पत्रिका फाडोनि हार कंठा । आपुलिये घातला ॥२२॥
बाळबुद्धि आपण होऊन । येणें शत्रु केला श्रीरघुनंदन ।
आश्रमी सांडून वन । सेवूं आम्ही जानकिये ॥२३॥
श्रीरामचंद्राचिये कटका । धरितो युद्धाच आवांका ।
उभी राहोनि नावेका । आपुले नयनीं पहावें ॥२४॥
अवो सीते अवधारीं । म्हणती वारु धरिला ऋषीश्वरीं ।
युद्ध मांडिलें महामारी । तापसां भय ओढावलें ॥२५॥
तापसांची स्त्रियाबाळें । धरोनि नेतील वो सकळें ।
ऐसीं गजबजलीं द्विजकुळें । हडबड थोर मांडली ॥२६॥
एक म्हणती उठा पळा । भोंवतें देखती उदंड दळा ।
तंव पोरें करिती कोहाळा । ऋषिपत्न्या आक्रंदती ॥२७॥
एक ऐसें म्हणती ऋषी । हीं तिघें द्यावीं तयांपासीं ।
एक म्हणती भीड कायसी । यांची तुम्हां पडलीसे ॥२८॥

सीतेने ऋषींना अभयवचन दिले :

मग म्हणे जनकदुहिता । तुम्हीं किती काय बोलता वृथा ।
मातें देवोनि तयांच्या हाता । आपण निसुर राहिजे ॥२९॥
मज द्यावें तयांसी । आपण स्वस्थ रहावें ऋषी ।
आम्ही भोगूं निजकर्मासी । आनंदेंसीं रहावें तुम्हीं ॥३०॥
निवारेल तुमचें अरिष्ट । सकळां होईल सुखसंतुष्ट ।
विचार न दिसे दुसरा स्पष्ट । दोघां कुमरांसगट मज द्यावें ॥३१॥
ऐसी श्रीरामाची अंतुरी । पडली चिंतेचे सागरीं ।
रुदन करी नानापरी । तें लहूनें देखिलें ॥३२॥
मातेसि देवोनि आश्वासन । म्हणे नको करुं वो रुदन ।
या मशकांचा पाड कोण । दळ विभांडीन क्षणमात्रें ॥३३॥
इतुकें बोलोनि ते अवसरीं । सैनिक आले आश्रमाभीतरीं ।
हडबड झाली ऋषींश्वरीं । आसनें चंचळ पैं केलीं ॥३५॥
लहु म्हणे ऋषिराजा । जरी होसी श्रीगुरू माझा ।
तरी ऐक माझे पैजा । मी जिंकीन नरवीर ॥३५॥
मी जाणें या सैन्यातें । तुम्ही शंका न मानावी चित्तें ।
ऐसें बोलता वाद्यध्वनीतें । ऋषीश्वरीं आयकिलें ॥३६॥

श्रीरामांच्या सैन्याचे वर्णन :

तयां वाजंत्रांची ध्वनी । दिशा दुमदुमिया तये क्षणीं ।
ढोल टिमक्या निशाणीं । नादें मेदिनी थरारिली ॥३७॥
एकापुढें एक वीर । सैन्य दाटलें अपार ।
भारापुढें चालिले भार । जैसे मेघ अंबरीं ॥३८॥
जैसे विद्युल्लतेचे थाट । अंबरीं दाटती कडकडाट ।
राघवसैन्य तैसें अचाट । आश्रमाभोवतें पसरलें ॥३९॥
असिवार नेणों किती । संख्या नाहीं भद्रजाती ।
कोट्यानुकोटि रथ घडघडती । वीर पदाती अगणित ॥४०॥
घोडियां बाणली मोहाळी । कंगरटोपा राघावळी ।
आरसे बंधिले तयांतळीं । पांखरा तेजाळी अनुपम्य ॥४१॥
वीरां बाणलीं कवचें पूर्ण । सम्यक संजोगूनि निशाणें ।
आवांका धरोनि चौदा भुवनें । पाटा वाटूनि सांडूं म्हणती ॥४२॥
ऐसी राघवसैन्यसंपत्ती । वीर भुभुःकारें गर्जती ।
धाकें रसातळा क्षिती । जाऊं पाहे ते समयीं ॥४३॥
दाशरथी वीर निधडे । एक निघती एकापुढें ।
शत्रुघ्न राखे चहूंकडे । मागें पुढें सांळाळून ॥४४॥
पराक्रमें गति गहन । सेनापति झाला शत्रुघ्न ।
वाल्मीक ऋषीनें देखोन । मग लहुवासि बोलाविलें ॥४५॥
आरता येईं राघवकुमरा । अरे लहुवा शूरा ।
उठावल्या महावीरा । युद्ध करीं समरांगणीं ॥४६॥
नाहींतरी वारु तयांचा । सोडून दे करीं माझी वाचा ।
आला लाग परवीरांचा । तो साहिला पाहिजे ॥४७॥

लवाचा निर्धार व आवेशपूर्ण उद्गार :

ऐकोनि वाल्मीकाचें वचन । आवेशें बोले लहुवा जाण ।
म्हणे रविवंशाचा सत्य मी नंदन । तरी हें सैन्य मारीन ॥४८॥
आमुचा जन्म सूर्यवंशीं । आनि सामर्थ्य तुमच्या विद्येसी ।
जरी याचें भय धरीन मानसीं । तरी स्वर्गीं देव निर्भत्सती ॥४९॥
मी जी तुमचा सेवक । बोलतसें गोष्ट एक ।
अश्व सोडितां विबुधादिक । तुम्हांसि काय म्हणतील ॥५०॥
देखोनि आमचा दळभारु । भेणें ऋषीनें सोडिला वारु ।
ऐसी अपकीर्तीची लाज थोरु । होईल तुम्हां जी मुने ॥५१॥
पुरुषार्थे धरिला श्यामकर्ण । पूर्वीच म्यां जीवीं विचारुन ।
आतां समरांगणीं मांडोनि ठाण । तुद्ध करीन सत्राणें ॥५२॥
ऋषि म्हणे येणें धरिला धीर । पितयासारिखा परम शूर ।
परी एक भय उपजे उत्तर । बाळकाप्रति बोलिला ॥५३॥
अरे लहुवा सैन्य दुर्धर । तूं तरी बाळक सुकुमार ।
सोडीं अश्व परता सत्वर । समरांगणीं धीर न धरवे तुज ॥५४॥
सैन्य पेटलें महामारी । तुज कोणी नाहीं साहाकारी ।
कुश गेला वना तो झडकारी । ये असवरीं न येचि ॥५५॥
महु म्हणे ऋषि ताता । तुमची कृपा मज असतां ।
सैन्य विभांडीन पळ न भरतां । माझ्या पुरुषार्था पहावें ॥५६॥
दुहियाची जो इच्छा करी । जळो जळो तो संसारीं ।
तयाच्या जननीस लज्जा भारी । पूर्वजां उणे येईल ॥५७॥
धिक् धिक् तयाचा पुरुषार्थ । धिक् धिक् जिणें तयाचें व्यर्थ ।
धिक् धिक् तयाचें गोत । युद्धीं परते तो निंद्य ॥५८॥
धिग् धिग् तो मातेच्या कुसीं । वियोनी वंध्या म्हणती तिसी ।
लाज तयाचें वंशासी । ओझें पृथ्वीसी त्या नराचें ॥५९॥
तो मनुष्यरुपें केवळ श्वान । रासभाहूनि तो नर हीन ।
जयाचे वाटिवे भेडपण । वृथा वचन तयाचें ॥६०॥
बोलासारिखें जो न करी । पुरुषार्थ मिरवी शब्देंकरीं ।
तया नराचा जन्म संसारीं । पाषाणापरी जाणावा ॥६१॥
स्वयें न बोले वाढिवेसीं । शत्रुनिर्दाळणीं उल्हास मानसीं ।
आपपर नेणे रणभूमीसीं । तोचि एक पुरुषार्थी ॥६२॥
क्षात्रधर्मी निधडा पूर्ण । तृणप्राण देखे निजजीवन ।
रिपु निर्दाळी थोर सान । न म्हणे तोचि पुरुषार्थी ॥६३॥
सर्व भूतीं दया पूर्ण । स्वकर्माविषयीं सावधान ।
गुरुभजनीं उदित मन । तोचि एक पुरुषार्थी ॥६४॥
जो न सांडी निजधर्मासी । स्वामिकाजीं नव्हे आळसी ।
मातृपितृभक्ति जयासी । तोचि एक पुरुषार्थी ॥६५॥
ऐसिया पुरुषाचें जें जिणे । तेंचि धन्य लहुवा म्हणे ।
म्यां जरी वारु सोडोनि देणें । लाजिरवाणें मम कुळा ॥६६॥
जे जे आले वीर उद्भट । तयांचें करीन समसकट ।
भरतलक्ष्मणादिक योद्धे श्रेष्ठ । गळां बांधोनि आणीन ॥६७॥
ऐकोनि बाळकाच्या बोला । ऋषीश्वरा आनंद झाला ।
जैसा समुद्र उचंबळला । पूर्ण चंद्रासि देखोनी ॥६८॥
शिष्य देखोनि स्वरुपज्ञानी । तेणें सुखावे श्रीगुरुजननी ।
तैसें ऋषीश्वराचे मनीं । आनंदभरितें दाटलें ॥६९॥

लव युद्धासाठी निघाला :

ऋषि म्हणे रावणारिसुता । विजयी होई युद्ध करितां ।
येरें चरणीं ठेविला माथा । मग पुढारां निघाला ॥७०॥
आधींच धरणिजेचा बाळ । चालिला जैसा पर्वत विशाळ ।
यावा देखोनि सैन्या पळ । राघवाचे सूटला ॥७१॥
उदय होतां तमारी । अंधकार लंघी दिशा चारी ।
नातरी देखोनि सर्पारी । कद्रुसुतां आकांत ॥७२॥
हाक दिधली वीरें जे । तेणें नादें अंबर गर्जे ।
ऐकोनि सैन्यें कापिजे । दाशरथी वीर हो ॥७३॥
ऐसा सामोरा चालिला । तो शत्रुघ्नें पडखळिला ।
म्हणे धीर धरीं लहुबाळा । रणीं उतावळा होऊ नको ॥७४॥
अरे तूं कोणाचा कोण । कोण जननी पिता कवण ।
वय तरी दिसतें सामान्य । पुरुषार्थ कठीण दिसताहे ॥७५॥

लवाचे शत्रुघ्नाला परखड उत्तर :

मग म्हणे जानकीचा बाळ । सूक्ष्म कैसा वडवानळ ।
हनुमेनें वेढिला द्रोणाचळ । तो वानर काय म्हणावा ॥७६॥
परिसा काय पाषाणपण । खुजट म्हणों नये वामन ।
तारकारिपित्याचें वहन । तया काय चतुष्पद म्हणावें ॥७७॥
चिंतामणीस म्हणों नये पाषाण खडा । कल्पतरुच्या वृक्ष पडिपाडा ।
सुधारसासी कांजी जोडा । ज्ञाते पंडित न करिती ॥७८॥
इल्वलारीसी द्विज साधारण । कामधेनूस पशूसमान ।
सद्गुरू जो चैतन्यघन । तया मानणें मानव ऐसें ॥७९॥
हे चतुराची नव्हे युक्तीं । ज्ञाते पंडित मिथ्या मानती ।
मज बाळ ऐसें संग्रामाप्रती । न म्हणे सुमति वीरराजा ॥८०॥
ऐकोनि लहुवाचें वचन । संतोषला कैकेयीनंदन ।
म्हणे बाळकाचा अभिमान । वारु येणें एकलेनि नेला ॥८१॥
आणि सुरांसारिखी दाखवी प्रौढी । पुढील पाय मागें न पाडी ।
पहा हो याची धिटींव केवढी । शब्दीं अपरवडी येऊं नेदी ॥८२॥
यासीं मज युद्ध करितां । लौकिकी येईल पैं लघुता ।
म्हणतां शत्रुघ्नें बाळकावरता । रणीं मेढ चढविला ॥८३॥
सरों न ये याच्या घायीं । आपण विंधों नये पाहीं ।
ययातें जिंकिलियाही । कीर्ति नाहीं पैं माझी ॥८४॥
ऐसा विचारीं पडे लवणारी । तंव बोले लहुवा अवसरी ।
म्हणे तूं जुंझार होसी जरी । माझा बाण सहावा ॥८५॥

शत्रुघ्न आणि लव यांचे द्वंद्वयुद्ध :

धनुष्यीं चढविला बाण । वोडी काढोनि आकर्ण ।
शरीं बिजाक्षर आव्हानून । श्रीराम जयराम ऐसें ॥८६॥
ठाण मांडोनि देवढें । शत्रुघ्ना सांभाळीं आतां पुढें ।
बाण निघाला कडाडें । वीरां झोपडें पडियेलें ॥८७॥
बाण भरतांचि गगनीं । बाणमय दश दिशा मेदिनीं ।
जैसा मेघ दणाणी । गडगडाट जेंवी हस्तींचा ॥८८॥
जेंवी पर्जन्याच्या धारा । तेंवी बाणीं खिळिलें अंबरा ।
हें देखोनि कैकेयीकुमरा । हडबड गाढी पैं झाली ॥८९॥
हा सामन्य नव्हे वीरराज । ऐसें बोलिला कैकेयीआत्मज ।
याचा गुरु निधडा सहज । जेणीं ऐसी विद्या दावियली ॥९०॥
यासी प्रसन्न शस्त्रदेवता । याचा गुरु असे पुरता ।
म्हणोनि झाला विंधाता । शत्रुघ्न वीर ते काळीं ॥९१॥
दाशरथीं वीरें सोडोनि बाण । ऐकें विस्तारिलें गगन ।
लक्षकोडी प्रसवोन । शरीं अंबर खिळियेलें ॥९२॥
एक एकातें निवारी । एक बाण पडती पृथ्वीवरी ।
परस्परें गगनोदरीं । उभयतां युद्धीं मिसळती ॥९३॥
मग दोघे वीर सावध । परस्परें हाणिती म्हणती शब्द ।
तंव शत्रुघ्नवीरें त्रिशूळी बाण भयद । लहुवावरी लोकलिले ॥९४॥
शत्रुघ्न म्हणे लहुवा वीरा । जरी तुझा गुरु असेल पुरा ।
तरी समरांगणीं धरिजे धीरा । माझीं शस्त्रें सांभाळीं ॥९५॥
येरु साधक वीररावो । अंगा लागूं नेदी घावो ।
पराक्रमी महाबाहो । रविवंशींचा लघुबाळ ॥९६॥
कैकेयीकुमरें स्मरिलें मार्तंडास्त्र । कोटी प्रकटले दिनकर ।
लहुवा स्मरे वरुणास्त्र । अभ्र दिनकर लोपले ॥९७॥
अवघें अंतराळ व्यापिलें । कोटिसूर्य झांकोळले ।
शत्रुघ्न स्मरे ते वेळे । मोहनास्त्र परियेसा ॥९८॥
मोहनास्त्र येतां गगनोदरीं । ते न लगे श्रीरामपुत्रीं ।
रामनाम जपे बीजाक्षरीं । कवणासी उरी तेथें ॥९९॥
रामनामाचा कडकडाट । तेथें मोह ममते बारा वाट ।
शत्रुघ्न विचारी स्पष्ट । मोहनास्त्र वृथा गेलें ॥१००॥
हा वीर कैसेनि आतुडे । मोहनास्त्र न चले यापुढें ।
हा यश घेईल गाढें । ऐसें मज वाटतें ॥१॥
तंव शत्रुघ्न म्हणे भरता । मोकलीं आतां निर्वाणअस्त्रा ।
येरें शक्तिमंत्रें आव्हानूनि शरा । लहुवा लक्षोनि टाकिला ॥२॥
शत्रुघ्न म्हणे अगा वीरा । जरी तुझा गुरु असेल पुरा ।
तरी सांभाळीं माझिया शरा । धरीं धीर समरांगणीं ॥३॥
शर निघाला गर्जत गगनीं । तें लहु वीरें देखोनी ।
मध्येंच तोडिला टाकोनी । क्षात्रत्वेंकरुन लाघवें ॥४॥
द्वादशत्रयविद्यांचे साधक । परस्परें नाटोपती एकमेक ।
घाय हाणिती तेणें पाताळलोक । दणाणीत ते समयीं ॥५॥
मग मिसळले मल्लयुद्धीं । झोंबती हाणिती घायीं सुबुद्धीं ।
मारी सांपडविती उरीं खांदीं । एकमेकां लक्षोनी ॥६॥

शत्रुघ्नाने पाठीमागून लवाला पकडले :

तंव शत्रुघ्ने चमत्कार केला । मागूनि लहुवा आकळिला ।
सवेंचि रथावरी बांधिला । मग सांडिली रणभूमी ॥७॥
दोघे अयोध्ये निघाले । रथीं बाळकासि बांधिलें ।
मनी थोर उल्हासले । पुरुषार्थ देखोनि लहुवाचा ॥८॥
म्हणती सिंहे सिंह धरिला । शार्दूळें शार्दूळ बांधिला ।
पुरुषार्थियानें पुरुषार्थ केला । पुरुषार्थी जिंकिला रणमंडळीं ॥९॥
एका जनार्दना शरण । लहुवा पावला बंधन ।
संतोषोनि भरत शत्रुघ्न । निजनगरासि निघाले ॥११०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लहुबंधन नाम षट्षष्टित्तमोऽध्यायः ॥६६॥ ओंव्या ॥११०॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सहासष्टावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *