संत बंका

संत बंका अभंग

संत बंका अभंग गाथा – एकूण ३९ अभंग

संत बंका अभंग – १

चरण मिरवले विटेवरी दोनी ।
ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥
तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।
अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।
ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥
वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।
भक्तां अभयकर देत असे ॥४॥


संत बंका अभंग – २

प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा ।
उभा तो देखिला भीमातटीं ॥१॥
कर कटावरी पाउलें साजिरीं ।
शंख चक्र करीं मिरवतसे ॥२॥
योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा ।
भक्तिचा आंदणा घरोघरी ॥३॥
वंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा ।
पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥४॥


संत बंका अभंग – ३

पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा ।
निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥
तारीतासे एका नावासाठी जगा ।
ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥
गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें ।
प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥
वंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा ।
मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥


संत बंका अभंग – ४

एक एकादशी जरी हो पंढरीसी ।
सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणे ॥१॥
चंद्रभागेतीरीं चतुर्भुजा नरनारीं ।
तेथें उभा हरि पंढरीराव ॥२॥
परतोनि मागुता ऐसा कईं होसी ।
जाउनी पंढरीसी पाहे डोळां ॥३॥
तुझे देह गेह ऐसे पैं न म्हण ।
साधीं हें निधान पांडुरंग ॥४॥
पुनरपि संसारा न येसी मागुता ।
आणिक सर्वथा ऐसा नाही ॥५॥
वंका म्हणे पहाल भजाल देहीं ।
तापत्रय गेलें सर्वही पांडुरंगीं ॥६॥


संत बंका अभंग – ५

चोखियाचे घरी चोखियाची कांता ।
सोयरा तत्वतां नाम जीचें ॥१॥
बहु दिवस करी प्रपंच कारण ।
परी नव्हे संतान तिजलागीं ॥२॥
बैसोनियां एकांतीं आठवी पंढरीराणा ।
म्हणे कांवो नारायणा विसरलासी ॥३॥
आमुचीया कुळीं नाहीं वो संतान ।
तेणें वाटे शीण मना माझ्या ॥४॥
ऐकोनी पंढरीराव हासलासे मनीं ।
म्हणे ऐकें रुक्मिणी गोड एक ॥५॥
चोखियाची कांता चिंताक्रांत मनीं ।
संसारी असोनी उदास वृत्ती ॥६॥
पोटीं नाही मूल करी तळमळ ।
वंका म्हणे विठठल काय करी ॥७॥


संत बंका अभंग – ६

चोखियाचे घरा आले नारायणा ।
होउनी ब्राह्मण दिनें वृध्द ॥१॥
हातामध्ये कांठी सावळा जगजेठी ।
तुळसीमाळा कंठी बुका भाळीं ॥२॥
कांपत कांपत जातसे चांचरी ।
मोठा नटधारी घरघेणा ॥३॥
चोखियाचे घर पुसतसे लोकां ।
वैकुठीचा सखा भक्त काजा ॥४॥
दुरोनियां पाहे चोख्याची अंतुरी ।
तंव तो आला द्वारी चोखियाच्य़ा ॥५॥
हांसत कांपत मुखाने बोलत ।
लाळही गळत मुखावाटे ॥६॥
वंका म्हणे पंढरीचा राणा ।
देखिला नयनां सोयराई ॥७॥


संत बंका अभंग – ७

तुळसी वृंदावनी उभा तो ब्राह्मण ।
पुसे घरीं कोण आहे बाई ॥१॥
कोणाचें हें घर दिसतें साजिरें ।
मुलें आणि लेंकुरें काय आहे ॥२॥
ऐकोनी उत्तर चोखियाची कांता ।
प्रेमजळ नेत्रा भरियेले ॥३॥
म्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद ।
आठविती गोविंद रात्रंदिवस ॥४॥
संसारी सुख नाहीं अणुमात्र ।
सदा अहोरात्र हाय हाय ॥५॥
पोटीही संतान न देखेची कांही ।
वायां जन्म पाहीं झाला माझा ॥६॥
वंका म्हणे ऐस बोलोनीयां मात ।
घाली दंडवत ब्राम्हणासी ॥७॥


संत बंका अभंग – ८

मग पंढरीराणा बोलतसे वाणी ।
आलों मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥
क्षुधा मज बहु लागली साजणी ।
देई कांही आणोनी फराळासी ॥२॥
येरी म्हणे आम्ही नीच याती महार ।
कैसा हा विचार करूं आतां ॥३॥
येरू म्हणे माझा जाऊं पाहे प्राण ।
यातीसी कारण नाहीं मज ॥४॥
कांही तरी अन्न असेल शिळे मिळें ।
देई येची वेळे लवकरी ॥५॥
वंका म्हणे ऐसे लाघव श्रीहरी ।
करोनी पसरी हात पुढें ॥६॥


संत बंका अभंग – ९

सोयराईनें मनी करोनी विचार ।
म्हणे हा अविचार करूं कैसा ॥१॥
हा तंव आहे वृध्द ब्राह्मण ।
दंत कानहीन दुर्बळ तो ॥२॥
यासी अन्न देतां आपुला विचार ।
मज मारामार करिती लोक ॥३॥
विन्मुख हा जातां पति रागवेल ।
बोल हा लागेल कपाळासी ॥४॥
वंका म्हणे ऐसा करोनी निर्धार ।
ठेवी पायावर डोई तेव्हा ॥५॥


संत बंका अभंग – १०

आम्ही तो जातीचे आहेती महार ।
तुम्हीं तो थोर उंच वर्ण ॥१॥
अन्नपाणी देता निंदितील जन ।
करतील ताडण मजलागीं ॥२॥
ऐंकोनियां मात येरू बोले वचन ।
यातीसी कारण नाही मज ॥३॥
माझा तूं वाचवी अन्न देऊनि प्राण ।
पुढील कारण पाहूं नको ॥४॥
ऐकोनी उत्तर सोयरा उठली ।
घरामध्यें आली लवलाहीं ॥५॥
दही आणी भात घेतला वाटीभरीं ।
आणोनिया करीं दिला तिने ॥६॥
वंका म्हणे हरी खावोनी तुष्टला ।
म्हणे माग मला देतों तुज ॥७॥


११

येरी म्हणे मज काय देतां स्वामी ।
उच्छिष्टांचे आम्ही धणी असों ॥१॥
तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा ।
तोचि प्रिय देवा आहे आम्हां ॥२॥
येरु म्हणे घास घेई माझा करीं ।
मूल तें निर्धारीं होइल तुज ॥३॥
ऐकतां आनंदे घाली लोटांगण ।
वंदिले चरण जीवेंभावें ॥४॥
वंका म्हणे ऐसें लाघव करोनी ।
गेलासे निघोनी चक्रपाणी ॥५॥


१२

इतुक्यामाजी चोखा घरासी तो आला ।
वृत्त्तांत निवेदिला सोयराई ॥१॥
येरु म्हणे हें काय अनुचित केलें ।
बोल ते लाविले आपणासी ॥२॥
जातिचे तो महार जग जाणताती ।
आपुली फजिती आपुल्या हातें ॥३॥
कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण ।
आपुले कारण साधीं आधीं ॥४॥
वंका म्हणे ऐसे बोल ते ऐकोनी ।
सोयर चरणीं घाली मिठी ॥५॥


१३

कौतुकें आनंदे लोटल कांही काळ ।
तों आलें असे फळ प्रसादाचे ॥१॥
चोखीयाची कांता जालीसे गर्भीण ।
लागलासे पूर्ण नववा मास ॥२॥
स्वभावे विनंती करी पतीलागीं ।
घरीं नाही सामोग्री कैसी करूं ॥३॥
वंका म्हणे ऐसी ऐकोनियां मात ।
निघाला त्वरित बहिणी घरा ॥४॥


१४

न पुसतां गेला बहिणीचीया घरा ।
गांव मेहुणपुरा नांदतसे ॥१॥
नाम तें निर्मळा निर्मळेचे तीरी ।
वाचे निरंतरी नामघोष ॥२॥
चोखा तैसी बहिण बहिण तैसा चोखा ।
सदा नाम मुखा विठोबाचें ॥३॥
वंका म्हणे धन्य ज्याचा अमृतजन्म ।
निघे अस्थी नाम विठोबाचें ॥४॥


१५

चोखियाचे घरी नवल वर्तले ।
पाहुणे ते आलें देवराव ॥१॥
सोयर निर्मळा होत्या दोघी घरी ।
पाहुणा श्रीहरी आला तेव्हां ॥२॥
खोपट मोडकें द्वारी वृदांवन ।
बैसे नारायण तया ठायीं ॥३॥
दोघी प्रेमभरित धरिती चरण ।
घालितीं लोटांगण जीवेभावें ॥४॥
कोठोनियां स्वामी आलेती तें सांगा ।
येरू म्हणे पै गा दूर देशीं ॥५॥
झाले दोन प्रहर क्षुधेने पीडिलों ।
म्हणोनियां आलों तुमचे सदनी ॥६॥
कोणाचें हें घर सांगा हो निर्धार ।
ते म्हणती महार आम्ही असों ॥७॥
येरू म्हणें घरी कोण अधिकारी ।
कैसी चाले परी संसाराची ॥८॥
मग त्या ऐकोनी तयाचे बोलणें ।
म्हणती देवाजीनें निकें केलें ॥९॥
वंका म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी ।
चोखियाचे घरी राहे सुखें ॥१०॥


१६

संसारदुःखें पीडिलों दातारा ।
किती येरझारा जन्ममरण ॥१॥
सोडवू गा देवा भवाची काचणी ।
जातो आडरानी विषयसंगे ॥२॥
भवाचिया डोहीं बुडतों वेळोवेळां ।
कां न ये कळवळा तुज देवा ॥३॥
वंका म्हणे तुम्ही जरी मोकलिलें ।
कवणातें वहिलें शरण जाऊं ॥४॥


१७

आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी ।
तूंचि माझा बळी मायबाप ॥१॥
तुम्हांविण कोणा जाऊं मी शरण ।
कांहो अभिमान नये माझा ॥२॥
हीन याती दीन पतीत आगळा ।
म्हणोनि कळवळा नये माझा ॥३॥
वंका म्हणे अहो पंढरीनिवासा ।
तुजविण आशा दुजी नाहीं ॥४॥


१८

कासया गा मज घातिलें संसारा ।
पाडिलें विसरा तुमच्या नामा ॥१॥
कोठवरी हांव करितों दिवसराती ।
गुंतलोंसे भ्रांती माया मोहें ॥२॥
न कळे उकला करितां येरझारी ।
माझा मीच वैरी झालों दिसे ॥३॥
वंका म्हणे सुख संताचे संगती ।
ती मज विश्रांती द्यावी देवा ॥४॥


१९

उपाधीच्या भेणें आलोंसे शरण ।
कायावाचामने सहित देवा ॥१॥
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत ।
तूं माझें गणगोत पंढरिराया ॥२॥
तुं माझी साउली तू माझी माउली ।
प्रेमाची माउली तूंचि माझी ॥३॥
वंका म्हणे तुज विकिला जीवप्राण ।
काया वाचा मन सत्य देवा ॥४॥


२०

नाहीं प्रेमभाव नकळे मान्यता ।
सलगी बोलतां सुख वाटे ॥१॥
अखंड नामावळी गाईन वेळोवेळीं ।
नित्य ती दिवाळी आम्हांघरीं ॥२॥
संतसमागम वैष्णवांचा हाट ।
पंढरीये पेठ दुमदुमली ॥३॥
वंका म्हणे सुख तयाचे संगंती ।
बैसेन पंगती हरिदासा ॥४॥


२१

भांबावोनी प्राणी संसारी गुंतले ।
माझें म्हणोनि श्रमले भवनदी ॥१॥
नामाची सांगडी न बांधिती कोणी ।
चौर्‍यांशीची खाणी भोगताती ॥२॥
आपुला आपण झाला असे वैरी ।
हिंडे दारोदारी भिक मागा ॥३॥
वंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल ।
वाचे बोलती बोल वाउगची ॥४॥


२२

चोखा चोखट निर्मळ ।
तया अंगी नाही मळ ॥१॥
चोखा सुखाचा सागर ।
चोखाभक्तिचा आगर ॥२॥
चोखाप्रेमाची माउली ।
चोखा कृपेची साउली ॥३॥
चोखा मनाचें मोहन ।
वंका घाली लोटांगण ॥४॥


२३

सुखाचा सागर चोखा हा निर्धार ।
काय मी पामर गुण वानूं ॥१॥
धन्य प्रेमपान्हा पाजुनियां मातें ।
केलें असे सरतें आपणामाजी ॥२॥
आनंदी आनंद दाविलासे डोळा ।
दिली जीवनकळा माझी मज ॥३॥
वंका म्हणे माझी प्रेमाची माउली ।
कृपेची साउली केली मज ॥४॥


२४

जें सुख ऐकतां मन तें निवांत ।
तेंचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥
साजिरें गोजिरें श्रीमुख चांगले ।
कर मिरवले कटावरी ॥२॥
समचरण दोनी शोभती पाउले ।
ध्यान मिरवले पंढरीये ॥३॥
आनंदी आनंद सुखाचा सुखराशी ।
घाली चरणासी वंका मिठी ॥४॥


२५

आधींच निर्मळ वदन सोज्वळ ।
विठोबा दयाळ पंढरीये ॥१॥
समचरण गोड गोजिरी पाउलें ।
कर मिरवले कटवरी ॥२॥
ध्यान दिगंबर तुळशीमाळा गळा ।
पांघुरला पिंवळा पीतांबर ॥३॥
वंका म्हणे सर्व सुखाचे आगर ।
तो हा विटेवर विठ्ठल देवो ॥४॥


२६

नकळे योग याग तपादि साधने ।
नेणेची लक्षण यांचे कांही ॥१॥
सुलभ सोपारे नाम आठवितां ।
न पडेची गुंता कर्म धर्म ॥२॥
विधिनिषेधाचें न घेवो ओझें ।
आणीक सहजें नकळे कांही ॥३॥
वंका म्हणे मज नामाचा आधार ।
उतरेन पार भवनदी ॥४॥


२७

मनाचेनि मनें केला हा निर्धार ।
भवसिंधुपार तरावया ॥१॥
नामाची चांगले नामची चांगले ।
जडजीव उध्दरले नेणों किती ॥२॥
नाम निजनौका संताची संगती ।
हेची श्रीपती द्यावी मज ॥३॥
बंका म्हणे देवा पुरवावी आळी ।
देईन जीव बळी संता पायी ॥४॥


२८

हीन याती पतीत दुर्बळ ।
परि तुम्ही दयाळ दिनानाथ ॥१॥
अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा ।
नामाचा भरंवसा त्रिभुवनीं ॥२॥
नाम घेतां कोणी न दिसे वायां गेला ।
ऐसाची गमला भावबळे ॥३॥
वंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा ।
पुरवावा लळा हाची माझा ॥४॥


२९

सांवळे सगुण उभे कर कटीं ।
मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥
शंख चक्र करी ते कटावरी ।
पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥
लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले ।
श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥
वंका म्हणे धन्य देवांचा हा देव ।
वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥


३०

भक्तांची आवडी धरोनी हृषीकेशी ।
उभा पंढरीसी विटेवरी ॥१॥
नामदेवासाठीं दूध पिये वाटी ।
मिराबाईचें घोटी विष स्वयें ॥२॥
जनीचिया संगे दळूं कांडूं लागे ।
चोखामेळ्या संगे ढोरे वोढी ।३॥
वंका म्हणे ऐसा भक्तांचा आळुका ।
ज्ञानियाची देखा भिंत वोढी ॥४॥


३१

पहा हो नवल गोरियाचे घरी ।
कुल्लाळ भीतरीं स्वयें झाला ॥१॥
त्रैलोकी गमन ते झाले गाढव ।
आपुलें वैभव परतें ठेवी ॥२॥
गोणी भरोनियां स्वयें आणी हरी ।
त्याचें साहित्य करी रखुमाई ॥३॥
वंका म्हणे ऐसी आवडी भक्ताची ।
बोलतां वेदांची वाचा मौन्य ॥४॥


३२

कोण भाग्य तया सेना न्हावियाचें ।
नीच काम त्याचे स्वयें करी ॥१॥
घेउनी धोकटी हजामत करी ।
आरसा दावी करी बादशहासी ॥२॥
कसबाचे घरी विकीतसे मांस ।
राका मेहत्यास हुंडी भरी ॥३॥
वंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे ।
तो भक्त सांकडे वारीतसे ॥४॥


३३

आपुल्या भक्तांचा धरोनी अभिमान ।
सगुण निर्गुण रूप धरी ॥१॥
जयाची वासना तेची पुरवीत ।
उभा राहे तिष्ठत बळिचे द्वारी ॥२॥
विदुराचे घरी आवडी खाय कण्या ।
धांवतसे धांवण्या भाजी पाना ॥३॥
वंका म्हणे अंबऋषीकारणें ।
दहा जन्म घेणे गर्भवास ॥४॥


३४

गोकुळी लाघव गौळीयांचे घरी ।
रांगता श्रीहरी स्वयें झाला ॥१॥
दही दूध लोणी चोरोनियां खाये ।
नही म्हणोनि वाहे आण माते ॥२॥
गाई चारी सुखें करीतसे काला ।
ठकवी देवाला ब्रह्मादिकां ॥३॥
वंका म्हणे ऐसा लाघवी सूत्रधारी ।
किर्ति चराचरी वाढलीसे ॥४॥


३५

वासना उडाली तृष्णा मावळली ।
कल्पना गळाली अहंकृती ॥१॥
तोचि भक्त जाणा दया शांति वसे ।
काम क्रोध फांसे न बाधी त्या ॥२॥
मोह ममतेचे तोडोनियां जाळें ।
केलें निजबळें तृणप्राय ॥३॥
वंका म्हणे तोची प्राणाचाही प्राण ।
आणीक प्रमाण नाही मज ॥४॥


३६

येणे जाणें दोनी खुंटले मारग ।
अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥
एक धरिला मनीं पंढरीचा राणा ।
वेदशास्त्र पुराण अकळ तो ॥२॥
आगमनाची आटी निगमा नकळे ।
बहुत शीणले वाखाणितां ॥३॥
वंका म्हणे तो हा पहा विटेवरी ।
पाउलें गोजिंरी कर कटी ॥४॥


३७

नकळे वो माव आगमा निगमा ।
जयाचा महिमा श्रुति शास्त्रां ॥१॥
तो म्यां डोळेभरी पाहिला श्रीहरी ।
भीवरेचे तिरीं विठ्ठलरूप ॥२॥
सुखाचा सागर भक्तांचा कैवारी ।
ब्रीद चराचरी गाजतसे ॥३॥
वंका म्हणे ऐसा जयाचा महिमा ।
सुलभ तो आम्हां भाविकांसी ॥४॥


३८

भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म ।
सुलभ हें नाम विठोबाचें ॥१॥
भवाचा उतार हरिनाम सांगडी ।
जाऊं पैलथडी हेळामात्रें ॥२॥
आनंद सोहळा हरिकथा माउली ।
भाविकां वोळली प्रेमपान्हा ॥३॥
वंका म्हणे माझ हाचि निर्धार ।
येणे संसार देशधडी ॥४॥


३९

ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली ।
खेचरा वोळली कृपासिंधु ॥१॥
ज्ञानदेवा चरणी खेचर शरण ।
नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥
नामदेवें हात चोखियाचे शिरी ।
विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥
वंका म्हणे माझा चोखा गुरु माउली ।
तयाचे पाउलीं लोटांगण ॥४॥

संत बंका अभंग समाप्त


हे पण वाचा: संत बंका यांची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *