chokhamela

संत चोखामेळा अभंग १९१ते३००

संत चोखामेळा अभंग १९१ते३०० – गाथा

१९१
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवर ॥१॥
कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फाकती दशदिशां ॥२॥
वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

१९२
अनादि निर्मळ वेदाचें जें मूळ । परब्रह्म सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटीं राहिलासे उभा । नीळवर्ण प्रभा फांकतसे ॥२॥
आनंदाचा कंद पाउलें साजिरीं । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥

१९३
गोजिरें साजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवलें योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीटकुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥

१९४
व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥
शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥
कटावरी जेणें कर हे ठेविले । ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥
चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद । नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥

१९५
अनाम जयासी तेंचि रुप आलें । उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्‌ठावीस । समचरणीं वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥

१९६
सर्वही सुखाचें ओतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्ही कटीं सम पाय विटे । शोभले गोमटें बाळरुप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचें धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥

१९७
उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्‍त्रां ॥४॥

१९८
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥
साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥
कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥
चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

१९९
ज्या कारणें वेदश्रुति अनुवादती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविका कारणें उभवोनि हात । उदारपणें देत भुक्तिमुक्ती ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्‍त्री शूद्र चांडाळा सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनि स्थिरावला भीमातटीं ॥५॥

२००
सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ देती । गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरुडवाहन हरी देखियेला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तिर विठ्‌ठल उभा ॥४॥

२०१
जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पाहा हो । न कळे ज्याची माव ब्रह्मादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनांचें माहेर । तें पंढरपुर भीमातटीं ॥४॥

२०२
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तिरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रुप हें सांवळें गोड तें गोजिरें । धणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥२

२०३
मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रह्म भुललें । गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे कैसा हा नवलाव । देवाधिदेव वेडावला ॥४॥

२०४
आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रुप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पहा ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा । कासे सोनसळा तेज फांके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रुप मनोहर गोजिरें तें ॥४॥

२०५
ज्या सुखा कारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागीं ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमार्गे । भक्तांचिया पांगे न बैसेचि ॥३॥
युगें अठ्‌ठावीस होऊनियां गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥

२०६
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणी देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

२०७
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्‍ठत पंढरीये ॥१॥
काय करुं प्रेमा न कळे या देवा । गुंतोनियां भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरीं कांहीं चाड । भक्ति सुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥

२०८
अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटीं । उभा वाळुवंटीं भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभापर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळु माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥

२०९
अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोमर्ले किरीट कुंडलें । तेचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पीतांबर कासे सोनसळा विराजे । सर्वांगीं साजे चंदनउटी ॥४॥
मिरवले कर दोनी कटावरी । ध्यान तें त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनि । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥

२१०
दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रुप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरुड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभाउभी कोड पुरवितो ॥५॥

२११
देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवी नाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्‌ठावीस । धरुनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळ । नाचती गोपाळ विठ्‌ठलछंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारीं ॥४॥

२१२
भक्तांचियां लोभा वैकुठं सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जड जीवा उद्धरी नामें एका ॥२॥
बांधियलें ब्रीद तोडर चरणीं । त्रैलोक्याचा धणी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्‌ठल । नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥

२१३
मुळींचा संचला आला गेला कुठें । पुंडलिक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरीये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥

२१४
बहुतांचे धांवणें केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्‌ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रह्मादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरुशनें उद्धरीं जडजीवां ॥४॥

२१५
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्‌ठलनामगजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

२१६
इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळुवंट । संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणीं । घेत पायवणी संताची ॥४॥

२१७
नेणते तयासी नेणता लाहान । थोर थोरपणें दिसे बरा ॥१॥
पोवा आहे वेणु खांदिया कांबळा । रुळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचे । उष्‍टें गोपाळांचें खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठाचा हरी । गोपाळा गजरीं काला वाटी ॥४॥

२१८
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

२१९
भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥
बाराही मार्गाची वणीज्ज करी । पंढर हे पुरी नामदेव ॥२॥
चोखा म्हणे लोटांगणीं जाऊं । नामदेव पाहूं केशवाचा ॥३॥

२२०
चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृताची खाणी ॥२॥
महा पातकी नासले । चोखट नाम हें ॥३॥
महाद्वारीं चोखा मेळा । विठ्‌ठल पहातसे डोळां ॥४॥

२२१
अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्‌ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखा मेळा ॥३॥

२२२
करीं सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
बरवे दिसती जानू । तेथें मिरवे पात्रा कान्हो ॥२॥
पायीं वाजती रुणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥३॥
वाम चरणींचा तोडरु । परिसा उठतसे डोंगरु ॥४॥
दक्षिण चरणींचा तोडरु । जयदेव पदाचा तरु ॥५॥
विटेवरी चरण कमळा । तो हा जाणा चोखा मेळा ॥६॥

२२३
बहुत हिंडलों देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या येरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भुवैकुंठ । मनाचे हे कष्‍ट दूर गेले ॥४॥

२२४
श्रीमुख चांगलें कांसे पीतांबर । वैजयंती हार रुळे कंठीं ॥१॥
तो माझ्या जीवींचा जिवलग सांवळा । भेटावा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धांवणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्‍त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हां रक्षी नानापरी ॥४॥

२२५
कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडीं । अंतरींची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझे मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे तें माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

२२६
वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचे गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळीन जीवें भावें ॥५॥

२२७
न करीं आळस जाय पंढरीसी । अवघी सुख राशि तेथें आहे ॥१॥
पाहातां भिंवरा करीं एक स्नान । घालीं लोटांगण पुंडलीका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखा सरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे तहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

२२८
बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकाचा ॥१॥
जात वित्त गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥
न मागतां आभारी आपेंआप होतो । भाविकासी देतो भुक्तिमुक्ति ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरुशनें ॥४॥

२२९
जया जे वासना ते पुरवीत । आपण तिष्‍ठत राहे द्वारीं ॥१॥
बळीचिया भावा द्वारपाळ होय । सुदाम्याचें खाय पोहें सुखें ॥२॥
विदुराचें घरीं आवडीं कण्या खाय । हात पसरिताहे भाजी पाना ॥३॥
गौळियाचे घरीं करीतसे चोरी । काला स्वयें करी गोपाळांसी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा नाटकी श्रीहरी । तोचि हा पंढरी भीमातटीं ॥५॥

२३०
सुखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
नलगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

२३१
नाम हें सोपें जपतां विठ्‌ठल । अवघेंचि फळ हाता लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्‍ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥

२३२
महादोषराशि पापाचे कळप । नामें सुखरुप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करुं नका कोणी । नाम जपा वाणीं सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करुं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जेवितां वाचे । नाम श्रीविठ्‌ठलाचें उच्चारावें ॥४॥

२३३
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेर्णे सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायीक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणीं तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशीं । येणें सदा सुखीं होसी जना ॥४॥

२३४
भेदाभेद कर्म नकळे त्याचें वर्म । वाउगाचि श्रम वाहतां जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्‍त्राचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच नकळे । विठ्‌ठलाचे बळें नाम घेतो ॥४॥

२३५
त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुता परी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्‌ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

२३६
आम्हां अधिकार उच्छिष्‍ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपेरें विठोबाचे नाम । आणिक नाही वर्म दुजें काही ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें । संताच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

२३७
आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद । शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्‍टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

२३८
योग याग तप व्रत आणि दान । करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥
सुलभ सोपेरें नाम विठोबाचें । सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥
येणें भवव्यथा तुटेल जीवाची । प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥
म्हणोनि नामाचा करा गदारोळा । म्हणे चोखामेळा विठ्‌ठल वाचे ॥४॥

२३९
आणिक दैवतें काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगतां सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटनी । न लगे तीर्थाटणीं काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥

२४०
नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्‌ठल विठ्‌ठल । नको काळ वेळ जपे आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

२४१
गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥
नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥
ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥

२४२
केला अंगीकार । उतरिला भार ॥१॥
अजामेळ पापराशी । तोही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंची तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥

२४३
शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप । तोहा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकीं तरिलें । जड जीवा उद्धरिलें ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं । चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥

२४४
अवघ्या साधनांचें सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी । सांगूं गोष्‍टी सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥

२४५
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशीं रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा नलगे सायास । जया रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठीं जप हा सर्वदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वां अधिकर । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

२४६
राम हीं अक्षरें सुलभ सोपींरे । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिकां नाहीं अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपेरें । जपावें निर्धारें एका भावें ॥५॥

२४७
कोणासी साकडें गातां रामनाम वाचे । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं । ऐसी साक्ष देती वेदशास्‍त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

२४८
अवघें मंगळ तुमचें गुण नाम । माझा तो श्रम पाहतां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
यापरतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥

२४९
न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांहीं नेणें । आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें । नाहीं उरलें दुःखातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामें पैलपार तरेन ॥४॥

२५०
अवघा आनंदा राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥
काम क्रोधांचें न पडती आघात । वाचे गातां गीत रामनाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥

२५१
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशीं रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा नलगे सायास । जया रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठीं जप हा सर्वदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वां अधिकर । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

२५२
राम हीं अक्षरें सुलभ सोपींरे । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिकां नाहीं अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपेरें । जपावें निर्धारें एका भावें ॥५॥

२५३
कोणासी साकडें गातां रामनाम वाचे । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं । ऐसी साक्ष देती वेदशास्‍त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

२५४
अवघें मंगळ तुमचें गुण नाम । माझा तो श्रम पाहतां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
यापरतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥

२५५
न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांहीं नेणें । आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें । नाहीं उरलें दुःखातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामें पैलपार तरेन ॥४॥

२५७
अवघा आनंदा राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥
काम क्रोधांचें न पडती आघात । वाचे गातां गीत रामनाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥

२५८
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा । रामनाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी काया क्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यासिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांतीं नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥

२५९
वोखटे गोमटे असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रह्म येचि अर्थीं ॥२॥
योगयोगादि जपतप कोटी । एक नाम होटीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्‍टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥

२६०
विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरी कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

२६१
सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्‍ताईचा भाव विठ्‌ठलचरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णवजन ॥३॥
चोखा तयां पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥

२६२
संतांचा अनुभव संतचि जाणति । येर ते हांसती अभाविक ॥१॥
नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणे । जन्म मरण पेणें खुंटविलें ॥२॥
सेवेचा प्रकार जाणे हनुमंत । तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥
सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली । ऐक्य रुपें चाली मिरवली ॥४॥
चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्‍ठाचार । तेथें मी पामर काय वानूं ॥५॥

२६३
आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांहीं ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळहळ त्रिविधताप ॥३॥
चोखा म्हणे आनंद वाटलासे जीवा । संतांचे पाय केशवा देखियेले ॥४॥

२६४
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनची ॥१॥
संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेचि होती ॥२॥
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ॥३॥

२६५
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें उडालें पाहणें लपालें । देवें नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्र्दयींच भेटे देहीं देव ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरीं ॥४॥

२६६
देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥
डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥
नवल वाटलें नवल वाटलें । देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४॥

२६७
नवल पाहीं नवल पाहीं । पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेंच ठाईं ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपालें । ह्रुदयीं बिंबलें ह्रुदयची ॥३॥

२६८
डोळियाचा देखणा पाहतां दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटीं ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपोआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥

२६९
फुलाचे अंगी सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृतिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटलें घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं । विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥४॥

२७०
आमुचा आम्हीं केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्ताचा अंकित म्हणूनी झाला ॥४॥

२७१
देहबुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं । देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥
चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक । सहज मीपण देख मावळलें ॥४॥

२७२
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिले । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळिलें । शास्‍त्रातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहींच भेटला देव आम्हां ॥४॥

२७३
देहीं देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तोहा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणि निजांगना ॥२॥
आकारलें तितुकें नासे । आत्मा अविनाश विठ्‌ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्‌ठल ह्रुदयीं ध्यायीं । चोखामेळा जडला पायीं ॥४॥

२७४
कोणें देखियेलें जग । पांडुरंग मी नेणें ॥१॥
मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधीं कैर्चे दोन । मजपासुन मी नेणें ॥३॥
चोखामेळा म्हणती संत । हेही मात उपाधी ॥४॥

२७५
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्‌ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियांची राहाटी विठ्‌ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन जेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्‌ठल माझा ॥३॥
आनंदीं आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्‌ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कुळ । चोखा म्हणे निजफळ विठ्‌ठल माझा ॥५॥

२७६
निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्‍त्रा बोल विठ्‌ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्‌ठल हा ॥२॥
निगम कल्पतरु भक्तांचा मांदुस । तोहा स्वयंप्रकाश विठ्‌ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचे जीवन । संताचें मनरंजन विठ्‌ठल हा ॥४॥

२७७
सकळा आगराचें जें मूळ । तोहा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्‍त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या ह्रुदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥

२७८
अखंड समाधी होउनी ठेलें मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥

२७९
निर्गुणा अंगीं सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गाबाळ अवघी काहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळीयलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

२८०
उपजले विटाळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं तेही जाती ॥१॥
रडती पडती तेही वेगे मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळीं ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंतीं यम फांसा गळां पडे ॥४॥

२८१
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंतीं अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळ परतें आहे कोण ॥४॥

२८२
नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोंवळा कोठें तो वोवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोंवळ्यांचे ठाईं सोंवळा आहे । वोवळ्या ठाईं वोवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्‍टीभरी ॥४॥

२८३
वेदासी विटाळ शास्‍त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रह्मीया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंतीं ॥४॥

२८४
कोण तो सोंवळा कोण तो वोवळा ।दोहींच्या वेगळा विठ्‌ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचांचा विटाळ एकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्‌ठल सोंवळा । अरुपें आगळा विटेवरी ॥४॥

२८५
काळाचा विटाळ जीवशिवा अंगी । बांधलासे जगी दृढ गांठी ॥१॥
विटाळीं विटाळ चवदाही भुवनें । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दुःखासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचें अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

२८६
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

२८७
पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

२८८
जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें । जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी । करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥

२८९
श्वान अथवा शूकर हो का मार्जार । परि वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्‍ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकें ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥

२९०
इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥

२९१
आतां याचा अर्थ पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवळा तुम्हांलागीं ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांहीं न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवळा तुम्हांलागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावि आस मायबाप ॥४॥

२९२
आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रह्मादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविट हा खेळ । भुललें सकळ ब्रह्मांडचि ॥४॥

२९३
बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख-दुःख लेशे भोगोनियां ॥१॥
मागिला लागाचें केलेंसें खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर तेही केले देशधडी ॥४॥

२९४
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगातें । निचेष्‍ट निरुतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हातां । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥

२९५
बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपे वर्म । अवघे कर्माकर्म पारुषती ॥२॥
यापरतें साधन आन कांहीं नेणें । अखंड वाचें म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं । राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥

२९६
आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोंसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें तें झालें असो कां उदास । धरोनियां आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांहीं ॥४॥

२९७
कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्‍ठुर झाला तुम्ही ॥१॥
मी तो कळवळोनी मारितसे हाक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
बोलोनी उत्तरें करीं समाधान । येवढेंचि दान मज द्यावें ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करीं उदास माझे माये ॥४॥

२९८
नेणो तुमचें मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्वकर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करुं । तेणें पडे विचारु पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण । मताचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करुं तें आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥

२९९
समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्‍टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥

३००
अगाध हे कीर्ति विठ्‌ठला तुमची । महिमा आणिकाची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *