भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा

सीता – मंदोदरी संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम नाहीसे झाल्याबद्दल वानरांचा प्रश्न :

आनंद झाला सर्वांसी । श्रीराम आला निजमेळिकारांसी ।
लागले श्रीरामचरणांसी । रामें हृदयेंसीं आलिंगिले ॥ १ ॥
परियेसीं स्वामी श्रीरामा । दीन अनाथां प्लंवगमां।
सांडोनि गेलासि आम्हां । सर्वोत्तमा काय केलें ॥ २ ॥
तुझ्या पोटीं होतें जाणें । एकासी तरी होतें सांगणे ।
न पुसतां घडलें जाणें । उचित करणें हें नव्हे ॥ ३ ॥

मारुतीकडून राममहातीचे कथन :

तंव बोलिला हनुमंत । तुम्हां वानरां न कळे मात ।
पूर्णावतार रघुनाथ । त्यासीं सांगता काय करी ॥ ४ ॥
जो दुजियाची वाट पाहे । त्याचें कार्य कधीं न होये ।
यश कोठेंचि न लाहे । श्रीराम पाहा तैसा नव्हे ॥ ५ ॥
श्रीराम एकला एकांगवीर । न धरी दुजियाचा आधार ।
तो वानरांसी विचार । पुसे साचार हें न घडे ॥ ६ ॥
जाणें होतें पाताळासी । कळों न देतां कोणासी ।
जावोनियां अति वेगेंसी । अहिरावणासी मारिलें ॥ ७ ॥
अहिरावण महिरावण । सखे बंधु दोघे जण ।
त्यांसी वधावया जाण । श्रीराम आपण स्वयें गेला ॥ ८ ॥
मारिलिया रावणासी । अवकाश न पुरे जावयासी ।
वेढा काढवोनि वेगेंसीं । पाताळासी स्वयें गेला ॥ ९ ॥
जरी जावें पुसोनी । तरी निवारुं आम्ही कोणी ।
गेला न पुसतां म्हणोनी । प्रकट जनीं न करीच ॥ १० ॥

श्रीरामांचे वृत्तांत कथन :

ऐकोनि तो विचार । हरिखेला वानरभार ।
श्रीराम एकांगवीर । युद्ध थोर पैं केलें ॥ ११ ॥
दुसरा कैंचा हनुमंत । म्हणोनी पुसे वानरनाथ ।
ऐकोनि तयाची मात । श्रीरघुनाथ स्वयें सांगे ॥ १२ ॥
वानरभार जैं निजेला । अहिरावणें घालोनि घाला ।
दोघां जणां धरोनि वहिला । गेला पाताळा घेउनी ॥ १३ ॥
मार्ग काढोनि त्वरित । आला पाताळा हनुमंत ।
मकरध्वज द्वार राखित । नगराआंत रिघों नेदी ॥ १४ ॥
युद्ध झालें दोघांसीं । न लोटती येरयेरांसी ।
हनुमान क्षोभोनि पुसे त्यासी । झाली दोघांसी ओळखी ॥ १५ ॥
हनुमंताचा स्वेदज पुत्र । पुसतां निघाला वीर मकर ।
भेटोनियां पितापुत्र । मज सत्वर सोडविलें ॥ १६ ॥
मारोनियां राक्षसांसी । मुक्त करोनि पाताळासी ।
राज्य देतां मकरध्वजासी । भेटों तुम्हांसी येथें आलों ॥ १७ ॥
हनुमंताचा आत्मज । अतिविख्यात मकरध्वज ।
ऐकोनि कपिसमाज । पुच्छध्वज उभारिलें ॥ १८ ॥
मग क्षेम देती येरांयेर । येरयेरां करिती नमस्कार ।
होवोनियां आल्हादपर । श्रीरघुवीर नमियेला ॥ १९ ॥
झालें सकळां समाधान । हरिखें नाचती वानरगण ।
तंव रावणाचे दूत जाण । हेरपण करिती रामकटकीं ॥ २० ॥

रावणाच्या हेरांनी रावणाला बातमी सांगितल्याने
रावणाने चिंताग्रस्त विचाराने मंदोदरीला सीतेकडे पाठविलें :

वृत्तांत ऐकोनि समग्र । गेले रावणासमोर ।
सांगितलें सविस्तर । रामचरित्र यथाश्रुत ॥ २१ ॥
अहिरावण महिरावण । यांचा वध ऐकोनि जाण ।
दहा मुखीं रावण । शंख आपण करितसे ॥ २२ ॥
मनोरथ न वचती सिद्धी । झाली सकळांची अवधी ।
आतां काय करुं बुद्धी । लागली आधी रावणा ॥ २३ ॥
दुर्धर कष्ट करोनि जाण । आणिलें सीता चिद्रत्‍न ।
तेंही नव्हे भोगायतन । कोण प्रयत्‍न करुं आतां ॥ २४ ॥
प्रार्थोनियां मंदोदरीसी । वश्य करीन जनकदुहितेसी ।
भोगितां मैथिलीसी । केल्या कष्टासी परिहार ॥ २५ ॥
धरावया मृगगणा । घरीं पाळिती भांड हरणा ।
स्वयातीसीं विश्वासोन जाणा । निजबंधन पावती ॥ २६ ॥
कामी पुरुष सकामासी । जार स्त्री पुश्चळिसी ।
किंवा तस्कर तस्करासी । वश्य करी हेरासी पैं हेर ॥ २७ ॥
हरिभक्त हरिभक्तासी । दृष्टी पडतां येरयेरांसी ।
मिठी पडे अतिप्रीतीसीं । सेव्य दोघांसी परमात्मा ॥ २८ ॥
योगी आकळे योगबळें । ज्ञानिया निजज्ञानमेळें ।
निःसंगत्वें वैराग्यशीळें । सद्य आकळे परब्रह्म ॥ २९ ॥
तेंवी पतिव्रता पतिव्रतेसी । वश्य करी क्षणमात्रेंसीं ।
म्हणोनियां मंदोदरीसी । सीताप्राप्तीसी पैं प्रार्थी ॥ ३० ॥
ऐसें विचारोनि रावण । निजकार्या सावधान ।
अत्यंत प्रीति करुन । निजकांता जाण पाचारी ॥ ३१ ॥
अत्यंत नम्र अति प्रीतीसीं । बोलता झाला मंदोदरीसी ।
तूं सती पतिव्रता होसी । माझ्या वचनासी नुपेक्षीं ॥ ३२ ॥
पतिव्रतेचा धर्म पूर्ण । नुल्लंघावें पतिवचन ।
ऐसें आहे वेदवचन । शास्त्रपुराणसंमत ॥ ३३ ॥
म्हणोनियां तुजप्रती । करीतसें मी विनंती ।
अनुसरोनि वचनस्थिती । कार्य निगुतीं साधावें ॥ ३४ ॥
जानकीभोगाची आस्था । अत्यंत लागलीसे चित्ता ।
ते कामना सिद्धी न वचतां । प्राणांतव्यथा होतसे ॥ ३५ ॥
मांडलें अत्यंत निर्वाण । निमाले पुत्रादि प्राधान ।
सैन्य निमालें संपूर्ण । वीर दारुण रणयोद्धे ॥ ३६ ॥
अदट वीर कुंभकर्ण । तोही मारिला विटंबून ।
गोष्टी सांगावया पुरती जाण । सांगातें आननुरेची ॥ ३७ ॥
ऐसें सकळ कुळाचें निर्दळण । झालें असतां संपूर्ण ।
माझे हृदयींचे शल्य जाण । अर्ध क्षण न ढळेची ॥ ३८ ॥
जेवितां रुचेना अन्न । चवी नेदी पैं जीवन ।
झोंप नये केल्या शयन । अवस्था पूर्ण लागली ॥ ३९ ॥
सपुत्र सैन्य निमालें देख । त्याचें अणुमात्र नाहीं दुःख ।
परी भोगावया सीतासुख । आस्था अलोलिक लागली ॥ ४० ॥
त्या आस्थेचें निरसन । मंदोदरी तुझेनि जाण ।
मज होईल समाधान । म्हणोनि विनवण करीतसें ॥ ४१ ॥
तूं सती पतिव्रता । नुल्लंघिसी पतिवचनार्था ।
सांडोनियां निजमहत्त्वा । शरण तत्वतां तुज आलों ॥ ४२ ॥
कार्य साधावें संपूर्ण । म्हणोनि धरिले दोनी चरण ।
सांडोनियां राजचिन्ह । तुज विनवण करितसें ॥ ४३ ॥
कामासीं आतुडला संपूर्ण । तो न पाहे मानापमान ।
स्त्रियेचे धरितां चरण । लज्जा रावण मानीना ॥ ४४ ॥
येरी निवारोनि वेगेंसीं । स्वयें लागली चरणांसी ।
भाग्य आलें जी फळासी । निजकार्यासी आज्ञापिलें ॥ ४५ ॥
जितुकें माझें युक्तिबळ । तितुकें वेंचोनि सकळ ।
प्रबोधीन जनकबाळ । परी प्राप्तिकाळ दैवाधीन ॥ ४६ ॥

दैवाधीन विचाराने मंदोदरी सीतेला भेटावयास जाते :

ऐसी रावणासी एकांतीं । संवादोनि महासती ।
आली निजधामाप्रती । होतें चित्तीं तें झालें ॥ ४७ ॥
बाप कृपाळु भगवंत । निजभक्तांचें मनोगत ।
पुरवावया सावचित्त । अनाथनाथ श्रीराम ॥ ४८ ॥
होतें मंदोदरीच्या चित्तीं । जे भेटावी सीता सती ।
राम भोगी कोण्या स्थितीं । हें सीतेप्रती पुसावें ॥ ४९ ॥
श्रीराम कैसा किमात्मक । श्रीराम भोगी कैसें सुख ।
सविकल्प निर्विकल्प । हेंही सकळिक पुसावें ॥ ५० ॥
श्रीरामाचें ठाणमाण । रुपरेखा गुणलक्षण ।
सर्वगत कीं परिच्छिन्न । स्थिति संपूर्ण रामाची ॥ ५१ ॥
श्रीराम केवढा कैसा असे । कोठें वसे ।
पुसावया जीवीं उल्लासें । जानकीस अहर्निशीं ॥ ५२ ॥
ऐसी मंदोदरीच्या चित्ता । होती अनिवार अवस्था ।
कैं भेटेल जनकदुहिता । निजगुह्यार्था पुसेन ॥ ५३ ॥
अवचटें सीता सती । हातींची गेलिया निश्चितीं ।
कोणा पुसावी निजगुह्यस्थिती । चिंता चित्तीं अनिवार ॥ ५४ ॥
भाग्यें भेटल्या साधूसी । अवश्य पुसावें निजगुह्यासी ।
जाणोनि जो होय उदासी । पाप त्यापासीं खतेलें ॥ ५५ ॥
बहुकळ ज्यासीं खता चढे । साहणे तोडितां तो न झडे ।
लोहाऐसें कठिण गाढें । करी रोकडें मृत्तिका ॥ ५६ ॥
अभिमानाची जाति पाहीं । साधुसंतां न मानी कांहीं ।
ज्ञानगर्वे बुडाले तेही । शुद्धि नाहीं तयाची ॥५७ ॥
मनुष्यदेहाची निजप्राप्ती । शिणतां न पवे लक्षांतीं ।
येथेंही विकल्प् चित्तीं । तोंडी माती पडली ती ॥ ५८ ॥
एक नरदेह नेणोनि गेले । एकीं लतकें म्हणोनि उपेक्षिलें ।
एक ते साधनीं ठकले । आपमती सैरा भरले ॥ ५९ ॥
एक करुं करुं म्हणतां गेले । करणे राहिलें तैसेंचि ॥ ६० ॥
पोटीं अनिवार विषयस्थिती । ज्ञान मिरविती लोकांप्रती ।
जीविका त्यावरी करिती । घात निश्चितीं । स्वयेंचि केला ॥ ६१ ॥
जेणें व्हावी निजप्राप्ती । तें वेचलें विषयासक्ती ।
स्वयेंचि नागवले निश्चितीं । भांडवल हातीं असेना ॥ ६२ ॥
स्वप्नीं जोडिली जे संपत्ती । ते वेंचितां नये जागृतीं ।
विषयी आणि ब्रह्मनिष्ठ म्हणविती । भ्रम निश्चितीं या नांव ॥ ६३ ॥
जरी धांवणें नागवी आपण । तरी कोण करील सोडवण ।
अभिमानें यापरी जाण । सकळ जन नागविले ॥ ६४ ॥
जे ज्ञानगर्वे नागविले । ते काळातें न देखती वहिले ।
सिद्ध आयुष्य वांयां गेलें । जें जोडितां न मिळे पुण्यकोटी ॥ ६५ ॥
झालिया नरदेहप्राप्ती । परमार्थ साधावा हातोहाती ।
जेंवी कृषीवलाची स्थिती । मढें झांकिती पेरणीसीं ॥ ६६ ॥
आजि हें राहो करीन पाहें । म्हणतां काळ कृपाळु नोहे ।
क्षणक्षणां जात आहे । उत्तम आयुष्य घेवोनियां ॥ ६७ ॥
ऐसी काळाची काळसत्ता । जाणोनि मंदोदरीच्या चित्ता ।
लागली अनिवार अवस्था । जनकदुहिता भेटावया ॥ ६८ ॥

मंदोदरीचे अशोकवनामध्ये आगमन :

तव आज्ञापिलें रावणें । उल्लासोनियां चौगुणें ।
करुं आदरिलें येणें । रामांगनेसी भेटावया ॥ ६९ ॥
अशोकवना येवोनी । पाहे मंदोदरी नयनीं ।
तंव देखिली जनकनंदिनी । रामानुसंधानीं आसनस्थ ॥ ७० ॥
श्रवणीं राम नयनीं राम । वाचेसीं नित्य वदवी राम ।
ध्यानीं राम मनीं राम । अनुसंधानीं राम अखंड ॥ ७१ ॥
प्राणाचा निजसंचारी । राम न विसंबेचि सुंदरी ।
सकळ इंद्रियविकारीं । झाली अविकारी श्रीरामें ॥ ७२ ॥
चोर धरियेला राजद्वारीं । त्यासीं निग्रहिती नानापरी ।
तेंवी इंद्रियवृत्ती समग्री । सीता सुंदरीं निग्रहिल्या ॥ ७३ ॥
ऐसी दृष्टीं देखतां जानकीसी । अति उल्लास मंदोदरीसीं ।
विसरोनि गेली देहभावासी । मिनली प्रीतीसीं अहंत्यागें ॥ ७४ ॥
साधु देखतांचि दृष्टीं । जरी विरे अहंकारची गाठी ।
पडे स्वानंदाची मिठी । उडे त्रिपुटी अभावें ॥ ७५ ॥
सांडोनियां मी तूं पण । सीतेसी बोलावया जाण ।
साधूं आदरिलें विंदाण । ऐसी अति विचक्षण मंदोदरी ॥ ७६ ॥
अति चातुर्याचा प्रश्न । पुसती झाली विचक्षण ।
रावणाचें कार्य जाण । साधून विंदान स्वरुप पुसे ॥ ७७ ॥
शब्दें व्यापिलें गगन । निमालें शून्याचें शून्यपण ।
तेथें परादि वाचा पुसे कोण । अर्थ संपूर्ण आकर्षी ॥ ७८ ॥
अहाच दृष्टी पाहतां । येथींच अर्थ न ये हाता ।
चित्त विनटलें तत्वतां । तें शब्दार्था पाविजे ॥ ७९ ॥
यालागीं श्रोते सज्जन । निजहितीं कुशल पूर्ण ।
करोनि सर्वांगाचें अवधान । शब्दार्थ जाणा परिसावा ॥ ८० ॥
जीवामाजी घालोनि जीव । परिसतां हें अर्थगौरव ।
तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भवभय निवारे ॥ ८१ ॥
असो आतां जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसीं ।
पुसती झाली वेगेंसी । राम अनुभविसी तो कैसा ॥ ८२ ॥
राम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजपासीं ।
सकळ देहीं श्रीरामासीं । स्थिति कैसी वस्तीची ॥ ८३ ॥
जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खान ।
आत्माराम हें अभिधान । न घडे जाण तयासीं ॥ ८४ ॥
जरी त्यातें व्यापक म्हणसी । तरी तो सर्वभूतनिवासी ।
मग तेथें उपेक्षितां रावणासी । अद्वैतभजनासीं अभावो ॥ ८५ ॥
ब्रह्मा धरोनि मुंगीवरी । राम व्यापक चराचरीं ।
तो रावणचेही शरीरीं । इंद्रियव्यापारीं नांदत ॥ ८६ ॥
जरी रामानुसंधान रावणीं । भजतां होय कोण हानी ।
हें सांगावें साजणी । प्रीती करोनि मजलागीं ॥ ८७ ॥

सीतेचे मंदोदरीला उत्तर :

तंव हांसोनि सीता सुंदरी । उत्तर देती अतिकुसरीं ।
ते परिसोनि मंदोदरी । विश्रांति थोरी पावली ॥ ८८ ॥
सावध ऐकें साजणीं । प्रवेशतां रामानुसंधानीं ।
चित्त चित्तपणा विसरोनी । रामाहुन स्वयें राहे ॥ ८९ ॥
द्रष्टा परिच्छिन्न होये । तैं दृश्य दृश्यत्वें भासों लाहे ।
श्रीराम स्वयें तैसा नव्हे । परिस माये सांगेन ॥ ९० ॥
श्रीरामाहून व्याप्त एक । असतां श्रीरामें व्हावें व्यापक ।
त्रिपुटीचा अभावो देख । व्याप्य व्यापक तेथें कैंचे ॥ ९१ ॥
म्हणसी सर्वांच्या अंतरीं । राम असे चराचरीं ।
तो रावणाच्या शरीरीं । इंद्रियव्यापारीं वर्तत ॥ ९२ ॥
राम सर्वांच्या हृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये ।
राम रावण कोठें आहे । सांग पां माये यथार्थ ॥ ९३ ॥
भोगितां निजहृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तयासी ।
तेथें रावण कैंचा आणिसी । जे तयासी भोगावें ॥ ९४ ॥
दृश्याचिये भेटी । द्रष्टा दृश्यपणें उठी ।
होतां तेणेसीं तुटी । तोही शेवटीं असेना ॥ ९५ ॥
आतां नाहींपणे असे । आणि असे तोचि दिसे ।
तरी रावणाचें काय पिसें । सांग सावकाशें साजणी ॥ ९६ ॥
ऐकोनि सीतेच्या उत्तरीं । पूर्णावस्था मंदोदरी ।
चढला स्वेद कंप शरीरीं । आनंदलहरी दाटली ॥ ९७ ॥
इंद्रियां विकळता झाली । चित्तचैतन्या मिठी पडली ।
अंतरी सुखोर्मी दाटली । तेणें पडली मूर्च्छित ॥ ९८ ॥
बाप सद्‍गुरुचें सामर्थ्य । अलोलिक अत्यद्‍भुत ।
वचनमात्रें शक्तिपात । झाला निश्चित मंदोदरी ॥ ९९ ॥
नाहीं हस्तक मस्तक । कृपें कळवळोनि देख ।
वचनमात्रें दिधलें सुख । झाल्या कल्पांत सरेना ॥ १०० ॥
छळणेंकरोनि बोलतां । तत्काळ झाली समाधिअवस्था ।
सद्‌भावें विनटतां संतां । न कळे तत्वतां काय देती ॥ १ ॥
जाणोनियां श्रोते सकळ । ज्यांसी निजप्राप्तीची कळवळ ।
तिहीं सांडोनियां छळ । सवावे अविकळ सज्जन ॥ २ ॥
परिस फोडावया जाण । सबळ बळें हाणिती घण ।
त्यासीं करितां सुवर्ण । न लगे क्षण तत्वतां ॥ ३ ॥
तरी परिस बापुडें तें किती । लोहाचे ठायीं सुवर्णस्फुर्ती ।
परीस न करीच निश्चितीं । निजस्थिती वंचिली ॥ ४ ॥
तैसा नव्हेचि चआंद्न । अंगवात झगटतांचि पूर्ण ।
उद्यान केलें आपणासमान । न्यून पूर्ण असेना ॥ ५ ॥
खैर धामोडे समग्र । वेहकळी टाकळी अत्युग्र ।
आदिकरोनि पांगार । झाले समग्र चंदन ॥ ६ ॥
आणीक गुण अलोकिक । जो छेदावया आला देख ।
त्यासी परिमळ अधिक । जाळित्या देख तयाहोनी ॥ ७ ॥
तेंवी सज्जनाचें लक्षण । छळें द्वेषभावें पूर्ण ।
जो आला तयापासीं जाण । त्यासी समाधान सारिखेंचि ॥ ८ ॥
यापरी सीता सती । मंदोदरीची छळणवृत्ती ।
छेदोनियां छळणयुक्तीं । समाधि निश्चितीं पावविली ॥ ९ ॥
बोलतां सीतेसीं बोलीं । आली वाट भुलविली ।
ऐसी जानकिया ख्याती केली । वचनें लाविली समाधी ॥ ११० ॥
कष्टें आली बाह्यवृत्ती । तरी न मोडे सहजस्थिती ।
मंदोदरी चवके चित्तीं । कांही निजचित्तीं स्फुरेना ॥ ११ ॥
मग कष्टीं म्हणे वो माये । देखिलिया तुझे पाये ।
जें सुख आलें आहे । तें बोली पाही बोलवेना ॥ १२ ॥
परादि वाचा नव्हे सौरस । येथें वोलासी कैंचा प्रवेश ।
ओसंडला अति उल्लास । राम परेश बोळला ॥ १३ ॥
ऐसें बोलतां बाष्प कंठी । तंव मन मागतें नुठी ।
इंद्रियां सुखसंतुष्टी । पडली मिठी चैतन्यीं ॥ १४ ॥
मग मौनेंचि लोटांगण । मंदोद्री स्वयें आपण ।
जानकीचे निजचरण । हृदयीं धरोन राहिली ॥ १५ ॥
तंव दुजी सन्नद्ध सहजासन । बैसली असतां सावधान ।
सहज निसरलें मन । रामरुपीं नयन निडारले ॥ १६ ॥
तेथें पाहतां आत्मबिंब । उतटों पाहताहे नभ ।
मी तूं पणाची मिथ्या भांब । दोघी स्वयंभ त्या झाल्या ॥ १७ ॥
एकाएकीं जनार्दनीं । दोघी दोनीपणा मुकोनी ।
मिळाल्या एक हो‍उनी । अशोकवनीं शोकातीत ॥ १८ ॥

हेरांनी सीता – मंदोदरीच्या भेटीची बातमी रावणाला दिल्याने चिंता :

तंव रावणें आपण । हेरपणें दासी जाण ।
मंदोदरीसवें देऊन । वृत्तांत संपूर्ण आणविला ॥ १९ ॥
दासीमुखें वृत्त समग्र । ऐकोनियां सविस्तर ।
तळमळिता झाला थोर । दशशिर रावण ॥ १२० ॥
मंदोदरी आली तेथ । सांगितलें सकळ वृत्त ।
दशवदन चिंताक्रांत । कांही मत चालेना ॥ २१ ॥
अहिरावणादिचरित्र । सेतुमाहात्म्यीं समग्र ।
लिहिले असे सविस्तर । नव्हे साचार कल्पित ॥ २२ ॥
संदेह असेल ज्यांचे मनीं । तिहीं अवकाश करोनी ।
सेतूमाहात्म्य अवलोकूनी । संदेह खाणोनी सांडावा ॥ २३ ॥
असो आतां तो विचार । किती सुचवूं परिहार ।
वक्ता एक एकांगवीर । मी कोण किंकर परिहारा ॥ २४ ॥
ग्रंथाचें नामाभिधान । शुद्ध भावार्थरामायण ।
तो भाव जडला पूर्ण । असतां वक्तेपण मज कैंचे ॥ २५ ॥
भावीं अनुसरोनि रघुनाथ । वक्ता झाला एकनाथ ।
माझेनि हातें ग्रं लिहिवित । कर्ता करविता तो एक ॥ २६ ॥
तेथें कैंची परिहारता । म्हणोनि श्रोते साधुसंतां ।
शरण आलों जी तत्वतां । क्षमा आतां मज किजे ॥ २७ ॥
पांवा मधुरध्वनी वाजे । वाजवित्याचेनि गाजे ।
जनार्दनें तैसें कीजे । ग्रंथ लिहिविजे मज करीं ॥ २८ ॥
म्हणोनि श्रोते जन । सर्वथा न ठेवावें दूषण ।
करितों हेचि विनवण । कृपावलोकनीं मज सनाथ कीजे ॥ २९ ॥
क्षमा करा ऐसें म्हणतां । तरी हों पाहे काव्यकर्ता ।
म्हणोनि मौनेंचि आतां । लोटांगण तत्वतां साधूंसी ॥ १३० ॥
साधु कृपाळु जननी । जे अंतर जाणती तत्क्षणीं ।
तेथें परिहार कोणालागनी । क्षणोक्षणीं सुचवावा ॥ ३१ ॥
एका जनार्दना शरण । झालें मंदोदरीआख्यान ।
आतां रावणाचा यज्ञ । अति विलक्षण परियेसा ॥ १३२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सीतामंदोदरीसंवादो नाम पंचपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५५ ॥ ओंव्या ॥ १३२ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचावन्नावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *