भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा

कुंभकर्णावर सुग्रीवाचा विजय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स्वये बोले श्रीरघुनंदन । सुग्रीव आणि कुंभकर्ण ।
दोघांसी मांडलेंसे रण । सावधान अवधारा ॥ १ ॥

उत्पपात तदा वीरः सुग्रीवो वानराधिपः ।
सशालहस्तः सहसा समाविध्य महाबला ॥१॥
अति दुद्राव वेगेन कुंभकर्ण महाबलम् ।
तमापतंतं संप्रेक्ष्य कुंभकर्ण प्लवंगमम् ॥२॥
तस्थौ विवृत्तसर्वांगो वानरेंद्रस्य संमुखः ।
कुंभकर्णं स्थितं दृष्ट्वा।सुग्रीवो वाक्यमब्रवीत ॥३॥
विहताश्च त्वचा वीराः कृतं कर्म सुदुष्करम् ।
सहस्वैकं निपातं मे शालवृक्षस्य राक्षस ॥४॥

हनुमंताच्या धर्मयुद्धनीतीमुळे कुंभकर्णाला आदर वाटतो :

सुग्रीव कपिराज आपण । लक्षोनियां कुंभकर्ण ।
सवेग करोनि उड्डाण । आला गर्जोन शालहस्ती ॥ २ ॥
कुंभकर्ण अति विस्मित । मज उचलोनि हनुमंत ।
होता गरगरां भोवंडित । तो कां न मरितां स्वयें गेला ॥ ३ ॥
मज कुंभकर्णाची शक्ती । क्षणार्धें केली न सरती ।
निधडा बळियाढा मारुती । धर्मस्थितीं रणयोद्धा ॥ ४ ॥
एकावरी दोघे जण । श्रेष्ठीं करुं नय रण ।
तें धर्मशास्त्र प्रतिपाळून । स्वस्थ ठेवून मज गेला ॥ ५ ॥
बळें भवंडितां आकाशीं । येतां देखोनि सुग्रीवासी ।
मज स्वस्थ ठेवोनि भूमीसीं । श्रीरामापासीं स्वयें गेला ॥ ६ ॥
हा तंव नव्हे हनुमंत । सुग्रीवराजा अति विख्यात ।
याचा करीन मी घात । संग्रामात निमेषार्धे ॥ ७ ॥

सुग्रीव व कुंभकर्णाचे परस्परांना आव्हान :

ऐसें बोलोनि आपण । सुग्रीवातें अनुलक्षून ।
संमुख आला कुंभकर्ण । शूळ घेऊन साटोपें ॥ ८ ॥
शूळहस्ती शालहस्ती । दोघे वीर भद्रजाती ।
येरयेरांतें निर्भर्त्सिती । स्वयें बोलती नोकोनी ॥ ९ ॥
संमुख देखोनि कुंभकर्ण । सुग्रीव स्वयें बोले आपण ।
नीचा कपीसीं करोनि कंदन । दादुलपण मिरविसी ॥ १० ॥
आतां मी आलों शालहस्ती । किती आहे तुझी शक्ती ।
ते दाखवीं कां मजप्रती । रणव्युत्पत्ती विचारोनी ॥ ११ ॥
मी एकला शालहस्ती । श्रीरामसेवक भद्रजाती ।
तुझी करीन समाप्ती । रणव्युत्पत्ती महामारें ॥ १२ ॥
ऐकोनि सुग्रीव वचन । हासोन बोले कुंभकर्ण ।
वीर न बोलती आंगवण । करोनि रण दाविती ॥ १३ ॥
जे कां बहुविध जल्पती । त्यांसी नाहीं संग्रामभक्ती ।
जरी तूं होसील पुरुषार्थी । करोनि ख्याती दावीं मज ॥ १४ ॥
सुग्रीवासीं करावया रण । कुंभकर्णा उल्लास पूर्ण ।
सरसावले दोघे जण । अति निर्वाण संग्रामीं ॥ १५ ॥

स कुंभकर्णस्य वचो निशम्य व्याविध्य शैलं सहसा ममोच ।
तेनाजघानोरसि कुंभकर्णं शैलेन शकाशनिसन्निभेन ॥५॥
तच्छैलशृंगं सहसा प्रभग्नं । भुजांतरे तस्य तदा विशाले ।
सशैलशृंगाभिहतश्चुकोप ननाद रोषाच्च विवृत्य वक्रम् ॥६॥
विन्याध शूलं च तडित्प्रकाशं चिक्षेप हर्यृक्षपतेर्वधाय ।
तत्कुंभकर्णस्य भुजप्रणुन्नं शूलं शितं कांचनदामजुष्टम्॥७॥
क्षिप्रं समुत्पत्य विगृह्य दोर्भ्यां । बभंज विरस्तरसा बलेन ॥८॥
कृतं मारसहस्रस्य शूलं कालयसं दृढम् । बभंज जानुमारोप्य संप्रहृष्टःप्लवंगमः ॥९॥

सुग्रीव-कुंभकर्ण यांचे द्वंद्वयुद्ध :

ऐकोनि कुंभकर्णवाक्यासी । कोपा आला सुग्रीवासी ।
शूळ हाणितां आवेशीं । शालवृक्षीं त्यासी ठोकिलें ॥ १६ ॥
शाल लागतां भुजांतरी । शूळ पडिला धरेवरी ।
कुंभकर्णा आली घेरी । अर्धचंद्री लागली ॥ १७ ॥
विकळ जातां चांचरी । राक्षस मूर्च्छेतें सांवरी ।
शूळ घेवोनियां करीं । सुग्रीवावरी धांविन्नला ॥ १८ ॥
कुंभकर्णें अर्ध क्षणीं । वानरराज पाडीला रणीं ।
राक्षससैन्याचिया श्रेणीं । आल्हादोनी गर्जती ॥ १९ ॥
शूळ ताडितां कोपेंकरीं । सुग्रीवबळाची पैं थोरी ।
उडोनि शूळ दोहीं करीं । वरिच्यावरी झेलिला ॥ २० ॥
जैसें उंसाचें करबाड । गुडघीं घालोनि मोडिती गोड ।
तैसा शूळ अति प्रचंड । केला दुखंड सुग्रीवें ॥ २१ ॥
शतत्रय पुरुषांसी । शूळ नुचले अति आवेशीं ।
सुग्रीवें झेलोनि आकाशीं । जानुप्रदेशीं मोडिला ॥ २२ ॥
निखळ तिख्याचा धगधगित । तुळितां भार शतानुशत ।
रत्‍नालंकारीं लखलखित । अत्यद्‍भुत महाशूळ ॥ २३ ॥
तोही वरच्यावरी झेलोनी । सुग्रीवें सांडिला मोडूनी ।
हरिखें श्रीरामनामवाणी । गर्जत रणीं महावीर ॥ २४ ॥
शूळ भंगिता सत्वर । स्वर्गीं नाचती सुरवर ।
सुग्रीवराजा महाथोर । कर्म दुर्धर स्वयें केलें ॥ २५ ॥

स तं तदा भग्नमवेक्ष्य शूलं चुकोप रक्षोऽधिपतिर्महात्मा ।
उत्पाट्य शृंगं सहसा गिरेस्तज्जघान सुग्रीवमभिप्रतर्दन् ॥१०॥
स शैलशृंगाभिहतो विसंज्ञं पपात भूमौ युधि वानरेंद्रः ।
तं प्रेक्ष्य भूमो पतितं विसंज्ञं नेदुःप्रहृष्टा युधि यातुघानाः ॥११॥
ततस्तमासाद्य जगाम वीरं संस्तूयमानो युधि राक्षसौधैः ।
शृण्वन्निनादं त्रिदिवालयानां प्लवंगराजग्रहविस्मितानाम् ॥१२॥
ततस्तमादाय तदा स मेने हरींद्रमिंदोपममिंद्रवीर्यः ।
अस्मिन्हते सर्वमिदं प्रशांतं सराघवं सैन्यमितींद्रशत्रुः ॥१३॥

सुग्रीवाने शूळ मोडल्याबद्दल कुंभकर्ण विस्मित होतो :

जेणें शूळें सुरासुर । यक्ष गंधर्व किन्नर ।
रणीं भगिला अमरेंद्र । तो येणें सत्वर मोडिला ॥ २६ ॥
माझा शूळ अत्यद्‍भुत । झेलून भंगिला आकाशांत ।
तेणें कुंभकर्ण विस्मित । धन्य पुरुषार्थ सुग्रीवा ॥ २७ ॥
शूळ भंगिला महाथोर । तेणें कोपला निशाचर ।
घेवोनियां गिरिशिखर । सुग्रीवावरी टाकिलें ॥ २८ ॥

कुंभकर्णाच्या गिरिशिखराच्या प्रहाराने सुग्रीव मूर्च्छित :

सुग्रीव उडतां आकाशीं । शिखर आदळिलें उरासीं ।
मूर्च्छित पडिला भूमींसीं । संज्ञा त्यासीं असेना ॥ २९ ॥
कुंभकर्णे अर्ध क्षणीं । वानरराजा पाडिला धरणीं ।
राक्षसवीरांची श्रेणी । उठली गर्जोनी जयजयकारें ॥ ३० ॥
वानरराजा रणांत । मज जाला हस्तगत ।
यश आलें अत्यद्‍भूत । रणीं डुल्लत कुंभकर्ण ॥ ३१ ॥
सुग्रीव मारिला रणांत । वानरसेना हताहत ।
रामसौ‍मित्र हनुमंत । तेही समस्त मारीन ॥ ३२ ॥
मज विचरतां रणाआंत । बापुडें मनुष्य रघुनाथ।
मुख्य मारिल्या हनुमंत । रणकंदनार्थ संपला ॥ ३३ ॥
यश मिरवावया रावणाजवळी । सुग्रीव वीर आतुर्बळी ।
स्वयें सुनी काखेतळीं । निघे तत्काळीं लंकेसी ॥ ३४ ॥
निशाणें त्राहाटिल्या भेरी । भाट गर्जती कैवारीं ।
स्तुती करिती निशाचरी । लंकेमाझारी निघाला ॥ ३५ ॥

विद्रुतां वाहिनीं दृष्ट्वा वानराणां ततस्ततः ।
कुंभकर्णेन सुग्रीवं गृहीतं चापि वानरम‍ ॥१४॥
हनुमांश्चिंतयासास मतिमान्मारुतात्मजः ।
एवं गृहीते सुग्रवे किं कार्यं वै मया भवेत ॥१५॥
यत्तु न्याय्यं मया कर्तुं तत्करिष्यामि सर्वथा ।
भूत्वा पर्वतसंकाशो नाशयिष्यामि राक्षसम ॥१६॥
मया विमोक्षितस्यास्य सुग्रीवस्य महात्मनः ।
अप्रीतिश्च भवेत्काष्टा कीर्तिनाशश्च शाश्वतः ॥१७॥

वानरसैन्यांत कल्लोख व हनुमंताची विचारसरणी :

कुंभकर्णे रणाभिनिवेशीं । धरोनि नेतां सुग्रीवासी ।
प्रळय मांडिला वानरांसीं । पळती चौपासीं किरकिरत ॥ ३६ ॥
तें देखोनि हनुमंत । स्वयें उठिला बळान्वित ।
सोडवावया वानरनाथ । असे गर्जत साटोपें ॥ ३७ ॥
धरोनि नेतां मुख्य धुर । उगेच पाहती वानर ।
तैसा नव्हे मी किंकर । करीन उद्धार स्वामिकार्याचा ॥ ३८ ॥
हाणोनि मुष्टिघात । सोडवीन कपिनाथ ।
कुंभकर्णाचा करीन घात । असे गर्जत साटोपें ॥ ३९ ॥
मारोनिया कुंभकर्णासीं । म्यां न सोडवितां सुग्रीवासी ।
परम अपकीर्ति रायासी । प्राण लाजेसी सांडील ॥ ४० ॥
रणीं मारितां कुंभकर्ण । मज न लागे अर्ध क्षण ।
लाजें सुग्रीव सांडील प्राण । यालागी आपण स्थिर व्हावें ॥ ४१ ॥

श्रीराम सहमत :

संज्ञा सांगे रघुनंदन । सुग्रीव स्वांगें आपण ।|
करील आपली सोडवण । तुम्ही आंगवण न करावी ॥ ४२ ॥
तुम्ही करिता पुरुषार्थ । राक्षस त्याचा करितील घात ।
तेंव्हा होईल अनर्थ । उगे स्वस्थ रहा येथें ॥ ४३ ॥
ऐसें सांगतां रघुनाथ निवांत ।
उगा राहिला हनुमंत । पुढील कार्यार्थ अवधारा ॥ ४४ ॥

लंकामार्गात कुंभकर्णास अपशकुन :

लंके जाता कुंभकर्ण । त्यासीं होती अपशकुन ।
आडवे जाती बिडालगण । करिती रुदन म्यांव शब्दे ॥ ४५ ॥

स कुंभकर्णोऽथ विवेक लंकां । स्फुरंतमादाय महाहरिं तम् ।
विमानचर्यागृहगोपुरस्थैः। पुष्पाग्रवर्षेरभिपूज्यमानः ॥१८॥
ततः स संज्ञा प्रतिलक्ष्य कृच्छ्राद्वलीयसस्तस्य भुजांतरस्तथः ।
अवेक्षमाणः पुरराजमार्गं । विचिंतयामास मुहुर्महात्मा ॥१९॥
एवं गृहीतेन कथं नु नाम । शक्यं मया संप्रति कर्तुमद्य ।
तथा करिष्यामि यथा हरीणां । भविष्यतीष्टं मम चैव पथ्यम् ॥२०॥
ततः कराग्रैः शसोर्ध्वमेत्य राजा हरीणाममरेंद्रशत्रोः ।
चकर्त कर्णौ दशनैश्च नासां । ददार पार्श्वेषु च कुंभकर्णम् ॥२१॥

कुंभकर्णाचे लंकावासीयांकडून अभिनंदन :

सुग्रीव धरिला कपिनाथ । महायशें मदोन्मत्त ।
कुंभकर्ण लंकेआंत । असे जात उल्लासें ॥ ४६ ॥
लंकामंदिरें विमानाकारी । त्यांवरी राहूनि नरनारीं ।
हर्षे कुंभकर्णावरी । सुमनधारी वर्षती ॥ ४७ ॥
घरोघरींच्या नारी उल्लासीं । अक्षता टाकोनियां शिशीं ।
ओंवाळिती कुंभकर्णासी । विजयाभिनिवेशीं जातसे ॥ ४८ ॥
बिभीषणाची निजकांता । जे कां परम पतिव्रता ओवाळितां ।
विपरीतता तेथें जाली ॥ ४९ ॥

कुंभकर्णावर टाकलेल्या अक्षता सुग्रीवावर पडून सुग्रीव सावध होतो :

कुंभकर्ण उंच भारी । अक्षता न वचती तेथेवरी ।
त्या पडिल्या सुग्रीवाच्या शिरीं । म्हणे झडकरी विजयी होईं ॥ ५० ॥
पतिव्रतेचे वचन । सुग्रीवासी फळले पूर्ण ।
मूर्च्छा जावोनि संपूर्ण । सावधान स्वयें जाला ॥ ५१ ॥

कुंभकर्णाच्या जयोन्मादात सुग्रीव त्याचे नाक व कान तोडतो :

कुंभकर्णाचे काखेभीतरीं । धरोनि आणिले लंकापुरीं ।
सुटका होय कैशापरी । ऐसें विचारी सुग्रीव ॥ ५२ ॥
श्रीरामनामा या आवर्ती । सकळ श्रमांची निवृत्ती ।
तत्काळ होय बंधमुक्ती । तें स्मरे चित्तीं सुग्रीवः ॥ ५३ ॥
करितां रामनामस्मरण । सुग्रीव सुटला संपूर्ण ।
विटंबावया कुंभकर्ण । स्वयें आपण विचारी ॥ ५४ ॥
निघोनियां काखेबाहेरी । बैसोनि त्याच्या उरावरी ।
नाका कानां केली बोहरी । तेही परी अवधारा ॥ ५५ ॥
मदोन्मत्त बळोन्मत्त । राजोन्मत्त ।
विजयोन्मत्त महामत्त । पंचोन्मत्त कुंभकर्ण ॥ ५६ ॥
पंचोन्मत्ताची पैं भुली । सुग्रीव सुटला काखेतळीं ।
कुंभकर्णा नाठवे ते काळीं । विजयोन्मेळीं उन्मत्त ॥ ५७ ॥

कुंभकर्णाचे नाक व कान घेऊन सुग्रीवाचे उड्डाण :

सुग्रीव बैसोनि उरेंसी । नखी छेदिलें नाकासी ।
दांती छेदिलें कानासी । गेला आकाशीं उडोनी ॥ ५८ ॥
पंचोन्मत्त आवेशी । देह नाठवे कुंभकर्णासी ।
विटंबिलें नाककानांसी । हें तयासी स्मरेना ॥ ५९ ॥

स कुंभकर्णो हृतकर्णनासो । भृशं नदन्वेदनयान्वितश्च ।
रोषाभिभूतः क्षतजार्द्रगात्रः । सुग्रीवमाविध्य पिपेष भूमौ ॥२२॥
स भूतले भूरिबलेन पिष्टः । सुरारिभिस्तैरभिहन्यमानः ।
जगाम खं कंतुकवज्जवेन । पुनश्च रामं सहसा जगाम ॥२३॥

नाक कापोनि दोहीं हाती । कान छेदोनियां दांतीं ।
गगना उसळला कपिपती । हें नेणे निश्चितीं कुंभकर्ण ॥ ६० ॥

कुंभकर्णाचे विद्रुप रुप पाहून लंकाजनांचा विषाद :

जेंवी मद्यपी विसरे शरीर । तेंवी देह विसरे निशाचर ।
काय करोनि गेला वानर । न कळे विचार कुंभकर्णा ॥ ६१ ॥
यशोमदें डुल्लत । लंकेमाजी असे जात ।
नाककानां जाला घात । नेणे वृत्तांत् कुंभकर्ण ॥ ६२ ॥
कुंभप्राय वाटोळे कान । यालागीं नांव कुंभकर्ण ।
वानरें छेदिले ते श्रवण । आतां विकर्ण शोभत ॥ ६३ ॥
स्वर्गीं सुरवरीं पिटिली टाळी । बाप सुग्रीव आतुर्बळी ।
निष्टोनियां काखेतळीं । केली होळी नाककानां ॥ ६४ ॥
सुग्रीव उसळोनी गगना । तेथून सांडिता नाककानां ।
दडपोनि राक्षसांची सेना । मुकली प्राणा लक्षांत ॥ ६५ ॥
कुंभकर्णनाकाची बोहरी । धाड आली लंकेवरी ।
बोंब सुटली घरोघरीं । राक्षसहारी निमाल्या ॥ ६६ ॥
छेदोनियां नाककान । सुग्रीवें करोनि उड्डाण ।
श्रीरामाचे ठाकिले चरण । यशस्वी पूर्ण कपिनाथ ॥ ६७ ॥

सुग्रीवाच्या आगमनाने रामांना व वानर सैन्याला हर्ष :

सुग्रीव येवोनि आपण । घालोनियां लोटांगण ।
वंदिता श्रीरामाचे चरण । केलें गर्जन वानरी ॥ ६८ ॥
निशाणे त्राहाटिल्या भेरी । गुढिया उभविल्या वानरीं ।
रामनामाच्या गजरीं । जयजयकारीं गर्जती ॥ ६९ ॥
आमुचा राज बळिवंत । कुंभकर्ण बळोन्मत्त ।
त्याच्या नाककानां करोनि घात । विजयान्वित स्वयें आला ॥ ७० ॥

सुग्रीवाचे निवेदन व रामनामाचा महिमा कथन :

स्वयें सुग्रीव सांगे आपण । श्रीरामा ऐकें सावधान ।
वृथा आमची आंगवण । तुजवीण रघुनाथ ॥ ७१ ॥
कुंभकर्णे धरितां जाण । निःशेष जाता माझा प्राण ।
आठवताचि नामस्मरण । आलें स्फुरण मज तेव्हां ॥ ७२ ॥
रामनामाच्या बळापुढें । राक्षसबळ तें बापुडें ।
मशक मानूं घुंगरडें । मज बळ गाढें रामाचें ॥ ७३ ॥
रामनामबळें जाण । त्याचे छेदिले नाक कान ।
नामें पावलों तुझे चरण । विजयी संपूर्ण रामनामें ॥ ७४ ॥
नामापासीं यश कीर्ती । नामापासीं विजयवृत्ती ।
नामापासीं भुक्ति मुक्ती । रामनाम स्मरती ते धन्य ॥ ७५ ॥
धन्य श्रीरामाचे चरण । धन्य श्रीरामाचें दर्शन ।
धन्य श्रीरामाचें स्मरण । बंदिमोचन रामनामें ॥ ७६ ॥
धन्य श्रीरामाची कीर्ती । धन्य श्रीरामभजनभक्ती ।
धन्य श्रीरामनित्यानुवृत्ती । नाम स्मरती ते धन्य ॥ ७७ ॥
नामासीं नाहीं विधिविधान । नामासी न लागे कर्मबंधन ।
नामाचि दासासीं अनुष्ठान । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ ७८ ॥
नामासी न लागे सूतक । नाम भस्म करी पातक ।
नाम सर्वथा नित्य निर्दोख । सरतें सुख रामनामें ॥ ७९ ॥
नामासीं नाहीं अनाध्यावो । नामस्मरणी नित्य स्वाध्यावो ।
नाम स्मरती ते सभाग्य पहा हो । नाम स्वयमेव परब्रह्म ॥ ८० ॥
ऐसें बोलतां सुग्रीवासीं । प्रेम ओसंडलें श्रीरामासीं ।
आलिंगोनियां हृदयासीं । आपणापासीं बैसविला ॥ ८१ ॥

हनुमंताची सुग्रीव क्षमा मागतो :

जीवापरीस परम आप्त । सुग्रीवा मानी श्रीरघुनाथ ।
तोही उठोनिया त्वरीत । चरण धरित हनुमंताचे ॥ ८२ ॥
माझे अपराध समस्त । क्षमा करावे त्वां निश्चित ।
म्यां केलें गा जें उद्धत । तें सावचित्त अवधारीं ॥ ८३ ॥
तुझिया संग्रामाआड । मी आलों गा महामूढ।
विचार न करितां दृढ । केला कैवाड संग्राम ॥ ८४ ॥
तुझिया संग्रामा अभक्ती । मी पावलों बंधनप्राप्ती ।
सुटलों रामनामानुवृत्तीं क्षमा मारुति मज कीजे ॥ ८५ ॥
मी सुग्रीव प्रतापराशी । केंवी सांपडें कुंभकर्णासी ।
तुझिया संग्राविक्षेपासीं अडकलों ॥ ८६ ॥
तेव्हां आठवावया श्रीरघुनाथ । हनुमानसद्‌गुरुकृपा समर्थ ।
येणें जालों नित्यमुक्त । जाण निश्चित कपिवर्या ॥ ८७ ॥
तुवां भेटविला श्रीरघुनाथ । तूं गुरु आम्ही शिष्य समस्त ।
जें जें केलें म्यां उद्धत । क्षमा समस्त मज कीजे ॥ ८८ ॥

हनुमंताचे परिवर्तन :

ऐकोनी सुग्रीवाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
येरें दिधलें आलिंगन । समाधान श्रीरामें ॥ ८९ ॥
दोघांचे गेले गुणागुण । दोघां नाठवे दोनपण ।
एका जनार्दना शरण । कृपा पूर्ण श्रीरामाची ॥ ९० ॥
करितां रामनाम स्मरण । सुग्रीवें विटंबिला कुंभकर्ण ।
एका जनार्दना शरण । गोड निरुपण पुढें आहे ॥ ९१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवकुंभकर्णयुद्धे सुग्रीवविजयप्राप्तिर्नाम सप्तविंशतितमोऽध्यायः ॥ २७ ॥
ओंव्या ॥ ९१ ॥ श्लोक ॥ २३ ॥ एवं संख्या ॥ ११४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्ताविसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *