संत नामदेव

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-आदि

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-आदि अभंग १ ते ३१


जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥
हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन । हेचि निजध्यासन वैराग्याचे ॥३॥
म्हणोनि बैसलों संतांचे संगतीं । गोविंदा विश्रांति गहिनीनाथ ॥४॥


बैसोनि एकांतीं गुरुगम्य गोष्टी । वेदांत परिपाठी शास्त्र बोध ॥१॥
नित्यशुद्धबुद्ध निर्विकार पूर्ण । उमेसी जें ज्ञान शिव सांगे ॥२॥
तेंचि सच्चिदानंद साकार जीव प्राण । शरीर जाय क्षीण जयापरी ॥३॥
तेंचि हें सर्व विठोबाचें नाम । निराईस प्रेम गहिनीनाथीं ॥४॥


बैसलियां दोघें भ्रतारवल्लभें । उदरींचा गर्भें तेंचि ध्यान ॥१॥
भक्ति नवमास भरले पूर्ण दिवस । आलें वैराग्य डोळस मूर्तिमंत ॥२॥
विठ्ठल आवडी ठेवियेलें नाम । निराईस प्रेम गहिनीनाथीं ॥३॥


व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥
केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण । जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥
मग पुष्करादि तीर्थें पाहावीं समस्तें । अनुताप चित्तें धरियेला ॥३॥
वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मूर्ति । निघालासे भक्ति तीर्थाटणा ॥४॥
विठठलें वंदुनी मातापिता दोन्ही । मग तीर्थाटणीं मुहूर्त केला ॥५॥


आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥
धरी मछावतार केला शंखोद्वार । देव मुक्तिमाहेर पांथिकाचें ॥२॥
तेथोनि सत्वर आला पिंडारका । मंगळहडीहुनी द्वारका देखियेली ॥३॥
सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिधली । ते पुरी पाहिली सुदामयाची ॥४॥
मंडपाकार शोभे तो माधव । रुक्मिणी विवाहो जाला जेथें ॥५॥
संपादुनी गेला अवतारकृत्य । तें भालुकातीर्थ देखियेलें ॥६॥
पश्चिमे प्रभासलिंग देखियेलें । सोरटी वंदिलें सोमनाथा ॥७॥
मुचकुंडाची गुंफा काळ्यवन उभा । विश्रांती पद्मनाभा धवलपुरी ॥८॥
मार्गींचीं तीर्थं करुनी समस्तें । आला शक्ति जेथें सप्तशृंगा ॥९॥
अरुणा वरुणा प्राची गोदावरी । ते कपाळेश्वरी पूजा केली ॥१०॥
पुढें ज्योतिलिंग देखिलें त्र्यंबक । कुशावर्तीं उदक स्वीकारिलें ॥११॥
वंदूनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरि । मग भीमाशंकरी आनंदला ॥१२॥
देखोनियां भीमा आठवे पंढरी । विठठल अंतरीं पांडुरंग ॥१३॥


ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथीं । पदोपदीं कीर्ति नामघोष ॥१॥
आला आळंकापुरीं इंद्रायणी-तीरीं । स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥
देखोनी सुब्राह्मण केलेंसे नमन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥३॥
कोण तुमचा गांव आलेति कोठुन । काय अभिधान गमन कोठें ॥४॥
विठठलाचें नाम रामेश्वरी भाव । वृत्ति आपेगांव गोदातीरीं ॥५॥
मातापिता वृद्ध वसताती तेथें । द्वारकादि तीर्थें करुनी आलों ॥६॥
आजि धन्य भाग्य स्वामीचें आगमन । आश्रम पावन कीजे माझा ॥७॥
आणुनी मंदिरीं सारुनी भोजन । निद्रा करविली पूर्ण तया हातीं ॥८॥
तंव स्वप्न अवस्थेमाजी येउनि पंढरेनाथ । म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी ॥९॥
प्रातःकाळ जाला नित्यनेमु सारिला । मग नमस्कार केला सिदोंपतीं ॥१०॥
वंदोनियां चरण सांगितलें स्वप्न । कन्यापाणिग्रहण कीजे तुम्ही ॥११॥
हांसोनी उत्तर बोले पैं सारांशें । आज्ञा श्रीनिवासें केली नाहीं ॥१२॥
आजिचा सुदिन स्वस्थ करुनी मन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥१३॥
ऐसे सुसंकल्प हेलावती मनीं । तुळसीवृंदावनीं निद्रा केली ॥१४॥
मग विश्वीं विश्वंभर व्यापुनियां स्थानीं । येऊनियां स्वप्नीं काय बोले ॥१५॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य आवडी । हे वसती उघडी तुझ्या अंगीं ॥१६॥
मूर्तिमंत चारी जन्मती इच्या उदरीं । म्हणोनि स्वीकारी आज्ञा माझी ॥१७॥
उठोनि विठठलें स्वप्न सांगितलें । हरुषें वंदिले सिदोपंतीं ॥१८॥
पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले । गुण उतरले छत्तीसही ॥१९॥
निर्धारिलें लग्न मिळाले ब्राह्मण । निर्विघ्न पूजन केलें आधीं ॥२०॥
देवकप्रतिष्ठा ब्राह्मणपूजन । घटिका जाली पूर्ण म्हणती द्विज ॥२१॥
कुळदेवस्मरण म्हणती सावधान । उभयतांचें मन पांडुरंगीं ॥२२॥
जालें पाणिग्रहण विधीसी अर्पण । वंदिले चरण सिदोपंतीं ॥२३॥
पांडुरंगक्षेत्रा मिळालीसे यात्रा । आले पंढरपुरा भक्तराज ॥२४॥
गरुडटके पताका मृदंग वाजती । वैष्णव गर्जती जयजयकारें ॥२५॥
गरुडपारीं उभे दाटी वैष्णवांची । उपमा वैकुंठीची पंढरीये ॥२६॥
राऊळभीतरीं प्रवेशलीं दोघें । देखियेले उभे पांडुरंग ॥२७॥
कायावाचामनीं पारुषले नयनीं । मस्तक चरणीं ठेवियेला ॥२८॥
विठठलासी ध्यान रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति राया ॥२९॥


आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं ॥१॥
जाणोनि अंतर म्हणे सिदोपंत । आपुले मनींचा हेत पुरता कीजे ॥२॥
जावें हो सत्वर यावें स्वस्ति क्षेम । पावले आश्रम सिदोपंत ॥३॥
विठठलें गमन केलें तेव्हां तीर्थाटणा । मुख्य मुख्य स्थाना अनुक्रमें ॥४॥


पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि ॥१॥
चालतां सुपंथीं ह्रदयीं विठठलमूर्ति । मुखीं नामकीर्ति गात चाले ॥२॥
अभोळ नरसिंह श्रीवासुदेव । सकळ देवराव व्यंकटाद्री ॥३॥
गेला अरुणाचळा करुनी नमन । चिदंबरा दक्षिणमथुरा कावेरी ॥४॥
वंदुनी जनार्दन गेला रामेश्वरा । हेत जाला पुरा विठठलाचा ॥५॥


जानकीची शुद्धी करावया गेला । हनुमंत उडाला जेथुनियां ॥१॥
आनंदभरित चालतसे मार्ग । ह्रदयीं अनुराग आवडीचा ॥२॥
तें स्थान वंदुनी पावला गोकर्ण । हाटकेश्वरीं स्नान करुनियां ॥३॥
आला कोल्हापुरा लक्षुमी दरुषणा । पंचगंगे स्नान करुनियां ॥४॥
प्रीतीचा संगम देखिला कर्‍हाटकीं । थोर जाला सुखी अंतरींचा ॥५॥
कृष्णोचिया स्नानें कृतकृत्य जाला । माहुली देखिला संगम डोळां ॥६॥
आला आळंकावती हर्षयुक्त चित्तीम । दिधलें सिदोपंतीं आलिंगन ॥७॥
विठठल अंतरीं मातापिता पाहावी । आज्ञा म्हणे द्यावी सिदोपंतां ॥८॥

१०
कुटुंबासहित जावें जी दरुषणा । केलीसे प्रार्थना सिदोपंतीं ॥१॥
सहज बोळवण संतांचें दरुषण । म्हण केलें मान्य शीघ्र चला ॥२॥
मग विठठलानें मातापिता वंदियेली । स्थिति सांगितली सिदोपंतीं ॥३॥
चिरंजीव नांदा म्हणती मातापिता । सुख आमुच्या चित्ता थोर जालें ॥४॥
वस्त्रें अलंकार सिदोपंता दिधले । मग गमन केलें सिदोपंतीं ॥५॥

११
असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं ॥१॥
संसाराची चिंता नाहीं विठठलासी । अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥
जालें वर्तमान ऐकिलें सिदोपंतीं । परम तेणें चित्तीं खेद केला ॥३॥
येउनि परामर्ष घेतला दोघांचा । म्हणे सांभाळ तुमचा करितो देव ॥४॥
उदासीन वृत्ति तुमची सर्वकाळ । पदार्थ सकळ पाहिजे तो ॥५॥
दया करोनि मज आतां सांभाळावें । आळंकापुरीं राहावें सुखरुप ॥६॥
पुत्रसंतती कांही होईल तुम्हांसी । मग येईल चित्तासी तें करा सुखें ॥७॥
मग मानुनी वचन विठठलें तयाचें । म्हणे हें देवाचे करणें हो ॥८॥

१२
येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥
नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठठल येकाकी सुखरुप ॥३॥
ऐसा बहुत काळ क्रमिलियावरी । पुत्र अपत्य उदरीं होतां न दिसे ॥४॥
विठठल म्हणे अवो ऐकतेसी कांते । मज ऐसें वाटतें संन्यास घ्यावा ॥५॥
देसी आज्ञा तरी जाईन वाराणसी । ऐसें रखुमाईसी म्हणितलें ॥६॥

१३
रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती ॥१॥
संतती वांचूनि न घ्यावा संन्यास । ऐसें सांगावें त्यांस म्हणितलें ॥२॥
निरोपाची वाट पाहे भलत्या मिसें । रखुमाई असे सावधान ॥३॥
असताम दुश्चितपणें निरोप पुसिला । जा जा म्हणे दिधला अवसरु ॥४॥
जाऊनि विठठलें घेतला संन्यास । चिंता रखुमाईस पडली भारी ॥५॥

१४
करावें सार्थक रखुमाईनें तेव्हां । आरंभिली सेवा अश्वत्थाची ॥१॥
जाणोनी पैं देवें उग्र अनुष्ठान । तेथें जालें येणें श्रीपादाचें ॥२॥
देखोनि सत्पात्र केला नमस्कार । सारांश उत्तर बोलियेलें ॥३॥
पुत्रवती होई दिधला आसीर्वाद । रखुमाईसी विनोद वाटियेला ॥४॥
माते तूं हांससी श्रीपाद पुसती । स्वामी पुत्र कैसे होती पतीविण ॥५॥
भ्रतारें जाऊनी घेतला संन्यास । स्वामीचे वचनास वचनास नलगे बोल ॥६॥
पुसतां खाणखूण निश्चयो बाणला । श्रीपाद बोलिला सत्य सत्य ॥७॥
रखुमाईसी पुसे असे तुझें कोणी । येरी कर जोडोनी बोलियेली ॥८॥

१५
मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं ॥१॥
कृपा करुनी यावें तुम्ही आश्रमासी । सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥
नेऊनी आश्रमा दिधलें आसन । केलें श्रुत वर्तमान सिदोपंतीं ॥३॥
अर्घ्यपाद्यपूजा भोजन सारिलें । मग वर्तमान पुसिलें सिदोपंतीं ॥४॥
श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव । तंव येथें हा अभिप्राव जाला ऐसा ॥५॥
आतां फिरोनियां जाणें वाराणसी । घेऊनी रखुमाईसी तुम्ही यावें ॥६॥

१६
श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥
सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥
जाउनी वाराणसीं मठी प्रवेशले । मग पाचारिलें चैतन्यासी ॥३॥
तुझें कोणी होतें सत्य सांग आतां । अन्यथा बोलतां उरी नाहीं ॥४॥
चैतन्यें चरणीं ठेवियेला माथा । म्हणे त्यागुनी कांता आलों स्वामी ॥५॥
उठवोनी श्रीपादें दिधलें आश्वासन । म्हणतां करी पाणिग्रहण इचें आतां ॥६॥
अविधि कर्माचें न धरावें भय । यासी आहे साह्य जगदीश ॥७॥
स्वदेशा जाउनी करावा आश्रमु । सुखरुप स्वधर्मु चालवावा ॥८॥
श्रीपादें मस्तकीं हात ठेवियेला । निरोप दिधला चैतन्यासी ॥९॥

१७
चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी । मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें ॥१॥
हासिन्नले लोक बरवा हा संन्यास । करिती उपहास दर्शनाचा ॥२॥
द्विजीं वाळियेलें जगीं सांडियेलें । सेखीं उपेक्षिलें आप्तवर्गीं ॥३॥
ऐसीं बारा वरुर्षे क्रमिली निगुती । तंव जालीसे संतती चौघजण ॥४॥
निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई । हांसती सकळही ऐकोनि नांवें ॥५॥
जालीं उपवरें व्रतबंधा योग्य । उभयतां उद्धेग चिंतातुरें ॥६॥
जातिकुळावेगळी पडियेली निराळी । माझी वंशावळी प्रायश्चित्त ॥७॥
मेळविले द्विज केली ब्रह्मसभा । क्षमा अपराधा करा दीना ॥८॥
निबंधीं निर्णय पाहती धर्मशास्त्रीं । तुम्हीं अति श्रौती परायण ॥९॥
सांगाल तें मान्य म्हणती साहीजणें । शुची हें करणें पतितांसी ॥१०॥
निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष । दर्शनेची मोक्ष जडमूढा ॥११॥

१८
पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ॥१॥
देहान्त प्रायश्चित्त असे या बोलिलें । विचारुनि भलें हित करा ॥२॥
म्हणती द्विजवर आणिक नाहीं उपाव । संस्कारें देह करा शुद्ध ॥३॥
श्रीपाद म्हणती अवश्य करीन । देह हे दंडीन अनुतापें ॥४॥
त्रिवेणी संगमीं घालीन कर्वती । गेला पूर्वस्थिती वीतरागेम ॥५॥
दारापुत्रगृह त्यजुनी निघाला । नमस्कार केला द्विजवृंदा ॥६॥
झडझडां जाती परतोनी न पाहती । नाहीं पुनरावृत्ति म्हणती द्विज ॥७॥
त्याग आणि वैराग्य हेंचि प्रायश्चित्त । मग जाला शुचिर्भूत गुरुकृपें ॥८॥
निवृत्ती म्हणती आम्हां कवण गती । सांगावे श्रीमंती विचारुनी ॥९॥

१९
म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं ॥१॥
नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥२॥
नव्हों देवगण यक्ष ना किन्नर । ऋषि निशाचर तेही नव्हों ॥३॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरुप माझें ॥४॥
नव्हों आप तेज वायू व्योम मही । महत्तत्व तेंही विराट नव्हों ॥५॥
नव्हें मी सगुण नव्हें मी निर्गुण । अनुभूतीं भजन होउनी नव्हें ॥६॥
निवृत्ति म्हणतसे ऐकें ज्ञानेश्वरा । माझी परंपरा ऐसी आहे ॥७॥

२०
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥
अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥
स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥
म्हणोनियां संतीम अवश्य आचरावेम । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥
कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥
प्रत्यवाय आहे अशास्त्रीम चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥

२१
हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य ॥१॥
पांडवांचें कुळ शोधितां निर्मळ । कुंड जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
भक्ति हे सरती जाति न सरती । ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य ॥३॥
दुर्वास वसिष्ठ अगस्ति गौतम । हे ऋषि उत्तम कुळींचे कैसे ॥४॥
व्यास आणि वाल्मिक कोण कुळ तयांचें । तैसेंचि आमुचें सोपान म्हणे ॥५॥

२२
देऊनियां पत्र निघालीं सत्वर । करुनि नमस्कार सकळांसी ॥१॥
जाउनी राहिले भोगावती तीरीं । तीर्थयात्रा बरी संपादिली ॥२॥
अनाथें पतितें शरणागत दीनें । अनाथ करणेम कृपादृष्टि ॥३॥
केली ब्रह्मसभा बैसले वरिष्ठ । होतें तैसें स्पष्ट निवेदिलें ॥४॥
पत्र वाचुनियां सकळां जालें श्रुत । संन्याशाचे पुत्र कळों आलें ॥५॥
नाहीं प्रायश्चित्त उभयंता कुळभ्रष्ट । बोलियेले श्रेष्ठ पूर्वापार ॥६॥
या एक उपाय असे शास्त्रमतेम । अनन्यभक्तीतें अनुसरावें ॥७॥
तीव्र अनुतापें करावेम भजन । गो खर आणि श्वान वंदुनियां ॥८॥
वंदावें अंत्यज ब्रह्मभावनेसीं । ऐसे पद्धतीसी बोलियेले ॥९॥
ऐकोनि निवृत्ती संतोषला चित्तीं । धन्य तुमची वदंती तीर्थरुप ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे सांगाल तें मान्य ।मुक्ताई सोपान आनंदिलीं ॥११॥

२३
ऐकोनि ऐसीं नांवें हासिन्नले ब्राह्मण । नामांचें अभिधान सांगा आम्हां ॥१॥
येक म्हणती नामापाशीं काय आहे । ज्ञाना वाहात आहे पखालीसी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा । वेगळिक आम्हां तया नाहीं ॥३॥
मारिती आसुड म्हैशियाचे पाठीं । तोचि वळ उठे ज्ञानदेवा ॥४॥
म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा । यापासोनी उच्चारावा वेदध्वनी ॥५॥
तरीच तुमची समता आम्हां येईल कळों । नाहीं तरी बोलों नका कांहीं ॥६॥
ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद । ओंकार मूळशब्द प्रणवाचा ॥७॥

२४
मग वेदाचा आरंभ करिता जाला पशू । विधी उपन्यासू सांग पढे ॥१॥
करिती आश्चिर्य सकळ द्विजवर । हे तीहीं अवतार तीन देवांचे ॥२॥
आदिमाया मुक्ताई मुक्तपणें अवतरली । आम्हांपासुनि जाली थोर चुकी ॥३॥
कर्मठ अभिमानें ठकलों देहबुद्धि । गोवियेलों विधि निषेधाच्या ॥४॥
नेणों भक्तिज्ञान वैराग्याचा लेश । कुटुंबाचे दास होऊनि ठेलों ॥५॥
आणिकांसी सांगों आपण नाचरों । लटिकेच हुंबरों प्रतिष्ठेसी ॥६॥
धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ । धन्य पुण्यशील अवतार हे ॥७॥
सकळ द्विजवर करिती नमस्कार । आनंदें जयजयकार करिताती ॥८॥
ज्ञानदेव म्हणे तुमच्या पायांचा महिमा । सामर्थ्य हे आम्हां अंगीं नाहीं ॥९॥

२५
तुम्हीं वेदरुप भूदेव प्रत्यक्ष । दरुषणेंचि मोक्ष जडमूढा ॥१॥
सकळही तीर्थें तुमच्या वसती पायीं । तेथें आमुचे कायीं उरती दोष ॥२॥
धन्य दिवस आजी जालों कृतकृय । भेटलेती संतब्रह्मवृंद आम्हां ॥३॥
ज्ञानदेवा ध्यान ब्राह्मणाचे चरण । कलिमलछेदन निवृत्ति म्हणे ॥४॥

२६
जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप ॥१॥
तीर्थासी पावन कलिमलछेदन । देवाचें कल्याण जयाचेंनी ॥२॥
ते पाय सादृश्य देखिले आजि दृष्टी । याग सहस्त्र कोटी न तुकती ॥३॥
जयांच्या ह्रदयीं वेदांचा निवास । शास्त्रें रहिवास केला होय ॥४॥
जयांच्या वचनें देवपितर तृप्त । स्वाहा स्वधा होत ज्यांच्या मुखें ॥५॥
जोडोनियां कर विनवितो सोपान । निश्चयें वचन द्यावें आम्हां ॥६॥
शेष उच्छिष्टा करावेम विभागी । बटुपणालागी अधिकारी ॥७॥
अध्यात्मग्रंथ पाहती पैठणीं । गीतासंबोधिनी जवळी असे ॥८॥
भोगावतीं स्नान कालिका दरुषण । वेदांत व्याख्यान परिमिती ॥९॥
धन्य हा सोपान धन्य ज्ञानदेव । धन्य निवृत्तिराय ब्रह्मरुप ॥१०॥
सांगती पुराण रात्रीं हरिकीर्तन । पैठणींचे जन वेधियेले ॥११॥
तव कव्ययज्ञ जाला गृहस्थाचे घरीं । पितर मंत्रोच्चारीं आव्हानिले ॥१२॥
अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य । यासारिखे ब्राह्मण नाहीं कोणी ॥१३॥
उपनिष‌दभाग पढिन्नलों वेदांत । परि हें सामर्थ्य नाहीं आम्हां ॥१४॥
नाहीं ऐकिलें ना कोठें वर्तलें । सृष्टी तेंचि आजि दृष्टीं दाखविले ॥१५॥
पशुमुर्खे वेद दृश्य इतर लोक । थोर हें कवतुक दाखविलें ॥१६॥
मिळोनि समस्त सोडियेलें शास्त्र । विचारोनी पत्र लिहियेलें ॥१७॥
हें परलोकीचें तारु देवत्रय कोणी । प्रायश्चित्त काय द्यावें कोणी ॥१८॥
लिहोनियां पत्र दिधलें तया हातीं । सम्स्तांसी निवृत्ति नमस्कारिलें ॥१९॥

२७
घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें ॥१॥
मागोनियां म्हैसा नेवाशासी आले । प्राकृत पैं केली गीतादेवी ॥२॥
निवृत्ती म्हणती ऐकें ज्ञानदेवा । अनुभव करावा अमृता ऐसा ॥३॥
आदिशक्तिमाता वंदुनियां म्हाळसा । मग तेथुनी सरिसा चालियेले ॥४॥
क्रमिताती मार्ग अनुभव कुशळ । हरिनाम सकळ कवित्वकळा ॥५॥
येउनी उतरली आळाचिये वनीं । पशु तये स्थानीं शांत जाला ॥६॥
करुनी तया पूजन सेंदूर तेलें लेपून । आळंकावती निजस्थान प्रवेशली ॥७॥
साने थोर सकळ तेथील निवासी । निवृत्ति तयांसी नमस्कारिलें ॥८॥

२८
तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥
धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥
उपजतांचि ज्ञानी हें वर्म जाणौनि । आले लोटांगणीं चांगदेव ॥३॥
प्रत्यक्ष पैठणीं भटीम केला वाद । बोलविला वेद म्हैसीपुत्रा ॥४॥
संस्कृताच्या सोडोनियां गांठी । केलीसे मराठी गीता देवी ॥५॥
नामा म्हणे सर्व सुख लाहिजे । एक वेळां जाईजे अळकावती ॥६॥

२९
गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे ॥१॥
गीतेचा महिमा बोलवेना वाचे । बंधने जीवाची दूर होती ॥२॥
येक येक अक्षर कोटी अश्वमेध । फळ हें प्रसिद्ध पुराणोक्त ॥३॥
येकचि तो श्लोक वाचिलिया नेमें । अंतीं परमधाम प्राप्त होय ॥४॥
नामा म्हणे गीता संपूर्ण वाचितां । लाभ त्याच्या हाता बोलवेना ॥५॥

३०
गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥
गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥
येका येका श्लोकीं कोटी अश्वमेध । पुण्यही अगाध म्हणताम गीता ॥३॥
नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता । तयाच्या सुकृता पार नाहीं ॥४॥

३१
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्नवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥

“संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि समाप्त

“संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि समाप्त एकूण ३१ अभंग

। “संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि ।

।। “संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि ।।


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

। “संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि ।। “संत नामदेव गाथा” श्रीज्ञानेश्वरांची-आदि ।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *