लागलासे काळ पाठी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 27
लागलासे काळ पाठी । कोण तुटी करी त्यासी ।।
ऐका ऐका पंढरीनाथा । निवारा भयापासूनी ।।
नको, नको. या उपाधी । जोडा संधी काळचक्र ॥
सावता म्हणे करुणाकरा । अहो श्रीहरी दयाळा ।।
मथितार्थ : या अभंगात महाराजांच्या मनाची अवस्था संसारिकाची वाटते. कारण सर्वसामान्य माणूस संसारात येणाच्या अडचणीवर मात करायचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला संसार अटळ आहे. टाळायचा म्हटले तरी लोकापवादासाठी करावा लागतो. साक्षात भगवंताचे अवतार असणारे प्रभुरामचंद्रना सुध्दा लोकापवादासाठी सीता मातेचा त्याग करावा लागला होता. मग सर्व सामान्यांची काय गती. संसाराच्या चक्रातून प्रत्येकाला जावे लागते. संसारातील जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात. यापासून सुटका होण्यासाठी महाराज विठ्ठलाला विनवतात. देवा माझी यातून सुटका कर याचा अर्थ असा नव्हे की संसारिक जबाबदाऱ्या त्यांना नको आहेत. पण संसार करत असताना विठ्ठलाचा विसर पडता कामा नये.
प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करताना परमार्थाला पहिले स्थान महाराज देतात. सर्वच संतांनी परमार्था येवढेच प्रपंचाला महत्त्वाचे स्थान दिले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात “आधी प्रपंच करावा नेटका.” संत तुकाराम महाराजसुध्दा या विचाराचे होते. म्हणून त्यांनी प्रपंच करुन परमार्थ केला. कारण काळाचे चक्र चालूच राहणार आहे. त्याची भीती मनात ठेवून परमार्थ करावा. जीवनाचे ध्येय प्रपंच हे नसून परमेश्वर प्राप्ती हे आहे. सावता महाराजाच्या काळातील सामाजिक परिस्थिती अशा प्रकारची होती. सर्वांना मोक्षाचा मार्ग हवा होता. पण तो शोधायचा कसा हे लोकांच्या लक्षात येत नव्हते. म्हणून सावता महाराज विठ्ठलाची भक्ती करण्यास सांगतात. कारण विठ्ठल हा करूणेचा सागर आहे. तो सर्वांशी समभावाने वागतो अशा विठ्ठलाला ते दयाळू असे म्हणतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.