सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

(ओव्या १ ते ७५)

(ओव्या ७६ ते १५०)

(ओव्या १५१ ते २४७)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय – बारा :-

जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥

तू शुद्ध आहेस. तू, उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. गुरुकृपादृष्टिरूपी माते तुझा जयजयकार असो. ॥१२-१॥

विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥

विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते, ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टि, तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. ॥१२-२॥

तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥

प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मादि त्रिविध तापांचे) चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरे जाळू शकेल ? ॥१२-३॥

योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥

हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांगयोगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे’ अशा स्वरूपसिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. (ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात.) ॥१२-४॥

आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥

आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस. ॥१२-५॥

प्रत्यक्‌ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥

आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोधकरणेरूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस. व स्वरूपानंदाचे लहान मुलाना घालावयाचे दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस. ॥१२-६॥

सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥

सतरावी जीवनकलारूपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरूपी) दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस. आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस. (स्थिर करतेस). ॥१२-७॥

म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥

म्हणूण साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. ॥१२-८॥

अहो सद्‌गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥

हे सद्गुरुचे कृपादृष्टि, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल, तो सर्व विद्यारूप सृष्टीचा (उत्पन्न कर्ता) ब्रह्मदेवच बनतो. ॥१२-९॥

म्हणोनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥

एवढ्याकरता हे आपल्या भक्तांचा कल्पतरु व श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे. ॥१२-१०॥

नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्‍नांचे आगरु ।
भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥ ११ ॥

शांत, अद्भुतादि नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती रहातील असे कर व (परमार्थ निरूपणास शोभतील अशा) योग्य अलंकाररूपी रत्नांची (माझे हे निरूपण) खाणच होऊन राहील असे कर. हे माऊली. (माझ्या व्याख्यानात) गीतेतील मतलबाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर. ॥१२-११॥

साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं ।
विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ ॥ १२ ॥

मराठी-भाषारूपी पृथ्वीमधे सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्मविचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. ॥१२-१२॥

संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें ।
लावीं म्हणे गहनें । निरंतर ॥ १३ ॥

प्रश्नोत्तरचर्चारूपी फळांचे भार असलेले सिद्धांतांचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असे ज्ञानेश्वर महाराज (आपल्या सद्गुरूंना) म्हणतात. ॥१२-१३॥

पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे ।
कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥ १४ ॥

(माझ्या देशीभाषारूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत, असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात). नास्तिकपणारूपी दर्‍या व वितंडवादरूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्करूपी दुष्ट जनावरे हाकून दे. ॥१२-१४॥

श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें ।
राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥ १५ ॥

श्रीकृष्णगुणांच्या वर्णनात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. ॥१२-१५॥

ये मर्‍हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।
घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥ १६ ॥

या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर. व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचे च घेणे देणे होऊ दे. ॥१२-१६॥

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें ।
तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥ १७ ॥

हे श्रीगुरुरूपी माते, जर तू प्रेमरूपी पदराने मला पांघरूण घालशील तर आताच मी हे सर्व उत्पन्न करीन. ॥१२-१७॥

इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी ।
म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥

या (ज्ञानेश्वर महाराजांच्या) विनवणीबरोबर गुरूंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले ‘गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नकोस’. ॥१२-१८॥

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाहला आनन्दु ।
आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥ १९ ॥

(असे गुरू बोलले ) तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तात्काळ आनंद झाला, व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन ॥१२-१९॥

अर्जुन उवाच
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥

अर्जुन म्हाणाला – याप्रमाणे सतत (तुझ्या व्यक्त स्वरूपाचे ठिकाणी) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्या दोन प्रकारच्या (योग्यांपकी) उत्तम योगी कोणते ? ॥१२-१॥

तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु ।
तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ॥ २० ॥

ज्ञा – तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाच्या (चंद्रवंशाच्या) विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला. ॥१२-२०॥

कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें ।
तें नवल म्हणोनि बिहालें । चित्त माझें ॥ २१ ॥

मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला – ऐकले महाराज. आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते अपूर्व विश्वरूप म्हणून माझे चित्त भ्याले. ॥१२-२१॥

आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें ।
तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ॥ २२ ॥

आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे, म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला. तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे प्रेम ठेऊ नकोस असे देवानी मला बजावले. ॥१२-२२॥

तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत ।
भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥ २३ ॥

तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस, याविषयी संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्तस्वरूपाची प्राप्ती होते. ॥१२-२३॥

या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा ।
व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥ २४ ॥

हे वैकुंठा (श्रीकृष्णा), व्यक्त व अव्यक्त असा जो तू, त्या तुझ्या उंबर्‍यात सोडणारे म्हणजे निखालस तुला प्राप्त करून देणारे भक्ति व योग हे दोन मार्ग आहेत. ॥१२-२४॥

पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये व्याला येका ।
म्हणोनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू ॥ २५ ॥

परंतु जो कस शंभरभार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. ॥१२-२५॥

अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी ।
तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलिया ॥ २६ ॥

अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृतसमुद्राच्या लाटेतील चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. (त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप जरी व्यापक आहे तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. ॥१२-२६॥

हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती ।
परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥ २७ ॥

महाराज माझ्या चित्तांत हाच (व्यक्त व अव्यक्र ही दोन्ही रूपें एकच आहेअत) खरोखरी निश्चये करून अनुभव आहे, परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारावयाचे ते एवढ्याचकरता की ॥१२-२७॥

जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक ।
तें साच कीं कवतिक । हें जाणावया ॥ २८ ॥

हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापकरूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत ते तुमचे प्रतिपालन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणाभर केलेला विनोद आहे हे नीट समजून यावे म्हणून (मी आपल्याला खुलासा विचारत आहे). ॥१२-२८॥

तरी तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम ।
भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥ २९ ॥

तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरता कर्म करतात व तू ज्यांची परमगति आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत. ॥१२-२९॥

इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें श्रीहरी ।
बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥ ३० ॥

हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी, जे भक्त तुला आपल्या अंत:करणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात ॥१२-३०॥

आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें ।
कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें वस्तु ॥ ३१ ॥

आणि जी वस्तु ॐकारापलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तु कशाही सारखी नाही ॥१२-३१॥

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥ ३२ ॥

ती वस्तु अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे, ती वस्तु दाखवता येण्याजोगी नाही व देशाने मर्यादित नाही, अशी आहे, अशा वस्तूची जे ज्ञानी ‘ती वस्तु मी आहे’ अशा भावनेने उपासना करतात ॥१२-३२॥

तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता ।
कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ॥ ३३ ॥

महाराज, असे ते वर सांगितलेले योगी व भक्त या दोहोंपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला सांगा बरे. ॥१२-३३॥

इया किरीटीचिया बोला । तो जगद्‌बंधु संतोषला ।
म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥ ३४ ॥

या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगद्बंधु श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. ॥१२-३४॥

श्री भगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥

श्रीकृष्ण मह्णाले, माझे ठिकाणी मन ठेऊन नित्ययुक्त होत्साते, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. ॥१२-२॥

तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं ।
रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥ ३५ ॥

ज्ञा – तर अर्जुना अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यावर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात ॥१२-३५॥

कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता ।
तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥

अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढू लागते, त्याप्रमाणे माझे भजन करत असतांना माझ्या भक्तांचे मजविषयीचे प्रेम नित्य नवे (वाढणारे) दिसते. ॥१२-३६॥

परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु ।
तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥ ३७ ॥

परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा (तिच्या) मागील पाण्याचा अनिवार लोट येत रहातो, त्या गंगेच्या सारखे ज्यांच्या प्रेमभावाला आधिक्य असते ॥१२-३७॥

तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त ।
जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥ ३८ ॥

तसेच रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृष अंत:करण ठेऊन माझी उपासना करतात ॥१२-३८॥

इयापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥ ३९ ॥

याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठप्रतीचे योगयुक्त मानतो. ॥१२-३९॥

ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥ ३ ॥

तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य. अविकारी, अचल, ध्रुव, – ॥१२-३॥

आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा ।
झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४० ॥

ज्ञा – आणि अर्जुना याशिवाय दुसरे (निर्गुणाचे उपासक) जे ‘ते ब्रह्म मी आहे’ अशी दृढ भावना धरून अवयवरहित व अविनाश अशा ब्रह्माला धरावयास पहातात, ॥१२-४०॥

मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ।
ते इंद्रियां कीर जोगें । कायि होईल ? ॥ ४१ ॥

ज्या ब्रह्माचे ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय ? ॥१२-४१॥

परी ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न संपडे ।
व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥ ४२ ॥

परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळेच व कोणात्याही आकारात येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठिण आहे, ॥१२-४२॥

जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें ।
जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥

जी वस्तु सर्व ठिकाणी, सर्व रूपाने व सर्व काली असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता ती चिंतन करण्याची क्रिया, तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते ॥१२-४३॥

जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे ।
ऐसें म्हणोनि उपाये । उपजतीचि ना ॥ ४४ ॥

जी वस्तु उत्पन्न होत नसून नाशही पावत नाही व जी वस्तु नाही असेही नाही व आहे असेही नाही, व जी वस्तु अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत, ॥१२-४४॥

जें चळे ना ढळे । सरे ना मैळे ।
तें आपुलेनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥

जे चळत नाही व हलत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे ॥१२-४५॥

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥

अशा ब्रह्माची इंद्रियसमुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्वभूतांचे हित त्यामध्ये रत असणारे, उपासना करतात ते देखील माझ्याप्रतच येतात. ॥१२-४॥

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें ।
अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥

ज्ञा – ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्ये जाळून त्यायोगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली ॥१२-४६॥

मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं ।
इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया ॥ ४७ ॥

मग इंद्रियास (निग्रहाच्या) पाशात घालून उलट फिरवले (म्हणजे अंतर्मुख केले) व अशा तर्‍हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले ॥१२-४७॥

अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा ।
मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥ ४८ ॥

हे सुजाण अर्जुना गुदद्वाराला आसनमुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला. ॥१२-४८॥

आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले ।
निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥ ४९ ॥

आशांचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. ॥१२-४९॥

वज्राग्नीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।
व्याधींच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥

वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरूप धातूंची होळी करून रोगरूप मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पुजिल्या. ॥१२-५०॥

मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।
तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥ ५१ ॥

मग कुंडलिनीची मशाल आधारवक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रपर्यंत मार्ग समजला. ॥१२-५१॥

नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।
उघडिली खिडकी । ककारांतींची ॥ ५२ ॥

शरीरातील नवही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. ॥१२-५२॥

प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे ।
मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥ ५३ ॥

प्राणशक्तिरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून ते व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. ॥१२-५३॥

चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी ।
सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥ ५४ ॥

इडा व पिंगळा नाड्यांचा सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले. ॥१२-५४॥

मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें ।
ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र ॥ ५५

मग सुषुम्ना नाडीमधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. ॥१२-५५॥

वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन ।
काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥

व शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ॐकाराची तिसरी मात्रा जो मकार त्या मकाररूपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्न्याकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. ॥१२-५६॥

ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी ।
आंगविताती निरवधी । योगदुर्गें ॥ ५७ ॥

अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सोऽहंसिद्धि (मी ब्रह्म आहे अशी भावना) काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. ॥१२-५७॥

आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं ।
तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥ ५८ ॥

आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य (निराकार ब्रह्म) घेतात, तेही अर्जुना मलाच पावतात. ॥१२-५८॥

वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे ।
ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥ ५९ ॥

एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. त्यात करणार्‍याला काही मिळत असेल तर जास्त श्रममात्र पदरात पडतात, दुसरे काही नाही. ॥१२-५९॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥

अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो.॥१२-५॥

जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं ।
पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥ ६० ॥

ज्ञा – सगुणाच्या भक्तीस डवलून निराश्रय निर्गुण, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते ॥१२-६०॥

तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें ।
आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पडोनि ठाती ॥ ६१ ॥

त्यास इंद्रपदादि पदे वाटमारेपणा करीत असून (म्हणजे इंद्रपदादि स्थाने आपणास प्राप्त व्हावी अशी घातक इच्छा उत्पन्न होऊन) ऋद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदु:खे त्या योग्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून रहातात. ॥१२-६१॥

कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग ।
आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥ ६२ ॥

कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते. ॥१२-६२॥

ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी ।
अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥ ६३ ॥

तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूक खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा ॥१२-६३॥

उनी दिहाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।
झाडासि साजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥

जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाबरोबर बोलणे हेच मित्रांबरोबर बोलणे होय. ॥१२-६४॥

शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।
वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥ ६५ ॥

थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. ॥१२-६५॥

किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा ।
भ्रतारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥

अर्जुना फार काय सांगावे ?.हा योग करणे म्हणजे नवर्‍यावाचून नित्य नवा अग्निप्रवेश (सती जाणे) आहे. ॥१२-६६॥

एथ स्वामीचें काज । न बापिकें व्याज ।
परी मरणेंसीं झुंज । नीच नवें ॥ ६७ ॥

या योग करण्याच्या कामात नवर्‍याचे (नवर्‍यबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळातो तसे नवरा मिळाण्याचे) काम नाही, अथवा काही कुलाचारानिमित्त योगासारखे कष्ट सोसावे असे) कुलाचाराचे निमित्तही नाही. परंतु मरणाबरोबर नित्य नवी लढाई आहे. ॥१२-६७॥

ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख ।
डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ? ॥ ६८ ॥

त्याप्रमाणे योगाचे दु:ख मृत्यूहून तीक्ष्ण आहे अथवा कढत विष पिववेल काय ? डोंगर गिळतांना मुख फाटणार नाही का ? ॥१२-६८॥

म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा ।
तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥

म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्यांच्या वाट्याला दु:खाचाच भाग आला. ॥१२-६९॥

पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें ।
तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥ ७० ॥

असे पहा की जेव्हा बोचर्‍या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणांशी त्याचा वियोग म्हणावा ? ॥१२-७०॥

म्हणोनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही ।
कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असें ? ॥ ७१ ॥

म्हणून बाहूंनी समुद्र तरून जाणे, हे कोठे शक्य आहे का ? अथवा आकाशात पायाने चालणे होते काय ? ॥१२-७१॥

वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लागतां कांठी ।
सूर्याची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥

युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडलाचा भेद करून जाता येईल काय ? ॥१२-७२॥

यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा ।
तेवीं देहवंता जीवां । अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥

म्हणून अर्जुना ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची अव्यक्ताच्या (निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी) गती नाही. ॥१२-७३॥

ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा ।
झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥ ७४ ॥

असे असूनही ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील तर ते दु:खाला प्राप्त होतील. ॥१२-७४॥

म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा ।
जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥ ७५ ॥

म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले ते हे दु:ख जाणतच नाहीत. ॥१२-७५॥

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होत्साते अनन्य योगाने (भक्तीने) माझे ध्यान करीत उपासना करतात ॥१२-६॥

कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें ।
जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥ ७६ ॥

ज्ञा – (येथीन पुढे भाक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात). त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रमधर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ॥१२-७६॥

विधीतें पाळित । निषेधातें गाळित ।
मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥

ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत. व केलेल्या कर्मांची फळे, ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. ॥१२-७७॥

ययापरी पाहीं । अर्जुना माझें ठाईं ।
संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥ ७८ ॥

अर्जुना याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्मांचा त्याग करून (कर्मे मला अर्पण करून) ते कर्मे नाहीशी करतात. ॥१२-७८॥

आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव ।
तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥

आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ति माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. ॥१२-७९॥

ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर ।
ध्यानमिषें घर । माझें झालें ॥ ८० ॥

असे जे माझ्या ठिकाणी गढून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ॥१२-८०॥

जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी ।
भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥

ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष या असाम्यादीन आहेत असे समजून, त्यांचा त्याग केलेला असतो. ॥१२-८१॥

ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें ।
तयांचे कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥

याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात, त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू ? कारण सर्वच मी करतो. ॥१२-८२॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥

त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यु व जन्मरूपी संसारसागरातून वर काढतो. ॥१२-७॥

किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा ।
तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥ ८३ ॥

ज्ञा – फार काय सांगावे ? अर्जुना जो आईच्या पोटी जन्म घेतो, तो आईचा किती आवडता असतो बरे ? ॥१२-८३॥

तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां ।
कळिकाळ नोकोनियां । घेतला पट्टा ॥ ८४ ॥

त्याप्रमाणे माझे भक्त ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळिकाळाचा पराभव करून त्यास मी आपल्या पदरात घेतो. ॥१२-८४॥

एर्‍हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता ।
काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥ ८५ ॥

सहज विचार करून पाहिले तर (कोणीही) एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्यास संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला ? सांग. राजाचे कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय ? ॥१२-८५॥

तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥

त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. ॥१२-८६॥

जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी ।
तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥ ८७ ॥

जन्ममृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला. ॥१२-८७॥

भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।
तेथ जरी कीं माझे । बिहिती हन ॥ ८८ ॥
संसारसागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही ? या योगाने (संसारसागराच्या क्षोभाने) माझे भक्त कदाचित् भितील. ॥१२-८८॥

म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा ।
करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥ ८९ ॥

म्हणून अर्जुना सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. ॥१२-८९॥

नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं ।
सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥ ९० ॥

माझी हजारो नावे, ह्याच कोणी नावा, त्या तयार करून संसारसागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज. ॥१२-९०॥

सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले ।
परीग्रहीं घातले । तरियावरी ॥ ९१ ॥

जे भक्त एकटे (अंतर्बाह्य परिग्ररहित) आहेत असे पाहिले, त्यास माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले. ॥१२-९१॥

प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं ।
मग आणिले तटीं । सायुज्याचिया ॥ ९२ ॥

एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले. ॥१२-९२॥

परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे ।
वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥ ९३ ॥

परंतु जे माझे भक्त असे (माझ्या दृष्टीने) ठरलेले आहेत मग ते (गजेंद्रासारखे) चार पायांची जनावरे का असेनात, पण त्या सर्वास वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. ॥१२-९३॥

म्हणोनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता ।
तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा ॥ ९४ ॥

म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही. कारण मी त्यांचा उद्धार करणारा तयार आहे. ॥१२-९४॥

आणि जेव्हांचि कां भक्तीं । दीधली आपुली चित्तवृत्ती ।
तेव्हांचि मज सूति । त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥

आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. ॥१२-९५॥

याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया ।
शिकिजे जे यया । मार्गा भजिजे ॥ ९६ ॥

ज्ञा – याकरता, हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्तिमार्गाचे आचरण करावे, हा विचार पक्का लक्षात ठेव. ॥१२-९६॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥

माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. (म्हणजे) या पुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील (मद्रूप होशील) यात शंका नाही. ॥१२-८॥

अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक ।
करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं ॥ ९७ ॥

अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. ॥१२-९७॥

इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेसीं ।
रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ॥ ९८ ॥

बा अर्जुना, या दोघांनी (बुद्धि व मन) जर माझ्यामधे बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. ॥१२-९८॥

जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं ।
तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥

कारण की मन व बुद्धि ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग ‘मी, तू’ असे द्वैत उरेल काय सांग. ॥१२-९९॥

म्हणोनि दीप पालवे । सवेंचि तेज मालवे ।
कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय ॥ १०० ॥

म्हणून पदराच्या वार्‍याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो ॥१२-१००॥

उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं ।
तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥ १०१ ॥

शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्या मागून जातात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. ॥१२-१०१॥

म्हणोनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं ।
येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ १०२ ॥

म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी दोन्ही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. ॥१२-१०२॥

यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं ।
आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥ १०३ ॥

अर्जुना हे जे मी बोललो त्यात अन्यथा काही नाही असे मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो. ॥१२-१०३॥

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९ ॥

अथवा हे धनंजया माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर (चित्तैकाग्रतेचा अथवा ध्यानाचा) अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्य़ाची इच्छा कर. ॥१२-९॥

अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित ।
माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥ १०४ ॥

ज्ञा – अथवा जर मन बुद्धिसहित हे चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट (सकल वासनारहित असे संपूर्ण) तू देऊ शकणार नाहीस. ॥१२-१०४॥

तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं ।
मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥ १०५ ॥

तर अर्जुना, असे कर की आठ प्रहरांमधे थोडकेसे निमिषभर चित्त देत जा. ॥१२-१०५॥

मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख ।
तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥ १०६ ॥

मग जितके तितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहील तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ॥१२-१०६॥

जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे ।
तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥ १०७ ॥

ज्याप्रमाणे शरदऋतूचा प्रवेश झाला की नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल, त्या मानाने तुझे चित्त प्रपंचापासून वेगाने निघेल. ॥१२-१०७॥

मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें ।
हारपत अंवसे । नाहींचि होय ॥ १०८ ॥

मग ज्या प्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावास्येला अगदी नाहीसे होते ॥१२-१०८॥

तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां ।
हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥ १०९ ॥

त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामधे प्रवेश करता करता अर्जुना, ते तुझे चित्त हळू हळू मद्रूप होईल. ॥१२-१०९॥

अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।
येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥ ११० ॥

अरे अभ्यासयोग जो म्हणतात तो हाच एक आहे, असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. ॥१२-११०॥

पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे ।
व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥ १११ ॥

अभ्यासाचे सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप या दुष्ट प्राण्यांना सुद्धा स्वाधीन करून घेतले आहे. ॥१२-१११॥

विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे ।
एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥ ११२ ॥

विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. ॥१२-११२॥

म्हणोनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥

म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठिण नाही. याकरता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. ॥१२-११३॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०॥

अभ्यासयोगाला देखील असमर्थ असलास, सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. माझ्याकरता कर्मे केलीस तरी देखील तू सिद्धी मिळावशील. ॥१२-१०॥

कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझिया अंगीं ।
तरी आहासी जया भागीं । तैसाचि आस ॥ ११४ ॥

ज्ञा – अथवा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस, त्या स्थितीत रहा. ॥१२-११४॥

इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं ।
अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥ ११५ ॥

इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस, आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. ॥१२-११५॥

कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं ।
मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥ ११६ ॥

आपल्या कुळातील आचारांचे रक्षण कर. व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधि सांगितला आहे, ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे. ॥१२-११६॥

परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये ।
तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥

परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस. ॥१२-११७॥

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे ।
विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८ ॥

कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे, तोच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व जाणत आहे. ॥१२-११८॥

उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुलिया ठायीं ।
स्वजाती करूनि घेईं । जीवित्व हें ॥ ११९ ॥

कर्मात काही कमी अथवा पूर्ण झाले तर त्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस. म्हणजे तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक. म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. ॥१२-११९॥

माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।
तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥ १२० ॥

अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणार्‍या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमानपणे कर्म करणारे होऊ दे. ॥१२-१२०॥

म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघे मती ।
अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायीं ॥ १२१ ॥

अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हातरी करतो काय ? ॥१२-१२१॥

एर्‍हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां ।
रथु काई खटपटा । करितु असे ? ॥ १२२ ॥

म्हणून कोणातेही कर्म करण्याची प्रवृत्ति अथवा न करण्याची निवृत्ति ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर. ॥१२-१२२॥

आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे ।
निवांतचि अर्पिजे । माझ्यां ठायीं ॥ १२३ ॥

आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस. तर ते निमूटपणे मला अर्पण कर. ॥१२-१२३॥

ऐसिया मद्‌भावना । तनुत्यागीं अर्जुना ।
तूं सायुज्य सदना । माझिया येसी ॥ १२४ ॥

ज्ञा – अर्जुना, अशा माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानाने शरीरत्यागानंतर तू सायुज्यमुक्तिरूप माझ्या घरी येशील. ॥१२-१२४॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११ ॥

मद्योगाचा आश्रय करून, माझ्या ठिकाणी कर्मांचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होत्साता सर्व कर्मफलांचा त्याग कर. ॥१२-११॥

ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज ।
तरी तूं गा बुझ । पंडुकुमरा ॥ १२५ ॥

अथवा हेही कर्म तुला मला देववत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल) तर अर्जुना, (आम्ही तुला पुढे सांगतो ते) तू आचरण करणारा हो. ॥१२-१२५॥

बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं ।
मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥ १२६ ॥

बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे तुला कठिण वाटत असेल (अभिप्राय असा की कर्माची प्रेरणा करणार्‍या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे, हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय व आरंभलेल्या कर्मापासून मिळाणारे फळ त्या कर्माचे शेवटी परमात्म्यास अर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या व कर्माच्या अगोदर व शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठिण वाटत असेल) ॥१२-१२६॥

तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो ।
परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥ १२७ ॥

तर हे देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला, त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे. परंतु तुझी बुद्धी (कर्मफलाविषयी) निग्रहयुक्त असू दे. (म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्वमद व फालास्वाद घेऊ नकोस.) ॥१२-१२७॥

आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें ।
तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥ १२८ ॥

आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची (कर्मांची) ती सर्व फळे तू टाकीत जा. ॥१२-१२८॥

वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं ।
तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ॥ १२९ ॥

झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व वेली टाकून देतात, त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे (म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेऊ नकोस.) ॥१२-१२९॥

परि मातें मनीं धरावें । कां मज उद्देशें करावें ।
हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥

परंतु मनामधे माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे. (तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस तर ते कर्म तसे रिकामे राहू दे.) ॥१२-१३०॥

खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें ।
कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें ॥ १३१ ॥

खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते, त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान. ॥१२-१३१॥

अगा आत्मजेच्या विषीं । जीवु जैसा निरभिलाषी ।
तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं ॥ १३२ ॥

अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलांविषयी तू निष्काम हो. ॥१२-१३२॥

वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं ।
क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी ॥ १३३ ॥

अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते, म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामधे जिरू देत. (म्हणजे जणु काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ति असू दे.) ॥१२-१३३॥

अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।
परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥ १३४ ॥

अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खारा, पण सर्व योगांमधे हा योग श्रेष्ठ आहे. ॥१२-१३४॥

येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे ।
एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥ १३५ ॥

जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. (ते कर्म सुखदु:खाचा भोग देण्यास पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. ॥१२-१३५॥

तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे ।
किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥ १३६ ॥

ज्ञा – त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे (जन्माला येणे) संपते. फार काय सांगावे ? जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो. (जन्ममरणाच्या खेपा बंद पडतात). ॥१२-१३६॥

पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी ।
ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥ १३७ ॥

मग अर्जुना, अभ्यासाच्या (वरील ९ व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे) पायरीने ज्ञान (परमेश्वराचे परोक्षज्ञान) प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. (त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे). ॥१२-१३७॥

मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव ।
तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥ १३८ ॥

मग सर्व भाव (कायिक, वाचिक, मानसिक भाव) ध्यानाला आलिंगन देतात म्हनजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर रहाते. (म्हणजे होत नाही. कारण कर्म करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेल्यामुळे कर्म करण्यास कोणी जागेवर नसतात, म्हणून कर्मे होत नाहीत). ॥१२-१३८॥

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥ १३९ ॥

फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा नाहीसे होते तेव्हा फालत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती (पूर्णब्रह्मस्थिति) हस्तगत होते. ॥१२-१३९॥

म्हणोनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।
म्हणोनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥ १४० ॥

म्हणूनच अर्जुना शांती प्राप्त होण्याकरता हाच (आता सांगितलेला) काय तो क्रम आहे. म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे. ॥१२-१४०॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥ १२ ॥

अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफलत्यागापेक्षाही शांति श्रेष्ठ आहे. ॥१२-१२॥

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान ।
ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥

अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. ॥१२-१४१॥

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

मग कर्मफलत्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफालत्यागापेक्षा शांतिसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव) चांगला आहे. ॥१२-१४२॥

ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा ।
शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ॥ १४३ ॥

अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला ॥१२-१४३॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥

सर्व भूतांचे ठिकाणी द्वेषरहित (सर्व भूतांचे ठिकाणी) मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणारहित सुखा व दु:ख समान मानणारा क्षमाशील ॥१२-१३॥

जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं ।
आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥ १४४ ॥
ज्ञा – सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. ॥१२-१४४॥

उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे ।
हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥ १४५ ॥

उत्तमाचा स्वीकार करावा, आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही, ॥१२-१४५॥

कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं ।
हें न म्हणेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥ १४६ ॥

किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत ॥१२-१४६॥

गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं ।
ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥ १४७ ॥

गाईची तहान भागवू व वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला ज्याप्रमाणे ठाऊक नसते ॥१२-१४७॥

तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री ।
कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥ १४८ ॥

त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणिमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वत: कृपेची जन्मभूमी असतो ॥१२-१४८॥

आणि मी हे भाष नेणें । माझें काहींचि न म्हणे ।
सुख दुःख जाणणें । नाहीं जया ॥ १४९ ॥

आणखी ‘मी तू’ अशी भाषा ज्याला माहीत नसते, आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदु:खाची जाणीव नसते ॥१२-१४९॥

तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं ।
संतोषा उत्संगीं । दिधलें घर ॥ १५० ॥

त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे, व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे (संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे) ॥१२-१५०॥

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥

सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझे ठिकाणी ज्याने मन व बुद्धि अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥१२-१४॥

वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु ।
तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥ १५१ ॥

ज्ञा – वर्षाऋतुशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहेमी भारलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहेमी पूर्ण भरलेला असतो. ॥१२-१५१॥

वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण ।
निश्चया साचपण । जयाचेनि ॥ १५२ ॥

जो अंत:करणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो ॥१२-१५२॥

जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनीं ।
जयाचिया हृदयभुवनीं । विराजती ॥ १५३ ॥

ज्याच्या अंत:करणरूपी घरामधे जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत (जीव व परमात्मा यांचे ऐक्य, ज्याच्या अनुभावाला आले आहे) ॥१२-१५३॥

ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि ।
अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायीं ॥ १५४ ॥

अशा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या (सगुण रूपाच्या) ठिकाणी अर्पण करतो ॥१२-१५४॥

आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु ।
तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ॥ १५५ ॥

अंत:करणात आत्मैक्यप्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे, चांगल्या तर्‍हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, ॥१२-१५५॥

अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु ।
तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥ १५६ ॥

अर्जुना तो भक्त. तोच योगी व तोच मुक्त. तो जशी काही माझी (आवडती) बायको व मी तिचा नवरा असा तो मला आवडतो. ॥१२-१५६॥

हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें ।
हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥ १५७ ॥

इतकेच नाही, तर तो मला जिवाइतका प्यार आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे, त्याला ही देखील उपमा अपुरी आहे. ॥१२-१५७॥

तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी ।
इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥

परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट बोलावयास लावते. ॥१२-१५८॥

म्हणोनि गा आम्हां । वेगां आली उपमा ।
एर्‍हवीं काय प्रेमा । अनुवादु असे ? ॥ १५९ ॥

म्हणून आम्ही (बायकोची व जीवाची) झटकन् उपमा देऊ शकलो. नाहीतर या प्रेमाला बोलून दाखावता येईल काय ? ॥१२-१५९॥

आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी ।
दुणा थांव उठी । आवडी गा ॥ १६० ॥

आता अर्जुना हे असू दे. पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते. ॥१२-१६०॥

तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये ।
तिये गोडीसी आहे । कांटाळें मग ? ॥ १६१ ॥

त्यात आणखी चर्चा करणारा प्रेमळा भक्त मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा काय आहे ? ॥१२-१६१॥

म्हणोनि गा पंडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता ।
वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥ १६२ ॥

म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त व प्रेमळ श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली. ॥१२-१६२॥

तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों ।
ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागला देवो ॥ १६३ ॥

(जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखावता येत नाही, तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे). तर आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे ! असे म्हणता क्षणीच देव डोलायला लागले. ॥१२-१६३॥

मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण ।
जया मी अंतःकरण । बैसों घालीं ॥ १६४ ॥

ज्ञा – मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंत:करण बसावयास देतो. त्या भक्ताची लक्षणे समजून घे. ॥१२-१६४॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥

ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत, व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे. ॥१२-१५॥

तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे ।
आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा ॥ १६५ ॥

तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात रहाणार्‍या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही ॥१२-१६५॥

तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।
आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६ ॥

त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वत:कडून लोकांना शीण होत नाही. ॥१२-१६६॥

किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां ।
तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥ १६७ ॥

फार काय सांगावे ? अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणिमात्रांना कंटाळत नाही. ॥१२-१६७॥

जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें ।
हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥ १६८ ॥

हे जगत त्याचा देह असल्यामुळे आवडते व नावडते, हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात. ॥१२-१६८॥

ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु ।
याहीवरी भक्तु । माझ्यां ठायीं ॥ १६९ ॥

असा सुखादु:खादि द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय व चित्तक्षोभ या पासून रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला ॥१२-१६९॥

तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो ।
हें असे जीवें जीवो । माझेनि तो ॥ १७० ॥

तर त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू ? हे राहू दे. तो माझ्याच जीवाने जगतो, (म्हणजे त्य़ाचे जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते). ॥१२-१७०॥

जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला ।
पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥ १७१ ॥

जो आत्मान्ंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले, आणि जो पूर्ण ब्रह्मस्थितीरूपी जी स्त्री तिचा प्रियपती झाला. ॥१२-१७१॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥

निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थाचा देखणा, उदासीन, संसारदु:खविरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार, तद्विरहित असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥१२-१६॥

जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा ।
सुखासि चढावा । जयाचें असणें ॥ १७२ ॥

ज्ञा – अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, (ज्याला कशाचीही जरुरी नाही) आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत रहातो ॥१२-१७२॥

मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर ।
परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥

काशीक्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षूचे शरीर खर्ची पडते. ॥१२-१७३॥

हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये ।
तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४ ॥

हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. ॥१२-१७४॥

शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।
परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥

गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात परंतु गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्याने तेथे बुडण्याचा संभव असतो. ॥१२-१७५॥

खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे ।
रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥

गंगेप्रमाणेच साधूच्या (ज्ञानाच्या) खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरीपण त्याचे संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे (साधुसंगतीत) मरावयाचा प्रसंग न येता याच देहात मोक्ष पदरात पडतो. ॥१२-१७६॥

संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे ।
तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥ १७७ ॥

संतांच्या शरीरस्पर्शाने गंगेची पापे जातात तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो ॥१२-१७७॥

म्हणोनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा ।
जेणें उल्लंघविलें दिशा । मनोमळ ॥ १७८ ॥

म्हणून आता हे वर्णन पुरे. जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादि मनातील मळ देशोधडीस लावले ॥१२-१७८॥

आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु ।
आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥ १७९ ॥

सूर्य जसा आतबाहेर प्रकाशित असतो, त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो (अज्ञानरूपी भूमीत असलेल्या) ब्रह्मरूपी धनाचा पायाळू पहाणारा आहे ॥१२-१७९॥

व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥ १८० ॥

ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. ॥१२-१८०॥

संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला ।
व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥ १८१ ॥

जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा (आणि म्हणून त्या पक्ष्याला आनंद व्हावा) ॥१२-१८१॥

तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे ।
नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥ १८२ ॥

(वरील पक्षाचा मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे तो पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु) तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघड नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही तसा तो कोणत्याही स्थितीत दु:खाला जाणत नाही. ॥१२-१८२॥

आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं ।
जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय ॥ १८३ ॥

आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नि विझून जातो ॥१२-१८३॥

तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा ।
जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥ १८४ ॥

त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे (म्हणजे ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे) ॥१२-१८४॥

अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरीं ।
द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला ॥ १८५ ॥

अर्जुना, इतका जो ‘ते ब्रह्म मी आहे’ अशा भावनेने भारलेला आहे, तो द्वैताच्या पलिकडच्या काठाला निघाला. (तो अद्वैत झाला). (आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल म्हणून त्याचे निराकरणा पुढे करतात. ॥१२-१८५॥

कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं ।
वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥ १८६ ॥

तथापि भक्तिसुखाकरता आपल्यातच (देव व भक्त असे) दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवाधर्म स्वीकारतो. ॥१२-१८६॥

येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी ।
न भजतया दावी । योगिया जो ॥ १८७ ॥

व दुसर्‍या भागाला मी (देव) असे नाव देतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणार्‍या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत (आचरून) दाखवतो ॥१२-१८७॥

तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान ।
किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ १८८ ॥

त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वत:च्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे ? त्याची जेव्हा आम्हास भेट होईल तेव्हाच आम्हास समाधान वाटते. ॥१२-१८८॥

तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज येथें असणें ।
तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥ १८९ ॥

त्याच्या करता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरताच (मला सगुण विग्रहाने) या जगात रहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत. ॥१२-१८९॥

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥

जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा नाही व चांगले व वाईट या दोन्हीविरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. ॥१२-१७॥

जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे ।
म्हणोनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥ १९० ॥

ज्ञा – जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एकाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही. ॥१२-१९०॥

आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला ।
म्हणोनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥ १९१ ॥

आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाचे ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते ॥१२-१९१॥

पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे ।
हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥ १९२ ॥

आपले जे खरे (त्रिकालाबाधित आत्मस्वरूप) आहे, ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील (आपल्यापासून) जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही ॥१२-१९२॥

आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं ।
जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ १९३ ॥

आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करत नाही. ॥१२-१९३॥

वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे ।
रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥

सूर्याच्या ठिकाणी रात्र व दिवस, हे दोन्ही जसे घडत नाही, त्याप्रमाणे वाईट व बरे हे त्याला काहीच वाटत नाही. ॥१२-१९४॥

ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु ।
त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं ॥ १९५ ॥

असा जो केवल अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो ॥१२-१९५॥

तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें ।
नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥ १९६ ॥

तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो. ॥१२-१९६॥

समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥

शत्रु व मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दु:ख यांचे ठिकाणी समान असणारा, (अंतर्बाह्य) संगरहित, ॥१२-१८॥

पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं ।
रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥ १९७ ॥

अर्जुना ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्ट नाही, शत्रु व मित्र् या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे ॥१२-१९७॥

कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा ।
हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥ १९८ ॥

ज्ञा – अथवा घरच्या माणसांना (तेवढा उजेड) पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नाही, ॥१२-१९८॥

जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली ।
दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा ॥ १९९ ॥

जो तोडण्य़ाकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, ॥१२-१९९॥

नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु ।
गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥ २०० ॥

अथवा ज्याप्रमाणे ऊंस हा त्याचे पिकास पाणी घालून वाढवणारास गोड व चरकात घालून त्याला गाळणारास कडू असा असत नाही, ॥१२-२००॥

अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा ।
मानापमानीं सरिसा । होतु जाये ॥ २०१ ॥

अर्जुना, त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मान व अपमानाचे वेळी सारखीच असते ॥१२-२०१॥

तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन ।
तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥

तिन्ही ऋतूंमधे आकाश जसे सारखे असते, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादि द्वंद्वांची त्याच्याजवळ सारखीच किंमत असते ॥१२-२०२॥

दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता ।
तैसा सुखदुःखप्राप्तां । मध्यस्थु जो ॥ २०३ ॥

अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वार्‍यांमध्ये जसा मेरु पर्वत अचल असतो तसा प्राप्त होणारी जी सुखदु:खे, त्यामधे तो अचल असतो. ॥१२-२०३॥

माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका ।
तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥ २०४ ॥

ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा व रंक यांना सारखीच अनुभवण्यास देते, तसा जो सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी सारखा असतो ॥१२-२०४॥

आघवियां जगा एक । सेव्य जैसें उदक ।
तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥ २०५ ॥

ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात ॥१२-२०५॥

जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग ।
एकाकीं असे आंग । आंगीं सूनी ॥ २०६ ॥

जो अंतर्बाह्य संगाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो ॥१२-२०६॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥

निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही होईल त्यामधे संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे. ॥१२-१९॥

जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे ।
आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ २०७ ॥

ज्ञा – जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही, ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही ॥१२-२०७॥

तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती ।
विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥ २०८ ॥

त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे तो निंदा व स्तुती यांना सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमधे व रानामधे संचार करत असतो. ॥१२-२०८॥

साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी ।
जो भोगितां उन्मनी । आरायेना ॥ २०९ ॥

खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखी असल्यामुळे तो मौनी झाला आहे. कारण की तो उन्मनी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही. (तो एकसारखा उन्मनी अवस्था भोगत असतो). ॥१२-२०९॥

जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे ।
पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥ २१० ॥

जो ज्यावेळेला जे मिळेल त्य़ाने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसावाचून सुकत नाही त्याप्रमाणे काहीही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही. ॥१२-२१०॥

आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं ।
तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥ २११ ॥

आणि ज्याप्रमाणे वायु हा कोठेतरी एकच जागा धरून रहात नाही त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही ॥१२-२११॥

आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती ।
तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया ॥ २१२ ॥

ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांतिस्थान आहे, ॥१२-२१२॥

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३ ॥

हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, फार काय सांगावे ! सर्व स्थावर-जंगमात्मक जग जो (अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे ॥१२-२१३॥

मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४ ॥

अर्जुना, इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. ॥१२-२१४॥

उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक ।
परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ॥ २१५ ॥

उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे ? पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. ॥१२-२१५॥

तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करितां जाणिजे प्रकारु ।
जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥ २१६ ॥

जर श्रीशंकर गुरु होतील तरच भक्तितत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. ॥१२-२१६॥

परी हे असो आतां । महेशातें वानितां ।
आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥ २१७ ॥

पण आता हे शंकराचे वर्णन पुरे. कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते. (भक्तितत्वचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ति ही त्यांनी माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली. असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत. असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वत:ची स्तुती केल्यासारखे होते म्हणून शंकराचे वर्णन पुरे असे भगवान् या ओवीत सांगत आहेत). ॥१२-२१७॥

ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें ।
अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥ २१८ ॥

एवढ्याकरता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वहातो. ॥१२-२१८॥

जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं ।
रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥ २१९ ॥

कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थसिद्धी जो मोक्ष, तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत निघाला. ॥१२-२१९॥

कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी ।
कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥ २२० ॥

तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. (म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा व कोणाला न द्यावा हे ठरवतो). व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. ॥१२-२२०॥

म्हणोनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।
तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥

म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू. त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्य़ाची टाच आम्ही हृदयावर धारण करू. ॥१२-२२१॥

तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।
तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥ २२२ ॥

त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. (आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ) आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. (कानांनी त्याची कीर्ती ऐकू. ॥१२-२२२॥

तो पहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥ २२३ ॥

तो पहावा, ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळेरहित आहोत तरी डोळे घेतो, आणी आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. ॥१२-२२३॥

दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥ २२४ ॥

त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलो. (म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले). ॥१२-२२४॥

तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे ।
किंबहुना आवडे । निरुपमु ॥ २२५ ॥

त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे ? तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. ॥१२-२२५॥

तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ? ।
परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥ २२६ ॥

त्याच्याशी आमची मैत्री असते. यात काय आश्चर्य आहे ? परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात ॥१२-२२६॥

तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २२७ ॥

जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे. ॥१२-२२७॥

जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत ।
भक्तियोगु समस्त- । योगरूप ॥ २२८ ॥

अर्जुना जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला. ॥१२-२२८॥

तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं ।
येवढी थोरी । जया स्थितीये ॥ २२९ ॥

ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वत: प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो, अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. ॥१२-२२९॥

ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य ।
करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥ २३० ॥

ज्ञा – ती गोष्ट (वर सांगितलेले भक्तियोगाचे वर्णन) जी चित्ताला रंजवणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला (त्या गोष्टीला) स्वानुभवाने जाणतात. ॥१२-२३०॥

तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे ।
जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥२३१ ॥

त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, एवढेच नाही तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात, ॥१२-२३१॥

परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं ।
मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥ २३२ ॥

पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. ॥१२-२३२॥

परी मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि ।
हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ २३३ ॥

परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे, असे मला समजतात व भक्तितत्वाविषयी आपले मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेऊन जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात ॥१२-२३३॥

पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥ २३४ ॥

अगा अर्जुना, या जगामधे तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. ॥१२-२३४॥

तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र ।
भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥ २३५ ॥

तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामधे तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्तिकथेशी स्नेह असतो. ॥१२-२३५॥

आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन ।
ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ॥ २३६ ॥

आम्ही त्य़ाचे ध्य़ान करून, तो आमची पूज्य देवता आहे, त्याच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानीत नाही. ॥१२-२३६॥

तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान ।
किंबहुना समाधान । ते मिळती तैं ॥ २३७ ॥

त्याचे आम्हास व्यसन असते. व तोच आमच्या ठेव्याची खाण आहे. फार काय सांगावे ? तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते. ॥१२-२३७॥

पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता ।
ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥ २३८ ॥

परंतु अर्जुना, जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो. ॥१२-२३८॥

ऐसे निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें ।
बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥ २३९ ॥

आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद (श्रीकृष्ण) याप्रमाणे बोलला. ॥१२-२३९॥

राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु ।
शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥

हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्यास योग्य आहे ॥१२-२४०॥

पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु ।
प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥ २४१ ॥

ज्याची धर्मसंबंधी (धर्मरक्षक म्हणून) कीर्ती उज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्यरहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे, व जो बळीच्या बंधनात राहिला आहे ॥१२-२४१॥

जो धर्मकीर्तिधवळु । आगाध दातृत्वें सरळु ।
अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु ॥ २४२ ॥

देवांचे साह्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे सांगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे, ॥१२-२४२॥

जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु ।
सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥ २४३ ॥

तो भक्तांविषयी मायाळू आहे व प्रेमळ जनांना सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे ॥१२-२४३॥

तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा ।
सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥ २४४ ॥

तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे. ॥१२-२४४॥

आतां ययावरी । निरूपिती परी ।
संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥

आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला ॥११-२४५॥

तेचि रसाळ कथा । मर्‍हाठिया प्रतिपथा ।
आणिजेल आतां । आवधारिजो ॥ २४६ ॥

तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांततरात आणली जाईल ती आपण ऐकावी . ॥११-२४६॥

ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।
हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥

महाराज म्हणतात, महाराज, प्रभु निवृत्तिदेवांनी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हां संतांची सेवा करावी ॥१२-२४७॥

 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

1 thought on “सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *