परमपूज्य महादेवी आईसाहेब

परमपूज्य महादेवी आईसाहेब “धन्य तोचि देश जेथे संतवास” ” जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” असे संत महात्मे हे भक्त व भगवंत यांच्यामधील दुवा आहेत. संतांनी स्वानुभवातून भगवंताच्या भक्तीची महती जनमानसापर्यंत पोहोचविली. “संता पायी माथा धरिता सदभावे! तेणे भेटे देव आपें आप!! “अशा महान संतांची परंपरा अखंड भारत देशास लाभली आहे. संतांच्या परंपरेत स्त्री संतांनीही आपल्या भगवद भक्तीच्या माध्यमातून स्वतःच्या कार्याचा प्रभावी ठसा समाज मनावर उंटविला आहे.अधिकारवाणीने” ताटी उघडा ज्ञानेश्वरा” म्हणत ज्ञानदेवांना उपदेश करणारी मुक्ताई असो की “म्हणे नामयाची दासी जनी” असं म्हणत विठ्ठलाशी अत्यंत जवळीक साधणारी नाते जोडणारी जनाई असो ” मोकलो नी आस झाहले उदास! घेई कान्होपात्रेस हृदया!! अशी आर्त हाक विठ्ठलास देणारी कान्होपात्रा असो या स्त्री संतांच्या चरित्रांनी शेकडो वर्षापासून समाजाला भगवत भक्तीची प्रेरणा दिली आहे. पूज्य महादेवी आईसाहेब यांचं कार्यही वारकरी सांप्रदायाच्या स्त्री संत परंपरेला साजेसच आहे. पूज्य महादेवी आई यांचा जन्म शके. १७५६ श्रावण शुद्ध अष्टमी रोजी झाला. त्यांचे माता-पिता अत्यंत सात्विक होते .महादेवी आईंना शिव विष्णू भक्तीची आवड बालवयापासूनच होती. शके१७७० महादेवी आईंचा विवाह सद्गुरु वीरनाथ महाराज औसेकर यांच्यासोबत झाला .सद्गुरु वीरनाथ महाराज विठ्ठल भक्तीत रममान झालेले थोर सत्पुरुष होते. वीरनाथांचे चिरंजीव मल्लनाथ यांच्या माता रखमाबाई या मल्लनाथांच्या जन्मानंतर एक महिन्यातच निवर्तल्या. लहानग्या मल्लनाथांचा सांभाळ करण्यासाठी म्हणून वीरनाथांनी पू.महादेवी सोबत विवाह केला . यावेळी मल्लनाथांचे वय तीन वर्षाचे होते. महादेवींनी मल्लनाथांचा सख्ख्या आईप्रमाणे सांभाळ केला .वीरनाथांचा महादेवींन सोबत विवाह होऊन फक्त सात वर्षे झाली होती. तोच सद्गुरु वीरनाथांनी देह ठेवला. यावेळी मल्लनाथांचे वय अवघे दहा वर्षाचे होते. अवसेकरांच्या घराण्यातील कृपाप्रसाधिक चक्रीभजन व नाथषष्ठी उत्सवाची सेवा करण्याची जबाबदारी सद्गुरु वीरनाथांनी मल्लनाथांकडे सोपविली. आपल्या या लहानग्या मुलाकडून ही परंपरेची सेवा करून घेण्याचे कर्तव्य पूज्य महादेवी आईकडे आले. आयुष्यातील ४० वर्षे त्यांनी अखंडितपणे ही जबाबदारी सांभाळली. दहा वर्षे वयाच्या मल्लनाथांना चक्रीभजनानंतर करावी लागणारी ज्ञानेश्वरी निरूपणाची सेवा शिकविण्यासाठी पूज्य महादेवीआईंनी आधी स्वतः आप्पाची बाबाराव यांच्याकडून अक्षर ओळख करून घेतली. लेखन वाचन शिकल्यानंतर ज्ञानेश्वरीचे अध्ययन त्या करू लागल्या आणि मल्लनाथांकडून त्यांनी ज्ञानेश्वरी ची निरूपण सेवा त्या काळात करून घेतली. इ.स. 1855 चा हा काळ स्त्रियांनी लेखन वाचन शिकण्यास समाजामध्ये फारसे अनुकूल वातावरण नव्हते. तसेच सद्गुरु वीरनाथांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या पत्नीने लेखन वाचन शिकणे हे सामाजिक दृष्टीने वाटते इतके सोपे नव्हते. परंतु महादेवी आईसाहेबांनी हे कार्य सांप्रदायाची सेवा म्हणून केले. जन्माने लिंगायत म्हणजेच शैव सांप्रदायी असलेल्या वीरनाथांना विठ्ठल भक्ती मुळे त्यांच्या जीवनात पुष्कळसा विरोध सहन करावा लागला होता. अशा परिस्थितीत आता महादेवी आईसाहेबांनी सांप्रदायाची ही जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येणं आणि हे कार्य करणे सोपे निश्चितच नव्हते.परंतु पतीची आज्ञा आणि मल्लनाथांकडून सांप्रदायाची ही सेवा पुढे सुरू ठेवण्यासाठी महादेवीआईनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मल्लनाथांच्या कौटुंबिक जीवनासाठी ही त्या नेहमी आग्रही राहिलेल्या दिसतात. मल्लनाथांचा सुयोग्य अशा वधू सोबत विवाह व्हावा. अवसेकरांच्या पुढील वंशजाकडून विठ्ठल भक्तीची परंपरा पुढे सुरू राहावी यासाठी त्या नित्य कार्यरत होत्या .निजामाच्या राज्यात हैदराबाद येथे झालेल्या नाथषष्ठी उत्सवामध्ये आणि काशी क्षेत्रातील नाथषष्ठी उत्सवात त्या मल्लनाथांसोबत सहभागी झाल्या होत्या .त्या मल्लनाथासोबत पंढरपूरची वारी करत असत. समाजातील अशा काही स्त्रियांना ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना त्या सहाय्य करत असत. आजही त्यांच्या समाधीस अनेक स्त्रिया दर्शनासाठी येऊन आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून नवस करताना दिसतात .संतान प्राप्तीनंतर त्यांच्या समाधीस वस्त्र पाळणा अशा काही सेवा या स्त्रियांकडून अर्पण केल्या जातात. मल्लनाथ महाराजांची आपल्या मातेवरती खूप श्रध्दा होती .महादेवीआईनी आपण केव्हा देह ठेवणार याची कल्पना एक वर्षे आधीच मल्लनाथांना दिली होती. महादेवीआईनी देह ठेवल्यानंतर स. मल्लनाथांनी त्यांची समाधी म्हणजेच “तुळशीवृंदावन ” नाथ मंदिर, औसा(लातुर) येथे स्थापन केले आणि आपण देह ठेवल्यानंतर आपली समाधी आपल्या मातेच्या समाधीसमोरच स्थापन करावी अशा प्रकारची सूचना मल्लनाथांनी आपल्या जवळील व्यक्तींना देऊन ठेवली होती .सांप्रदायाच्या सेवेसाठी वीरनाथांना दिलेला शब्द महादेविआईनी जीवनभर सांभाला आणि अवसेकरांची ही परंपरा पुढे प्रवाहित ठेवण्यामधील खूप मोठा दुवा होऊन त्यांनी कार्य केले.   स.मल्लनाथ महाराज यांनी पु.महादेवीआईनसाठी केलेली आरती…. आरती गुरुमाईला !माझ्या मातोश्रीला! स्थान सतरावी पाजविला !पालख चैतन्यीं निजविला !! धृ !! अनुहात खेळण! दिलें बाळालागून! ते नादें लुब्धणे! विसरला देहाभिमान !!१ !! निज तेजें प्रकाशांत! अखंड रमत! पतिवृत्ता पूर्ण भरीत मल्ला पायीं लोळत !! २ !!
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या