भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सव्विसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सव्विसावा

यम व ब्रह्मदेव यांचा संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिले प्रसंगीं पाशुपतास्त्र । रावणें सोडून भस्मीभूत ।
यमराजसैन्या केला अंत । तेणें हर्षें गर्जत राक्षस ॥१॥
विजयो पावला दशानन । म्हणोनि करिती गर्जन ।
तें वैवस्वत ऐकोन । क्रोधें दारुण उचंबळत ॥२॥

यम युद्धाला निघाला :

नेत्रा आरक्त करोन । आपुलें सैन्य पडिलें जाणोन ।
सारथियासि म्हणे शीघ्र स्यंदन । आणीं युद्धा जावया ॥३॥
सारथियानें आणिला दिव्य रथ । वरी आरुढला प्रेतराज रणपंडित ।
त्या रथाच्या घडघडाटश्रवणांत । दिग्गजांची टाळीं बैसलीं ॥४॥
हातीं घेतला मुद्गर । मृत्यसारिखा तो उग्र ।
काळदंड घेवोनि कठोर । जानों संहार करील ब्रह्मांडाचा ॥५॥
ऐसा तो विवस्वतात्मज । रथीं आरुढला वीरराज ।
परिवेष्टित काळतुल्य सहज । गणांतें बैसविलें ॥६॥
मनीं थोर उल्लास । करीन राक्षसांचा विध्वंस ।
ऐसा यम वीरश्रियेचा सौरस । भोगावया चालिला ॥७॥

राक्षससैन्यांत घबराट उडाली :

यमराजाचें आगमन । देखोनि राक्षस कंपायमान ।
म्हणती हा प्रयळ दारुण । आजि असे मांडला ॥८॥
रथ घडघडाटें रणक्षितीं । सिंहनादें गर्जना करिती ।
आला तो राक्षसैन्याप्रती । जेथें पौलस्ती उभा असे ॥९॥
एका मुहूर्तामध्ये जाण । आले रणांगणा घोडे दारुण ।
उपमा देतां उच्चैःश्रवा न्यून । रथींचें वारु जाण तैसे ते ॥१०॥
राक्षस देखोनियां भारी । अश्व हिंसती नानापरी ।
पाय न ठेविती पृथ्वीवरी । चंचलता मनापरीस अधिक ॥११॥
ऐसा आरक्त वारुवांचा रथ । वरी आरुढला प्रेतनाथ ।
देखोनि राक्षस भयभीत । धाकें थोर पळते जाहले ॥१२॥
रावणाचे प्रधानगण । तेही भयभीत दारुण ।
आणीकही स्थूळ सूक्ष्म जन । द्विजऋषिमुनिगण पळाले ॥१३॥

रावण व यम यांचे द्वंद्वयुद्ध :

लोक भयातुर देखोन । दोघे करुं लागले रणकंदन ।
सोडिती शक्ती दारुण । वर्म लक्षोन हाणिती ॥१४॥
यम आणि तो रावण । सोडिती शक्ती तोमर दारुण ।
वीरांचे वीर वर्म लक्षोन । क्रोधेकरुन उचंबळती ॥१५॥
दोघे जुंझती उसण्याघायीं । येरेयेरांचीं वर्मे लक्षिती पाहीं ।
तंव रावणें केले काय ते समयीं । शर वर्षला दारुण ॥१६॥
जेंवी मेघांच्या धारा । वर्षोनि लोपविती गिरिवरा ।
तेंवी रावणें वैवस्वतरहंवरा । वरी बाण टाकिले ॥१७॥
त्या समयीं तो वीरराज । राया विवस्वताचा आत्मज ।
संधान करोनि रिपुबाणसमाज । रणरंगीं तोडिले ॥१८॥
खमंडळीं जीमूतांचें पडळ । तोडी जैसा वायु प्रबळ ।
तेंवी वैरियाचें शरजाळ । समरांगणीं सकळ तोडिलें ॥१९॥
सप्तरात्रींपर्यंत । युद्ध केलें असंख्यात ।
दोघे समान रणपंडित । श्रम न पावत पैं दोघे ॥२०॥
देव गंधर्व सिद्ध ऋषी । पिशाच गृह्यक तापसी ।
आणि महंत संन्यासी । थोर आश्चर्यासी पावले ॥२१॥
तदनंतर दशानन । रिपूचें समान बळ देखोन ।
करिता झाला संधान । तें सावधान अवधारा ॥२२॥
चौ बाणीं सारथी सत्तरीं रथी । एक सहस्त्र बाणीं यमाप्रती ।
वर्मांग लक्षोनि निशाचरपती । विंधिता झाला ते समयीं ॥२३॥
येतां रिपूचे बाण । यमराजें तोडिले न लागतां क्षण ।
जैसें सूर्योदयीं तमाचें ठाण । नव्हतेंचि जाण गगनीं हो ॥२४॥
याउपरी वैवस्वत । क्रोधाच्या उकळ्या सांडित ।
भासत झाला पावकवत । सुरनरांच्या नेत्रांसी ॥२५॥

शत्रुनाश करण्याची मृत्यु यमाकडे आज्ञा मागतो :

क्रोध आलिया यमासी । तंव मृत्यु उभा संमुख करी विनंतीसी ।
म्हणे राया मजलागीं आज्ञेसी । दीजे युद्धासी करावया ॥२६॥
माझी पडलिया दृष्टी । हे आटेल सकळ सृष्टी ।
मज न लगे युद्धाची अटाटी । माझी गोष्टी अवधारा ॥२७॥
मज सोडावें लवकरी । रिपु मारीन रणसागरीं ।
नरकासुर क्षणाभीतरीं । म्यां वधिला भारी निजांगें ॥२८॥
माझें स्वरुप हें हरिहर । माझें स्वरुप ब्रह्मा इंद्र ।
माझे स्वरुप श्रीरामचंद्र । राक्षससमुद्र शोषूं पाहे ॥२९॥
हे समस्तही निमित्तधारी । मी मृत्यु जगाचा संहारकारी ।
जे जन्मले प्राणी संसारीं । त्यातें मारिन त्वरेंकरीं ॥३०॥
शंबर वृत्र आणि शुंभ । सहस्त्रार्जुन निशुंभ ।
नमुचि विरोचन मधुकैटभ । यांचे प्रतापची बोंब त्रिभुवनीं ॥३१॥
हे मारिले आणिकही बहुत । निर्दाळिले म्यां संख्येरहित ।
यादव कौरव हे समस्त । माझेनिच निश्चित निमाले ॥३२॥
मजसारिखा सेवक । तुज चिंता कायसी एक ।
मज सोडिल्या निमेष एक । न लागतां सकटक रिपु मारीन ॥३३॥
माझिये दृष्टीं पडिले प्राणी । ते न वांचती सत्यवाणी ।
मज सोडिता तेच क्षणीं । संहारीन ब्रह्मांड ॥३४॥
ऐसें मृत्युचें वचन । धर्मराजें ऐकोन ।
म्हणे मृत्यु तूं नको मीच मारीन । पुढील निरुपण ऐकावें ॥३५॥

मृत्युला नकार देऊन काळदंड हाती घेतला :

तदनंतर प्रेतनाथ । करुनि नेत्र आरक्त ।
काळदंड घेवोनि त्वरित । तोलिता झाला अद्‌‌भुत करतळीं ॥३६॥
जयाच्या पृष्ठभागीं असती । भाते भरले बाणीं वज्रतुल्य निगुतीं ।
पावकसमान मुद्गर अरिमर्दनार्थी । प्रतिष्ठिला अति घोर ॥३७॥
जयाचिये रथीं जाण । चाप ठेविलें काळासमान ।
पुटपावकाचे तेजें गगन । दशदिशा धवळल्या ॥३८॥
यशाचिये रथीं संमुख । मुग्दर ठेविला काळांतक ।
दर्शनें जीवामात्र देख । अपधाकें मरताती ॥३९॥
दर्शनें प्राणी संहारी । तो सोडिला जीवांवरी जरी ।
तरी तयाची काय उरेल उरी । देखोनि वैरी कांपिजे ॥४०॥
तो परिघ घेता करीं । तयाची दीप्ति फांके अंबरीं ।
ज्वाळा वेष्टित सहपरिवारीं । दर्शनें वैरी मद गळित ॥४१॥
ऐसा परिघ अति दारुण । यमराज स्पर्शूनि जाण ।
सोडी तंव राक्षससैन्य । त्वरान्वित पळतें झालें ॥४२॥
सुरासुर भयभीत । पृथ्वीचे जन चळीं कांपत ।
त्या दंडाचें प्रेरण करुन हात । ऊर्ध्व टाकिला रावणावरी ॥४३॥
तया समयीं वैवस्वत । दंड प्रेरितां उठे अनर्थ ।
हा प्रळय अकल्पित । ओढवला म्हणत जनलोक ॥४४॥

ब्रह्मदेवाचे यमाला आवाहन :

तेचि अवसरीं प्रजापती । बोलता झाला गा महामूर्ती ।
अहो जी प्रेतराज दक्षिणपती । वचन माझें निश्चितीं ऐकावें ॥४५॥
ब्रह्मा म्हणे प्रेतपती । ऐक माझी वचनोक्ती ।
तुझेनि दंडें निशाचरपती । क्षणें भस्मांती जाईल ॥४६॥
पैल पाहें रणा उजु । दहा शिरें वीस भुजु ।
तोचि जाण लंकेचा नृपराजु । ठाण मांडोनि उभा असे ॥४७॥
पूर्वी तया रावणासी । म्यां वर दिधला निश्चयेसीं ।
माझेनि वरदें सुरासुरांसीं । त्रासिलें येणें राक्षसें ॥४८॥
आता यमा मुद्गरेंकरुन । नको करुं रावणाचें हनन ।
माझे वचन अप्रमाण । हा मरतां होऊं पाहें ॥४९॥
आणि भविष्य वाल्मीकाचें । असत्य होऊं पाहे साचें ।
तरी आतां ये काळींचें । वाक्य आमुचें तुवां मानावें ॥५०॥
मुद्गर मजपासोनि जनित । तो तुज दिधला युद्धार्थ ।
तेणेंकरोनि लंकानाथ । न मारीं ये रणमंडळीं ॥५१॥

ब्रह्मवचन प्रमाण मानून रावणाला न मारता यम निघुन गेला :

ऐसें ऐकोनि ब्रह्मवचन । प्रतिउत्तर दे धर्मराज आपण ।
म्हणे स्वामी न करिता हनन । हा उगा कैसा राहेल ॥५२॥
यासि वधीन क्षणाभीतरीं । परी आज्ञा तुमची शिरीं ।
म्हणोनि मुग्दराते सांवरी । ते समयीं प्रेतराज ॥५३॥
ऐसें बोलोनि प्रजापतीप्रती । सवें घेवोनि रथ सारथी ।
नारदासहित ऊर्ध्वगती । स्वर्गासी निघाला ॥५४॥
तंव येरीकडे दशानन । यमराज गेला देखोन ।
जिंतिलें म्हणोनि श्लाघ्यवचनें । करी गर्जना आनंदें ॥५५॥
पुष्पकीं आरुढोनि लंकापती । यमसदनींहूनि पुढतीं ।
चालिलासे रसातळाप्रती । तें सावध श्रोतीं अवधारिजे ॥५६॥
एका जनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण ।
एका एकापणा वांचून । रामयण लिहिलेंसे ॥५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
यमविधातृसंवादो नाम षड् विंशतितमोऽध्यायः ॥२६॥ ओंव्या ॥५७॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सव्विसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सव्विसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *