मागणे ते आम्हा नाही हो कोणासी -संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -37
मागणे ते आम्हा नाही हो कोणासी । आठवावे संतासी हेचि खरे॥
पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशीच ॥
सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥
मथितार्थ——– सावता महाराजांनी या अभंगात संत संगतीचे अर्थातच संत सहवासाचे महत्त्व सांगितले आहे. सावतोबा म्हणतात हे देवा आमचे कसलेही कोणाजवळ काहीही मागणी नाही फक्त आम्हाला संतांची संगती घडावी कारण तेच आम्हाला भक्ती मार्ग दाखवतात. संत हाच आम्हाला देवाच्या ठिकाणी आहे तुकाराम महाराजही म्हणतात” तुका म्हणे आता तू उदार होईl मज ठेवी पायी संताचिया l” भक्तीचा मार्ग संत संगतीने दाखविला जातो म्हणून हे देवा हे नारायणा माझ्यावर कृपा कर व मला ईश्वर रूप असणाऱ्या संतांची संगती घडव सावतोबांचा विठ्ठलाच्या भक्तीवर विश्वास आहे.
या भक्तीवर विश्वास ठेवून ते विठ्ठलाची भक्ती करतात त्यांच विठ्ठलाची उपासना आराधना करतात जे भक्त विठ्ठलाच्या भक्तीवर निष्ठा ठेवून भक्ती करतात अशा भाविक भक्तांची आम्हाला संगती घडावी सहवास घडावा असे महाराज म्हणतात, ज्या विठ्ठलाच्या भक्ती मार्गाचा अवलंब करतात ते वारकरी संप्रदायातील संत साधू वारकरी होत या साधूंनी आपल्यातील असणाऱ्या षड्विकारांचा नाश केलेला असतो, म्हणून त्यांना साधू म्हणावे, काम क्रोध मद मत्सर लोभ द्वेष या सहा विकारावर त्यांनी विजय मिळवलेला असतो अशा संतांची अशा साधूंची आम्हाला संगती लाभावी असे सावता महाराज म्हणतात.
श्री .दत्ताञय संभाजी ढगे
श्रीक्षेञ अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.