भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय त्रेपन्नावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय त्रेपन्नावा

नृगराजाची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम धरणिजाकांत । लक्ष्मणवचनें हर्षयुक्त ।
होवोनि स्वानंदे डुल्लत । कथा सांगत अनेका ॥१॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । तुज गेलें असतां वना ।
मागें चार दिवस राजकारणा । मन नाहीं प्रवर्तलें ॥२॥
तरी आतां नगरीचे जन । बोलावी शेटे महाजन ।
आणि पुरोहित प्रधान । राजकारणालागूनी ॥३॥
जो देशींचा भूपती । होवोनि न करी राजनीती ।
तो जाईल अधःपातीं । नृगरायासारिखें होईल ॥४॥
लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । नृग हा कोण कां अधःपाता ।
गेला काय कारण सर्वथा । तें मजप्रति सांगिजे ॥५॥
नृग कोण देशींचा भूपती । कोणाचा पुत्र रघुपती ।
काय चुकला म्हणोनि अधःपातीं । कोणे कर्मे जी गेला ॥६॥
ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । श्रीराम सच्चिदानंदघन ।
नृगरायाचें समूळ कथन । सांगता झाला संकळित ॥७॥
ऐकें सौमित्रा पूर्वील कथन । नृगराय धर्मपरायण ।
ब्राह्मणभत्क करी प्रजापाळण । इक्ष्वाकुनंदन तो नृप ॥८॥
नित्य गायी कोट्यनुकोटी । सवत्स ब्राह्मणां दे जगजेठी ।
सुवर्णभूषणें शोभती पाठीं । नित्य वाटीं गायींतें ॥९॥
पुष्करतीर्थींचा ब्राह्मण । अत्यंत दरिद्री अकिंचन ।
उंच्छवृत्तीनें वेचीं कण । उदरपोषण तेणें करी ॥१०॥

एका ब्राह्मणाला मिळालेली गाय राजाच्या
गृही गेली; राजाने ती दुसर्‍या ब्राह्मणाला दान दिली :

त्या ब्राह्मणें घेवोनि गोदान । स्वगृहीं नेतां मार्गीं जाण ।
चुकली धेनु पुनरपि भवन । राजियाचे पैं शिरली ॥११॥
दुसरे दिवशीं राजियानें । सवेंचि केलीं कोटिगोदानें ।
त्यांमध्ये धेनु आणिक्या ब्राह्मणें । संकल्पोनि घेतली ॥१२॥
ब्राह्मणें घेवोनि धेनूसी । नेली आपल्या नगरासी ।
तंव यरिकडे पुष्करवासी । स्वधेनूसी पाहता झाला ॥१३॥
म्हणे मज रायानें धेनु दिधली । ते माझ्या प्रारब्धानें नेली ।
तरी कोणे ठायीं असेल गेली । ती शोधून पाहूं पां ॥१४॥
उपवासी तो द्विजवर । हिंडता झाला नगरें नगर ।
उपवासी पीडिला एक संवत्सर । धेनूची शुद्वि न लभेचि ॥१५॥
अत्यण्त क्लेशी होऊन । कनखलतीर्था आला जाण ।
तंव ते धेनु विप्रगृहीं देखोन । बोलता झाला द्विजवर ॥१६॥

ती गाय मूळ ब्राह्मणाने ओळखून दुस-याजवळ मागितली :

न्याहाळून पाहे धेनूसी । तंव ते ओळखिली निश्चयेसीं ।
मग साद करोनि तियेसी । शबळे येई म्हणोनियां ॥१७॥
ऐकोनि ब्राह्मणाच्या वचनासी । धेनु लागली पाठीसीं ।
तंव ते कनखलतीर्थवासी । चरित्र पाहत तियेचें ॥१८॥
विप्राचिया पाठीं लागे । धेनु चालली मागें मागें ।
तंव तो येरु बोलिला रागें । कोणाची धेनु नेतोसी ॥१९॥
अगा धेनुचोरा कोठील वासी । माझी गाय चालवोनि नेसी ।
तुज दंडीन राजसभेसीं । परस्परें कलहासी पेटले ॥२०॥
परस्परें करिती वाद । परस्परे करिती संवाद ।
एकमेकांसि वर्मांगशब्द । भेदोनियां बोलती ॥२१॥
ऐसें भांडत भांडत दोघे जण । नृगरायाचें नगरा आले जाण ।
अति रमले क्षुधेंकरुन । राजदर्शन नव्हे सहसा ॥२२॥

राजाचे दोन चार दिवस दर्शन न झाल्यामुळे ब्राह्मण राजाला शाप देतात :

दोन चार दिवसपर्यंत । रायाचें दर्शन नव्हे प्राप्त ।
क्षोभले विप्र शाप देत । झाले नृगभूपतीसी ॥२३॥
क्रोधें अत्यंत तप्त होऊन । शाप देते झाले ब्राह्मण ।
म्हणती राया तुज कृकळपण । शीघ्रकाळें येईल ॥२४॥
कार्याची उत्कंठा मोठी । म्हणोनि आलों तुझे भेटी ।
तूं दर्शन नेदिसी शेवटीं । अवश्य सरड पैं होसी ॥२५॥
बहुत सहस्त्र वर्षे शत । तू कृकळ होसील निश्चित ।
विवरामाजीं होसील गुप्त । दुःखफळ भोगिसील ॥२६॥
ऐकोनि विप्रांचा शाप । राजा झाला अति संतप्त ।
मग ब्राह्मण बोलावोनि समीप । प्रार्थिता आपण पैं झाला ॥२७॥
राजा म्हणे ब्राह्मणांसी । धेनूच्या प्रतिनिधी घ्या धेनूसी ।
ब्राह्मण म्हणती राया परियेसीं । आणिका धेनूंचे कोण काम ॥२८॥

नृगराजाला उःशाप :

मग राजा झाला शरण । स्वामी मज द्यावें उःशापवचन ।
मग ते ब्राह्मण गतक्रोध होऊन । वचन बोलत पैं झाले ॥२९॥
यदुकुळीं उत्पन्नभूत । वासुदेवनामें विष्णू साक्षात ।
जयाचें नाम स्मरतां जाण । महापातकां होतसे ॥३०॥
लीलाविग्रही श्रीनारयण । अवतरेल यदुकुळीं जाण ।
जयाची कथा परम पावन । शापापासून सोडवील ॥३१॥
वासुदेव परमात्मा आपण । राया सोडवील शापापासून ।
मग ते दोघेही ब्राह्मण । थोर सुख पावले ॥३२॥
ते धेनु दोघीं जणीं । दिधली आणिका ब्राह्मणालागूनी ।
पुढें काय वर्तलें चापशरपाणी । सावधान अवधारिजे ॥३३॥
ऐसा रायासि शाप झाला । राजनीतीसी चुकला ।
याकरणे लक्ष्मणा वहिला । कार्याकारणा न चुकिजे ॥३४॥
राजा राजनीति न करी । एवढीं व्यसनें तयाचे शिरीं ।
वाजवी सौमित्रा निर्धारीं । यदर्थीं संदेह न धरावा ॥३५॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड आहे निरुपण ।
नृगरायाचें कथन । सावधान अवधारा ॥३६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
नृगराजकथनं नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥ ओंव्या ॥३६॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय त्रेपन्नावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *