संत नामदेव

संत नामदेव गाथा बालक्रीडा

संत नामदेव गाथा बालक्रीडा अभंग १ ते १८३

श्रीकृष्णमाहात्म्य

१.
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥
तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥
चौदा विद्या तुझे कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रूणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनी भुललें मन माझें ॥६॥
भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसें ॥७॥
नामा ह्मणे आतां देईं मज स्फूर्ती । वर्णितसें कीर्ति कृष्णजीची ॥८॥

२.
सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुलती तुजलार्गीं ॥१॥
लाडकें लडिवाळ मागतसें तूज । वंदीन हे रज चरणींचे ॥२॥
त्वरें येवोनिय मस्तकीं ठेवीं हात । जाईल ही आंत तेव्हां माझी ॥३॥
आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करीं फजितीं जनामध्यें ॥४॥
विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ति । आवडीचा ओतीं रस यातें ॥५॥
ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ॥६॥

३.
प्रर्‍हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले ॥१॥
दालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शूक नमीयले ॥२॥
रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन याजलागीं ॥३॥
टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा नि-रतंर कृपा मज ॥४॥
साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णींन स-मस्त कृष्णलीला ॥५॥
नामा मनीं आठवी खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥६॥

४.
देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी ॥१॥
ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥३॥
योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेव जगद्नुरु ॥४॥
निर्गुण निर्विकार नाहीं तुज माया । ऐकें वासुदेवा कानडिया ॥५॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐकें वासुदेवा राया गोजरीया ॥६॥
नामा म्हणे जरी दाखविशील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥

५.
क्षीरसागरांत अससी बैसला । धांवोनी मजला भेटी देईं ॥१॥
कैलासासी शीव पूजितसे तुजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥२॥
शेषावरी जरी अससी निजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥३॥
गहिंवरोनि नामा बाहात विठ्ठाला । धांवोनी मजला भेटी देईं ॥४॥

६.
चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । बालें मजप्रती तैसें आतां ॥१॥
चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैसें आतां ॥२॥
वत्स न देखतां गाई हुंबरती । झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनवेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैसें आतां ॥४॥
नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसें खंती फार तुझी ॥५॥

७.
काय माझा आतां पाहातोसी अंत । येईं बा धांवत देवराया ॥१॥
माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येईं बा धांवत देवराया ॥२॥
असे जरी काम भेटूनियां जात । येईं बा धांवत देवराया ॥३॥
येरे देवा आतां नामा तुज बाहात । येईं बा धांवत देवराया ॥४॥

८.
न वर्णवे जन्ममरणाचें दु:ख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥१॥
कुरळिया केश भाळीं शोभे टिळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥२॥
भोवया व्यंकटा शोभती सुरेख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥३॥
कमलाकार नेत्र सुंदर नासीक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥४॥
कर्णींचीं कुंडलें न वर्णवे हाटक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥५॥
आधार आरक्त दंत इंदुहूनि अधिक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥६॥
विष्णुदास नामा तुझेंचि बाळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥७॥

९.
बाहूबळें तुवां काढिलें अमृत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥१॥ जननी माझी जेव्हां ज्याकडे बाहत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥२॥ देवा बैसवोनि शुद्ध तें वाढीत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥३॥ क्षीराचा सागर उपमन्यूशी देत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥४॥ घेवोनियां चक्र परिक्षिता रक्षीत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥५॥ कवटाळूनि धरिलें ध्रुवासी वनांत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥६॥ विदुराच्या घरीं कण्या सांभाळीत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥७॥ चिरंजीव करूनियां नगरी सुवर्ण देत । ठेवीं बा तो हात शिरा-
चरी ॥८॥ नामा म्हणे युद्धीं रक्षियेला पार्थ । ठेवीं बा तो हात शिरावरी ९

१०.
रुणझुण पायीं वाजताती वाळे । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥१॥
जनक्र याचे घरीं चाळूनियां गेलें । दावीं तीं पा-उलें दयानिधी ॥२॥
गजा धरिलें नक्रें तेव्हां जे धांवले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥३॥
वस्त्रहरणीं ज्यातें द्रौपदीनें चिंतिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥४॥
देखोनियां ज्यातें कौरव भ्याले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥५॥
धर्म आणि भीष्म विदुरादिक धाले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥६॥
स्वयंवराशी जातां शीळे उद्धरिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥७॥
नामा म्हणे ज्यातें बळीनें पूजिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥८॥

११.
अडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां
येईं आतां ॥१॥ बैसावयासाठीं घेऊं नको घोडा । धांवत दुडदुडां
येईं आतां ॥२॥ भोजना बैसलासी येथें घेईं विडा । धांवत दुडदुडां
येईं आतां ॥३॥ बाहुबळें काढिला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडां
येईं आतां ॥४॥ कृपाळु बहुत लक्ष्मीचा जोडा । त्याला बाहतसे वेडा नामदेव ॥५॥

१२.
येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव ॥१॥
ज्याचे पायीं असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥
जनीं पुसे सुखी रखुमाईचा जोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥३॥
यावयासी येथें आळस तुह्मी सोडा । घेईन इडा-पिडा नामा म्हणे ॥४॥

१३.
युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहातोसी काय अंत माझा ॥१॥
कोमळ ह्लदय तुझें पंढरीच्या राया । कठिण सखया कैसें झालें ॥२॥
विचारिलें चित्तीं दुर्लभ हरिहरा । जाऊं कैसा घरा रंका-चीया ॥३॥
अंगिकारावरी अव्हेराची मात । नव्हे हें उचित देव-राया ॥४॥
मागें जे कां आळी केली वासुदेवा । उदारा केशवा पुर-विला ॥५॥
नुपेक्षिसी आतां भरंवसा चित्तास । आशेची निरास झाली दिसे ॥६॥
वांचोनियां दु:ख भोगावें म्यां आताम । प्राणासी मुक्तता हेंचि भलें ॥७॥
वर्णितां नामा झाला समाधिस्थ । जहालें विदित पांडुरंगा ॥८॥

१४.
त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नाम-देवा ॥१॥
रुसलासे नामा देवासी न बोले । करें कुर्वाळिलें वदन तेव्हां ॥२॥
समजावूनि देवें धरिला पोटीसीं । बोलें मजपाशीं नामदेवा ॥३॥
नामा ह्मणे देवा उशीर कां केला । किंवा माझा आला तुला राग ॥४॥

१५.
वेळोवेळां तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥
मागें बहुतांनीं केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलों ॥२॥
माथां ठेऊनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णिरे प्रताप नामदेव ॥३॥

१६.
करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥
कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥
भागीरथी स्नाना श्रम लागे फार । करावें एकग्न मन येथें ॥३॥
नामा ह्मणे ऐसें बोले भागवत । शुक सांगवते परीक्षिती ॥४॥

१७.
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झालें ओझें त्यांचें ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्यां भेणें ॥३॥
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोस-वेना भार मज आतां ॥५॥
ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥६॥
नामा म्हणे आताम करितील स्तुती । सावधान चित्तीं परिसावें ॥७॥

१८.
वासुदेवा हषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥
पद्मनाम त्रिलोकेशा वामना शेषशायी । आह्माम कोणी नाहीं तुजवीण ॥२॥
जनार्दना हरि श्रीवत्स गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आह्मां ॥३॥
वराहा पुंडरीका नृसिंह नरां-तका । वैकुंठनायका देवराया ॥४॥
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देईं आम्हां ॥५॥
नारायणा देवाध्यक्षा कैठभमंजना । करींरे मर्दना दुष्टाचिया ॥६॥
चक्रगदाशंखपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥
रामा हयग्रीवा भीष्मा रौद्रा मेवाद्भवा । आश्रय भूतां सर्वां तुझा असे ॥८॥
श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ:शामा । लेंकुरें आम्ही आम्हाम पाव त्वरें ॥९॥
नामा म्हणे ऐसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥

१९.
आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करूं नका ॥१॥
देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥
उतरीला भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांशी करील तो ॥३॥
रोहोणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हारे तुम्ही ॥४॥
ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥

२०.
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें बिव्न झालें. ऐका ॥१॥
आकाशींची वानी सांगतसे कंसा । मानी हा भरंवसा बोलण्याचा ॥२॥
आठवा इचा पुत्र वधील तुजशी । ऐकोनी मानसीं क्रोधावला ॥३॥
घेऊनियां खड्‍ग माराया धांवला । हात तो धरीला वसुदेवें ॥४॥
देईन मी पुत्र सत्य माझें मानीं । ठेवा बंदीखानीं दूता सांगे ॥५॥
पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांशी ठेवूं नको ॥६॥
होतांची प्रसूत नेऊनियां देत । साहाही मारीत दुराचारी ॥७॥
धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बालक नामा म्हणे ॥८॥

२१.
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहिणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राह्मण राहिले अरण्यांत ॥३॥
नाहीं कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टांसी कोण आतां ॥४॥
विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभूतींची ॥५॥
अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा ह्मणे ॥६॥

२२.
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचें ह्लदय जळतसे ॥१॥
हरणें पळती देखोनियां । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥
अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥
जेवि-तां बोलतां शेजे शीणें निज । आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आतां दैत्याचें तें बंड । फाटलीसे गांड तेव्हां त्यांची ॥५॥
नामा ह्मणे भय लागलेंसे ध्यान । चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥

२३.
विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
साहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणा-प्रती अंत तुझा ॥३॥
अठराजण तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघां जणां तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आह्मांसाठीं ॥५॥
अठयांशीं सहस्र वर्णिताती तुज । ब्रह्मां-डाचें बीज तुज नमो ॥६॥
जन्ममरणाचें नाही तया भय । आठविती पाय तुझे जे कां ॥७॥
नवजणी तुझ्या पायीं लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥८॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासी ॥९॥

२४.
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थडया ॥१॥
भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सक-ळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्त-स्वरें ॥३॥
मंदमंद मेघ गर्जंना करीती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदानें ॥५॥

२५.
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥
वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्ष-पाळां ॥३॥
नवग्रह अनुकूळ सर्वांचें जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा हा वंश तयासी आनंद । माझे कुळीं गोविंद अवतरला ॥५॥
अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमीं । नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥

२६.
कोटिशा आदित्य गोठे एके ठायीं । तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥
घाबरा होवोनी वसुदेव पाहे । ह्लदयीं आश्चर्य करी-तसे ॥२॥
मुकुटावरी रत्न नक्षत्रांचा मेळा । भाळीं शोभे टिळा केश-राचा ॥३॥
व्यंकटा भृकुटी कमलाकार नेत्र । नासीक विचित्र शुक-चंचू ॥४॥
विद्युल्लते ऐसी झळकती कुंडलें । अधर कोंवळे अरुणोदय ॥५॥
कंबुग्रीव कंठ ह्लदयीं वत्सलांच्छन । ब्रह्मयाची सीण न कळे अंत ॥६॥
चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघ:श्याम वर्ण ज्याचा ॥७॥
कौस्तुभ निर्भळ वैजयंती माळा । कासे सोनसळा हाटवर्ण ॥८॥
रुणझुण रुणझुण वाजताती वाळे । आरक्त वर्तुळ नखीं शोभा ॥९॥
ध्व-जवज्रांकुश जैसीं रातोत्पळें । नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥

२७.
अयुत गायी ब्राह्मणासी । सोडी संकल्प मान सें ॥१॥
ओळखिलें तुज । आतां कळलासी मज ॥२॥
धर्म स्था-पावया । येथें येसी देवराया ॥३॥
आलिंगितां दोहीं बाहीं । नामा म्हणे डोई पायीं ॥४॥

२८.
सोडीं सोडीं मिठीं । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वासुदेव चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥
नामा ह्मणे आलें हासें । देव तेव्हां सांगतसे ॥४॥

२९.
नंदाच्या घराला । मज नेईं गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथें । ठेवीं मज आगीं येथें ॥२॥
म्हणसी असे रक्षपाळ । ते म्यां मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा ह्मणे माझा बाप ॥४॥

३०.
उचलिला कमळापती । पायींचीं बंधनें गळती ॥१॥
त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडें उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरीं छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लविला अंगुष्ट ॥५॥
त्वरें आला नंदाघरीं । निद्रिस्थ त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥
रडे माया करी आक्रांत । नामा ह्मणे उठवी दूत ॥८॥

३१.
पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥
इच्छामात्रें करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचें ॥२॥
नंदाचें सुकृत झालें अगणीत । म्हणोनी भगवंत आला तेथें ॥३॥
सर्वां होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥

३२.
तांतडीनें जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥२॥
त्वरें धांव घाली । पाहे कन्या उप­-जली ॥३॥
ज्याचा धोका तूज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥
मारायाशीं खड्‍ग घाली । हातिंची सुटूनियां गेली ॥५॥
तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥
सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समा-धान ॥७॥
नामा ह्मणे तयेवेळीं ॥ त्यांचीं बंधनें काढिलीं ॥८॥

३३.
बोलावूनी अवघींयातें । कंस पाहे विचारातें ॥१॥
कोणीएक रे बोलती । आह्मां ठावी देववस्ती ॥२॥
जेथें पुराण कीर्तन गाईब्राह्मण करिती यज्ञ ॥३॥
तेथें असे नारायण । वधूं तयासी जाऊन ॥४॥
वैरी सहजची मरेल । ऐसे बोलताती बोल ॥५॥
कंसा मानवलें जाण । करा मजसाठीं यत्न ॥६॥
नामयाच्या छंदें । नंद करितो आनंद ॥७॥

३४.
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवण करितां तृप्ति नाहीं तुज ॥१॥
माया जातां मथुरे सावध निद्रिस्थ । देखिला भग-चंत्त यशोदेनें ॥२॥
अनंत ब्रह्मांडे उदरीं न कळे कोणाला । वाज-विती थाळा जन्मकाळीं ॥३॥
यज्ञमोक्ता कृष्ण त्यासी देता बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥
गौळणी वाहाती नंदालागीं तेव्हां । पुत्रमुख पाहा नामा ह्मणे ॥५॥

३५.
विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥
तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं । य-शोदा जननी म्हणताती ॥२॥
वेडावला शेष शिणले वेद चारी । निजे मांडीवरी यशोदेच्या ॥३॥
शरणागता देत क्षीरसिंधु जाण । चोखी-तसे स्तन आवडीनें ॥४॥
त्रैलोक्याचा राजा वर्णूं काय रंक । ऐकावें जातक नामा ह्मणे ॥५॥

३६.
करुनियां स्नान । वस्रें घेतलीं नूतन ॥१॥
पाचारा ब्राह्मण । श्रृगारावें देवसदन ॥२॥
बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगां आणा पोथी ॥३॥
त्वरें बाहारे ज्योतिषी । नंद करी जातकासी ॥४॥
केलें देवतार्चन । द्विज सांगती तर्पण ॥५॥
फार त्याला मुख । पाहे कृष्णाजीचें मुख ॥६॥
करी पुण्याहवाचनें । नामा ह्मणे आनंदानें ॥७॥

३७.
आला जगदीश्वर । त्याचेम भरलें भांडार ॥१॥
सुशो-भित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥२॥
तिळ तांदूळ पर्वत । द्रव्यें वांटी अगणित ॥३॥
एक जाती एक येती । ओझें उचलितां कुंथती ॥४॥
भाट वर्णिताती । नामा ह्मणे ज्याची कीर्ति ॥५॥

३८.
तुतारे भोंवारें वाजंत्रें वाजती । अप्सरा नाचती थैयथैय ॥१॥
झणण झणण झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥२॥
सुरवर येत विमानाची दाटी । करिती पुष्पवृष्टि देवावरी ॥३॥
नारद तुंबर किन्नर गंधर्व । व्योमीं गाती सर्व सप्त-स्वरीं ॥४॥
कीर्तनाचा घोष नामाचा गजर । मृदंग सुस्वर वाजताती ॥५॥
केशरी गंधाचे टिळक लावी भाळा । घाली पुष्पमाळा द्विजांकंठीं ॥६॥
घरोघरीं नंद धादी शर्करेशी । वस्त्रें सुह्लदांसी नांआ ह्मणे ॥७॥

३९.
ब्राह्मण आशिर्वाद देती । नंदा पुसोनि निघती ॥१॥
चलाचला म्हणती लोक । पाहूं नंदाचें बालक ॥२॥
नरनारी हो अलं-कार । शृंगारिलें सर्वपूर ॥३॥
दैन्य दारिद्र अपेश । पळती मानू-नियां त्रास ॥४॥
आणिताती बाळलेण । स्त्रिया पाहताती कृष्ण ॥५॥
नामा ह्मणे पाहतां मुख । देहभाव जाय सकळीक ॥६॥

४०.
पाटावरी बैसविती । गोपी अक्षवाणें करिती ॥१॥
ब्रह्मादिक न देखती माथा । त्यासीं लविती अक्षता ॥२॥
नव्हे प्राकृत बाळक । परस्परें म्हणती लोक ॥३॥
ध्वज वज्रांकुश चिन्हा । आला वैकुंठींचा राणा ॥४॥
येती वेळोवेळां । नामा ह्मणे पाहाती डोळां ॥५॥

४१.
द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥१॥
तेथें भेटे वसुदेव । पुसे सुखी आहां सर्व ॥२॥
कंसावे मानसीं । घात इच्छी गोकुळासी ॥३॥
जांई जांई त्वरित । होती गोकुळीं आघात ॥४॥
नामा ह्मणे ऐसें सांगे । नंद तेथुनिया निघे ॥५॥

४२.
कंसें पाठविली मायावी पूतना । देवोनिया स्तना बाळें मारी ॥१॥
दीन दुर्बळांचीं मारीत बाळकें । करीताती शोक माय- बाप ॥२॥
गहिंवरोनि तेव्हां पुसे परीक्षिती । भगवंताची मूर्ती बा-ळरूप ॥३॥
अभय देतसे बापा नको रडूं । तें काय घुंगर्डू मारूं शके ॥४॥
जेथें पुराण कीर्तन होत नामघोष । तेथें यम त्रास घेत असे ॥५॥
पळती तेथूनि असुरादिक वैरी । तेथें नाहीं थोरी पाप तापा ॥६॥
नामा ह्मणे आलीए नंदाचिये घरीं । स्वरूप सुंदरीं देवांगना ॥७॥

४३.
कृष्णा लविवसे स्तनीं । तिसी मारी चक्रपाणी ॥१॥
भयाभीत पडे प्रेत । जन विस्मय करीत ॥२॥
रडे तेव्हां माया । वांचलासी बा तान्हया ॥३॥
मिळोनियां समस्त । भाळीं आंगारा लावीत ॥४॥
वसुदेवें सांगितलें । नंद ह्मणे तैसें झालें ॥५॥
कुर्‍हादी आणिती । गात्रें निकुरें तोडिती ॥६॥
नामा ह्मणे दिला अग्नी । वास न माये गगनीं ॥७॥

४४.
पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे ॥१॥
नंदें उत्साहासीं केलें तेव्हां फार । दिधलें अपार द्रव्य द्विजां ॥२॥
यशोदा घेतसे देवासें चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥३॥
चोंगईचा मुका घेताती गौळणी । हांसे चक्रपाणी आनं-दानें ॥४॥
नामयाचा स्वामी मंद मंद हांसे । यशोदा करितसे निंबलोण ॥५॥

४५.
करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन ॥१॥
भोजन करिती । कोणी देवा खेळविती ॥२॥
डोळे झांकीत श्रीपती । दवी निद्नेची आकृती ॥३॥
बहुत खेळलासे खेळा । आतां निजवागे बाळा ॥४॥
वस्त्रें घालुनी शकटातळीं । निजविती वनमाळी ॥५॥
क्षणक्षण निजला देव । रडे उठे वासुदेव ॥६॥
मुलालागीं ह्मणे तेव्हां ।माझा कान्होबा खेळवा ॥७॥
रागेंरागें झाडी लात । गाडा मोडोनी पाडीत ॥८॥
नामा ह्मणे वाटी धन । नंद वांचला नंदन ॥९॥

४६.
मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥
तूंची माझ प्राण तूं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥
गणगोत भाऊ तूंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥
तूंचि माझा धनी तूंची माझें जीवन । चुंबीत वदन वेळोवेळां ॥४॥
नामा म्हणे भार घाली मांदीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥५॥

४७.
कंसें पाठविला आला तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापि-येलें ॥१॥
दुष्टबुद्धि तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठीं देवें ॥२॥
यशोदा पाहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवून शोक करी ॥३॥
गौळणींचा मेळा मिळाला समस्त । कोणी कृष्णनाथ नेला सयें ॥४॥
न लगे घरदार बुडाला संसार । दावा गे श्रीधर तान्हें माझें ॥५॥
ठावें असतें ऐसें बांधित्यें पोटासीं । कोठेम गुंतलासी बाळा माझ्या ॥६॥
धांवा गे धांवण्या पाहा गे लेंकरूं । शोक अनिवारू करीतसे ॥७॥
शिणल्या भागल्या येतों तुह्यां घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा ॥८॥
सांडूं पाहे प्राण यशोदा सुंदरी । हंबरडा मारी वत्सालागीं ॥९॥
चेपोनी नरडें गतप्राण केला । भूमीसीं पाडिला दैत्य तेव्हां ॥१०॥
नामा ह्मणे वरी खेळत गोविंद । पाहोनी आनंद सकळांसी ॥११॥

४८.
आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं ॥१॥
नंदें गर्गातें देखिलें । पूजा स्तवनीं तोषविलें ॥२॥
भूतभविष्यवर्तमान । तुह्मां कळती हो संपूर्ण ॥३॥
पाहा सामुद्रिक लक्षण । याचें कांहीं सांगा चिन्ह ॥४॥
बोले तेव्हां तो नंदाशीं । झणीं कळेल कंसासी ॥५॥
रोहिणीनंदादि वैसती । ऐकावया जातक चित्तीं ॥६॥
घालू-नियां मंगलस्नान । आरंभीं पुण्याहवाचन ॥७॥
ऐसी वदे शुकवाणी । नामा ह्मणे ऐका कानीं ॥८॥

४९.
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥
राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥
द्वादश गांव अग्नि करील प्राशन । वांचतील प्राण सकळांचे ॥३॥
चोरोनियां गाइ नेईल सौंगडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥४॥
उचलील हा पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रें ॥५॥
समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्भुत करील हा ॥६॥
सोळा सहस्र शत अष्ट नायिका । करील बाईका तुझा कृष्ण ॥७॥
त्रैलोक्यांत हाची उदाराचा राणा । देईल ब्राह्मण हेमपुरी ॥८॥
सांगुनिया ऐसें आशीर्वाद देऊनि । नामा म्हणे. मुनि जाता झाला ॥९॥

५०.
परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥
दुडदुडा पळती मुखीं लावी माती । शेणांत लोळती दोघे-जण ॥२॥
नंदाच्या पुढील ओढीताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥३॥
कटीं कडदोरा वांकी घुंघुरवाळा । पिंपळपान भाळा शोभतसे ॥४॥
देवातें झोंकिती वर्जिल्या रडती । घडोघडीं येती बिदीमाजीं ॥५॥
वत्साचिये पुच्छें बळें ओढिताती । सोडी न सो-डिती दोघेजण ॥६॥
विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पाहावया ॥७॥

५१.
मृगाचिये श्रृंगें धरोनी नाचती । जन हांसताती खद-खदां ॥१॥
भोजना बैसती घांस घेती हातीं । मांजरें देखती दुरो-निया ॥२॥
गळां त्यांच्या तेव्हां धरी मेघ:श्याम । पुच्छ बळिराम ओढीतसे ॥३॥
यशोदा धांवत खदखदां हांसत । गौळणी समस्त पाहताती ॥४॥
पुसतांची मामा चोंगई दाविती । मर्कटाचे धरिती दोन्ही कान ॥५॥
रोहीणी ह्मणे डसतील बाळा । किती म्यां याजला सांभाळावें ॥६॥
पाणी उडविती प्रतिबिंब पाहाती । गोरस सांडिती भू-मीवरी ॥७॥
नामा ह्मणे स्वामे सर्वांचा जो साक्षी । धरितसे पक्षी चुकवुनी ॥८॥

५२.
मुतूनिया हायें भूमी सारविती । पोटासी पुसती दोघे-जण ॥१॥
घेऊनियां काष्ट घाशिताती दांत । वाकुल्या दावीत नंदा- लागीं ॥२॥
जेवितां जेवितां बाहेर पळती । श्वानासी बाहाती यूयू करुनी ॥३॥
तयापुढें दोघे ठेवूनियां वाटी । घालिताती मिठी गळां त्याच्या ॥४॥
देखोनियां जन खदखदां । हांसती । येशोदे सांगती कौतु-कानें ॥५॥
भिंती धरूनियां उभे राहाताती । आधार जगतीं ज्यांच्या असे ॥६॥
उभयतां जाती बिदीं खेळावया । कुरवंडी काया नामयाची ॥७॥

५३.
मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥
गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ॥२॥
न पुरेची हात दूध शिंक्यावरी । करावें मुरारी कैसें येथें ॥३॥
पाटावरी रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहो-रीनें ॥४॥
बडवोनी टिरी नाचतसे पेंदा । भलीले गोविंदा युक्ती केली ॥५॥
उदलाले बेत्या कलूं नको नलबला । थांबालीलो गोळा लेनियाचा ॥६॥
कोणी पिती दूध कोणी खाती दहीं । आली लव-लाही गौळण ते ॥७॥
अहर्निशीं धराया पहातें मी तुज । जासी कैसा आज चोरटीया ॥८॥
मुख्रींहूनि पय टाकी तिच्या डोळां । नामा ह्मणे पळा सांगतसे ॥९॥

५४.
गार्‍हाणें सांगाया । आल्या गोकुळींच्या स्रिया ॥१॥
यशोदा ऐकत । पळे बाहेरी भगवंत ॥२॥
एक ह्मणे लोणी । माझें भक्षी चक्रपाणी ॥३॥
फोडितसे भांडे । विर्जिलिया ह्मणे रांडे ॥४॥
गाई वासरें सोडितो । येऊन आह्मांसी सांगतो ॥५॥
अष्टदळ का-ढिलें अंगणीं । वरी मुते चक्रपाणी ॥६॥
घेऊनियां आला अग्न । तुझ्या घरासी लावीन ॥७॥
देईन मी तोंडावर । तुझ्या बापाचें हे घर ॥८॥
घेतसे वरखडे । शिण्या देऊनियां रडे ॥९॥
एकी ह्मणे गरोदर । पाहूं तुह्मा गे डोंगर ॥१०॥
सांगती गौळणी । यशोदा तें ऐके कानीं ॥११॥
नामा ह्मणे न मनी देव । माय ह्मणे अवघी वाव ॥१२॥

५५.
एक ह्मणे धरी स्तन । याचे उपटीन कान ॥१॥
यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांहीं सांग ॥२॥
अंधारीं लपत । पोरें करिती आकांत ॥३॥
सांगतसों शिकवणा । खोडी नको करूं कृष्णा ॥४॥
तोंड करूनि वांकडें । मला ह्मणे तशीच रडे ॥५॥
पोरां शिकवीत । गोरस आणारे समस्त ॥६॥
आह्मी निजलों समस्त । काजळ मुखासी लावीत ॥७॥
मेले आणूनियां सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥८॥
योगियांचें नये लक्षा । त्यासी लावूं ह्मणती शिक्षा ॥९॥
अनंत गार्‍हाणीं । नामा ह्मणे कीर्ति वानीं ॥१०॥

५६.
मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥
लांकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥
भावा भुललासे खरा । कांपतसे थरथरा ॥३॥
मुख दावीं उघडोनी । पाहें ह्मणे चक्रपाणी ॥४॥
ब्रह्मांडें देखिलीं । नामा ह्मणे वेडी झाली ॥५॥

५७.
यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥
घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥
दूध जातसे उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥
मंथन पात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥
मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥
हातीं न लगे जगजेठी । नामा ह्मणे होय कष्टी ॥६॥

५८.
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥
धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥
दावें सोडूनियां । बांधि-तसे देवराया ॥३॥
फार करितोसी खोडया । गोपी दाविती वांकु-डया ॥४॥
दावीं अनंत लावीत । दोन बोटें उणें येत ॥५॥
करि-ताती चोज । परी नव्हेचि उमज ॥६॥
श्रमतसे वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥
विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभीं झाडें ॥८॥

५९.
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥
विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥
अनंत अवतार घेसी भक्तां-साठीं । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥३॥
यज्ञेशा सर्वेशा दयानिधि ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥
धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आह्मांकडे ॥५॥
जोडोनियां हात करिती विनंति । देईं तुझी भक्ति जन्मोजन्मीं ॥६॥
करूनि नमस्कार हळू-हळू चालती । वेळोवेळां पाहाती कृष्णाकडे ॥७॥
मोडतांचि वक्ष नाद ऐकूनियां येती । धांवोनि पहाती नामा ह्मणे ॥८॥

६०.
समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां ॥१॥
वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासीं लागती कान्होबाच्या ॥२॥
यशोदेचे मनीं झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥३॥
नामा ह्मणे तिशीं घालितसे घाला । अपराध तिजला काय असे ॥४॥

६१.
नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासूं देगे याशी दहीं दूध ॥१॥
मजला लेंकरें नाहींत गे फार । विश्रांतीसी घर एवढें आहे ॥२॥
निवारिलें विघ्न देवें हें केवढें । पडती जरी झाडें याजवरी ॥३॥
आजपासूनि यासी बोलसी कठीण । देईंन मी प्राण तुजवरी ॥४॥
स्फुंदस्फुंद रडे तेव्हां नारायण । देईं यासी स्तन भुकेलासे ॥५॥
यशोदा बाहात नये वनमाळी । धांवोनि कुरवाळी वदन त्याचें ॥६॥
समजावोनि देवा पाजितसे स्तन । घालीत भोजन नामा ह्मणे ॥७॥

६२.
गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥
वृद्ध ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥२॥
समस्तां मानला तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हां ॥३॥
अहिर्निशीं देवा करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पैं ॥४॥

६३.
विचारित हो श्रीपती । जे म्याम जावें वनाप्रती ॥१॥
राखावया गायी । भार उतरावया मही ॥२॥
एके दिनीं सायंकाळीं । नंदा पुसे वनमाळी ॥३॥
उद्या जाईन मी राना । घेऊनियां जी गोधना ॥४॥
बुद्धीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥५॥

६४.
प्रात: काळीं मुलें येताती सकळ । उठवीं गोपाळ ह्मण-ताती ॥१॥
आळस देवोनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडी-तसे ॥२॥
देऊनियां स्तना काकुळती येत । सांभाळा भगवंत वना-मध्यें ॥३॥
जवळींच खेळा जाऊं नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥४॥
होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभा-ळावें ॥५॥
आसनीं शयनीं भोजनीं जतन करा । नामया दातार केशिराजा ॥६॥

६५.
चालियेलं तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥
वत्साचिया वेषें वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥
पाहोनियां ऐसें तयासी मारिलें । झोंकोनियां दिल्हें आकाशातें ॥३॥
चला आतां जेवूं बसूं एके ठायीं । काढारे लव-लाही शिदोरीया ॥४॥
गोपाळ मिळोनी आनंदें जेविले । ब्रह्मरस धाले कृष्णासंगें ॥५॥
उदक प्राशन करावया आले । बकानें देखिलें कृष्णजीला ॥६॥
दुष्टबुद्धि तेव्हां देवासी गिळीत । ह्लदय जळत उगळीला ॥७॥
धरूनियां हातें उभाची चिरीला । आनंद देवाला न समाये ॥८॥
नामा ह्मणे आले घरासी सकळ । सांगताती बाळ वर्तमान ॥९॥

६६.
उठोनी प्रात:काळीं गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥
चला जाऊं आतां पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥
तांतडीनें येती नंदाचिया घरा । मुख दावीं उदारा कृष्णराया ॥३॥
कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभ-ताती ॥४॥
अरुणोदय प्रभा अधरीं दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥
भोंवया व्यंकटा सरळ नासिक । पाहोनियां मुख सुख होय ॥६॥
लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तु-रीचा ॥७॥
वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें निंबलोण ॥८॥

६७.
उठोनियां प्रात:काळीं । देवें मुरली वाजविली ॥१॥
गडी मिळोनी समस्त । घ्यारे शिदोर्‍या सांगात ॥२॥
अलंकार घालिताती दिसे सुशोभित मूर्ति ॥३॥
नामा ह्मणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥४॥

६८.
अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां विलसताती ॥१॥
रक्त पितांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चा-लताती ॥२॥
रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूरपत्रवेंठी शो-भताहे ॥३॥
शिंगें रंगविती देऊनियां रंग । चालती श्रीरंग मागें मागें ॥४॥
चित्तीं सर्वकाळ राहे ऐसें ध्यान । नामा ह्मणे धन्य तो़चिं एक ॥५॥

६९.
शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥
नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥
सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसे । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥
गडियांसी काला वांटीत्त श्रीधर । कौतुक सुरवर पाहताती ॥४॥
नामा ह्मणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥

७०.
कंस धाडी अघासुर । मारी नंदाचा कुमर ॥१॥
एक ओंठ घाली खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥२॥
गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरीं ॥३॥
आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥
क्षणार्धेंची मारी । भक्तजनाचा कैवारी ॥५॥
भेणें गोपाळ पडिले । कृपा दृष्टि अवलेकिले ॥६॥
तेज अद्‍ भुत निघालें । कृष्णमुखीं प्रेवशलें ॥७॥
भक्तासी रक्षीत । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥८॥

७१.
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती ॥१॥
कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥
कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥
कोणी पसरिती चवाळें । कोणी अंथरती जाळें ॥४॥
गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणीती ॥५॥
पाहाताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥
मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥
माया मोही ब्रह्मादिका । नामा ह्मणे तोचि एका ॥८॥

७२.
गौळियांचीं पोरें वांकुल्या दाविती । क्रोधावला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥
चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहूं याचें बळ किती आहे ॥२॥
जाणोनी चित्ती देव हांसतसे । सामर्थ्य पाहातसे पुत्र माझा ॥३॥
ते-थून आणवीं नव्हे हें उचीत । ह्मणोल किंचित पराक्रम ॥४॥
नामा ह्मणे ऐसें विचारिलें चित्तीं । करीतसे श्रीपति काय तेव्हां ॥५॥

७३.
गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती ॥१॥
पूर्ववत सर्व न्यून कांहीं नाहीं । करीत आपाही मनामाजी ॥२॥
इच्छामात्रें करी ब्रह्मांडाच्या कोटी । त्यासी काय गोष्टी अपूर्व हे ॥३॥
सायंकाळीं गेले गोकुळाभीतरीं । आपुलाल्या परी घरीं सर्व ॥४॥
ब्रह्मादिकां ज्याचा नकळेची पार । मानवा विचार न कळे कांहीं ॥५॥
ऐसा हा समर्थ नामयाचा धनी । वंदी पायवणी सदाशीव ॥६॥

७४.
एक संवत्सर जालासे सकळां । पाहावया आला ब्रह्मदेव ॥१॥
पूर्ववत गायी गोपाळ देखिले । आश्चर्य वाटलें तेव्हं त्यासी ॥२॥
ब्रम्हांडांत ब्रह्मा दूजा असे कोण । केलेंसे उत्पन्न याजलागीं ॥३॥
घेवोनियां गोलों तेची आहे येथें । जावोनियां तेथें पाहातसे ॥४॥
भ्रांतीने व्यापीलें तयाचें तें मन । देखतों मी स्वप्न किंवा सत्य ॥५॥
नामा म्हणे एके ठायीं उभा राहे । न्याहाळून पाहे सकळांसी ॥६॥

७५.
चतुर्भुज दिसे शंखचक्र हातीं । मुकूट शोभती सर्वां -लागीं ॥१॥
कर्णीचीं कुंडलें वैजयंती माळा । देखतसे डोळां ब्रह्म-देव ॥२॥
कौस्तुभ ह्लदयीं श्रीवत्सलांछन । बाहूचीं भूषणें पाहातसे ॥३॥
चरणीं तोडर पीत पीतांबर । तेजें दिवाकर लोपतसे ॥४॥
आपादपर्यंत तुळसीच्या माळा । मुद्रिका दयांगुळा रत्नाचिया ॥५॥
केशराचे टिळे नेत्र कमलाकर । दंतीं इंदुकर बैसलेती ॥६॥
कोटी-कृष्ण मूर्ति कोटि ब्रह्में दिसती । स्तवनीं स्तविताती सुरवर ॥७॥
नामा ह्मणे ऐसें दावीत गोविंद । झालासे सावध ब्रह्मा तेव्हां ॥८॥

७६.
ओळखे बापाला । ब्रह्मा धावोनियां आला ॥१॥
नेत्रीं अशूचिया धारा । कांपतसे थरथरा ॥२॥
घाली नमस्कार । ह्मणे अपराधी मी थोर ॥३॥
जोडोनियां हात । नामा ह्मणे स्तुति गात ॥४॥

७७.
श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥
धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधूं ॥२॥
आपण तरेल नव्हे हें नवल । कुळें उद्धरील सप्तही तो ॥३॥
एकेक अक्षर निर्दळील महा पाप । करा याचा जप शौनक हो ॥४॥
नाम घेतां धांवे अनवाणी पाय । कोमळ ह्लदय कृष्णाजीचें ॥५॥
न विचारितां याति कुळ अमंगळ । न पाहे काळ वेळ धांव घेई ॥६॥
शरणागता नेदी काळाचिये हातीं । नामा ह्मणे चित्तीं दृढ धरा ॥७॥

७८.
जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तयालागीं ॥१॥
तोचि गोकुळांत होउनि गोवळ । म्हणवितो बाळ यशोदेचा ॥२॥
चिन्मय चिद्रुप अक्षई अपार । परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥
सर्वां भूताचे फुटकिये खोळे । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥
आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाहीं ज्याचा ॥५॥
नामा ह्मणे सर्वरूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥

७९.
अवतरले हरी नंदाचे मंदिरीं । जाणोनियां सुरीं तोषि-जेत ॥१॥
आतां गेली सर्व आमची चिंता । भूभार सर्वथा उतरील ॥२॥
यज्ञ दान तप होतील अपार । आमुचा आहार आह्मांलागीं ॥३॥
दुष्ट दुराचारी मातले राक्षस । यांचा करिल नाश क्षणामाजी ॥४॥
नीति न्याय धर्म वाढेल अपार । भाविकांसी पार उतरील ॥५॥

८०.
वाढो लागे हरि नंदाचे मंदिरीं । नाना क्रीडा करी नित्य नवी ॥१॥
देखोनियां चोज भुलल्या नरनारी । देहभावें वरी वोंवाळिती ॥२॥
सांवळें गोजिरें दिसे नेत्रालागीं । ह्मणोनि वोसंगी सदा घेती ॥३॥
नाचे उडे बोले मंजुळ बोबडे । तेणें वेदां पडे मौन्य सदा ॥४॥
नित्य नवी लीला दाखवी अपार । मन तेथें स्थिर लांचावलें ॥५॥
नामा म्हणे गोप त्यासंगें रतले । प्रेमानें मातले एकसरें ॥६॥

८१.
एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र ॥१॥
तेव्हां गोप आले विनविती गोपाळा । आतां जाऊं चला चोरीलागीं ॥२॥
कोठें काय असे तें आम्हां ठाउकें । जाऊं एकमेकें मिळोनियां ॥३॥
तुझिये संगती वाढतो आनंद । दाविसी विनोद ब्रह्मांदिका ॥४॥
नामा ह्मणे ऐसें गोपाळ बोलिले । ऐको-नियां झालें देवा गोड ॥५॥

८२.
देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-नियां ॥१॥
तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥
घ्यारे आतां वरी मृत्तिका गाळुनी । सराटे वेंचुनी वोंटीं भरा ॥३॥
डांगा एक आणा वेंचुनीयां खडे । निघावें रोकडे एकसरा ॥४॥
नामा ह्मणे ऐसें ऐकतां गोपाळ । नाचती सकळ कृष्णापुढें ॥५॥

८३.
मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमों ॥१॥
गुंजाहार गळां मयुरपुच्छे वेंटी । कृपाळु जगजेठी तुज नमों ॥२॥
वनपुष्पमाळा अपाद शोभती । लक्षुमीच्या पति तुज नमों ॥३॥
वेणू वाजविसी गायी त्या चारीसी । न कळे कोणासी तुझी लीला ॥४॥
हातीं तुझ्या कवळ शोभे पीतांबर । चरण सुंदर तुज नमों ॥५॥
घेवोनी अवतार दुष्टांसी मारिसी । भक्तांसी रक्षिसी निरंतर ॥६॥
रावण कुंभकर्ण मारीसी आत्मारामा । सोड विलें आह्मां बंदीहुनी ॥७॥
तुझें मी बालक वेडें अविचारी । नामा ह्मणे करीं कृपा आतां ॥८॥

८४.
भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥२॥
नारायण नारायण करी जो पारायण । तो उद्धरे जाण इहलोकीं ॥३॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवा उद्धरणा नाम स्मरा ॥४॥
अहर्निशी कीर्ति गाती भाविक भोळे । त्यांनीं तुज जिंकिलें ब्रह्मा म्हणे ॥५॥
नामा ह्मणे ऐसें दाविलें सुगम । नलगे तुह्मा नेम नाना कोटी ॥६॥

८५.
कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी ॥१॥
कार्य आणि कारण लटका हा शीण । वर्म न कळोन वांयां गेलें ॥२॥
नामा ह्मणे माझी खेचर माउली । कृपेनें दाविली वाट मज ॥३॥

८६.
धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे ॥१॥
विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनांत । तृणादि समस्त धन्य धन्य ॥२॥
धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । वृक्षादि पाषाण धन्य धन्य ॥३॥
धन्य हें गोकूळ धन्य हे गोपाळ । व्रजवासी सकाळ धन्य धन्य ॥४॥
धन्य ही यथोदा स्तन दे मुकुंदा । धन्य तूंची नंदा त्रैलोक्यांत ॥५॥
ब्रह्मसनातन वेदासी नकळे । तें गडयां-सवें खेळे अरण्यांत ॥६॥
विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता । यथोदेसी माता म्हणतसे ॥७॥
सद्नदित कंठ नेत्रीं जळ वाहे । नामा ह्मणे काय मागतसे ॥८॥

८७.
इतुकें मागतसें तुज । वनीं जन्म देईं मज ॥१॥
सुखें करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥
बहुत शीणलों । आतां तुजपाशीं आलों ॥३॥
न करीं अव्हेर । दास तुझा मी किंकर ॥४॥
ब्रह्मा येतो काकुळती । नामा म्हणे देवाप्रती ॥५॥

८८.
काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला ॥१॥
म्हणसी देईन मी मुक्ति । तरी ऐक रमापति ॥२॥
मारायासी आले । त्यांसी स्वरूपीं मिळविलें ॥३॥
येथोनियां नवजासी । मज कळलें मानसीं ॥४॥
आणोनियां देत । गायी गोपाळ समस्त ॥५॥
घाली पोटामध्यें डोई । क्षमा करीं माझे आई ॥६॥
आज्ञा घेवोनियां येला । नामा म्हणे स्वस्थ झाला ॥७॥

८९.
आनंदें खेळत । राम नडी कृष्णनाथ ॥१॥
गडी ह्म-णती रामा । ताडफळें देई आत्मां ॥२॥
सकळ मिळोनि । आले धेनूकांचे वनीं ॥३॥
वृक्ष खालवोनी । फळें पाडिलीं मेदिनीं ॥४॥
येत धांवोनी असुर । करी तयाचा संहार ॥५॥
भक्तांचा अंकित । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥६॥

९०.
कालिंदीचे डोहीं काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हें ॥१॥
पक्षीश्वापदांनीं सोडियेलें स्थळा । निघताती ज्वाळा तया डोहीं ॥२॥
विषाचियायोगे झाडें जळताती । जीवन न घेती कोणी त्याचें ॥३॥
वैकुंठनायक तया वनीं आला । गोपाळांचा मेळ बरोबरी ॥४॥
हुहुतु हमामा लपंडाई खेळती । देवासी ह्मणती लपें आतां ॥५॥
तृषाक्रांत गाई झाले ते गोपाळ । पिती तेव्हां जळ कालीयाचें ॥६॥
लहानालीं मुलें नाहीं तया ज्ञान । झाले गतप्राण सकळांचे ॥७॥
नामा ह्मणे तेव्हां कृपादृष्टी पाहात । उठवी समस्त गायी गडी ॥८॥

९१.
जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांति तुझी आतां ॥१॥
माझिया लेंकरा दिधलासे त्रास । करीन मी नाश आतां तुझा ॥२॥
त्रैलोक्यांत कोण ऐसा हो समर्थ । माझे शरणा-गत मारील जो ॥३॥
माझिया भक्तां कोण गांजी निर्दय । करीन प्रळय त्याजवरी ॥४॥
स्फुरताती दंड कांपती अधर । उठला सत्वर जगदीश ॥५॥
कळंबाचे वृक्षीं देव चढतसे । पीतांबर गोसे खोंची-यले ॥६॥
जगद्‍गुरु तेव्हां पुष्पमाळा काढी । टाकितसे उडी जळा-मध्यें ॥७॥
नामा ह्मणे शोकें व्यापिलें समस्त । करूनि एकांत मने ऐका ॥८॥

९२.
घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला ॥१॥
गडी रडताती वत्स पळताती । कपाळ पिटिती सकळीक ॥२॥
तुजवांचोनीयां रक्षी कोण आह्मां । काय सांगूं रामा सकळीक ॥३॥
रुसल्या आमुचें करी समाधान । तुजवीण वन ओस वाटे ॥४॥
आम्हांसाठीं तुवां दुष्टासी मारिलें । कोण आतां लळे पुर-वील ॥५॥
तुजवांचोनियां आह्मी सर्व दीन । न जाऊं येथून गोकु-ळासी ॥६॥
वियोगानें तेव्हां पक्षी रडताती । आतां कृष्णमूर्ती कैंची आह्मां ॥७॥
बोलोनियां ऐसें निस्तेज पडती । नदी वाहत होती स्थीरावली ॥८॥
नामा म्हणे होती दुश्चिन्हें बहुत । गोकुळीं समस्त विचारिती ॥९॥

९३.
यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी ॥१॥
उठती तिडका स्तनीं माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळां ॥२॥
जीव तळमळी दाटे माझा प्राण । केव्हां मी पाहीन पाडसासी ॥३॥
गोकुळींचे जन निघाले सकळ । पाहाताती गोपाळ वनामध्यें ॥४॥
कालिंदीच्या तीरीं पडिले सकळ । पाहोनी कोल्हाळ करीताती ॥५॥
कपाळ पिटिती यशोदा रोहिणी । आताम चक्रपाणी कैंचा आम्हां ॥६॥
धांव धांव कृष्णा दावींरे वदना । पाजूं आतां पान्हा कोणालागीं ॥७॥
तुझिया कौतुकें कंठीं मी संसार । जळतें अंतर तुजसाठीं ॥८॥
कोणावरी आतां घालूं अलंकार । बुडालें हें घर माझें आतां ॥९॥
नामा म्हणे शोकें जाऊं पाहे प्राण । सकळाचें जीवन कृष्णनाथ ॥१०॥

९४.
नंद ह्मणे माझें बुडालें जहाज । अभाग्यासी मज कृष्ण कैचा ॥१॥
काय माझें तप संपूर्ण सरलें । ह्मणोनी बुडालें तान्हें माझें ॥२॥
चिंतेनें व्याकूळ पिटी वक्षस्थळा । दावरे सांवळा प्राण माझा ॥३॥
आलिया अतीता त्रासें दवडीलें । ह्मणोनी बुडालें बाळ माझें ॥४॥
प्रात:काळीं पाहूं कोणाचें मी मूख । येथुनियां सुख नाहीं नाहीं ॥५॥
समस्तांची दृष्टी करी तुज कष्टी । ह्मणोनी जगजेठी ठाकियलें ॥६॥
गोकुळींचे जन देऊं पाहाती प्राण । वा-चाया कारण काय आतां ॥७॥
अभय देतसे बळिभद्र सर्वांसी । मारून दुष्टांसी येईल आतां ॥८॥
अंतर्यामीं जाणे जन झाले वेडे । नामा ह्मणे वेढे काढितसे ॥९॥

९५.
तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जग-दीश ॥१॥
त्रैलोक्याचा भार घाली ह्लषीकेशी । दमीत दुष्टासी स्वामी माझा ॥२॥
होतां एक क्षण झाला तेव्हां क्षीण । जाऊं पाहे आण काळीयाचा ॥३॥
तेव्हां त्याच्या स्त्रीया करिताती स्तुती । लक्षुमीच्या पती कृपाळूवा ॥४॥
यज्ञेशा अच्युता गोविंदा माधवा । दयानिधि केशवा कृष्णनाथा ॥५॥
श्रीधरा वामना अगा वासुदेवा । ऐकावी ही देवा विज्ञापना ॥६॥
आह्मांलागीं आतां देईं चुडेदान । धरिती चरण कृष्णजीचे ॥७॥
दीना़चा दयाळ दासाच्या कैवारी । नामा ह्मणे हरि उतरला ॥८॥

९६.
राहूं नका येथें जावें समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिकां ॥१॥
तुझिया मस्तकीं असे माझा चरण । न भक्षी तुज जाण पक्षीराज ॥२॥
दिव्य सुमनाच्या घालिताती माळा । पूजिती सांवळा बाप माझा ॥३॥
अनर्ध्य रत्नांचे देती अलंकार । श्रीमुख सुंदर पहाताती ॥४॥
जांबुनदातटीं घालिती भोजन । निघती तेथून सक-ळिक ॥५॥
आला भगवान आनंदले गडी । उभारिती गुढी जन तेव्हां ॥६॥
काळिया आख्यान स्मरे जो मानसीं । न डंखिती त्यासी सर्पकुळें ॥७॥
अहर्निशीं याचें करी जो पठण । नामा ह्मणे विघ्न नाहीं तेथें ॥८॥

९७.
आला वनमाळी । मग भेटती सकळी ॥१॥
यशोदा रोहिणी । पोटीं धरिती चक्रपाणी ॥२॥
गायी धांवताती । कृष्ण अंगातें चाटिती ॥३॥
उडया मारिताती । गडी आनंदें नाचती ॥४॥
न वर्णवे तो आनंद । नामयाची बुद्धि मंद ॥५॥

९८.
झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्‍भुत हें ॥१॥
निद्रेनें व्यापिलें शौनकारे सर्वां । लागला वणवा तया स्थानीं ॥२॥
गायी पाळताती पक्षी उडताती । पिलीं पडताती कृष्णापुढें ॥३॥
हाहा:कार झाला धांव धांव कृष्णा । वांचवीं रे प्राणा सकळांच्या ॥४॥
तुझीं आह्मी बाळें वाचवींरे आह्मां । धांव धांव रामा ह्मणताती ॥५॥
आक्रोशें रडती मारिताती हांका । वैकुं-ठनायका रक्षीं आह्मां ॥६॥
दीनाच दयाळ मनाचा कोवळा । घाली अभिज्वाळा मुखामाजी ॥७॥
होतां प्रात: काळ सकळ चालिले नामा ह्मणे आले गोकुळांशी ॥८॥

९९.
दुष्ट दुराचारी । गोपाळाचा वेषधारी ॥१॥
दैत्य ओ-ळखिला । रामें प्रलंब मारिला ॥२॥
देव करिती जयजयकार । पुष्पें वर्षती अपार ॥३॥
सूर्य आलासे माध्यान्हा । देवा बाहाती भोजना ॥४॥
नामा ह्मणे पाचारती । गडी एकत्र बैसती ॥५॥

१००.
एके ठायीं करुनी अन्न । हातें वाढी नारायण ॥१॥
हें पाहोनी सुरवर । चित्तीं करिती विचार ॥२॥
धन्य पुण्य गौळीयांचें । आम्हां अन्न मिळे कैचें ॥३॥
एक असे युक्ति । हात धुवील श्रीपति ॥४॥
उच्छिष्टाचे मिषें । देव जळीं झाले मासे ॥५॥
हें कळलें घन-नीळा । सांगतसे हें गोपाळ ॥६॥
चला वृंदावना जाऊं । नामा ह्मणे उदक घेऊं ॥७॥

१०१.
तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ॥१॥
चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ॥२॥
सरस्वती प्रवरे कालिंदी नर्मदे । येईं तुंगभद्रे धां-वोनियां ॥३॥
देवाजीच्या शब्द ऐकोनियां कानीं । येताती धांवोनी नामा म्हणे ॥४॥

१०२.
त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनीं । वेणू चक्रपाणी वाज-वितो ॥१॥
तयावरी गायी टाकिताती माना । बाळें स्तनपाना विसरती ॥२॥
सर्प आणी नाग मुंगूसें बैसती । जळेंही वाहाती विस-रलीं ॥३॥
हस्ती सिंह एके ठावीं बैसताती । भ्रमर भूलती वेणुनादें ॥४॥
विंचरिती वेणी तेथें राहे फणी । करितां भोजनीं ग्रास मुखीं ॥५॥

१०३.
मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती ॥१॥
अरुणोदयीं येती कालिंदीचे तीरीं । गाती त्या सुंदरी कृष्णजीला ॥२॥
सिकतेची मूर्ति करूनि देवीची । पूजाअर्चा तिची करिताती ॥३॥
जोडोनियां कर करिताती स्तवना । ऐकें विझापना आदिमाये ॥४॥
नंदाचा नंदन देईं आह्मां पती । नामा ह्मणे येती स्वस्थळासी ॥५॥

१०४.
कालिंदीचे तीरीं वस्त्रें ठेविताती । जळांत रिघती सक-ळीक ॥१॥
गडयांसमवेत आला तेथें कृष्ण । करावया पूर्ण व्रत त्यांचें ॥२॥
वस्त्रें घेवोनियां चढे वृक्षावरी । घाबरल्या नारी पाहो-नियां ॥३॥
वस्त्रें देईं आतां आमुचीं मुकुंदा । जाउनियां नंदा सांगों आतां ॥४॥
अच्युता अनंता कृष्णा गरुडध्वजा । दासी आह्मी तुझ्या सकळिका ॥५॥
वाजतसे सीत जाऊं पाहे प्राण । यशोदेची आण तुज असे ॥६॥
ऐकोनियां ऐसें नामा ह्मणे हांसे । धर्म सांगतसे तयांलागीं ॥७॥

१०४.
नग्न होवोनियां स्नान जे करिती । त्यांचीं व्रतें होती निरर्थक ॥१॥
त्वरें करूनियां या गे मजपाशीं । सांगतों तुह्मांसी प्रायश्चित ॥२॥
एकी आड एक गुह्यस्थानीं हात । आनंद बहूत मनामध्यें ॥३॥
करा नमस्कार सांगे वनमाळी । एक हस्त भाळीं लविताती ॥४॥
देवां द्बिजां ऐसा करितां नमस्कार । पाप याचें फार धर्मशास्त्रीं ॥५॥
ऐकोनियां ऐसें लाज सोडोनियां । पडताती पायां आदित्याच्या ॥६॥
वस्त्रें देत तेव्हां तयां जगजीवन । मनोरथ पूर्ण करीन मी ॥७॥
नामा ह्मणे येती गोकुळासी नारी । चालिला श्रीहरि तेथुनियां ॥८॥

१०५.
प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी ॥१॥
सोडोनियां गायी चालीले वनासी । गडी ह्लषी-केशी खेळताती ॥२॥
वर्जियलें आम्हां नका घेऊं अन्ना । खावें काय कृष्णा आजी आतां ॥३॥
गडीयांसी सांगे वैकुंठींचा राणा । सांगावें ब्राह्मणा जावोनियां ॥४॥
वनीं उपवासी आहे रामकृष्ण । द्यावें त्यासी अन्न कृपा करोनी ॥५॥
गोपाळासी तेव्हां धाडी वासु-देव । पाहावया भाव याज्ञिकांचा ॥६॥
जोडोनियां हात वंदिती द्विजांसी । धाडिलें आम्हांसी कृष्णनाथें ॥७॥
नामा म्हणे ऐसें सांगती गोपाळ । याज्ञिकां सबळ अभिमान ॥८॥

१०६.
पडे प्रायश्चित्त बोलों नका कोणी । ऐकूं नये कानीं शब्द यांचा ॥१॥
स्वर्गसुखासाठीं करिताति यज्ञ । टाकिती अवदान अग्निमुखीं ॥२॥
भोक्ता वनीं आला न कळेचि त्याला । पूर्ण ब्रह्म कृष्णाला न जाणती ॥३॥
कृपाळु बहुत परीक्षिती राया । उद्धार कराया पाठविलें ॥४॥
इच्छामात्रें पाडी अन्नाचे पर्वत । काकुलती येत अन्नासाठीं ॥५॥
गडियांसी कळे तेथील आकार । निघती सत्वर तेथुनिथां ॥६॥
येवोनियां कृष्णा सांगितलें त्यांनीं । हांसे चक्रपाणी नामा म्हणे ॥७॥

१०७.
कृष्णा पांच खासा उथळ दिसती । लाहानाल्या भिंती त्याजवरी ॥१॥
विस्तू घालिताती गवत आंथरती । बडबड करीती अवघेजण ॥२॥
घालुनियां तूप हातीं घेती चाटू । करीती ॐ फटू अस्कवळ ॥३॥
लांकडाचें पाळें घेउनी बैसला । मिळालासे मेळा त्याजपुढें ॥४॥
एवढेंसें भांडें तांदूळ शिजविती । तुजला काय देती त्यांतूनियां ॥५॥
घडिघडी उठती घडिघडी बैसती । तें बाय श्रीपति आह्मां सांग ॥६॥
काय चतुराई असे त्या गोवळा । भावासी भुलला नामा म्हणे ॥७॥

१०८.
गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां ॥१॥
नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥
त्वरें करोनियां गेले स्त्रियांपाशीं । सांगितलें त्यांसी वर्तमान ॥३॥
ऐकोनियां ऐसेम उठिल्या सत्वर । वर्जिती भ्रतार तेव्हां त्यांचे ॥४॥
एका ब्राह्मणानें स्त्रियेसी बांधिलें । प्राणासी सोडिलें परीक्षिती ॥५॥
सकुमार सांवळा राजीवलोचन । पहा-ताती कृष्णमुख तेव्हाम ॥६॥
आनंदानें नेत्रीं वाहातें जीवन । पुसे वर्तमान नामा ह्मणे ॥७॥

१०९.
घरा जावें ऐसें सांगे पुरुषोत्तम । ऐकोनियां श्रम फार होय ॥१॥
दयानिधि ऐके अगा मेघश्यामा । धाडूं नको आह्मां येथूनियां ॥२॥
तुजसाठीं आह्मी सोडिलें भ्रतारां । चरणी देईं थारा देवराया ॥३॥
देव ना संसार आम्हां झालें कृष्णा । सांगावें हें कोणा दु:ख आतां ॥४॥
तुमचे भ्रतार वदिती आम्हांसी । सांग हषीकेशी भिऊं नका ॥५॥
सांगतांची ऐसें चालियेल्या सर्व । पाहाती केशव वेळोवेळां ॥६॥
द्विजाचे मानसीं होय अनुताप । द्विजाचे मानसीं होय अनुताप । भिंदिती आप आपणातें ॥७॥
भोजन करूनी गडी रामकृष्ण । निघती तेथून नामा म्हणे ॥८॥

११०.
इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां ॥१॥
क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हां आतां ॥२॥
पोरांच्या बुद्धीनें वर्तताती सर्व । धरूनियां गर्व तेची करी ॥३॥
प्रलय मेघाच्या काढिल्या श्रृंखला । वर्षावें गोकुळा जा-ऊनियां ॥४॥
आज्ञा म्हणोनियां वंदियेला इंद्र । कोपे जैसा रुद्र प्रलयींचा ॥५॥
मुसळाच्या धारा मेघ वर्षताती । गारा पडताती शिळा ऐशा ॥६॥
मरताती पक्षी श्वापदें अपार । हिंवें नारीनर कांपताती ॥७॥
नामा म्हणे गायी हंबरडा ह्मणीती । येऊनी पडती कृष्णापुढें ॥८॥

१११.
काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां ॥१॥
मागें बहुतापरी रक्षियलें आह्मां । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥
कोण तुजविण आह्मांसि रक्षिता । उदारा अनंता जगजेठी ॥३॥
शरण शरण अगा वासुदेवा । अच्युता माधवा नारा-यणा ॥४॥
विलंब केलिया जातील रे प्राण । धरिती चरण नामा ह्मणे ॥५॥

११२.
सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥
महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
रक्षिणार यांसी आहें मी गोविंद । उतरीन मद तुझा आतां ॥३॥
शरणागता मारी ऐसा कोण थोर । मशक पामर पाहूं आतां ॥४॥
यासाठीं करीन सृष्टीचा उभारा । लागों नेदी वारा दु:खाचा मी ॥५॥
गोवर्धना तुम्ही चलारे सकळ । दावितों मी बळ इंद्रा आतां ॥६॥
उचलिला गिरी प्रथम अंगुळीं नामा म्हणे बळी बाप माझा ॥७॥

११३.
राहा याचे तळीं आनंदें करूनी । मानूं नका मनीं भय याचें ॥१॥
पाहूं किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥
सांगतांचि ऐसें राहाती सकळ । वर्णिताती बळ परस्परें ॥३॥
सौंगडे म्हणती तेव्हां ते समस्त । लावीं कीरे हात सकळीक ॥४॥
उगेची श्रमती बालकें अज्ञान । ह्मणे नारायण काढा हात ॥५॥
सप्त दीन होती सांगतो योगीद्रं । पाहावया इंद्र येता झाला ॥६॥
अद्‍भुत चरित्र पाहून गेली भ्रांत । मेघासी सांगत पुरे करा ॥७॥
नामा ह्मणे इंद्र चित्तीं चिंतावला । अपराध घडला समर्थाचा ॥८॥

११४.
राहिला पाऊस निघावें बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी ॥१॥
दीनबंधू तेव्हां ठेवी पर्वतासी । भेटती देवासी सकळीक ॥२॥
आयुष्य बहुत तुज होवो कृष्णा । वांचविले प्राणा सकळांच्या ॥३॥
विष्णुदास नामा ओंवाळून जाय । येगे माझे माय भेटी देईं ॥४॥

११५.
वाहातसे नेत्रीं इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया ॥१॥
क्षमा करीं आतां अच्युता अनंता । अगा कृष्ण-नाथा दीनबंधू ॥२॥
तुझिया दासासी दु:ख म्यां दिधलें । भ्रांतीनें मोहिलें मन माझें ॥३॥
दावीं तुज थोरी न करींच सेवा । करा दंड देवा मजलागीं ॥४॥
तूंचि माझा बाप तूंचि माझी आई । क्षमा कृष्णा-बाई करीं आतां ॥५॥
दैत्य मारावया भूतळीं आलासी । भक्तांला रक्षिसी निरंतर ॥६॥
जगद्नुरु माझा धनी वनमाळी । जोडोनि आंजुली उभा असे ॥७॥
चतुर्भुज गळां वैजयंती माळा । पाहातसे डोळां नामा ह्मणे ॥८॥

११६.
गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमों ॥१॥
गोवर्द्धनोद्धरा देवा विश्वंभरा । निर्गुण निराकारा तुज नमों ॥२॥
जनार्दना हरि कृपाळू ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमों ॥३॥
अव्यक्ता क्षेत्रज्ञ अचिंता कुटस्था भुवनत्रयनाथा तुज नमों ॥४॥
अनंत ब्रह्मांडें तुझिये उदरीं । घनश्यामा हरि तुज नमों ॥५॥
देवराया तुझें कोमळ ह्लदय । कृपादृष्टी पाहें मजकडे ॥६॥
तुझा मी किंकर आहें वासुदेवा । अभय या जीवा देईं आतां ॥७॥
नामा म्हणे घाली चरणासी मिठी । बोले जगजेठी स्वामी माझा ॥८॥

११७.
तुझा मोडिला म्यां यज्ञ । ऐक तयाचें कारण ॥१॥
न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझें मन ॥२॥
विसरलासी मज । अनुग्रह केला तुज ॥३॥
ऐसें सांगे नारायण । नामा म्हणे समाधान ॥४॥

११८.
आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥
सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥
वेदमंत्रघोष ऋषि करिताती । अप्सरा नाचती थैयथैयां ॥३॥
नारद तुंबर गंधर्व गायन । वर्णिताती गुण कृष्णाजीचे ॥४॥
यथा-विधि इंद्र पूजी विश्वंभरा जोडोनियां करा उभा राहे ॥५॥
आज्ञा घेऊनियां जाय स्वस्थळासी । येती गोकुळासी सकळीक ॥६॥
चरित्र जो कोणी उच्चारील वाचे । जळती पापाचे पर्वत हे ॥७॥
नामा ह्मणे ऐसें सांगतसे शुक । सूत पुराणिक शौनकासी ॥८॥

११९.
गौळी ह्मणती ह्लषिकेशी । दावी आपुल्या स्थळासी ॥१॥
सखा तूंची कृष्णा । आमुची पुरवावी वासना ॥२॥
दावी वैकुंठ सकळां । क्षणएक पाहूं डोळां ॥३॥
नामा तेथील रहिवासी । आला स्थापाया धर्माशीं ॥४॥

१२०.
लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनीं शोभा सुशो-भित ॥१॥
देहुडा पाउलीं उभा तये वनीं । वेणू चक्रपाणी वाजवितो ॥२॥
ऐकतांचि नाद गोकुळींच्या नारी । पाहावया हरि निघताती ॥३॥
भ्रतार सेजेसी टाकुनी उठती । वाढितां पंगती निघताती ॥४॥
स्तन देतां बाळें टाकिलीं भूमीसी । मोकळिया केशीं निघताती ॥५॥
नामा ह्मणे ऐशा गेल्या देवापाशीं । आनंद मानसीं न समाये ॥६॥

१२१.
वनामध्यें कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती ॥१॥
निशींमाजीं व्याघ्र फिरताती रानीं । जावें सक-ळांनीं घरां आतां ॥२॥
ऐकोनिया ऐसें कठीण वचन । चालिलें जीवन नेत्रींहूनी ॥३॥
वेणुनाद दूत धाडिला आह्मांसी । आलिया म्हणसी जावें आतां ॥४॥
शहाणा चतुर आहेसी नेटका । वैकुंठना-यका विचारावें ॥५॥
कामाग्नीनें कृष्ण धरिती सकल । मांडियेला खेळ मन्मथाचा ॥६॥
एक एक नारी एक एक कृष्ण । करावया पूर्ण इच्छा त्यांची ॥७॥
प्रकृतीसी ऐसा भुलला गोविंद । करिती आनंद नामा म्हणे ॥८॥

१२२.
झाला अभिमान धन्य आम्हीं आतां । लक्षुमीच्या कांता भोगीतसों ॥१॥
गुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक । करिताती शोक सकळीक ॥२॥
निघाल्या तेथूनि फिरताती वनें । यशोदेचें तान्हें धुंडावया ॥३॥
वृक्ष आदि पक्षी पुसती तयांसी । तुम्हीं ह्लषि-केशी देखियेला ॥४॥
मृगासी पुसती देखीयेला डोळां । सांगारे सां-वळा कोणी तरी ॥५॥
आम्हांवरी तुम्हीं काय रे कोपतां । सांगा रे भगवंता पुसतसों ॥६॥
कुरवंडी करू सकळांचे प्राण । देऊं त्या भू-षण अंगावरील ॥७॥
नामा म्हणे जेथें असे अभिमान । तेथें नारा-यण नाहीं नाहीं ॥८॥

१२३.
ऐकावें चरित्र परीक्षितिराया । बरोबरी जाया एक असे ॥१॥
तोडोनियां पुष्पें करी अलंकार । घालीत श्रीधर तिजवरी ॥२॥
नये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । घालितसे वेणी आवडीनें ॥३॥
वंदियेली शिवें चरणींची गंगा । करीतसे भांगा नीट तीच्या ॥४॥
गोपिकांच्या वेषें प्रगटल्या श्रुती । गुह्य हें तुजप्रती सांगितलें ॥५॥
घेवोनियां तिसी गेला कुंजवना । वज्रांकुश चिन्हा उमटती ॥६॥
गोपिकांचा मेळा येतसे तांतदी । युगाऐसी घडी झाली तयां ॥७॥
नलगेची शोध शीणती सकळा । न जाती गोकुळा नामा ह्मणे ॥८॥

१२४.
चंद्राच्या प्रभेनें चमकती पाउलें । दुरोनि देखिलें गो-पिकांनीं ॥१॥
कृपणाचें धन होतें तें चळलें । तयांसि लाधलें अव-चिता ॥२॥
एकीमागें एक धांवताती नारी । आहे येथें हरी ऐसें वाटे ॥३॥
घेवोनियां रज लविताती भाळा । पाहती सकळा न्याहा- ळूनि ॥४॥
बरोबर नारी कोणी तरी असे । पाउलाचे ठसे उमटले ॥५॥
पापिणिगे आम्ही तुह्मी सकळिका । पुण्याची अधिका ह्मणून भोगी ॥६॥
बरोबरी तिसी होय अभिमान । झालासे स्वाधीन माझ्य़ा देव ॥७॥
कडे घेसी तरी येतें बरोबरी । चालवेना हरी मज आतां ॥८॥

१२५.
मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां ॥१॥
टाकोनियां गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥
वैकुंठनायका अगा नारायणा । दावींरे वदना एक वेळा ॥३॥
कृष्णाचें चरित्र सकळ करिती । मन रंजविती नामा म्हणे ॥४॥

१२६.
कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिलें नारदानें ॥१॥
व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥
विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्याप वदत कृपाळुवा ॥३॥
कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासीं याल बेगीं ॥४॥
मोडितसे वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥
नामा म्हणे तेव्हां करिताती स्तुती । पापें दग्ध होती ऐकतांची ॥६॥

१२७.
जोडोनियां हात येतों काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागीं ॥१॥
अवतार घेसी दुष्ट वधायासी । येती गोकुळासी म्हणोनियां ॥२॥
पाहोनियां तुला लक्षुमी पातली । दरिद्रें पळाली येथोनियां ॥३॥
सकळांसी सुख द्यावया आलासी । आम्हीं वनवासी दु:खी होतों ॥४॥
नामा म्हणे कंठीं धरियेला प्राण । दाखवीं चरण दयानिधी ॥५॥

१२८.
सरोवरीं कमळें तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती ॥१॥
कृपाळुवा ऐकें अगा ह्लषिकेशी । आह्मी तुझ्या दासी मोलविण ॥२॥
कामरूपदैत्य मारितो आह्मांसी । भक्तांसी रक्षिसी कीर्ति जगीं ॥३॥
दीनासी रक्षिसी दुष्टांसी मारिसी । धर्माला स्थापिसी निरंतर ॥४॥
घेवोनियां शस्त्र मारावें सकळां । आलासे कंटाळा नामा ह्मणे ॥५॥

१२९.
सुकुभार सांवळे जैसीं रातोत्पळें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥१॥
दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥२॥
दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥३॥
रांगतं अंगणीं विमलार्जुन मोडिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥४॥
अघासुरा ह्लदयीं उभे जी राहिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥५॥
नाम ह्मणे ज्यांतें वरुणानें पूजिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥६॥

१३०.
सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥
नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥
तेहेतीस कोटी देव ब्रह्मा सदाशीव । प्रार्थिताती सर्व तुजलागीं ॥३॥
यादवकुळटिळका वैकुंठनायका । विधीच्या जनका भेट आतां ॥४॥
नामा म्हणे मुख दावीं कृष्णनाथा । हरेल ही व्यथा वियोगाची ॥५॥

१३१.
शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥१॥
अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥२॥
वेणू पांवा जया हातांत शोभत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥३॥
घेवोनी शिदोर्‍या गडयांसी वांटीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥४॥
रक्षावया व्रजां उचलिला पर्वत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥५॥
सुवर्णाचीं कडीं भूषणें अमूप । पाहतां निष्पाप नामा म्हणे ॥६॥

१३२.
अभिमानें घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥
तुजवांचोनियां जाऊं पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥
मुकुट कुंडलें श्रीमुख सांवळें । केशरी लविलें गंध भाळीं ॥३॥
पाहोनियां जीवीं होय फार मुख । हरेल ही भूक डोळियांची ॥४॥
तुजवांचोनी आम्हां नाहीं कोणी । तिहीं त्रिभुवनीं नामा म्हणे ॥५॥

१३३.
चरणासीं शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥
लक्षुमीनें ज्यातें असे आराधिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥२॥
आवडीनें शिवें मस्तकीं वंदिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥३॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । शिंपीयेली क्षिती अश्रुपातें ॥४॥

१३४.
आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥
रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥
कामाग्नीनें आम्हीं जळतों सकळ । करावें शीतळ अधरामृतें ॥३॥
नामा म्हणे देईं एक वेळ भेटी । तुजसाठीं कष्टी फार होती ॥४॥

१३५.
वाजवोनी वेणू पसरिलें जाळें । आम्हांसी न कळे कपटिया तूं ॥१॥
दुखवोनी सर्वां टाकियेलें वनीं । गेलासी वधुनी पारधिया ॥२॥
धरूनियां धीर न राहावे कृष्णा । देऊं मग प्राणा सकळिकां ॥३॥
सकळांच्या हत्या येती तुजवरी । नामा म्हणे हरि भेट आतां ॥४॥

१३६.
त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ॥१॥
अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥
स्वर्गीं जें अमृत प्राशन करिती । पुण्य सरल्या येती मृत्यु लोकां ॥३॥
तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारीं मा-नसीं याति कांहीं ॥४॥
नाहीं चतुराई बोबडे हे बोल । संतोषे विठ्ठल नामा ह्मणे ॥५॥

१३७.
गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥
सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥
खडे कांटे बहू कठिण तृण मुळें । ठेवीसी पाउलें त-यावरी ॥३॥
पावतोसी क्लेश अगा वासुदेवा । म्हणोनियां जीवा दु:ख वाटे ॥४॥
सांगतसों आम्ही नित्य यशोदेसी । धाडूं नको यासी वनामध्यें ॥५॥
नामा म्हणे होय सकळांचा उद्धार । म्हणोनी श्री-धर वना जाय ॥६॥

१३८.
तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥
अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥
कुरळ हे केंश सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होये ॥३॥
लवती पांपण्या न सोसती आह्मां । अहिर्निशी नामा हेंचि गाय ॥४॥

१३९.
टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां । आलोंत अच्युता तुजपाशीं ॥१॥
आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावें नाहीं ॥२॥
घालोनियां कूपीं कापियेला दोरा । साधियेलें वैरा आपुलिया ॥३॥
वरोनियां टाकी मोठासा पर्वत । म्हणती समस्त नामा म्हणे ॥४॥

१४०.
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥
दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥
बोलवेना आतां । कंठ शोकला अनंता ॥३॥
ऐसें पाहोनियां । नामा म्हणे आली दया ॥४॥

१४१.
देतसे दर्शन । सकळांसी नारायण ॥१॥
झाला सकळा आनंद । ह्लदयीं धरिला गोविंद ॥२॥
टा कोनियां आम्हां । कां गेलासी पुरुषोत्तमा ॥३॥
तुम्हां झाला अभिमान । नामा म्हणे सांगे खूण ॥४॥

१४२.
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥
विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरें ॥२॥
विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्ण-वेना ॥३॥
न जाय चंद्रमा न जाती नक्षत्रें । पाहाती सर्वत्र रास-क्रीडा ॥४॥
जलक्रीडा करी लक्षुमीचा पती । लाळ घोटीताती देवस्रिया ॥५॥
धन्य त्या गोपिका धन्य त्यांचें पुण्य । भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ॥६॥
नामा ह्मणे होय कामाची ते पूर्ती । नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ॥७॥

१४३.
होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥
क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥
परिक्षिती ऐके ऐका कौतुकासी । होत्या त्यांज-पाशीं त्याच्या स्त्रिया ॥३॥
ह्मणोनियां कोणी नाहीं विचारिलें । अंतरीं न कळे दुजियाला ॥४॥
यथामती रास वर्णिला देवाचा । संपूर्ण हे वाचा काय करी ॥५॥
चरित्र श्रवण करील जो कोणी । धन्य तोचि प्राणी नामा ह्मणे ॥६॥

१४४.
सरस्वती तीरीं अंबिकेचें स्थान । गोकुळींचे जन जाती तेथें ॥१॥
करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥
सारितां भोजन लपाला आदित्य । नामा ह्मणे तेथें राहाताती ॥३॥

१४५.
निद्रिस्थ सकळ तये वनीं व्याळ । गिळितसे बळें नंदालागीं ॥१॥
कृष्णा धांव वेगीं मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥
माझिया पाडसा येईंरे धांवोन । दाखवीं वदन अंतकाळीं ॥३॥
आली काय तुज निद्रारे कान्हया । माझिया तान्हया ऊठ वेगीं ॥४॥
ऐकोनियां ऐसें बोलती सकळ । घालिती मुसळ सर्पावरी ॥५॥
श्रमले सकळ सोडिना नंदाला । पिटी वक्ष-स्थळा नंदपत्नीं ॥६॥
उठे जगद्‍गुरु काय झालें माय । लवितसे पाय तयालागीं ॥७॥
टाकियेलें तेव्हां सर्पें कलेवर । पुरुष सुंदर दिसतसे ॥८॥
नामा ह्मणे वाचे स्तवी विश्वंभरा । करूनि नम-स्कारा जाता झाला ॥९॥

१४६.
करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें ॥१॥
शंख नामा तेथें आलासे गुह्यक । नाहीं त्या विवेक पापि-यासी ॥२॥
उपजला काम तयाचिया मना । घालोनी विमाना स्त्रिया नेत ॥३॥
धांव धांव रामा नेतसे हा आह्मां । अगा मेघश्यामा कृष्णनाथा ॥४॥
नेतो स्त्रिया काय न कळेचि देवा । यासी करूं द्यावा अपराध ॥५॥
हातीं वृक्ष दोघे ऐसें पाहोनियां । टाकोनी तो स्त्रिया पळतसे ॥६॥
घालितांचि वृक्ष प्राणासी मुकला । मणी त्याचा दिल्हा बळीभद्रा ॥७॥
भक्तांसाठीं मारी दुष्टां जगजेठी । नामा ह्मणे तुटी विसरेना ॥८॥

१४७.
गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागीं ॥१॥
परब्रह्म साक्षात्‍ क्षीरसागरवासी । त्या कैसा धा-डसी वनामध्यें ॥२॥
ब्रह्मा आणि इंद्र आले गोकुळासी । वर्णिती कृष्णासी तुह्मीं देखा ॥३॥
तेहेतीस कोटी देव जयांतें प्रार्थित । त्यासी अरण्यांत रुपती कांटे ॥४॥
दैत्यांचा हा भार जाहला पृथ्वीसी । कंस वधायासी आला येथें ॥५॥
ज्याजसाठीं फार श्रम-ताती योगी । कैलासाचा योगी ध्यान करी ॥६॥
भ्रांती कांरे तुज पडे वेळोवेळां । पाहातोसी डोळां चरित्रास ॥७॥
नामया सुकृत झालें असे फार । म्हणोनी विचार नाठवेची ॥८॥

१४८.
वृषभाच्या रूपें आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥
बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥
जगजेठी तेव्हां धरितसे शिंगें । सारितसे मागें भुजाबळें ॥३॥
पाडोनियां खालीं दिल्हा पाय वर । मारिला असुर नामा म्हणे ॥४॥

१४९.
कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांतीं बैसोनी सांगतसे ॥१॥
सातवा जो गर्भ जिराला ह्मणती । रोहिणी प्रस-वती बळीराम ॥२॥
आठवा जो पुत्र देवकीसी झाला । वसुदेवें नेला नंदाघरीं ॥३॥
यशोदेची कन्या घेऊनियां येत । गेली आका-शांत मारीतां जे ॥४॥
तुझिया मानसीं अशंका येईल । होते रक्ष-पाळ माझे तेथें ॥५॥
ईश्वराची माव न कळे कोणाला । कळलें हें मजला त्याच्याकृपें ॥६॥
घेऊनियां शस्त्र उठला त्वरीत । करितों मी अंत वसुदेवावा ॥७॥
तयेवेळीं ह्मणे ब्रह्मयाचा सूत । ऐक तुज मात सांगतों मी ॥८॥
आधीं मारी पुत्र तुझे जे कां वैरी । असे तुझ्याघरीं मग यासी ॥९॥
सांगोनियां ऐसें शांतविलें त्यासी । गेला गोकुळासी नामा ह्मणे ॥१०॥

१५०.
माराया कृष्णासी । कंसें पाठविला केशी ॥१॥
बहु असे तो प्रतापी । आला अश्वाचिये रूपीं ॥२॥
देवा डसाया धांवला । धरूनि पायीं झुगारिला ॥३॥
मुखीं देऊनियां हात । श्वास कोंडी जगन्नाथ ॥४॥
नामा ह्मणे पडलें प्रेत । हर्ष सुरवरां बहुत ॥५॥

१५१.
शेळ्या मेंढियांचा खेळ । आतां खेळूंरे सकळ ॥१॥
कोणी मेंढया होती । कोणी चोर म्हणताती ॥२॥
म्हणती रात्र झाली । आतां निजे वनमाळीं ॥३॥
कोणी श्वान होती । चोरा ड-साया धांवती ॥४॥
तेथें व्योमासुर येत । गोपाळाचा वेष धरित ॥५॥
करोनियां चोरी । नेऊन ठेवी पर्वतदरीं ॥६॥
हें तो देवासि कळलें । नामा ह्मणे संहारिलें ॥७॥

१५२.
कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥
अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥
आजी होईल माझ्या जन्माचें सार्थक । वैकुंठनायक पाहीन मी ॥३॥
उजवे जाती काक वाम जाती मृग । पाहीन श्रीरंग स्वामी माझा ॥४॥
शुभ हे शकुन मार्गीं हे होताती । पाहीन भूपती वैकुंठींचा ॥५॥
येथूनियां माझी सरली येरझार । कंसानें उपकार केला मोठा ॥६॥
आजी माझे पितर उद्धरती सकळ । पाहींन गोपाळ कृपासिंधु ॥७॥
नामा ह्मणे आला गोकुळासन्निध । ह्लदयीं आनंद न समाये ॥८॥

१५३.
चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं ॥१॥
एकांतीं अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीनें ॥२॥
सप्तऋषि ज्याचे वर्णिताताती गुण । करीतसे ध्यान ब्रह्मा ज्याचें ॥३॥
चारी वेद ज्याची वर्णिताती कीर्ति । करिताती स्तुति साहीजण ॥४॥
तेहेतीस कोटि देव जयातें पूजिती । श्रुति वर्णिताती गुण ज्याचे ॥५॥
लक्षुमीचा पति ध्याती सनकादिक । पाहीन श्रीमुख एकवेळां ॥६॥
पृथ्वीचा हा भार करावया दूर । ह्मणोनि अवतार वेत असे ॥७॥
नामा ह्मणे आला यमुनेजवळी । उतरला खालीं रथाचिया ॥८॥

१५४.
धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥
धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥
धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । नंदाचा मंदन क्रीडतसे ॥३॥
धन्य ती यशोदा धन्य तिचा पति । अखंड पाहाती मुख ज्याचें ॥४॥
माया घेवोनियां देव गेला राना । ध्वजवज्रांकुश चिन्हां उमटती ॥५॥
नेत्रीं अश्रुपात उतरे रथाखाले । गडबडोनी लोळे तयावरी ॥६॥
ब्रह्मादिकां दुर्लभ येथील ही माती । घेवोनियां हातीं मुखीं घाली ॥७॥
नामा ह्मणे पुढें चालिला त्वरित । देखे गडियांत परब्रह्म ॥८॥

१५५.
तनु हें आकाश चंद्रमा तें मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचें ॥२॥
भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळ । खेळत सांवळा जगद्नुरु ॥३॥
वैजयंती माळा किरीट कुंडलें । अक्रूरें देखिले दोघेजण ॥४॥
जोडोनियां हात घाली नमस्कार । वाहतसे नीर क्षणोक्षणीं ॥५॥
नामा ह्मणे त्वरें धांवे ह्लषिकेशी । धरीत पोटाशीं अक्रूरातें ॥६॥

१५६.
भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें ॥१॥
पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हां । कोणरे हा बावा आला येथें ॥२॥
आपुल्या कान्होबाच्या पायां कां पडतो । काय हा मागतो सांग आह्मां ॥३॥
अक्रूर बळिराम घरीं आले गोपाळ । मंदादि सकळ भेटीयेले ॥४॥
मधुपर्कविधि करीती पूजन । ह्मणे धन्य दीन आईचा हा ॥५॥
अक्रूराबरोबरी करिती भोजन । पुसे वर्तमान मग त्यासी ॥६॥
भक्त माझें दैवत जगा दावी मात । कृपाळु बहुत नामा ह्मणे ॥७॥

१५७.
प्रात:काळीं मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी ॥१॥
गौळणींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हातें ॥२॥
एकी त्या घालीती केंसामध्यें माती । एक त्या लोळती भूमीवर ॥३॥
आह्मां सोडूनियां तू रे कैस जासी । तुजविण पीशीं आह्मी सर्व ॥४॥
कोणी रथापुढें जाऊनि पडली । आक्रोशें रडती सकळीक ॥५॥
अक्रूर नव्हे बाई मोठा असे क्रूर । नामीं निरंतर क्रीया वसे ॥६॥
अक्रूर आह्मी सर्व पसरीतों पदर । नेऊं नको श्रीधर मथुरेसी ॥७॥
नामा ह्मणे शोक न वर्णवे आतां । झाला तो हाकिता रथ त्वरें ॥८॥

१५८.
ब्रह्मनिष्ठ तेव्हां स्थिरावला चित्तीं । अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र ॥१॥
दहींदूधतूप भरिल्या कावडी । चालती तांतडी सकळीक ॥२॥
चिंतेनें व्यापिलें अक्रूराचें मन । काय वर्तमान होईल नेणें ॥३॥
नरनारी शोक करीती सकळ । दुराचारी खळ कंस आहे ॥४॥
मारगीं स्नानासी उतरे अक्रूर । रथावरी किशोर नंदजीचे ॥५॥
सोडोनियां घोडीं चालिला तांतडी । दिल्ही असे बुडी जळां-मध्यें ॥६॥
दावोनी कौतुक निरसी त्याचा धाक । सांगतसे शुक परिक्षिती ॥७॥
जुंपोनियां घोडीं चालिला सत्वर । लपे दिनकर नामा ह्मणे ॥८॥

१५९.
जोडोनियां कर विनवी विश्वंभरा । चलावें मंदिरा सकळिकीं ॥१॥
अनाथावरी कृपा करा कृष्णनाथा । ठेवीतसें माथा पायांवरी ॥२॥
मारूनियां कंस येईन तुझ्या घरा । आग्रह अक्रूरा करूं नको ॥३॥
सकळ समुदाय मथुरेचे वनीं । साह्य चक्रपाणी ह्मणे नामा ॥४॥

१६०.
प्रात:काळीं गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले ॥१॥
मागती रजका देईना तो वस्त्रें । वधी नख शस्त्रें पापियासी ॥२॥
ती ठायीं वांकडी नीट केली तीसी । तीनें चंद-नासी लवियेलें ॥३॥
जोडोनियां हात विनवी सुदामा । चला मेघ:-शामा घरा माझ्या ॥४॥
वस्त्रें देती तेव्हां मथुरेचे लोक । नरनारी मुख पाहाताती ॥५॥
मोडितां धनुष्य येती रक्षपाळ । नामा ह्मणे खळ वधियेले ॥६॥

१६१.
इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥
मदोन्मत्त हस्ती देखोनियां हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥
सांवरोनी हातें केंसा देत गांठ । खोंवितसे नीत वैजयंती ॥३॥
खंब ठोकोनियां राहे पुढें उभा । सांवळी सुप्रभा अंगकांती ॥४॥
पाहोनियां शूक झाला समाधिस्थ । ऋषिमुनी समस्त वेडावले ॥५॥
दुष्ट पाही हत्ती घाली आंगावरी । क्षणार्धेंचि मारी गजालागीं ॥६॥
उपडोनियां दातं घेतसे श्रीधर । जाहला उद्धार कुवलयाचा ॥७॥
नामा म्हणे पुढें चालिला गोविंद । सावध सावध परिक्षिती ॥८॥

१६२.
चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥
इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठीं ॥२॥
अतुर्बळी तेव्हां दिसे नारायण । जळताती मनें वैरियांचीं ॥३॥
कंसाचे अंगणीं उभा असे देव । जैसा ज्याचा भाव तैसा भासे ॥४॥
कृष्णातें देखोनी वल्गना करिती । चोळिताती माती दंडालागीं ॥५॥
बळिभद्रासी खूण दावियेली तेव्हां । उशीर न लावा मारायासी ॥६॥
नामा म्हणे एक उरला असे कंस । वधती सकळांस दोघेजण ॥७॥

१६३.
रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे ॥१॥
त्वरें जाऊनियां धरीयेला केशीं । पाडियेला भूमिसी दुष्टबुद्धी ॥२॥
वज्रपाय मुष्टी वोपी नारायण । सांडि-येला प्राण कंसें तेव्हां ॥३॥
देव वर्षताती सुमनाचे भार । भक्त जयजयकार गर्जताती ॥४॥
गार्‍हाणीं सांगती ऋषिमुनी सर्व । याताती गंधर्व सप्तस्वरें ॥५॥
नामा म्हणे पुढें अप्सरा नाचती । वर्णिताती कीर्ति कृष्णजीची ॥६॥

१६४.
राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें ॥१॥
देवकीच्या स्तनीं फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥
वासुदेवें केलें त्याचें समाधान । गायी दिल्या दान ब्राह्मणांसी ॥३॥
समस्तांचि क्रिया करी उग्रसेन । झा-लासे दिवाण देव त्याचा ॥४॥
पळोनियां गेले होते जे यादव । आणियेले सर्व रामकृष्णें ॥५॥
आनंद न माये सकळ लोकांला । मथुरेत राहिला नामा ह्मणे ॥६॥

१६५.
नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी ॥१॥
अहर्निशीं माझें करावें चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥
ऐसें ऐकोनियां निराश वचन । जाईल माझा प्राण तुजविण ॥३॥
गडी ह्मणती देवा आह्मांसी टाकिलें । काय आमुचें सरलें पुण्य देवा ॥४॥
कोणासवें आह्मीं खेळूं यमुनेंत । र-क्षील आम्हांतें कोण आतां ॥५॥
ब्रह्मादिक तुझ्या वंदिताती पायां । दिल्या आम्ही शिव्या क्षमा करीं ॥६॥
यशोदेसी सांगा माझा नम-स्कार । देईन सत्वर भेटी सर्वां ॥७॥
कंठ सद्नदीत नेत्रीं अश्रुपात । निघती समस्त नामा ह्मणे ॥८॥

१६६.
चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥
कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ॥२॥
देशोदेशीं चिठया लिहिल्या वसुदेवें । मुंजीसीठीं यावें कृष्णजीच्या ॥३॥
मथुरेचे लोक आणिती आहेर । होतसे गजर वाजंत्रांचा ॥४॥
उग्रसेनें तेव्हां फोडिलें भांडार । द्विजांसी अपार द्रव्य दिल्हें ॥५॥
विष्णुदास नामा वांटितो सुपारी । झाले ब्रह्मचारी रामकृष्ण ॥६॥

१६७.
घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरीं दोघे ॥१॥
गुरुसेवा करिता वंदिती चरणा । जाहली संपूर्ण विद्या तेव्हां ॥२॥
जोडोनियां हात करिती प्रार्थना । मागावी दक्षणा गुरुराया ॥३॥
नामा ह्मणे द्विज ह्मणत स्त्रियेसी । असे जें मानसीं इच्छा तुझ्या ॥४॥

१६८.
समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥
अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥
करोनियां पूजा पुसे वर्तमान । देईंरे आणून गुरुपुत्र ॥३॥
पांचजन्य दैत्य येथें बळी राहे । बंधु तेथें पाहे कृष्णनाथा ॥४॥
टाकोनियां उडी वधिलें तयासी । पाहे ह्लषिकेशी उदरांत ॥५॥
नाहीं ऐसें कळों आलें तें ईश्वरा । घेवोनी शरीरा आला ॥६॥
परीक्षिती काय न कळे तयाला । दावीतसे लीला नामा म्हणे ॥७॥

१६९.
यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें ॥१॥
ऐकोनियां नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥
जोडोनियाम हात आणी अधोक्षजा । करोनियां पूजा पुसतसे ॥३॥
संदीपनपुत्र आहे तुजपाशीं । आणींरे तयासी शीघ्र आंता ॥४॥
तुमचा मी किंकर निरोप हो द्यावा । रामा वासुदेवा पुसतसे ॥५॥
घेवोनियां पुत्र तेथोनी चालिले । नामा ह्मणे आले गुरुगृहीं ॥६॥

१७०.
काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा ॥१॥
असे कांहीं इच्छा मागावें आणीक । दिल्हें हें बाळक ह्मणती दोघे ॥२॥
अहर्निशीं तुझ्यां असावें कल्याण । आले रामकृष्ण मथुरेसी ॥३॥
कृतांतासी धाक नामा ह्मणे त्याचा । आहें मी तयाचा शरणागत ॥४॥

१७१.
युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोकां तैसें झालें ॥१॥
उदास दिसती वनें दाही दिशा । कायरे जगदीशा आह्मां केलें ॥२॥
वेडावल्या गायी करिताती खंती । वत्स न क-रिती स्तनपान ॥३॥
अन्नपाणी तेव्हां वर्जिती गौळणी । आतां चक्रपाणी कैंचा आह्मां ॥४॥
यमुनेचे तीरीं वृक्ष ते सुकले । पाषाण उलले तया दु:खें ॥५॥
प्रात: काळीं गडी अवघेचि बोलती । मा-रूनि श्रीपति गेला नाही ॥६॥
जीवनाविण मत्स्थ जैसे तळमळती । नामा ह्मणे चित्तीं धन्य प्रेमा ॥७॥

१७२.
अंतरयामीं जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठीं ॥१॥
पाहूनियां प्रेमा भुलला गोविंद । रडतसे मंदमंद तेव्हां ॥२॥
उच्चारितां नामें तारताती पापी । न विसरती गोपी कांहीं केल्या ॥३॥
विश्वाचा जो आत्मा शोक तया नाहीं । भुल-लासे तोहि भक्तीप्रेमें ॥४॥
चिंतेमें व्यापिला तेव्हां ऋषिकेशी । पाठवूं कोणासी गोकुळांत ॥५॥
तयेवेळीं पुढें देखिलें उद्धवा । बाहा-तसे तेव्हां तयालागीं ॥६॥
नामा ह्मणे आतां करील एकांत । सावधान चित्त अवधारा ॥७॥

१७३.
शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासीं ॥१॥
दयेचा सामर बोले तयेवेळां । मजसाठी गोकुळा तुवां जावें ॥२॥
मजवरी त्यांनी ठेवियेला प्राण । संसाराचे भान नाही कोणा ॥३॥
यशोदा आणि नंद झालेती तटस्थ । गडी माझे समस्त पिसे झाले ॥४॥
गाई मजविण न वेती तृण । बाळें स्तनपान विसरली ॥५॥
चालतांना पंथ चुकती नारीमर । पक्ष्यांनी आहार सांडियेला ॥६॥
शाहाणा चतूर आहेशी नेटका । बोधाव्या गोपिका ब्रह्मज्ञानें ॥७॥
नाना ह्मणे ठेवीं चरणांवरी माथा । जुंपूनियाम रथा निघतसे ॥८॥

१७४.
सारथ्यासीं सांगे हांकीं हा रथवर । पाहियेलें तीर यमुनेचें ॥१॥
उभा राहोनियां पाहे चहूंकडे । बोलताती कोडें पक्षी-राज ॥२॥
व्याघ्र आणि गायी एकत्र बैसती । कोळिका बोलती कृष्ण कृष्ण ॥३॥
सर्प आणि नाग निस्तेज पडती । चिमण्या बो-लती कृष्ण कृष्ण ॥४॥
वियोगानें तेव्हां मयूरें रडती । शुक डोल-ताती कृष्ण कृष्ण ॥५॥
कृष्णाच्या कृपेनें कळलें उद्धवासी । धन्य धन्य त्यांसी ह्मणे तेव्हां ॥६॥
ब्रह्मज्ञान सांगों देवें पाठविला । तो रडूं लागला तयेवेळी ॥७॥
नामा ह्मणे आला नंदाचिया घरा । पुढलें अवधारा निरोपण ॥८॥

१७५.
धांवोनियां नंदें धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥
सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥
रोहिणीचा पुत्र सखी आहे राम । स्मर्रे पुरुषोत्तम कधीं आह्मां ॥३॥
गोकुळांत गौळी आहे एक नंद । आठवी गोविंद कधीं तरी ॥४॥
काय माझें पुण्य उद्धवा सरलें । ह्मणोनि टाकिलें कृष्ण-नाथें ॥५॥
परब्रह्म पूर्ण धाडी मी वनासी । ह्मणोनी ह्लषिकेशी को-पलासे ॥६॥
मेघ:श्याम मूर्ति सकुमार पाउलें । न देखती डोळे आतां माझे ॥७॥
ऊठ नंदा जेऊं कोण ह्मणे आतां । दु:ख माझ्या चित्ता फार वाटे ॥८॥
नेत्रीं अश्रुधारा कंठ सद्नदीत । पडीला मूर्च्छित नामा ह्मणे ॥९॥

१७६.
पडियेली जेव्हां यशोदेसी भ्रांती । ऐकें परीक्षिती प्रेम तिचें ॥१॥
खोडी नको करूं ह्मणे दटाविलें । ह्मणोनि रुसलें तान्हें माझें ॥२॥
नंदासी ह्मणत पाहूं कोठें कृष्णा । दाटलासे पान्हा स्तनीं माझ्या ॥३॥
उद्धव चित्तांत करीतसे खेद । यशोदे सावध होई माते ॥४॥
निर्दय पापीण बांधीं मी उखळासी । म्हणोनि रुसलासी देवराया ॥५॥
माती खातां वेळे तुज मी मारिलें । म्हणोनि टाकिलें मजलागीं ॥६॥
नामा ह्मणे त्यांचें करीं समाधान । सांगे ब्रह्मज्ञान दोघांजणा ॥७॥

१७७.
प्रात:काळीं उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा ॥१॥
परस्परें ह्मणती कोण आतां आला । न्यावया नंदाला पाठविलें ॥२॥
सकळांच्या प्राणा घेऊनियां येईं । ह्मणोनियां पाहीं धाडी यासी ॥३॥
भ्रमरासी स्रिया कुशब्दें ताडिती । आव-डीनें बोलती नाना शब्द ॥४॥
धावून उद्धवाचे धरीती चरण । आमुचें स्मरण करितसे ॥५॥
स्वरूपहीन आम्ही सुंदर कंसदासी । ह्मणोनि तुजसी पुसतसों ॥६॥
आह्मांसाठीं तेथें जाऊनियां ह्मणे । एकदां चरण दावी सर्वां ॥७॥
गेल्या गोपिका त्यांची राख झाली । वाजवी मुरली तया जागा ॥८॥
नामा ह्मणे त्यांसीं सांगे ब्रह्मज्ञान । श्रीकृष्ण कृपेनें स्थिरावल्या ॥९॥

१७८.
समस्तांचें त्यानें केलें समाधान । सारिलें भोजन सक-ळिकीं ॥१॥
यशोदा आणि नंद देती अलंकार । कृपा दीनावर असों द्यावी ॥२॥
गोपाळ गौळणी पुसती उद्धव । मिळोनियां सर्व बोळ-विती ॥३॥
पक्षी श्वापदांसी सांगत उद्धव । असों द्यावा भाव कृष्णापायीं ॥४॥
आला मथुरेसी सांगे वर्तमान । नामा ह्मणे धन्य श्रोते वक्ते ॥५॥

१७९.
अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषलें मन फार त्याचें ॥१॥
घालेनि आसन प्रक्षाळी चरण । ह्मणे धन्य दीन आजीचा हा ॥२॥
जोडिनियां हात घाली नमस्कार । जाहला उद्धार पूर्वजांचा ॥३॥
हस्तनापुरासि अक्रूरा त्वां जावें । सांगितलें देवे नामा ह्मणे ॥४॥

१८०.
अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेलें पूर कौर-वांचें ॥१॥
धृतराष्ट्रा सांगे विवेकाच्या गोष्टी । फार तुझ्या पोटीं दुष्टबुद्धी ॥२॥
बंधूचिया पुत्रा धरितोसी दूर । होसी लोमापर पुत्रांवरी ॥३॥
करितोसी द्वेष पंडूच्या पुत्रांचा । होशील नरकाचा अधिकारी ॥४॥
स्वर्गींचे पूर्वज हांसतील तुज । धरावा उमज ग्रेथोनियां ॥५॥
सांगोनियां ऐसें येथूनि उठला । कुंतीसी भेटला नामा म्हणे ॥६॥

१८१.
देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की ॥१॥
पाहोनी तुज झालें समाधान । सुखी आहे कृष्ण मथुरेंत ॥२॥
आमुची एक कुंती आहे हस्तनापुरीं । स्मरे तो अं-तरी किंवा नाही ॥३॥
बहुता दिवसां तुज धाडिलें आक्रूरा । ह्मणोनि अंतरा सुख वाटे ॥४॥
माझिया बाळासी फार देती दु:ख । नाही मज सुख क्षणभरी ॥५॥
राजा पंडु आम्हां टाकूनियां गेला । रक्षी बाळकाला कोण आतां ॥६॥
नामा म्हणे ऐसें सांगतसे कुंती । शिंपियेली क्षिती आश्रुपातें ॥७॥

१८२.
निरोप हा माझा सांगरे कृष्णाला । भरंवसा मजला आहे तुझा ॥१॥
अच्युता अनंता श्रीधरा वामना । अगा नारा-यणा शरण तुज ॥२॥
जनार्दन हरि त्रिविक्रम केशवा । अगा वासुदेवा शरण तुज ॥३॥
गोविंदा माधवा अगा मेघ: शामा । अगा पुरुषोत्तमा शरण तुज ॥४॥
चक्रपाणी अगा वैकुंठनायका । रक्षी या बाळका दासा तुझ्या ॥५॥
त्रिविधतापें माझी जळतसे काया । दावीं मज पायां एक वेळां ॥६॥
विदुर अक्रूर करिती समाधान । करावें श्रवण नामा म्हणे ॥७॥

१८३.
परब्रह्म पूर्ण तुझा आहे सखा । मानिसी कां दु:खा जननीये ॥१॥
इंद्राचा अवतार आहे हा अर्जुन । घेईल हा प्राण कौरवांचा ॥२॥
करील गे युद्ध धरोनियां धीर । न देखें मी वीर त्रैलोक्यांत ॥३॥
सांगूनियां ऐसें पुसोनी सर्वांसी । आला मधुरेसी नामा म्हणे ॥४॥

“संत नामदेव गाथा” बालक्रीडा अभंग १ ते १८३ समाप्त 

“संत नामदेव गाथा बालक्रीडा”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *