भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा

वानरांचे स्वस्थानी निर्याण –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सिंहासनांधीश श्रीरामांचे वर्णन :

तदुपरी दुसरें दिवशीं । करोनियां प्रातःस्नानासी ।
वंदोनियां महेशासी । भद्रपीठासी श्रीराम आला ॥ १ ॥
सभा झाली घनदाट । प्रत्यया न ये वैकुंठ ।
येथींचा महिमा उद्‌भट । डोळा स्पष्ट विश्व देखे ॥ २ ॥
अंकीं बैसवोनि जानकीसी । आपण बैसला सिंहासनासीं ।
घेवोनि भरत प्रधानासी । बंधुत्रयेंसीं नमिता झाला ॥ ३ ॥
सुमंत धरी छत्रातें । राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें ।
धर्मपाळ आतपत्रातें । धरितां झाला ते काळीं ॥ ४ ॥
भरत चरणीं निकट । यौवराज्य लाहोनि उत्कृष्ट ।
नम्रपणे बोले चोखट । राजनीतिलागूनी ॥ ५ ॥
धनुष्य खड्‌ग हातीं धरून । सव्यभागीं लक्ष्मण ।
उभा राहोनि विचक्षण । स्वामि आज्ञापन वंदिता झाला ॥ ६ ॥
शत्रुघ्न आपण सेनानी । हातीं वेत्र धरोनि अनुदिनीं ।
रामसंकेतालागूनी । नमस्कारा तिष्ठत ॥ ७ ॥
ब्रह्मादिक देवगण । आरूढोनि दिव्य विमान ।
समीप बैसले ऋषिगण । जे भविष्यार्थ जाणते ॥ ८ ॥
ऐसी सभेची थोरी । राबती अष्टमहासिद्धि द्वारीं ।
कल्पतरु चिंतामणींच्या हारी । आदिकरोनि तिष्टती ॥ ९ ॥
गंधाक्षता सुमनमाळा । अर्पिती अपूर्व परिमळा ।
क्षणक्षणां देती तांबूला । दिव्य सोहळा काय वानूं ॥ १० ॥
श्रीराम सालंकृत । कृपादृष्टी पाहे भरत ।
नेत्रसंकेत मनोगत । जाणोनि यथोक्त आरंभिलें ॥ ११ ॥
षोडशदानें द्विजांसी । वस्त्रें दिधलीं भाटांसी ।
उर्वशीआदि कामिनींसी । अति उल्लासीं पूजिलें ॥ १२ ॥
नारद तुंबर आणि गंधर्व । नागरिक लोक अपूर्व ।
चौसष्टीकळालाघव । अति मनोहर दाविते झाले ॥ १३ ॥
चारी वेद मूर्तिमंत । सहाही शास्त्रें बोलत ।
अष्टदश पुराणें वल्गेजत । उपपुराणें गर्जत नानापरी ॥ १४ ॥
सकळ सभा आनंदेसीं । देखती झाली श्रीरामासी ।
संकेत करोनि बिभीषणासी । मग तयासी पुढें केलें ॥ १५ ॥
तयाउपरी राजे समस्त । नमस्कारा उभे सभेआत ।
कर जोडोनि तटस्थ । विनीतवत बोलती ॥ १६ ॥
वानर म्हणती श्रीराघवा । आनंदें भूगोल भरला आघवा ।
जैसा उदेलिया शशी बरवा । भरितें भरे समुद्रातें ॥ १७ ॥
हा दृष्टांत एकदेशी । बोलतां न ये उपमेसी ।
तूं अंतरात्मा होसी । सर्व जाणसी मनोगत ॥ १८ ॥
ऐसें परिसोनि कपींचें उत्तर । सर्वथा संतोषला श्रीरघुवीर ।
मग बोलिला प्रत्युत्तर । समस्तांसी सभेप्रती ॥ १९ ॥

श्रीरामांचे ऋणस्मरण ऐकून वानरांना आनंद :

म्हणे मी तुमचे उपकारऋणें । बांधिलों अवतारीं येणें ।
उत्तीर्णतापदार्थ जेणें । व्हावया सर्वथा न दिसे ॥ २० ॥
तरी तुम्ही काया वाचा मनसा । स्त्रीपुत्रांची धरिली नाहीं दुराशा ।
सांडोनि जीवाची आशा । साह्य सहसा झालेति मज ॥ २१ ॥
ऐकोनि श्रीरामवचनासी । आनंद झाला सकळांसी ।
जीवें ओंवाळोनि मानसीं । प्रीतिवचनासी मांडिलें ॥ २२ ॥
दाटलें बाष्प जळ लोचनीं । सद्‌गद बोलती वचनीं ।
तया प्रेमालागूनी । ब्रह्मपद ओंवाळिजे ॥ २३ ॥
तुझिया चरणांपरतें । नलगे आम्हां सायुज्य तें ।
परी न भोगितां प्रारब्धाते । केंवी येथे राहूं शकों ॥ २४ ॥
स्वामीवांचोनि अन्यथा । तिळभरी जरी दूर होतां ।
प्राण जाऊं पाहे तत्वतां । वचन सर्वथा मानिजे ॥ २५ ॥
आत्मा सकळांहि जाण । आदिकरोनि दानपुण्य ।
परी तुझ्या वियोगाचें दुःख दारुण । सर्वथा जाण सोसवेना ॥ २६ ॥
श्रीराम म्हणे सकळांसी । मी आहें तुम्हांपासीं ।
तिळभरी न विसंबें अहर्निशीं । वचन सकळांस मानले ॥ २७ ॥
आपण सकळांचा आत्मा । म्हणोनि मस्तकीं ठेवी हस्तपद्या ।
निरसोनियां आम्हां तुम्हां । जाणवी निजखुणा लाघवी ॥ २८ ॥

सुग्रीवाने आपल्या राज्याला जाण्याची आज्ञा मागितल्यावर
भोजनप्रसाद घेऊन जावे असे रामांचे सांगणे :

सुग्रीव राजा आपण । प्रार्थी श्रीराम कर जोडून ।
आज्ञा झाल्या संपूर्ण । स्वराज्या आपण जाऊं स्वामी ॥ २९ ॥
आतां स्वामींनी राज्य कीजे । आम्हां रंकांलागी आज्ञा दीजे ।
ऐसें ऐकतां रघुराजें । तांबूल अर्पिजे समस्तां ॥ ३० ॥
श्रीराम म्हणे सकळांसी । दध्योदन करोनि भोजनासी ।
मग जावें स्वराज्यासी । अक्षय सुखासी पाविजे ॥ ३१ ॥
आज्ञा वंदोनि माथां । माध्यान्हिक सारोनि तत्वतां ।
बिभीषण सुग्रीव वाळिसुता । पंक्तीं तत्वतां बैसविलें ॥ ३२ ॥
वसिष्ठादि ऋषीगण । आपण बंधु सहप्रधान ।
तिघी माता गुणसंपन्न । समीप आणून बैसविल्या ॥ ३३ ॥
वाढिती झाली कुशध्वजसुता । घृत वाढी सुमेधा पतिव्रता ।
दधि वाढी सौमित्रकांता । आदरें तत्वतां जानकी पाहे ॥ ३४ ॥
नाना अन्नें परवडी । काय वानूं तेथींची गोडी ।
ब्रह्मादिक वर्णिती प्रौढी । शंकरादिकां दुर्लभ ॥ ३५ ॥
पवित्र शरयूचे जळ । माजी मिश्रित सुपरिमळ ।
तें सेवितां सुख केवळ । पावे सुकाळ स्वानंदाचा ॥ ३६ ॥

इच्छा असेल ते मागून घ्या असे रामांनी वानरांना सांगताच,
पुढच्या कृष्णावतारात आमची तृप्ती करावी अशी सर्वांची प्रार्थना :

याउपरी श्रीराघुवीर । बोलिला प्रीतीचे उत्तर ।
म्हणे ज्यासी जो इच्छाआदर । तो मागणें प्रकार ममाज्ञा ॥ ३७ ॥
तंव बोलती मधुरवाणी । आजींची तृप्ति अनंत गुणी ।
परी उरी असे किंचित मनीं । ते परिसा श्रवणीं स्वामिनाथा ॥ ३८ ॥
दहिभात स्वइच्छेकरीं । भोजन करावें यमुनातीरीं ।
कां जें अवतरणे द्वापरीं । कृष्णावतारी स्वामिया ॥ ३९ ॥
वचन ऐकोनि श्रवणीं । हांसे आलें जानकीलागूनी ।
कोण भूषण गौळपणीं । वत्सराखणी स्वामीतें ॥ ४० ॥
भक्ती क्षणाक्षणाधीन देव । स्वामित्वाचे हेंचि लाघव ।
ऐसा जाणोनि मनोभाव । श्रीरामराव हौसले ॥ ४१ ॥
श्रीराम म्हणे तथास्तु । पुरती तुमचे मनोरथु ।
तुमचे पंक्ती मी कृतार्थ । बहु काय अर्थु अनुवादों ॥ ४२ ॥

भोजनोत्तर सर्वांना तांबूलदान :

असो ऐसीं भोजनें झालीं । सकळीं उत्तरापोषनें घेतलीं ।
उष्णोदकें सिद्ध होतीं ठेविली । तेणें सकळ आंचवले ॥ ४३ ॥
शुद्धाचमनें घाली सकळांसी । शीतळोदके देवोनि प्राशनासी ।
मग तुळसी देवोनि सर्वांसी । मुखशुद्धीसी दीधलें । ४४ ॥
देवोनि गंध सुमन । राजोपचार परिमळपूर्ण ।
तांबूल देवोनि संपूर्ण । सभेस जाण बैसविलें ॥ ४५ ॥
वीणासंकर्तिनगजरे । भाट गर्जती कैवारें ।
स्वानंदें लागली मंगळतुरे । उपमे न सरे सत्यलोक ॥ ४६ ॥

नंतर सुग्रीवाला मुकुट देऊन निरोप दिला :

तदुपरी श्रीराम आपण । मुकुट सुग्रीवासी देऊन ।
बहुत करोनि सन्मान । किंष्किंधेसी जाण धाडिला ॥ ४७ ॥
ते समयीं सुग्रीवें आपण । दृढ धरिले श्रीरामचरण ।
मस्तकीं लाहोनि वदरदहस्त पूर्ण । प्रीतिकरोन अति नम्र ॥ ४८ ॥
श्रीराम म्हणे तुझ्या उपकारा उत्तीर्ण । तुळितां मेरुमांदार तृण ।
क्षणक्षणां आठवी तुझे गुण । सखा संपूर्ण तूं माझा ॥ ४९ ॥
सव्य घालोनि सर्व सभेसी । सुग्रीव निघे वानरभारेसीं ।
श्रीराम म्हणे स्मरण मानसीं असो द्यावें सर्व काळ ॥ ५० ॥
उपरी अंगद कर जोडूनी । सख्य उभा राहूनी ।
बोलता झाला प्रीतिकरोनी । मधुरवचनीं अनुवादे ॥ ५१ ॥
म्हणे स्वामी तुझे कृपेंकरून । जन्ममरणावेगळें होणें ।
त्या तुज विसरोनि काय जिणें । निंद्य होणें जगामाजी ॥ ५२ ॥

अंगदाचा सत्कार करून त्याला प्रेमाचा निरोप दिला :

ऐसें अनुतापाचे बोलणें । संतोष मानिला रघुनंदने ।
मग अर्पूनियां भूषणें । अंगद पूर्ण शोभता झाला ॥ ५३ ॥
तुज न विसरिजे हें सुख । तुज न विसरिजे तें दुःख ।
भोगावया कोण मूर्ख । जो जन्मांध देख पृथ्वीवरी ॥ ५४ ॥
श्रीराम म्हणे वाळिआत्मजा । तूं आलासि माझिया काजा ।
आतां जाइजे निजवोजा । युवराजा किष्किंधे ॥ ५५ ॥
ऐसी रघुराज आज्ञा देत । अष्टादशक्षोणीसमवेत ।
सव्य घालोनि वैदेहीकांत । नामें गर्जत चालिला ॥ ५६ ॥

जांबवंत, कुमुद, रंभ, शरभ या प्रमुख वानरसेनानींचा सत्कार करून त्यांना प्रेमाचा निरोप :

यानंतरें ऋक्षाधिपती । जांबवंत करी विनंती ।
म्हणे स्वामी बहुतां रीतीं । सांभाळिलें मजलागीं ॥ ५७ ॥
आतां आज्ञा वंदोनि शिरीं । प्रयाण करूं सहपरिवारीं ।
श्रीरामें तये अवसरीं । बहु सन्मान दिधला ॥ ५८ ॥
रत्‍नखचित कवच । आणोनि अर्पिला साच ।
येरु म्हणे संतोष झाला उंच । मेरूपरीस सन्मानें ॥ ५९ ॥
परस्परें संकेत । श्रीराम म्हणे फळतीच मनोरथ ।
स्यमंतहरणीं पावसी निश्चित । द्वापर प्राप्त झालिया ॥ ६० ॥
ऐसी श्रीरामाची आज्ञा । मानिली जांबवंतें संज्ञा ।
मग मस्तकी वंदोनि आज्ञा । कोटि क्रक्षेंसीं निघाला ॥ ६१ ॥
पुढें कुमुदनामा वानर । श्रीरामासी करी नमस्कार ।
येरी हृदयीं धरोनि गौरव थोर । वीरांमाजी अति श्रेष्ठ ॥ ६२ ॥
संतोषोनि श्रीराम । जो अवाप्तपूर्णकाम ।
उचिता येवोनि उचितोत्तम । हार मुक्तलग दिधला ॥ ६३ ॥
उचित देखोनि तत्वतां । न माये गगनीं सर्वोत्कर्षता ।
सव्य घालोनि सीताकांता । शतसहसें कोटींसीं निघाला ॥ ६४ ॥
विंध्याचळीं वास्तव्य ज्याचें । रथ ऐसे नाम जयाचें ।
तेणें स्तुति करोनि रघुनाथाचे । मन अत्यंत तोषविलें ॥ ६५ ॥
उचिता येवोनि रघुनायक । दिधला रत्‍नखचित टिळक ।
माथां ठेवोनि अभयहस्तक । अति संतोषें धाडिला ॥ ६६ ॥
येरु हर्षे उचंबळला । सव्य घालोनियां भूपाळा ।
सरिसा सपरिवार चालिला । त्रिदशकोटींसमवेत ॥ ६७ ॥
यापरी कपि शरभु । स्तविता झाला अयोध्याप्रभु ।
उचिता येवोनि कौस्तुभु । प्रीती करोनि दिधला ॥ ६८ ॥
उचितानंदाचा सोहळा । सुख भरलें भूपाळा ।
सवें नव लक्ष गोळांगूळां । निघाला सव्य घालोनी ॥ ६९ ॥
विनीत वानर याउपरी । श्रीरामाची स्तुति करी ।
म्हणे परा पश्यंती मध्यमा वैखरी । बोलतां वाचा पारुषली ॥ ७० ॥
तो तू अमूर्त मूर्तिमंत । भक्तजनांलागीं कृपावंत ।
ऐसें बोलतां विनीत । स्वयें रघुनाथ तोषला ॥ ७१ ॥
बहु भूषणें रत्‍नखचित । विनीतासी अर्पी सीताकांत ।
सव्य घालोनी हर्षयुक्त । साठी शतसहस्रेंसीं निघाला ॥ ७२ ॥
कृच्छ कपि अगाध बळी । रामासन्मुख बद्धांजळी ।
स्तुति परिसोनि ते काळीं । आत्माराम संतोषला ॥ ७३ ॥
पदक काढोनि घातलें कंठीं । येरु सव्य घालोनि उठी ।
घेवोनि वानर तीन कोटी । उठाउठीं चालिला ॥ ७४ ॥
पुढें प्रमाथिनामा महामारी । तेणें स्तविला श्रीराम भारी ।
उचित दिधलें अवधारीं । कटिसूत्र जडिताचे ॥ ७५ ॥
तेणें उचिताचेनि हर्षे । गर्जत नामाचेनि घोषे ।
पन्नास सहस्त्र एक लक्षें । सहपरिवार चालिला ॥ ७६ ॥
याउपरी गवयनामा । स्तुती तोषविलें श्रीरामा ।
उचिता दिधलें प्लवंगमा । जडित उत्तरी कंठींची ॥ ७७ ॥
उचितें हर्ष झाला थोरू । सव्य घोलोनि श्रीरघुवीरू ।
सप्तकोटी परिवारू । कपींसमवेत चालिला ॥ ७८ ॥
यानंतरे वानर गज । तेणें स्तविला रघुराज ।
उचित दे महाराज । जो आत्मज कौसल्येचा ॥ ७९ ॥
कंकण जडित हातींचें । काढूनि त्वरित दिधलें साचें ।
श्रीराम बोले निजवाचे । आतां न विसरें मजलागीं ॥ ८० ॥
येरु मस्तक ठेवोनि भूमीसीं । तुज न विसंबें जीवेंसी ।
सवें वानर तीन लक्षेंसीं । सव्य घालोनि निघाला ॥ ८१ ॥
ऋक्षयातीचा प्रघसनामा । तेणें स्तविलें गुणग्रामा ।
कंठींची मेखळा उत्तमोत्तमा । तया दिधली संतोषें ॥ ८२ ॥
याउपरी सनातन कपी । दोघे बळी दीर्घप्रतापी ।
तिहीं स्तविला धर्मरूपी । मधुर स्तुती करोनियां ॥ ८३ ॥
स्तुति ऐकोनियां तत्वतां । पायींचा तोडर दिधला उचिता ।
येरु चालिला सत्वरता । सव्य घालोनि श्रीरामा ॥ ८४ ॥
ऋषभनाभा बळवंत । कर जोडोनि स्तवन करीत ।
उचित देवोनि सीताकांत । वांकी देत चरणींची ॥ ८५ ॥
दुर्मुखनामा याउपरी । स्तवोनि संतोषविला रावणारी ।
उचित दिधलें झडकरी । जडित कमळ हातींचें ॥ ८६ ॥
सुमुख कपि यानंतर । स्तुतिअनुवादें जोडोनि कर ।
म्हणे चाड नाही अलंकार । स्मरण देई आपुलें ॥ ८७ ॥
विचार पडला रघुनायका । मग उचित दिधल्या रत्‍नपादुका ।
येरें ठेवोनि मस्तका । सव्य घालोनि निघाला ॥ ८८ ॥
उचितें आनंद न समाये जगीं । सव्य घालोनि श्रीरामा वेगीं ।
निघता घाला ऊर्ध्यमार्गी । सभालोकीं संतोषिजे ॥ ८९ ॥
हें ऐकोनि श्रीराम । उचित हे अंगुष्ठमुद्रा उत्तमा ।
सर्वदा देखसी मज समा । प्रपंचोन्मुख असतांही ॥ ९० ॥
मग तुकावोनि माथा । कोटिदळेंसीं उत्तरपंथा ।
सव्य घालोनि रघुनाथा । त्वरान्वित चालिला ॥ ९१ ॥
याउपरी गवाक्षज झाला बोलता । कृपा असों दे रघुनाथा ।
सेवा लाहोनि पूर्णता । जे ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ ९२ ॥
याउपरी सर्वोत्तमें । उचित देणें श्लाध्यधर्मे ।
जें जें आहे परम दुर्गमे । जें देणें लागे दशमुद्रें ॥ ९३ ॥
तेणेंकरोनि जाण । पावलें श्रीरामाचें ध्यान ।
मग करोनियां नमन । पूर्वमार्गी चालिला ॥ ९४ ॥
याउपरी कपि नळ । तेणें स्तविला घननीळ ।
उचित देवोन अंदुखळाळ । स्वेहानंदें गौरविला ॥ ९५ ॥
नळे वंदोनि झडकरी । मस्तक ठेविला पायांवरी ।
अति हर्षें निजगजरीं । अग्रिदिशे चालिला ॥ ९६ ॥
सवें एक पद्य दळ । घेवोनि चालिला आतुर्बळ ।
सव्य घोलोनि नृपाळ । जो भूपाळ अयोध्येचा ॥ ९७ ॥
यानंतरें नीळ मधुरोत्तरीं । नरेंद्राची स्तुति करी ।
येरें काढोनि भागवती करीं । त्याचे हातीं दिधली ॥ ९८ ॥
सव्य घालोनि सभास्थान । गर्जत चालिला त्वरेन ।
सवें घेवोनि सर्व सैन्य । श्रीरामगुण वर्णित ॥ ९९ ॥
यानंतरें सुषेण । वंदोनि श्रीरामचरण ।
होवोनियां हर्षायमान । नामगर्जन करीत ॥ १०० ॥
श्रीराम म्हणे तूं प्राणदाता । उचित न दिसे पदार्था ।
कवण्या द्यावें अर्था । लक्ष्या सर्वथा न येचि ॥ १०१ ॥
तथापि एक असे मनीं । म्हणोनि काढिला कंठींचा मणी ।
देवोनि सुषेणालागूनी । अति प्रीतीनें धाडिला ॥ १०२ ॥
एक सर्व सेना घेऊन । सुषेण चालिला आपण ।
वंदोनियां सीतारमण । अति हर्षोन चालिला ॥ १०३ ॥
म्हणे तुझे दृष्टीपुढें । मृत्यु पळेल बापुडें ।
रोगिया गणना केंवी घडे । ऐसें वदे रोकडे श्रीराम ॥ १०४ ॥
यानंतरे मैंद कपि जाण । स्तविता झाला रघुनंदन ।
येरू म्हणे तूं सखा पूर्ण । येथें अनुमान असेना ॥ १०५ ॥
उचिता येवोनि आपण । अपिले तुजलागीं सिंहासन ।
हेचि करीं माझे पूजन । सर्वही श्रेय जाण पावसी ॥ १०६ ॥
एक शंख घेवोनि सेना । वंदोनिया रघुनंदना ।
सव्य घालोनियां जाणा । करित गर्जना चालिला ॥ १०७ ॥
हिमवंत करी स्तुती । सार्वभौभा मंगलमूर्ती ।
तेणें आनंदला रघुपती । देवोनि रत्‍नमूर्ति गौरविला ॥ १०८ ॥
मग घेवोनि दहा क्षोणी सेना । सव्य घालोनि रघुनंदना ।
त्वरें चालिला जाणा । वायव्यकोणा लागूनी ॥ १०९ ॥
ज्योतिर्मुख याउपरी । श्रीरामाची स्तुति करी ।
उचित तया झडकरी । रत्‍नप्रावरण दिधलें ॥ ११० ॥
नमस्कारोनि राघवातें । सेना घेवोनि एक कोटीतें ।
सव्य घालोनि रघुनाथातें । उल्लासित चालिला ॥ १११ ॥
केसरी नाम कपि जाण । येवोनि घाली लोटांगण ।
त्यासी देवोनि बाहुभूषण । अति गौरवून धाडिला ॥ ११२ ॥
सवें घेवोनियां निजसेना । अक्षौहिणी गणना ।
वंदोनियां श्रीरामचरणां । करित गर्जना चालिला ॥ ११३ ॥
हेमकूट त्यानंतर । स्तुति करोनि अत्यादर ।
चुंबोनि श्रीरामचरण परिकर । निढळीं सत्वर लाविलें ॥ ११४ ॥
तये समयीं उचित । पावला कौस्तुभ झळझळित ।
वंदोनियां सीताकांत । शतकोटी कपींसहित चालिला ॥ ११५ ॥
याउपरी वानर खेद नाम । स्तुति वदे सर्वोत्तम ।
संतोषोनि देवोत्तम । दे क्षुद्रघंटिका कंठींची ॥ ११६ ॥
आज्ञा देतां सीतारमण । सवें घेवोनि सात क्षोणी सैन्य ।
सव्य घालोनि रघुनंदन । हास्यवदन चालिला ॥ ११७ ॥
गंधमादन आणि दधिमुख । उभे राहिले श्रीरामासन्मुख ।
जीवें ओंवाळुनि श्रीमुख । मस्तक चरणी ठेविती ॥ ११८ ॥
अभयहस्त ठेवोनि माथा । देत आशीर्वाद तत्वतां ।
विजयी तुम्ही अक्षयता । श्रीरघुनाथाचेनि धर्में ॥ ११९ ॥
समस्तांसी श्रीरघुवीर । कोणा अलंकार कोणा वस्त्र ।
गौरवोनियां वानर । अति त्वरें बोळवीत ॥ १२० ॥
ऐसे बोळवोनि वानरगण । सुख पावोनि संपूर्ण ।
एका जनार्दना शरण । रम्य रामायण अति गोड ॥ १२१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
वानरनिर्याणं नाम एकनवतितमोऽध्याय ॥ ९१ ॥
॥ ओंव्या ॥ १२१ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याण्णवावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *