संत नामदेव

संत नामदेव गाथा रूपके

संत नामदेव गाथा रूपके  – शेत – अभंग १ ते २

१.
संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें ।
उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे ॥१॥
संसार शेत करि कांरे आल्या देहाचिया लाहे परि । भक्ति उंच माळा उभा राहुनि हरिनाम सोंकरिरे ॥२॥
हरिश्चंद्र राजा सात्विक भला तेणें बाहो केला । सत्त्व नांगर त्रिगुण तिफणि निर्वाण कुळव धरिला ।
भक्ति कुर्‍हीवरी उभा राहूनियां बहुत भाग्य पिकला । खळेदाणे तेणें दिधले ब्राम्हण युगायुगीं तरलारे ॥३॥
शिराळ शेटी कुळवाडी मोठा बहु सोसियेल्या वेठी । आलिया गेलिया जेववी राड भक्ता देतो थोर सृष्टी ।
भला म्हणोनि जगीं वाखाणिला देव आला त्याचे भेटी । मुक्ति शेत तया इनाम दिधला ठाव दिला वैकुंठीं ॥४॥
रावणाचें शेत चवदा चाहुर दाटल्या दुर्बुद्धी पेढी । गर्व अहंकार दाट खुंट झाडें शेत आलें तेणें पडी ।
किडा मुळिंजो बैसला बीज गेलें तेणें वोढी । बटकर बाण अंगीं जो सेकला तोही झाला देशधडीरे ॥५॥
अवघी कुळवाडी कौरवें केली नाटोपेचि दुर्योधन । अर्ध वांटेकरी धर्म दुराविला शेतासि नाहीं रक्षण ।
अधर्म टोळीं शेत जें खादलें बिज गेलें चौपट होऊन । हरिभक्तिविण फलकट जालें न जोडे कृष्ण निधानरे ॥६॥
पांचही पांडवीं नवाट काढिलें वाहिलें सद्वैत वन । निरंजन वन शेत जें पिकलें आपण कृष्ण रक्षण ।
द्रौपदी सुंदरी डाहोरा जो केला दुर्वासा दिधलें भोजन । अनंत खंडी सांजे जे पिकली जोडलें कृष्ण निधानरे ॥७॥
ज्ञानदेव चांगदेव वटेश्वर निवृत्ति मुक्ताई सोपानदास । परसाभागवत सांवता सालया रसाळ चोखा मुधेश ।
परमानंद जोगाजनमित्र नागा गोरा दागा कूर्मदास । इतुके शेतकरी त्यांचा अंगेवाटे करी नामा विष्णुदासरे ॥८॥

२.
याहो क्षेत्र केलें जुंपिलीं आउतें । अठारा धान्यें तेथें पेरियेलीं ॥१॥
मेघ:शाम मेघ वर्षें सर्वा धारीं । बीज विटेवरी सिन्नलें ॥२॥
जगाचें जीवन पंढरी पिकली । चराया सोकलीं भुतें जाणा ॥३॥
घालूनियां माळा रक्षी कळिकाळा । काय कलिमळा संसाराची ॥४॥
पापा सोंकरणें भक्ति हे गोफण । भूस सांडी कण वेंचिताती ॥५॥
वेदशास्त्र ऐसे बोल बोलविता । गूढ वेगळितां लाभ हेती ॥६॥
नामा म्हणे स्वामि विठ्ठल सुकाळ । अन्न ब्रम्हा फळ त्रिभुवनीं ॥७॥

संत नामदेव गाथा रूपके  – शेत – अभंग १ ते २ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके  – कुळवाडी – अभंग १ ते ३

१.
चालती कुळवाडी नटके । उपकें घेतलीसें नाके ।
चार वर्षें पिकलें निकें । त्यांचे कण सांचले ॥१॥
पुढें एक विपाणीक पडिलें । त्या कणाचें द्रव्य सांचलें ।
कृपणाचें घर भरिलें । बंचल झाला भक्तांसी ॥२॥
स्त्रियांबाळां खाऊं नेदी । धर्म न करीच निशुद्धी ।
डोईस बांधलीसे चिंधी । खांदीं रकटें ठिगलांचें ॥३॥
त्या द्रव्याचें करी कळांतर लेखा । सजगाणीस देई रुका ।
रुक्यास घेई पैका । आठा दिवसांच्या बोला ॥४॥
सबाई दिडि दुणी । अकर्ताच घरीं आणी ।
तो न भजे चक्रपाणी । पाप धुणी होतसे ॥५॥
तंव एक अतीत घरासी आला । बाईलीनें त्यासी स्वैंपाक केला ।
तंव आपण उठून जागला । झडकरी आला द्वारासी ॥६॥
कोणें दाखविलें माझें घर । त्यावरी घेईन जहर ।
कोठें गेला सुना मोगर । अरगळा कोणें काढिली ॥७॥
ऐसा तो ब्राह्मण चड्फडत गेला । आपण परतोन माघारा आला ।
धांवोनी घाव हाणितला । डोई फोडिली बायलेची ॥८॥
कैसी केली बोहरी । बोज नाहीं तुझे घरीं ।
नागविलें इया पोरीं । तीनवेळां खाताती ॥९॥
ऐसी गजबज ऐकोन । शेजारी आला धांवोन ।
त्यासी हातीं धरोन । गृहाभितरीं हिंडविला ॥१०॥
त्यासी बैसावया दिला पिढा । तों स्वैपाक आणोनी ठेविला पुढां ।
पहा हो बायलेचा धाडस केवढा । ऐका तुम्ही दादोजी ॥११॥
ऐसीं पूर्ण अकरा वर्षें भरलीं । बारा वर्षांची साउली पडली ।
या रीतीनें गुजराण झाली । तंव अग्नि लागला गृहासी ॥१२॥
शेतांतून कुळवाडें केली चोरी । पाणी निघालें पेवा भीतरी ।
सुनेनें घालून घेतलें विहिरीं । ऐसेपरी नागवलो ॥१३॥
ऐसे जे नर असती । ते जन्मोजन्मीं नागवती ।
त्यांची न चुके यातायाती । विष्णुदास म्हणे नामा ॥१४॥

२.
आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥
वाचा पिकली पिकली । हरिनामाची वृष्टी झाली ॥२॥
दशमी एकादशीच्या दिवशीं । झाल्या कैवल्याच्या राशी ॥३॥
संत म्हणती नामा भला । हरिनामाचा सुकाळ झाला ॥४॥

३.
जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥
तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥
आत्मयांची करुनी कुवे काठी । वारा लागतो जगजेठी । तारूं चाले थोरा नेटी । विठ्ठल भेटी पंढरीये ॥३॥
तारवा सांपडलें बंदर । राया विठोबाचें नगर । तें बा संताचें माहेर । विष्णुदास म्हणे नामा ॥४॥

संत नामदेव गाथा रूपके  – कुळवाडी – अभंग १ ते ३ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके  – घोंगडें – अभंग १ ते २

१.
पाटोळा तिंमलारे मजवरी घालीं कांबळें ॥ध्रु०॥
आषाढमासिचारे कैसा शीतळ वारा । वर्षतो मेहुलारे कैशा शीतल धारा ॥१॥
झिरमिर झिरमिररे कैसा वर्षतो मेहू । जाळीचें घोंगडें बा मजवर घालीं सेवू ॥२॥
प्रेमाचें भरतेंगा कैसा महापूर आला । नामया विष्णुदास केशवराजीं मिनला ॥३॥

२.
औट हात घोंगडें दिधलें हरी । पांधरलों नाहीं घणीवरी ॥१॥
माझें घोंगडें कृष्णा गा जतन करीं । नागविलें थोरीं पांचाजणीं ॥२॥
साठी तीनशें दसोडी । पदरीं औट कोडी रोमावळी ॥३॥
बहात्तर गांठी सोळा फुंदणी । घोंगदी दाटणी होत असे ॥४॥
त्निगुणी दोरिया जाणा । घोंगडें पांघरवी पंढरीराणा ॥५॥
त्यांचें घोंगडें त्यासी दिधलें । उघडें नामे भक्ती पांघरविलें ॥६॥

संत नामदेव गाथा रूपके  – घोंगडें – अभंग १ ते २ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके पिंगळा– अभंग १

पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥
देवा शकून ऐकावा ॥ध्रु०॥
संत साधु आपरमीत । अवघा करियेला थाट । टाळवीणे वाद्य वाजत । आवडी मंजुळ स्वरें गात ॥२॥
नादें अंबर दणाणलें । तेहतीस कोटी देव मिळाले । आवडी पहावया आले । स्वर्गसुखातें विसरले ॥३॥
आई रखुमाई माते । उठवा उठवा श्रीरंगातें । नारद तुंबर गायनातें । कर जोडूनि हनुमंत ॥४॥
उठिला सांव्ळा वनमाळी । आनंदली भक्तमंडळी । जयजयकारें पिटिली टाळी । विठ्ठल नामें दिधली आरोळीं ॥५॥
पिंगळा आनंदला मनीं । तेज न माये गगनीं । हर्षें घातली लोळणी । शिंपी नामा तुझे चरणीं ॥६॥

संत नामदेव गाथा रूपके पिंगळा– अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके धेनु– अभंग १ ते २

१.
वेणुनादीं चरे पाणी पी भीवरे । ते धेनु हूंबरे वत्सांलागीं ॥१॥
वाणें ते सांवळी नामें ते श्रीधरा । चरे वसुंधरा चवदा भुवनें ॥२॥
केशव नामें गाय माधव नामें गाय । विठ्ठल नामें गाय कामधेनु ॥३॥
प्रेमें ते पान्हावे भक्ता घरीं जाय । भूकेलिया खाय पातकासी ॥४॥
नामा म्हणे गाय भाग्यवंता घरीं । पाप्या जन्मवरी पाठीलागे ॥५॥

२.
परा पश्यंति मध्यमा वैखरी । ते गाय दुभे वैष्णवा घरीं ॥१॥
ते एके विठ्ठलें पंढरी राखिली । दुभावया दिधली पुंडलिका ॥२॥
चार्‍ही वेद मुखीं धरूनियां राहे । विठ्ठलाचे द्वारीं नामा गाये ॥३॥

संत नामदेव गाथा रूपके धेनु– अभंग १ ते २ समाप्त 


संत नामदेव गाथा रूपके – गोंधळ – अभंग १ ते २

१.
प्रथम अवतारीं आई थोर ख्याति केलीवो । ब्रम्हयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप झाली वो ।
धुंडाळिला सागर आई शंखासुरा मिठी घाली वो । वधियले राक्षस ब्रम्हपुरीं त्वां स्थापिलें वो ॥१॥
ऐसी बहु लोकां माझारी आई खेळतसे गोंधळींवो । तेहतीस कोटि देवता सवें मेळवुनी मेळींवो ।
त्रासिले राक्षस भक्त जना प्रतिपाळींवो ॥२॥
कूर्म वेश धरुनी धरणी पाठीवरी धरिली वो । महेंद्र मंथन मेळीं आंबा वेगीसी पावली वो।
समुद्रमंथन करितां आई बरवा गोंधळ घाली वो । नारायण विश्वरुप देवा जैं त्वांच दिधलें वो ॥३॥
वराह रूप धरुनी आई थोर पवाडा केला वो । पृथ्वीच्या कैवारा घालिसी गोंधळ गाढा वो ।
वधिला हिरण्याक्ष त्याचा केला त्वां रगडावो । खेचर देवता धरणी धरियली दाढा वो ॥४॥
विक्राळ रूप धरुनी स्तंभ फोडुनी निघाली वो । सिंहनादें गर्जतां हाक त्रिभुवनीं गाजली वो ।
वधिला हिरण्यकश्यप अंतरमाळा गळां घाली वो । प्रर्‍हादाकारणें कैसी गोंधळीं नाचली वो ॥५॥
इंद्राच्या कैवारा आई सानें रूप धरिलें वो । बळिच्या द्वारा जाऊन भूमिदान मागितलें वो ।
त्रिलोक मोजिततं बळिस पाताळीं घातलें वो । मागुता येईल म्हणवुनी त्याचें द्वार त्वां रक्षिलें वो ॥६॥
जमदग्नि रेणुके कुशीं धरियेला अवतार वो । हातीं परशु घेउनी केला दैत्यांचा संहार वो ।
एकविस वेळ मेदिनी नि:क्षत्रिय करुनी फेडिला भूमिभार वो । वधिला सहस्रार्जुन कामधेनूच्या कैवारा वो ॥७॥
पितृवचनाकारणें आई वनवासासी गेली वो । अठरापद्में वान्नर मेळवुनी गोंधळ घाली वो ।
वधिला दशशिर लंका शरणागता दिधली वो । कौसल्या माउलि देवा बंदी सोडी केली वो ॥८॥
वसुदेवकुळटिळके तरी तूं कंसासुर मारिके वो । कुळांतकुळ तारिके तरी तूं कौरव संहारिके वो ।
पांडव प्रतिपाळके भक्तजनाशी तारके वो । तुझा गोंधळ गाता अंबे कोण वर्णूं शके वो ॥९॥
वेदमार्ग सांडुनि असुरें देवा गांजियलें वो । त्याचिया कैवारा आई त्वां सौम्यरूप धरिलें वो ।
बौद्धरूप धरुनी भक्तालागीं मोहिलें वो । कौसल्या देवता जे त्या रूपें त्वां दिधलें वो ॥१०॥
कलियुगाच्या अंतीं थोर होईल अन्नान्न वो । एके ठायीं होउनी खातील चारी वर्ण वो ।
तेव्हां पृथ्वी भारें तुजला येईल शरण वो । तेव्हां तूं पावसी कलंकी अवतार धरुनी वो ॥११॥
पुंडलिकाकारणें पंढरपुरीं केला वास वो । तुझा गोंधळ गातां थोर जिवा उल्हास वो ।
तूं माये माउली तुझा मज बहु विश्वास वो । विनई विष्णुदास नामा तुझा दासाचा मी दास वो ॥१२॥

२.
विठाई सांवळे डोळसे रंगा येईं हो ॥ध्रु०॥
कानीं कुंडलांची प्रभा । जैसे चंद्रसूर्य नभा हो ॥२॥
गळां वैजयंती माळा । कासे पीतांबर पिवळा हो ॥३॥
नाम म्हणे कृपावंता । झडकरी यावें पंढरिनाथा हो ॥४॥

संत नामदेव गाथा रूपके – गोंधळ – अभंग १ ते २ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – डांक – अभंग १

वाजचिली डांक चौक ठेवियला वो । ठायीं पंढरींचे विठठले तुज हाकारा केला वो ॥१॥
रंगा येईंवो खेचरे विठाई सुंदरी वो । तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी द्दष्टी देखेन वो ॥२॥
पाजळला दीपु फिटला अंधकारु वो । न लाचा उशीरु पांडुरंगे माउलीये वो ॥३॥
तमोगुणाचा रज जाळूनि धूप केला वो । उशिरु कां लाविला पांडुरंगे माउलीये वो ॥४॥
तनुमनाची मूद ठाकीन तुज वरोनी वो । ठैकुंठवासिनी पांडुरंगे माउलिये वो ॥५॥
अहंकार दैवतें झडपिलें नामयासी वो । येऊनियां रंगासी रंग राखीं आपुला वो ॥६॥

संत नामदेव गाथा रूपके – डांक – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – वासुदेव – अभंग १

बाबा अहंकार निशीं घनदाट । गुरु वचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दविला चोखटगा ॥१॥
नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ध्रु०॥
रेक बोल सुपष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रम्हानंद होय आघवागा ॥२॥
आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें शरीरा । फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारागा ॥३॥
अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळुगा ॥४॥

संत नामदेव गाथा रूपके – वासुदेव – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – पांगुळ – अभंग १

जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणीं लक्ष लागो । ज्याशी नाहीं पंख पाय तेणें करावें तें काय ।
शुद्ध भाव धरोनियां पंढरीसी जाय इच्छिलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥२॥
सुदामा ब्राम्हण दु:खें दारिद्रें पीडिला । मुष्टिभर पोहे घेऊनि त्याचे भेटीलागीं गेला । शुद्ध भाव देखोनियां गांव सोनियाचा दिला ॥३॥
गण आणि गोत्नज सर्व हांसताती मज । गेलें याचें मनुष्यपण येणें सांडियेली लाज । विनवी तो शिंपी नामा संत चरणींचा रज ॥४॥

संत नामदेव गाथा रूपके – पांगुळ – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – स्वप्न – अभंग १

देह मंदिराभीतरीं । शेजे सूदला श्रीहरी । निद्रा उन्मनीचे भरी । तें म्यां स्वप्न देखिलें ॥१॥
स्वप्नीं भुललें बाई । मागील नाठवेचि कांहीं । हा जीव परवस्तूच्या ठायीं । तनुमने आटला ॥२॥
स्वप्न सांगूं कोणासी । विवेक करिती तयासी । हें कोडें अज्ञानासी । संतावांचुनी नुगवे ॥३॥
ध्यानीं पहूडला सांवळा । जवळी नारी बारासोळा । विंजणे वारिती सकळां । सोहं शब्द जागरणीं ॥४॥
धिं धिं तुरे वाजती । अनुहात ध्वनि गर्जती । तेथें निद्रा ना सुषुप्त । चंद्र सूर्य मावळले ॥५॥
मना पवना नाहीं भेद । तया ठायीं हा गोविंद । तेथें खुंटला अनुवाद । वेदश्रुति आटल्या ॥६॥
म्हणे विष्णुदास नामा । जन्मरण नाहीं आम्हां । कृपा केली मेघ:श्यामा । संतसंगें तारिलों ॥७॥

संत नामदेव गाथा रूपके – स्वप्न – अभंग १ समाप्त 


संत नामदेव गाथा रूपके – हरिजागर – अभंग १


कैलास भुवनीं । देव वैसले सिंहासनीं । आपण भवानी । कर जोडुनी उभी असे ॥१॥
भक्तिरस द्यावा । तेथील अनुभव ध्यावा । नित्य हरिजागरू सांगावा । कोण फळ तयाचें ॥२॥
तंव चंद्रचूड संतोषला । देवी प्रश्न बरवा केला । अमृतवोघ प्रचर्तला । दुजें बोलती व्यापकें ॥३॥
या हरिजागराचें फळ । तुज सांगेन सोज्वळ । महादेव ऐसें बोलिले । प्रेमभावें गिरजेसी ॥४॥
परिसा हरिजागरू । गिरजेसी सांगे महेश्वरू । नवविधा भक्तीचा प्रकारू । शिवतत्त्वीं बोलतों ॥५॥
प्रथम अश्विनीचा भरू । पूर्ण तिथि जी शंकरू । करुनी व्रतांचा स्वीकारू । मास दीनपर्यंत ॥६॥
मग मिळोनि संतसज्जन । करावें हरिजागरण । गीतवाद्य सुलक्षण । नृत्य विलास तांडव ॥७॥
मग सारोनि देवासी मार्जन । वरी गंगोदकें स्नान । मग वस्त्रें परिधान । देवासी करावीं ॥८॥
यज्ञोपवीत अलंकार । करोनि पूजा नमस्कार । आणि नैवेद्य नानाप्रकार । भगवंतासी अर्पावा ॥९॥
सद्यस्तृप्त घृत पूर्ण । वरी षड्रस पक्कान्न । भावें सर्वांसी पूजोन । नमस्कार भावें करावा ॥१०॥
मग करावी वैष्णवांची पूजा । मनीं भाव न धरावा दुजा । स्वयंभ मूर्ति मीच सहजा । सदा संतां जवळिकें ॥११॥
संत मार्जनादि भेदू । जेंवी मिळणी गंगासिंधू । अखंड वाचे परमानंदू । हरिकीर्तन करावें ॥१२॥
त्या हरिजागराचें महिमान । दुजें नाहीं समाधान । सकळ तीर्थ केलिया पुण्य । परी सरी न पवशी ॥१३॥
सकळ तीर्थांची परवडी । दान देतां पृथ्वी थोकडी । या हरीजागराची प्रौढी । ते तयाहूनि अधिक ॥१४॥
पहिले पक्षीं मज अर्पिला । दावा विष्णु थोर झाला । दुजा पक्षु सांगाजी वहिला । म्हणोनि नमस्कारिलें शंकराशी ॥१५॥
परिसे गिरिजे देवी । कथा सांगेन बरवी । फळ पावती मानवी । अंत:करणीं कल्पिलें ॥१६॥
दुजा पक्षु प्रथम तिथी । वैश्वानरेसी प्रीत्यर्थीं । बीज ब्रम्हया सांगती । ऋषीसहित उपचारू ॥१७॥
पंचमी अष्ट्मी नागकुळा । शेषादिका सकळां । प्रीत्यर्थ पावो नागकुळा । षष्ठी स्वामी कार्तिक ॥१८॥
भानु सप्तमीं जागरीं । जैसा समुद्र सरिता सागरीं । अष्टमीची अवधारीं । माझारीं मृत्युलोक ॥१९॥
नवमीच षष्ठी योगिनी । आणि चार कोटी कात्यायनी । दुर्गेसहित भवानी । दशमी यम पवित्र गुणी ॥२०॥
तेहतीस कोटी एकादशी । ब्रह्मा हरिहर वोरसी । नंदी धेनु तेरेसी । आणि चतुर्दशी परियसा ॥२१॥
पौर्णिमा चंद्रतारा । इंद्रादिकां देवां सकळां । इत्यर्थ पावो देवां सकळां । जे बोलिया वेदश्रुति ॥२२॥
संतोषोनिय यमापती । ऐसें पुराणें बोलती । या हरिजागराची स्थिती । तुजप्रति सांगितली ॥२३॥
हें सकळ मीच भोक्ता । येर परिवार देवता । भ्रांति मीच भाविता । भावेंविण न कळे मी ॥२४॥
जेथें भाव तेथें देवो । आन न धरावा संदेहो । विश्वसृष्टी एकचि पहा हो । तरी मी असें जवळीकें ॥२५॥
विष्णुदास नामयासी । हरिचें नाम सदा मानसीं । राम हा मंत्र उपदेशी । भवसागर तरावया ॥२६॥

संत नामदेव गाथा रूपके – हरिजागर – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – कूट – अभंग १ ते १६


एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें ।
बापुडें ब्राम्हण नागविलें । धाऊनि आलें वोसगांवींचें ॥१॥
वोसगांवींचा हनुमंत खोटा । त्याचा बाप जुनाट चोरटा ।
मारूनि नेतो दाहीवाटा । जन चोहटा नागविलें ॥२॥
नागविला चोहाटीचा वाणी । अणिक नेली प्रभुची गोणी ।
शेळी आली लांडगा घेउनी । गाढव बंदीखानीं बोंबलत ॥३॥
एका संन्याशानें कुतरें खादलें । गांवच्या खाटका प्रायश्चित्त दिल्हें ।
बापुडे कुंभार नागविले । डोचकें फोडिलें म्हातारीचें ॥४॥
ऐशा सिद्धांतीच्या खुणा । एक जाणे पंढरीराणा ।
नामा करी विज्ञापना । संत प्रेमळ जाणती ॥५॥

२.
मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥
उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥
अवघें आकाशा मुंगीये मागें । मुंगीये संसार सांडिला मागें ॥३॥
विष्णुदास नामा मुंगीये मागें । मुंगी उमगली खेचासंगें ॥४॥

३.
मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं ॥१॥
मुंगी उमगा मुंगी उमगा । मुंगीचे माथां त्निवेणी गंगा ॥२॥
मुंगीचे गळां तुळईचा लोढणा । विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥३॥

४.
समुद्राचें पाणि मुंगी मुखांतूनी । काढाया लागोनि श्रम थोडे ॥१॥
केशवाची भक्ति कठीण त्याहनि । वांयां दंभपणीं नोहे नोहे ॥२॥
आकाश अंगुळें नामप सुयेमान । भूमीचें वजन पालडेनि ॥३॥
नामा म्हणे वारा वळूं ये कदापि । केशवाचे रूपीं नव्हे बुद्धि ॥४॥

५.
आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्‍या कानीं गोष्टी सांगे ॥१॥
कांसवीचें दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं  ॥२॥
वारियाच्या लोथा बांधोनियां माथां । वांझेचिया सुता बळिवंता ॥३॥
मुंगीनें त्नैलोक्य धरियलें तोंडीं । नामा म्हणे पिंडीं प्रचीत आहे ॥४॥

६.
हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥
गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥
जिताचि कोष्टी घातला खाचे । प्रेमेंविण कुंभार नाचे ॥३॥
लोहार हिंवाविण तापे । सोनारा लागले धापे ॥४॥
नामा म्हणे यातिचे चाळे । दुखणेंविण परीट विवळे ॥५॥

७.
अकरा लोचन त्याचे पांच मुख । आठ कान देख पुच्छ दोन ॥१॥
अरत अखंड निरत प्रचंड । उमाळ उदंड उभा फार ॥२॥
दहा पाय चहूं चालत ते जाय । नव्हेत ग माय सावज त्या ॥३॥
नामा म्हणे त्याचा अर्थ करीं चोख । पूर्वज पातक लया जाय ॥४॥

८.
बारा हात लुगडें एकचि नारी । पालऊं घातला खांदियावरी ॥१॥
जाईन त्या गोकुळा पाहीन त्या गोपाळा । तयालागीं उतावेळ मन माझें ॥२॥
एका हातीं घातला तांबियाचा वाळा । हाळदुळी वांटुनी सुद्लें मी डोळां ॥३॥
एकली जातां नोळखे मातें । विष्णुदास नाम्यास नेईन संगातें ॥४॥

९.
राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे ।
पिंडामध्यें आहे त्याचा शोध तुझी करारे । मेरूच्या शिखरीं त्या पांखराचा थारारे ॥१॥
येऊनि संसारा याचा अनुभव तुम्ही करारे ॥ध्रु०॥
चौर्‍यांशीं लक्ष योनी चुकेल जन्माचा फेरारे ॥ध्रु०॥
अठ्ठावीस योजने तया पांखराचा फेरारे । बत्तिसा मुखांनीं तें बा घेतसे चारारे ।
अहं सभेमध्यें ताचा शोध तुम्ही करारे । अकराही लोचन तया चोंची असती फाररे ॥२॥
एकवीस स्वर्गंहुनी तया पांखराची उंचीरे । सप्तहीं पाताळाखालीं तया पांखराची नीचीरे ।
नेत्रांतील बाहुली तया पांखराची निचीरे । उडालें पांखरूं सप्तही सागर घेऊन चोंचींरे ॥३॥
ऐसें तें पांखरूं दादा आहे सृष्टीवरीरे । मेरु आणि मांदार तया पांखराचे उदरींरे ।
शिवाचें आसन दादा कवणिये परीरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं म्हणती दशवे द्वारींरे ॥४॥
ऐसें तें पांखरूं गोरक्ष्ररायें वळखिलेंरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं मछिंद्रनाथें देखियेलेंरें ।
त्याचियेनीं अंगसंगें सद्रुरुनाथें दाखविलेंरे । त्याचियाचि प्रसादें नामा शिंप्यानें गाईलोंरे ॥५॥

१०.
प्रळयाचे ळाळीं ब्रह्मांड जळालें । कोण त्यांत उरलें सांगा मज ॥१॥
प्रभा ते फांकली जाती  ते गुंतली । सांग मज खोली स्वरूपाची ॥२॥
ब्रम्हांडाची जेव्हां राख जळून झाली । कोणी ती लाविली अरूपरूपीं ॥३॥
विष्णुदास म्हणे सांगा हेंचि गूढ । नाहीं तरी मूढ होऊनि राहें ॥४॥

११.
मेलें जित्यासी सांगे गोष्टी । आंधळें ओंवी सुवर्णाच्या गांठी ।
पांगुळ लागे पवनाच्या पाठीं । बाळका पोटीं माय वाढे ॥१॥
थोटयानें धवलार रचियेलें । मुकें पुराण सांगूं बैसलें ।
सवेंचि बहिरें ऐकों ठेलें । वेडें हांसलें शहाणीयासी ॥२॥
आणिक एक नवल सांगूं काई । जीत वाघ शलभानें भक्षिला पाहीं ।
मुंगीनें पर्वत उचलिला बाहीं । माशी करी साही सूर्यासी पैं ॥३॥
मृदंगें वाहिला गुरव राणा । वांझेच्या स्तनीं संचरला पान्हा ।
माथां फुलें खोऊं नाचे दवणा । जाण सुजाणा न कळेची ॥४॥
मुरकुटें सगळा सागर शोषिला । माशानें पारधी मारिला ।
सशानें सिंह भोवंडिला । वेदांपुराणां न कळेची ॥५॥
हें तुम्ही म्हणाल उमानें । हें तंव उफराटें द्दष्टी पहाणें ।
विष्णुदास नामा म्हणे । अनुभवी या खुणा जाणती ॥६॥

१२.
नीर समुद्र तो कोण । कोठें क्षीराब्धि आसन ॥१॥
दधि समुद्र कोण्याठायीं । खारा समुद्र कोण्या गृहीं ॥२॥
रत्न समुद्र तो कोण । कोठें मदनाचें आसन ॥३॥
मन समुद्र कोठें आहे । नामा म्हणे शोधून पाहे ॥४॥

१३.
नेत्र नीर समुद्र देखा । क्षीर सत्रावी ओळखा ॥१॥
दधिसमुद्र नाकीं आहे । खारा शरीरीं तो पाहें ॥२॥
नाभीं रत्नाकर देखा । माथां मदन ओळखा ॥३॥
नामा म्हणे सांगूं काय । मन समुद्र ह्रदयीं आहे ॥४॥

१४.
राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें ॥१॥
कैसी नागवण आलीरे बापा । वेंचा परतें पाप आणिक नाहीं ॥ध्रु०॥
सहाजणां ब्राह्मणां सहा सवा शेराचा भात । कढींत हिंग जिरें मिरें बहुत ।
त्यावरी घातलें मुगाचें वरण । येवोका मरण जिवित्यांसी ॥२॥
सहाजणां ब्राम्हणां घातले सहा वडे । घालितां रडे उकसाबुकसीं ।
त्यावरी घातलें तूप लोणकदॆं । जावो कां मढें या जेवित्यांचें ॥३॥
सगळ्या गव्हाची रांधिली क्षीरी । ही एक महामारी आली देखा ।
त्यावरी घातला साखर गुळ । उठोका पोटशूळ जेवित्यांसी ॥४॥
जेवण झालें दहीभात आला । तंव आत्मा लागला ब्रम्हांडासी ।
बहुतेक दिवसासी अंतर पडिला । समुळीं नागविला म्हणे नामा ॥५॥

१५.
मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती । ॥१॥
आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥ध्रु०॥
लटिकें गेलें कटके तेथें गाडग्या एवढें राळें । उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीयेवढे डोळे ॥२॥
शेळी करी घुसळण तेथें मांजर काढी लोणी । उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥३॥
पाण्यांत कांसव गीत गाय वनांत कोल्हा नाचे । सावज मनीं संतोषला खोकड पुस्तक वाचे ॥४॥
कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी । बागुल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥५॥
बाभुळीचे खोडीं माशानें केलें कोटें । सशानें सिंह ग्रासिला बेडुक आले लोटें ॥६॥
विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती । लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥७॥

१६.
त्रिभुवनाची परी मांडिली शरीरीं । गोकुळाभीतरीं उभारिलें ॥१॥
शेषाचीये द्दष्टी मूळ भूमिका चोखटी । तेथुनी मूळ सृष्टी आरंभिली ॥२॥
मन विंदानीं आणि कुंडलणी चतुर्दळांपासुनी । पवनवेगीं टाकुनी पति समया स्वाधिष्टानी ॥३॥
मणीपूर पर्यंत तळवट शोभिवंत । तेथुनी टाकितसे नीट कर्मभूमीं ॥४॥
बारा सोळा नारी श्रीपति मुरारी । ह्रदय मंदिरीं गोपीराजु ॥५॥
कनक घाटेवरी सत्नावी सुंदरी । चाले उन्मत्त भारी चंद्रकळा ॥६॥
तेथें रोवियला दारवंटा दावी त्याच्या वाटा । जावया वैकुंठा गौळियांसी ॥७॥
मृत्यूलोकींचिया सैंवरा आल्या ज्या चौबारा । देखिल्या त्या घरां चौघीजणी ॥८॥
त्या चिपोळीया वाहती मिळोनियां येती । चालती मागुती पश्चिमपंथीं ॥९॥
अनुहतावरी वाट करुनी नीट । विशुद्ध नगरा येती धीट ॥१०॥
तेथुनी वाटा असे नीट दारवंटा । तेथूनि जावें ब्रम्हरंध्र कपाटां ॥११॥
हेंचि परब्रम्हराऊळ तेथुनी । जाऊं नये उढारीं सांडुनी राया ॥१२॥
तेथें रविशशीवरी आणि ब्रम्हरश्मी स्वरूप । एकांत ओवरी आहे अमूप ॥१३॥
विष्णुदास नामा सांगे निर्वाणींच्या खुणा । अनुभवी तोचि जाणें येरा चोजवणा ॥१४॥

संत नामदेव गाथा रूपके – कूट – अभंग १ ते १६ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – खेळिया – अभंग १

नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥
आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें जाणुनि खेळ खेळेरे ॥धृ०॥
ब्राम्हणाचें पोर एक खेळासि भ्यालें । तें बारा वर्षें लपालेंरे । कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलेंरे ॥३॥
साहा तोंडया एक संभूचें बाळ त्यानें । बहूतचि बळ आथियेलेंरे । खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलेंरे ॥४॥
चहूं तोंडयाचा पोर एक नारयाहि जाण । तो खेळिया माजी आगळारे । कुचालि करुनी पोरें भांडवी । आपण राहे वेगळारे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें रानारे । खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहाणारे ॥६॥
खेळिया माजी हनुम्या शहाणा न पडे कामव्यसनींरे । कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैचा तेथें कैचें भांडणरे ।
रामा गडयाची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणरे ॥७॥
यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहूतचि खेळलारे । लहान थोर अवघे मारिलीं । खेळचि मोडूनि गेलारे ॥८॥
ऐसे खेळिये कोठयानकोटी गणित नाहीं त्यालारे । विष्णुदास नामा म्हणे वडीलहो पहा देहीं शोधुनीरे ॥९॥

संत नामदेव गाथा रूपके – खेळिया – अभंग १ समाप्त 


संत नामदेव गाथा रूपके – बागुल – अभंग १

पहिला बागुल तो ऐसा । त्याचें नांव म्हणती मासा । शंखासुर वधिला कैसा । चारी वेद आणिले ॥१॥
कृष्णा राहेरे उगला । नाहीं तर सांगेन त्या बागुला । घुसळणाशी उशीर झाला । रवी सोड गोविंदा ॥धृ॥
दुसरा बागुल बोलती । नाम कांसव म्हणती । जेणें सृष्टि धरली पृष्ठीं । पाय पोटीं धरियेला ॥ कृष्णा० ॥२॥
तिसरा बागुल बोलती । नाम वराह म्हणती । जेणें दाढे धरिली क्षितीं । दैत्य थोर मारिलें ॥ कृष्णा० ॥३॥
चवथा बागुल नरहरी । थोर खांबांत गुरगुरी । दैत्य वधोनी मांडीवरी । भक्त प्रर्‍हाद रक्षिला ॥ कृष्णा० ॥४॥
पांचवा बागुल ब्रम्हाचारी । उभा असे बळिचे द्वारीं । भिक्षा मागोनी निर्धारी । बळिचें द्वार रक्षिलें ॥ कृष्णा० ॥५॥
सहावा बागुल बोलती । नाम परशुराम म्हणती । ज्यानें वधिलें मातेप्रती । पितृवचन मानुनी ॥ कृष्णा० ॥६॥
सातवा बागुल सत्त्वाचा । राम म्हणती दशरथाचा । रावण वधोनी दशमुखांचा । जानकिसी आणिलें ॥ कृष्णा० ॥७॥
आठवा बागुल बोलती । गोकुळीं थोर आहे ख्याती । त्यानें वधिलें कंसाप्रती । देव सुखी केले ॥ कृष्णा० ॥८॥
नववा बागुल बोलती । नांव बौद्ध म्हणती । कोणा न कळे त्याची गती । बौद्धरूपें राहिला ॥ कृष्णा० ॥९॥
होतां कलंकीचा रथू । वेगीं येईंबा धांवतू । नामा म्हणे पंढरिनाथू । बागुल तूं झालासी ॥ कृष्णा० ॥१०॥

संत नामदेव गाथा रूपके – बागुल – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – हुंबरी – अभंग १

समस्त मिळोनि गोपाळीं । तया यमुनेच्या पाबळीं ।
कृष्णे मांडिली धुमाळी । कळंबा तळीं  आनंद ॥१॥
वळूनि कांबळ्या वेठी । त्याही बांधिल्या मणगटीं ।
विवाद मांडिला निकटी । धुर्जटी कान्होसी ॥२॥
आतां कृष्णा कव्णे ठायीं । जासी तुजवरी आली डाई ।
आमची हमामा हुंबरी देईं । उभा राहें पैं कांगा ॥३॥
कृष्ण म्हणे मी एकवटू । तुम्ही आम्ही गडी वाटूं ।
गोवळी घातलासे हाटू । अति निकटू कान्हुसी ॥४॥
म्हणे बळीराम पहागा । बोल नव्हे तुम्हाजोगा ।
तुम्ही समर्थ श्रीरंगा । आम्हां कांगा भेटविसी ॥५॥
ऐसा सकळीं मान केला । तेव्हां कृष्ण संतोषला ।
आनंद चित्तासी पावला । म्हणे भला भला नाम्या ॥६॥

संत नामदेव गाथा रूपके – हुंबरी – अभंग १ समाप्त


संत नामदेव गाथा रूपके – कुस्ती – अभंग १

कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । करें घेऊनि सावकासी । आतां बहु भितो यासी ॥१॥
आम्ही तुम्ही सवें जेवूं । गाई वळावया जाऊं । त्याच्या मानेवर बुक्या देऊं । जवळ जावयासि आतां भिऊं ॥२॥
नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनि उभे राहूं । पायां पडूनि मागुनि घेऊं । जनीं वनीं तो कृष्ण ध्याऊं ॥३॥

संत नामदेव गाथा रूपके – कुस्ती – अभंग १ समाप्त 


संत नामदेव गाथा रूपके – जातें – अभंग १

संसार घन घनदाट । कैं होईल शेवट जातीयाचा ॥१॥
जीव हेंचि जातें कर्म ह्राचि खुंटा । वोढिती बरवंटा चौघीजणी ॥२॥
जातां वैरू वैरणें जंव आहे लहाणे । जातां जाईजणें जाईल जाणा ॥३॥
एकोत्तरशें कौरव वैरिले वैरणा । यांचा पांडावा जाणा तेंचि झालें ॥४॥
नळनीळ मांधाता वैरियले जातां । निमिष न लागतां पीठ झालें ॥५॥
संसाराचा वोढा वोढितां न वोढे । बैस पैलकडे लावीं हात ॥६॥
नामा म्हणे विठोबा दिनाचें माहेर । सदा पंढरपूर गाऊं गीतीं ॥७॥

संत नामदेव गाथा रूपके – जातें – अभंग १ समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *