संत नामदेव

संत नामदेव गाथा संतमहिमा

संत नामदेव गाथा संतमहिमा अभंग १ ते ४४


ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले । उद्धरावया आले दीनजनां ॥१॥
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घे वदनीं दोष जाती ॥२॥
हो कां दुराचारी विषयीं आसक्त । संतकृपें त्वरित उद्धरतो ॥३॥
अखंडित नामा त्याचा वास पाहे । निशिदिनीं ध्याय सत्संगती ॥४॥


संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संतांची हे कळा पाहतां न कळे । खेळोनियां खेळ वेगळाची ॥२॥
संतांचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥४॥


कर्दळी फळ कर्पूर परिमळें भिन्न । परि दोहींचे जन्म ते एकत्र जाण ।
आत्मा कीं परमात्मा अभेद कीं भिन्न । चंद्र सोमकांत शून्य महाशून्य ॥१॥
सूर्य सूर्यकांतु प्रकाश एकु । साधुसंत आरति रावो ना रंकु ॥२॥
भ्रमरांच्या रुंजी मकरंद उधळती । असाध्य साधनीं लागल्या ज्योती ।
लयाचें लक्ष हरपली स्थिति । म्हणोनि साधुचरणीं नित्य पंचारती ॥३॥
गोदेचा उगमु तो ठाईंच्या ठाईं । आणिकें उदकें तीं चाली प्रवाहीं ।
तैसी साधुसंत कृपा उन्मत देहीं । सागरा भेटली क्षीरसिंधु तेही ॥४॥
सागराचेम उदक जगा विनवित । निवळुनि मागुतें पूर्ण भरित ।
तैसें अंतरीचें नीर ओघें हे साधुसंत । परि सागरा अंतरीं न वर्णवे मुक्त ॥५॥
तेथें अनुपम्या ऐकिजे शब्दाचि रचना । हें जाणतेनो जाणा अमृतखुणा ।
हें रत्न कीं माणिक ऐसें अनुमाना । तें पानबुडिया परसोबा लाधले निधाना ॥६॥
दुधावरील साय वरी साखर मेळवणी । जैसी जिव्हा लोधली मधु लागुनि ।
तेथील गौलता तें रहस्य लागलें ध्यानीं । तें परसोबा लाधलें येरां मूर्खां भुलवणी ॥७॥
तापलें लोहो तेणें शेखियेले जीवन । तैसें अंतरीम निवालें आपोआप आपण ।
परसा भागवत हें सकळांचें जीवन । विष्णुदास नामा त्याचे चरणीचे रजरेण ॥८॥


वैष्णवा घरीं सर्वकाळ । सदा झणझणिती टाळ ॥१॥
कण्या भाकरींचे खाणें । गांठीं रामनाम नाणें ॥२॥
बैसावयासी कांबळा । द्वारीं तुळसी रंगमाळा ॥३॥
घरीं दुभे कामधेनु । तुपावरी तुळसीपानु ॥४॥
फराळासी पीठ लाह्या । वेळोवेळां पडती पायां ॥५॥
नामा म्हणे नलगे कांहीं । चित्त रंगलें हरीचे पायीं ॥६॥


रविरष्मि धरोनि स्वर्गीम जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥
वैतरणी उतरोनिन वैकुंठा जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥२॥
स्वप्नींचा ठेवा साचहि होईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥३॥
मायबाप बंधू भगिनी मिळे योनी । परि साधुची मिळणी भाग्ययोगें ॥४॥
तर्पे व्रतें दानें गोविंद पैं भेटे । परि साधु तंव न भेटे भाग्येंविण ॥५॥
नामा म्हणे केशवा बरा साधुसंग । या वेगळा भवरोग न तुटे न तुटे ॥६॥


आजी महासुखें सृष्टी भरली भाग्यवंती । जालीसे विकृती पापा तापा ॥१॥
चालिले देखोनि वैष्णव जगजेठी । उभविती वैकुंठी गुडिया देव ॥२॥
आले आलेरे हरीचे डिंगर । वीर वारीकर पंढरीचे ॥३॥
ज्याची चरणधुळी उधळें गगनपंथें । ब्रह्मादिकां तेथें जाली दाटी ॥४॥
एकमेकांपुढे उडविती माथें । म्हणती आम्हातें लागो रज ॥५॥
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगीं । नाचती हरिरंगीं नेणताती लाजू ॥६॥
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती । ह्रदयीं कृष्णमूर्ती भेटों आली ॥७॥
कोंदलें हरिरुप देखती विश्वाकार । सुटले पाझर नयन कमळीं ॥८॥
गुढिया रोमांकुरीं सात्त्विके दाटले । गर्जती विठ्ठले नामघोष ॥९॥
मोरपिसा कुंचे भाट गरुड टके । भार ते नेटके मिरविताती ॥१०॥
तेथें केशवचें नामें तनु हे तुळिका केली । पायघडी घातली हरिच्या दासा ॥११॥


ध्वजा कुंचे गरुडटके । वैष्णव चालिले नेटिके ॥१॥
आलें वैष्णवांचें दळ । भेणें पळे कळिकाळ ॥२॥
तुळसी मंजरेचे भाले । देखोनि यमदूत पळाले ॥३॥
ऐकोनी नामाचा गजर । प्रेमें डुल्लतसे शंकर ॥४॥
नामा म्हणे भक्ति गाढी । सेवा न सोडी अर्ध घडी ॥५॥


आला वैष्णवांचा मेळ । पळाला हो कळिकाळ ॥१॥
आले आले हरिदास । कळिकाळावरी घाला कास ॥२॥
कल्मशा पडियेला धाक । तो हि देऊं न शके हांक ॥३॥
पैल नामा केशवाचा । सवें मेळूं वैष्णवांचा ॥४॥


भक्त केशवाचे आले । दूत यमाचे पळाले ॥१॥
भक्त हरीचे चालिले । हातीं हरिनामाचे भाले ॥२॥
तळपे शांतीचें ओढण । घेती स्वानंदें उड्डाण ॥३॥
नामा म्हणे निजदास । कळिकाळाचे भरंवसे ॥४॥

१०
यम सांगू गेला वैकुंठा । देवा सांभाळा जी आपुल्या मठा ।
आम्ही नवजाऊं तयाचिया वाटां । वैष्णव दूत नागवती ॥१॥
कुंभिपाक पडला ओस । दूतां लागला त्रास ।
देवा कोपेल महेश । म्हणोनी सांगावया आलों ॥२॥
देवा तुम्ही एक वोखटें केलें । गंगेसि मृत्यूलोकासी पाठविलें ।
तेणें थोर कार्य नाशिलें । हा प्रसाद गौतमाचा ॥३॥
ऐसें वैष्णवदूतीं गांजिलों । तुजप्रति सांगावया आलों ।
देवें पाहिजे मना आणिलों । माझें साह्य करावेम स्वामी ॥४॥
विशेष शिंपी नामा । तो पंढरीये पुरुषोत्तमा ।
हाचि बोल ऐकूनि प्रेमा । त्याच्या शिवाणा न जावें ॥५॥

११
यम सांगे दूतां कानीं । तुम्ही जातां मेदिनी ।
विष्णुभक्त चुकवुनि । येर बांधोनि आणा ॥१॥
दूत सांगतां यमा । दिंडीपुढे चाले नामा ।
ते नागविती आम्हां । विष्णुदूत म्हणोनी ॥२॥
जे नेणती धर्मवेला । वाचे न उच्चारिती गोपाळा ।
तयांसि जाचवावेम वेळोवेळां । एकविस कुळांसहित ॥३॥
जे न करिती हरीची भक्ती । तयांसीं जाचवावें पुढता पुढतीम ।
रघुनाथनाम ज्याच्या कंठीं । त्याच्या वाटे नवजावे ॥४॥
दिंडी पताका गजर टाळघोषांचा । नाद उमटतो अंबरींचा ।
तेथें पाड नाहीं काळाचा । शिंपी नामा तळपतो केशवरायाचा ॥५॥

१२
सांडोनि नित्य नेम कर्म । बोलती कळिकाळाचें वर्म ॥१॥
नामधारक नामाचे । जाले डिंगर केशवाचे ॥२॥
टाल मृदंग वाजती । टके पताका शोभती ॥३॥
कंठीं तुळसीच्या माळा । वज्र पंजराचा टिळा ॥४॥
शंख चक्र मुद्रा धरणें । अंगीं मिरवती भूषणें ॥५॥
संतरज उधळलें । तेणें सर्वांग डवरलें ॥६॥
सहस्त्रनामें गर्जित । तेणें पळाले यमदूत ॥७॥
नामा म्हणे ते माझे सखे । स्वामी विठोबासारखे ॥८॥

१३
वैष्णवांचे घरीं मांडिला पाहुणेर । नामाचा वोगर वाढियेला ॥१॥
घ्यारे ताटभरी जेवा धणीवरी । आनंद गजरीम रामनाम ॥२॥
होईल पाईरव दुर्जना न सांगावें । एकांति सेवावें नामा म्हणे ॥३॥

१४
सर्वांभूतीं पाहे एक वासुदेव । पुसोनियां ठाव अहंतेचा ॥१॥
तोचि संतसाधु ओळखावा निका । येर ते ऐका मायाबद्ध ॥२॥
देखिलिया धन मृत्तिकेसमान । नवविधा रत्नें जैसे धोंडे ॥३॥
काम क्रोध दोघे घातले बाहेरी । शांति क्षमा घरीं राबवित ॥४॥
नामा म्हणे नाम गोविंदाचें वाचे । विसंबेना त्याचे क्षणमात्र ॥५॥

१५
नावडे निजांगना शेजेवरी रुचेसी । कीं पतिसेजे जेविं व्यभिचारिणी अप्रीत जैसी ॥१॥
गांधी विष संग्रहीत भक्ष्णाची नाहीं प्रीत । चकोरा देखत सिद्धी अमावस्या ॥२॥
याचपरी संत वर्ते प्रपंच देह कर्मां । समुळ बुडे ब्रह्मी ब्रह्मपणें ॥३॥
पोसणा पुत्र लटकेंचि बाबा म्हणे । स्वपियातें अंतरुनि पिंडदान करणें ॥४॥
बहुरुपी स्त्रियेचे कटाक्ष इतराम दावी । आपण जाणत जीवीं हें मी नव्हे ॥५॥
शत्रुसभे नाना उपचार होती । ते न लगती कांहीं चित्तीं भूपा ॥६॥
नामा म्हणे ह्रदयभानीं योगी निरंजन मनीं । मिथ्या विनोद कानीं क्षणिक जैसा ॥७॥

१६
आशा नाहीं ज्याला । देव कां मारी तयाला ॥१॥
जेव्हां सुखाची उन्नति । मोह पायासी लागती ॥२॥
सर्वां चित्तीं समभाव । सर्व मानीं वासुदेव ॥३॥
नामा म्हणे अंगीं प्रेम । मुखीं विठोबाचें नाम ॥४॥

१७
धन्य महाराज जन्मले संसारीं । जे ध्याती अंतरीं नारायणा ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय । धन्य त्यासी माय प्रसवली ॥२॥
प्रसवली तया कुळाचा उद्धार । तो तरे निर्धार नामा म्हणे ॥३॥

१८
प्रतिदिनीं स्वधर्म करी । हरिमूर्ति नमस्कारी ।
भावें भजन वसे शरीरीं । तोचि भक्त हरीचा ॥१॥
अनंत जन्मींचे कांट । तेणेंचि केलें सपाट ।
स्वधर्मे करोनियाम नीट । शुद्धपक्ष हरि हरि ॥२॥
तेंचि तापसा सामर्थ्य । तेणेंचि जोडिलें तीर्थ ।
त्याचे धरोनि मनोरथ । हरिभजन पथीं लागला ॥३॥
देवो त्याचा अंकिला । सत्वा न ढळे तो कष्टविला ।
अकर्मीं तोचि भला । त्याचें धन्य जीवित्व ॥४॥
तोचि सफळ सकळीं । सदा निर्मळ सर्वकाळीं ।
जो हरिनामें वाजवी टाळी । तोचि समर्थ त्रिभुवनीं ॥५॥
नामा हरिरंगी रंगला । संत चरणीं अनुरंगला ।
तेणें विठ्ठल संतोषला । येऊनि राहिला ह्रदयकमळीं ॥६॥

१९
वैष्णवांमाजीं एक बळी । पृथु जाला दुजा महीतळीं ।
हरि नांदे प्रल्हादाजवळी । नारदें वनमाळी दान घेतला ॥१॥
विभीषणें पूजिला लंके हरी । भीष्में देखिला द्वारकेभीतरीं ।
अर्जुनें केला साहकारी । सारथि हरि पांडवांचा ॥२॥
उद्धवेम तप केलें समर्थ । अक्रूर नित्य वंदनार्थ ।
गाई गोपिका गोपाळांत । तो स्तन पीत यशोदेचें ॥३॥
नंदा वसुदेवा लाधलें । बळि देवें ऐसेंचि पुण्य केलें ।
उग्रसेनें तप साधिलें । रत्न साधिलें रुक्मणीनें ॥४॥
गरुड हनुमंत शेषादिक । नित्य जाले हरिचे सेवक ।
चरणींच्या उदका शिवादिक । नित्य मस्तक खालाविती ॥५॥
ऐसा दुर्लभ हरिराजा । वर्णितां होती चतुर्भुजा ।
जड जीवाम तारिल केशवराजा । उभारोनि भुजा सांगे नामा ॥६॥

२०
सदा विचरती जनीं वनीं रानीं । मुखीं चक्रपाणि जपतसे ॥१॥
विरक्तीची मात असे कोण्या गुणें । नामाचें चिंतन योगिराज ॥२॥
तेव्हां योगियासी कीर्तनाचे ध्यास । मुक्ती चारी त्यास हात जोडी ॥३॥
पंढरीस उभा राहे पांडुरंग । तीर्थ चंद्रभागा नामा म्हणे ॥४॥

२१
जयाचेनि तीर्था आलें तीर्थपण । केली सांठवण ह्रदयीं ती ॥१॥
नवल महिमा हरिदासां जीवीं । तीर्थें उपजवी त्यांचे कुसीं ॥२॥
वाराणसी प्राणी मरे अंतीं कोणी । तया चक्रपाणि नामें तारी ॥३॥
नामा म्हणे तीर्थे तया येती भेटी । वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥४॥

२२
सत्वसमाधानी कर्मनिष्ठ जाण । अखंडित ध्यान रामकृष्ण ॥१॥
सत्संग सर्वदा साक्ष सर्व देहीं । सर्वांभूतीं पाही अंशमात्रें ॥२॥
आपणासमान सर्वत्र पाहाती । अन्य सर्वांभूतीं रामविष्णू ॥३॥
नामा म्हणे ऐसें सकळिकें संमत । नामीं सदोदित भक्तिमार्ग ॥४॥

२३
गौतम वसिष्ठ आणि विश्वामित्र । भारद्वाज अत्रि कश्यपादि ॥१॥
बळी हनुमंत बिभीषण नळ । दुष्ट अजामिळ वाल्हा श्रेष्ठ ॥२॥
उद्धव अर्जुन अंगद अगस्ति । सर्वांभूतीं भक्तिभाव ऐक्य ॥३॥
नामा म्हणे सदा साधु संत जन । जनीं जनार्दन आत्मा एक ॥४॥

२४
तोचि पुराणिक जो होय कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ॥१॥
मानी तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देहभावो ॥२॥
नामा म्हणे ऐसे संत भेटावे गा देवा । त्यालागी केशवा ह्रदय फुटे ॥३॥

२५
पत्रावली काढी वैकुंठनायक । धांवुनिया शुक आला तेथें ॥१॥
दाटी पाहुनि द्वारीं मानसीं विचारी । जावया भीतरीं काय काज ॥२॥
हा वाहे प्रसाद स्वहस्तें अनंत । वेचोनियां शीत घाली मुखीं ॥३॥
घंटानाद वाजे लक्ष द्विजपंक्ती । अक्षयीं वाजयी वेळोवेळां ॥४॥
ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव । पुसे धर्मराव देवाजीसी ॥५॥
सांगतसे खुण वैकुंठनायक । ब्रह्मनिष्ठ एक आला तेथें ॥६॥
येथुनी उठले धर्म नारायण । बाहेर येऊन पाहताती ॥७॥
शुकाचिया मिषें व्यासाचा नंदन । सांगतसे खूण जगदीश ॥८॥
धरुनियां करीम नेला तो भीतरीं । नामा म्हणे करी पूजा त्याची ॥९॥

२६
नित्य सर्वकाळ पुण्याचिया राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी ।
नित्य तपानुष्ठानाच्या राशी । कोटि यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्यांचा वंश । जे जे रतले नामास ।
रामनामीं नित्य सौरस । ते विष्णुदास पवित्र जाणा ॥२॥
पवित्र ते स्वधर्मीं । ज्यासीं सर्वकाळ नेम नामीं ।
तयाचें नाम पूर्णकामीं । मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचें । सार्थक केलें संसाराचें ।
ओझें फेडिलें पूर्वजन्मींचे । हरि स्मरण केलिया ॥४॥

२७
एक भानू अवघा सृष्टीच सोहळा । व्यापूनि सकळा आकाशासी ॥१॥
पवनसिंधुवरी मन वेगें पांखरी । मार्गु षटचक्रीं वैकुंठासी ॥२॥
तोचि भोगी सुख चिदानंदी वासू । संतसंगें प्रकाशु सफळ मग ॥३॥
नामा म्हणे यासी गुरुकृपा पाहिजे । संतसंगें पाविजे केशवचरण ॥४॥

२८
धन्य नरदेहीं संतसंग करी । त्रैलोक्य उद्धरी हेळामात्रें ॥१॥
नेणे सुख दुःख शरीराचें भान । अखंड भजन केशवाचें ॥२॥
कर्म करुनियां होय शुचिष्मंत । नामामृतीं प्रीत सर्वकाळ ॥३॥
नामा म्हणे ऐसे वर्ते देहभावीं । मूढजनां दावी भक्तिमार्ग ॥४॥

२९
धन्य तोचि देश जेथें संतवास । तापत्रयदोष जाती सत्य ॥१॥
धन्य मातापिता उभयकुळशुद्धता । तोचि भजे संतां निर्धारेंसी ॥२॥
तीर्थरुपी जळ विलंबे करी निर्मळ । संतदर्शनें तत्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ति चिरकाळें फळती । संतांचे संगतीं निजस्वार्थ ॥४॥
नामा म्हणे मुक्ति जे नर इच्छिती । संतांचे संगतीं धरती भाव ॥५॥

३०
कपटाचें कुपथ्य जालें तुझें पोटीं । स्मरावा जगजेठी कृपाळु तो ॥१॥
नाम औषध घ्यावें नाम औषध घ्यावें । संतांचे लागावें समागमीं ॥२॥
त्यापाशीं औषध आहे नानाविध । रामकृष्ण गोविंद म्हणती वाचे ॥३॥
पुत्रस्नेहें कैसा अजामेळ स्मरला । तेणें तो उद्धरला क्षणमात्रें ॥४॥
राम राम म्हणतां तारिली कुंटिणी । वैकुंठभुवनीं तये वासु ॥५॥
तेंचि हें औषध प्रल्हादें घेतलें । तें तूं घे उगलें म्हणे नामा ॥६॥

३१
संतांपायीं माथां धरितां सद्‌भावें । तेणें भेटे देव आपेंआप ॥१॥
म्हणवूनि संतां अखंड भजावें । तेणें भेटे देव आपेंआप ॥२॥
साधुपाशीं देव कामधंदा करी । पीतांबर धरी वरी छाया ॥३॥
नामा म्हणे देव इच्छी संतसंग । आम्हां जिवलग जन्मोजन्मीं ॥४॥

३२
बहुरुप्या ब्राह्मणा पडियेलें मित्र । दोहींचें तें गोत्र एक जालें ॥१॥
वेश्या पतिव्रते पडियेला शेजार । दोहींचा आचार एक जाला ॥२॥
संग तोचि बाधी संग तोचि बाधी । कुसंग तो बाधी नारायणा ॥३॥
नामा विष्णुदास सत्संगति बोधला । आत्मा हा लाधला पांडुरंग ॥४॥

३३
जायाचें सोंवळें जायाची ही चोळी । जायाची गरसोळी तीहि जाय ॥१॥
जिणें हें जायाचें जिणें तें जायाचें । तें पैल कोणाचें देणें आहे ॥२॥
जायाचा आचार जायाचा विचार । जायाचा भ्रतार क्षणभरी ॥३॥
नामा म्हणे अवघें जिणें तें जायाचें । संतसंगतीचें सुख घ्यावें ॥४॥

३४
संतसंगतीचेम काय सांगूं सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥१॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलियुगीं ॥२॥
इहलोकीं तोचि सर्वांभूतीम सम । शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥

३५
भोळ्या भाविकांचें वचन नुल्लंघी । फिरतसे संगें तयामागें ॥१॥
मी एक अभक्त मी एक अभक्त । मी एक अभक्त पापराशी ॥२॥
नाममाळा दृढ न करी जतन । परि जाणे वर्ममूख संतसंगें ॥३॥
नामा म्हणे नाहीं तुम्हांसी उपमा । आमुचे स्वधर्म शुद्ध नाहीं ॥४॥

३६
परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥१॥
कीटकी ध्याताम भृंगी जाला तोचि वर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥२॥
वनस्पति परिमळु चंदन जाला जाण । तैसा भेटे नारायण संतंसंगें ॥३॥
अग्निस मिळे तें न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥४॥
सरिता ओघ जाय सिंधूसी मिळून । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥५॥
नामा म्हणे केशवा मज देई संतसंग । आणिक कांहीं तुज न मागे बापा ॥६॥

३७
येतां जातां थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥
बहुतांचा सेवकु जाला काकुळती । न पावे विश्रांति कधीं काळीं ॥२॥
ऐसें माझें मन सिणलें नानापरी । घालीन आभारी संतांचियां ॥३॥
वियोगें संतांच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडे दारोदार दीन रुपें ॥४॥
परि कोणी संतांच्या न घालिती चरणीं । तळमळी अनुदिनीं श्रांत सदा ॥५॥
माझें माझें म्हणवूनि जया घाली मिठी । दिसें तेचि दिठी नाहीं होय ॥६॥
तया शोकानळें संतप्त आंदोळे । गेलें तें न मिळे कदा काळीं ॥७॥
न देखत ठायीं देखावया धांवें । भ्रांति भुले भावें नाना मार्गीं ॥८॥
तुझा स्वरुपानंदु नाहीं ओळखिला । जाहली विठठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळु लागला परिसातें । पढिये सर्वांते होय जेंवी ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणीं । करुनि त्रिभुवनीं होईन सरता ॥११॥

३८
सुख सांगावें संतांपुढें । जेणें सुख अधिक वाढे ॥१॥
आणिक न करावें शहाणें । प्रेम दिठावले झणें ॥२॥
खंडितां कल्पनेचा लाग । त्यासि असावा अनुराग ॥३॥
तोडिताम वासनेचा तंतु । त्यासि असावा एकांतु ॥४॥
गिळी अहंतेचें बीज । त्याचें व्हावें चरणरज ॥५॥
नामा म्हणे त्याचे संगतीं । चित्ता आपेंआप येईल निवृत्ति ॥६॥

३९
वासनेविरहित होवोनि एकवट । असावेम निकट संतसंगें ॥१॥
हेंचि माझें तीर्थ हेंचि माझें व्रत । करावें दास्यत्व हरिभक्तांचें ॥२॥
नामा म्हणे केशवा तरीच शरणांगत । नाहीं तरी पतित म्हणा मातें ॥३॥

४०
संतांच्या चरणा द्यावें आलिंगन । जीवें निंबलोण उतरावें ॥१॥
तेथेंचि निश्चळ राहे माझ्या मना । मग तुज यातना नव्हती कांहीं ॥२॥
संतांचे द्वारींचा होई द्वारपाळ । तुटे मायाजाळ मोहपाश ॥३॥
संतांचे प्रसाद सेविसी उरले । आयुष्य सरलें दुणावेल ॥४॥
नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु । देती भक्तिबोधु प्रेमसुख ॥५॥

४१
आपुलें शरीर घालूनियां पुढें । पडे वाडेंकाडें सर्वभावें ॥१॥
नाम आवडती नानाभूते सुष्टि । देखेन मी दृष्टी ब्रह्मरुप ॥२॥
विष्णुरुप सर्व भवीं अखंडित । मानी सर्वभूत आत्मा माझा ॥३॥
नामा म्हणे सत्य सत्य जे बोलती । ज्यांचे पायींची माती इच्छितसें ॥४॥

४२
संतांचें लक्षण ओळखावया खूण । जो दिसे उदासीन देहभावा ॥१॥
सतत अंतरीम प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥२॥
त्या संतांचे चरण देखिले मी दृष्टीं । जळती कल्प कोटी पापराशी ॥३॥
जयाच्या ह्रदयीं प्रेमाचा जिव्हाला । जीवें भावें गोपाळ न विसंबती ॥४॥
त्याचे अंगणींचा होईन सांडोवा । मग तूं केशवा नुपेक्षिसी ॥५॥
तुझ्या ध्यानीं ज्यांचे सदा भरलें मन । विश्व तूंचि म्हणोन भजती भावें ॥६॥
त्याच्या उष्टावळीचा होईन मागता । तरीच पंढरीनाथा भेटी देसी ॥७॥
ऐसे नित्यानंदे बोधें जे निवाले । ते जीवावेगळे न करी नाम्या ॥८॥

४३
माझे मायबाप साधुसंतजन । माझे जीवप्राण अंतरीचे ॥१॥
भवभयाहूनि तारियेलें मज । बाळेभोळे गुज प्रेम दावी ॥२॥
रंकाहूनि रंक जालों मी सेवक । ब्रह्मादिक देख इच्छिती सुख ॥३॥
नामा म्हणे संतभाग्य अलौकिक । शुद्ध निष्कलंक पुण्यरुप ॥४॥

४४
आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरिच्या दासां ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं । हे संत मंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासां भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे तया असावेम कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥

“संत नामदेव गाथा” संतमहिमा अभंग १ ते ४४ समाप्त

“संत नामदेव गाथा संतमहिमा “

संत नामदेव गाथा संतमहिमा । संत नामदेव गाथा संतमहिमा । संत नामदेव गाथा संतमहिमा । संत नामदेव गाथा संतमहिमा 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *