स्वात्मसुख  

स्वात्मसुख

स्वात्मसुख – संत एकनाथ 

स्वात्मसुख – आरंभ

श्रीगणेशाय नमः
। श्रीकृष्णपरमात्मने नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
ॐ नमोजी सच्चिदानंदा । जय जय जगदादि आनंदकंदा । निजागें अभयवरदा । श्रीगुरुराया ॥१॥
जयाचेनि अवलोकनें । हारपे एका एकपणें । केले सर्वांगचि देखणें । अनंगें देवें ॥२॥
एकपणीं अनेक । अनेकीं दावी एक । नकळे कैसे कवतुक । दुजेनविण ॥३॥
जेथें दुजेंचि नाहीं । तेथे स्तुतिस्तव्य तें काई । शब्दासीचि ठाव नाहीं । मा स्तवन तें काइसें ॥४॥
पहातां रुपाचा दुकाळ । नामाचा विटाळ । तेथें स्तवनाचा गोंधळ । रिघेल कोठें ॥५॥
तेथें एकपणेंवीण एका । जो कां जनार्दन निजसखा । स्तवावया देखा । निःशंक ऐसा ॥६॥
जैसें वेदें आपुलें आपण । सामर्थ्य कींजे निरुपण । ते स्तवनी दुजेपण । लागेल कैचें ॥७॥
नातरी शब्दाची पदवी । शब्देंचि लागे बोलावी । कां जीवाची एकोपजीवीं । जीवचि जाण ॥८॥
आतां गुरुशिष्य दोन्ही । आणोनि एकपणीं । रिघालों जी स्तवनीं । स्तवावया ॥९॥
तरी देऊनी आपुली पुष्टी । मज सामाविलें आपुला पोटीं । याहीवरी कृपादृष्टी । याचिलागीं करी ॥१०॥


स्वात्मसुख – ग्रंथाची निर्मित्ती

जे आपुली स्वरुपस्थिती । ते वानावी अभिनव कीर्ती । जेणें संतसज्जन होती । संतुष्ट सदा ॥११॥
आतां संतांच्या मनोगतीं । तेंचि बोलावें प्रस्तुती । तरी सांगों स्वरुपस्थिती । सुनिश्चित ॥१२॥
तरी कठिणांशु करुनि वेगळ । पहातां जैशी स्फटिकशीळ । तैसें जाण सकळ । स्वरुप असे ॥१३॥
सांडूनी आर्द्रतेचा रोहो । नाडळत भरला डोहो । तैसी ते वस्तु पहाहो । सर्वत्र असे ॥१४॥
जडत्व सांडूनि निश्चळ । वसुधा जैसी पुष्कळ । तैसें ज्ञेय सकळ । सकळिक असे ॥१५॥
गगन सर्वांसी स्पर्शे । परी स्पर्शिलें हें न दिसे । आत्मा तैसा सन्निध असे । आडळेविण ॥१६॥
शून्यत्व सांडूनि गगनें । सर्वत्र जेवीं असणें । आत्मा तैसा पूर्णपणें । सर्वदा सर्वीं ॥१७॥
जें नाडळें स्पर्शनीं । घसवटेना जनघसणीं । शून्या शून्यत्व करोनी । संविती असे ॥१८॥
जेवीं वर्ततांही जगीं । नाडळत आडळे आंगीं । अंगा अंगत्व संयोगी । नुरऊनि असे ॥१९॥


स्वात्मसुख – सद्रूपाची उपपत्ति

सद्रूपाची निजात्मगती । सांगितली स्वरुपस्थिती । आतां चिद्रूपाची उपपत्ति । सहज दृष्टांतें सांगेन ॥२०॥
सांडूनि ज्वाळा काजळां । दीप प्रकाश उमाळा । असे, तैसी आत्मकळा । कळातीत ॥२१॥
कां रविबिंब अस्तां जाये । आणि प्रभा तैशीचि राहे । तैसी आत्मप्रभा पाहे । उष्णातीत ॥२२॥
नातरी आंधारें सूनि पोटीं । उष्ण चांदणें दोन्ही घोटी । तयावरी जे दशा उठी । ते आत्मप्रभा ॥२३॥
कां डोळां सांडोनि मागें । दिसते दवडूनि वेगें । माजी देखणेपण सर्वांगे । सर्वत्र वस्तू ॥२४॥
अक्षर घालुनी माघारी । शब्द न निघतां बाहेरी । माजीं अर्थु असे जयापरी । तैसी ते वस्तू ॥२५॥
आडळ सांडोनि आरसा । सन्मुख गगनाएवढा जैसा । तो असतचि नाहीं होय जैसा । आत्मा तैसा पैं असे ॥२६॥
सद्रूप चिद्रूप दोन्ही । निरोपिलीं उपलउनी । आतां स्वानंद सांगेन चिन्ही । जें आयकतां मन निवे ॥२७॥
साखर करुनि वेगळी । गोडीचि कीजे निराळी । माजीं स्वादु सर्वागीं सकळीं । तैसा स्वानंदु जाणा ॥२८॥
नातरी रतीच्या अंतीं । जे होय सुखप्राप्ती । तें सर्वदा सर्वांगें भोगिती । सांडुनी रतिसंबंधू ॥२९॥
कां रसनेवीण फुडी । ते सदां सर्वांगें गोडी । भोगी जेवीं आवडीं । तेवीं स्वानंदसुख ॥३०॥
कां कामिनीवींण कामसुख । वीर्य सबळवीण देख । उपजे तोषेंवीण संतोष । तैसें स्वात्मसुख जाणा ॥३१॥
सत चित आनंद । हा अद्वय वृत्तीचा भेद । वस्तु नव्हे त्रिविध । एकविध एकली ॥३२॥
मृदु तिख आणि पिवळी, । ती नांवें एक चापेकळी । तेवीं सच्चिदानंद बोली । वस्तु एकली एकत्वें ॥३३॥
जैसें आपलेंच मुख । तें नव्हे आपणा सन्मुख विन्मुख । तैसें नहोनी सुखदुःख । सहजें सुख सदोदित ॥३४॥
सद तेंचि चिद । चिद तेंचि आनंद । वस्तु नव्हे त्रिविध । ते एकपद एकत्वें ॥३५॥
जेथें दुजेवीण जाण । नुपजतां एकपण । सुख सुखत्वें संपूर्ण । तें स्वसंवेद्य ॥३६॥
जेथें ध्यान अवघें सरे । ध्येयपण वेगळें नुरे । ध्याता सर्वांगें विरे । विरालेपणेंसी ॥३७॥
दृश्य द्रष्टेनसिं मिळे । तेथें दष्टेपण तत्काळ गळे । दर्शन एकलेपणें मावळे । निर्विशेषीं ॥३८॥
ज्ञाता ज्ञेयीं ज्ञेयत्वें जडे । तेथें ज्ञान लाजिलें फुडें । वस्तु वस्तुत्वें अंगा जडें । वेदनेवीण ॥३९॥
प्रमाता प्रमाण । दोन्ही जाहली अप्रमाण । प्रमेयेंसि कारण । अकारण जालें ॥४०॥


स्वात्मसुख – स्वस्वरुपप्राप्तीचा उपाय

ऐसें सिद्ध स्वरुप असतां । तें जेणें प्रकारें ये हाता । तें साधनही तत्त्वतां । सांगेन आइका ॥४१॥
सुमनें सांडूनि सकळें । गुणेंवीण गुंफिजे परिमळें । तैसें आत्मसाधन केवळें । स्वात्मसिद्धीचें ॥४२॥
लहरिया लहरी आलिंगिजे । ते आलिंगनीं नाडळे दुजें । तैसें आत्मसाधन जाणिजे । स्वात्मसिद्धीचे ॥४३॥
अलंकार सोनिया मिळे । तेथें मिळणी दुजें नाडळें । ऐसी वृत्ती अखंड फळे । आत्मसाधनी ॥४४॥
जेथें आतळों न शके ज्ञान । तेथें कैचें ध्येय ध्यात ध्यान । येथ वस्तूचें साधन । वस्तूचि होय ॥४५॥
सुवर्ण धन । कां धनें सुवर्ण । तैसें वस्तूचे साधन । वस्तूचि होय ॥४६॥
लोहकाम लोहखडें घडे । तैसी वस्तू वस्तुत्वें जोडे । जैसें सूर्याचेनि उजियेडें । सूर्यचि दिसे ॥४७॥
बाहूंवीण खेंव । प्राणेंवीण धांव । मनेंवीण भाव । भावना जेथ ॥४८॥
शब्देंवीण बोली । चरणेंवीण चाली । दृष्टीवीण आली । दर्शन शोभा ॥४९॥
क्रियेवीण कर्म । दानेंवीण धर्म । धारणेवीण उपशम । मांडला दिसे ॥५०॥
जेवीं एकपणें तंतू । अनेक पटू तोचि होतू । तैशी एकात्मता जगा आंतू । लक्षिजे तें आत्मसाधन ॥५१॥
वृत्तीसी अखंडतां न घडे । तंव साधनी साध्य कैचें जोडे । जैसें भंगलें पात्र कोरडें । भरितांही तोय ॥५२॥
घटाकाशीचेनि आकाशें । सदा महदाकाशीं वसे । घटभंगीं अभंग असे । जेथिचें तेथें ॥५३॥
तो घट जें देववशें फुटे । मग घटाकाश लागे नीट वाटे । तैंच महदाकाश भेटे । येर्‍हवीं चुके ? ॥५४॥
तैसी आकार निराकारीं । वृत्ति अखंडत्व धारण धरी । तें साध्याच्याही साक्षात्कारी । कार्यसिद्धि ॥५५॥
तया नांव साधन । आत्मसाक्षात्कारीचें अंजन । जें हात बसलिया निधान । होइजे स्वयें ॥५६॥
सूर्ये केला दिवसू । जळबिंदु करी पावसु । पृथ्वी करी पांशू । स्वात्मत्वाचा ॥५७॥
तैसें साध्यचि साधना । जंव नये अनुसंधाना । तंव वांचूनि मना । सदभाव नाही ॥५८॥
जेथें स्वस्वरुपाची नास्तिक । ते येणें साधनें देख । तेथेंचि आणिली आस्तिक्य । आत्मत्वाची ॥५९॥
जेथें जग हें ब्रह्मा नव्हे । तेंचि ब्रह्मत्वें उभें राहे । तरी कवण पा न पाहे । सर्वार्थ भावें ॥६०॥
चिंतामणींचा हिरा । जरी तेजरुप खरा । मिनलिया अलंकारा । न मने कवणा ॥६१॥
आकाशाचा दर्पण । सन्मुख जोडला संपूर्ण । तरी स्वस्वरुपा कवण । पाहों विसरे ॥६२॥
तेथें पाहतां स्वरुप भासे । विस्मरणामाजीं तेंचि दिसे । कर्मक्रियेही सरिसें । लागलें सदा ॥६३॥
तें सांडितां सांडिलें न जाये । डोळे झांकितां अधिक होये । देहाचा भ्रम निःशेष जाये । सहजान्वयें स्वभावें ॥६४॥
कां मुक्ताफळाचा परिसू । जोडलिया स्वप्रकाशू । तरी मुकुटीं बाणितां उल्हासू । न करी कवण ॥६५॥
कां कल्पतरुचें झाड । सुवास सुंदर आणि गोड । मीनलिया इंद्रियांचें कोड । न पुरवी कवण ॥६६॥
तैसा परमात्मा परेश । सर्वरुपें रुपस । जोडलियां कां डोळस । डोळे झांकी ॥६७॥
यापरी जे जे प्रतिमा । तेथें प्रगटे परमात्मा । हे गोडी आत्मयारामा । निर्मनें रमवी ॥६८॥
जैसें सूर्याची किरणें । सूर्यापुढें धांवती जाण । तेणें प्रकाशें सूर्यपण । अधिकाधिक ॥६९॥
कां रत्नाची कीळ । रत्नावरी वाढे प्रबळ । तेणें रत्नासीचि केवळ । प्रबळता आणी ॥७०॥
कां चंदनाचा वासू । चंदनाहुनी चौपसू । धावे तेणें अतिसुवासु । चंदना आणी ॥७१॥
कां अग्नीच्या ज्वाळा । अग्नीवरी वाढती प्रबळा । तिनें अतिरुप अनळा । आणिलें जैसे ॥७२॥
तैसे विश्वप्रकाशितया गभस्ती । त्याचें किरणें नानाव्यक्ती । तेथें नास्तिकता जे देखती । ते मूर्ख मृगतृष्णिका ॥७३॥
हो कां चिद्रत्नाची कळा । तें हें चराचर सकळा । ऐसी कळा न दिसे ते समळा । पडळ दृष्टी ॥७४॥
असो हे सुवर्ण खोटी । करुनि धातली वधूच्या कंठीं । तेणें ते गोमटी । दिसेल काई ? ॥७५॥
मा त्याचें करुनि भूषण । अंग प्रत्यंगीं जाण । बाणिल्या सुंदरपण । शोभेसी ये ॥७६॥
तैसे स्वस्वरुपें निर्विकार । त्याचें सर्वांग भूषण मनोहर । तेणेंसि अलंकारिलें चराचर । स्वरुपचि भासे ॥७७॥
चंदनाचेनि संनिधीं झाडें । न मोडतां चंदनत्व घडे । तैसा वस्तूचेनि अंगें प्रपंच वाढे । तद्रूपतेंसी ॥७८॥
सुवर्ण आणि भूषण । तेथ काई असे दोनीपण । प्रगट पहातां कांकण । सोनेंचि असे ॥७९॥
स्वयंभ पट पाहातांचि दिठीं । तंतूसीचि होय भेटी । तैसी अवलोकितां सकळ सृष्टी । स्वरुपचि भासे ॥८०॥
सागरीं भरितें दाटे । तेथें सागरत्व चढे कीं ओहटे । तेवीं जगदाकारें प्रगटे । ईश्वरशोभा ॥८१॥
ऐशिया संविती । इंद्रिय कर्माची प्रवृत्ति । प्रवर्ततां आपुलाले स्थिती । बाधूं नपवे ॥८२॥
चंद्र काये चांदिणेन हारपे । सागर लहरियांस्तव लोपे । तैसा इंद्रियकर्मी आत्मा लोपे । कीं प्रकटे स्वयें ॥८३॥
यालागीं उघडिया दृष्टी । पाहतां दृश्येची नव्हे भेटी । नामा रुपाची सृष्टी । देखतांही ॥८४॥
सुवर्णाचे ह्नणती नग । तें नग नव्हे सोनेंचि चांग । तैसें दृश्याचें देखणें आंग । द्रष्टाचि दिसे ॥८५॥
ह्नणे म्यां सोनेंचि पहावें दिठीं । तरी पुढें ठेविजेल खोटी । परी खोटी वेगळी भेटी । सुवर्णी नघडे ॥८६॥
तैसें जग हें परतें न्यावें । मग आत्मत्व म्यां पहावें । कांकण आटूनी ह्नणावें । सुवर्ण आतां ॥८७॥
तरी आटावें हे आटाटी । संकल्प संनिपात उठी । येर्‍हवीं आटितां नाटितां दिठीं । सोनेंचि असे ॥८८॥
तरंगा लहरी मिळें । तेथें विजातीय नाडळे । तेवीं सकळीं सकळ फळे । स्वात्मभाव ॥८९॥
छायामंडपीं विचित्र सेना । दीपेंवीण दिसो कां नयना । तैसी प्रकृतीकर्मगणना । स्वात्मभावेंचि आभासे ॥९०॥
ते मंडपीमाजीं जें जें दिसे । तद्रुपें दीपप्रभा आभासे । तैसा जगदाकारें प्रकाशे । निर्विकार आत्मा ॥९१॥
तेथ देवाचें देवपण सरे । भक्ताचें भक्तपण विरे । तर्‍ही भजन उरें । निर्विशेषीं ॥९२॥
उदकाचें मोती होये । तेथ उदकपण निःशेष जाये । तरी ह्नणती पाणी आहे । अतिदीप्ति प्रभा ॥९३॥
काशीहुनी परते कावडी । तो गांवासि ये घेऊनि गुढी । तरी यात्रा श्रेय न सांडी । क्षेत्रत्यागें ॥९४॥
कां अमृत सेविजे नरें । तें सेवितां तत्काळ सरे । परी अंगीं अमरत्व उरे । अमृतेवीण ॥९५॥
तैसी आत्मसिद्धीसी देऊनि भेटी । सर्व साधन तत्काळ घोटी । ते आत्मसिद्धीवरी उठी । सदगुरुभजन ॥९६॥
हें अद्वैत भजन चोखडें । अनुभवी जाणती फुडें । येरा परिसतांचि कानडें । मंदभाग्या ॥९७॥
पहा पां चंद्रकिरणेचें अमृत । तेणें चकोरें होती तृप्त । परी वायस काय तेथ । श्रद्धा धरिती ॥९८॥
चंद्र चकोरां तृप्ती करी । येरां आण देउनी काय वारी । जो जैशी श्रद्धा करी । तो तैशापरी संतृप्त ॥९९॥
वानर सकळ फळें खाय । परी नारळातें अव्हेरुनी जाय । त्याचें अभ्यंतर नोहे । ठाउकें तया ॥१००॥


स्वात्मसुख – सदगुरुकृपा

तैसी आत्मसाक्षात्काराची । सदगुरु अधिष्ठात्री तेची । ह्नणोनी साध्याही वरी तयाची । सेवा घडे ॥१॥
ब्रह्माहूनि अधिकत्व गुरुसि आलें । ब्रह्मा ब्रह्मत्व याचेनि बोले । यालागीं भजन वहिलें । सापुज्यता माथां ॥२॥
जें काळासीही नाकळे । जें देखूं नशके बुध्यादि सकळें । जेथ विवेकाचे मंद डोळे । गुरुअंजनेवीण ॥३॥
जें न प्रकाशी तरणी । जें न बोलवें वेदवचनी । येवढिया वस्तूचा गुरु दानी । दयाळुत्वें ॥४॥
जया सूर्याचेनि प्रकाशें । न दिसती काळगर्जना भासे । जया सूर्याचेनि दिवसें । उत्पत्ती प्रळयो ॥५॥
जया सूर्याचेनि योगें । जगीं कर्म होय दाटुगें । हरिहरांचे वेगें । आयुष्य हरी ॥६॥
जेणें गमनागमन वेगेंसी । चिरंजीवियाचें वय ग्रासी । मग तेंही काळापासी । बांधोनि घाली ॥७॥
जया सूर्याचेनि अंगें । स्वाहा स्वधा चाले वेगें । यालागी सुरनर पितर पांगे । पावले तृप्ती ॥८॥
जया सूर्याचेनि संगें । दिसों लागती सकळ जगें । बालाग्रीचें सवेगें । दुविळें दिसे ॥९॥
गवाक्षद्वारीचें परिमाण । जेणें सूर्यें दिसती जाण । येवढें प्रकाशाचें महिमान । जयाचें अंगीं ॥११०॥
परी त्रैलोक्यव्यापिनी वस्तु पाही । दाखवावया कांहींच नाहीं । कोण्हेतरी कांहीं । दाखविता कां ॥११॥
जें सर्वत्र सदा असे । तें कोण्हेही तरी काळी दिसे । ऐसे न करवेंचि प्रकाशें । जयाचेनि ॥१२॥
ऐशी वस्तू सूर्ये न प्रकाशे । ते सदगुरुकृपालेशें । आपणासगट भासे । तद्रूप जग ॥१३॥
जयाचिये कृपे पोटीं । हारपती सूर्यांच्या कोटी । न दिसे तें दावी दिठी । कृपाळू जो ॥१४॥
वेदविहिताचेनि बोलें । वेदवचनें जग धरिलें । वर्णाश्रमाचे वहिले । मार्ग वेदें ॥१५॥
वेदें द्योतिलें कर्म । वेदें प्रतिष्ठिला धर्म । वेदवचनें नेम । जगातें नेमी ॥१६॥
वेद शब्दसृष्टीचा अर्कू । वेदें तिखट केला तर्कू । वेदबळें लोकू । तोंडाळ जाला ॥१७॥
प्रपंच परमार्थ जाण । वेदेंचि केलें अभिधान । वेदास्तव अज्ञान । सज्ञान जाले ॥१८॥
येवढी जाणिवेची हांव । धरुन घेवों गेला वस्तूचें नांव । तंव उलथोनि टाकिली शिंव । अविद्येची ॥१९॥
आत्मा सच्चिदानंद । हाही आविद्यक बोध । आत्मा नामाचा अनुवाद । करितां वेद थोटावला ॥१२०॥
नित्यानित्याची खटपटा । करितां नामाची प्रतिष्ठा । नव्हेचि मग उफराटा । लाजला वेदू ॥२१॥
ह्नणोनि वस्तूचिया पाठा । न चलवी वेदवचन वाटा । यालागीं ‘ नेतिनेति ’ या निष्ठा । परतला तो ॥२२॥


स्वात्मसुख – गुरुकृपा

ऐसें वेदा न बोलवेचि शब्दें । तें सदगुरुपादप्रसादें । निः शब्दचि वाचा वदे । मौनेंवीण ॥२३॥
नवल गुरुकृपेची करणी । मौनवी बोलवी वचनीं । जें आदिमध्यअवसानीं । तेणेंशी शब्दू ॥२४॥
वस्तुवांचूनि कहीं । वोस तंव उरलें नाहीं । मागुता शब्दू कवणे ठायीं । उपजेल सांगा ॥२५॥
सागरु अवघाचि परता सारी । मग काशावरी चाले लहरी । तैसी वस्तूवीण शब्दकुसरी । शोभती कोठें ॥२६॥
प्राण निःशेष जाये । तेथ निमिषोन्निमिष कोठें राहे । तैसी वस्तूवीण केवी होये । शब्दशोभा ॥२७॥
यालागी वेदासि जें कानडें । तें सदगुरुकृपाउजियेडें । वाचेसि ये गांठीं पडे । वस्तु सबळ ॥२८॥
मन देखिलिया वाटां जाये । नदेखिलें श्रवणी पाहे । मना कल्पिलिया राहे । पदार्थ कवणू ? ॥२९॥
तया मानसी परमाथंता । वस्तु सर्वत्र सांगतां । परी न कळेचि सर्वथा । अंशमात्र ॥१३०॥
मनासि वस्तूची सोये । धरितां गजबजिलें ठाये । कांहीं न लभोनि राहे । थोटावलें मन ॥३१॥
वस्तु सांगतां मागें पुढें । पाहतां कांहींचि नातुडे । मग भांबावलें चेडें । मनचि होय ॥३२॥
ऐसे मनाचिया आस्तां । नाना हेतु कल्पितां । परी वस्तूचा वारा सर्वथा । न लभेचि मन ॥३३॥
तया सदगुरुकृपातुषारें । प्रतीतीचा प्रत्ययो स्फुरे । मग मन मना विसरे । विनटलेपणें ॥३४॥
जया स्वरुपाची गोडी । लागलिया मन न सोडी । अधिकाधिक दे बुडी । स्वानंदडोही ॥३५॥


स्वात्मसुख – स्वस्वरुप

एकदां स्वस्वरुपाची गोडी लागली की कशांतहि गोडी वाटत नाही

तेथुनी मन मागुतें उठी । परी तद्रूपतेची नसुटे मिठी । अवलोकितां सकळसृष्टी । स्वरुपचि भासे ॥३६॥
जैसा बुडाला घटू सागरीं । तोचि रिघालिया बाहेरी । रिता कैशापरीं । निघों लाहे ॥३७॥
जळ एक देशी असे । तरी घटु बाहेरी निघो उमसे । वस्तु एकार्णवें पूर्ण असे । मन निघो केवी लाहे ॥३८॥
इळा परिसातें झगटी । तो सोनेंचि होऊनि उठी । मग इळेपण पहातां दिठीं । काई लोखंड होईल ॥३९॥
तैसी गुरुकृपा मनासि होये । मग वस्तुत्वेंचि होऊनि राहे । तेथोनि चराचरहि पाहे । परी मनपणा नये ॥१४०॥
यापरी चंचळ मना । सदगुरुकृपा समाधाना । आणी ते विवंचना । ऐसी आहे ॥४१॥

काळसुद्धां गुरुचा दास होतो

काळ सुरनरां क्षय करी । काळ श्रेष्ठातें संहारी । काळ हरिहरांतें मारी । मारकपणें ॥४२॥
काळ अमरातें गिळी । काळ अंतकातें छळी । काळ प्रलयरुद्राची होळी । सकाळें करी ॥४३॥
काळ ब्रह्मांडातें खाये । तेथ रुद्रादिक विधाता कैचा राहे । ब्रह्मांडआवर्ती जें होये । तें काळाचें खाजें ॥४४॥
ऐशि ऐशिया प्रौढी । काळ अमरपदें मोडी । मग शून्याचीचि नरडी । मुरडूनि खाये ॥४५॥
या परी काळ दुर्धरु । कोण्ही नशके आंवरुं । तो काळूही होय आज्ञाधारु । गुरुकृपेचा ॥४६॥
गृकृपेचिया सदभावा । काळ करुं लागे सेवा । अनित्य नासोनि तेव्हां । जगनित्यत्व दावी ॥४७॥
ऐसी सेवा करितां संतोषें । उतराई ह्नणे हरिखें । तंव काळ काळपणा मुके । अनित्य नासुनी ॥४८॥
नवल गुरुकृपा कीजे । काळेंचि काळू निवारिजे । मग अनकळित उरिजे । आपण स्वयें ॥४९॥
ह्नणोनी काळाचिया माथां । आहे गुरुकृपेची सत्ता । यालागीं काळाचा नियंता । सदगुरु स्वामी ॥१५०॥
काळ करुं लागे सेवा । ऐसा गुरुचरणी भाव द्यावा । यालागी भक्तवैष्णवा । प्रार्थित असे ॥५१॥
जालियाही कार्यसिद्धि । सेवेसि नपडे अवधी । स्वाभाविक भजनविधी । भजवित असे ॥५२॥
जेथ दुजें ना एक । तेथ काय सेवेचें सुख । ह्नणाल तरी कवतिक । ऐसे आहे ॥५३॥
वरा वरपणाचा सोहळा । वोसरुनि जाय तेचि काळा । परी भोगिलेपण वेळवेळां । सोहळेवीण भोगी ॥५४॥
रणीं शूराची ख्याती । होय रणभूमी समाप्ती । तरी विजयश्रीयेची कीर्ति । रणेवीण भोगी ॥५५॥
पुरुषसयोगें संगप्राप्ती । कामिनी लाहे गर्भसंभूती । नित्य संगावीण गर्भाची कीर्ति । मिरवी जगीं ॥५६॥
सतरावियेचें अमृतपान । करी तोचि जाणे हे खूण । तेथ आपुली गोडी आपण । भोगिजे जैसी ॥५७॥
तैसें भज्य भजक भजन । कां पूज्य पूजक । नुरोनियां गुरुचरण – । भजन आहे ॥५८॥
जैशी चोराची माये । प्रगट रडों न लाहे । परी आंतुच्या आंतु होये । उकसबकशी ॥५९॥
कां स्वैरिणी गर्भाची ठी । बाहेरी उमसों नेदी गोठी । परी संभवलें आहे पोटीं । हें तेचि जाणे ॥१६०॥
विषाचें मारकत्व जैसें । विषाआंगी बाहेरीं नदिसे । परी त्यामाजी तें असे । तद्रूपतेंसी ॥६१॥
तैसी गुरुयुक्त भावना । आतळों नेदी मना । अखंड पैं भजना । भजतचि असे ॥६२॥


स्वात्मसुख – मायेचा प्रभाव

अगा जियेतें ह्नणती माया । जे कासेंनि नये आणा । पाहो जातां विधातया । व्यक्ति नये ॥६३॥
संत ह्नणों तरी न दिसे । असंत ह्नणों तरी आभासे । नामरुपाचें पिसें । लाविलें जगा ॥६४॥
संभ्रमाचें दारुण । दोराआंगीं सापपण । कां नसताचि दिसे जाण । छाया पुरुष गगनीं ॥६५॥
जैसी जडलीचि व्योमा । नसती भासे निळिमा । कां सूर्यबिंबीं काळिमा । नाथिली दिसे ॥६६॥
तैसी नाथिलीच अविद्या । नासावया प्रबुद्धा । धिंवसा नव्हे सदां । शिणताती योगी ॥६७॥
आपुली देहाभिमानता । तें मायेचें स्वरुप मुख्यता । हेचि जीवाची बद्धता । निश्चयेंसी ॥६८॥
माया निरशीन मी साचार । ह्नणे तो मायां मोहिला नर । तो छायेचें छेदावया शिर । शस्त्र घडवी ॥६९॥
शस्त्र घेवोनि छेदावें वेगें । ऐशी माया हाती नलगे । नाहीं ह्नणतां लागे । हरिहरांदिकां ॥१७०॥
देवी गुणमयी गुणकार्या । श्रीकृष्ण ह्नणे मम माया । अतिदुस्तर तरावया । ब्रह्मादिकांसी ॥७१॥
ब्रह्मा करितां सृष्टिक्रम । स्वकन्या देखोनि उत्तम । सरस्वतीसी अकर्म । करुं धावे ॥७२॥
जो कां श्रेष्ठ योगियां । त्या शिवासि मोहिलें मायां । मोहिनीरुपें विलया । तत्काळ नेला ॥७३॥
जो कां विष्णू त्रिकालज्ञानी । तोही मायां व्यापुनी । बृंदेच्या स्मशानीं । विषयत्वें वसवी ॥७४॥
ऐसी हरिहरां माया । दुर्जयत्वें न ये आया । तेचि गुरुकृपा जालिया उभीच विरे ॥७५॥
गुरुचे साचार धरलिया पाये । माया मुखचि दाऊं नलाहे । विमुख तरी उरो लाहे । हेंही नघडे ॥७६॥
याचिया वचनप्रतीति माया । उरी नुरतां गेली विलया । जैसा वंध्यापुत्र राया । पहातां न पाहतां नाहीं ॥७७॥
माया नामरुपाचा बडंबा । आणूनि करिती पुढां उभा । तरी सदगुरुकृपेची प्रभा । सद्रूपचि दावी ॥७८॥
रात्री आपुलिया प्रौढी । अंधाराचें दुर्ग घडी । परी सूर्यासमोर अर्ध घडी । राहोंचि नशके ॥७९॥
कां मृगजळाचें जळ । भरलें दिसे प्रबळ । परी साचाराचा तीळ । तिंबू नशके ॥१८०॥
शुक्तिकेचा रजताकारु । प्रत्यक्ष दिसताहे गोचरु । परी एक तरी अळंकारु । अघटमान कीं ॥८१॥
तैसी दिसतांही माया पुढें । सदगुरुकृपेचेनि उजियेडें । पाहों जातां तत्कळ उडे । अभावपणें ॥८२॥
अविद्या इहीं शब्दीं । आपुले नाहींपण प्रतिपादीं । परी नास्तिकां नास्तिकसिद्धी । सदगुरुकृपां ॥८३॥
ऐशी नाशिलियाही माया । अधिक भजवी गुरुराया । ते प्रतीतीच्या भजनठाया । स्वभावें आणी ॥८४॥
ज्याची प्रतीती लाहिजे । तया उपेक्षिजे कीं भजिजें । हें अनुभवीचि जाणिजे । येरां अघतमान ॥८५॥
सिद्धि जालिया साधन । सहज वोहट पडे जाण । तैसें नव्हे गुरुभजन । प्रतीतिस्तव ॥८६॥
कां स्तन्यसेवन अवस्था । सरलिया ते माता । भजावी कीं सर्वथा । दवडूनि दीजे ॥८७॥
देव प्रसन्न होय तंव पूजावा । मग काय नेउनी विकावा । नदी उतरुनि फोडावा । परळू कैसा ॥८८॥
मुंज बांधी तंव तो मुंज । मग काय ह्नणावा नव्हे द्विज । रणीं विभांडी तंव तो गज । मग काय कोल्हा ह्नणावा ॥८९॥
मा जो देहाचें मरण सोडवी । त्यासी वेदू पितृत्वें मानवी । मा जो जन्ममरण चुकवी । त्यासि काय न भजावें ॥१९०॥
जीव अमरचि असे । त्याचें मरण नाशिलें कैसें । जीवासि जीवत्व नुमसे । या नांव मरणनिरास ॥९१॥
जयासि दिग्भ्रमु चढे । तो वाट सोडूनि अव्हाटा पडे । तयासी उमजऊनी रोकडें । मार्गस्थ कीजे ॥९२॥
कनकबीज सेविलिया । भुलिजे आपण आपणिया । तो सावधू कीजे प्राणिया । स्वस्थिती जेवीं ॥९३॥
तैसा मायामोहभ्रमें । नाथिलींचि मानी जन्मकर्में । तो जयाचेनि वचनधर्मे । स्वात्मत्व पावे ॥९४॥
यालागी देवा दुर्जय जी माया । ती जगडव्याळेंसी गेली विलया । सदगुरुप्रसादें पाया – । चेनि बळें ॥९५॥
जेथ सदगुरुकृपा पाहे । तेथ माया ममता कैची राहे । यालागीं गुरुसेवनें होये । सर्वार्थसिद्धि ॥९६॥
जया स्वरुपाची गोडी । इंद्रियें नेणतीं बापुडीं । जें विषयकर्दमी बुडी । देऊनि ठाती ॥९७॥
जें स्वरुपसुख कहीं । इंद्रियीं चाखिलें नाहीं । तें गुरुसेवनी पाही । स्वमुख सेविती ॥९८॥
जेथ इंद्रियां रिघतां सांकडें । तें इंद्रियद्वारां सुख जोडे । ऐसा सदगुरुकृपा उजियेडें । अलभ्य लाभू ॥९९॥
तरी पृथक् पृथक् इंद्रियवृत्ति । प्रवर्ततां आपुलाल्या अर्थी । आत्मसुखाची प्राप्ती । अखंड लाबे ॥२००॥
दृष्टि स्वभावें घे रुप । तंव रुपचि होय स्वरुप । जें सदगुरुकृपेचा दीप । दृष्टीतें वरी ॥१॥
दृश्य देखोंजाय दृष्टी । तंव दृश्य लोपे द्रष्टाचि उठी । ऐशी निर्विशेष त्रिपुटी । गिळूनि पाहे ॥२॥
श्रोत्रावधानी शब्दू । तंव शब्दा सर्वांगीं निः शब्दू । यापरी परमानंदू । श्रवणार्थ सिद्धि ॥३॥
सुपना न येता जो वासू । परममकरंद सुवासू । तो घ्राणद्वारें निर्विशेषू । भोगमिसें भोगवी ॥४॥
रसना रातली आवडी । तें मिथ्या विषयत्वाची त्वचा काढी । मग अभ्यंतरील गोडी । स्वसुखें सेवी ॥५॥
ताट भोक्ता परवडी । अवघें निर्विशेष वाढी । मग जिव्हें चोरुनि गोडी । रसना सेवी ॥६॥
जें जें आडळें आंगीं । तें आंगचि होय वेगीं । ऐसेनि स्पर्शं सर्वांगी । सदानंद दाटे ॥७॥
वाचा उठोनि चौकटे । परी मौनाची मिठी नसुटे । शब्द चपळतेसवें प्रकटे । निः शब्द वस्तु ॥८॥
कराचे क्रिया करणी । निजपती सचित्र चिंतामणी । तेणें अकर्तेपणाची खाणी । खवळली उठी ॥९॥
जें जें उपजे चरणीं । तें अकर्तेपणाची परणी । मग अद्वैताचिये भरणीं । सुखवासें वसती ॥२१०॥
निश्चळाच्या अंगावरी । चपळ पाउलांच्या हारी । चाळवी जैशा लहरी । क्षीराब्धिमाजी ॥११॥
शयना अवसरीं । शेज परेचे उपरी । जाणपण घालोनि बाहेरी । स्वसुखें निजे ॥१२॥
आकाशाच्या अंगावरी । वायु नाना क्रीडा करी । परी कहीं गगनाबाहेरी । पाऊल न घाली ॥१३॥
तैसी इंद्रियकर्माची प्रवृत्ति । निपजतांही हातोपातीं । परी निः संगाची संगती । सोडिली नाहीं ॥१४॥
तेणेंसीच क्रिया उपजे । तेणेंसीच कर्म निपजे । तेणेंवीण काजें । काज करुं विसरे ॥१५॥
श्वासोच्छ्वासाचे परिचार । ते निर्व्यापारेंचि व्यापार । निमिषोन्मिषाचे विकार । निर्विकारें विचरतीं ॥१६॥
जैं सदगुरुकृपा धडफुडी । तैं अतींद्रिय जे गोडी । तें इंद्रियकर्मी उघडी । उदास रहाटे ॥१७॥


स्वात्मसुख – असाध्य तें साध्य

या कारणें सदगुरुची कृपा पाहे । तरी असाध्य तेंचि साध्य होये । यालागीं धरावे त्याचे पाये । निजात्मभावें ॥१८॥
तो काळाचा आकळिता । मायेचा निर्दाळिता । मनाचा नियंता । तोचि एक ॥१९॥
तो वेदाचा वाचकू । अर्काचा आदिअर्कू । इंद्रियांचा द्योतकू । असे प्रभापणें ॥२२०॥
यालागीं कार्यसिद्धीचे माथां । भजावें वेगीं गुरुनाथा । बोलिलों ते अवस्था । ऐसी आहे ॥२१॥
सकळसाधना गुरुभजन । साध्यावरही गुरुसेवन । गुरुवांचूनिया ज्ञान । विज्ञान नघडे ॥२२॥
गुरुनिःशेष परब्रह्म । गुरु आज्ञा सकळकर्म । गुरुसेवा तो स्वधर्म । सर्वार्थसिद्धि ॥२३॥
ते गुरुकृपेची गोडी । जरी वेगळेपणें आणी जोडी । तरी नागवणचि रोकडी । आणिली जाण ॥२४॥
जैसा गुळामाजीं दगडू । सर्वांग झाला गोडू । तरी परिपाकी दावी निवाडू । वेगळेपण ॥२५॥
कां आंबयाच्या पोटीं । असती रसाचिया खोटी । परी त्याहीमाजी असें गांठी । ते वेगळीचि पडे ॥२६॥
कां सोज्ज्वळ हिरा शुद्ध । माजीं अवलक्षणाचा बिंद । तो अमोल परी मंद । होऊनि ठेला ॥२७॥
घृतामाजी घातलें काश्मीरलिंग । तें तद्रूपचि दिसे चांग । परी वेगळेपणाचें आंग । अनसुट असे ॥२८॥
निद्रित निद्रासुख । आंगें नव्हेचि निःशेष । यालागी वेगळेपणचि संतोष । सांगों लाहे ॥२९॥
तैसा आत्मसुखें मी सुखी आहें । ऐसा सुखत्वें फुजों लाहे । तरी वेगळेपणचि राहे । सुखवेदनें ॥२३०॥
लवण ह्नणे मी गोड पाणी । तरी नाहीं मिळालें मिळणीं । तेणें स्वादें वेगळेपणीं । द्योतिला ठावो ॥३१॥
चंद्र तोषे देखोनि कळा । तरी तो चंद्रपणा वेगळा । चंदन तोषे देखोनि परिमळा । तैं चंदनत्वा मुके ॥३२॥
हिंगु ह्नणे मी दुर्गंधू । तरी तो वेगळेंपणें शुद्धू । तैसा आनंद ह्नण मी आनंदू । तें आनंदा वेगळा ॥३३॥
तैसें सात्त्विकाचें भरितें । कां सुख सुखपणें दावी सुखातें । तरी जाण अज्ञान तेथें । ज्ञानरुप असे ॥३४॥
जैसें काष्ठ अवघें जळे । होय काष्ठपणावेगळें । परी लखलखिजे इंगळें । तो काष्ठलेश की ॥३५॥
लवण जळीं मुरे । परी स्वादू जळत्वें थावरे । तैं लवण जळाकारें । उरलें दिसे ॥३६॥
कापूर आगीं मिळे । तरी कापुरत्व न मावळे । तो अंत दीप्त उजाळे । उरला दिसे ॥३७॥
तैसें सुख एक आहे । तें जेथें प्रगट हो लाहे । तेथ अज्ञान दिसत आहे । ज्ञानरुपें ॥३८॥
अज्ञान ज्ञानता नव्हे । तरी सुख दुःख कवणा होत आहे । तेथ सात्त्विकाचेनि फुंजें लाहे । अज्ञान ज्ञानें ॥३९॥
तरी ज्ञान ऐसा ठसा । ते अज्ञानाची उत्तरदशा । जैशी कडूसेंद परिपाक वयसा । गोडीतें ये जेवी ॥२४०॥
मुग्ध वयसेचें बाळ । तेंचि वयत्वें चतुर चपळ । होय तेवी केवळ । अज्ञान ज्ञानें ॥४१॥
लोखंड केवळ कृष्णवर्ण । त्याचे सोज्ज्वळ होय दर्पण । तैसें अज्ञान तें ज्ञानपण । परिपाकें राहे ॥४२॥
तैसा आत्मा सुखित्वें सुखाचा भोग । तैं अज्ञान निघालें ज्ञानाचें अंग । तेंही वोसंडी तें चांग । साचार मिळणी ॥४३॥
अज्ञान तत्काळ जाये । परी ज्ञान अति सबळ राहे । जळगार जळी विरोनि जाये । परी मोती न विरे ॥४४।।


स्वात्मसुख – स्वस्वरुपाची ओळख

उदकाचें मोती मोला चढलें । तें वनितावदनीं फांसा पडिलें । तैसें ज्ञातेपण सज्ञान झालें । तें पडिलें अभिमानीं ॥४५॥
मृदभांडे हिरवें केलें । तें तत्काळ मृत्तिके मिळालें । भाजिलें तें अतिकाळें । मृत्तिका नव्हे ॥४६॥
निखळ मी शुद्ध ज्ञान । ऐसा वृत्तिरुपें अभिमान । स्फुरे तें भवमूळ जाण । ज्ञानरुप ॥४७॥
जहालेनि ज्ञानें । मी मुक्त मानिजे मनें । तो ज्ञानबंध ह्नणे । उपनिषद्भागें ॥४८॥
लोखंडाची बेडी तोडिली । मा आवडी सोन्याची जोडिली । तरी बाधा तंव रोकडी । जैशीतैशी ॥४९॥
खैराचा सूळ मारी । मा चंदनाचा काय तारी । तैसी ज्ञान अज्ञान दोन्ही परी । बाधकचि ॥२५०॥
जळीं प्रतिबिंब बुडालें साचें । तें बाहेरी निघालें दैवाचें । ह्नणती या मूर्खाचे । मुक्तिपद हें ॥५१॥
आधीं बंधचि तंव साच नाहीं । मा मुक्तता मानावी कवणे ठायी । हें न घडतें माने जेथ पाही । तो ज्ञानबंध होये ॥५२॥
तरी शुद्ध जें स्वरुपज्ञान । तें वृत्तिरुपें घे अभिमान । तें वरिष्ठाचेंही वचन । नमनी ज्ञानें ॥५३॥
येथ आपुली जे विषयावस्था । ज्ञान प्रतिपादी सर्वथा । भोग भोगुनी ह्नणे अभोक्ता । हा ज्ञानबंधु ज्ञानी ॥५४॥
हा अभिमान ऐसाचि फुडा । मुक्तपणें घाली खोडा । काय करील प्राणीया बापुडा । नकळे अतिसूक्ष्मपणें ॥५५॥
शुद्ध स्वरुपीं मीपण उठी । तत्काळ भासती ब्रह्मांड कोटी । जें मीपण जीवाची पोटीं । तैं मुक्तता कैची ॥५६॥
मीपण ईश्वरा बाधी । तोही शबल कीजे सोपाधी । शुद्धासी जीवपदीं । मीपण आणी ॥५७॥
जेथ सूक्ष्मत्वें अभिमानू असे । तेथ सूक्ष्मत्वेंचि विषयो वसे । तेणें अभिमानें लाविलें पिसें । मी मुक्त ह्नणोनी ॥५८॥
जेथें स्वरुपप्राप्ती नघडे । तेथ मी बद्ध सत्यत्व पडे । तेणें नाथिलेंच उघडे । मिथ्या मुक्ती ॥५९॥
ते जेथ स्वरुपप्राप्ती काची । तेथ मुक्ती मानी साची । येर्‍हवीं निजीं बंधमोक्षाची । वार्ताही नाहीं ॥२६०॥
अभिमानाचेनि लेशे । मुक्तवासना उल्हासे । यालागी अभिमानाचेनि निःशेष नाशें । निर्विशेषप्राप्ती ॥६१॥
जेथ अभिमान समूळ तुटे । तेथ चिन्मात्र पहाट फुटे । समाधी नेटेंपाटें । ह्नणती त्यातें ॥६२॥
निरभिमान निरवधी । तेचि अखंड समाधी । परी काष्ठा ते त्रिशुद्धी । समाधी नव्हे ॥६३॥
ताटस्थ्या समाधी साचे । मानितां त्या स्वरुपाचें । ज्ञान नाहीं निश्चयाचें । अनुमानसिद्धी ॥६४॥
आघातें मूर्छा आली । तेणें काया पडोनि ठेली । तरी काय तेथ झाली । समाधी साच ॥६५॥
बहुरुपी सोंग संपादितां । वायु स्तब्धला अवचिता । तेणें सर्वांगीं ताटस्थ्यता । बहुकाळ झाली ॥६६॥
परी वासना जेथ न तुटे । तेथ समाधी कैची भेटे । सावध होतांचि प्रगटे । उचित जी राया ॥६७॥
सर्वसंकल्पा अवधी । ते निर्विकल्प समाधी । सकळ शास्त्रप्रतिपादी । समाधीतेची ॥६८॥
स्वरुप देखोनि तत्त्वता । आश्चर्ये जाली तटस्थता । तरी जाण तेथ सर्वथा । वृत्ति आहे ॥६९॥
स्वरुप देखोनि विस्मयो उठी । तोही जिरवूनि पोटी । तयावरी जे दशा उठी । ते समाधी साचार ॥२७०॥
जेथ निःशेष वृत्ति विरे । तेथ विस्मयो कवणासी स्फुरे । सूक्ष्म कल्पना थावरे । तैं विस्मयो प्रगटे ॥७१॥
जेथ निर्विशेष प्राप्ती होये । तेथ देहचि स्फुरों नलाहे । तेव्हां तटस्थ कीं चालताहे । हे अपरदृष्टी ॥७२॥
ऐसें देहचि मिथ्यापणें । त्याचीं कवण लक्षी लक्षणें । मृगजळीचेनि नहाणें । निविजे जैसे ॥७३॥
मिथ्या देहासि तटस्थता । जालिया ह्नणावा ज्ञाता । ऐसीं लक्षणें लक्षितां । निरंतर ठकती ॥७४॥
होकां स्वप्नीचिया नरा । लागती ताटस्थमुद्रा । तरी काय तो खरा । जागृती आला ॥७५॥
ते स्वप्नीचिया लोकाप्रती । ज्ञातेपणाची ख्याती । परी नाही आला निश्चिती । जागेपणा ॥७६॥
जो साच जागृती आला । त्यासि स्वप्नदेह मिथ्या झाला । हें साच कीं या बोला । अनुमान आहे ॥७७॥
जो जागा होऊनि ह्नणे । लाऊं स्वप्नदेहा लक्षणें । हें अधिक दशा कीं लाजिरवाणें । ज्याचें त्यासी ॥७८॥
तो जागा होऊनि स्वप्न सांगे । तें लटिकेपण अवघें । परी स्वप्न देहासी आंगें । आतळला नाही ॥७९॥
तैसी साचार वस्तुप्राप्ती । जो नातळे देहस्थिती । तरी देहो बर्ते कवणे रीती । तें प्रारब्धशेषें ॥२८०॥
वारा वाजोनि सरे । रुखीं हेलावा थावरे । कां लक्ष्य भेदोनि तीरें । चालिजे पुढें ॥८१॥
निशाणा धावो वाजोनि जाये । परी ध्वनीशेष उरला राहे । अर्क तपोनि अस्ता जाये । तरी उबारा उरे ॥८२॥
मेघ वोळोनि वोसरे । जळ अवघेंचि जिरे । परी भूमीं वोल थावरे । तेणें पिकती शेतें ॥८३॥


स्वात्मसुख – ज्ञानी देह

तैशी अविद्या नासोनि जाये । परी प्रारब्धभोग शेष राहे । तेणें शेषें देह वर्तताहे । ज्ञानियांचा ॥८४॥
जेवीं कां पूर्व संस्कारी । मद्यप वस्त्र खांद्यावरी । आहे नाही आठवो न धरी । तैसे देह मुक्तासी ॥८५॥
सर्प कांचोळी सोडोनि जाये । ते वारेन हालों लाहे । मुक्तांचे देह तैसें पाहे । कर्मी वर्ते ॥८६॥
जैसे गळित पत्र वारेनि चळे । तैसे देह वर्ते प्राचीनमेळें । परी संकल्पाचेनि विटाळें । नातळे मन ॥८७॥
अविद्या जेथ नासोनि जाये । देह तेंही अविद्याकायें । कारण नाशलिया कार्य राहे । हें केवी घडे ॥८८॥
वृक्ष मुळी छेदिला जाये । आर्द्रता तत्काळ नजाये । तेवी अविद्यानाशें देह राहे । प्रारब्धअवधीं ॥८९॥
तया प्रारब्धाच्या पोटीं । सांगे सकळ जगासी गोठी । अथवा दरेदरकुटीं । माजीं पडो ॥२९०॥
कां आचरो सकळकर्मे । कां तटस्थ राहोनि भ्रमे । तें प्राचीनचि परिणमे । तदनुरुपें ॥९१॥
जेथ बाध्य बाधकता फिटली । समूळ अविद्या तुटली । तेथेंचि निर्विकल्प जाली । समाधी सैरा ॥९२॥
ऐशी ज्यास समाधी अवस्था । भोग भोगुनी अभोक्ता । सकळ कर्मी अकर्ता । तोचि होय ॥९३॥
तो इंद्रियांचेनि योगें । दिसे विषयावरी लोटे निजांगें । परी निःसंगता संयोगें । भंगोनेंदी ॥९४॥
पहातां जळामाजीं झाली । आणि जळावरी वेलि गेली । परी जळेंसी अलिप्त ठेलीं । पद्मिणीपत्रें ॥९५॥
कां फुंकितां लखलखिला । जो फुंकास्तव प्रकटला । तो फुंक न साहतां ठेला । दीप जैसा ॥९६॥
तैसी कर्मास्तव उत्पत्ती । आणि कर्मीची जाली परम प्रात्पी । त्या कर्मामाजी वर्तती । निष्कर्म होवोनी ॥९७॥
तो वेव्हारी होवोनि । ताटस्थ राहोनि जनीं । परिस्थिती अधिक उणी । बोलोंचि नये ॥९८॥
रावो उपरिये निजीला । तरी राजपदा अधिक आला । कां बाहेरी व्याहाळिये निघाला । तरी राज्यत्वा मुके ॥९९॥


स्वात्मसुख – समाधि

पूर्णत्वाला पोचलेल्या ज्ञानी पुरुषाला समाधि व व्यत्थान संभवत नाही

यालागीं समाधी आणि व्युत्थान । या दोहीचें लक्षण । अपक्वासीचि घडे जाण । पूर्णांसि नाहीं ॥३००॥
चाली चौपदी । त्या पूर्णाची परिपूर्ण कहाणी । वेद सांगे निजनिष्ठा मौनी । जो मौन बोलणें ग्रासोनि दोन्ही । मुक्ती वाहे तयाचे घरी पाणी ॥१॥
मुळीं ठेऊनि फुटकी हंडी । ब्रह्मरसाची रांधिली गोडी । वेदवादाची सांडोनि वोढी । चवी चाखे त्यासि समाधी गाढी ॥२॥
राउतावरी बैसे घोडे । रायाची छाया छत्री पडे । समूळ शून्य ज्याचेनि उडे । चिन्मय दुर्गी तो नर चढे ॥३॥
प्रणवधनुष्य निर्धारें काढी । एकेवेळें दोन्ही शर सोडी । मनोमृगातें घायेंवीण पाडी । त्याची त्वचा शस्त्रेंवीण काढी ॥४॥
ते मृगाजिन साधोनि पाहे । त्यावरी ज्याचें आसन राहे । निजमायेतें न मरुनि खाये । समाधी त्याचे वंदी पाये ॥५॥

अशा परिपूर्ण पुरुषोत्तमाचें वर्णन

निजतेजी जो स्वयें माये । तेजाचें निज तेज स्वयें होये । नयनीं नयन जो होऊनि राहे । समाधि वंदी त्याचे पाये ॥६॥
अहं सोहं सांडोनि वोझें । हें सुख जेणें अनुभविजे । निजेतें मारुनि निजी निजें । सहज सुखें तो सहजी सहजें ॥७॥
सहज सुखें तो अति संतोषे । देहादि ममता मिथ्या देखे । रसनेवीण जो रसू चाखे । नित्य निमग्न तो निजसुखें ॥८॥
एक जनार्दनाची वोवी । ब्रह्मसुखातें सहजें गोवी । सहज भावार्थी तो सदभावी । ब्रह्मसुखाचा तो अनुभवी ॥९॥
समाधि सुख जें नेटेंपाटे । जे योगमुद्रा योग्या भेटे । एक जनार्दनीं हाटे वाटें । तेणें सुखेंची सहज रहाटे ॥३१०॥

त्याचें अगाध सामर्थ्य

तो देखे तेंचि परब्रह्म । तो करी तेंचि सत्कर्म । त्याची लीला तो परम धर्म । घार्मिकांचा ॥११॥
तो जल्पे तें वेदशास्त्र । तो वोसणाये तो महामंत्र । तो अनादीचें आदिसूत्र । अव्यक्तत्वें ॥१२॥
तो पुरुषोत्तमा पुरुषोत्तम । तें विश्रांतीचें विश्रामघाम । तो निष्कामाचा काम । कामनाशून्य ॥१३॥
त्याच्या श्वासोछ्रवासाचे परिचार । तें आनंदाचें माहेर । त्याच्या निमिषोन्मिषामाजीं घर । निजसुखें केलें ॥१४॥
जो निर्गुण निः शब्दाचा । तो बोले आपुलिया वाचा । हा चाले तेथे समाधीचा । संतोष तोषे ॥१५॥
तो बैसला दिसे एकदेशीं । परी तो सर्वदेशनिवासी । देह हिंडतां दिगंतासी । चलन त्यासी असेना ॥१६॥
तो असे वसे जिये देशीं । तेथ चार्‍ही मुक्ती होती दासी । तो साचार भेटे त्यासी । परब्रह्मचि भेटलें ॥१७॥
ईश्वर जो जगाचा । तो आज्ञाधारकू तयाचा । आनंद वोळगणा अंगाचा । आठ प्रहर ॥१८॥
शम त्याचेनि समत्वा आला । संतोषू त्याचेनि संतोषला । अनुभवा अनुभवू जाला । याचेनि अंगें ॥१९॥
त्याचिये निद्रेपाशीं । समाधि ये विश्रांतीसी । शिणली माहेरा जैसी । विसावों धावो ॥३२०॥
ज्ञान ज्ञातेपणें संतापलें । तें याचिये दृष्टीं जिवों आलें । वेद वोसंगा निवाले । वाचेचिये ॥२१॥
हरिविरंच्यादि देव आले । ते याचेनि देवत्वा मुकले । शून्य शून्यपणा उबगलें । याचिये भेटीं ॥२२॥
वैकुंठीचे मुक्तवासी । नवस नवसिती अहनिशीं । ऐशियाची भेटी आह्मासी । होईल केव्हां ॥२३॥
जें जगा वंद्य महामाये । जें हरिहरां वश नोहें । ते यांचिये पायीं सामाये । नाहींपणें ॥२४॥
जग जगपणें संतापलें । तें याचिये छायें निवों आलें । कीं छायेमायेसी मुकलें । जगत्वा जग ॥२५॥
अधिष्ठान परदेशी जालें । तें याचिया वोसंगा विसावों आलें । कीं खेंव देऊनि सुरवाडलें । नसुटेचि मिठी ॥२६॥
येवढिये प्रतीतीच्या अंगीं । निष्ठा काष्ठा गेली भंगीं । मग गुरुशिष्य दोन्ही भागीं । आपणपे स्वयें ॥२७॥
कागा दोन्ही डोळे ह्नणणें । परी एकें बुबुळें दोन्ही देखणें । कां दोदांतीं चाखणें । एकी वस्तु ॥२८॥
वाम सव्य दोन्ही भाग । दो नांवीं एक अंग । तैसे गुरुशिष्य विभाग । एकत्वें दिसती ॥२९॥
जरी गुरुशिष्य दोन्ही एक । तरी कां दिसे न्यून आधिक । आणि निवृत्तिशास्त्र देख । याचिया बोधा ॥३३०॥
तरी हें अवधेंचि वावो । ऐसा अवगमताहे भावो । हा मायामय निर्वाहो । मृगजळत्वें ॥३१॥
जीव शिवाचा जो भेद । तो केवळ मायिक संबंध । ते मायेचा विनोद । सादर ऐके ॥३२॥


स्वात्मसुख – मायेचा उपकार

माया अवघे ह्नणती कुडी । परी ते मायेची उत्तम खोडी । स्वरुप आच्छादुनी गाढी । वाढवी श्रद्धा ॥३३॥
माया ब्रह्म राखे गुप्तता । यालागीं आवडे समस्तां । मुमुक्षु अति अवस्था । वैराग्यता श्रद्धाळू ॥३४॥
तेंचि ब्रह्म प्रगट असतें । तरी कोणीच त्यातें न पुसते । अवघेचि उपेक्षितें । हेळणा करुनी ॥३५॥
सूर्य परब्रह्म प्रत्यक्ष दिसे । त्यासि उपेक्षिती लोक जैसे । नमस्कारीं श्रद्धा नसे । ब्रह्मासि पैं तैंसे होतें ॥३६॥
अग्नि देवाचें निजमुख । त्यावरी पाय देऊनि घेती शेक । आळशी तेथ थुंकी थुंक । ब्रह्मासिही देख तैसें होतें ॥३७॥
मनकर्णिका ब्रह्मजळ । तेथें करिती मूत्रमळ । एवं प्रत्यक्षासि केवळ । उपेक्षा होतसे ॥३८॥
तैसी परब्रह्माच्या अभक्तीं । अवघ्यां होती अधोगती । हे चुकविली निश्चितीं । माया देवी ॥३९॥
हा मायेचा उपकारु । अवघ्यांहूनी परम थोरु । आम्हीं तव साचारु । मानिला जीवें ॥३४०॥
माता पित्याचा विकल्प धरिती । जे गुरुसी विकल्पिती । ते प्रगटस्वरुपी श्रद्धा धरिती । हें न घडे ॥४१॥
यालागीं मायाचि सज्ञान । ब्रह्म आच्छादुनी जाण । श्रद्धायुक्त जन । अतिशये केलें ॥४२॥
हो कां डोळ्याची वाहुली । कधीं वेगळी नाही जाली । परी ज्याची त्यावरी बिंबली । दिसे जैशी ॥४३॥
कां सागराची लहरी । स्वभावें चपळ सागरीं । तैसे पूर्णाच्या अंगावरी । मिथ्या जीवित्व भासे ॥४४॥
आंबा परिपाकता पावे । तैं परिमळ फळापुढें धावे । तैसे चिन्मात्राचे हेलावे । जीवत्वें दिसती ॥४५॥
जैसा शब्द आणि शब्दार्थ । दोन्ही एकत्वेंचि वर्तत । तैसें जीव चैतन्या आंत । नसोनि असती ॥४६॥
जैशा घृताचिया कणिका । घृतेंसी नव्हेति आणिका । तैसे जीव परब्रह्मीं देखा । कल्पनामात्र ॥४७॥
जो अलिप्तपणें उभा । जो थिल्लरीं बिंबला प्रतिबिंबा । तरी मिथ्या द्वैत शोभा । देखणा तोचि ॥४८॥
जरी बिंब सजीव नसे । तरी प्रतिबिंब कवणा आभासे । यालागीं द्वैतभावें आभासे । अद्वैतप्रभा ॥४९॥
तरी एक अविद्या बहु विद्या । नाना मत मर्यांदा । एकत्वीं विरुद्धा । अर्थातें जनिती ॥३५०॥
हा पूर्वपक्ष गाढा । नकळोनि शास्त्रज्ञमूढा । मानिताती सदृढा । विरुद्धा अर्थातें ॥५१॥


स्वात्मसुख – मुक्तात्मा

तरी अविद्या एकचि निश्चिती । परी बोधका अनंता शक्ती । जैशी एके दावर्णी बांधिती । अनेक पशू ॥५२॥
तेथ पशुप्रती बिरडें । वेगळालें आगरडें । येणें बाधकत्व घडे । एकानेकविधा ॥५३॥
तेथ ज्याचें बिरडें तुटलें । तें दोर दावणीहूनी सुटलें । तैसें अविद्या आवरण फिटलें । तो मुक्त झाला ॥५४॥
एकाचेनि अविद्यानाशें । जगचि मुक्त व्हावें ऐसें । मानिती त्यां मतपिसें । मताभिमानें ॥५५॥
पैं एकें ढोरें दावणी उपडिली । तरी अवघींचि कैसेनि सुटलीं । ते अधिकाधिक गुंफली । परस्परानुमिळणीं ॥५६॥
तरी एकाच्या अनुष्ठानसिद्धी । जो जगाचि मुक्ती प्रतिपादी । तो जाण पां त्रिशुद्धी । अधिक गुंफे ॥५७॥
एकाचेनि भोजनें । केवीं तृप्ती होइजे सकळजनें । कीं एकाचेनि अमृतपानें । जग अमर होइजे ॥५८॥
तैसी एकाची परप्राप्ती । कैसी सकळांसी निवृत्ती । हे बाळसाची वदंती । परी सिद्धार्थ नव्हे ॥५९॥
ज्याची अविद्या निरसे । त्यासि जगचि मुक्त दिसे । तेथ मुक्त म्यां करावें ऐसें । अभिमानत्व नुरे ॥३६०॥
फिटली अविद्येची बाधा । तोचि प्राप्त मुक्तिपदा । हे वसिष्ठादिमत मर्यादा । ज्ञानियांची ॥६१॥
केवळ दोराचा व्याळ । हा काळ्या नाव शंखपाळ । ह्नणतां होय बरळ । सांगतांचि ॥६२॥
कां गंधर्व नगरीचे हुडे । मागां बहू पुढें थोडे । ह्नणती ते शहाणे कीं वेडे । विचारी जोपां ॥६३॥
आकाशाची सुमनें । सुवार्से की वासहीनें । विवंचिती ते देखणे । निर्धाराचे ॥६४॥
तैसी अविद्याचि तंव वावो । तेथ कैचा एकानेकभावो । हा वाढविती जो निर्वाहो । ते काय निपुण ज्ञानी ॥६५॥
डोळियामाझी बाहुली असे । हें ह्नणे तोचि प्रतिबिंबला दिसे । तेवीं आपुलेनि संकल्पवशें । अविद्या सृष्टी ॥६६॥
जैशीं आपुलीचि उत्तरें । होती पडिसादा प्रत्युत्तरें । तेवी स्वसंकल्पाचेनि आधारें । मायादिसृष्टी ॥६७॥
स्वसंकल्पें अविद्या बाधू । स्वसंकल्पें मानी बद्धू । स्वसंकल्पें अनुवादू । मी मुक्त ह्नणउनी ॥६८॥
आरिसा काये प्रतिबिंब असे । परी जो पाहे तोचि आभासे । तेवीं आपुलेनि संकल्पवशें । वसविल्या सृष्टी ॥६९॥
स्वसंकल्पावांचूनि पाही । जगीं अविद्याचि नाहीं । ते कल्पना निमे ठाईं । तें यातायात कैची ॥३७०॥
ह्नणोनि कल्पनेच्या नाशीं । अविद्या पडे मनाचे ग्रासीं । तैं अज्ञानाची निशा निरसी । अविद्या भावें ॥७१॥


स्वात्मसुख – अविद्येचा निरास

अविद्या निरसूनि मन । उरे त्याचें ऐसें चिन्ह । जैसा चित्रींचा हुताशन । दिसे परी बाधीना ॥७२॥
कां दग्धवस्त्राची घडी । भासे परी ते अवघे कुडी । तेथ कर्मकर्माची परवडी । बोलोचि नये ॥७३॥
बाधित दृश्याचें भान । तेथ मनपणें नाहीं मन । हे अनुभवींची खुण । अनुमाना नये ॥७४॥
काष्ठ अवघें जळोनि जाये । परी अग्नी काष्ठाकारें राहे । काष्ठचि अग्नी होये । तैसे तें मन ॥७५॥
तेथ पदें पदग्रासू । मनें मनाचा नाशू । अविद्येचा निरासू । अविद्यकत्वें ॥७६॥
तेथ प्राणेवीण परिचार । क्रियेवीण आचार । मनेवीण विचार । विचारी विरे ॥७७॥
तें नाठवितांचि आठवे । विसरवितां न विसरवे । जें भुलवितां न भुलवे । प्रमदामोहें ॥७८॥
तें निजेलियाहि जागे । जागलिया निजेंसि वागे । जें सर्व करुनि उगें । सर्वदां असे ॥७९॥
तेथ शब्देवीण बोली । चरणेवीण चाली । दृष्टीवीण आली । दर्शनशोभा ॥३८०॥
तंव उपशमा जाला शमू । नेमातें मुकला नेमूं । ठकोनि ठेला निकामू । सकामेंसी ॥८१॥
तेथ धैर्या मुकली धृती । वार्धक्या आली शांती । जे सगुणाची मूर्ति । अगुणत्वा आली ॥८२॥
जाला दिवसाचा उगाणा । रात्रि मुकली रात्रपणा । संध्याकाळाची गणना । बृडोनि गेली ॥८३॥
फिटला वेदाचा भ्रम । लाजोनि लोपलें कर्म । शिगें चढला धर्म । धार्मिकेंविण ॥८४॥
तेथ मोक्षा मुक्ति जाली । बोधाची भुली गेली । साधनाची फिटलीं । सांकडीं अवधीं ॥८५॥
अहिंसा सामावली अंगीं । समाधी सांठविली सर्वांगीं । धारिष्ट रंगलें रंगीं । चैतन्याचे ॥८६॥
निद्रा निःशेष गेली । जागृती नाहीं जागली । स्वप्नाची मोडली । समूळ वाट ॥८७॥
दवडूनि अभ्रघन । आकाश सोलिलें मौन । तियें आरिसा पहातां उन्मन । बिंब प्रतिबिंब नदिसे ॥८८॥
तेथ अभ्यास लाजिला । विस्मयो वेडावला । अनुभव बुडाला अवघेनि आंगे ॥८९॥
आनंदु गिळिला बोधें । बोध गिळिला बोधें । बोध गिळिला आनंदें । दोन्ही नाहीं नुसधें । सुखचि नांदे ॥३९०॥
तेव्हां सुख ऐसें ह्नणते । सुखा वेगळें नुरेचि तेथें । यालागी सुखपणातें । सुख सुखत्वा विसरे ॥९१॥
सुख सुखत्व जेथ नाहीं । तरी शून्यवाद आला पाही । शून्य जाणवलें जिये ठायी । तें तंव शून्य नव्हे कीं ॥९२॥
होकां चंद्रमा तिये अवसें । स्वयें प्रगटें ना कोणा दिसे । मी चंद्रमा आहें ऐसें । तो तंव जाणे ॥९३॥
राय विनोदें जाला संन्यासी । स्वयें संपादूं जाणे तया वेषासी । सत्यत्व मानलें लोकांसी । परी तो आपणापें जाणें ॥९४॥
सर्वग्रस्तोदय ग्रहणीं । स्वयें प्रगटी तरणी । पहातां न देखेचि कोणी । तरी काय सूर्य नाहीं ? ॥९५॥
तैसें शून्य जेणें जाणितलें । त्यासि शून्य जाय केवी केलें । आंख गणितांख शून्य आलें । परी गणकू शून्य नव्हे कीं ॥९६॥
यालागी शून्यसंमतवादा । माथा नुघवेचि शब्दा । शून्यसाक्षित्व शून्यवादा । नास्तिक्य आली ॥९७॥
ह्नणोनि आणिक विशो नोहे । ना सुख सुखपणें सुखा नये । ऐसें कोणी एक सुख आहे । सदोदित ॥९८॥
ऐशिया निजसुखाच्या पोटीं । दुजेनवीण ग्रंथ गोठी । वाचेवीण जगजेठी । जनार्दन वदवी ॥९९॥
अवघा जनार्दनचि देखा । तेथ आडनांवें मीनला एका । तेणें नांवें ग्रंथलेखा । अलक्ष लक्षी ॥४००॥


सदगुरु जनार्दनकृपा

जेथ जनार्दन कृपा प्राप्त । तेथ उपनिषदाचा मथितार्थ । देशभाषेमाजी ग्रंथार्थ । लोटांगणी येती ॥१॥
ते गुरुकृपावैभवें । आत्मसुख येणें नांवें । ग्रंथ निर्मिला देवें । येहि अक्षरीं अक्षर ॥२॥
जैशी खांबसूत्रींची बाहुली । सूत्राधीन उगली । तैसा जे जे बोल बोलवी बोली । ते वाचा वदे ॥३॥
पहिलें अणुमात्र आरंभवी सहज । परी आरंभिलें नकळे मज । पाठी येकायेक ग्रंथवोज । वोडवला दावी ॥४॥
निरुपण कायें चालवावें । प्रमेय कैसें आकळावें । हें कांहीं सर्वथा जीवें । म्यां विवरिलें नाहीं ॥५॥
माझे मनीं रिघाला जनार्दन । माझी जिव्हा तो झाला आपण । माझा हात धरुनियां जाण । ग्रंथलेखन तो करवी ॥६॥
नाही श्रोतयांचा साक्षेप । नकळे ग्रंथ पीठिकेचें रुप । परी एकसरें स्वरुप । ग्रंथार्था आले ॥७॥
निरसावी विकल्प बाधा । राखावी वेदमर्यादा । हें कांहीचि मी कदा । उपलवूं नेणें ॥८॥
परी नेणों काय श्रीअनंता । आवडली हे ग्रंथकथा । तो निजभाविकतां अर्था । वदोनि ठेला ॥९॥
आतां मजमुखें वदला देवो । ऐसा घ्यावा अहंभावो । तंव विश्वमुखें पहाहो । देवचि वदे ॥४१०॥
त्या अद्वैतपरपवित्रा । विकल्पनिरसनी विचित्रा । वोविया नव्हे हे अर्धमात्रा । प्रणवपीठीची ॥११॥


स्वात्मसुखाचें महत्त्व

स्वात्मसुख येणें नांवें । हा केवळ ग्रंथ नव्हे । येणे रहस्य अनुभवावें निजात्मसुख ॥१२॥
जें आत्मसुखें सुरत । त्यांसि पढियंता हा ग्रंथ । जे आत्मसुखा आर्तिवंत । तेहीं ग्रंथार्थ घ्यावा ॥१३॥
हो कां पतिसुखालागीं गोरटी । सासूसासर्‍यासी मानी मोठीं । तैसे प्रमेय सुनी दिठी । पहावा ग्रंथ ॥१४॥
जैसी द्राक्षीच्या घडीं । गोडीयेहूनि अधिक गोडी । तैसी वोवीयेहूनि चढी । वोवी आहे ॥१५॥
जैसें चंद्रकिरणी अमृत भरलें । तें चकोरासीचि भागा गेलें । तैसें आत्मसुख उपाइलें । निर्मत्सरासी ॥१६॥
पहाहो तें आत्मसुख कैसे । हें वारंवार मज पुसें । तरी करतलामलकविन्यासें । सांगेन आइका ॥१७॥
जैसा मर्दण्याला विकळ । कळे प्राप्तिसुख कल्लोळ । तैसें सुख सदा केवळ । कळेवीण साधूसी ॥१८॥

आत्मसुखप्राप्तीसाठीं सदगुरुचे पाय धरणें हच एकमात्र मार्ग

अहो तें आत्मसुख सकळां आहे । परी ठाउकें नव्हे कीजे काये । यालागीं धरावे सदगुरुचे पाये । तैं भावार्थ प्राप्ती ॥१९॥
सदगुरु तोचि ब्रह्ममूर्ति । भावार्थे करितां अनन्यभक्ती । शिष्या स्वात्मसुखाची प्राप्ती । हीय निश्चिती तत्काळ ॥४२०॥
आतां ब्रह्मज्ञानाची किल्ली । सांगेन एक्याचि बोलीं । जयांची कल्पना निमाली । ते प्राप्त पुरुष ॥२१॥


स्वात्मसुख – साधना

याचिलागीं आचारु । याचिलागीं विचारु । याचिलागीं शास्त्रसंभारु शोधिजे सदा ॥२२॥
याचिलागीं ज्ञाना याचिलागीं ध्यान । योग अष्टांग साधन । याचिलागीं ॥२३॥
याचिलागीं तपसायास । याचिलागीं जप संन्यास । एकाएकी वनवास । याचिलागीं ॥२४॥
याचिलागीं दिगंबर । याचिलागीं वल्कलधर । याचिलागीं चर्मांवर । मृगव्याघ्राजिनादि ॥२५॥
याचिलागीं निराहार । याचिलागीं फळाहार । याचिलागीं जटाधर । काषाय वास ॥२६॥
याचिलागीं वीतराग । याचिलागीं योगयाग । याचिलागीं निःसंग । संवाद कीजे ॥२७॥
याचिलागी वेद । याचिलागी बोध । याचिलागीं भेद । सांडिजे सदा ॥२८॥
याचिलागीं संतांचे । माथां वाहिजती मोचें । महिमा सांडोनि रंकाचें । रंकत्व यालागी ॥२९॥
यालागीं सदगुरु । यालागीं तत्त्वविचारु । याचिलागीं धैर्य निर्धारु । धरविला जेणें ॥४३०॥
तो हा भगवजपंचानन । जो अनाम्य नामें जनार्दन । तेणें एकपणेंवीण एक होऊन । कवित्व करवी ॥३१॥


शुद्ध भावाचा महिमा

येथ भावार्थ तें निज स्वार्थू । भावार्थ तें कृतकृत्यार्थूं । भावार्थ, तैं परमार्थू । पाषाणीं पविजे ॥३२॥
येथ भावार्थ, तैं भ्रांति फिटे । भावार्थ, तैं विकल्प तुटे । भावार्थ तैं देव भेटे । भाविला ठायीं ॥३३॥
भावार्थ । तरी सत्यवादू । भावार्थ तरी सत्य साधु । भावार्थ, तरी सत्य बोधु । चिन्मात्रें ॥३४॥
भावार्थ तैं संकल्प तुटे । भावार्थ तैं देव भेटे । भावार्थ नाही तै कष्टे । दैवहता ॥३५॥
भावार्थ तरी तीर्थ फळे । भावार्थ तें तत्त्व कळें । वैकुंठीचे भावबळें । पाहुणे येती ॥३६॥
भावो, तैं भज्य भजना । भावें तुटे विकल्प कल्पना भाव । तें भावना । तत्काळ फळे ॥३७॥
भावो तैं श्रेष्ठ भाग्य । भावो तैं वरिष्ठ वैराग्य । भावो तैं आरोग्य । भवरोगाचें ॥३८॥
भक्त भावार्थी निजाचा । तै देव सेवकू होय सेलेचा । बोल बोले जे वाचा । ते तत्काळ करी ॥३९॥
द्रौपदीचे भावासाठीं । अंबर अंबराच्या पोटीं । करुनियां जगजेठी । राखिली लाज ॥४४०॥
प्रर्‍हाद पुत्र शत्रूचा । परी भाव फळला त्यासि त्याचा । द्वंद्व निरासी सर्वांगाचा । वोळगणा देवो ॥४१॥
यालागीं भावो, तेंचि जयवृत्ती । भावो तैं परमप्राप्ती । भावो तैं ख्याती । परमार्थाची ॥४२॥
भावार्थी सत्य गुरु । भावार्थ निजनिर्धारु । भावो नाहीं तैं भूमिभारु । जन्म होये ॥४३॥
गुरु शिष्याचिया बोला । भावार्थाचि मोला आला । तो भाव जैं पालटला । तैं बुडाला परमार्थू ॥४४॥
यालागी चाड जैं परमार्था । तैं मळो न द्यावें भावार्था । भावेंवीण सर्वथा । परमार्थ न घडे ॥४५॥
जरी मळका होय भावार्थ । तैं मळकाचि मिळे परमार्थ । मग भावानुसार स्वार्थ । सकळ लाभे ॥४६॥
दृढ भावें भावना । जैं उदभट उपजे मना । तैं जनी जनार्दना । देखिजे साचें ॥४७॥
तो गुरु ह्नणावा जनार्दन । माझिये नयनीचें अंजन । जेणें स्वसुखाचें निधान । दाविलें डोळां ॥४८॥
त्यासि नाहीं गुरुत्वाची गोडी । परी गुरुत्व त्याचे पाय न सोडी । त्याचें चरणरज दैन्य फेडी । दावी निजस्वरुप ॥४९॥
यालागी भावार्थेसी पाये । धरिल्या अविद्या निःशेष जाये । हे स्तुती अर्थवादू नव्हे । प्रतीति माझी ॥४५०॥


सदगुरुचरणाचें माहात्म्य

म्यां नाही केले उग्र तप । नाहीं जपिन्नलों मंत्रजप । योगयाग खटाटेप । नाहीं तीर्थादि भ्रमण ॥५१॥
आह्मा सकळ साधनाचें साधन । हे सदगुरुचें श्रीचरण । तेणें दाविली हे खूण । जग गुरुत्वें नांदे ॥५२॥
आह्मा गुरु तोही गुरु । शिष्य तोही सदगुरु । निपराध तो परमगुरु याचेनि पाये ॥५३॥
ऐशियाचे सांडूनि पाये । कोण कोणा तीर्था जाये । जाऊनि काय प्राप्ती लाहे । हें नकळे मज ॥५४॥
एका एकपणाची नाथिली दिठी । या एकपणाची सोडिली पेटी । मुक्त मुक्ताफळाची मोकळी गांठी । मिरवे जनार्दन चरणीं ॥५५॥
आतां सज्जनीं उपसहावें । हेंही नलगे प्रार्थावें । तेही सदगुरुचि स्वभावें । झाले आह्मा ॥५६॥

सदगुरुंकडे या ग्रंथासाठी श्रीनाथांची वरयाचना

ऐशिया जी गुरुनाथा । एका एकत्व चरणीं माथा । ह्नणे वरद जी या ग्रंथा । द्यावा मज ॥५७॥
अज्ञान्याचें अज्ञान फिटे । ज्ञानियांचा ज्ञानाभिमान तुटे । जनीं जनार्दन भेटे । सर्वत्र सदा ॥५८॥
येनें वरप्रसाददानें । भक्ताचेनि भाववचनें । आपणपेया जनार्दनें । दिधलें देख ॥५९॥
आतां एकपणाचेनि नांवें । जन जनार्दनचि आघवें । आणि जनार्दनाचेनि जीवें । जितुसे एका ॥४६०॥
एका एकपणेंवीण आतां । केला यापरी कवी कर्ता । विनवणी संतश्रोता । अवधान द्यावें ॥६१॥


ग्रंथाची उपयुक्तता

श्रोत्यांशी सलगीचें बोलणें

तुमच्या लळेयाचे लळिवाडें । निःशब्दवादें बोलीगडें । केलें तें तुह्मापुढें । पढिन्नलो स्वामी ॥६२॥
बाळक बोले बोबडें । तेणें मातेसी प्रीती वाढे । तेवीं येहि बोली वाडे कोडे । रिझाल तुह्मी ॥६३॥
संती अवधान द्यावें । सज्जनीं सन्मुख व्हावें । ग्रंथू केला येणें भावें । भावार्थेसी ॥६४॥
हा ग्रंथू येणें भावें जे संतीं सदा संतोषावें । संतोषोनिया ह्नणावें । आपुलें मज ॥६५॥
समथ ज्याकडे पाहे । त्याचें दरिद्र विच्छिन्न होये । तेवी संतकृपा जे होये । ते सनाथ जी मी ॥६६॥

या ग्रंथाची उपयुक्तता

जे सिद्धांचे सिद्धस्थान । जें साधकाचें साधन । ये ग्रंथींचे संरक्षण । ऐसेंचि आहे ॥६७॥
यालागीं सिद्धां आणि साधकां । ये ग्रंथीं लाभे अवांका । हा दोहीचिया निजसुखा । सुखसंतोष ॥६८॥
ह्नणोनी मुक्त आणि मुमुक्षा । अहा अर्थ लाभे निजापेक्षां । साध्यसाधनलक्षा । साधिकारें दावी ॥६९॥
जैसे आपुलिया भावना । भजन पाववी त्या त्या स्थाना । तैसा हा ग्रंथ जाणा । स्वधिकारें निववी ॥४७०॥
हो कां आपुलेनि संकल्पवशें । देवदेवित्वें वस्तु भासे । तेवीं ग्रंथू हा अधिकारवशें । फळोनि दावी ॥७१॥

ग्रंथाची अमृतोपम गोडी व त्याचें महिमान

ये ग्रंथीचें निरुपण । वरिवरि पहातां कठिण । परी अभ्यंतरी गोडी जाण । अमृता ऐसी ॥७२॥
परी हेही उपमा थोडी । अमृतपानें अमर कोडी । मरणार्णवीं बुडी । देऊनि मरती ॥७३॥
तैसें नव्हे हें अमृत । जीवेंवीण जीववित । शिवेंवीण सामर्थ्य । समर्थून दावी ॥७४॥
हें पानेंवीण अमृतपान । कीं विदेहा तृप्तीचें भोजन । संतभ्रमराचें निजसुमन । सदा आमोद बहळ ॥७५॥
हा निर्गुणाचा शृंगारु । देहातीताचा अळंकारु । हा अवेवावीण सनागरु । स्वरुप तें हें ॥७६॥
हें डोळेवीण देखतें । श्रोत्रेवीण ऐकतें । रसनेंवीण चाखतें । स्वादासि हें ॥७७॥
हें चरणेंवीण चालतें । वदनेंवीण बोलतें । क्रियेवीण कर्ते । अकर्तेपणें ॥७८॥
हें अमृतातें जीववितें । कीं कल्पतरु याचें मागेतें । चिंतामणीचे पुरविते । मनोरथ हें ॥७९॥
हें परिसाची काळिमा फेडी । दशेचें दैन्य दवडी । लक्ष्मीची अवकळा काढी । करी कळायुक्त ॥४८०॥
हें श्रुतीतें पढवितें । सकळशास्त्रां बुद्धिदातें । कीं नानामतें बुझावितें । स्वरुप तें हें ॥८१॥
हें देवाचें देवार्चन । हें जीवाचें जीवस्थान । सकळ साध्याचें साधन । हेंचि एक ॥८२॥
हें अव्ययाचें आयुष्य । हें अद्वयाचें रहस्य । हें सामरस्याचें सामरस्य । सहजान्वयें ॥८३॥
हें अजन्माचें जन्मपत्र । हें क्षेत्रविहीनाचें सुक्षेत्र । हें अनादीचें आदिसूत्र । अभंगत्वें ॥८४॥
दया येणें दयालुत्व । कृपा येणें कृपालुत्व । साम्यासि सत्यत्व । येणें एकें ॥८५॥
येणें प्रकाशें प्रकाश भासे । येणें देखणें नित्यत्व दिसे । येणें सुखें सुख उल्हासे । उचंबळत ॥८६॥
येणें नाठवे देह गेह । येणें तुटती संदेह । हे देही देह विदेह । याचेनि होये ॥८७॥
हे निजांगाची गोडी । गुरुकृपा उपलब्धी फुडी । तेथ नीच नवी गोडी । होय तें कळे ॥८८॥
हो कां वत्साचे मनीं । आवडी जैशी स्तनपानीं । कां दुकळलें भोजनीं । सादर जैसें ॥८९॥
नातरी निराळीच्या पाउसा । झेलूं जाने चातक जैसा । गुरुवचनालागीं तैसा । स्वानंदें सादरु ॥४९०॥
नवघनगर्जनेसरिसा । उल्हास न धरवे मयूरा जैसा । परमार्थालागी तैसा । उत्सावो असे ॥९१॥
धनदायें बद्धक । कां कामलाभें कामिक । तैसा नित्य नवा हरिख । सदगुरुभजनीं ॥९२॥

सदगुरुभजनी साधकाला हा ग्रंथ म्हणजे पुरुषोत्तमाचे साक्षात् निजधामच आहे

ऐसें गुरुचरणी ज्याचें प्रेम । तेणेंचि केले सकळ नेम । परमार्थाचें वर्म । फावले त्यासी ॥९३॥
त्यासीच योग आकळे । त्यासीच तत्त्व कळे । सकळ साधनांची फळें । त्यासीच फळतीं ॥९४॥
यापरी जो साधक । गुरुवचनचातक । त्यासी हा ग्रंथ विवेक । सफळित फळे ॥९५॥
नवल या फळाचें निज । वरी त्वचा ना आंत बीज । नुसतिया रसाचेंचि रसफुंज । फळरुपें फळलें ॥९६॥
तें हें कवित्व मुद्रेची फळें । चिन्मात्रैक निर्मळें । घमघमिताति परिमळें । स्वानंदबोधें ॥९७॥
दुरुनि येतांचि वास । धांवती विवेकराजहंस । मुमुक्षु सारंगाचे बहुवस । रुंजी करिती समुदाये ॥९८॥
तेथ शुकादि संतृप्त झाले । सुभाषित बोलती ते बोलें । तेहि वचनी संतोषले । श्रीमंत साधू ॥९९॥
शुकमुखींचीं गळित फळें । प्राप्ती प्राप्त भावबळें । ते गोडियेची रसाळें । अक्षरें लिहिलीं ॥५००॥
अक्षरीं अक्षर अक्षरांतर । अक्षरी अक्षर अपरांपर । अक्षरीं अक्षर निर्धार । धरिता हा ग्रंथ ॥१॥
स्वात्मसुख ग्रंथाक्षर । तें क्षराक्षरातीत पर । पुरुषोत्तमाचें साचार । निजधाम हें ॥२॥
मूळ डाळ शखा प्रवाळ । वन उद्यान द्रुम सकळ । अवघी वाढी एकचि फळ । सुखरुपें स्वादिष्ट ॥३॥
हे जीवा आंतुली गोडी । अनिर्वाच्य चोखडी । ते लाविली कवित्व वाढी । वाचेच्या आळां ॥४॥
तेथ जनार्दन कृपाधन । वर्षताहे जीवन । तेणें एकाकी कविता वन । सफळित सदा ॥५॥


श्रीएकनाथांचे धन्योदगार

हें भानुदासकवित्व कुळवल्ली । निजात्ममंडपा वेली गेली । एका जनार्दन पुष्पीं फळीं । संत सुखीये होतू ॥६॥
हें स्वात्मसुख निजकथा । विवेकवैराग्ययुक्त श्रोता । श्रवणें श्रवण करितां । ये समाधि अवस्था लोटांगणी ॥७॥
एक एक तूं जनार्दना । ह्नणउनी नुरविसी एकपणा । यालागीं ग्रंथगणना । संपूर्ण झाली ॥८॥
एका जनार्दन परिपूर्ण । जनजनार्दन अभिन्न । हे ज्यासि आकळे खूण । स्वात्मसुख जाण तो लाभे ॥९॥
एका जनार्दना शरण । स्वात्मसुख ग्रंथ संपूर्ण । आत्महितार्थ केला जाण । श्रवणमात्रे सुख होय ॥५१०॥
इति श्रीस्वात्मसुख । ग्रंथ संपतें पीयूष । श्रोते वक्ते एकमुख । सदा संतुष्ट होतू ॥५११॥

उपाधौ यथा भेदता सन्मणीनां । तथा भेदता
बुद्धिभेदेषु तेऽपि । यथा चंद्रिकाणां जले चंचलत्वं
तथा चंचलत्वं तवापीह विष्णो ॥१४॥
इति श्री एकनाथ महाराजकृत
स्वात्मसुख समाप्त

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref: transliteral 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *