जगी तारक एक नाम – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 16
जगी तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ।
चला जाऊ तया गावा । पाहू देवा विठ्ठला ।।
वंदू संत चरण -रज । तेणे काज आमुचे ।।
सावता म्हणे विटेवरी । उभा सम चरणी हरी ।।
मथितार्थ : या अभंगामध्ये सावता महाराज परमेश्वराच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगतात. आपला उध्दार व्हावा असे ज्यांना वाटते त्या सर्वांनी विठ्ठलाचे नामस्मरण करावे. या संसाररुपी भवसागरातून तरुन जायचे असेल तर विठ्ठलाचे नामच सर्वश्रेष्ठ आहे. संसारातील कटकटीपासून मनाला विश्रांती मिळवायची असेल तर पंढरपूर हे योग्य ठिकाण आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाबरोबर संताच्या संगतीचा लाभ होतो. संताची संगती, विठ्ठलाचे दर्शन यामुळे भाविकांना प्रपंचाचा काही काळ का होईना विसर पडतो आणि संताच्या पायधुळीला ते वंदन करतात, असे केल्याने आपला उद्धार होईल अशी त्यांची धारणा होते. विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन महाराज करतात. विठ्ठल विटेवर उभा आहे. त्याने आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत. आणि दोन्ही पाय समान ठेवून तो विटेवर उभा राहिला आहे. त्यासाठी त्यांनी समचरणी हा शब्दप्रयोग वापरला आहे. संसारिक भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, संतसज्जनाच्या संगतीचा लाभ घ्यावा.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.