भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा

नील व रावणाचे युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाचे रामांस वंदन करुन प्रयाण :

श्रीरामें निरुपण सांगून । बंधूसी पावली मूळींची खूण ।
घालोनियां लोटांगण । श्रीरामाचरण वंदिले ॥ १ ॥
वंदितां श्रीरामचरण । लक्ष्मणासीं आलें स्फुरण ।
श्रीरामें देवोनी अलिंगन । धाडिला आपण संग्रामा ॥ २ ॥

स रावणं वारणहस्तबाहुं ददर्श भीमोद्यतदीप्तचापम् ।
प्रच्छादयंतं शरवृष्टिजालैस्तान्वानरान्बाणविकीर्णदेहन् ॥१॥
तमालौक्य महातेजा हनुमान्मरुतात्मजः ।
निवार्य शरजालानि विदुद्राव स रावणम् ॥२॥
रथं तस्य समासाद्य तोदमाक्षिप्य सारथेः ।
त्रासयन्‍रावणं धीमान्हनुन्मान्वाक्यमव्रवीत ॥३॥
एष मे दक्षिणो बाहुः पंचशाखः समुद्यतः ।
विधमिष्यति हे देहे भूतात्मानं चिरोषितम् ॥४॥

वानरसैन्याला रावणापांसून पीडा :

रावणाचें उग्र स्वरुप । अत्युग्र वाहोनिया चाप ।
अनिवार शरप्रताप । वानरदर्प भंगिला ॥ ३ ॥
रावणाच्या निजबाणीं । वानरां जाली भगाणी ।
पाठीराखा नाहीं कोणी । रणमर्दनीं त्रासिले ॥ ४ ॥

हनुमंताचे रावणाला आव्हान :

श्रीराम आणि सौ‍मित्र । करितां धर्मयुद्धविचार ।
रावणे त्रासितां वानर । हनुमान सत्वर पावला ॥ ५ ॥
रणी गर्जोनी मारुती । येतां देखोनी शीघ्रगती ।
रावणबाण जंव सज्जिती । तंव तो रथीं आदळला ॥ ६ ॥
बाण ओढावया पुरती । रावणा सवडी नुरेचि रिती ।
आसड आसडुनियां मारुती । रथींचा रारथी घोळशिला ॥ ७ ॥

रावणाचा मारुतीच्या उरावर आघात :

हनुमान म्हणे रावणातें । पंचांगुळी दक्षिणहस्तें ।
तुझ्या मारीन भूतात्म्यातें । तळघातें हाणोनी ॥ ८ ॥
भूतात्मा तुझ्या देहाआंत । बहुकाळ वसिंनला अधर्मयुक्त ।
त्याचा करीन मी घात । दक्षिणहस्ताचेनि घायें ॥ ९ ॥
रावण म्हणे हनुमंता । शीघ्र करीं माझ्या निःपाता ।
तुझ्या देखोनी पुरुषार्था । मग तुझ्या घाता मी करीन ॥ १० ॥
जेव्हा मारिला अखयासुत । तेव्हांचि तुझा प्राणांत ।
आतां मेला ना जीत । मिथ्या पुरुषार्थ तूं वल्गसी ॥ ११ ॥
ऐकोनी कपीच्य वाक्यातें । कोपें प्रज्वळोनी लंकानाथें ।
उरावरी हनुमंतातें । निष्ठुर घातें ताडिलें ॥ १२ ॥
हृदयीं लागतां तळघात । उल्लास कपीच्या हृदयांत ।
करावया रावणाचा घात । स्वयें हाणित तळघातें ॥ १३ ॥

अजघान च संकुद्धस्तलेनैवासुरद्विषम् ।
दशग्रीवः पपातोर्व्यां यथा भूमितलेऽचलः ॥५॥
संग्रामे तं तथा दृष्ट्वा रावणं तलताडितम् ।
ऋषयश्चारणा सिद्धा नेदुर्देवाश्च वानराः ॥६॥
अथाश्वस्य महातेजा रावणो वाक्यमब्रवीत् ।
साधु वानर वीर्यं ते श्लाघनीयोऽसि मे रिपुः ॥७॥
रावणेनैवमुक्तस्तु मारुतिर्वाक्यमब्रवीत् ।
धिगस्तु मम विर्यस्य यत्वं जीवसि रावण ॥८॥

हनुमंताचा प्रतिकार व रावणास मुर्च्छा :

हनुमंतें हाणितां करतळ । रावण होवानियां विव्हळ ।
भूकंपे उलथे अचळ । तैसा विव्हळ लवंडला ॥ १४ ॥
चंद्री लागली विसां नेत्रीं । खरसी दाही मुखांतरी ।
रावण पडतांचि क्षितीवरी । निशाचरी आकांत ॥ १५ ॥
जाणोनि हनुमंत अति उद्‌भट । त्यासीं कां भिडों गेला दशकंठ ।
तेणे तळघातें केला शेवट । राज्यलोट लंकेचा ॥ १६ ॥
बोंब सुटली दळभारीं । बोंब सुटली निशाचरीं ।
बोंब सुटली लंकेमाझारीं । केली बोहरी हनुमंते ॥ १७ ॥

राक्षसांचा आक्रोश व मारुतीचा जयजयकार :

आर्तुबळी वायुनंदन । पूर्वी जाळिलें लंकाभुवन ।
आतां मारिला दशानन । केले कंदन राक्षसां ॥ १८ ॥
देखोनि हनुमंताची ख्याती । सुरवर जयजयकार करिती ।
असुर आंगवण वानिती । ऋषि स्तविती जयशब्दें ॥ १९ ॥
सिद्ध गंधर्व चारण । वानिती कपीची आंगवण ।
रणीं ढिलावला रावण । बळ संपूर्ण हनुमंता ॥ २० ॥
अदृष्टगतीचें विंदान । कपीचेनि हातें नाहीं मरण ।
रावणाचा परतला प्राण सावधान स्वयें जाला ॥ २१ ॥

शुद्धीवर आल्यावर रावणाचे मारुतीला धन्यवाद :

रावण सावधान होतां । धन्य म्हणे हनुमंता ।
अप्रमेयबळ पुरुषार्थ । शौर्यश्लाघता तिहीं लोकीं ॥ २२ ॥
तुझ्याऐसें बळ सत्राण । इंद्रदि देवां नाहीं जाण ।
दानव मानव बापुडे कोण । तुझी आंगवण त्यां नाही ॥ २३ ॥
दैत्य म्हणविती अदट । ते तुझे वाटिवेचे भाट ।
तूं वीरा वीर वरिष्ठ । शौर्य श्रेष्ठ मी मानीं ॥ २४ ॥

हनुमंताचा अधिक्षेप :

ऐकोनि रावणाचें वचन । हनुमान बोले लज्जायमान ।
जळो माझी आंगवण । घायें रावण न मारवेचि ॥ २५ ॥
माझा लागतां आघात । निःशेष मरावा लंकानाथ ।
तो तूं सावधान बोलत । धिक् पुरुषार्थ पैं माझा ॥ २६ ॥

तेन वानरवाक्येन कोपस्तस्य प्रजज्वले ।
स मुष्टिं पातयामास वज्रकल्पं महायशा ॥९॥
स तेनाभिहतो गाढं विसंज्ञो विह्वलोऽभवत् ।
विह्वलं तं तदा दृष्ट्वा हनूमंतं महाबलम् ॥१०॥
रथेनातिरथ क्षिप्रं नीलं प्रतिसमाद्रवत् ॥११॥

रावणाचा हनुमंतावर मुष्टिप्रहार :

ऐकोनि हनुमंताचें वचन । रावण जाला कोपायमान ।
रागें वज्रमुष्टि वळोन । हाणी धांवोन हनुमंता ॥ २७ ॥
हृदयीं लागतां मुष्टिघात । नावेक हनुमान मूर्च्छित ।
रावणाचा झणणिल हात । व्यथाभूत रथावरी ॥ २८ ॥

हनुमान सावध होण्याआधीच रावणाची नीलावर स्वारी :

मुष्टि हाणितां तडकला हात । तों हनुमान जाला सावचित्त ।
निमेषार्धे करील घात । निघे लंकानाथ अति धाकें ॥ २९ ॥
रण सांडोनी मागें जातां । उपहास लंकानाथा ।
रणीं चुकवावया हनुमंता । प्रेरी निजरथा नीळावरी ॥ ३० ॥
हनुमंतयुद्धसंकट । चुकवोनी रथ घडघडाट ।
नीळावरी आला दशकंठ । बाण उद्‌भट वर्षत ॥ ३१ ॥
रावण रणीं वर्षे बाण । नीळें हाणोनि पाषाण ।
रावणाचे बाण करी चूर्ण । रणविंदान दोहींचे ॥ ३२ ॥

अंतकप्रतिमैर्बाणैः परमर्मविभेदिभिः ।
क्षिप्रमापीडयामास नीलं हरिचमूपतिम् ॥१२॥
स शरौघं समायांतं नीलः परमदारुणः ।
गिरिशृंगं च शैलाभं रक्षोऽधिपतयेऽक्षिपत् ॥१३॥
हनुमानपि तेजस्वी समाश्वस्तो महाबलः ।
समीक्ष्यमाणो युद्धेप्सुः सराषमिदमबवीत् ॥१४॥
नीलेन सहसा सक्तो रावणो राक्षसाधिपः ।
न न्याय्यं हि मया योद्धं क्षत्रधर्मवि जानता ॥१५॥

नील व रावण युद्ध :

रावण विंधी जे जे बाण । नीळें वर्षोनि पाषाण ।
अवघे करितां शतचूर्ण । रणीं रावण क्षोभला ॥ ३३ ॥
साधोनिया रणांगण । अंतकतुल्य घेवोनि बाण ।
तोडून नीळाचे पाषाण । शर संपूर्ण विंधिले ॥ ३४ ॥
वर्मी भेदतांचि शर । तेणें क्षोभला वानर ।
मलयाद्रिसम गिरिवर । रागें सत्वर उपटिला ॥ ३५ ॥
न धरत न सांवरत रागें । ठोकिला लंकानाथ ।
तेणें रावण अति विस्मित । पर्वतपात देखोनी ॥ ३६ ॥
श्रीरामाच्या निजदळीं । जो तो वानर आतुर्बळी ।
पर्वत उपडोनी समूळीं । रणकल्लोळीं भिडताती ॥ ३७ ॥
मारिलें माझ्या प्रहस्तासी । तो सूड घेईन मी तुजपासीं ।
नीळ म्हणे रावणासी । उज प्रहस्तासी भेटवीन॥ ३८ ॥

मारुती शुद्धीवर आल्यावर नीळ व रावण यांचे द्वंदव पाहात राहिला :

तुम्हां दोघां जाहल्या भेटी । प्रहस्त सांगेल गुह्य गोष्टी ।
तेणें रावण क्षोभोनि पोटीं । शरवृष्टी वर्षत ॥ ३९ ॥
येरीकडे हनुमंत । मूर्च्छा शांतवून सावचित्त ।
रणीं मदार्वया लंकानाथ । असें पाहात साटोपे ॥ ४० ॥
रावण नीळेंसीं युद्धासक्त । तें देखोनि हनुमंत ।
स्वयं सांडी युद्धकंदनार्थ । धर्मयुक्त विवेकी ॥ ४१ ॥
दोघे वीरीं एकजणासीं । युद्ध करणें पापराशी ।
यालागीं त्याजून रावणासी । श्रीरामापासीं कपि आला ॥ ४२ ॥
रावण आणि नीळ । दोघे जण रणप्रबळ ।
दोघे करिती रणकल्लोळ । दोघे कुशळ रणमारा ॥ ४३ ॥
नीळें टाकिला प्रचंड गिरी । रावणे नवबाणेंकरीं ।
छेदून पाडिला धरेवरी । शतधा करी विखंड ॥ ४४ ॥

तद्विशीर्णागिरेः शृंगं दृष्ट्वा हरिचमूपतिः ।
अन्यांश्च विविधान्वृक्षान्नीलश्चिक्षेप संयुगे ॥१६॥
स तानापततः शीघ्‍रं वृक्षांश्चिच्छेद रावणः ।
नीलस्याप्याहनन्‍दात्रे दर्शयंश्च स्वलाघवम् ॥१७॥
ह्वस्वं कृत्वा ततो रुपं ध्वजाग्रे निपपात ह ।
ध्वजागे धनुषश्चाग्रे किरीटाग्रे च तंहरिम् ॥१८॥
सौ‍मित्रिः सुगलो रामो हनूमान्विस्मयं गतः ।
रावणोऽपि महासत्त्वः कपिलाघवविस्मितः ॥१९॥
नीललाघवसंभ्रांतं दृष्ट्वा रावणमाहवे ॥२०॥

वृक्षांच्या वर्षावाने रावणाची धांदल :

पर्वत छेदोनि प्रचंड । बाणीं केला खंडविखंड ।
नीळ कोपला वितंड । रावणबंड दंडावया ॥ ४५ ॥
नीळ होवोनि कोपायमान । वृक्ष घेतला बहुशाख जाण ।
दंडावया दशानन । दावी आपण हस्तवेग ॥ ४६ ॥
अश्वकर्ण शल्मली शाल । चूत चंपक तमाल ताल ।
खर्जूरी पोफळी सरळ । पिंपळ लघुलाघवें ॥ ४७ ॥
जांबळी वेहकळी प्रचंड खैर । वृक्षीं त्रासल दशशिर ।
दुर्धर तरुवरांचा मार । रणीं धीर न धरवे ॥ ४८ ॥
एक वृक्ष जंव तोडित । तंव वृक्ष येती शातानुशत ।
जाजावला लंकानाथ । रणी उसंत घेवों नेदी ॥ ४९ ॥
वृक्ष आदळती शिरीं । वृक्ष आदळती उरावरी ।
वृक्ष आदळती भुजांवरी । धनुष्य करी धरुं नेदी ॥ ५० ॥
अश्व हाणितां मुखावरी । सारथि पडला रथावरी ।
रथ भ्रमे चक्राकारी । भ्रमें चांचरी रावण ॥ ५१ ॥
सारथि मूर्च्छित रथावरी । अश्ववागोरे कोण आंवरी ।
रथ भोंवे सैरावैरी । अपांपरी रावणा ॥ ५२ ॥
नीळें ऐस‍ऐशापरी । रावण त्रासिला तरुवरीं ।
रावणें लघुलाघवेंकरीं । नीळ शरधारीं विंधिला ॥ ५३ ॥

रावणाचा बाणांचा वर्षाव चुकविण्यासाठी नीळाचं सूक्ष्म रुपधारण :

रावण धनुर्वाडा अति दक्ष । विकट साधोनियां लक्ष ।
छेदोनि सांडिलें वृक्षेंवृक्ष । नीळ संमुख विंधिला ॥ ५४ ॥
रावणाचें बाणलाघव । नीळें लक्षोनिया सर्व ।
स्वयें झाला अतिर्‍हस्व । र्‍हस्वान्‍व-यविंदानी ॥ ५५ ॥
र्‍हस्वरुपें नीळ वानरी । बैसला रावणाच्या ध्वजावरी ।
ध्वजीं विंधोनि जातां शरीं । धनुष्याग्रीं बैसला ॥ ५६ ॥

नीळाच्या सूक्ष्म रुपामुळे रावण गांगरतो :

धरुं जातां धनुष्याग्रीं । सवेंचि बैसे मुकुटावरी ।
धरुं जातां मुकुटाग्रीं । ध्वजाग्री आभासे ॥ ५७ ॥
देखोनी नीळाचें चरित्र । गदागदां हासे सौ‍मित्र ।
हनुमान सुग्रीव रामचंद्र । वानरवीर हांसती ॥ ५८ ॥
ध्वजाग्रीं धनुष्याग्रीं बाणाग्रीं । सवेंचि भासत रथाग्रीं ।
नीळ निर्धारीं लक्षेना ॥ ५९ ॥
विस्मय मानी श्रीरघुनाथ । विस्मित हनुमंत सौ‍मित्र ।
विस्मित वानर समस्त । नीळें लंकानाथ गांगिला ॥ ६० ॥
वीस बाहु वीस डोळे। रावण एकाग्र केला नीळें ।
युद्ध काय होतें तें न कळे । संभ्रांतळें तटस्थ ॥ ६१ ॥
वानर मिशांसी घेती हिंदोळा । एक काढिती कंठमाळा ।
एक पदकें घालिती गळां । रावण भुलला संग्रामीं ॥ ६२ ॥
एक आंसडिती वीरकंकणें । एक घेती बाहुभूषणें ।
नीळें रावणें एकाग्र करणें । देह विसरणें संग्रामीं ॥ ६३ ॥
एवं रणीं गांगोनि दशशिर । नीळें केला भुभुःकार ।
वानरांचा जयजयकार । केला गजर हरिनामें ॥ ६४ ॥
ऐकोनि वानरांचा गजर । रणीं क्षोभला दशशिर ।
मारावया नीळ वानर । बाण दुर्धर वर्षला ॥ ६५ ॥
रावणबाणांच्या आवर्ती । लक्षा ने येचि सेनापती ।
शर सुटले सुनाट जाती । लंकापति क्षोभला ॥ ६६ ॥
नीळ जो कां सेनापती । आटोपेना शस्त्रावर्ती ।
मग दिव्यास्त्रें लंकापती । तद्वधार्थी प्रयोजी ॥ ६७ ॥

वानराणां प्रणादेन संकुद्धो रावणस्तदा ।
अस्त्रामाहारयामास दीप्तमाग्नेयमुत्तमम् ॥२१॥
आग्नेयास्त्रेण संयुक्तं गृहीत्वा रावणःशरम् ।
ध्वजशीर्षस्थितं नीलमुदैक्षत निशाचरः ॥२२॥
ततोऽवबीन्महातेज रावणो राक्षसेश्वरः ।
कपे लाघवयुक्तोऽति मायया परया युतः ॥२३॥
त्वाद्वजायमयाक्षिप्तः सायकश्चाभिमंत्रितः ।
जीवितं खलु रक्षस्य यदि शक्तोऽसि वानर ॥२४॥
एवमुक्तो महाबाहू रावणो राक्षसेश्वरः ।
संधाय बाणमस्त्रेण चमूपतिमताडयत् ॥२५॥

रावण अग्निअस्त्र सोडतो :

वानरांचा जयजयकार । ऐकोनि क्षोभला दशशिर ।
नीळ मारावया वानर । अग्निअस्त्र सज्जिलें ॥ ६८ ॥
धगधगीत सज्जून बाण । रागें विंधितां रावण ।
नीळें होवोनि अणुप्रमाण । गेला उडोन ध्वजाग्री ॥ ६९ ॥
नीळ नाढळे बाणासीं । अलक्ष्य लक्षेना लक्ष्यांसीं ।
अग्निअस्त्र न लागे त्यासीं । मनीं कुसुमुसी रावण ॥ ७० ॥
नीळाची सूक्ष्म लाघवी गतीं । निर्बंधावया लंकापती ।
दमनीं अस्रप्रयुक्ती । नीळाप्रती प्रयोजी ॥ ७१ ॥
दमनीं अस्त्रमंत्रप्रयुक्ती । नीळाची खुंटली शक्ती ।
अग्निअस्त्र घेवोनि हातीं । लंकापति गर्जत ॥ ७२ ॥
लघुलाघवें सूक्ष्मगतीं । दाविसी नाना मायाव्युत्पत्ती ।
ते म्यां तुझी दंडिली शक्ती । रणभिवर्ती मारावया ॥ ७३ ॥
तुझा घ्यावया निजप्राण । म्यां सोडिला आहे बाण ।
पाहूं तुझी आंगवण । आपणा आपण वांचवीं ॥ ७४ ॥
नीळ लक्षोनि ध्वजाग्रीं । अग्निबाण घेवोनि करीं ।
रावण विधी निजनिर्धारीं । रण गजरीं गर्जोनी ॥ ७५ ॥
येतां देखोनि अग्निबाण । नीळा करितां न ये उड्डाण ।
मंत्रास्त्रें निजशक्ति क्षीण । हृदयीं बाण खडतरला ॥ ७६ ॥
हृदयीं लागतांचि बाण । नीळ करी श्रीरामस्मरण ।
येतां येतां पळालें मरण । वरकांती बाण खडतरले ॥ ७७ ॥
येथें श्रीरामस्मरण । तेथें कल्पांतीं न रिघे मरण ।
नीळाचा वांचला प्राण । वरकांती बाण लागला ॥ ७८ ॥

शत्रयुक्तेन बाणेन नीलो वक्षसि ताडितः ।
निर्दह्यमानः सहसा निपपात महतिले ॥२६॥
विसंज्ञं वानरं दृष्ट्वा दशग्रीवो रणोत्सुकः ।
रथेनांबुदघोषेण सौ‍मित्रिममिढुद्रुढुवे ॥२७॥

रामनामस्मरणाने नीळ सुरक्षित रहतो :

लागतां अग्निअस्त्राघात । नीळ भूतळीं पडे मूर्च्छित ।
तेथेंही जालें विपरीत । अत्यद्‍भुत तें ऐका ॥ ७९ ॥
अग्निअस्त्रें करावें घाता । तंव अग्नि नीळाचा पिता ।
तो न करीच प्राणघाता । नीळ तत्वतां वाचला ॥ ८० ॥
लागतां अग्निअस्त्राचा बाण । नीळें केलें रामस्मरण ।
घालोनियां वीरासन । मूर्च्छापन्न तो पडिला ॥ ८१ ॥
अग्निअस्त्राचा ताप शमोन । श्रीरामनामस्मरणें वोलावोन।
नीळ सुखें मूर्च्छापन्न। सुखसंपन्न श्रीरामें ॥ ८२ ॥
वानर रामाचे निजभक्त । त्यांसी पडतां रणांआंत ।
प्रकटोनि रघुनाथ । रक्षी भक्त स्वानंदें ॥ ८३ ॥
अंतकाळींचा सोयरा रघुनाथ । शस्त्राभिघातीं सुखोन्मत्त ।
यापरी रक्षी निजभक्त । युद्धाआंत श्रीराम ॥ ८४ ॥
श्रीरामें सुखरुप रण । श्रीरामें नाठवे जन्ममरण ।
श्रीरामें वानरां समाधान । सुखसंपन्न संग्रामीं ॥ ८५ ॥
श्रीरामाचे निजसंगती । रणीं वानरां सुखसंवित्ती ।
बाप कृपाळु रघुपती । संग्रामस्थितीं स्वानंद ॥ ८६ ॥

नीळास रावण लंकेत नेत असता लक्ष्मणाचे आगमन :

नीळ सेनानी वीर सुभट । रणीं पडिला अति श्रेष्ठ ।
रथीं घालोनि घडघडाट । जाऊं स्पष्ट लंकेमाजी ॥ ८७ ॥
रावणें रणीं लावोनि ख्याती । धरोनि आणिला सेनापती ।
इतकी तरी विजयवृत्ती । लंकेप्रती हो माझी ॥ ८८ ॥
रावणें जावें नीळेंसकट । तंव सौ‍मित्र आला निकट ।
तेणे तळमळे दशकंठ । खोटें अदृष्ट हें माझें ॥ ८९ ॥
यशेंसी जावया आपण । वाडी नुरेचि अणुप्रमाण ।
युद्धा आलासे लक्ष्मण । निर्वाणकंदन हा करील ॥ ९० ॥
लंकागमन राहिलें स्पष्ट । युद्ध करणे विचार श्रेष्ठ ।
रथ मुरडोनि घडघडाट । रागें दशकंठ परतला ॥ ९१ ॥
एक प्रद्युम्न एक शंबर । एक वृत्र एक देवेंद्र ।
तैसा रावणेंसीं सौ‍मित्र । युद्धी सत्वर मिसळला ॥ ९२ ॥
शस्त्रास्त्रीं विचित्र दारुण । एका जनार्दना शरण ।
श्रोतीं अवधानमज द्यावें ॥ ९३ ॥
नेणें पदबंधव्युत्पत्ती । नेणें कथेची संगती ।
रामायण वदवी रघुपती । कथाप्रयुक्ती पाकृत ॥ ९४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
नीलरावणयुद्धप्रसंगोनाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
ओंव्या ॥ ९४ ॥ श्लोक ॥ २७ ॥ एवं ॥ १२१ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *