भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तावन्नावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तावन्नावा

लवणासुराचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामचंद्र राजीवनयन । कथा सांगतां लक्ष्मणा ।
थोर आश्चर्य पावला मना । ब्रह्मानंदें डुल्लत ॥१॥
आधींच कथा रामायणी । जे कां वदला वाल्मीक मुनी ।
सुरस आणि जगतारिणी । प्रवेशतां श्रवणीं भवदोष खंडी ॥२॥
ऐसे श्रीरामलक्ष्मण । चर्चा करितां निशी क्रमोन ।
प्रभात होय रविकिरण । सर्वत्र अवनीं प्रगटले ॥३॥
दोघे बंधु श्रीरामलक्ष्मण । करोनियां संध्यास्नान ।
भद्रासनीं येवोनि जाण । राजनीती करिते झाले ॥४॥

ऋषिसमुदाय श्रीरामांच्या दर्शनार्थ आला :

तंव सुमंत प्रधान आला । श्रीरामा नमस्कार केला ।
म्हणे स्वामी ऋषींचा मेळा । द्वारी उभा दर्शनार्थी ॥५॥
यमुनातीरींचें ऋषीश्वर । भर्गवच्यवनादि थोर थोर ।
तुमचे भेटीलागीं द्वार । धरोनि उभे असतीं पैं ॥६॥
ऐकोनि प्रधानाची मात । काय बोलिला काकुत्स्थ ।
वेगीं पाचरीं गा त्वरित । भार्गवच्यवनादि ऋषींसी ॥७॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरीं । मग त्यां सुमंतें झडकरी ।
द्वरा येवोनी विनीतोत्तरीं । ऋषीश्वरांप्रति प्राथिलें ॥८॥
सुमंत म्हणे ऋषीश्वर हो । दर्शनाकारणें जानकीनाहो ।
उद्यत बैसलासे पहा हो । जैसा चंद्रालागीं चकोर ॥९॥
तरी प्रवेशावें राजभवन । भेटीस तिष्ठे रघुनंदन ।
ऐसें ऐकोनि सुमंत वचन । ऋषी भवनीं प्रवेशले ॥१०॥
ऋषींस देखोन रघुनंदन । करोनियां अभिवंदन ।
नाना परींचीं आसनें देवोन । सभेमध्ये बैसविले ॥११॥
श्रीराम म्हणे जी ऋषी । तुमचें दर्शनें अभीष्ट आम्हांसी ।
तरी कोण कार्याचे उद्देशीं । तुम्हीं आगमन पैं केलें ॥१२॥
ऐकोनियां श्रीरामवचन । पूर्णकलशीं तोय पूर्ण ।
आणि फळे मुळे तूर्ण । श्रीरामासी समर्पिली ॥१३॥
ऋषींची देखोन अति प्रीती । सर्व अंगीकारुनी धरणिजापती ।
पुनरपि म्हणे कोण कार्यार्थी । तुमचें आगमन पैं झालें ॥१४॥
मी तुमचा आज्ञाधर । आणि सेवकाचा किंकर ।
तुमच्या कार्यालागीं अवतार । सूर्यवंशीं धरिलासे ॥१५॥
राज्य आणि सकळ जीवित । हें वेंचीन प्रियकार्यार्थ ।
माझें वचन मानावें सत्य । कायावाचामानसें ॥१६॥
कोण उत्कंठा असे चित्तीं । तू मज सांगा जी निश्चितीं ।
मी प्रवर्तेन त्या अर्थी । तुमचे सेवेलागून ॥१७॥

ऋषींकडून श्रीरामांची स्तुती :

श्रीरामाचे ऐकोनि वचन । भला भला गा धन्य धन्य ।
तूं सूर्यवंशीं शिखारत्न । शिवहृदयींचें ध्यान तूंचि पैं ॥१८॥
तुज देखोनि श्रीरामा । थोर सुख झाले आम्हां ।
जैसा चकोर चंद्रमा । तैसा तूं आम्हां कृपाळु ॥१९॥
बहुत राजे पृथ्वीपती । नानापरींचे धरणीवरी असती ।
तयांमध्ये तूं श्रेष्ठ श्रीरघुपती । अगाध कीर्ती पैं तुझी ॥२०॥
तूं त्रैलोक्याचा ईश्वर । ब्रह्मा तुज निजकुमर ।
फेडावया भूमिभार । अवतरालसी श्रीरामा ॥२१॥
तूं जगाचा ईश्वर । सुरकार्या लागीं अवतार ।
धरोनि फेडिसी धराभार । दशरथकुमर होवोनी ॥२२॥
येथें संदेह नाहीं श्रीरघुपती । कार्य करिसी हें निश्चितीं ।
ऋषींचें कार्य निरसावयार्थी । तुज असे अधिकार ॥२३॥

कार्य कोणते हे समजून घेतल्याशिवाय होकार देऊ नये :

ऋषि म्हणती श्रीरामा जाण । कोणे कार्यालागीं ब्राह्मण ।
आले असती हें विचारून । मग करीन ऐसें वदावें ॥२४॥
न जाणतां कार्याची स्थिती । न म्हणावे करीन श्रीरघुपती ।
ऐसी असे राजनीती । विनंती यदर्थी आम्हीं केली ॥२५॥
ऋषींमध्यें भार्गवमुनी । जो अत्यंत सधर्म अनुष्ठानीं ।
तो ऋषिभय श्रीरामालागोनी । सांगतां झाला ते काळीं ॥२६॥

मधुदैत्याची कथा :

पूर्वी कृतयुगीं जाण । गोळपुत्र ज्येष्ठ मधु नामाभिधान ।
दैत्यांमध्ये परम पावन । धर्मनिष्ठ अत्यंत ॥२७॥
गायीब्राह्मणां हितकरी । परम उदार पृथ्वीवरी ।
वीर्यसंपन्न दुष्टां संहारी । कृपा करी द्विजदेवां ॥२८॥
ऐसा स्वधर्मनिष्ठ गोळनंदन । मधुनामें प्रसिद्ध जाण ।
तयासि रुद्र झाला प्रसन्न । अद्भूत वरदान पैं दिधलें ॥२९॥
निजशूळापासोनि जो निश्चित । निर्माण करी शैलजाकांत ।
परम प्रीतीने रुद्रें तेथ । तो शूळ तयासि दिधला ॥३०॥
अगा मधु तुझी उत्तम भक्ती । आणि सर्व जीवांसिं प्रिय निश्चिती ।
ऐसें जाणोनि मी उमापती । प्रसाद शूळ दिधला ॥३१॥
जंव स्वधर्मे पाळिसी जन । तंवपर्यंत शूळ राहेल जाण ।
जेव्हां ऋषींसी करिसी विरुद्धपण । तेव्हां शूळ जाईल निजस्थानासी ॥३२॥
या शूळानें दैत्यवधार्थी । तूं जय पावसी निश्चितीं ।
जेव्हां तुझी फिरेल मती । तेव्हां शूळ घाता प्रवर्तेल तुझ्या ॥३३॥
ऐसे रुद्रवर लाहोन । गोळपुत्रें प्रणिपात करुन ।
पुनरपि महादेवाप्रति वचन । बोलता झाला ते काळीं ॥३४॥
अहो जी महेशा पार्वतीपती । माझ्या वंशा हो शूळप्राप्ती ।
तुम्ही प्रेमसिंधु सर्वांगीं विभूती । माथां जटाजूट शोभती ॥३५॥
चंद्रशेखर त्रिपुरदहन । कामांतक वृषभवाहन ।
पिनाकपाणि त्रिलोचन । पंचवदन परमेश्वर ॥३६॥
ऐसी तया मधूची स्तुती । ऐकोनियां पशुपती ।
पुनरपि वदे दैत्याप्रती । जें जें असेल चित्तीं तें पावसील मत्प्रसादें ॥३७॥
माझिये कृपेनें मधु । वेगीं भोगी तूं सुख आनंदु ।
तुझिया पुत्रा शूळ शुद्धु । प्राप्त होईल हा जाण ॥३८॥
ऐसा मधु वर लाहोन । प्रेमें झाला सुखसंपन्न ।
पुढील श्रीरामा निरुपण । भार्गव जाण सांगता झाला ॥३९॥
ऐसें श्रीरामा धरणिजापती । मधूची कुंभनसीनामें सती ।
विश्वावसूची दुहिता निश्चितीं । सुंदर गुणवंत पतिव्रता ॥४०॥
तियेच्या उदरीं लवणासुर । जन्मला अत्यंत पराक्रमी शूर ।
बाळपणापासोनि कर्मे घोर । पापाचार करितसे ॥४१॥
पुत्र दुष्टात्मा देखोन । मधूसि चिंता अति गहन ।
म्हणे हा पापिष्ठ दारुण । वेगीं निधन पावो पैं ॥४२॥
पुत्रातें म्हणे मधु दैत्य । तूं विचरें वरुणालय जेथ ।
हा शूळ घेवोनियां त्वरित । मजपासोनि पैं जावें ॥४३॥
या शूळाचा महिमा अगाध । देवां दैत्यांसि करितां युद्ध ।
जवळी शूळ असतां न पाविजे खेद । परी देवां ऋषींस विरुद्ध करूं नये सर्वथा ॥४४॥
तेणें ऐकोनि पित्याचें वचन । शूळ करीं घेवोन जाण ।
विचरतां दुःख दारुण । देता झाला ऋषींतें ॥४५॥
तयाचे भयें श्रीरामा । येथवरी येणें झालें आम्हां ।
तुजवाचोनि तो दुष्टात्मा । वधिला न जाय इतरांसी ॥४६॥
अनेक पृथ्वीपति असती । तयांचेनि लवणासुर दुष्टमती ।
वधिला न जाय श्रीरघुपती । आमची भयनिवृत्ती तुवां कीजे ॥४७॥
रावणाऐसा दुराचारी । तुवां वधिला सहपरिवारीं ।
तुजपुढें लवण मशकापरी । तुझें दृष्टीनें नुरेल ॥४८॥
एका जनार्दना शरण । पुढें लवणासुरी वधावयालागून ।
सहपरिवारीं जाईल शत्रुघ्न । सावधान अवधारा ॥४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लवणासुराख्यानं नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥५७॥ ओंव्या ॥४९॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तावन्नावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *