tukdoji maharaj

संत तुकडोजी सुविचार

संत तुकडोजी सुविचार – १ ते १३० पूर्ण 

१. प्रिय मित्रांनो ! निर्मल हृदयाच्या सिंहासानाशिवाय तुमची प्रिय देवता तुमच्यात विशेषरुपाने प्रगट होऊ इच्छीत नाही. त्याकरिता तुमचे हृदय हृदय-धर्मप्रमाणे शुद्ध व दोष रहित झाले पाहिजे. असे झाले तरच तुम्ही खरे भक्त व्हाल.
२. एका परमेश्वराशिवाय उगीच नाना देवतांची अनेकत्वाने पूजा करणे म्हणजे आपले प्रेम व्यभिचारी बनवून शुद्ध भावनेचा नाश करणे होय.
३. मनुष्याची देवता तो मानतो ती नसून, अखिल प्राणिमात्राला व वस्तूंना आपले सौंदर्य देऊन त्यातून जी प्रत्येक वस्तूचा उपयोग दाखविते आणि त्याकरिता आपली ज्ञानशक्ती देते. तीच त्याची देवता होय !
४. ईश्वराची कृपा धन, ऐश्वर्य, संतती इत्यादि असण्यावर अवलंबून नसून ती सद्विचाराच्या वर्तनावरच अवलंबून असते.
ईश्वराच्या कृपेला तेच पुरुष पात्र होतात की, ज्यांना प्रारब्धाने भीक जरी लागली असली, तथापि असे सदाचरण कदापि विसरत नसतात.
५. ईश्वर भक्तांचे सांप्रदायी (संप्रदायातील) तेच असतात, जे ओळखी-अनोळखीच्या लोकांस सारख्या (समान) प्रेमाने पाहून त्यांचा आदर करतात आणि प्रसंगी आपणाकडे कमीपणा घेऊनही दुसऱ्याला संतुष्ट करतात.
६. संगीत किंवा भजन आपल्या हृदयेंद्रियाला सुख देऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून असते, त्याला खरे संगीत अथवा भजन म्हणता येत नसून, ती एक लोकंना प्रसन्न करण्याची कला आहे.
७. राष्ट्रदेवतेच्या योग्यतेसमोर लोकांच्या आपापल्या लाखों देवता मला सूर्यासमोर गणल्या जाणाऱ्या काजव्याप्रमाणे वाटतात, पण प्रत्येक देवतेचे महत्व त्यांच्या त्यांच्या स्थानी विशेष असणे हे एक मनुष्याच्या स्वार्थीपणाचेच द्योतक असते.
८. आपली वाचा नेहमी सत्य ठेवणे, दुसऱ्याच्या सेवेकरिता अंत:करणापासूनची तयारी असणे, अपराधी लोकांकडे अक्रोध दृष्टीने पाहून त्यांना सत्याकडे नेण्याची इच्छा बाळगणे व जगन्नियंत्या परमेश्वराची प्रेमपूर्वक करुणा भाकणे आणि त्याने
दिलेल्या इभ्रतीची कदर करुन निरभिमान होऊन लोकात राहणे,असेच ईश्वर भक्तांचे शिक्षण नेहमी चालू असते.
९. जे लोक आपत्तीला तोंड देण्याची हिंमत ठेवीत नाहीत, ते भक्ती करुनही मरणाला जिकू शकत नाहीत. जे मरणाला जिंकु शकत नाहीत, ते पुरुष ईश्वराचे भक्त होऊच शकत नाहीत.
१०. मरणास भिऊन रडत बसण्यापेक्षा मरणे अमर कसे होईल याची चिंता करणे बरे असते.
११. धैर्यहीन मनुष्यांकरिता त्यांची झोपडीही हिमालयाएवढी मोठी व जड होऊन बसते.
१२. मनुष्याने आपल्या सद्विचाराला (विवेकबुद्धीला) व ईश्वराला सदैव भ्याले पाहिजे, परंतु अन्याय आणि दुष्टतेला कधी न भिता हाकून दिले पाहिजे.
१३. प्रसंगी मार खाऊनही आपली सत्यनिष्ठा व धैर्य न सोडणे याला मार देणणाऱ्यापेक्षाही धाडस ठेवावे लागते, म्हणूनच हिसेंपेक्षा अहिंसेची किंमत अधिक मानली जात असते.
१४. भित्र्या मनाने मार खाऊन आपली लाज वाचवणे हे दुर्बलाचे काम असते, कुणावरही आवेशाने वार करणे मूर्खपणाचे असते आणि ज्ञान असून जाणूनबुजून परिणामाकरिता वार करणे हे
शहाण्याचे कार्य असते.
१५. ताकदवान तो नसतो की, जो दुसऱ्याला खाली पाडतो. तोच ताकदवान खरा की, जो पडलेल्याला उचलून नीतिपथावर आणतो.
१६. आपल्या शत्रुविषयीही उत्तम बुद्धी ठेवा त्याने ईश्वराजवळ तुमची कदर होईल.
१७. जे लोक तुम्हांला अलग फेकतात, त्यांच्याशी तुम्ही मिळून वागण्याची बुद्धी ठेवा. जे लोक तुमच्याशी वाईट वागतील, त्यांच्याशी तुम्ही सरळ वागा म्हणजे प्रभू तुमच्याकरिता त्यांना दंड न देता दोस्त करुन घेईल.
१८. आपल्या शत्रूचाही कोणाकडून होत असलेला अयोग्य अपमान सहन करणे वीराचे कार्य नव्हे. शत्रूची अयोग्य फजीती नेत्राने पाहून समाधान मानणे हे नीचाचे काम आहे.
१९. शत्रू आणि मित्र हा भेदभाव कार्यातच समजणे व इतर प्रसंगी दोघांनाही आपल्यासमान पाहणे, हेच शूर लोकांचे लक्षण असते.
२०. आपत्तीच्या जाळीतून करुण हाक ऐकू येत असता प्राणाची पर्वा न करुन धडाडीने मदत करणारे वीरच खरे वीर समजले जात असतात.
३०. मनुष्य गुणाने उत्तम असला म्हणजे कुरुपही रुपवान दिसत असतो.
३१. आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूवर कार्याशिवाय अती प्रेम करणे, म्हणजे उगीच आपली वृत्ती गुलाम करुन शेवटी भुतांच्या हाती प्राण देणेच होय.
३२. प्रत्येक आजारी माणसाचा हक्क त्याच्या रोगाची निवृत्ती करण्याइतकाच तुमच्यावर आहे. ती जर होत नसेल आणि तो जर आपला पुढचा मार्ग मोकळा करु इच्छित असेल तर त्याचेविषयी किंचितही दु:ख न मानता परमेश्वराला शुभाशीर्वाद मागा नि त्याला सर्वमिळून प्रभूच्या भूशय्येवर पोचवून समाधान
माना.
३३. कोणत्याही माणसाची प्रेतयात्रा चालली असता निदान पाच पावले तरी त्याच्यामागून चालू लागा व नंतर आपले काम करा ही त्या रथीची इभ्रत आहे.
३४. मित्रांनो ! मृत्यू हा उगीच येत नसतो, जेव्हा परमेश्वराला आपली भेट देऊन त्या जीवाच्या कर्माची विचारपूस करुन त्यास दुसऱ्या शरीराने पाठवावयाचे असते, तेव्हांच तो आपला मृत्यु-दूत पाठवितो. वास्तविक ती किती प्रिय आणि मंगल आहे, हे थोरच जाणू शकतात व ते त्यासाठी सदैव तयार असतात.
३५. नदी ज्याप्रमाणे सागराला मिळण्याकरिता उत्सुक असते त्याप्रमाणेच शेवटच्या वेळी जीव हा आपली जबाबदारीची कर्तव्ये परमेश्वरासमोर मांडण्याकरिता उत्सुक असतो (किंवा असायला हवा)
सुविचार-स्मरणी
३६. मित्रांनो ! मरणाला आपला अत्यंत प्रिय आणि हितैषी मित्र समजा. जो आपली भेट परमेश्वराशी करुन देण्याला उत्सुक असतो आणि तुच्छ आसक्तीचे बंधन तोडण्यास सुसज्ज असतो.
३७. अपरिग्रह म्हणजे मुद्दाम लंगोटी लावणे नसून, जरुरी आहे त्यातच स्वावलंबी होणे हाच खरा अपरिग्रह आहे.
३८. आत्यंतिक ऐषआराम हे शेवटच्या अवनतीचे असते व आत्यंतिक सावधानी आणि कार्यतत्परता हे ऐश्वर्य प्राप्तीचे लक्षण असते.
३९. तुम्हाला जर सदैव धनिक रहावेसे वाटत असेल, तर माझे हे रत्न सदा उपयोगाकरिता आपल्याजवळ असू द्या-
नेहमी तारतम्यदृष्टीने सत्य बोलणे, दुसऱ्याला दिलेला शब्द पुरा करणे, कुणाचाही विश्वासघात न करणे, व्यभिचारापासून दूर राहणे, आपली नजर नेहमी नम्र ठेवणे, कुणावरही आवेशाने जबरी न करणे व स्वत: अंगाने कर्तव्यदक्ष असणे, या नियमांनी
मनुष्य सदासर्वदा तिन्ही लोकांत धनिक राहतो.
४०. आपली सुखसोय दुसऱ्यावर अवलंबून ठेवणे म्हणजे आपले मरण लोकांनी हसत पाहण्याची इच्छा करणेच होय.
४१. मागे पहाल तर आपले दोष पहा आणि पुढे पहाल तर थोरांची चरित्रे पहा म्हणजे उन्नतीचा मार्ग मिळेल.
४२. उन्नतीचा मार्ग शब्दपांडित्य, साहित्य, दर्शन, कलावृद्धि इ. एवढ्यावरच अवलंबून नसून, सत्याचरण व प्रभु प्रियता याचीच त्याला मुख्य आवश्यकता आहे, केवळ एवढ्याने पुरुष उन्नत होतो परंतु बाकीच्या कला असणे हा सुवर्णात सुगंधाचा योग होय.
सुविचार-स्मरणी
४३. मोठ्या गुन्हेगारांपैकी ते लोक असतात, जे आपल्या वडिलांची सत्य आज्ञाही मानीत नसतात आणि मोठ्यांची मने दुखवितात; खोटीच शपथ सदा घेतात नि खोटीच साक्ष लोभास्तव देतात.
४४. मनुष्याचा स्वभाव एखाद्या प्रसंगानेच उघडा पडत असतो.
४५. तेच लोक सज्जन असतात, ज्यांना उत्तम कामाविषयी खुशी आणि वाईट कामाचे दुःख होते.
४६. खरा स्वयंसेवक तोच की, ज्यावर लोक आपली कौटुंबिक मालमत्ता सोपवण्याएवढा भरवसा ठेवू शकतात नि तसे करिताना नि:शंक राहतात.
४७. मित्रांनो ! साधारणत: मनुष्याच्या स्वभावाची परीक्षा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ किंवा श्रद्धावान लोकांजवळ होत नसून, त्यांच्या आज्ञेत वागणारऱ्या आणि त्याहून कमी गणल्या जाणाऱ्या
लोकांच्या वागणुकीवरुन, तसेच त्या लोकांशी होत असलेल्या त्याच्या वागणुकीवरुनच यथार्थ होऊ शकते.
४८. शस्त्रे घर्षणाने चमकतात आणि शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो.
४९. धाडसाची तयारी प्रसंगांनीच लौकर वाढत असते, केवळ छाती मोठी करुन नव्हे.
५०. लक्षावधी रुपये देत असताही जो लाचलुचपतीच्या मोहाने आपली न्यायबुद्धी गहाण ठेवून सत्य पक्ष विसरत नाही, तोच पुरुष वीरांच्या मालिकेत बसवण्यास योग्य असतो.
५१. प्रयत्नशील व वीर पुरुषास हा समस्त संसार गुलाबाच्या फुलांच्या ताटव्यासारखा आल्हादकारक सुगंध देणारा वाटत असतो.
५२. आपल्या सत्य आणि सरळ वृत्तीला विनाकारण कोणत्याही ऑफिसर किंवा सत्ताधीशासमोर नम्र करण्याचे कारण नसते. तेच लोक भीत असतात, जे लोकात पाप करून आपले वर्चस्व ठेवू इच्छितात आणि अधिकाऱ्यांची मुद्दाम हांजीहाजी करितात.
सुविचार-स्मरणी
५३. लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. याकरिता आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका आणि सर्वाशी समान भावनेने वागा.
५४. देहापेक्षा कर्तव्याचा मान लाखोपटीने उत्तम असतो आणि चिरंतर ही (अमर) असतो.
५५. पुढे सरकाल तर सेवेकरिता आणि मागे हटाल तर मानाकरिता (सन्मानप्रसंगी); असे झाले की लोकमित्र निश्चयाने व्हाल.
५६. निर्वैर भावातही आपला सत्यपेक्ष न सोडणे म्हणजे प्रतिपक्षाला दुरुस्त करणारा आदर्श दाखविणेच होय, थोर लोक ही गोष्ट केंव्हाही विसरत नसतात.
५७. आपले दोष दुसऱ्याला सांगण्याएवढी जरी हिंमत नसली, तरी ते दोष आहेत असा भाव मनात जागृत असू द्या, म्हणजे दुरुस्त व्हालच.
५८. मानाकरिता उपवासी न राहता कामाकरिता चपळ असलेले बरे, म्हणजे मान (कि्ती) आपोआपच मागे लागून येईल.
५९. भक्तिवान मनुष्याने आपल्याला आवश्यक असणारे कामही न करणे म्हणजे भक्तीच्या पांघरुणात लपून अघोर पाप वाढवणेच होय.
६०. ज्यांना धन, मान, वैभव, संप्रदाय इ. गोष्टी अत्यंत आवडत असतील त्यांच्याकरिता समाज-सेवकाच्या आणि ईश्वर भक्तांच्या सभेत कोठेही स्थान नाही.
सुविचार-स्मरणी
६१. मित्रांनो ! आपल्यासमोर जेंव्हा कोणत्याही मनुष्य मात्रात काही कमतरता दिसून येईल, तेंव्हा त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या आणि त्याचा जन्म सफल करा. याच्याएवढे पुण्य सर्व जगात दुसरे नाही.
६२. जी गोष्ट ज्याच्यात उपजत अंशत:ही नाही, तिची हौस करुन त्याने आपली फजीती करुन घेऊ नये.
६३. अतिआग्रहानंतरही मनुष्याने तेथून जाणे आणि बाहेर निघताच तेथे घोर आपत्ती कोसळणे, हेही एक परमेश्वराच्या कार्यापैकी आपले अस्तित्व दर्शविणारे कार्यसूत्रच आहे; की जे नकळत मनुष्याकडून वेगळेच कार्य घडवून आणते.
६४. अचानक घडून येणाऱ्या ईश्वरी योगाच्या वेळी थोरांचीही बुद्धी कुंठित होत असते, कारण तो प्रसंग अनावर असतो.
६५. वीरांच्या भरवशावर आपली वीरता दाखविणारे लोक वास्तविक अबलेपेक्षाही कमी धैर्यवान असतात.
६६. काहीतरी उद्योगकला शिकल्याशिवाय जिवंत राहणे म्हणजे भूमीला भार होणेच आहे.
६७. सद्य:परिस्थितीतील दुःखी जीवांना उद्योगशील करुन त्यांच्यात आनंद निर्माण करणे हीच कला सर्व साहित्यात व कलांमध्ये मला श्रेष्ठ वाटते.
६८. मित्रांनो ! जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजता, तीच गोष्ट दुसरऱ्याकरिताही तेवढीच उत्तम समजून मदत करा.
६९. जवळच्या माणसाला फाटके पांघरूण असता आपल्याजवळ अधिक कपड़े संग्रही ठेवणे, हे परमेश्वराला खपत नसते.
सुविचार-स्मरणी
६१. मित्रांनो ! आपल्यासमोर जेंव्हा कोणत्याही मनुष्य मात्रात काही कमतरता दिसून येईल, तेंव्हा त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या आणि त्याचा जन्म सफल करा. याच्याएवढे पुण्य सर्व जगात दुसरे नाही.
६२. जी गोष्ट ज्याच्यात उपजत अंशत:ही नाही, तिची हौस करुन त्याने आपली फजीती करुन घेऊ नये.
६३. अतिआग्रहानंतरही मनुष्याने तेथून जाणे आणि बाहेर निघताच तेथे घोर आपत्ती कोसळणे, हेही एक परमेश्वराच्या कार्यापैकी आपले अस्तित्व दर्शविणारे कार्यसूत्रच आहे; की जे नकळत मनुष्याकडून वेगळेच कार्य घडवून आणते.
६४. अचानक घडून येणाऱ्या ईश्वरी योगाच्या वेळी थोरांचीही बुद्धी कुंठित होत असते, कारण तो प्रसंग अनावर असतो.
६५. वीरांच्या भरवशावर आपली वीरता दाखविणारे लोक वास्तविक अबलेपेक्षाही कमी धैर्यवान असतात.
६६. काहीतरी उद्योगकला शिकल्याशिवाय जिवंत राहणे म्हणजे भूमीला भार होणेच आहे.
६७. सद्य:परिस्थितीतील दुःखी जीवांना उद्योगशील करुन त्यांच्यात आनंद निर्माण करणे हीच कला सर्व साहित्यात व कलांमध्ये मला श्रेष्ठ वाटते.
६८. मित्रांनो ! जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजता, तीच गोष्ट दुसरऱ्याकरिताही तेवढीच उत्तम समजून मदत करा.
६९. जवळच्या माणसाला फाटके पांघरूण असता आपल्याजवळ अधिक कपड़े संग्रही ठेवणे, हे परमेश्वराला खपत नसते.
सुविचार-स्मरणी
७०. दुसऱ्याच्या अडलेल्या कामाकरिता घरात वस्तू असून नाकारू नका, म्हणजे तुमच्याकरिताही लोक धावून येऊन तुमच्या अडचणी दूर करतील.
७१. तो मनुष्य मनुष्यत्वविहीन होय, जो आपण स्वत: भोजन करुन आणि शेजारच्या मनुष्याला उपवासी पाहूनही काही देत नाही.
७२. ज्या ज्ञानाने तुम्ही जगाची सत्व परीक्षा करिता तोच तुमचा स्वभाव आहे.
७३. राजा प्रजेचा आधाराशिवाय राज-मुकूट टिकवू शकत नसतो.
७४. जगाची सेवा करणाऱ्या लोकांना-आपल्या हातात आपली प्रतिष्ठा, सत्यनिष्ठ लोकांवर प्रेम करणारी प्रबळ वृत्ती, दरिद्री लोकांची अंत:करणात वेदना, संघर्षप्रसंगी धाडस आणि मार खाणे व मरणे याविषयी आध्यात्मिकता ठेवावी लागते अशीच माणसे जगावर आजन्म उपकार करु शंकतात आणि पुढच्या पिढीला धडा देणारे होतात.
७५. सत्यज्ञान हेच मनुष्याचे स्वरुप आहे. त्याला पहातच (शोधीतच) मनुष्य जगात थोर होत असतो.
७६. निष्काम प्रेमच अमर आत्म्याचा प्रकृतिस्वभाव आहे.
७७. सत्य प्रेम हे व्यक्तिभाव विसरुन शुद्ध वृत्तीच्या द्वारे प्रेमी जनांत उदात्ततेचा अनुभव करणारे असते; ज्यायोगे आकुंचितता, क्षुद्रता नष्ट होत जाते, ते प्रेम भक्त लोकांत आणि विनम्र सदाचारी लोकांतच सापडत असते.
७८. जगाचे सुखदुःखात्मक आघात ज्ञानी पुरुषावरही संभवत असतात, पण तो त्यात आसक्त होत नाही. तो आपल्या जाणिवेने सर्वांचे निरसन करुन लौकरच मोकळा होत असतो.
सुविचार-स्मरणी-
८९. ज्या कुळात काही पिढ्यांपासून तरी सत्य-नैतिकता-अर्थात सदाचाराने वागण्याची दीक्षा चालू असते व दुसऱ्यांच्या सुखदुःखात मदत करण्याकरिता आपल्याप्रमाणेच लक्ष दिले जाते, त्या घराण्यास कुलवंत म्हणतात.
९०. आपल्या दुर्बळ स्वभावाचे कुणाच्याही धाडसी मनावर दडपण घालून आघात करु नका.
९१. सिंहाच्या छाव्यात हत्तीवर छापा घालण्याची उपजतच बुद्धी होत असते, तसेच कुलवान लोकांना शत्रूशी (दुर्जनाशी) झुंड खेळण्याची बुद्धी अगदी स्वाभाविक असते.
९२. भीतीने काळे तोंड घेऊन अंधारात लपून बसणारापेक्षा उजेडात लोकहिताकरिता मरणारा तरुणच खरा अमर होत नाही का ?
९३. ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या मातापित्याची सत्ता असते त्याप्रमाणेच त्यापेक्षाही लाखोपटीने अधिक त्याच्या देशाची सत्ता त्याच्यावर असते.
९४. देश हा नागरिकांच्या संख्येवर मोठा गणला जात नसून, त्यातील थोर व नीतिज्ञ लोकांवर मौल्यवान ठरला जात असतो.
९५. जेथील धर्मज्ञ (धर्मगुरु) व सत्ताधीश लोक मार्ग सोडून वागतात. तेथील प्रजेच्या सर्वस्वाचा न्हास अगदी जवळ आलेला असतो.
९६. अगोदर तर्काचे डोंगर उठवीत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाचा विचार करुन पुढे चालणारे लोकच खंबीर असतात.
९७. देशातील कृषीत धान्याची निपज अत्यंत कमी होणे हे त्यातील लोकांच्या आलस्यादि पापाचेच द्योतक होय, असे मला वाटते.
सुविचार-स्मरणी
९८. लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा ईमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो.
९९. दहा कुपुत्र असण्यापेक्षा एकटाच सुपुत्र असलेला अधिक बरा.
१००. नीच विचाराने जगण्यापेक्षा सुशीलतेने मरणेही अधिक मौल्यवान् असते.
१०१. आपले अंत:करण सर्वाकरिताच मोकळे ठेवण्याइतका मोठेपणा फारच थोड्या लोकांत मिळत असतो.
१०२. मित्रांनो ! श्रेष्ठ पुरुषांच्या आश्रयास राहून कितीही विद्वत्ता संपादन केली असली, तरी जो स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही, त्याची ती विद्या कुचकामाचीच समजावी.
१०३. स्वत:च्या पायावर उभा राहुन आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टिने कमी वाटत असला, तरी त्याचे ज्ञान अनुभविक असल्यामुळे थोर व बहुमोल आहे, असे मी समजतो.
१०४. मिळालेल्या धनावर मनसोक्त चैन भोगून दुसऱ्यारकडे लक्षच न देण्याइतका नीचपणा पशुपक्षी व कीटकां (कोल्हे, कावळे, मुंग्या इ.) मध्येही नाही.
१०५. धर्म हा धंदा म्हणून आचरण्याचा विषय नव्हे, तर तो व्यष्टिसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो; आणि म्हणूनच त्याची मूलतत्त्वे अबाधित असतात.
१०६. आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासमोर समाजाचा नाश इच्छिणारे लोक लांडग्याइतकेच विद्वान (!) समजले पाहिजेत.
सुविचार-स्मरणी
१०७. या जगातील प्रत्येक वस्तू कोणाच्या ना कोणाच्यातरी  उपकाराकरिताच आपले जीवन वाहणारी आहे. मनुष्य जर त्या सर्वात श्रेष्ठ आहे तर त्याने याचे महत्व समजून स्वतःही
दुसऱ्यावर उपकार करण्याची बुद्धी आपल्यात बाळगणे हेच त्यास भूषणावह आहे.
१०८. सृष्टीतील प्रत्येक वस्तूत, प्रत्येक कणात, सतत कार्यप्रवृत्ती खेळत आहे. जो निष्क्रीय (कार्यहीन) होऊन फिरेल देवाचा आणि समाजाचा गुन्हेगार ठरला जाईल, असा सृष्टीचा कायदा आहे.
१०९. अनुभवाच्या उच्च शिखरावर गेलेले पुरुष, जगालाच प्रभुचे रुपक-किंबहुना प्रत्यक्ष स्वरुप-समजून प्रत्येक जीवाशी समरस होऊन वागण्यात गर्क झालेले असतात.
११०. मित्रांनो ! जगात असा कोण साधू आहे की जो आपले कर्तव्यसोडून देवाच्या मागे लागल्यानेच देवाला मिळाला आहे ?
कुणीही नाही, जे भक्त झाले, त्यांचे कार्य पाहूनच देव
त्यांच्याकडे धावून आला आहे. मग लोक आपले सत्य
कार्य करुनच भक्त का बनत नाहीत ?
१११. आपली स्वसत्कर्तव्यरतता अंतर्बाह्य एकरुप दाखवणे, या भक्तिमार्गासमोर जगातील कोणत्याही सन्मानाची मजल पोचली नाही.
११२. आपले स्वत:चे सदाचारयुक्त नियुक्त कार्य सोडून केवळ भक्तीच्या मागे लागणे म्हणजे नाव सोडून नदी आवरण्याचा प्रयत्न करणेच आहे.
११३. अंगाने पोटाकरिता कष्ट करुन भक्ती करण्याऐवजी लोकांवर आपले ओझे घालून भारती करीत राहणे म्हणजे उपकाराऐवजी देवावर अपकारच करणे आहे असे मला वाटते.
सुविचार-स्मरणी
११४. संसार ही परमार्थाची शाळा असून परमार्थ हा संसाराचा उद्दिष्ट हेतू आहे.
११५. आपल्या पूजेकरिता मंदिराची आवश्यकता असताना एखाद्या कारागीरास (शिल्पकारास) विनंती करण्यापेक्षा आधी स्वतःच कारागीर होऊन दुसऱ्यास उपकार दृष्टीने मकान बांधून देण्यातच देवाची पूजा अधिक होत असते, असे मला वाटते.
११६. कष्टाळूपणे मजूरी करुन जे पद सद् भक्तांनी प्राप्त करुन घेतले, ते लक्षावधी रुपये घरी असता दान करुनही कुणी मिळविले असे क्वचितच आढळेल.
११७.मित्रांनो ! या जगात अत्यंत गरम किंवा कोमल वस्तू जर कोणती असेल तर ती सज्जनाचे अंत:करण ! तसेच अत्यंत कठीण-कशानेही न          दुरभंगणारे-असे जर काही असेल तर तेही एक सज्जनांचे अंत:करणच !!
११८. सज्जन दयेच्या दृष्टीने अत्यंत कोमल,  निश्चयासाठी कठोर असतात.
११९. आपल्यासमोर स्पष्ट वाईट दिसणाऱ्या कार्यास अत्यंत उत्तम बनविण्याकरिता झटणे म्हणजे आपल्यापरीने राष्ट्रसेवा करणेच समजावे.
१२०. आपल्या राष्ट्राचा स्तुत्य, न्याय्य व सक्रीय अभिमान असणे म्हणजे देवासमोर कर्तव्याने चमकणेच होय.
१२१. जो दुसऱ्याची करुण हाक ऐकू शकतो त्यालाच ईश्वराचा आवाज ओळखता येतो.
         सुविचार-समरणी:
१२२. मित्रांनो ! ईश्वरभक्तांना मोक्ष जसा हातचा मळ वाटतो तसाच उद्योगशील पुरुषांना संसार हा केवळ चेंडू प्रमाणे  क्रीडासाधन वाटत                 असतो.
१२३. जो पुरुष उद्योगाला केवळ आपल्या उदरभरणाचे स्वरुप देतो तो बंधनात पडतो आणि जो आपल्या उद्योगाला राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरुप           देतो तो उद्योगानेही मोक्षगामी होत असतो.
१२४. ज्याची प्रेम-मुद्रा आपत्तीने मलीन होत नाही. तोच पुरुष मरणालाही लाजवीत असतो.
१२५. जगाच्या सुखासाठी कारागृहात अडकलेल्या
         तुटक्या कैद्यासमोर लक्षावधी रुपये कमावणाऱ्या नोकरांचे तेज़ पडू शकत नाही.
१२६. सत्याच्या बाणेदारपणाला भरजरी पोषाख आणि सोन्याची आभूषणेही दाबू शकत नाहीत.
१२७. गुलाम होऊन सुवर्णाच्या रत्नजडित पिंजऱ्यात पडण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात स्वतंत्रतेच्या हिरव्या चिल्हाटीकर राघू अधिक                    आनंदात दिसत असतात.
१२८. जी गुलामी पशू, पक्षी नि वृक्षही सहन करुन शकत नाहीत, ती मनुष्याने भिऊन स्वीकारावी; यापेक्षा अधिक पतन ते कोणते असते ?
१२९. पक्ष्यांच्या पंखांच्या भरारीपेक्षा मनुष्याच्या मानसिक भरारीत अधिक सामर्थ्य असते पण तपहीन मनुष्याच्या काल्पनिकभरारी                         पक्ष्यापेक्षाही निपट्टर (हीन) असते.
१३०. मित्रांनो ! हा सर्व संसार वीर्यवान लोकांचा दास आहे. जे लोक वीर्यहीन, हतबल असतील त्यांनां जगात  कोल्हा कुत्राही तान मारू                  देणार  नाही.
_______________________________________
संत तुकडोजी सुविचार संत तुकडोजी सुविचार संत तुकडोजी सुविचार  संत तुकडोजी सुविचार  संत तुकडोजी सुविचार  संत तुकडोजी सुविचार संत तुकडोजी सुविचार 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *